आजकाल लग्न समारंभांचे प्रस्थ वाढले आहे. लग्न करण्यासोबतच ते गाजवण्याची फॅशन आलेली आहे. त्यामुळे लग्नासंबंधित खानपान सेवा, केशभूषा, वेशभूषा या सगळ्यालाच प्रचंड भाव प्राप्त झालेला आहे. त्यातही लग्न समारंभ म्हटला की त्यामध्ये नवरा-नवरीइतकाच महत्त्वाचा असतो तो छायाचित्रकार. त्यामुळेच लग्नाच्या छायाचित्रण व्यवसायाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. यामध्ये अतिशय उत्तम असे मानधनही मिळते.

फक्त लग्नविधी आणि आलेल्या पुतळ्यासारखे उभे राहिलेल्या पाहुण्यांची छायाचित्रे काढणे म्हणजेच लग्नाचे छायाचित्रण ही संकल्पना आता पुरतीच कालबाह्य़ झालेली आहे. लग्नाआधी, लग्नामध्ये, लग्नानंतर वधू-वर आणि जमलेल्या पाहुण्यांची अतिशय नैसर्गिक, अकृत्रिम छायाचित्रे काढणे ही नवी व्याख्या आता रूढ होत आहे. यामध्ये फक्त कार्यालयात किंवा घरातच नव्हे तर घराबाहेरही छायाचित्रे काढली जातात. यामध्ये छायाचित्रकाराला आपली एक शैली विकसित करावी लागते. त्यासाठी सुरुवातीला छायाचित्रणातील मूलभूत बाबी समजून घ्याव्या लागतात. त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रकाशयोजना आणि छायाचित्रण तंत्रावरील काही कार्यशाळांतून त्याचे ज्ञान घ्यावे लागते.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
special helmets for soldiers
कुतूहल : सैनिकांसाठी खास हेल्मेट..
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी

या छायाचित्रकारासाठी महत्त्वाचे म्हणजे त्याने उत्स्फूर्त असायला हवे. लाजणारा, अबोल छायाचित्रकार इथे उपयोगाचा नाही. त्याने एक तर वधू-वर आणि पाहुण्यांच्या नकळत त्यांचे भाव टिपायला हवेत किंवा बोलून त्यांना खुलवायला हवे, त्यांची छायाचित्रकाराशी मैत्री झाल्याशिवाय नैसर्गिक भाव असलेले छायाचित्र मिळणे कठीण होते. या छायाचित्रकाराकडे प्रचंड संयम हवा. सर्व प्रकारच्या लोकांशी जमवून घेण्याचे तंत्र त्याला जमले पाहिजे. समारंभात मोकळेपणाने वावरता आले पाहिजे. या प्रकारात छायाचित्रकाराला सर्वच प्रकारची यंत्रसामग्री विकत घेणे गरजेचे नाही तर काही वेळा ती त्याला भाडय़ानेही आणता येते. अद्ययावत छायाछपाई तंत्राचे त्याला ज्ञान हवे.

पण या क्षेत्रात चिक्कार स्पर्धा आहे. तशी ती सर्वच क्षेत्रांत आहे, पण लग्नाच्या छायाचित्रणात ती जरा जास्तच आहे. कारण हे काम नाजूक आहे. त्यामध्ये ग्राहकांच्या भावना गुंतलेल्या असतात. एक वेळ औद्योगिक किंवा खाद्यचित्रणामध्ये तुम्हाला एखादे छायाचित्र परत घेता येईल. पण लग्नाचे तसे नाही. ती वेळ पुन्हा येत नाही. त्यामुळे वधूवरांचे ते भाव टिपणे, त्या वेळी साधायलाच हवे. प्रेमापासून लग्नापर्यंतचा एखाद्या जोडप्याचा प्रवास दाखवताना छायाचित्रकाराला कल्पकता वापरायला हवी. जेणेकरून या गोड आठवणींचा एक देखणा संग्रह तयार होईल. प्री-वेडिंग शूट आणि वेडिंग शूट आवडल्यास काही जोडपी हनिमून शूटसाठीही त्याच छायाचित्रकाराला विचारणा करतात. कारण हल्ली प्री-वेडिंगप्रमाणेच हनिमून शूटचीही हौस वाढत आहे.

पण लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आता लग्नाचे छायाचित्रण हे एका माणसाचे काम राहिलेले नाही. किमान २-३ छायाचित्रकार एकत्र येऊन ते करतात. म्हणजे कुणी वधू-वरांचे छायाचित्र काढतो कुणी पाहुण्यांचे, कुणी सजावटीचे. कारण लग्नसमारंभ मोठा झाल्याने एका माणसाला सगळीकडे धावाधाव करणे शक्य होत नाही. लग्न जर आणखीच भव्य-दिव्य असेल तर चक्क १२-१५ छायाचित्रकारही त्यासाठी टीम म्हणून काम करतात. हे छायाचित्रण करताना फक्त छायाचित्रच नव्हे तर चलचित्रण (व्हिडीओ) करण्याचेही ज्ञान आवश्यक आहे. या वेळी एक लक्षात ठेवले पाहिजे की लग्नातल्या प्रत्येक छायाचित्रात प्रत्येकालाच सुंदर दिसायचे असते, त्यामुळे वेगवेगळ्या कोनांतून देखणे छायाचित्र घेणे ही छायाचित्रकाराची कसोटीच असते. या प्रकारामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची आणखी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार तुम्हाला तुमच्या कामात बदल करावा लागतो. काही घरांमध्ये परंपरांना महत्त्व असते, तर काही घरांमध्ये साजरीकरणाला स्थान असते. त्या त्या घराप्रमाणे त्यांच्या त्या समारंभाचे उत्कृष्ट छायाचित्रण करणे हे छायाचित्रकाराचे काम आहे. लग्नाचे छायाचित्रण हा कधीही न संपणारा विषय आहे. कारण वर्षभर कुठे ना कुठे लग्न चालूच असतात. त्यामुळे एक काम उत्तम केलेत तर तुमचे चांगले नाव तयार होईल आणि तुमच्याकडे नक्कीच उत्तम कामे येत राहतील.

प्रशिक्षण देणाऱ्या संस्था

  • फोकसएनआयपी focusnip.com/focusnip
  • उडान ( udaan.org.in )

dilipyande@gmail.com