30 May 2020

News Flash

नीसमध्ये नाटक

नीस या गावाचे मुख्य दोन भाग आहेत. एक ओल्ड नीस आणि दुसरं नवीन नीस.

चिलीच्या एका महिन्याच्या दौऱ्यानंतर लगेचच फेब्रुवारीमध्ये आम्ही दुबईला प्रयोग करून फ्रान्सच्या दक्षिणेला असलेल्या नीसला आलो. त्याला फ्रेंच रिव्हिएरा असंही म्हणतात. हा फ्रान्सच्या दक्षिणेचा भाग अतिशय सुंदर आहे. हा भाग पॅरिसपेक्षा जरा कमी थंड आहे. इथे बर्फ पडत नाही. चार-पाच डिग्रीपेक्षा तापमान जास्त खाली जात नाही. आम्ही गेलो तेव्हा फेब्रुवारी महिना होता, त्यामुळे हवामान थंड होतं. कान, ग्रास, मोनॅको, मोंन्टेकालरे ही सगळी इथली शहरं. त्यातलंच एक नीस. नीस या गावाचे मुख्य दोन भाग आहेत. एक ओल्ड नीस आणि दुसरं नवीन नीस. हे सुंदर, श्रीमंत आणि शांत शहर आहे. काही लोक या शहराला पेन्शनरांचं शहर असंही म्हणतात. फ्रेंच लोक तर पैसे साठवून या भागात सुट्टय़ांसाठी येतात आणि आणि मला तर माझ्या कामामुळेच ही संधी मिळाली होती.

नॅशनल थिएटरच्या आर्टिस्टिक डिरेक्टर, इरिना ब्रूकने आमच्या थिएटर कंपनीला आमंत्रण दिलं होतं. इरिना ब्रूक या स्वत: एक उत्तम अभिनेत्री तर आहेतच, शिवाय त्या सुप्रसिद्ध दिग्दर्शक पीटर ब्रूक यांच्या कन्या आहेत. हे सांगणं गरजेचं आहे, कारण पीटर ब्रूक यांनी नाटकाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली आहे. त्यांच्या कामाचा जगभरातल्या रंगकर्मीवर खूप प्रभाव आहे.

हा दौरा तसा छोटा होता. आमचे चार प्रयोग होते आणि आम्ही इथे एकूण सात दिवस होतो. पुढे आम्ही सगळे पॅरिसला फिरायला जाणार होतो.

पहिलाच दिवस होता. दुबईचे प्रयोग आणि प्रवासाचा थकवा अजून गेला नव्हता. रूममध्ये आराम करून मी आणि तृप्ती बाहेर पडलो. तृप्ती खामकर ही एक अत्यंत गुणी अभिनेत्री आहे. ती आणि मी दौऱ्यावर असताना नेहमी एका खोलीत राहतो. आम्ही खूप काळ दौऱ्यावर असतो तेव्हा ती मला म्हणते की ‘‘या महिन्यात तू तुझ्या नवऱ्यापेक्षा जास्त वेळा माझ्यासोबत रूम शेअर केलीएस.’’ ती माझ्यापेक्षा वेगळ्या स्वभावाची असूनही आमचं चांगलं जमतं. तिला आम्ही सगळे जी.पी.एस. म्हणतो. तिला कुठल्याही शहरात न्या, सगळे रस्ते कळतात आणि लक्षात राहतात. तर, मी आणि तृप्ती सहज फिरत फिरत गेलो आणि बघतो तर समोर निळाशार भूमध्य सागर (मेडिटेरेनिअन सी), आणि त्याचा दगडांचे गोटे असलेला किनारा. थंडी खूप होती, त्यामुळे वॅल पॅरासो, चिलेसारखं (प्रशांत महासागर) समुद्रात डुंबता नाही आलं, पण हात-पाय पाण्यात बुडवलेच. हा जगातला एकमेव समुद्र जो सगळ्यात जास्त भूभागाने वेढलाय. हा जगातला सगळ्यात खारट असलेला समुद्र.. निळा, शांत अगदी प्रशांत महासागराच्या विरुद्ध स्वभावाचा, मला माझ्या डोळ्यांसमोर दिसत होता. माझ्या मनाने तेव्हा ठरवलं की आपण जगातले सगळे समुद्र पाहायचे आणि त्यात पूर्ण जरी डुंबता आलं नाही तरी हात किंवा पाय बुडवायचेच. समुद्र जवळच असल्यामुळे पुढचे काही दिवस त्याचं दर्शन होतंच राहणार होतं, त्याची साथ सारखी असणार होती.

दोन दिवसांनी प्रयोग होता, त्यामुळे तोपर्यंत सगळ्यांनी काही ठिकाणं पाहू या असं ठरवलं. सगळीकडे बसने जात होतो. आतापर्यंत ज्या ज्या देशात गेले होते, त्या सगळ्या देशांमध्ये सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था अत्यंत उत्तम होती. ट्राम, बस, सबवे, ट्रेन हे सगळे प्रकार अत्यंत माफक तिकीट दरात उपलब्ध होते. ग्रास हे गाव बघायला जायचं असं ठरलं. हे गाव पफ्र्युमरीजसाठी प्रसिद्ध आहे. तिथल्या फ्रेमोगार्ड नावाच्या पफ्र्युमरीमध्ये गेलो. तिथे त्यांनी आम्हाला पफ्र्युम कसा बनवतात हे दाखवलं. तिथे मला पहिल्यांदाच कळलं की ‘वास’ या विषयावरही इन्स्टिटय़ूट्स आहेत. पफ्र्युमरला फ्रेंचमध्ये ‘ला नेझ’ असं म्हणतात. थोडक्यात कानसेन असतो तसा ‘नाकसेन’ तयार करतात.

‘आल्प्स पर्वत.. महाकाय. त्यांचं अस्तित्वच पुरेसं आहे. असे हे पर्वत’, हे वाक्य माझ्या ‘गजब कहाणी’ नाटकातलं. नाटकात हे वाक्य म्हणताना हिमाच्छादित पर्वत डोळ्यासमोर यायचे खरे, पण जेव्हा मी त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं तेव्हा त्याच्या महाकाय असण्याची व्याप्ती कळली. आम्ही सगळे मिळून आरोन या ठिकाणी पोचलो आणि रोपवेने वर गेलो.. आणि मी पहिल्यांदा एवढा बर्फ पाहिला.. अनुभवला. ते दृश्य माझ्या डोळ्यात मावेना. मन भरतच नव्हतं. बघतच बसावं असं वाटत असतानाच शेवटच्या बसची वेळ झाली आहे हे लक्षात आलं आणि तिथून निघून खाली आलो. परतीच्या प्रवासात सगळे अगदी शांत बसले होते. निसर्ग आपल्याला गप्प करून टाकतो. अगदी नाटकवाल्यांनाही.

प्रयोग सुरू झाले. या वेळेस फ्रेंचमध्ये नाटकाचा अनुवाद झाला होता. नाटकाचा प्रयोग एका मोठय़ा, सुसज्ज थिएटरमध्ये होता. प्रयोग करताना फार काही प्रतिसाद नव्हता. ऊझेनसारखाच अनुभव होता. फ्रेंच लोक शिष्ट असतात असं ऐकलं होतं, पण त्याचा आता प्रत्यक्ष अनुभव येत होता. नाटकानंतर साधारण पाच वेळा आम्हाला कर्टन कॉल घ्यावा लागला. ती इथली पद्धतच आहे. नाटक आवडलं, तर प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवत राहतात आणि कलाकार वाकून अभिवादन करून आत जातात. जोपर्यंत टाळ्या वाजत राहतात तोपर्यंत कलाकार आत-बाहेर करत राहतात. अनेक नाटकांत तर कर्टन कॉल बसवला जातो. काही लोकांना नाटकाचं फ्रेंच भाषांतर आवडलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की भाषा प्रमाण नाही आहे. ते बरोबरच होतं, कारण आमचा हिंदी अनुवादही बोलीभाषेत होता. त्यामुळे अनुवादही तसाच झाला होता. पण कदाचित तो लहेजा प्रस्थापित लोकांना मान्य नसावा. आपल्याकडे अजूनही प्रमाणभाषा बोलणाऱ्यांना (प्रस्थापित समाज), जरा कोणी ‘आणि’ला ‘आनि’ किंवा ‘पाणी’ला ‘पानी’ म्हटलं की त्रास होतोच की. नाही का?

प्रयोग सुरू झाल्यामुळे फार फिरणं शक्य नव्हतं; म्हणून मी आणि तृप्तीने ओल्ड नीस बघायचं ठरवलं. तृप्तीची अजून एक खासियत म्हणजे तिचे जगात सगळीकडे मित्र-मैत्रिणी असतात. त्यातलाच एक तिचा फक्त चौऱ्याऐंशी वर्षांचा तरुण मित्र पिअर. तो तिच्या मैत्रिणीचा मित्र. त्याने आम्हाला ओल्ड नीस दाखवलं आणि त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळंच नीस तिथे राहणाऱ्या माणसाच्या नजरेतून दिसलं. पिअर स्वत: जगभर फिरतो. फोटो काढतो. लिहितो. त्याचा उत्साह माझ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त होता. मी तर त्याच्या प्रेमातच पडले. आणि त्याच्यामुळे नीसच्याही. त्याने आम्हाला मार्केटमध्ये नेऊन तिथली वैशिष्टय़ं दाखवली. मिमोसा फुलाला फ्रेंच रिव्हिएराचा दागिना मानलं जातं. पूर्ण बाजार त्या फुलांनी भरला होता. तिथल्या मजुरांचा एकेकाळचा आहार असलेला सोक्का नावाचा पदार्थ खाल्ला. मग नीसच्या गल्ल्या-बोळांमधून फिरत असताना त्याने आम्हाला एक म्युरल दाखवलं. त्याची फार मजेशीर दंतकथा सांगितली. त्यात एक बाई (कॅथेरीन सेग्युरें) होती जिच्या एका हातात धोपटणं आणि दुसऱ्या हातात झेंडा होता. पिअरने सांगितलं की ती बाई एक धोबीण होती जिने तुर्काविरुद्धच्या युद्धात शत्रू सैन्यातील लोकांना स्कर्ट वर करून स्वत:चा पाश्र्वभाग दाखवून पळवलं.

मग त्यानं आम्हाला एका जुन्या इमारतीपाशी नेलं. तिथल्या प्रवेशद्वारावर फ्रेंचमध्ये काही लिहिलं होतं. त्यानं सांगितलं की, हे पूर्वी वेश्याघर होतं. त्या प्रवेशद्वारावरच्या दगडावर कोरलं होतं की, ‘जो इथे प्रवेश करेल, तो खरा शूर असेल.’ मग त्याने आम्हाला ओल्ड नीसच्या सगळ्यात उंच ठिकाण्ी नेलं, तिथून सगळं नीस दिसत होतं. तेव्हा कुठे माहीत होतं काही महिन्यांतच इथे एका मोठय़ा बॉम्बस्फोटात खूप लोक मारले जाणार आहेत!

या दौऱ्यात नाटकात राजाची भूमिका करणाऱ्या सागर देशमुखचं (माझा जिवलग मित्र) पाकीट चोरीला गेलं. त्याला खूप मोठा आर्थिक फटका बसला. मागे चिलीमध्ये नाटकात गाण्यांना साथसंगत करणाऱ्या राहुल शर्माचं पाकीट आणि पासपोर्ट चोरीला गेला होता. या दौऱ्यात माझी व्यायाम करताना पाठ दुखावली. याचबरोबर पाऊस सुरू झाला. थंडी वाढली. प्रयोग संपवून आम्ही सगळे कलाकार पॅरिसच्या वारीला निघालो.

मला नेहमी वाटतं की माझ्या कामामुळे मी इतकं फिरू शकतेय, नाहीतर मी तशी घरकोंबडीच आहे. मला नाटकाने खूप शिकवलंय. माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढलंय. माझं काम माझ्यात बदल घडवतंय, मला समृद्ध करतंय म्हणून मला माझ्या कामात खूप आनंद मिळतो.

पॅरिस म्हणजे कलाकारांची पंढरीच. तिथे जाऊन जगातल्या अजून एका आश्चर्याचं दर्शन होणार होतं. आयफेल टॉवर हे ‘पिया बहुरुपिया’च्या दौऱ्यातलं दुसरं आश्चर्य दर्शन. पण त्याहून आतुरतेने मी वाट पाहात होते ते त्या पॅरिसला भेट देण्याची. अनेक कलाकारांचं प्रेरणास्थान असलेलं हे शहर.. व्हॅन  गॉग, पिकासो, मॉनेट, दाली, देगा हे सगळे ज्या ठिकाणी जमायचे ते मोंमार्त बघायचं होतं. तिथली संग्रहालयं- मूस द ओरसे, लुव्र, पॉम्पेदू, मूस रोदीन, मूस पिकासो, सेन नदीचा किनारा, साR कार- नोत्र दाम ही गिरिजाघरं, फॅशन, खाणं-पिणं, मुलारुज हे सगळं मला खुणावत होतं. ‘पिया बहुरुपिया’त मी एक गाणं म्हणते. त्यात प्रेयसी प्रियकराच्या आगमनाची वाट बघतेय आणि त्यासाठी तयारी करतेय. चौक सजवतेय, डोळ्यात काजळ घालतेय. तिला हुरहुर लागलीये की कधी ती प्रियकराला भेटेल. मन व्याकूळ झालंय त्याच्या भेटीसाठी. तसंच काहीसं पॅरिसच्या भेटीसाठी माझं झालं होतं.

‘चोक पुरावो, माटी रंगावो,
आज मेरे पिया घर आवेंगे
खबर सुनाऊ जो,
खमुशी रे बताऊ जो,
आज मेरे पिया घर आवेंगे.’
गीतांजली कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2016 1:22 am

Web Title: %e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87 %e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%95
Next Stories
1 चिलेतला अनुभव
2 सेलेब्रिटी लेखक : वूझेन अनुभव!
3 सेलेब्रिटी लेखक : पिया बहरुपिया
Just Now!
X