News Flash

चिलेतला अनुभव

अतुल कुमारला स्वत:ला नाटक आणि त्या नाटकाला घेऊन प्रवास करणं खूप आवडतं.

‘पिया बहरुपीया’चे प्रयोग विविध देशांमध्ये घडवून आणण्यामागे दोन जणांचा हात आहे, एक शेक्सपिअर आणि  दुसरा आमचा निर्माता-दिग्दर्शक अतुल कुमार. शेक्सपिअरची नाटकं जगात सगळ्या भाषांमधून अनुवादित तर झाली आहेतच, शिवाय त्यांचे प्रयोग आजही केले जातात. गेली ४०० र्वष लोक त्याची नाटकं वाचतायेत, करतायेत, पुन्हा  पुन्हा शोध घेतायेत. आमच्या नाटकाचा पहिला प्रयोगही, २०१२ साली लंडनच्या कल्चरल ऑलिम्पिकसाठी ‘ग्लोब थिएटर’मध्ये झाला. तो ‘ग्लोब टू ग्लोब’ फेस्टिवलचा भाग होता, ज्यात जगातल्या ३७ भाषांमधून शेक्सपिअरची ३७ नाटकं दाखवली गेली होती. या ‘बार्ड ऑफ एवॉन’ (शेक्सपिअर) ने आम्हाला नाटक तर दिलंच, पण ते त्याचं होतं म्हणून आम्हाला आमंत्रणं येत  होती.

बार्डने आपलं काम करून ठेवलंय. पण सगळ्यांना त्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवाव्या, यासाठी जगभरात अनेक दिग्दर्शक, कलाकार, निर्माते धडपडतायेत. त्यातलाच एक अतुल कुमार. अतुल कुमारला स्वत:ला नाटक आणि त्या नाटकाला घेऊन प्रवास करणं खूप आवडतं. स्वत: नट असल्यामुळे त्याला प्रयोग जास्तीत जास्त व्हावेत, असं वाटतं. तो स्वत: महोत्सवांचे डिरेक्टर, विविध देशांतल्या थिएटर्सचे आर्टिस्टिक डिरेक्टर, कलाकार अशा सगळ्यांशी सतत संपर्कात राहतो आणि आपल्या नाटकाबद्दल माहिती तर पाठवतोच, पण त्याचा पाठपुरावाही करतो. या सगळ्याला प्रचंड वेळ आणि मेहनत लागते.

सॅन्डबॉक्स कलेक्टिव्ह आणि कंपनी थिएटर (म्हणजे आमच्या नाटकाची संस्था), यांनी मिळून, चिले या दक्षिण अमेरिकेतल्या एका देशात १० प्रयोग मिळवले. हे प्रयोग एका मोठय़ा महोत्सवाचा (ते अत्रो अ मिल /सँटियागो अ मिल) भाग होते, ज्यात जवळ जवळ ७० नृत्यं, नाटकं आणि संगीत यांची सादरीकरणं होणार होती.

हा आमचा तोपर्यंतचा सगळ्यात मोठा प्रवास आणि सगळ्यात मोठा दौरा असणार होता. आम्ही २८ डिसेंबर २०१४ ला निघालो आणि ३१ डिसेंबरला पोचलो. मुंबई-पॅरिस- सँटियागो असा प्रवास होता. ४८ तासांच्या प्रवासानंतर आम्ही सँटियागोला पोचलो. पुढचे दहा दिवस सँटियागोत राहाणार होतो. आमची सोय एका अपार्टमेंट हॉटेलमध्ये केली होती, जे अगदी मुख्य शहरात (डाउनटाउन) होतं. त्यामुळे खाण्याची ठिकाणं, प्रवास, खरेदी यासाठी खूप सोयीस्कर होतं. पुढे २२ दिवस आम्ही या देशात-सँटियागो, ईकीके आणि अँटोफॅगस्ता या शहरांमध्ये आणि त्यांच्या आजूबाजूच्या गावांमध्ये प्रयोग करणार होतो.

आम्ही ३१ डिसेंबरला दुपारी सँटियागोत पोचलो. खरं तर प्रवास आखताना असंच ठरवलं होतं की ३१ ची रात्र सँटियागोमध्ये घालवायची म्हणजे नवीन वर्षांचं स्वागत करता येईल. आम्हाला असं कळलं होतं की सगळं शहर चौकात जमा होतं आणि नवीन वर्षांचं स्वागत करतं. आम्हीही त्यात सामील व्हायचं ठरवलं. रात्रभर आम्ही सगळे त्या चौकात, जिथे आम्हाला कोणीही ओळखत नव्हतं, जिथली भाषा आम्हाला येत नव्हती, जे ठिकाण आमच्यासाठी नवीन होतं अशा जागी आम्ही नवीन वर्षांचं स्वागत केलं. रात्रभर त्या शहरात आम्ही फिरत होतो. जेटलॅगमुळे झोप तर येतच नव्हती. दक्षिण अमेरिका, दक्षिण गोलार्धात येत असल्या कारणाने इथे डिसेंबर असूनही उन्हाळा होता. त्यामुळे वातावरण अगदी छान होतं. फार थंड नाही की फार गरम नाही. या रात्रीच्या भ्रमंतीत हेही लक्षात आलं की इथले लोक एकदम मनमोकळे आहेत. साधारण गोव्यातल्या संस्कृतीची आठवण झाली- सुशेगात ..सावकाश आणि आनंदाने जीवन व्यतीत करणे. संगीत आणि नृत्य इथल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे इथं आमचं नाटक लोकांना आवडेल असं वाटत होतं. चिलेची राष्ट्रभाषा स्पॅनिश आहे. त्यामुळे यावेळेस सबटायटल्स स्पॅनिशमध्ये होती.

सँटियागो आणि आजूबाजूच्या गावांमध्ये सात, इकिकेमध्ये एक आणि अंतोफागास्तामध्ये दोन, असे दहा प्रयोग ठरले होते. यामध्ये एक-दोन दिवसांचे ब्रेकही होते. त्यात आम्ही फिरायचं आणि महोत्सवातली इतर सादरीकरणं बघायची असं ठरवलं. या दौऱ्यात आमचा एखाद्दुसरा प्रयोगच बंदिस्त ठिकाणी झाला. बाकी सगळे प्रयोग खुल्या आणि अनौपचारिक जागेत झाले. चौकात, बागेत (पार्क), रस्त्यात आणि एक तर चक्क बुल फाइटच्या अरिना थिएटरमध्ये झाला. पूर्ण दौऱ्यात आपण जणू त्या लोकांमधले आहोत असंच वाटत होतं. इथले लोकही आपल्याच वर्णाचे, त्यामुळेही फार फरक वाटत नव्हता. नाटकाला सगळं कुटुंबच यायचं. अगदी बाबागाडीतल्या पोरांना घेऊन. सगळं माहौल कार्निवल किंवा कुठल्या उत्सवासारखा असायचा.

रांकागुआ नावाच्या गावात, जिथे पूर्वी बुल  फाईट होत असे, त्या अरिना थिएटर मध्ये प्रयोग केला. मेकअप रूममधून स्टेजपर्यंत जायला ही गाडी ठेवली होती, एवढं मोठं ते थिएटर होतं. तिथे प्रयोग करताना आपण रॉकस्टार असल्यागत वाटत होतं. पाच हजार प्रेक्षक, मोठाले स्क्रीन्स, हेड माईक्स, सगळंच भव्य होतं. मला वाटून गेलं की हे लोक, एक परभाषिक नाटक बघायला आले आहेत. यांना समजा कळलं नाही किंवा कंटाळा आला, तर हा एवढा मोठा जनसमुदाय काय करेल? मला थोडी भीती वाटत होती. तसं आत्तापर्यंत इथे, आम्ही पार्क, चौक आणि रस्त्यांवर प्रयोग केले होते. कुठेच वाईट अनुभव आला नव्हता. उलट स्पॅनिशमधला अनुवाद खूप चांगला झाला होता. कारण आम्हाला जसा भारतात प्रतिसाद मिळतो तसाच इथेही मिळत होता. मी भीती झटकली, कारण  प्रयोग करायचा होता. प्रयोग करताना सगळे प्रेक्षक आमच्याबरोबर गात होते, टाळ्या वाजवत होते, हसत होते. बायका-मुलं, म्हातारे-कोतारे, तरुण पोरं-पोरी सगळी आली होती. त्यांनी पूर्ण नाटक बघितलं. कुठेही उगाच आरडाओरडा केला नाही. जिथे हसायचं तिथे  हसत होते, जिथे गाणी होती तिथे टाळ्या वाजवत होते. मला परत प्रश्न पडला, एक परभाषिक नाटक आपल्याकडे एका छोटय़ा गावात, एवढय़ा मोठय़ा जनसमुदायासमोर कुठल्याही गोंधळाशिवाय झालं असतं  का?

सँटियागो शहर असूनही तिथे खूप बागा, खुल्या जागा, मोठे पादचारी मार्ग, अनेक ठिकाणी बसायला बाकडी अशा सोयी केल्या गेल्या आहेत. या बागांमध्ये लहान मुलं, तरुण तरुणी, म्हातारे, बायका-पुरुष सगळे असतात. एके दिवशी मी भर दुपारी, एकटी एका बागेत आकाशाकडे बघत पहुडले होते. उन्हाळा होता त्यामुळे शॉर्ट आणि टी-शर्ट घातला होता. मनात परत विचार आला, असं मी माझ्याच देशात, माझ्याच शहरात बिनधोकपणे करू शकते का?

सँटियागोच्या प्रयोगानंतर दोन दिवसांचा खंड होता. तेव्हा आम्ही सगळे मिळून वॅल पराईसो नावाच्या शहरात फिरायला गेलो. शहर समुद्रकाठावरच आहे, पण सपाट नाहीय. सगळं शहर समुद्रालगतच्या टेकडय़ांवर वसलेलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोचायला फुनिकूलर्स (एलिवेटर्स) वापरावे लागतात. अत्यंत सुंदर, टुमदार, रंगीबेरंगी शहर आहे हे. छोटी छोटी खाण्या-पिण्याची ठिकाणं, दुकानं, चित्रं रंगवलेली घरं हे सगळं बघून तुम्ही जेव्हा समुद्रकिनारी येता तेव्हा तुम्हाला त्या अवाढव्य प्रशांत महासागराचं दर्शन होतं. उन्हाळा असल्यामुळे समुद्रकिनारी गर्दी होती. सगळे आपापल्या कुटुंबासोबत आले होते आणि मस्त ऊन खात वाळूवर पडलेले होते. काही लोक समुद्राच्या प्रचंड मोठय़ा लाटांमध्ये खेळत होते. मी पाण्यात गेले. खूप मोठय़ा लाटा होत्या. मी मुंबईची, त्यामुळे मला समुद्रकिनारा काही नवीन नव्हता. पण महासागराच्या लाटा आणि आपल्या अरबी समुद्राच्या लाटांमध्ये नक्कीच फरक वाटत होता.

सँटियागो इथे कवी पाब्लो नेरुदांचं घर बघितलं. त्यांच्या कविता मी वाचल्या होत्या. त्यांचं प्रेमकाव्य मला विशेष आवडतं. घर बघताना कळत होतं की जीवनात किती रस घेणारा माणूस होता. त्यांच्या घरच्या जेवणाचं टेबल फार रुंद नव्हतं, पण भरपूर लांब होतं. त्यांच्या घरी खूप लोक जेवायला, गप्पा मारायला यायचे. त्या सगळ्यांना जेवताना एकमेकांशी गप्पा मारता याव्यात म्हणून ते टेबल अरुंद केलं होतं आणि त्या टेबलावर खूप लोक मावावेत म्हणून लांब केलं होतं. ते घर इतकं छान जपलं होतं. चिले देश हा काही फार श्रीमंत देश नव्हे. तरी त्यांनी ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टी उत्तम सांभाळल्या आहेत, याचं कौतुक वाटलं.

आम्ही या दौऱ्यात असताना आमच्या दिग्दर्शकाची, अतुल कुमारची आई वारल्याची बातमी आली. अजून संपूर्ण दौरा व्हायचा होता. त्याने समजा भारतात जायचं ठरवलं असतं, तर प्रवासालाच ४८ तास लागणार होते. त्यामुळे त्याने नाही जायचं असं  ठरवलं. दौऱ्याच्या काळात आपण कुठे असू, आपल्या जवळच्या व्यक्ती कशा असतील, त्यांना काही अडचण आली तर आपण तिथं मदत करायला नसू, हा विचार प्रवास करताना सतत मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असतोच, पण नटाला नाटक करायचंय म्हटलं की दौरेही आलेच. आणि दौरे म्हणजे नुसते नाटकाचे प्रयोग नसून जीवन जगण्याचं एक शिक्षणच असतं. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, तिथे प्रयोग तर करतोच, पण तिथे राहतो, खातो, फिरतो. त्यांची संस्कृती, समाज, भाषा, माणसं, खाणं-पिणं, समजून घ्यायचा प्रयत्न  करतो. शिवाय आपणही त्यांना काही देऊन जातो. ते आपल्याबरोबर हसतात, कधी रडतात, टाळ्या वाजवतात, गातात. आपल्या नाटकाद्वारे, आपल्या पात्राद्वारे आपण त्यांना आपली ओळख करून देत असतो. या सगळ्या देवाण-घेवाणीत मजा तर येतच असते, पण बारा गावचं पाणी पिल्यामुळे शहाणपणही येत असतं.

इश्क बुले नु नचावें यार,
तो नचना पेंदाये
हो जावे दीदार,
तो नचना पेंदाये
आजा यार दे दीदार,
आजा यार दे दीदार
गीतांजली कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:08 am

Web Title: article by celebrity writer geetanjali kulkarni
Next Stories
1 सेलेब्रिटी लेखक : वूझेन अनुभव!
2 सेलेब्रिटी लेखक : पिया बहरुपिया
3 मन धागा धागा जोडते नवा
Just Now!
X