18 September 2019

News Flash

मेपलच्या देशा…

या नाटकाच्या दरम्यान म्हणजे गेल्या चार वर्षांत बरंच काही आम्हा कलाकारांच्या आयुष्यात घडलं होतं.

देशात आणि परदेशात ‘पिया बहरूपिया’चे १५० प्रयोग झाले होते. आता प्रयोग कमी होतील असं वाटत असतानाच अतुल कुमारने नाटकाचा दुसरा संच (टीम बी) तयार केला. प्रयोगांची मागणी खूप होती आणि प्रत्येक वेळेस आमच्या संचातल्या कलाकारांच्या तारखा जमत नव्हत्या. मला वाटलं, दुसरा संच तयार झालाय तर आम्हाला काही फार दौरे मिळणार नाहीत. पण नाटकाला चार वर्षे होऊन दोन संच असतानादेखील प्रयोग येतच होते. दोन मोठे दौरे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा असे आले. ऑस्ट्रेलियाचा दौरा दुसरा संच करणार होता तर कॅनडाचा दौरा आमचा संच. खूप मोठा दौरा होता, कारण कॅनडाच्या आधी दोन प्रयोग शिकागोलाही होणार होते. २४ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर २०१६, म्हणजे हा चिलेपेक्षा मोठा दौरा असणार होता.

या नाटकाच्या दरम्यान म्हणजे गेल्या चार वर्षांत बरंच काही आम्हा कलाकारांच्या आयुष्यात घडलं होतं. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही पातळ्यांवर. नेहा आणि अमितोष या जोडीने ‘पिया बहरूपिया’ला खूप काही दिलं आणि त्यांनाही या नाटकाच्या प्रवासात एक अतिशय गोड भेट मिळाली. अमितोषने या नाटकाचं रूपांतरण केलंय आणि शिवाय तो यात सेबास्टियनची भूमिकाही करतो. त्याच्या लेखनामुळे नाटक अस्सल भारतीय झालंय आणि त्यामुळे ते फक्त भारतातच नव्हे, तर इतर देशांमध्येही पोहोचतंय. नेहा (फुलसिंगची भूमिका करणारी) मूळ जबलपूरची. ती अप्रतिम अभिनेत्री तर आहेच, पण तिने हे नाटक तयार होताना तिच्या भागातली खूप गाणी दिली, जी नाटकात वापरली आहेत आणि ती लोकांना फार आवडतात. तर या नाटकाच्या नुकतंच आधी त्यांचं लग्न झालं होतं आणि याच नाटकाच्या दरम्यान त्यांना बाळ झालं आणि आता तो मुलगा, अनय आमच्याबरोबर दौरेही करू लागलाय. कॅनडाच्या एवढय़ा मोठय़ा दौऱ्यात तो आमच्याबरोबर होता आणि त्यानं कधीही त्रास दिला नाही. सौरभ (माल्व्होलिओची भूमिका करणारा) आणि निकिता (नेहा नसताना फुलसिंग करणारी) यांचं लग्नं झालं. राहुल (वाद्य साथीदार) याचं लग्न तर नाटक बघायला आलेल्या एका मुलीशी झालं. कोणाची प्रेमं जुळली, तर कोणी विलग झाले. अतुल कुमारची आई गेली. माझे वडील गेले. माझ्या व्यावसायिक जीवनात ‘कोर्ट’ हा सिनेमा ‘पिया बहरूपिया’मुळेच आला. सत्चित पुराणिक, ज्यांनी काही प्रयोग सागर देशमुखच्या जागी राजाची भूमिका केली, त्यांनी माझं ‘कोर्ट’साठी कािस्टग केलं.

21-lp-geetanjali

‘पिया बहरूपिया’ हे नाटक गाजण्याचं महत्त्वाचं कारण त्याचा संच आणि त्या संचाची ऊर्जा आहे. आम्ही सगळे देशाच्या विविध भागांतून आलोय. वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलंय आणि प्रत्येकाची अभिनयशैली वेगळी आहे. पण आम्ही एकत्र राहून या नाटकाची तालीम केली, प्रत्येकाने आपल्या परीने नाटकात भर घातली म्हणून हे कडबोळं जमून आलंय. हे लिहिताना मला हे जाणवतंय की मी आतापर्यंत जी महत्त्वाची आणि गाजलेली कामं केली ती सगळी ‘ऑन्सॉम्बल’  किंवा ‘सांघिक’ होती. त्यात कोणी प्रथितयश कलाकार किंवा मोठे निर्माते-दिग्दर्शक नव्हते. माझं पहिलं व्यावसायिक नाटक ‘मु.पो.बोंबीलवाडी’ किंवा ‘कोर्ट’ किंवा ‘पिया बहरूपिया’, सगळ्याच कलाकृतींचे दिग्दर्शक, कलाकार आणि निर्माते हे तसे नवीन होते. अर्थातच नंतर सगळ्यांनीच नावं कमावली आणि आता ते सगळे यशस्वी झालेत.

कॅनडाचा दौरा सुरू होण्याआधी दोन प्रयोग शिकागो शेक्सपिअर कंपनी थिएटर या ठिकाणी होते. फार उत्तम स्टेज होतं. हे ग्लोब थिएटरचं नवं बंदिस्त रूप वाटत होतं. शिकागो आणि कॅनडाचे प्रयोग वेगवेगळ्या संस्थांनी आयोजित केले होते. त्यामुळे कॅनडाचे प्रयोग सुरू व्हायच्या आधी आमच्याकडे साताठ दिवस ‘भाकड’ होते. तर टोरान्टो आणि वॅनकूवरच्या संस्थांनी आधीचे साताठ दिवस जे रिकामे होते, त्यात आमची राहायची आणि खाण्या-पिण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे या दिवसात आम्हालाही दोन शहरं बघता येणार होती. आणि ‘पिया बहरूपिया’चा दौरा म्हटलं की ‘आश्चर्य दर्शन’ होणारच. त्याप्रमाणे टोरान्टोला पोहोचल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी मी टीमसोबत नायगरा धबधबा बघायला गेले. आणि ‘पिया बहरूपिया’च्या दौऱ्यातलं तिसरं आश्चर्य बघितलं गेलं.

टोरान्टोच्या चार दिवसांच्या पाहुणचारानंतर वॅनकूवरला पोहोचलो. इथे सलग अकरा प्रयोग असणार होते. त्यामुळे त्याआधी सगळं शहर िपजून काढायचं होतं. गेलेल्या दिवसापासून सपाटाच लावला. स्टॅन्ली पार्क, सी वॉल, क्वारी रॉक स्टोन हाइक, लिन क्रिक ट्रेल हे सगळं पाहिलं. वादळी हवामानामुळे ग्राऊस माउंटन मात्र राहिला. मला फार हळहळ वाटली. मला ती हाइक करायचीच होती. कारण या पूर्ण दौऱ्यात मी भरपूर व्यायाम करत होते आणि त्यामुळे मला हे चॅलेंज घ्यायचं होतं. मला पूर्ण दौऱ्यात उत्तम तब्येत ठेवायची होती. सलग अकरा प्रयोग वॅनकूवरमध्ये आणि नंतर टोरान्टोमधले चार प्रयोग. इतके प्रयोग करायचे होते. या नाटकात माझी भूमिका एका मुलीची आहे, जी मुलाच्या रूपात वावरते. मुलगा वठवताना मला प्रचंड ऊर्जा लागते. शिवाय आम्ही सगळे यात गातो-नाचतो. त्यामुळे तंदुरुस्ती गरजेची होती. आवाज आणि शरीर जपणं गरजेचं होतं. त्यात हवा तशी थंडच होती. अर्थात फार सुंदर ऋतू होता. सगळं वॅनकूवर ‘फॉल’मय झालं होतं. लाल बुंद झाडं. केसरीया झाडं. पिवळी झाडं, जाम्हळी झाडं, पाण्याचे मोठे झरे, तलाव, समुद्र, नद्या, टेकडय़ा, जंगल, धबधबे सगळं मुबलक होतं. मी वॅनकूवरच्या प्रेमात पडले. नेहमीप्रमाणे आमचं राहण्याचं ठिकाण मुख्य शहरात होतं (डाउनटाउन), त्यामुळे सगळीकडे जायला चांगल्या सोयी होत्या आणि सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था उत्तम असल्यामुळे फिरताना काही अडचण आली नाही.

सागर देशमुख, जो या नाटकात राजाची भूमिका करतो, माझा जिवलग मित्र आहे. तो एक हरहुन्नरी, उत्साही आणि पक्का नाटकवाला माणूस आहे. मला त्याच्या सोबत काम करायला जाम मजा येते. मानसी मुलतानी हे एक वेगळंच रसायन आहे. हे असं व्यक्तिमत्त्व आहे की प्रत्येक जण तिच्या प्रेमात पडतं. ती नाटकात राणीची भूमिका करते. मला तिची आवडणारी गोष्ट म्हणजे तिची स्वत:शी असलेली मत्री. त्यामुळे ती मस्त असते. एकटी फिरते, वेगळी ठिकाणं शोधून काढते आणि फार छान गाते. मी, सागर आणि मानसी या दौऱ्यात एकत्र भरपूर फिरलो. समुद्र, तलाव, जंगल, टेकडय़ा धबधबे सगळं पहिलं. सायकिलग, ट्रेकिंग, हायकिंग करत जमेल तेवढं वॅनकूवर बघितलं.

मग आमचे प्रयोग सुरू झाले. सलग अकरा प्रयोग असल्यामुळे फिरणं वगरे कमी झालं. रोज चार वाजता बसने थिएटरला जायचो. कपडय़ांची इस्त्री, प्रॉपर्टी लावणे, आवाज आणि शारीरिक व्यायाम करणे, संगीताचा रियाज करणे असं प्रत्येक प्रयोगाआधी करायचो. आठ वाजता प्रयोग सुरू व्हायचा आणि संपवून, सामान आवरून रूमवर यायला बारा वाजायचे. जाताना-येताना वीस नंबर बसने प्रवास करायचो. त्या बसमधून एक वेगळंच वॅनकूवर दिसायचं. ती एका रस्त्यावरून जायची, ईस्ट हेिस्टग्स नावाच्या. तो रस्ता बेघर (होमलेस) लोकांनी भरलेला होता. शिवाय खूप म्हातारे, मानसिकदृष्टय़ा दुर्बळ, मादक पदार्थाच्या आहारी गेलेले असे लोक दिसायचे, बसमध्ये चढायचे. अनेक लोक तिकीटही नाही काढायचे. वॅनकूवरचं हे रूप, त्या सुंदर निसर्गाने भरभरून दिलेल्या रूपापेक्षा फार वेगळं होतं. कॅनडा हा म्हणावा तर फार नवा देश. इथली लोकसंख्याही फार नाही. प्रगत देशांपकी एक असा हा देश. मग इथे इतके लोक असे बेघर का असतील? ब्रिटिश यायच्या आधी इथे जे लोक होते, त्यांचा इतिहास काय आहे? या देशात जगाच्या विविध भागांतून लोक आलेले दिसतात, पण इथले मूळ लोक  फार दिसत नाहीत, असं का? या देशाच्या दोन राज्यभाषा आहेत- इंग्रजी आणि फ्रेंच. पण इथली मूळ भाषा कोणती असे खूप प्रश्न पडत होते. आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी खूप दिवस राहतो, तेव्हा त्याच्याकडे एका पर्यटकाच्या नजरेतून न बघता, तिथलं वास्तव पाहू लागतो. मग तिथलं राजकारण, समाजकारण, संस्कृती जवळून दिसू लागते.

यॉर्क थिएटरमधले आमचे अकरा प्रयोग चांगले झाले. काही प्रयोगांना म्हणावी तेवढी गर्दी नव्हती, तरी कलाकारांनी आपली कामगिरी उत्तम बजावली. हे फार कठीण असतं. परदेशात जिथे आपलं नाटक सगळ्यांना कळतंच असं नाही, तिथे त्याच जोमानं अकरा प्रयोग करणं हे काही सोपं काम नाही. अर्थात काही प्रयोग हाऊसफुल असल्याकारणाने परत उत्साह वाढायचा आणि आम्हा कलाकारांचा आत्मा शांत व्हायचा. अनेक भारतीय अगदी आपले मराठी लोकही नाटकाला आले. त्या सगळ्यांना नाटक प्रचंड आवडलं. शिवाय नाटकाची चांगली परीक्षणं आली, अनेक वृत्तपत्रांमध्ये मोठाले फोटो छापून आले आणि बस-गाडय़ांवर आपले फोटो पाहून कलाकार मंडळी तृप्त होऊन पुढे टोरान्टोस जाण्यास सज्ज झाली.

हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. दौऱ्याचा शेवटचा पडाव होता. शेवटचे सहा दिवस उरले होते. खूप दिवसांनी एवढा मोठा काळ फक्त काम आणि स्वत:कडे लक्ष देणं; असं करायला मिळालं होतं. प्रपंचात अशा घटिका फार क्वचितच येतात. टोरान्टोत आमचे प्रयोग सुरू होण्याआधी आमच्याकडे दोन-तीन दिवस होते. या दरम्यान मानसीच्या पुढाकारामुळे आम्ही टोरान्टोमध्ये विविध पद्धतींची नाटकं बघितली. ‘बडीज इन बॅड टाइम्स’, ‘थिएटर सेन्टर’, अशी वेगवेगळी नाटकाची ठिकाणं पाहिली. तिथे अनेक नाटकं पाहिली. एक प्रयोग तर मला इतका आवडला की त्या दोन अभिनेत्रींना मी आणि मानसीने भेटायचं ठरवलं आणि नंतर आम्ही एका कॅफेमध्ये भेटलोदेखील. त्यांच्याकडून कळलं, की तिथेही प्रायोगिक नाटकं करणं किती कठीण आहे ते. जे प्रस्थापित आहेत, किंवा जे मुख्य प्रवाहात काम करतात त्यांना थोडं सोपं जातं. पण काहीही वेगळं करू इच्छिणाऱ्या लोकांना खस्ता खाव्याच लागतात.

एक नाटक होतं, ‘वन थिंग लीड्स टू अनदर’, जे आठ ते चौदा महिन्यांच्या बाळांसाठी होतं. ते पाहून तर मी थक्कच झाले. प्रेक्षकात बाळंच बाळं आणि त्यांचे पालक. वीस मिनिटांच्या या नाटकात त्या बाळांनी एक सेकंदही इकडेतिकडे पाहिलं नाही. ती पूर्णपणे नाटकात गुंतली होती. ही नाटकं पाहून एक वेगळा उत्साह निर्माण झाला आणि त्या सगळ्याचा परिणाम प्रयोगावर झाला. मला वाटतं सतत काही ना काही वेगळं पहिलं, वाचलं, अनुभवलं की त्याचा परिणाम तुमच्या कामावर होतो आणि तुमची अभिव्यक्ती अधिक परिपक्व होते. आम्ही आमची दिवाळी प्रयोग करून साजरी केली. माझी एक मत्रीण गौरी वनारसेने फुलबाज्या आणल्या होत्या, त्या लावल्या. काही भारतीय प्रेक्षक मिठाई देऊन गेले. ती खाल्ली. अशी मी तरी पहिल्यांदाच परदेशी दिवाळी साजरी केली. दौरा संपायला आला होता. सगळ्यांनाच घरी जायचे वेध लागले होते. कितीही प्रवास केला, दौरे केले, तरी कधी ना कधी आपल्याला परत घरी यायची ओढ असतेच. तसंच काहीसं आमचं झालं होतं. सध्या तरी, पुढचे काही महिने प्रयोग आणि दौरे नसणार होते. २०१६ या वर्षी शेक्सपिअरला जाऊन ४०० र्वष झाली. त्यानिमित्ताने मला त्याच्या नाटकाच्या दौऱ्यांची कहाणी तुम्हाला सांगता आली, हे माझं भाग्यच म्हणायला पाहिजे.

असंच फिरता फिरता काही सापडलं तर तुम्हाला भेटायला येईनच.

तोपर्यंत फेअरवेल..

अदेऊ (Adeiu)..

गॉड बाय.. (शेक्सपिरिअन नाटकातले निरोप घेतानाचे शब्द)

‘रंग महल में अजब सहर में

आजा रे हंसा भाई

निर्गुण राजा पे सिरगुन सेज बिछाई’
गीतांजली कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

First Published on December 23, 2016 1:09 am

Web Title: canada