‘पिया बहरुपिया’ला चीनमधून एका महोत्सवाचं आमंत्रण आलं. शांघायमध्ये प्रयोग असतील, असं सांगितलं. आम्ही शांघायला पोहोचल्यावर कळालं की, ज्या गावात प्रयोग करणार आहोत ते शांघायपासून दोन तासांवर आहे. वूझेन असं त्या गावाचं नाव होतं. ज्या बसमधून गेलो ती अत्यंत अद्ययावत बस होती. त्या बसमध्ये वायफाय होतं. जो मुलगा आम्हाला न्यायला आला होता त्यानं आम्हाला आमच्या संपूर्ण ट्रिपबद्दल माहिती दिली. त्यात असं लक्षात आलं की, आपण जिथे जाणार आहोत ते एक प्रेक्षणीय स्थळ (सिनिक झोन) आहे. आम्ही तिथे पोचलो. त्या झोनच्या आत शिरलो आणि एका वेगळ्याच विश्वात प्रवेश झाला. त्या प्रेक्षणीय स्थळाच्या आत गाडय़ा-बसेसना प्रवेश नाही. तिथे चालणे किंवा होडीने प्रवास, हे दोनच पर्याय होते. आत कालवे होते, त्यात होडय़ा, त्या होडय़ांतून तुम्ही आतल्या आत प्रवास करू शकता. तुमचं सामान वगरेसाठी गोल्फ कोर्ट्स आहेत. सगळीकडे चालत जायचं. छोटे छोटे रस्ते, पूल, दुकानं, खायची ठिकाणं, बार, बागा, परफॉर्मन्सच्या जागा बंदिस्त आणि खुल्या. दोन्ही वेगवेगळी ठिकाणं तिथे ठरवून बनवली होती. सगळं ठरवून आखलेलं ठिकाण. अत्यंत सुंदर. काही चूक नाही. ज्या हॉटेलमध्ये आमची व्यवस्था केली होती, तेही फार सुंदर होतं. खिडकी उघडली की कालवा, त्यातून जाणाऱ्या होडय़ा दिसायच्या. छान थंडी होती आणि सुंदर ठिकाण होतं.

इथे आयोजकांनी नाटकांचा महोत्सव ठेवला होता. त्यात चिनी, इंग्लिश, इटालियन, आमचं िहदी आणि इतर अनेक भाषांतील नाटकं होती. शिवाय चौकाचौकांत काही ना काही सादरीकरण सुरू असायचंच. कुठे पथनाटय़, तर कुठे मोठे-मोठे पपेट्सचे शो, तर कुठे शारीरिक कसरतींचा खेळ (अ‍ॅक्रोबॅट्सल शो) असं सुरू होतं.

आमचा शो जिथे होता ते एक टुमदार, २००-२५० लोक मावतील असं देखणं थिएटर होतं. तिथे आमचे चार प्रयोग होणार होते. नाटकाचं चिनी भाषेत भाषांतर केलं होतं. म्हणजे इंग्रजीतून िहदीत आणि िहदीतून परत इंग्रजीत (कारण ते आता रूपांतरित होतं) आणि मग परत चिनी भाषेत असा त्या संहितेचाही प्रवास घडत होता. पुढे कुठे-कुठे ती आणि आम्ही जाणार होतो ते तो विलीच जाणत होता! हे प्रोसेनियम (स्र्१२ूील्ल्र४े) थिएटर  होतं. स्टेजच्या दोन्ही बाजूंना स्क्रीन्स असणार होते, ज्यावर सबटायटल्स दाखवले जाणार होते. याआधी ‘ग्लोब’मध्येही स्क्रीन्स होते, पण त्यावर फक्त त्या त्या नाटय़प्रवेशाचा सारांश दाखवला जायचा; पण या वेळेस आमच्या प्रत्येक वाक्यासोबत सबटायटल्स स्क्रीनवर येणार होते. ती यंत्रणा मॅन्युअली जाणार होती. त्यामुळे त्याचीही तालीम करण्यात आली होती. चिनी लोकांना आपलं नाटक कळेल का, काय प्रतिसाद असेल, हे प्रश्न सतत डोक्यात घोंघावत होते. कशाचीच-काहीच कल्पना नव्हती.

आमच्या पियाच्या चमूने आमच्या दौऱ्याबद्दल एक  टॅगलाइन तयार केली होती. ‘खाया पिया, बहा रुपया’ ..जिथे जाऊ तिथे विविध प्रकारचं खाणं, फिरणं करायचो आणि त्यात पसेही खर्च करायचो. त्यामुळे या दौऱ्यातही भरपूर वेगवेगळे प्रकार खाल्ले. मुंग्यांचे मोमो, मंगोलियन बाऊल, राइस वाइन. असे विविध प्रकार मी पहिल्यांदाच चाखले. ज्या देशात जाऊ त्या देशातले पदार्थ खायचेच, हे मी ठरवलेलंच आहे.

प्रयोग करताना काही अंदाज येत नव्हता, की लोकांना नाटक कळतंय का नाही, कारण सगळे आम्ही नाटक करताना स्क्रीनकडे बघत होतो. नाटक विनोदी ढंगाचं असल्यामुळे, जेव्हा प्रतिसाद नसतो तेव्हा नटांना जरा कठीणच जातं; पण प्रत्येक प्रेक्षक वेगळा असतो. त्यांचा प्रतिसाद तिथल्या संस्कृतीनुसार असतो, हे हळूहळू लक्षात येत होतं. शिवाय भारतात भाषा कळत असल्यामुळे प्रेक्षक अधिक प्रतिसाद देतात. या नाटकात आम्ही प्रेक्षकांशी अनेकदा संवाद साधतो (इंटरॅक्टिव्ह), त्यांच्या प्रतिसादाला प्रतिक्रियाही देतो.

एक फार मजेशीर गोष्ट घडली. आमच्या नाटकात एक जगराताचा (जागरण) प्रसंग आहे. ज्यात ऑलिविया म्हणजे राणीला, ती ज्याच्या प्रेमात आहे तो सिझारिओ, जी खरं तर पुरुष रूपातली स्त्री आहे, नकार देतो. त्यानंतर ती उदास होते आणि त्या हतबल अवस्थेत असतानाच तिथे नाटकाचा सूत्रधार येतो आणि नाटक मंडळी आणि प्रेक्षकांना आव्हान करतो की, आपण तिच्यासाठी देवाकडे सगळे मिळून साकडं घालू. तेव्हा सगळ्यांना हात वर करून हेलकावयाला सांगतो. या वेळेस प्रत्येक ठिकाणी कधी कोणी लोक हात वर करतात, कधी नाही करत; पण चीनमध्ये सगळ्यांनी एक साथ हात तर वर केलेच, शिवाय अगदी कवायतीसारखे सगळ्यांनी एकसमयावच्छेदेकरून हलवलेदेखील. आम्हाला हे पाहून फार आश्चर्य वाटलं. असं आजपर्यंत कुठल्याही देशात, जिथे आम्ही आत्तापर्यंत प्रयोग केले आहेत, तिथे कुठेही असं घडलं नाही. ‘ग्लोब’मध्ये किंवा भारतातही प्रयोग करताना जितका खुला आणि मनमोकळा प्रतिसाद होता तितकाच इथे शिस्तबद्ध आणि मोजूनमापून प्रतिसाद मिळत होता. नाटक संपल्यावर मात्र सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या.

अजून एक प्रसंग मला अगदी प्रकर्षांने आठवतोय. नाटकात एक संवाद आहे, ‘ये मॅडम का दिमाग, मेड इन चायना है क्या, जो इतने यंग एज में खराब हो गया’. या वाक्याला एका प्रयोगात साताठ जण उठून गेले. मग आम्हाला फेस्टिवल डायरेक्टरने सांगितलं की, चीनमध्ये लोक याबाबतीत जरा भावनिक आहेत, तुम्ही ते वाक्य बदलू शकत असाल तर बदला. आम्ही भारतीय असल्यामुळे आम्हालादेखील त्यांच्या भावना कळल्या. पुढच्या प्रयोगात आम्ही ते वाक्य बदललं. त्याला ‘मेड इन इंडिया’ असं केलं. आम्हाला वाटलं आपण आपलीच खिल्ली उडवली तर चिनी लोकांना मजा येईल; पण त्यालापण प्रतिसाद मिळाला नाही. मग परत आम्ही ‘मेड इन चायना’ केलं. त्या लोकांनीपण मग बदल करा म्हणून आग्रह नाही धरला.

शेवटच्या प्रयोगाआधी आम्हाला महोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणून पार्टीला बोलावलं होत. आम्हाला वाटलं कुठल्या तरी हॉलमध्ये किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा लॉनवर पार्टी असेल. थिएटरच्या जवळ गेलो तर संपूर्ण गल्लीमध्ये टेबलं लावली होती. सगळी गल्ली चिनी दिवे, पताका, फुलांनी सजवलेली होती. संगीत, जेवण आणि वाइन. सगळा माहौल मस्त झाला होता. आम्हाला या गावजेवणाची कल्पनाही नव्हती. मग कळलं की, चीनमध्ये, जुन्या काळात, जेव्हा रेस्टॉरंट्स किंवा हॉटेलं नव्हती, तेव्हा सण साजरे करताना, पूर्ण गाव सामील होत असे. सगळे आपल्या घरासमोर टेबल मांडून खाण्यापिण्याची सोय करत असे. सण साजरा करण्याची ही पद्धत आम्हाला फार आवडली. आमचा पुढे प्रयोग होता. त्यामुळे फार खाता मात्र आलं नाही. आम्ही पार्टी मध्यावर सोडून प्रयोग करायला गेलो. त्या दिवशी शेवटचा प्रयोग होता. प्रयोगानंतर चिनी लोकांनी त्यांच्या शिस्तीनुसार उभं राहून एकसाथ टाळ्या वाजवल्या.

आमचा तांडा दुसऱ्या दिवशी त्या अचूक, सुंदर अशा प्रेक्षणीय स्थळातून बाहेर पडला आणि आम्हाला चीनमधली खरी दुनिया पहिल्यांदा दिसली.

वू त्सेन ते शांघाय प्रवासात प्रचंड वाहनकोंडीत अडकलो. शांघाय स्टेशनवर प्रचंड गर्दी होती, मुंबईच्या ट्रेन स्टेशनपेक्षा अधिक. तेव्हा जाणवलं की, चीनची लोकसंख्या आपल्यापेक्षा खरंच जास्त आहे. कसेबसे वेळेवर ट्रेन स्टेशनवर पोहोचलो. बुलेट ट्रेनमध्ये बसण्याची माझी पहिलीच वेळ होती. पुढे बीजिंगला जाऊन जगातल्या सात आश्चर्यापकी एक, ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ बघणार होते. परदेशातील माझं हे पहिलं ‘आश्चर्य दर्शन’ होतं. अजून काय काय आश्चर्य पाहणार होते ते फक्त तो विली.. विल्यम.. शेक्सपिअरच जाणत होता!

‘अगर गाना बजाना हि इश्क कि खुराक है तो और गाओ और बजाओ’

‘इफ म्युझिक बी द फूड ऑफ लव्ह, प्ले ऑन’

अजून देश फिरायचे होते, अजून आश्र्चय बघायची होती, अजून खेळ करायचे होते.

पुढल्या लेखात अजून एक दौरा आणि अजून एक देश.
गीतांजली कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com