दर बुधवारी नेहमीप्रमाणे आमच्या पुण्याच्या घरात सतारीचा क्लास सुरू होता. हार्मोनी स्कूल ऑफ सितार ही आमची म्हणजे बाबांनी सुरू केलेली सतारीची/संगीताची शाळा. सकाळी लवकर उठून सव्वासहा वाजताच तळेगावचं घर सोडायचं आणि सात वाजता सगळ्यांच्या आधी येऊन पिण्याचं पाणी वगैरे भरून सतार लावायची. मग सात वाजले की पहिला विद्यार्थी येतो. आणि मग सुरूच होतं. सात ते बारा कोण कोण येत असतात. सतारीवरच्या प्रेमामुळे आणि संगीत शिकण्याच्या स्फूर्तीमुळे आमचा क्लास दिवसभर सुरू असतो. मध्ये थोडा वेळ दुपारचं जेवण, आराम आणि पुन्हा संध्याकाळी खूप रियाज, खूप शिक्षण, लोक येऊन गेले तरी मी असतेच दिवसभर.
असाच सकाळचा क्लास संपला आणि मला ‘लोकप्रभासाठी लिहिशील का?’ म्हणून फोन आला. ‘तुला पाहिजे तो विषय निवड आणि थोडंसं लिही,’ असंही मला सांगण्यात आलं. मला मजा वाटली आणि ठरवलं प्रयत्न तर करू.
‘‘माझे वडील सतार वाजवतात’’ हे सांगताना मला लहानपणीसुद्धा खूप अभिमान वाटायचा. कारण असं म्हटलं की सगळ्यांचेच डोळे चमकत, आश्चर्य आणि उत्सुकता वाटे लोकांना! मी तेव्हा गाण्यांच्या क्लासला जायचे. शाळेत असताना गाणं, कथ्थक हे दोन्ही क्लासेस जवळजवळ दहावी संपेपर्यंत चालू होते. मला कधी कधी मजा म्हणून सतार हातात धरल्याचं आठवतं, पण रियाज-शिक्षण असं काही कॉलेजला जाईपर्यंत पक्कं ठरवलं नव्हतं. अमेरिकेतून हायस्कूल संपवून मी जेव्हा परत आले, तेव्हा मात्र आपोआप सतार शिकायलाच सुरुवात झाली. बाबांनी पुण्यात क्लास घ्यायला सुरुवात केली होती आणि मीसुद्धा क्लासमध्ये बसून सुरूच केलं वाजवणं- फार चर्चा, बोलणं, करू का नको असा काही विचार करायच्या आत! सगळे एकत्र मनापासून खणखणीत रियाज करत आणि एकत्र रियाजात तर खूपच गंमत वाटायची.
एकदा मी मुंबईत गेले होते. एकटीच. एफवायला असताना. माझी मैत्रीण राहायची पाल्र्यात. तेव्हा बाबांनी फोनवर सांगितलं की ‘‘नेहरू सेंटरमध्ये किशोरीताईंचा (गानसरस्वती किशोरी अमोणकर) कार्यक्रम आहे. तू जा- मी सांगतो तुला प्रवेश द्यायला आतमध्ये.’’ पावसाळा होता तेव्हा. प्रचंड पाऊस पडत होता. त्या दिवशी मला आणखीनच उत्साह आला. इतका सुंदर पाऊस, मी एकटी पावसातून जाणार आणि एक संगीताची मैफल ऐकणार! मी आनंदात, भिजत रिक्षातून निघाले. नेहरू सेंटरमध्ये पोहोचले तेव्हा चक्क ओली किच्च झाले होते. अंगावरचे कपडे निथळून आत गेले. माझी सीट शोधली आणि अचानक एसीमध्ये आल्यामुळे कुडकुडत बसले. थोडा उशीरच झाला होता मला.
गेल्या गेल्या लगेचच पडदा उघडला. त्या दिवशीचं स्टेजवरचं दृश्य हे माझ्या आयुष्यातलं सर्वात अविस्मरणीय! अंधाऱ्या, थंड प्रेक्षागृहमध्ये फक्त स्टेजवर पिवळसर मंद प्रकाश, किशोरीताई सोनेरी काठांची काळी साडी नेसून स्टेजच्या मध्यभागी बसलेल्या, दोन उंच तंबोरे, पेटी, व्हायोलिन, तबला असे सगळे साथीदार बसलेले.
तंबोऱ्याच्या आवाजाने आणि वाद्यांची जुळवाजुळव करत असतानाच्या सुरांनी माझी थंडी कमी होत होती. काहीतरी अद्वितीय पाहतोय आपण, अचानक रात्री खूप चांदण्या आकाशात दिसल्यावर वाटतं तसं असं वाटलं. ताईंनी भूप गायला सुरुवात केली आणि मला रडूच यायला लागलं.
Alice in wonderland.
जेव्हा त्या बिळातून आत पडली असेल- तसं खोल खोल कुठेतरी चाललोय आपण, काहीतरी सुंदर आणि अद्भूत ऐकत- असं वाटत होतं. माझ्या भिजलेपणाचा पूर्ण विसर पडला होता. कार्यक्रम संपला आणि कितीतरी वेळ मला सीटमधून उठावंसंच वाटत नव्हतं.
पण उठले, परतीची ट्रेन पकडली आणि खिडकीतून बाहेर बघत असताना स्वत:लाच म्हणाले, आता मनापासून सतार शिकणार.
मला पण कधीतरी अनुभवयाचं आहे, असं सुरांच्यात रमणं!
नेहा महाजन response.lokprabha@expressindia.com

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!