30 May 2020

News Flash

पोलीस नावाची शोकांतिका!

मुंबईत दोन मुलांनी डोक्यात बांबू मारला आणि त्यामुळे हवालदार शिंदे गेले.

आपल्याला आयुष्यात वेळोवेळी पोलीस दिसत असतात. (भेटत नसतात याला आपण सुदैव मानतो.) त्यामुळे पोलीस हे कायम काहीतरी वाईट झालं तर भेटायची व्यक्ती असा आपला (गैर)समज असतो. खरंतर ते आपल्या सुव्यवस्थेसाठीच झटत असतात. पण तरीही दुर्दैवाने ते आपल्याला आपले वाटत नाहीत. का? याचा विचार करायची याहून योग्य वेळ नाही असं वाटलं आणि हा लेख लिहायला घेतला.

मुंबईत दोन मुलांनी डोक्यात बांबू मारला आणि त्यामुळे हवालदार शिंदे गेले. आज ते गेले म्हणून अख्खा महाराष्ट्र हळहळला. नेते मंडळींनी (मुख्यमंत्र्यांसकट) घरी गर्दी केली पण अशा दृश्य-अदृश्य काठय़ा हजारो पोलिसांच्या डोक्यावर वर्षांनुवर्षे बसतायत हे या भावनेच्या भरात आपण साफ विसरलो. कुणाला माफियांकडून, कुणाला राजकारण्यांकडून, कुणाला डिपार्टमेंटमधूनच. कुणाला निर्लज्ज जनतेकडून. आपल्या आजूबाजूचे असंख्य पोलीस या ठणकत्या जखमा घेऊनच वर्षांनुवर्षे डय़ूटी करत असू शकतील असा विचारही आपल्या मनाला कधी शिवत नाही.

विचार केला आणि जाणवलं, पोलिसांबद्दलची ही अनास्था आपल्या ‘कंडीशनिंग’मध्ये आहे. बालपणापासून ‘अमुक अमुक कर नाहीतर पोलीस काका येतील’ असं सांगितलं जातं, त्यामुळे पोलिसच मुलं उचलून घेऊन जातात असं वाटायला लागतं. त्यांच्याबद्दल आदराऐवजी धाक तयार होतो. कळत्या वयात, ज्याचा धाक वाटतोय ती ‘पोलीस’ नावाची व्यक्ती सिग्नलच्या कोपऱ्यात ‘शंभर-दोनशे’ रुपयांना मॅनेज होते हे कळतं आणि पोलीस म्हणजे ‘मॅनेज होणारा!’ यावर आपला ठाम विश्वास बसतो.

तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘पोलीस काहीही करू शकतात’ असा गैरसमज. यातून पोलिसांकडे असलेली प्रचंड ताकद आणि त्याचा गैरवापर करण्याची त्यांची सवय याचा अपप्रचार होत रहातो. वर्षांनुवर्षे हे ऐकत राहिल्यामुळे आणि स्वत:ला काही बेसिक अनुभव आल्यामुळे पोलिसांबद्दलचा आदर आणि धाक व्यस्त गुणोत्तरात येतात. आजूबाजूला पोलीस असणं हेसुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असण्याचं, वातावरण ‘अनकम्र्फेटेबल’ असण्याचं लक्षण वाटायला लागतं आणि त्यांच्याबद्दलच्या कथा (ज्यात भ्रष्टाचार, गुन्हेगारांना साथ, तपासात ढिलाई) या आपल्या मनावर इतक्या बिंबवल्या जातात की त्यांच्या युनिफॉर्म पलीकडे असलेला माणूस कधी बुजून जातो कळत नाही.

त्यात आपण सिनेमे पाहतो. पोलिसांचं तद्दन हिंदी सिनेमाइतकं  नुकसान गुन्हेगारांनीही केलं नसेल. हिंदी सिनेमाने एकतर त्याला सुपरहिरो करून टाकला नाहीतर सुपर व्हिलन. त्याचा प्रामाणिकपणा हा भाबडा आदर्शवाद म्हणून दाखवला आणि त्याची दुर्बलता त्याचा अवगुण म्हणून. ‘अर्धसत्य’, ‘शूल’, ‘सरफरोश’, ‘अब तक छप्पन’, ‘ब्लॅक फ्रायडे’ सारखे मोजके सिनेमे ज्यांनी पोलिसांचा युनिफॉर्म सोलून आत असलेला माणूस दाखवला, आणि त्यालाही स्वभाव असतो, राग, हतबलता, जबाबदारी असते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यालाही एक भूतकाळ असतो याची जाणीव करून दिली. या सगळ्या सिनेमांनी ‘पोलीस’ या एन्टिटीकडे ज्या नजरेनी पाहिलं त्याच नजरेने आपण आज त्याच्याकडे पाहणं प्रचंड गरजेचं आहे.

याची कारणं खूप आहेत. आज पोलीस हे भीतीदायक जगतायत. त्यांच्यावर प्रचंड प्रेशर आहे. मामुली चेन स्नॅचिंगपासून मल्टी स्टेट किडनी रॅकेटपर्यंत आणि तलावात ‘बुडवणाऱ्या’ गुंडापासून जागतिक दहशतवादापर्यंत सगळ्याची जबाबदारी फक्त त्यांच्यावर आहे. त्यांची अवस्था गोलकीपरसारखी आहे आणि समोर हजारो प्लेयर्स बॉल घेऊन तयार आहेत. तो अडवला तर कर्तव्य आणि नाही तर चूक या एकाच तत्त्वावर आज त्यांच्याशी सगळ्या स्तरातून वागलं जातंय. याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, कारण त्यांच्यावर जबाबदाऱ्या प्रचंड आहेत आणि त्याबदल्यात मिळणारा मोबदला? अत्यंत किरकोळ.

अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देणाऱ्या पोलिसांच्या हातात काय आहे आज? ना नीट पगार, ना नीट रहाण्याची सोय, ना सोयी सुविधा, ना आदराची वागणूक! राजकारण्यांच्या मागे पळणं, त्यांच्या बदलत्या राजकीय भूमिकांनुसार तत्पर रहाणं, सरकारच्या आदेशांचं पालन करण्यासाठी जीवाची पर्वा न करणं, तोच आदेश फिरवला की दात-ओठ खाणं, वर्षांतले बरेच दिवस आंदोलनं, रास्ता रोको, मोर्चे, धार्मिक सण, राजकीय रॅल्या यांच्यात अनुचित प्रसंग होऊ  नये म्हणून डोळ्यात तेल घालून घरदार सोडून थांबणं, तिथल्या माणसांकडून हीन दर्जाची वागणूक मिळणं, मिडीयाकडून सतत सकारात्मक नकारात्मक प्रेशर असणं, समाजातल्या वाढलेल्या उद्धटपणामुळे, बेशिस्तीमुळे त्रास करून घेणं, दबावाखाली लोकांना पकडणं, आणि दबावाखाली सोडून देणं, कधी बदली होण्यासाठी कधी न होण्यासाठी अक्षरश: हातापाया पडणं, प्रसंगी पैसे द्यायला लागणं, स्वत:च्या तब्येतीचे आणि मानसिकतेचे अतोनात हाल करणं यात सर्वसामान्य पोलिसांच्या सहनशक्तीचा काय कडेलोट होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी!

पोलिसांमध्ये आणि जनतेत गेल्या काही काळापासून वारंवार उडणाऱ्या चकमकी हे आपल्यात पडत चाललेल्या दरीचं आणि पोलिसांमध्येही असलेल्या कमालीच्या असंतोषाचं मोठं ‘इंडिकेशन’ आहे, याची वेळीच दखल घ्यायला हवी. दुबळ्या माणसांवर पोलिसांचा दिसणारा खाक्या, हा त्यांच्या ‘पॉवरलेस’ वाटण्याचा परिणाम आहे, ‘पॉवरफुल’ वाटण्याचा नाही, हे समजून घ्यायला हवं. सरकार आपल्याला गुलाम म्हणून वागवतं आणि जनता गुंड म्हणून ही भावना पोलिसांमध्ये प्रबळ होत राहिली त्यांच्यातल्या असंतोषाचा स्फोट आपल्याला फार महागात पडेल!

आता कुणी म्हणेल, पोलिसांमध्ये दोष नाहीत का? तर तसंही नाही. आज सर्रास बाहेर ओरड होते की पोलिसात भरतीपासून भ्रष्टाचार होतो, पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालतात, पोलीस कामात दिरंगाई करतात, पोलीस प्रचंड पैसा छापतात, पोलीस त्रास देतात, पोलीस पैसे उकळतात. या तक्रारी काही प्रमाणात खऱ्या असतीलही, पण याने सरसकट पोलीस खात्याला धारेवर धरणं चूक वाटतं. भ्रष्ट होणं किंवा न होणं हा प्रत्येक माणसाच्या जडणघडणीतून, स्वभावातून आणि गरजेतून आलेला चॉईस आहे.

गेल्या काही वर्षांत समाज म्हणून टोकाचं प्रामाणिक असणं आणि टोकाचं भ्रष्ट असणं याच्यामध्ये जी ‘सोयीस्कर’ लोकांची जमात तयार झालीये, पोलीस हे त्याचंच बायप्रॉडक्ट आहे. सोयीनुसार प्रामाणिक आणि सोयीनुसार अ‍ॅडजस्ट होणारं कल्चर आता सगळीकडे सर्रास दिसतंय. पोलीस पैसे खातात म्हणून नावं ठेवणारे लोक स्वत:च्या हॉटेलसाठी लिकर लायसन्स मिळवायला राजकारण्यांना पैसे देतात. वर्षांतनं एकदा पोलिसांच्या कार्यक्रमाला जाणारे कलाकार नंतर कधीतरी ‘ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’मध्ये पकडल्यावर त्याचाच दाखला देऊन सोडायचा आग्रह धरतात. आपल्याला समाज म्हणून कोणाचाही धाक नकोय आणि शिस्तीची तर आपल्याला अ‍ॅलर्जीच आहे. म्हणूनच पोलिसांना सरसकट ‘गैरवापर’ करणारे समजण्यात आणि वेळोवेळी त्यांना आपला वट वापरून ‘मॅनेज’ करण्यात आपण सगळे धन्यता मानतो ही आजची खरी शोकांतिका आहे.

पोलिसांकडे नव्या दृष्टिकोनाने पाहायची आज सर्वात जास्त गरज आहे. त्यांच्याशी सौजन्य हे ‘सप्ताहानं’ पाळून होणार नाही, त्यासाठी कायमस्वरूपी समन्वय असणं गरजेचा आहे. पोलिसांना कर्तव्य बजावताना अभिमान आणि चुकीचं पाऊल उचलताना भीती वाटणं इतपत ज्या दिवशी परिस्थिती बदलेलं त्या दिवशी पोलीस होणं ही शोकांतिका न रहाता आदराची गोष्ट होईल. मात्र तो दिवस येण्यासाठी सरकार, जनता आणि पोलीस खातं यांना अतोनात मेहनतीची, पारदर्शक संवादाची आणि एकमेकांबद्दल काळजी असण्याची नितांत गरज आहे. कारण कार्यक्षम शासन आणि शिस्तप्रिय समाजच प्रामाणिक आणि सक्षम पोलीस घडवण्यात मोलाचा वाटा उचलणार आहे.
क्षितिज पटवर्धन – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2016 1:30 am

Web Title: police issues
Next Stories
1 कुठून आणायची तुझ्यासारखी माणसं?
2 स्वचित्र
3 यश-अपयश?
Just Now!
X