25 September 2020

News Flash

अभ्यास बदलत्या सांस्कृतिक घटनांचा

सध्या ती ब्रह्मपुत्रेच्या काठी राहणाऱ्या लोकांवर, त्यांच्या आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या संबंधांवर काम करते आहे.

भारताच्या विविध भागांत स्वतंत्र पद्धतीनं काम करणारी आरती ही पत्रकार आणि छायाचित्रकार. तिचं काम माणूस आणि पर्यावरण यांच्यामधला स्वाभाविक संबंध टिपून तो प्रसिद्ध करणं. तिनं सुरू केलेल्या ‘पिपली प्रोजेक्ट’च्या संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेक लोकांना आपलं काम प्रसिद्ध करण्याची संधी मिळते आहे.
भा रताच्या विविध भागांत स्वतंत्र पद्धतीनं काम करणारी आरती कुमार-राव ही एक अभ्यासू आणि ‘भटकी’ पत्रकार आणि छायाचित्रकार आहे. तिचं काम थोडक्यात सांगायचं झालं तर माणूस आणि पर्यावरण यांच्यामधला स्वाभाविक संबंध टिपणं आणि तो लोकांसमोर आणणं. सध्या ती ब्रह्मपुत्रेच्या काठी राहणाऱ्या लोकांवर, त्यांच्या आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या संबंधांवर काम करते आहे.
आरती स्वत:ला केवळ एक पत्रकार किंवा छायाचित्रकार समजत नाही. तिच्या मते, ही लेबलं माणसाला कळत-नकळत मर्यादित करत असतात. तिच्या मते,ती कथा सांगते, सत्य घटनांवर आधारित कथा. नदी, डोंगर, माणसं यांच्या कथा. माणसांच्या, त्यांच्या बदलत्या सांस्कृतिक खुणांच्या कथा. अशा कथा ज्या मुख्य प्रवाहात सांगायच्या राहून जातात. कारण मुख्य वर्तमानपत्रांकडे आणि मासिकांकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एकच प्रोजेक्ट करण्यासाठी वेळ आणि पैसा हे दोन्हीही नसतं. तिथे आरतीसारखे पत्रकार मदतीला येतात. आरतीने तयार केलेली फीचर्स आणि फोटो स्टोरीज भारतातल्या अनेक प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये, नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ती म्हणते की, ‘‘मी सांगते त्या कथा शब्द, चित्र, छायाचित्र यांच्या पलीकडे जाणाऱ्या असतात. मी एकाच वेळी अनेक माध्यमांचा वापर करून गोष्ट फुलवत असते, त्यातून त्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचायला मदत होते.’’
‘‘मी ज्याला ‘व्हिजुअल स्टोरी टेलिंग’ म्हणते त्याची चटक मला दर महिन्याला घरी येणाऱ्या ‘नॅशनल जिओग्राफिक’ या मासिकानं लावली. ठं३ॅी च्या त्या सुप्रसिद्ध पिवळ्या खिडकीमधून जे जग पाहिलं त्यामुळे मी सर्वात जास्त प्रभावित झाले,’’ ती सांगते. असं असलं तरी तिनं करियर करण्यासाठी पहिल्यापासून हेच क्षेत्र निवडायचं असं काही ठरवलं नव्हतं. म्हणूनच मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून बी.एस्सी. फिजिक्समध्ये पदवी घेतली. पुढे पुणे विद्यापीठातून फिजिक्स, बायोफिजिक्समध्ये तिनं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. हे शिक्षण घेतानाच तिला लिखाणाची आवडही जोपासायची होती. पण भारतामध्ये त्या वेळेला फिजिक्स, लेखनकौशल्य आणि पत्रकारिता हे विषय एकत्र शिकणं अशक्यच होतं. शिक्षणानंतर तिनं काही काळ प्रयोगशाळांमध्ये कामही केलं. पण त्या विषयाची आवड असली तरीही सारं आयुष्य प्रयोगशाळेत घालवणं तिला अशक्यच वाटलं. त्यामुळे एका रात्रीतून ते काम सोडून देण्याचा निर्णयही तिनं घेतला. आपली लेखनाची आवड जोपासण्यासाठी तिनं ‘नॅशनल ग्लॉसी’ या मासिकात नोकरी करायला सुरुवात केली. या नंतर दीड-एक वर्षांतच तिचं लग्न झालं आणि ती अमेरिकेत गेली. तिथेही तिनं शिक्षण घेतलं आणि ८ र्वष कॉर्पोरेट जगतात काम केलं.
पण नंतर मात्र कॉर्पोरेट जगताला तिनं रामराम ठोकला आणि स्वत:च्या आवडीच्या कामात उतरली. अर्थात सध्याच्या कामाच्या पद्धतीमुळे तिला महिन्याच्या महिन्याला पगार मिळत नाही. जगभरातून अनेक संस्था अशा प्रकारच्या कामाला फेलोशिप, अनुदान देत असतात. त्या पैशांच्या आधारे प्रवास आणि इतर सर्व खर्च भागवायचा असतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कॉर्पोरेट जगतात मिळवलेला पैसा तिला खूप कामी आला, हे ती आवर्जून सांगते. कारण अनुदान कायमच मिळेल असं नाही. काही जण अचानक मदतीला धावून येतात. त्यांना काम आवडलेलं असतंच, शिवाय अशा गोष्टी लोकांसमोर आणल्या जाव्यात असा त्यांचा ठाम विश्वास असतो म्हणून ते काही देणगीही देतात. पण असे लोक क्वचितच भेटतात. अशा ‘स्लो जर्नालिझम’ला मदत करण्याऱ्या संस्था, गट खूप कमी आहेत. म्हणून आरती,
प्रेम पानिकर आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी मिळून ‘पिपली प्रोजेक्ट’ची सुरुवात केली. ‘पिपली प्रोजेक्ट’च्या संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेक लोकांना आपलं काम प्रसिद्ध करण्याची संधी मिळते. तिच्या मते आज भारतात अनेक घटना घडत आहेत, ज्या सांगायला कोणी नाही. ज्या घटना सांगितल्या जायला हव्यात, मात्र त्यांना व्यासपीठ नाही, ‘ब्रेकिंग न्यूज’नं आपलं आयुष्य पुरतं व्यापून टाकलं आहे. इतकं की आपल्यामध्ये एखादा मुद्दा शांतपणे ऐकायची, बघायची, मग आपलं मत मांडायची क्षमताच नाही. माध्यमं त्यांचीच मतं आपल्यावर थोपवतात आणि आपण ती आपली म्हणून जगभरात सांगत सुटतो. ‘पिपली प्रोजेक्ट’च्या माध्यमातून, या स्लो जर्नालिझमच्या मदतीनं ही परिस्थिती हळूहळू बदलवू. जसे लोक जोडले जातील तशी ही परिस्थितीही बदलेल असा तिचा विश्वास आहे. आरतीच्या मते आता इंटरनेटमुळे अशा ‘स्टोरीज’ लोकांपर्यंत पोहोचवणं सोपं झालं आहे.
आरतीच्या कामाचं स्वरूप अतिशय जिकिरीचं आणि अनेक वेळा शारीरिक क्षमतांचा कस लावणारं असंच आहे. एवढं सगळं करून जेव्हा समाजातला अन्याय, निराशाच बघावी लागते तेव्हा नक्कीच हताश वाटत असणार, असं विचारलं असता ती म्हणाली की, ‘‘दऱ्या-खोऱ्यांत, जंगलात काम करताना मला जे सकारात्मक अनुभव येतात तसे अनुभव शहरात, चार भिंतींमध्ये कधीच येत नाहीत. बाहेर पडल्यावर तुम्हाला, तुम्ही नक्की कोण आहात, तुम्हाला काय हवं आहे याची जाणीव होते. तुम्ही अधिकाधिक वर्तमानात जगायला शिकता.’’
तिच्या कामामध्ये सगळ्यात आवडता विषय कोणता असं विचारलं जाणं साहजिकच होतं. पण आरती आणि तिची भटकंती ही स्टोरी, फीचर, विषय, प्रश्न या सगळ्या विभागणीच्या पलीकडे गेली आहे. आता तिला दिसतात ते फक्त नद्या, डोंगर आणि माणसं. आरती सध्या ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी वसलेल्या काही वाडय़ा वस्त्यांचा अभ्यास करते आहे. ब्रह्मपुत्रा नदी सध्या बऱ्याच बदलांना सामोरी जाते आहे. त्यामध्ये मुख्य बदल झाला तो धरणांमुळे. यामुळे तिथल्या जैवविविधतेवर परिणाम झाला, रोजगाराची साधनं बदलली. तिच्या अभ्यासामध्ये मानवनिर्मित आणि पर्यावरणाच्या बदलांमुळे इथल्या लोकांवर नक्की काय परिणाम होतो याचं चित्रीकरण करणं हा मुख्य भाग आहे. हा प्रकल्प एक वर्षांचा असून या एक वर्षांत केवळ पाच टक्के भागाचा अभ्यास होऊ शकतो असं आरती म्हणते.
या प्रकल्पाआधी आरतीनं थर वाळवंटामध्ये राहणाऱ्या लोकांच्यावर काही फोटो स्टोरीज केल्या. तिथली वेगळ्या पद्धतीची शेती, कमी पाण्यामध्ये लोक कसे राहतात, तिकडची धुळीची वादळे इत्यादी गोष्टींची छायाचित्रे तिने टिपली. याबरोबरच तिने भारतामधल्या मान्सूनची सुरुवात यावर फोटो-स्टोरी केली. कोलकात्यामधले रस्ते, हत्तींचा कळप, भारतामध्ये असलेला दुष्काळ हेही तिच्या फोटो स्टोरीजचे विषय आहेत.
सध्याचा ब्रह्मपुत्रेचा प्रकल्प हातावेगळा झाला की ती तिच्या बंगळुरू शहराचा अभ्यास सुरू करणार आहे. त्यामध्ये ती बंगळुरू शहराच्या पाण्याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये एके काळचं समृद्ध साम्राज्य सध्या ४० वर्षांमधल्या सर्वात वाईट दुष्काळाला कसं तोंड देत आहे, या प्रश्नावर ती काम करणार आहे.

(सदर समाप्त)
pradnya.shidore@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 1:15 am

Web Title: study of changing cultural events by arati kumar rao
Next Stories
1 संघर्षांतून नवनिर्माणाकडे..
2 कलेच्या सोबतीने व्यवसायवृद्धी
3 जळजळीत जखमेवर हळुवार फुंकर
Just Now!
X