पॉला आणि गॅरीने आपली आयुष्ये भल्यामोठय़ा बॅकपॅकमध्ये बंदिस्त केली आणि ते लंडनहून चालत तडक निघाले थेट सहारा वाळवंटाच्या दिशेने. तिथून सहाराच्या किनाऱ्यावरच्या एका दुर्गम खेडय़ापर्यंतचा तीन वर्षांचा, १२ हजार कि.मी.चा प्रवास. पण मध्येच रखरखत्या वाळवंटात जोडीदार पाठ फिरवून परतला तरीही पॉलाने हार मानली नाही, ती चालतच राहिली.. तिच्या या प्रवासाने काय दिले ते सांगण्यासाठी पॉला नुकतीच मुंबईत आली होती. तिचे हे अनुभव.
एक नाव सोडले तर काहीच कॉन्स्टन्ट नव्हते तिच्या आयुष्यात. वरकरणी सगळे व्यवस्थित होते. गॅरीसारखा समानधर्मी जोडीदार, मेलबर्नमधले सुंदर घर, ते सगळे सोडून ब्रूमसारख्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी राहायचा घेतलेला निर्णय. मिळतील ती लहानसहान कामे करत दोघांनी थाटलेला नवा संसार. उचंबळणाऱ्या लाटांच्या संगतीत मित्रमंडळींशी गप्पागोष्टी करत कॅम्पफायरच्या उजेडात जागवलेल्या रात्री. गिटारवरची उसळती गाणी, सिगरेट्स्, िड्रक्स अशी एक वेगळीच नशा असणारे स्वतंत्र, मुक्त आणि बेधुंद आयुष्य.
तरीही आत कुठे तरी एक अस्वस्थता ठाण मांडून बसली होती. अपुरेपणाची जाणीव मन आतून कुरतडत होती. कुठे तरी जायचे होते, काही तरी करायचे होते, काही तरी मिळवायचे होते. काळाचे मणी हातातून झरझर निसटून चालल्याची जाणीव अंतरंगात खळबळ माजवत होती आणि दोघांनाही एकदम जाणवण्याइतकी ती खरी होती आणि एका भल्या पहाटे मोकळ्या आकाशाखाली समुद्रात स्वच्छंद पोहताना त्या दोघांना अचानक ते सापडले.
ते स्वप्न- सहारा वाळवंट!
“A really big, monster of a travel to end all travels..” या कल्पनेने पछाडलेल्या पॉलाचे आयुष्य त्या क्षणापासून आमूलाग्र बदलले. एका वेगळ्याच धुंदीच्या लाटेवर स्वार असलेला भूतकाळ मागे सोडत पॉला आणि गॅरीने आपली आयुष्ये भल्यामोठय़ा बॅकपॅकमध्ये बंदिस्त केली आणि ते लंडनहून चालत तडक निघाले. २००४ साली सुरू झालेला हा प्रवास इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, मोरोक्को पार करत तब्बल तीन वर्षांनी सहाराच्या किनाऱ्यावरच्या एक दुर्गम खेडय़ामध्ये थांबला. अर्थात हा प्रवास सोपा मुळीच नव्हता.
गाठीशी असलेल्या ज्या तुटपुंज्या बचतीच्या जोरावर पॉला आणि गॅरी या जोडगोळीने या सफरीसाठी लागणारी सगळी जमवाजमव केली होती, ती शिदोरी आता जवळपास संपत आली होती. पाठीवरचा बॅकपॅक आता अधिकच जड भासू लागला होता आणि पुढे पसरला होता सहाराचा विस्तीर्ण भूलभुलया. तिला सतत खुणावणारा, सतत रूप बदलणारा, मायावी सहारा. ते रौद्रभीषण रूप तिच्या डोळय़ांत सामावत नव्हते. इथून पुढे खरी लढाई सुरू होणार होती- निसर्गाशी, परिस्थितीशी, नशिबाशी!
पॉलाच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याचे वर्णन ‘स्लो जर्नी साऊथ’ आणि वाळवंटातल्या पायपिटीचे अनुभव ‘सहारा’मधून पुस्तकरूपाने प्रकाशित झालेत. ही रूढ अर्थी प्रवासवर्णने किंवा साहस मोहिमांच्या सुफल, संपूर्ण झालेल्या रम्य कहाण्या नाहीत. एका स्त्रीने कुठलेही पाठबळ नसताना केवळ स्वत:चा आशावाद, िहमत आणि कणखरपणाच्या जोरावर १२ हजार कि.मी. चालत पार केलेल्या अत्यंत खडतर प्रवासाचे हे चित्रण आहे. अतिशय सोपी भाषाशैली, कालक्रमानुसार सरळ उलगडत जाणारे कथानक आणि दृश्यात्मकता हे त्याचे विशेष आहेत. म्हटले तर हे तिचे आत्मकथनही आहे; पण ही अशी कथा आहे, की जी परिस्थितीचा सामना करताना आलेल्या अडचणींचा पाढा अचूक उलगडते, दु:ख-उदासीचे मूक रंग उधळते, व्यथेच्या विविध क्षणांना स्पर्श करते, पण त्या दु:खाच्या भोवऱ्यात गुंतून भोवंडत नाही, ती व्यथेची गाथा बनत नाही. विलक्षण अलिप्तता हे तिचे अतिशय महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ आहे.
‘‘सहाराने मला वेड लावले होते, पण इतर जण करतात तशी वाळवंटाची आरामशीर सफारी मला करायची नव्हती. मला रणरणत्या वाळवंटातून प्रत्यक्ष चालायचे होते, उघडय़ा आकाशाखाली ठोकलेल्या तंबूत राहायचे होते, तिथल्या विविध भटक्या-विमुक्त जमातीची जीवनशैली आणि आदिम संस्कृतीचा हिस्सा बनून जगायचे होते. मला ते जग एका वेगळय़ा दृष्टिकोनातून बघायचे होते.
ch03माझे ते स्वप्न होते आणि माझ्याकडे माझे असे ते स्वप्नच होते फक्त.’’
म्हणून आपला देश-समाज-कुटुंब पाठी सोडून कुठल्याही स्पॉन्सरशिपविना, मीडियाच्या प्रकाशझोतापासून दूर, ही बाई स्थानिक वाटाडे आणि कॅमल ट्रेन बरोबर घेऊन एक एक पाऊल टाकत त्या सतत रूप बदलणाऱ्या असीम मरुभूमीत पुढे जात राहिली. ध्येयावरचा अतूट विश्वास आणि ते साध्य करण्याची जिद्द हे तिची प्रेरणा बनून तिला बळ पुरवत राहिले. अर्धीअधिक वाटचाल झाल्यावर, तिचा जोडीदार तिला वाळवंटात एकटीला सोडून पाठ फिरवून त्याच्या वाटेने निघून गेला तेव्हा काही क्षण ती हतबल होत पराभवाच्या भावनेने ग्रासून जात कोसळून पडली; पण ती हरली नाही, झाले गेले ते स्वीकारून ती सावरत गेली आणि पूर्वीपेक्षा काकणभर अधिक जोमाने पावले टाकत पुढच्या प्रवासाला निघाली.
‘‘त्या क्षणी लग्न टिकवण्यासाठी हातातोंडाशी आलेली संधी सोडून गॅरीबरोबर परत फिरले असते, तर इतक्या कष्टाने मिळवलेली सहारा पार करण्याची ही एकमेव संधी गमवल्याची खंत मला आयुष्यभर छळत राहिली असती. ते श्रेय हरपल्याचे, पराभवाचे चटके मला आतून बसत राहिले असते आणि परतून आले असते तरी आम्हा दोघांमध्ये निर्माण झालेली दरी इतकी प्रचंड होती की, ती भरून काढण्याची, परिस्थिती पूर्ववत होऊन हे लग्न टिकण्याची शाश्वती तरी कुठे होती? त्या परिस्थितीत माझ्यासमोर एकच पर्याय स्पष्ट उभा होता, पुढे चालत राहून मोहीम पूर्ण करणे.’’ त्या बिकट प्रसंगी अतिशय तर्कशुद्ध निर्णय घेणारी पॉला आज त्या क्षणांकडे मागे वळून बघताना विलक्षण हळवी होते.
या मोहिमेसाठी तिने आपल्या तुटपुंज्या कमाईमधला प-पसा वाचवला होता, त्यासाठी दिवसरात्र संशोधन करून सगळी पूर्वतयारी केली होती, स्थानिक वाटाडय़ांशी चर्चा करून मोहिमेचा आराखडा नक्की केला होता, फ्रेंच आणि अरेबिकशी नाते जोडले होते, सामानाच्या वाहतुकीसाठी कॅमल ट्रेनबरोबर घ्यायची म्हणून उंटांना वाळवंटातून चालवण्याचे, त्यांची निगा राखण्याचे प्रशिक्षणही तिने मोठय़ा कष्टाने घेतले होते, पण आता ती एकाकी होती, मोरोक्कोच्या पुढचा आफ्रिकी भूप्रदेश इस्लामधर्मीय आहे, त्या अगदी अपरिचित संस्कृतीने वेढलेल्या वाळवंटातून ती चालत राहिली. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातले भटक्या-विमुक्त जमातीतले अशिक्षित वाटाडेच तिचे साथी, मित्र, आप्त बनून तिच्या पाठीशी उभे राहिले. एवढेच नव्हे, तर वाळवंटातली आश्रयस्थाने, जलाशयांच्या आसऱ्याने वसलेली लहानशी गावे, विहिरीजवळ ठोकलेल्या तंबूच्या कनातीतल्या भटक्या जमातीतल्या लोकांनी या पाश्चिमात्य संस्कृतीतल्या परक्या गोऱ्या बाईला आपल्यात सामावून घेतले, तिच्याबरोबर घासातला घास वाटून घेतला, रात्री पाठ टेकायला सुरक्षित निवारा दिला, प्रसंगी कोंबडी-बकरा कापून तिला मेजवानीही दिली हे आठवताना पॉला अगदी सद्गदित होऊन जाते. रेताड वाळवंटातल्या वादळ-वावटळींचा सामना करत जगणाऱ्या त्या अभावग्रस्त भटक्या जमातींनी, संस्कृती-परंपरेच्या दाट बुरख्याआड दडलेल्या त्या अनेक अनाम चेहऱ्यांनी पॉलाला सांभाळून घेतले, त्यातून ती बदलत गेली, जगण्याचे धडे शिकत गेली, ती वाळवंटाची लेक झाली.
Sometimes putting one foot before the other is the best way to gain असे ती आज म्हणते तेव्हा त्या काळात उचललेल्या अपरिमित शारीरिक कष्टांचा, मनस्तापाचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नसतो, कारण ते सगळे पचवून ती पुढेच जात राहिली होती, सर्व संकटांवर मात करून १२ हजार किलोमीटरची खडतर पायपीट पूर्ण करण्यात यशस्वी झाली होती. म्हणून तिची ही जगावेगळी कहाणी ऐकताना माटुंग्याच्या वेलिंगकर इन्स्टिटय़ूटमधले एमबीएचे तरुण विद्यार्थी अक्षरश: भारावून गेले होते. आजच्या अतिशय गुंतागुंतीच्या, अस्थिर सामाजिक- राजकीय- आíथक आव्हानांचा मुकाबला करत ज्यांना आपली करिअर घडवायची आहे, समाज-देश-जगाच्या विकासात आपल्या योगदानाची ज्यांना जाणीव आहे अशा युवा पिढीसमोर तिचा प्रत्येक शब्द वर्गात शिकवलेल्या व्यवस्थापनविषयक तत्त्वांचा जणू व्यावहारिक वस्तुपाठ बनून उलगडत होता. जाणून घ्या आणि त्याचे नियोजन करा, ते आत्मसात करा, निश्चयाने ते पार पाडा आणि कधीही हार मानू नका- वाळवंटी मोहिमेत तावूनसुलाखून निघालेल्या पॉलाची चतु:सूत्री त्यांना पुढील वाटचालीसाठी जणू मूलमंत्र देऊन गेली.
या प्रवासात पुष्कळदा अपयशाचे क्षणही वाटय़ाला आले. प्रवासाच्या अधल्यामधल्या टप्प्यावर तिच्या एकमेव वाटाडय़ाच्या हट्टीपणाला कंटाळून तिने त्याला काढून टाकायचा निर्णय घेतला आणि पुढचा टप्पा एकटीने पार पाडण्याचे दिव्य स्वीकारले, पण तिच्याबरोबर असलेल्या त्या एकमेव उंटालाही ते कळले की काय न कळे, दिवसभराची पायपीट संपल्यानंतर तिने रोजच्या सवयीने त्याचे दावे सोडताच तो तिथून जो उधळला की ज्याचे नाव ते! तिचे सगळे सामान, पसे, पासपोर्ट, एवढेच नव्हे तर जीपीएस सिस्टम घेऊन गायब झालेला तो प्राणी त्या सतत रूपरंग बदलणाऱ्या मरुभूमीतून शोधून परत आणणे ही अशक्य गोष्ट होती, पण सगळे हरवून सरभर झालेल्या त्या क्षणीही ही बाई हरली नाही, कर्माला दोष देत बसली नाही.
अखेरच्या टप्प्यात माले पार करत असताना आजूबाजूला पेटत चाललेल्या यादवीच्या वणव्यात ती सापडली आणि कैद केली गेली. तिच्याकडचं सगळं, अगदी उंटही जप्त करण्यात आला आणि तिच्यावर देश सोडण्याची सक्ती करण्यात आली. अंतिम टप्प्यावर आलेली सफारी सोडून पॉला जड अंत:करणाने घरी परतली.
पुलाखालून आता खूप पाणी वाहून गेलंय. या अनुभवांवर लिहिलेल्या ‘स्लो जर्नी साउथ’ आणि ‘सहारा’ पुस्तकावर वाचकांच्या उडय़ा पडल्या. मेहता पब्लििशग हाऊसतर्फे सार्क देशांसाठी काढलेल्या खास आवृत्त्या आज भारतीय वाचकांना भुरळ पाडत आहेत. सध्या ऑस्ट्रेलियात स्थिरावलेल्या पॉलाने पर्थला ‘सोविलो सोल’ नावाचे एक ‘वेलनेस सेंटर’ सुरू करत उद्योजकतेच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. तिचा जीवनमार्ग विविध अर्थानी खडतरच होता, पण त्यातून ती जे शिकत, समजत, आतून परिपक्व होत गेली ते सगळे शहाणपण तिने स्वत:च्या पूर्वीच्या बोहेमियन वृत्तीला अनुसरत स्वत:पुरते मर्यादित ठेवले नाही. ते तिने आपली पुस्तके, ब्लॉग्जवरच्या लिखाणातून जगभरातल्या वाचकांना भरभरून दिले आणि आता वेलनेस सेंटरच्या माध्यमातून पर्यायी उपचार पद्धती व व्यक्तिमत्त्व विकासाची सांगड घालून इतरांची आयुष्ये निरामय आणि निर्भय व्हावीत यासाठी ती धडपडत राहणार आहे. स्पेन, मोरोक्को या तिच्या आवडत्या देशात व्यक्तिमत्त्व विकासाचे उद्दिष्ट केंद्रस्थानी असणाऱ्या ‘वॉकिंग टूर्स’ सुरू करण्यासाठी ती प्रयत्नशील आहे.
 वेिलगकर इन्स्टिटय़ूटमधल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, तिचे लक्ष समोर मोठय़ा संख्येने जमलेल्या मुलींकडे वेधले जात होते. हिने जे केलंय ते मला जमेल का? करू शकेन मी हे धाडस? त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले असे अनेक प्रश्न तिने नेमके टिपले आणि तिथे जमलेल्या आपल्या छोटय़ा मत्रिणींना उद्देशून ती म्हणाली, Beware of the idea assassins.. ते प्रत्येक पावलागणिक तुला नामोहरम करायचा प्रयत्न करतील, कारण तू स्त्री आहेस, पण तू हस आणि चालत राहा. ते कितीही कठीण असले तरी चालणारे तुझे प्रत्येक पाऊल तुला पुढेच नेईल.’’ समारोप करताना पॉला म्हणाली, ‘‘प्रत्येकाचे स्वप्न वेगळे, ध्येयही वेगळे असते, तसेच प्रत्येकाच्या सुख-समाधान-आनंदाचे मोजमापही वेगळे असते. तुमच्या आयुष्याचे श्रेय कशात आहे ते ओळखायला शिका. माझे यश कशात आहे? माझी दिवसभराची रखरखाटातली पायपीट संपल्यानंतर रात्री मी थकून आडवी व्हायचे तेव्हा वाळवंटावर दूरवर पसरत गेलेले असीम सुंदर आकाश बघताना माझे मन आनंदाने भरून यायचे. आजचा दिवस उत्तम जगल्याबद्दल ही रात्र आपल्याला जणू बक्षीस मिळाली आहे, अशा भावनेने कृतकृत्य होऊन जायचे. वाळवंटातल्या त्या अडाणी माणसांची ही जीवनदृष्टी पुढे माझी धारणा बनून गेली, ती शिकवण यशाचा पाया ठरली.’’
 यशस्वी करिअर आणि सुखी आयुष्याच्या रूढ कल्पनांपलीकडे एक वेगळे जग आहे. वेगळा विचार करणाऱ्या, धाडस दाखवून वेगळी वाट चोखाळणाऱ्या मंडळींचा आयुष्यमार्ग खडतर असणारच. प्रत्येक ‘जिवंत’ माणसाच्या आयुष्यात कधी तरी अचानक ती वेळ येते ज्या क्षणी इतरांसारखे इतर बनून, कळपात दाणे टिपत सुरक्षित, पोटभरू वृत्तीने जगण्याचे आयुष्य झुगारून देत पॉलासारखी मंडळी एक खडतर जीवनक्रम जाणूनबुजून स्वीकारतात. मग तेच त्यांच्या आयुष्याचे साध्य आणि साधनही बनून जाते. अशी मंडळी यशाचे नवे मानदंड प्रस्थापित करतात.
सगळे कष्ट झेलून खंबीरपणे परिस्थितीवर मात करणाऱ्या या बाईने किती सोपे
करून टाकले सगळे!
yashodhara.katkar@welingkar.org