नेपाळमध्ये २५ एप्रिल रोजी झालेल्या भूकंपाने लाखो नागरिक विस्थापित झाले. क्षणात होत्याचं नव्हतं झालेल्या या विनाशकारी भूकंपाचा हा प्रत्यक्ष अनुभव

मीआणि माझी मैत्रीण डॉ. रंजना एका कॉन्फरन्ससाठी नेपाळला गेलो होतो. २० एप्रिलला कॉन्फरन्सचे सूप वाजल्यावर उर्वरित नेपाळ पाहण्यासाठी एका ट्रॅव्हल कंपनीकडून कार्यक्रम तयार करवून घेतला आणि त्यानुसार चितवन पोखरा फिरून २४ तारखेला संध्याकाळी काठमांडूला देव गेस्ट हाऊसमध्ये परतलो.
२५ तारखेला मुंबईत येण्यासाठी दुपारची फ्लाइट असल्याने सकाळीच आम्ही चेकआऊट करून, सामान घेत ठरवलेल्या टॅक्सीतून स्वत:साठी तसेच आप्त मित्रांसाठी मनसोक्त खरेदी केली आणि तिथून काठमांडूतील प्रसिद्ध असा भक्तपूर परिसर पाहण्यास गेलो. युनेस्कोने त्याला जागतिक वारशाचे स्थळ ठरवल्याने तिथे पर्यटकांचा ओढा असतो, मात्र परिसराच्या आत वाहने नेण्यास मनाई असल्याने टॅक्सी ड्रायव्हरला मुख्य रस्त्यावर थांबण्यास सांगून आम्ही चालत निघालो..
एकूण चार विभागांत पसरलेल्या त्या परिसरातील दरबार स्क्वेअर पाहून पुढे दत्तात्रय स्क्वेअरशी पोचलो. तिथले अरुंद गल्लीबोळ आणि तुरळक वस्तीच्या इमारती बघताना जुन्या मुंबई-पुण्याची आठवण येत होती. बहुतेक पर्यटक प्राचीन बांधकाम आणि मंदिरांचे फोटो काढण्यात व्यस्त असतानाच पावणेबाराच्या सुमारास माझ्यासमोरच्या कंपाऊंडच्या भिंतीसमोरून काहीजण आरडाओरडा करत पळाले. ते काय किंवा कशाला ओरडताहेत याचा अंदाज येण्यापूर्वीच मला कुणी तरी पायाखालून वर ढकलतेय असा भास झाला आणि दुसऱ्या क्षणी एखादा चेंडू टप्पा खाऊन किंचित उडून पुन्हा खाली आपटावा तशी माझी अवस्था झाली आणि मी उजव्या कुशीवर सपशेल आपटले. प्रचंड भांबावून हाताच्या रेटय़ाने जेमतेम उभी राहायचा प्रयत्न करतेय तर तोच प्रकार पुन्हा झाला आणि पुन्हा धडपडले. पायातून, कमरेतून कळा येऊ  लागल्या, आणि त्याच क्षणी मनातील गोंधळ संपून वास्तवाचे भान आले. आजवरच्या आयुष्यात किंचितशी झलक दाखवणाऱ्या भूकंपाने आज आपले रौद्र रूप दाखवले होते तेही परदेशात, सुहृदांपासून दूर एकाकी असताना.
अर्थात तो क्षण भावविवश होण्याचा नव्हता, मुश्कीलीने पर्स सांभाळत उभी राहिले. समोर सैरावैरा धावणाऱ्या माणसांत माझी मैत्रीणही दिसली आणि ch15आपल्यासोबत कुणीतरी आहे याचे समाधान वाटले. तिला हाक मारणार तोच अधिक तीव्र स्वरूपाचा धक्का जाणवला.. काही सेकंदांनंतर मी भानावर आले तेव्हा धूळभरल्या जमिनीवर मी पडले होते. माझ्या अंगाखालची पर्स मला टोचत होती. पडल्या पडल्याच मी समोर पाहण्याचा प्रयत्न केला, पण धुळीच्या दाट पडद्यामुळे पलीकडचे काही दिसणे केवळ अशक्य होते. आजूबाजूच्या करुण आक्रोशाने भेदरायला झाले. काही क्षणानंतर धुळीचा पडदा विरला आणि माणसांच्या आकृती दिसू लागल्या. पर्स उराशी कवटाळून स्वत:ला सावरत ठणकत्या शरीराने एक-एक पाऊल चालताना पुन्हा मैत्रीण दिसली. दोघींनी आनंदाने एकमेकींना मिठय़ा मारल्या. भूकंपाच्या वेळी मोकळ्या जागेत, मैदानांवर जाऊन उभे राहावे या नियमानुसार  आमच्यासारखेच हवालदिल झालेले अनेक पर्यटक, स्थानिक दत्तमंदिरासमोरच्या मोकळ्या मैदानात जमा होऊ  लागले.
पहिल्या धक्क्यातून सावरल्यानंतर प्रसंगावधान राखून मी पहिल्यांदा मुलीला फोन करायचा प्रयत्न केला, पण फोन बंद होता. इतक्यात समोर एक परदेशी स्त्री फोन करताना दिसली तेव्हा तिच्याकडे धाव घेऊन माझ्या मुलीला आम्ही सुखरूप असल्याचा फक्त मेसेज करण्याची विनंती केली आणि तिनेही त्याप्रमाणे केले. गंमत म्हणजे माझा मेसेज जाईपर्यंत नेपाळमध्ये भूकंप झाल्याची बातमी इथे कुणाला कळली नव्हती. तिचे आभार मानून वळतेय तोच कुणी तरी समोरच्या एकुलत्या एक दुकानातून केक घेताना दिसले. आमच्याकडेही काही नव्हतेच खायला म्हणून घ्यायला गेलो तेव्हा त्याने जबाबदारीने प्रत्येक ग्रुपला १ केक असे वाटप करून छापील किंमतच आकारली. त्याही क्षणी त्याचे कौतुक वाटले. त्यातील अर्धाच केक खाऊन पुढची तरतूद म्हणून आम्ही अर्धा ठेवून दिला.
 पुन्हा हादरा बसेल का? आपले काय होईल? याचा ताण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वाचता येत होता. माझे लक्ष समोरच्या गरुड स्तंभाकडे गेले. त्या गरुडाची चोच मला हलतेय असा भास होतोय असे वाटत असतानाच कुत्र्यांचे केकाटणे आणि पक्ष्यांचा फडफडाट कानी आला आणि दुसऱ्या क्षणी जमीन पुन्हा हादरली आणि सगळ्यांचे चेहरे पांढरेफटक पडले. त्यानंतर किमान १७-१८ धक्के जाणवले, पण त्यांची तीव्रता सुरुवातीच्या धक्क्याएवढी नव्हती. अशा धक्क्यांना म्हणा किंवा मानसिकदृष्टय़ा सावरल्याने म्हणा, आजूबाजूच्या गल्ल्यातून ढिगारे बाजूस सारून खालच्या विव्हळणाऱ्या माणसांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले होते. आम्हीही हताश अवस्थेत उभे असताना आमच्या बाजूने चादरीच्या स्ट्रेचरवरून एका रक्तबंबाळ स्त्रीचा देह नेताना बघितल्यावर पोटात अक्षरश: तुटले. बिचारी कुणाची कोण असेल, तिच्यासाठी दोन अश्रू ढाळायलाही कुणी आजूबाजूला नव्हते. मनाला प्रचंड उदासीने घेरले आणि त्याक्षणी अंधार पडायच्या आत इथून बाहेर पडण्याचा आम्ही निर्णय घेतला. कारण नुसतेच तिथे बसण्यात काहीच अर्थ नव्हता. आमच्यासारख्याच समविचारी माणसांबरोबर आधीच्या हमरस्त्याकडे निघालो. जो तो आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने कूच करत होता. परंतु माझे ठणकणारे अंग आणि पाय त्यांच्या वेगाशी जुळवू शकत नव्हते. आमच्यातील अंतर वाढत गेले तसे डोळ्यांतून धारा वाहू लागल्या. देवाचा धावा करत खुरडत खुरडत त्यांच्या मागे जाताना मला मोटारसायकलवरून जाणारे जोडपे दिसले. अक्षरश: हात जोडून त्यांना मुख्य रस्त्यापर्यंत न्यायची विनंती केल्यावर, मला मध्ये बसवून त्यांनी अक्षरश: वेगवेगळ्या ढिगाऱ्यांनी भरलेल्या गल्ल्यांतून कसाबसा मार्ग काढत माझ्या इच्छित स्थळी पोचवले. कृतज्ञतेपोटी त्यांना ५०० रुपये  देऊ  केले तर त्यांनी स्पष्ट नकार दिला. अखेर माझा मान राखण्यासाठी मी पुढे केलेल्या नोटांतून त्यांनी फक्त १० रुपयांची नोट उचलली. परदेशात आणि तेही अशा संकटसमयी आलेल्या या अनुभवाने माझा माणुसकीवरचा विश्वास अधिकच दृढ झाला!
 हमरस्त्यावर पोचलो खरे, पण आमची टॅक्सीच काय कुठलीच वाहने दिसत नव्हती. अशा आणीबाणीच्या प्रसंगी आपले सामान आणि खरेदीवर तुळशीपत्र ठेवून तडक मायदेशी जावे की सामानाचा शोध घ्यावा यावर आमच्या दोघींचा खल झाला आणि अखेर नेसत्या वस्त्रानिशी पर्स सांभाळत विमानतळाकडे जायचे निश्चित झाले. एका खासगी गाडीला १२०० रुपये देऊन आम्ही  त्रिभुवन विमानतळाकडे निघालो.
 चार दिवसांपूर्वी रंगीबेरंगी गर्दीने गजबजलेल्या, फळाफुलांनी बहरलेल्या काठमांडू शहराचे आजचे भयाण उद्ध्वस्त रूप बघून एकीकडे मन विषण्ण झाले तर दुसरीकडे आपल्याला अजून कसल्या दिव्यातून पार पडायचेय याची चिंता होती. संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही तिथे भारतीयांसाठी असलेल्या गेटमध्ये प्रवेश केला. महिला वर्गाचा कायमच कुचंबणेचा विषय असलेल्या निसर्गाच्या हाकेला गेल्या १० तासांत ओ देणे जमले नव्हते. मात्र तिथे बऱ्यापैकी सोय झाली.
थोडय़ाच वेळात इंडियन एअर फोर्सच्या माणसांनी त्यांच्या विमानातून १२२ जणांना दिल्लीला नेणार असल्याचे सांगितल्यावर क्षणभर कानावर विश्वासच बसेना. फक्त पासपोर्ट बघून आणि आमच्याकडून जुजबी फॉर्म भरून घेताना, त्यांच्यातील माणुसकीचा ओलावा पदोपदी जाणवत होता. आम्ही विमानात प्रवेश केल्यावर त्यांची  In this hour of disaster We the Indian Govt and Indian Air Force are with you  अशी घोषणा ऐकल्यावर मला खात्री आहे माझ्यासारखाच प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून आला असणार.
दिल्लीला पोचल्यावर आपल्या मातृभूमीत सुखरूप परतलो या कल्पनेनेच मन पिसासारखे हलके झाले. तिथे महाराष्ट्राच्या प्रतिनिधीने आमचे स्वागत करून आम्हाला महाराष्ट्र सदनात नेले. आलिशानपणाच्या कल्पना थिटय़ा पडाव्यात अशी ती वास्तू पाहून तिथे वावरताना एकीकडे दडपण आले तर एकीकडे अभिमानही वाटला. आमच्यासाठी रात्री ३ वाजता त्यांनी गरम जेवणाची तसेच वातानुकूलित खोल्यांची सोय करून ठेवली होती. इतकेच नाही तर आमची २५ तारखेची विमानाची तिकिटे रद्द करून २६ची तिकिटे पहाटे  आमच्या हाती सोपवली गेली. एरवी आपण ज्याप्रमाणे गैरसोयींबद्दल तक्रार करतो तसेच त्यांच्या चांगल्या कामाची दखलही घ्यायला हवीच ना.
२६ तारखेला सकाळी नऊच्या सुमारास घरी पोचले तेव्हा गेल्या २२ तासांतील अनेक घटनांनी डोक्यात एकच गर्दी केली.. नेपाळचा तो भूकंप आता आमच्या आठवणींच्या कप्प्यात कायमचा बंदिस्त झाला..
शब्दांकन- अलकनंदा पाध्ये
alaknanda263@yahoo.com
‘भोगले जे दुख त्याला’ हे माधुरी ताम्हणे यांचे सदर आजच्या अंकात
प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.