योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com

अनेक गोष्टींचं आपण व्यवस्थित नियोजन करूनही आयत्या वेळी काहीतरी वेगळ्याच समस्या उद्भवतात आणि ती आव्हानं पार करण्यासाठी आपल्याला नव्यानं आखणी करावी लागते. कित्येकदा आपल्या कामात पूर्ण प्रयत्न के लेत असं वाटूनही हातून चुका घडतात, घोडचुका होतात.  प्रत्येकाच्या बाबतीत हे के वळ करिअरच्या सुरुवातीलाच अटळ आहे असं नाही, अगदी नंतरही ते घडू शकतं. पण या घटनांनी आपण खचून जाणार? दोन पावलं मागे हटणार? की शून्यातूनही काही शिकता येईल?.. नवीन नोकरीच्या ठिकाणी झालेल्या आगळ्यावेगळ्या मुलाखतीतनं त्याला एक नवा मंत्र शिकवला.

‘‘मी या नोकरीसाठी तुझं नाव निश्चित करतो आहे. पण त्याआधी तुला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचार.’’ त्या कंपनीचा मालक असणारा पस्तीशीतला तो तरुण अगदी मोकळेपणानं त्याला म्हणाला. त्या तरुणाचं हे बोलणं ऐकल्यावर त्याच्या मनात प्रश्नांची वावटळ उडाली. नोकरीसाठी निवड होणं हे त्याच्यासाठी अनपेक्षित होतं आणि त्यामुळेच त्याच्या मनात असंख्य प्रश्न पिंगा घालत होते.

जसं की गेल्या वर्षीचे दोन विषय राहिलेले असताना त्याची इंटरव्ह्य़ूसाठी निवड कशी झाली?, इंटरव्ह्य़ूमध्ये अभ्यासक्रमाशी निगडित जितके प्रश्न विचारले गेले, तितकेच प्रश्न आपल्या ट्रेकिंग आणि चित्रकला या छंदांबद्दलही का विचारले गेले?, ज्या कंपनीत फक्त आठ ते दहा लोक काम करतात, अशा कंपनीत नेमका कोणता विचार करून नोकरी स्वीकारावी?, अनेक छोटय़ा कंपन्या अचानक बंद पडण्याचे आणि वेळेवर पगार न देण्याचे अनुभव माहिती असल्यानं करिअरची सुरुवात अशा ठिकाणाहून करावी का?, चांगले गुण असणारे कु णीही इथे काम करण्यासाठी तयार होणार नाहीत, म्हणून आपली निवड केली जात असेल का?, पण इथे नकार दिला, तर एकूणच शैक्षणिक प्रगती पाहता आपल्याला बाहेर दुसरी नोकरी मिळण्याची शक्यता किती आहे?, अजून आपण काहीही सिद्ध केलेलं नसताना, नोकरी देत असलेल्या कंपनीची स्थिरता आणि पगारातलं सातत्य या मुद्दय़ांवर थेट प्रश्न विचारणं कितपत बरोबर आहे?  मनात येणाऱ्या अशा परस्परविरोधी प्रश्नांमुळे तो चक्रावून गेला. बोलायला नेमकी सुरुवात कुठून करावी?, कोणता प्रश्न पहिल्यांदा आणि कशा पद्धतीनं विचारावा?, हे त्याला समजेना. त्याची अवघडलेली स्थिती पाहून तो तरुणच पुन्हा म्हणाला, ‘‘अरे अगदी मोकळेपणानं विचार. मी तुझ्या वयाचा असताना माझ्या मनातही असंख्य प्रश्न असायचे. तेव्हा एकदा आपल्याला प्रश्न पडला की त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा. आपला प्रश्न चूक आहे की बरोबर, असा विचार करून त्रास करून घ्यायचा नाही. मनात जे काही आहे ते विचार.’’

त्यावर तो शांतपणे म्हणाला, ‘‘माझे मागच्या वर्षीचे दोन विषय राहिले आहेत. इतर विषयांतही काही चांगले गुण मिळालेले नाहीत. असं असतानाही माझी निवड आपण कोणत्या निकषांवर केलीत?’’ त्याचा प्रश्न ऐकून तो तरुण शांतपणे म्हणाला, ‘‘विषय सुटला की नाही, त्यात किती गुण मिळाले, हा माझ्या दृष्टीनं फारसा महत्त्वाचा मुद्दा नाही. तुला विषय किती नेमकेपणानं समजला, हे अतिशय महत्त्वाचं आहे. मुळात कोणत्याही विषयाचे सगळे बारकावे हे शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होऊ शकत नाहीत. अनेक गोष्टी तुम्ही काम करत असताना त्या अनुभवातून शिकत असता. मात्र तुमची तो अनुभव घेण्याची, त्यातून अपेक्षित परिणाम साध्य होईपर्यंत तावूनसुलाखून निघण्याची तयारी असावी लागते. मी विचारलेल्या प्रश्नांची चांगली उत्तरं तू दिलीस. पण तुझ्याशी तुझ्या ट्रेकिंगच्या आणि चित्रकलेच्या आवडीबद्दल गप्पा मारल्यावर तू उत्तम काम करशील हे मला प्रकर्षांनं जाणवलं.’’

‘‘म्हणजे?’’ तो गोंधळून म्हणाला. त्यावर तो तरुण हसून म्हणाला, ‘‘म्हणजे ट्रेकिंगला जाताना कुठे जायचं हे ठरवलं, तिथे पोहोचण्याचा एक नकाशा घेतला, चांगले बूट घातले, बरोबर भरपूर पाणी घेतलं, की मोहीम फत्ते होते का?’’

‘‘नाही.’’तो उत्तरला.

‘‘सगळी तयारी करून निघालं तरी त्या प्रवासात नेमकं काय होईल हे कु णीच आधी सांगू शकत नाही. काही वेळा हवामान अचानक बदलतं, त्यानं स्टॅमिनाची वाट लागते. काही वेळा नकाशा असूनही रस्ता चुकतो. काही वेळा आपल्याबरोबरच्या एखाद्या भिडूला ‘आयुष्यात कधी पाणीच मिळालं नाही’ इतकी तहान लागते आणि तो पहिल्या दोन तासांत पाणी संपवतो.

कु णीतरी टॉर्च आठवणीनं बरोबर घेतलेला असतो, पण त्यातल्या बॅटरीज तपासायच्या राहिलेल्या असतात, मग तो पाचव्या मिनिटाला बंद पडतो. अशा अनेक गोष्टी होत असतात. चार-पाच वेळा असं काहीतरी अनपेक्षित घडल्यामुळे आम्हाला अध्र्यात ट्रेक सोडून परत यावं लागलं होतं.’’ तो विचार करून म्हणाला.

‘‘मग या ट्रेकिंगपेक्षा चित्रकला चांगली. नाही का? म्हणजे आपल्याला हवे असलेले रंग आणि कॅनव्हास घेतला की चित्र तयार. हो ना?’’ तरुणानं पुढचा प्रश्न विचारला. त्यावर तो चटकन म्हणाला, ‘‘नाही. तिथे वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. आपल्या मनात जसं चित्र काढायचं त्याची एक प्रतिमा असते. ती प्रतिमा तशीच्या तशी कागदावर उमटणं हे सर्वात अवघड असतं. मग मनात असलेली रंगांची छटा प्रत्यक्षात बनवताना तुमचा कस लागतो. मी अनेक र्वष चित्र काढत असूनही खूप वेळा चित्र हवं तसं येत नाही. रंगछटा जशी हवी तशी जमतेच असं नाही.’’

त्यावर तरुण शांतपणे म्हणाला, ‘‘थोडक्यात तू पूर्ण तयारी करून ट्रेकिंगला गेलास काय, की घरात बसून चित्र काढलंस काय.. तुझ्या मनाप्रमाणे सगळं काही होईल याची शाश्वती नसते. पूर्ण तयारी करूनही गोळाबेरीज शून्य येऊ शकते. पण तसं असलं तरी आपण ट्रेकिंगला जाणं सोडत नाही, की चित्र काढणं थांबवत नाही. हो ना?’’

‘‘हो.. कारण गोळाबेरीज शून्य झाली तरी पुढची सुरुवातही शून्यापासूनच होते.’’ तो नकळतपणे म्हणाला.

त्याच्या बोलण्यातला धागा पकडत तरुण म्हणाला, ‘‘बरोबर. आपण जेव्हा एखाद्या प्रोजेक्टवर काम करतो, तेव्हाही असंच असतं. कितीही तयारी केली, गोष्टी कुठे चुकू शकतील याचे अंदाज बांधले, तरी सगळं काही आपल्याला हवं तसं होईल याची खात्री नसते. दरवेळी काहीतरी नवीन शिकायला मिळतं. शून्यापासून सुरुवात करण्याची तयारी ठेवावी लागते. ती तयारी असेल तर मग अशक्य गोष्टी शक्य होतात. फक्त प्रोजेक्टच्या बाबतीतच नाही, तर कंपनी चालवतानाही हेच सूत्र लागू पडतं.’’

तरुणाचं हे वाक्य ऐकल्यावर पुन्हा त्याच्या मनात कंपनी अचानक बंद होणं, पगार वेळेवर न मिळणं, याबद्दलचे प्रश्न यायला सुरुवात झाली. पण त्याबद्दल थेट कसं विचारावं, हे पुन्हा त्याला समजेना. पण तो तरुणच म्हणाला, ‘‘तुला जे काही विचारायचं आहे ते तू विचारच. पण अनायासे तू शून्यातून सुरुवात म्हणालास, म्हणून मी आणखी काही गोष्टी, ज्या मी तुला शेवटी सांगणार होतो त्या आताच सांगतो. गेल्या चार वर्षांपासून मी ही कंपनी चालवतो आहे. उत्साहानं व्यवसायात उडी घेऊन पुढे तो व्यवसाय बंद करण्याची वेळ येण्यापर्यंतच्या सगळ्या अवस्था पहिल्या दोन वर्षांतच मी अनुभवल्या. भरपूर चुका केल्या. पण मग त्या दुरुस्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला. आपण एखाद्या माणसाला आपल्या कंपनीत घेताना पूर्णपणे पारखून घेतो, तसंच येणारा माणूसही आपल्याला पारखून घेत असतो. आणि त्यानं तसं पारखलंच पाहिजे याची मला जाणीव आहे. तेव्हा मी तुला समोरून सांगतो आहे, की आपला हा इंटरव्ह्य़ू झाला, की तू कंपनीत काम करणाऱ्या लोकांबरोबर मोकळेपणानं बोल. ऑफिसमध्ये एक छोटी गच्ची आहे, तिथे कॉफी पीत छान गप्पा मार. काही प्रश्न मला विचारणं अवघड वाटत असेल किंवा मी सगळं चांगलंच सांगतोय असं वाटत असेल, जे अगदीच माझ्याकडून होऊ शकतं, तर त्याची खातरजमा कर आणि मग निर्णय घे.’’

‘‘पण सगळ्यांशी बोलल्यावरही मी इथं नोकरी करायची नाही असं ठरवलं तर?’’ तो थोडा चाचरत म्हणाला. त्यावर तरुण मंदपणे हसून म्हणाला, ‘‘शेवटी तो पूर्णपणे तुझा निर्णय असणार आहे. तुझे विषय राहिले असतानाही तुला इथे संधी मिळते आहे, तेव्हा ती तू घेतलीच पाहिजेस, असा कोणताही दबाव मी टाकणार नाही. इतर दुसऱ्या कंपनीत संधी मिळणार नाही, असंही म्हणणार नाही. कदाचित थोडा वेळ लागेल, पण संधी नक्की मिळेल, हे मी तुला समोरून सांगतो. फक्त मी एकच म्हणेन, की आपण कितीही ठरवलं तरी काही वेळा सुरुवात पुन्हा शून्यापासून करावी लागते आणि त्यात काहीही वाईट नसतं, हे जे तुला ट्रेकिंग आणि चित्रकलेमुळे जाणवलं आहे, ते कधीही विसरू नकोस. तसं बघितलं तर करिअर करताना सगळेच जण या शून्यापासून सुरुवात करतात आणि मग स्थिरतेच्या शोधात त्या शून्याला पुन्हा भेटायला घाबरायला लागतात, हे सर्वात मोठं अपयश असतं.’’

ते ऐकून तो म्हणाला, ‘‘अगदी खरं सांगू? माझ्या मनात खूप गोंधळ उडालेला आहे. नेमकं काय करावं?, काय निर्णय घ्यावा?, हे ठरवता येणं खरंच खूप कठीण आहे.’’ तेव्हा क्षणभर विचार करून त्याचा इंटरव्ह्य़ू घेणारा तो तरुण म्हणाला, ‘‘काय निर्णय घ्यावा हे फक्त तुझ्यासाठीच नाही, माझ्यासाठीही खूप कठीण होतं. निवड केलेली व्यक्ती ही खरोखर मनापासून, निष्ठेनं, दिलेलं काम पूर्ण करेल,

जिथे जिथे नवं काहीतरी शिकण्याची गरज

आहे, तिथे नवीन गोष्टी शिकेल, चूक झाली तर ती दडपण्यापेक्षा मोकळेपणानं मान्य करून स्वत:ची गुणवत्ता वाढवेल, कुठे काही

अडलं तर आपणहून विचारेल, ही मी फक्त अपेक्षा ठेवू शकतो. कोणत्याही परीक्षेचे मार्क, प्रमाणपत्र, इंटरव्ह्य़ू, या गोष्टींची हमी देऊ शकत नाहीत. तेव्हा समोरच्यावर विश्वास ठेवून त्याला बरोबर घेऊन सुरुवात करणं, इतकंच माझ्या हातात आहे. अर्थात माझा अंदाज चुकला, केलेली निवड फसली, तर पुन्हा नवीन व्यक्ती शोधताना शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. पण ते करण्याची मी तयारी केलेली आहे. तेव्हा तू ठरव.’’

त्यावर तो म्हणाला, ‘‘बरोबर आहे. सुरुवात करताना असो, की प्रयत्न फसल्यावर असो. शून्यसुद्धा आपलंच आहे, हे मान्य केलं की सगळं सोपं आहे. ठीक आहे. मी इथं काम करायला तयार आहे. बाकी काही नाही, तरी मिळणारा तो अनुभव माझ्यापासून कु णीही घेऊ शकणार नाही. हो ना?’’