|| रोहिणी हट्टंगडी

नाटक हे कलांचं मिश्रण आहे म्हणूनच ‘अमुक एक गोष्ट शिकू न काय फायदा होणार?,’ असा प्रश्न विद्यार्थ्यांनी कधी विचारू नये. कोणती गोष्ट कु ठे, कशी उपयोगी पडेल सांगता येत नाही. नाटकाचा अभ्यास करताना आम्ही जसं कर्नाटकची पारंपरिक ‘यक्षगान’ शैली शिकलो, तसंच इंग्लंडचे नेपथ्यकार कसं नेपथ्य करतात हेही शिकलो. ओडिसी नृत्याबरोबरच ‘कं टेम्पररी’ नृत्यही शिकलो. कलाकारांनी, विशेषत: दिग्दर्शकांनी आजूबाजूला काय चाललंय ते जाणून घ्यायलाच हवं. तुमच्या ‘सिस्टीम’च्या ‘मदरबोर्ड’मध्ये ते जाऊन बसलं की योग्य वेळी, योग्य ठिकाणी त्याचा उपयोग करता येतो. आजच्या (२७ मार्च) ‘जागतिक रंगभूमीदिनी’ इतकं  तर लक्षात ठेवायलाच हवं.  

‘रा.ना.वि.’मध्ये (राष्ट्रीय नाटय़ विद्यालय) खूप काही वेगवेगळं करायला, अनुभवायला मिळालं. पुराना किला, जपानी नाटक तर होतंच, पण आपल्याकडचा कर्नाटकचा ‘यक्षगान’ हा लोककला प्रकारही मला करायला मिळाला. आपल्याकडे लोककला प्रकारांची अक्षरश: रेलचेल आहे. प्रत्येक राज्याचा स्वत:चा असा एक मुख्य प्रकार आहेच आणि इतर जास्त प्रसिद्ध नसणाऱ्याही अनेक लोककला आहेत. जसा आपला ‘तमाशा’, गुजरातचा ‘भवाई’, कर्नाटकचा ‘यक्षगान’, ओडिशाचा ‘छाऊ’, उत्तर प्रदेशचा ‘नौटंकी’ वगैरे. ‘यक्षगान’ या प्रकारात आमचं नाटक बसवायला डॉ. शिवराम कारंथ आले होते.

यात मुख्यत्वे रामायण-महाभारतातले प्रसंग सादर केले जातात. आम्ही ‘भीष्मविजय’ हा प्रसंग सादर केला होता. अंबा, अंबिका, अंबालिका यांना भीष्म पंडू राजासाठी जिंकून घेऊन जात आहेत असं अंबाला कळतं आणि ती निषेध म्हणून अग्निकाष्ठ भक्षण करते, हा प्रसंग. मला अंबाची भूमिका करायला मिळाली. या प्रकारात नृत्य जास्त आणि संभाषण कमी असतं. रंगमंचाच्या मागे भागवत म्हणजे मुख्य गायक, त्यांच्याबरोबर एक तबला आणि एक हार्मोनिअम किंवा व्हायोलिन वाजवणारे बसतात. पारंपरिक कवनं, गीतं भागवत गातो आणि गोष्ट पुढे नेतो. नाटकातली पात्रं त्यावर नृत्य करतात आणि क्वचित संवाद बोलतात. एक-एक प्रसंग फुलवला जातो. ‘एका राजाला तीन राजकन्या होत्या’ एवढय़ा एका ओळीसाठी आम्ही बागेत फिरतोय, फुलं गोळा करतोय, एकमेकींच्या खोडय़ा काढतोय, हार ओवतोय असं नृत्यामधून ‘इम्प्रोवाईज’ करायचो. आमच्या प्रयोगात भीष्माच्या भूमिके त रतन थियम होता, तर किरात म्हणजे शिकारी, राज बब्बर होता.

नृत्यासाठी आम्हाला ताल शिकून घ्यावे लागले. सर्व अभिनेत्यांसाठी रोज पहिला तास त्याचाच असायचा. डॉ. कारंथ त्या वेळी ७२ वर्षांचे होते आणि आम्हा विशीतल्यांना लाजवेल अशी ऊर्जा त्यांच्यात होती. कर्नाटकहून त्यांनी भागवत आणि एका नर्तकाला बरोबर आणलं होतं, ते आम्हाला शिकवायचे. मला एक दिवस तालीम करताना डॉ. कारंथ म्हणाले, ‘‘तू मराठी आहेस ना? तुमचं नाटय़संगीत ‘यक्षगान’च्या काही पारंपरिक चालींवर बेतलं आहे.’’ आणि त्यांनी ‘यक्षगान’मधलं एक कानडी पद म्हटलं. ओळख म्हणाले. ते ‘नच सुंदरी करू कोपा’ होतं. अशी त्यांनी आणखीही एक-दोन गीतं सांगितली.

नाटकातल्या पुरुष पात्रांची रंगभूषा, वेशभूषा खूप ठसठशीत, कथकलीची आठवण करून देणारी. तरीही वेगळी. राजाच्या पात्रासाठी सोनेरी मुकुट. भरदार मिशा रंगवलेल्या. पण राम, कृष्ण अशा देवादिकांना मिशा नाहीत! दुय्यम पात्रांसाठी पिंपळपानाच्या आकाराचा मुकुट. तोही ‘रेडीमेड’ नाही. कपडय़ाच्या तयार केलेल्या रस्सीनं गुंडाळायचा आणि सजवायचा. एकेका मुकुटाचं वजन एक ते दोन किलो. वेशभूषाही खूप. चुडीदार, धोतर, अंगरखा, त्यावर दागिने- हलके लाकडी, त्याला काळे-तांबडे गोंडे लावलेले. स्त्रियांना  साधारण तसेच दागिने आणि केसांच्या अंबाडय़ावर छोटं पिंपळपानासारखं शिरोभूषण, पाचवारी साडय़ा. हे सगळं घेऊन नाचायचं. दमछाक व्हायची. वाटायचं, कसे हे पारंपरिक कलाकार रात्ररात्र नाचत असतील? आपल्याकडचे लोकप्रकार.. केवढं वैविध्य आहे त्यांत. अघळपघळ वाटलं तरी त्यात आपल्याला बांधून ठेवणारी काही तरी जादू आहे. स्कूलच्या शेजारीच असणाऱ्या कमानी थिएटरमध्ये संगीत नाटक अकादमीचे खूप कार्यक्रम व्हायचे. त्यात इतर अनेक लोककला प्रकार बघायला मिळाले. केवढी समृद्धी!

स्कूलमध्ये फक्त नाटकच नाही, तर त्याचे अनेक पैलू शिकायला मिळाले. एकदा अल्काझी सरांनी नेपथ्यासाठी इंग्लंडहून नेपथ्यकाराला बोलावलं होतं. ब्रायन कऱ्हा नाव त्यांचं. फ्रें च राज्यक्रांतीवरचं नाटक ‘दान्तो की मौत’ (Danton’s Death) आमचं स्कूलचं नाटक होतं. त्यासाठी भला मोठा एक मजली तुरुंगाचा सेट बनवला होता. ‘स्टेज क्राफ्ट’ विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती मोठीच संधी होती. त्यांना असिस्ट करायला मिळालं, शिकायला मिळालं. या नाटकात दुसरेही सेट्स होते. प्रवेशांप्रमाणे ते बदलले जात असत. त्यात शेवटच्या सीनमध्ये ‘गिलोटिन’ होतं. दान्तो आणि त्याच्या दोन साथीदारांना त्या सीनमध्ये गिलोटिननं शिरच्छेदाची शिक्षा होते, असं दाखवलं होतं. ते गिलोटिन जवळजवळ ‘लाइफ साइज’ होतं. त्याचं पातंसुद्धा धारदार नसलं तरी जड होतं. खाली मान ठेवण्यासाठी खाच वगैरे होती. परिणाम साधण्यासाठी शिक्षा झालेल्यानं तिथं मान  ठेवायची आणि तो माणूस प्रेक्षकांना दिसणार नाही अशा प्रकारे ‘क्राउड’मधले नट उभे राहायचे. मग शिक्षा झालेल्या पात्रानं बाजूला व्हायचं आणि पात्याचा दोर सोडला की पातं सरसरत खाली येऊन खाड्कन आवाज व्हायचा. ते खूप परिणामकारक असायचं. मग नाटकात ‘क्राउड’चा जल्लोष, मुंडकी असलेली टोपली नाचवत नाचवत त्यांनी ‘एक्झिट’ घ्यायची. गिलोटिनचं पातं पुसून, वर खेचून, रस्सी व्यवस्थित बांधून दोन जल्लाद निघून जायचे. स्टेजवर शांतता.. आणि मग माझी ‘एन्ट्री’ असे. मी त्या साथीदारांपैकी एकाच्या बायकोची भूमिका करत होते. तिच्या डोक्यावर या सगळ्याचा परिणाम झाल्यामुळे ती त्या तंद्रीतच असते. गिलोटिन एका चौथऱ्यावर होतं. ती त्याच्या पायऱ्या चढून, मान ठेवायला असणाऱ्या खाचेवर बसते, गिलोटिन हा जणू झोपाळा आहे अशी झुलत गाणं गाऊ लागते आणि हळूहळू अंधार होतो, नाटक संपतं. मग आम्ही पुढे येऊन ‘कर्टन कॉल’ घ्यायचो. या नाटकाच्या रंगीत तालमीत एक घटना घडली. दिवे विझवले गेले, मी ‘कर्टन कॉल’साठी अंधारातच गिलोटिनवरून उठून दोन पावलं पुढे आले आणि मागून ‘खर्र्र्र-धाड’ असा गिलोटिनचा मोठा आवाज आला. ‘लाइट्स-लाइट्स’ असा सरांचा आवाज आला. सगळे धावत आले. मनात आलं, जरा वेळ चुकली असती तर? ज्यानं ती दोरी बांधली होती त्यानं चार वेळा ‘सॉरी’ म्हटलं. मी म्हटलं, ‘‘छोड ना! होतं असं कधी कधी. सोडून दे.’’ पण त्याला चैन पडत नव्हती. त्यानं दुसऱ्या दिवशी मला लवकर थिएटरवर बोलावलं. मी गेले तर मला गिलोटिनजवळ उभं करून एक नारळ माझ्यावरून ओवाळून फोडला. नेमकं हे अल्काझी सरांनी पाहिलं. नमस्कारही न करून घेणारे आमचे सर! त्यांनी जवळ येऊन म्हटलं, ‘‘आपलं काम व्यवस्थित करा. म्हणजे हे असलं करण्याची वेळ येणार नाही! यानं काहीही होत नसतं.’’ ज्यानं त्यानं आपलं काम चोख बजावण्यावर त्यांचा नेहमी जोर असे.

नाटकाचा अभ्यास चालू होताच, पण त्याबरोबर इतरही खूप काही शिकायला मिळत होतं. दुसऱ्या वर्षांला असताना वार्षिक परीक्षेसाठी मला आणि  एका सिनिअर मुलीला शेजारी असलेल्या कथक केंद्रात शिकवणाऱ्या गुरू केलुचरण महापात्रा यांच्याकडे जाऊन ‘ओडिसी’ नृत्यातील ‘वसंतपल्लवी’ शिकून यायला सांगितलं. आमच्या नृत्याच्या शिक्षिका मोठय़ा सुट्टीवर असताना ‘कं टेम्पररी डान्स’साठी एक शिक्षिका बोलावली. भारतीय नृत्य आणि पाश्चात्त्य नृत्य, यातला फरक कळला. वसतिगृहापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या ‘मॅक्सम्युलर भवन’मध्ये आम्ही एक रुपयात दर्जेदार अशा इतर देशांतल्या फिल्म्स बघत होतो. संगीत नाटक अकादमीचे वेगवेगळे कार्यक्रम होतेच. ललित कला अकादमीची पेंटिंग, शिल्प प्रदर्शनं बघत होतो. काही ना काही चालू असायचं. कधी मोकळा वेळ मिळाला की वसतिगृहाच्या लॉनमध्ये गोलाकार बसून गाणी, गप्पा चालायच्या. कधी ‘कोरस’मध्ये, तर कधी एकेकटय़ानं म्हटलेली गाणी. सुहास जोशीचं ‘रावी के उस पार सजनवा’ आणि बी. जयश्रीचं ‘नंदनंदन दीठु पडया माई सावरो’ अजूनही आठवतात..

त्यातून आम्हाला एक अभ्यासक्रमात नसलेला प्रकल्प करायला सांगितला.  ‘Arts and crafts of Mohen -Jo- Daaro  and  Hadappa’  बाप रे! आता हे कसं करावं? मग निभा जोशी या आमच्या शिक्षिकेनं सांगितलं, की तिथल्या उत्खननात ज्या काही वस्तू मिळाल्या, त्यावरून तेव्हाच्या संस्कृतीचा अंदाज बांधायचा. म्हणजे एक छोटं बैलगाडीसारखं खेळणं तिथे सापडलं आहे, त्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? बैलगाडी आहे म्हणजे व्यापार असणार आणि तो खुष्कीचा मार्ग असू शकतो. गाडी आहे म्हणजे लाकूडकाम, सुतारकाम नक्की असणार. चाकं आहेत आणि जे मातीच्या भांडय़ांचे, रांजणांचे तुकडे सापडले त्या अर्थी कुं भाराचं चाकपण माहीत असणार. जे टवका उडालेलं चौकोनी नाणं मिळालं, त्यावर जी चौरंगांवर बसलेली, मुकुट घातलेली, ध्यानस्थ बसलेली आकृती दिसते, त्यावरून आपण अनुमान लावू शकतो की ती उच्च पदावरील किंवा देवासमान व्यक्ती असू शके ल. पर्यायानं भक्ती, श्रद्धा आलीच! लोकांच्या मनाचा कल, त्यांची संस्कृती याचा अंदाज बांधू शकतो आपण. वेरूळ, अजिंठा यांचा अभ्यास के ल्यावर तीही संस्कृती कळते.

तर सांगायचा मुद्दा असा, की हे सर्व आम्हाला अभिनयात काय कामाचं?, असं म्हटलं असतं तर आम्ही मूर्ख ठरलो असतो. या सगळ्या अभ्यासानं तुमचं मन, विचार, दृष्टिकोन खुलत जातो. एका वेगळ्या पद्धतीनं तुम्ही विचार करायला लागता. इट ओपन्स अप युअर

फॅ कल्टीज्! म्हणून मला नेहमी असं वाटतं, की आपण कोणत्याही वयात काहीही शिकलेलं कधी वाया जात नाही. तुमच्या ‘सिस्टीम’च्या ‘मदरबोर्ड’मध्ये ते जाऊन बसलं की तुम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी त्याचा उपयोग करता. माझं विद्यार्थ्यांना हेच सांगणं असतं की तुम्हाला जे करायला सांगितलं आहे ते करून मोकळे व्हा. का करायचं, याचा काय उपयोग आम्हाला, असा विचार केलात तर मागे पडाल. बुद्धीलासुद्धा ‘ट्रेनिंग’ जरुरीचं असतं.

कोणताही कलाकार घडतो तो या सर्व गोष्टींमुळे. त्यातून नाटक हे अनेक कलांचं मिश्रण आहे. नाटकासाठी इतरही अनेक सामाजिक, राजकीय, भौगोलिक, ऐतिहासिक, सर्वच गोष्टींचं भान असणं आवश्यक असतं. दिग्दर्शकांना जरा जास्तच! अल्काझी सरांनी हेच शिकवण्याचा प्रयत्न केला. संस्था काय किंवा गुरू काय, आपल्या शिष्यांना सारखंच देत असतात. तुम्ही काय घेता ते महत्त्वाचं. म्हणूनच ‘हेच शिकवलं का तुला?’ असं विचारण्यापेक्षा ‘हे शिकलास का?’ असं विचारत जाऊ. हो ना? कबूल? असो.

हे लिहिता लिहिता लक्षात आलं, हा लेख

२७ मार्चला तुम्हाला वाचायला मिळणार आहे. हा ‘जागतिक रंगभूमी दिन’ आहे. या कलेचं महत्त्व, कलाकारांचं योगदान लोकांना कळावं, यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. १९६२ पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली. दरवर्षी वेगवेगळ्या रंगकर्मीतर्फे एक संदेश दिला जातो. २००२ मध्ये गिरीश कर्नाड यांना तो मान मिळाला होता. या वर्षी हेलन मिरेन या ब्रिटिश अभिनेत्रीला तो मान दिला गेला आहे. माझं भाग्यच आहे की आज मला या विषयावर वाचकांशी संपर्क साधता आला.

 तुम्हा सर्वानाही जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

hattangadyrohini@gmail.com