विवाहानंतर माझ्या गाण्याला एक नवा आयाम मिळाला. संगीताकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी  मिळाली. डॉ. सुब्रमण्यम स्वत: एक उत्कृष्ट व्हायोलिनवादक आहेतच, पण त्यांची संगीताची जाण प्रगल्भ आहे. संगीताच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने ते जगभर फिरत. त्यांच्या कार्यक्रमात मीही त्यांना साथ देऊ  लागले. माझ्या गाण्यात खूप वैविध्य आले, नवे नवे सांगीतिक प्रयोग मी केले. हा सांगीतिक अनुभव खूप समृद्ध करणारा होता.. आमच्यात ‘प्यार चुपके से’ झाले, पण विवाहानंतर आमचे नाते प्रगल्भ होत गेले. सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती सांगताहेत आपले पती सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्याबरोबरच्या १५ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
आम्ही पहिल्यांदा भेटलो १९९९ मध्ये, ‘हे राम’ या चित्रपटाच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने! खरे तर आम्ही दोघे एकमेकांना माहीत होतो, म्हणजे मी एक गायिका आहे आणि ते एक व्हायोलिनवादक आहेत एवढी माहिती होती, पण प्रत्यक्ष आमचा कधी संबंध आला नव्हता. कमल हासन यांच्या ‘हे राम’ चित्रपटाचा प्रोजेक्ट ते करणार होते आणि त्यातील एका गाण्यासाठी त्यांनी माझी निवड केली होती. त्यामुळे त्यांच्याशी ओळख झाली. गंमत म्हणजे नंतर काही कारणाने तो प्रोजेक्ट झाला नाही, पण त्यानिमित्ताने आमची ओळख झाली. नंतर काही संगीताच्या कार्यक्रमांत आम्ही भेटलो, बोललो, मैत्री झाली, प्रेम वाढले. त्या वेळी आमची दोघांची अवस्था माझ्याच एका गाण्याप्रमाणे ‘प्यार हुआ चुपके से, ये क्या हुआ चुपके से..’ अशी झाली होती आणि मग ते फार काळ चुपके से न राहता आमचा विवाह झालाही.
डॉ. एल. सुब्रमण्यम हे सुमारे २० वर्षे अमेरिकेत राहत होते. १९९६ मध्ये त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले. त्यांना तीन  लहान मुले होती. पत्नीच्या निधनानंतर ते मुलांना घेऊन भारतात आले नि बंगळुरूमध्ये स्थायिक झाले. हे खूप विद्वान, अतिशय शांत स्वभावाचे. तसे गंभीर व्यक्तिमत्त्व असणारे, त्यामुळे एखाद्या स्त्रीशी मैत्री-प्रेम या गोष्टी जरा लांबच होत्या. आमची दोघांची ओळख झाली, परिचय वाढला. मी त्यांच्या घरी बंगळुरूलाही जाऊन आले. त्यांच्या मुलांना भेटले. मुलेही स्वभावाने खूप गुणी होती, पण त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक दु:खाची छाया होती. कधीही भेटले तरीही ते किंवा त्यांची मुले उत्साहात नसायची. सतत एक उदासी जाणवायची. मी त्यांना बऱ्याचदा भेटायचे, गप्पा मारायचे, पण हाच अनुभव यायचा. मग माझ्या मनात विचार डोकावू लागला. माझी जागा, इथे या घरात आहे, मुलांची आई म्हणून आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांची पत्नी म्हणून. त्यांनाही माझ्याबद्दल तसेच वाटत असावे, पण ते कधी बोलले नाहीत. एकमेकांबद्दल प्रेम, ओढ दोघांनाही वाटत होती, पण ते पुढाकार घेत नव्हते आणि आपल्या संस्कृतीत मुलीने प्रपोज करण्याची पद्धत नाही, त्यामुळे मी कसे विचारणार? इथेही माझ्याच एका गाण्याप्रमाणे आमचे, ‘हम दिल दे चुके सनम, तेरे हो गये हम, तेरी कसम’ अशी अवस्था झाली होती. ही अवस्था फार काळ राहू नये असे बहुधा त्यांनाच वाटत असल्याने त्यांनीच विचारले आणि मी लगेच ‘हो’ म्हणून टाकले. ११ नोव्हेंबर १९९९ रोजी आम्ही विवाहबद्ध झालो. खरे तर माझ्या लग्नाला तसा उशीरच झाला होता, कारण आधी लग्न न करण्याचा माझा विचार होता, त्यामुळे लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या घरचे लोक टेन्शनमध्येच होते. त्यांना माझी काळजी वाटायची, विशेषत: माझी आई आणि मावशी यांना. त्या खूप काळजीत होत्या, कारण नवे घर, नवे शहर, नवी माणसे, विशेषत: मुले, ती माझ्याशी कसे वागतील, मुले मला स्वीकारतील की नाही, असे एक ना अनेक प्रश्न त्या दोघींना पडले होते. मी दिल्लीत राहत होते आणि वयाच्या १४व्या वर्षी मी मुंबईला मावशीकडे आले. मला पाश्र्वगायिका बनवण्याची तिचीच खूप इच्छा होती. म्हणूनच माझ्या डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्याशी विवाह करण्याच्या निर्णयामुळे तिला थोडा धक्का बसला, पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते आणि तिचाही माझ्यावर विश्वास होता.
विवाहानंतर मी बंगळुरूला शिफ्ट झाले. खरे तर मुंबईत माझे करिअर सुरू झाले होते आणि विवाहाच्या वेळी मी बऱ्यापैकी प्रसिद्ध होते, माझे करिअर टॉपला होते. मला त्या वेळी ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला होता. मला पहिल्यांदा ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’ या चित्रपटासाठी १९९५ मध्ये फिल्म फेअर अ‍ॅवॉर्ड मिळालं. ते गाणे होते ‘प्यार हुआ चुपके से, ये क्या हुआ चुपके से.’ त्यानंतर सलग तीन वर्षे मला सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे मुंबई सोडणे म्हणजे करिअर सोडण्यासारखेच होते, पण तसे काही झाले नाही. काही न काही रेकॉर्डिग आणि संगीताच्या कार्यक्रमासाठी मी आठवडय़ातून दोन-तीन दिवस मुंबईतच असते. त्यामुळे तसे मी हे शहर ‘मिस’ करत नाही. विवाहानंतर ‘देवदास’ चित्रपटातल्या ‘डोला रे डोला’ या गाण्यासाठी मला ‘फिल्म फेअर’ पुरस्कार मिळाला, पण डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर मी चित्रपट संगीतातील गाण्याच्या निवडीबाबत चोखंदळ झाले. भरपूर गाणी गाण्यापेक्षा चांगली, दर्जेदार गाणी गाण्याकडे माझा कल राहिला. त्यांच्याशी विवाहानंतर माझ्या गाण्याला एक नवा आयाम मिळाला. संगीताकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मला मिळाली. हे स्वत: एक उत्कृष्ट व्हायोलिनवादक आहेतच, पण त्यांची संगीताची जाण प्रगल्भ आहे. सतत संगीताच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने जगभर फिरत असल्यामुळे, देशोदेशीचे संगीत कानावर पडत असल्यामुळे त्यांनी ‘फ्यूजन म्युझिक’ची संकल्पना वाढवली. त्यांच्या कार्यक्रमात मीही त्यांना साथ      देऊ  लागले. त्यामुळे माझीही संगीताकडे बघण्याची दृष्टी बदलली. माझी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर आधारित असलेली गाणी आणि त्यांचे फ्यूजन, व्हायोलिनवादन यामुळे आमचा कार्यक्रम खूप रंगू लागला, त्यांच्याच प्रोत्साहनामुळे मी आधी कधीही गायले नाही अशी गाणी गाऊ  लागले. संगीतात नवे नवे प्रयोग करू लागले.
विवाहानंतर माझे क्षितिजच बदलले. माझ्या गाण्यात खूप वैविध्य आले, नवे नवे सांगीतिक प्रयोग मी केले. यांच्याबरोबर जगभर प्रवास केला. हा सांगीतिक अनुभव खूप समृद्ध करणारा होता. आमचा स्वत:चा बँड आहे. की बोर्ड, गिटार, इलेक्ट्रिक बास, ड्रम्स आणि भारतीय तालवाद्ये आणि सगळे वादक असा लवाजमा घेऊन आम्ही फिरत असतो. लंडनचा रॉयल अल्बर्ट हॉल, वॉशिंग्टन केनेडी सेंटर असे अनेक विख्यात ठिकाणी कार्यक्रम केले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि आंतरराष्ट्रीय संगीताचा सुरेख मिलाफ या कार्यक्रमात ऐकायला मिळतो.
‘वॉर्नर ब्रदर्स’ यांनी प्रदर्शित केलेल्या ‘ग्लोबल फ्यूजन अल्बम’मध्ये मी एकमेव भारतीय सोलो गायिका आहे. मी बीजिंग सिम्फनी, फेअर फेक्स, बीबीसी रेडिओ, ऑर्केस्ट्रा  सिम्फनी, अशा अनेक बँडसोबतही गाते.
हिंदी बॉलीवूड गाण्याबरोबरच मी इंडिपॉप गाणी, उडत्या चालीची हिंदी गाणीही गाऊ  लागले. देशात, परदेशात आम्ही खूप दौरे करतो आणि परदेशी नागरिकही या फ्यूजन संगीताचा आस्वाद खूप आनंदाने घेतात. गंमत म्हणजे आमची मुलेही या कार्यक्रमात कधी कधी सहभागी होतात. मोठा मुलगा नारायण डॉक्टर झाला आहे. मुलगी बिंदू गीतकार आहे आणि ती गातेही छान आणि धाकटा अम्बी तर व्हायोलिन खूप छान वाजवतो. अर्थात त्याच्या वडिलांकडूनच तो शिकला आहे आणि आता तो त्यांच्याबरोबर व्हायोलिनवादनाची जुगलबंदीही करतो.
तिन्ही मुलांची माझ्याशी जवळीक आहे, नात्यापेक्षा मैत्री जास्त आहे. त्यांनी कधीही माझी त्यांच्या आईशी तुलना केली नाही. मी बंगळुरूला घरात असले आणि मला वेळ असला तर मी त्यांच्यासाठी आवडीचे पदार्थही करते. खरे तर मी माहेरची तमिळ अय्यंगार ब्राह्मण, पण मी माझ्या मावशीकडे जास्त राहिल्याने आणि माझी मावशी बंगाली असल्याने मला मांसाहारी जेवणाची, जास्त म्हणजे मासे खाण्याची सवय होती, पण यांच्याकडे सगळे शाकाहारी. खरे तर ही मुले अमेरिकेत होती, पण भारतात आल्यावर मात्र सगळे शाकाहारी बनले, पण आम्ही कधी बाहेर गेलो जेवायला तर मला सांगतात की, ‘तू नॉनव्हेज खा.’ पण आता मलाच फारसे आवडत नाही.
मी उशिरा लग्न केले, पण मला अगदी योग्य जोडीदार मिळाला. यांचा स्वभाव खूप शांत. कधी चिडणार नाहीत की आरडाओरडा नाही, कसलीही सक्ती नाही, त्यामुळे आमची भांडणे, वाद असे फारसे होत नाही. खरे तर माझा स्वभाव चिडका आहे. मला लगेच राग येतो; पण यांना चिडलेले आम्ही कधीही पाहिले नाही. आमच्यातला वादाचा विषय म्हणजे कधी यांना विमानाने जायचे असले तर घरून आरामात निघतात. विमानाच्या वेळेच्या एक तास आधी तरी एअरपोर्टला पोहोचणे आवश्यक असते, पण यांना घाई कसली ती नसतेच. मी आणि तिन्ही मुले यांच्या पाठी लागतो, पण नाही. ते त्यांच्या ठरलेल्या वेळीच बाहेर पडतात आणि विमानतळावर सगळ्यांना माहीत असते आज डॉ. एल. सुब्रमण्यम विमानाने जाणार आहेत, त्यांचा बोर्डिग पास वगैरे काढून ठेवला जातो.
पण सुरांच्या बाबतीत मात्र ते कडक शिस्तीचे आहेत. आमच्या रेकॉर्डिगच्या वेळी माझा सूर जरा कमी-जास्त झाला की त्यांचा चेहरा बदलतो. त्यांच्या अपेक्षित पिचला गाणे कधी कधी खूप कठीण जाते, पण ते मला म्हणतात, ‘खराब गा रही हो, लेकीन बोलने की जरुरत नही. तुम तो समझ रही हो न की तुम खराब गा रही हो.’ आमच्या संगीताच्या जाहीर कार्यक्रमातही असे कधी झाले की त्यांची नजरच सारे बोलून जाते. ते मला नेहमी सांगतात, ‘स्टेजवर आल्यावर कधी प्रेक्षकांकडे बघू नकोस. उलट डोळे मिटून घे आणि सूर आळव. पहिला सूर पक्का लागला की पुढची गाणी चांगली होतील.’ अशा कार्यक्रमात, मी प्रामुख्याने भजने किंवा बिगरफिल्मी गाणी गाते, पण ते मला आवर्जून सांगतात की, ‘हम दिल दे चुके सनम’मधले ‘निम्बोडा निम्बोडा’ हे गाणे गा. त्यांच्या मते हे गाणे खूप कठीण आहे. श्वासाची दमछाक करणारे आहे, पण मी ते चांगले गाते असे त्यांना वाटते. त्यांच्यासाठी व्हायोलिनचे सूर झटक्यात वर आणि झटक्यात खाली करणे सोपे आहे, पण त्याबरोबरीने मला स्वर वर-खाली करणे खूप कठीण जाते, पण त्यांचा नेहमी मला सकारात्मक पाठिंबा असतो. त्यांचा स्वभावच मुळात शांत, समजूतदार असल्याने दोघांमधले इगो वगैरे तर अगदी लांबची गोष्ट झाली.
आदी शंकराचार्याच्या रचनांना सुब्रमण्यम यांनी संगीत दिले आहे आणि मी गायले आहे. आम्हा दोघांचा ‘आदी गणेश’ हा अल्बमही आम्ही काढला आहे. आमच्या फ्यूजन संगीताच्या कार्यक्रमात व्हायोलिनबरोबरच, पियानो, कर्नाटकी शास्त्रीय संगीत आणि माझी बॉलीवूडची गाणी असा कार्यक्रम असतो, तर यांच्या ‘ग्लोबल फ्यूजन’ या कार्यक्रमात पाश्चिमात्य संगीत सोडून इतर देशांच्या म्हणजेच, आफ्रिकी, जपानी, चिनी, किंवा नॉर्वेच्या संगीताचा समावेश असतो. पुढच्या काळात मला बिगर फिल्मी गीतांचा एक अल्बम काढायचा आहे. त्याशिवाय गीत गोविंद, गझला, भजन असे वेगवेगळे अल्बम काढायचे आहेत. काही आध्यात्मिक अल्बमचीही योजना आहे.
आज मागे वळून बघताना स्वत:ला मी भाग्यवान समजते. संगीताची आराधना तर माझी चालूच आहे. मी चांगली पाश्र्वगायिकाही बनले. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, राहुल देव बर्मन, ए. आर. रहमान, जतीन ललित, रवींद्र जैन यांसारख्या ज्येष्ठ संगीतकारांबरोबर काम केले, इतकेच नाही तर मन्ना डे, हेमंतकुमार, मुकेश, लतादीदी यांसारख्या ज्येष्ठ गायकांबरोबर गाण्याची संधी मिळाली. मला खूप पुरस्कार मिळाले, पद्मश्रीही मिळाली. डॉ. एल. सुब्रमण्यमसारखा विद्वान आणि समंजस जोडीदार मिळाला, तीन छान मुले मिळाली. माणसाला एका आयुष्यात आणखी काय हवे असते?
खरे तर मी खूप महत्त्वाकांक्षी नाही. आज मी समाधानी आहे. कुटुंब मला महत्त्वाचे आहे. सिनेसंगीत गायचे नाही असे नाही, पण चांगली दर्जेदार गाणी गायची आहेत. आता इंडस्ट्रीही खूप बदलली आहे. स्पर्धा खूप आहे आणि मला या रॅटरेसमध्ये पडायचे नाही, त्यामुळेच आज जी मी आहे, आमचे जसे सहजीवन सुरू आहे, त्यात मी आनंदी आहे, खूश आहे..  
शब्दांकन- वैजयंती कुलकर्णी-आपटे
vaiju3@yahoo.com

bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!