26 February 2021

News Flash

आक्रोश ते आर्टकिल १५

‘समझमे नही आता ऐसी कौनसी वजह है के तुम लोग गुंगे बने हो? डर रहे हो किसीसे?’

|| नीरजा

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी आलेल्या ‘आक्रोश’  या चित्रपटापासून आजच्या ‘आर्टकिल १५’ पर्यंतच्या अनेक चित्रपटांनी, सर्जनशील लेखक, दिग्दर्शकांनी जातीय विषमतेच्या आजाराचं समूळ उच्चाटन व्हावं म्हणून प्रयत्न केले. हे बघताना अस्वस्थ करत असलं तरी चित्रपटगृहांतून बाहेर पडून आपल्या जगात शिरल्यावर लोक का विसरतात हे सारंच? का जगायला लागतात पुन्हा एकदा मनात खोलवर रुतलेली श्रेष्ठत्वाची किंवा कनिष्ठत्वाची भावना घेऊन? की ‘कभी हम हरिजन होते है, कभी बहुजन, मगर केवल जन नहीं होते.’ हे चित्रपटातलं  वाक्य कायम वास्तव बनून राहणार आहे.

‘समझमे नही आता ऐसी कौनसी वजह है के तुम लोग गुंगे बने हो? डर रहे हो किसीसे?’ पत्नीच्या खुनाचा आरोप असलेल्या पण स्वत:ला वाचवण्यासाठी संपूर्ण चित्रपटात एकही शब्द तोंडातून न काढणाऱ्या आदिवासी लहान्या आणि त्याच्या बापाला विचारलेले भास्कर कुलकर्णी या वकिलाचे हे प्रश्न १९८० मध्ये आलेल्या गोविंद निहलानी यांनी दिग्दíशत केलेल्या ‘आक्रोश’ या चित्रपटातले आहेत.

असेच काहीसे प्रश्न या आधी आणि नंतर येऊन गेलेल्या काही चित्रपटांत अनेकदा विचारले गेले होते आणि आहेत. अगदी सात-आठ वर्षांपूर्वी आलेल्या याच नावाच्या म्हणजे प्रियदर्शन यांनी दिग्दíशत केलेल्या ‘आक्रोश’ नावाच्याच चित्रपटातही ‘गांववाले बात करने से इतना डरते क्यू है?’ असा प्रश्न सीबीआय अधिकारी सिद्धांत चतुर्वेदी त्याच्याच सोबत काम करणाऱ्या आणि दलित असलेल्या मेजर प्रतापकुमार याला विचारतो. आज पुन्हा हाच प्रश्न मनात घेऊन इन्स्पेक्टर अयान रंजन ‘आर्टकिल १५’ या चित्रपटातून आपल्यासमोर आला आहे. प्रश्न विचारणारे वकील किंवा अधिकारी उच्चवर्णीय आहेत आणि त्यांच्यासमोर प्रश्न बनून उभे राहिलेले लोक आहेत शूद्रादी शूद्र.

केवळ चित्रपटांत नाही तर गेली अनेक र्वष अशा प्रश्नांची उत्तर शोधण्याचा आणि लोकांना सजग करण्याचा प्रयत्न प्रत्यक्षात काम करणारे अनेक कार्यकत्रे करत आहेत. अनेक कवी आणि लेखक या प्रश्नांविषयी लिहीत आहेत आणि संवेदनशील नाटककार आणि दिग्दर्शक हे प्रश्न नाटक किंवा चित्रपटांतून मांडत आहेत. साहित्य आणि चित्रपट खरं तर समाजाचाच आरसा असतात. जे-जे समाजात घडत असतं ते ते साहित्य आणि विविध कलांतून प्रतिबिंबित होत असतं. समाजातील वास्तव चित्रित करणाऱ्या या सर्जनशील लोकांना अनेकदा वाटत असतं की आपण जे मांडू पाहतो आहोत, आपण जे प्रश्न उपस्थित करू पाहतो आहोत ते प्रश्न कविता, कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट या माध्यमांतून लोकांपर्यंत पोचतील. त्यांच्या वाचनात येतील, कमीतकमी डोळ्यांखालून जातील, त्यांच्या कानावर पडतील आणि त्यांच्या मेंदूपर्यंत पोचून मेंदूला झिणझिण्या आणतील. या एका आशेवर लेखक, कवी, नाटककार, पटकथालेखक लिहीत असतात आणि दिग्दर्शक त्यांच्या पद्धतीनं ते आपल्यापर्यंत पोचवतात.

भारतीय साहित्यात तर रवींद्रनाथ टागोर, प्रेमचंदांपासून अनेक साहित्यकारांनी शूद्रादीशूद्रांचं जगणं आपल्यापर्यंत आणलं. सत्यजित रे यांच्या चित्रपटांतून ते आपल्यापर्यंत पोहोचलं. मराठी साहित्यात संतपरंपरेपासून ते आजपर्यंत अशा अनेक चळवळी झाल्या. नामा शिंपी, चोखा महार, दासी जनी, तुकाराम वाणी अशा कनिष्ठ जातीतल्या लोकांनी समाजाला धर्मजातींपलीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आधुनिक काळात केशवसुतांपासून नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, अरुण काळे अशा अनेक कवींनी तसेच अण्णा भाऊ साठे, बाबूराव बागुल यांच्यासारख्या लेखकांनी शोषितांचे आक्रोश आपल्यापर्यंत पोहोचवलेत. दया पवारांच्या ‘बलुतं’ आणि त्यामागोमाग आलेल्या वेगवेगळ्या शोषित समाजांतील प्रतिनिधींच्या आत्मचरित्रांनी उच्चभ्रू समाजात एकच खळबळ उडवून दिली होती. नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार यांच्यासारख्या अनेकांनी एकत्र येऊन ‘दलित पँथर’ची स्थापना केली होती.

जे साहित्यात झालं तेच चित्रपटात झालं. सत्तर-ऐंशीच्या दशकात श्याम बेनेगल आणि गोिवद निहलानी यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी ‘अंकुर’, ‘आक्रोश’, ‘निशांत’ यांसारख्या चित्रपटांतून लोकांना अस्वस्थ केलं, विचार करायला भाग पाडलं. ‘सामना’, ‘शापित’ पासून सुरू झालेल्या मराठी चित्रपटांच्या यादीत पुढे ‘फँड्री’, ‘सराट’सारखे चित्रपट जोडले गेले. पण आजही या साहित्याचा किंवा चित्रपटांचा परिणाम म्हणावा तसा समाजावर झाला नाही. कथा, कादंबऱ्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतातच असं नाही. आज पुस्तक विकत घेऊन वाचणारे कमी असले तरी आपल्या देशात चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. तरीही या अशा चित्रपटांचा परिणाम समाजमनावर झाला आहे असं जाणवत नाही. असे चित्रपट निर्माण करण्याचा हेतू समाजात बदल घडवून आणणे हा असला तरी काही अपवाद वगळता ना उच्चवर्णीय समाज बदलला ना खूप खोलवर रुतलेल्या भयाला आयुष्याचा भाग करून जगणाऱ्यांची परिस्थिती.

आपल्या देशात वर्णव्यवस्थेचं समर्थन करताना सारे अधिकार स्वत:कडे ठेवून शूद्रांना पशूप्रमाणे वागवण्याचे नियम सांगणारी ‘मनुस्मृती’ जन्माला आली आणि हळूहळू वर्णव्यवस्थेचं रूपांतर जातिव्यवस्थेत होत गेलं. ‘मनुस्मृती’च्या पहिल्या अध्यायातच ब्राह्मण हा बुद्धीचा उपयोग करणारा मानव म्हणून सर्वश्रेष्ठ ठरवला गेला (अध्याय १-९६) तर याच अध्यायात निर्दोष दृष्टीने तीनही वर्णाचे सेवाकर्म करणे हे एकच काम शूद्र जातीस ब्रह्मदेवाने लावून दिल्याचे (श्लोक-९१) सांगून एका विशिष्ट समाजाला उच्चवर्णीयांनी अस्पृश्य म्हणून घोषित केलं. गेली अनेक शतकं आपली सावलीही उच्चवर्णीयांवर पडू नये म्हणून प्रयत्नशील असलेले दलित स्वातंत्र्यानंतरच नाही तर आजही गावखेडय़ात उच्चवर्णीयांनी मेहरबानी करून त्यांच्या हाताच्या ओंजळीत पाणी टाकलं तर पिताहेत, सवर्णाच्या मुलीशी बोललं तर झाडावर लटकवले जाताहेत, तिच्यावर प्रेम केलं तर मारले जाताहेत, नाहीसे केले जाताहेत. एवढंच नाही तर तीन रुपये पगार वाढवून मागितला म्हणून त्यांच्या मुलींवर सामूहिक बलात्कार करून त्यांचा आवाज कायमचा बंद केला जातो आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात दलितांना गळ्यात मडकं अडकवून फिरावं लागत होतं, आपला स्पर्शच काय पण आपली सावलीही पडू नये याची काळजी घ्यावी लागत होती. पण ब्रिटिशांनी सर्व जातींसाठी खुल्या केलेल्या शिक्षणामुळे आणि महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अनेकांनी दलितांच्या केलेल्या बौद्धिक मशागतीमुळे ही परिस्थिती बदलत गेली. अस्पृश्यांना या अन्यायाची जाणीव व्हायला लागली. आणि पुढे उच्चवर्णीय आणि दलितांत फरक करणारी आणि एका मनुष्य समूहावर वर्षांनुर्वष अन्याय करणारी ही ‘मनुस्मृती’ बाबासाहेबांनी जाळली. एवढंच नाही तर स्वातंत्र्यानंतर माणसाला माणसासारखं आणि सन्मानानं जगता यावं म्हणून एक परिपूर्ण संविधान आपल्याला दिलं.

अक्षरांचा प्रकाश नाकारला गेलेल्या या लोकांना ब्रिटिश साम्राज्यात शिक्षणाची दारं खुली झाली होती. ती सताड उघडली गेली ‘आर्टकिल १५’ अर्थात भारतीय राज्य घटनेतील कलम १५ मुळे. सामाजिक न्यायाच्या भावनेतून दिलेल्या आरक्षणामुळे. पण शिकूनही या समाजातील लोकांना इतरांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा, एका पंक्तीत जेवण्याचा किंवा अगदी बौद्धिकदृष्टय़ा बरोबरी करण्याचा मान काही मिळाला नाही. उलट, ‘या लोकांनी आम्हा बुद्धिजीवी लोकांचे हक्क हिरावून घेतले,’ असा काहीसा अपप्रचार केला गेला आणि आजची तरूण पिढी या गरसमजावरच पोसली गेली. आज मुंबई-पुण्यासारख्या महाविद्यालयातील मुलांना वर्गात जातव्यवस्थेवर बोलायला सांगितलं की ते, ‘जातव्यवस्था ही स्वातंत्र्यानंतर सुरू झाली,’ अशीच सुरुवात करतात. ‘आरक्षण म्हणजेच जातव्यवस्था,’ असा काहीसा भ्रम बाळगून या पिढीतली अनेक मुलं मोठी होताहेत. त्याचं कारण त्यांच्या पालकांनी ‘आरक्षण स्वातंत्र्यानंतर सुरू झालं आणि त्यानंतरच तुमच्यावर अन्याय सुरू झाला आहे,’ असं त्यांना सांगितलेलं आहे. आज अनेक मुलांना हे माहीत नसतं की, या देशाच्या नसानसांत रक्तासारखी जी वाहते आहे ती जातव्यवस्था शतकानुशतकांची देणगी आहे आणि आज ती आपल्याच घरात एखाद्या असाध्य आजारासारखी पसरलेली आहे.

या आजाराचं समूळ उच्चाटन व्हावं म्हणून प्रयत्नशील असलेले काही संवेदनशील आणि सर्जनशील लोक गेली सत्तर र्वष तोच प्रश्न घेऊन लोकांसमोर येताहेत. उच्चवर्णीयांतलाच एखादा भास्कर कुलकर्णी, एखादा सिद्धांत चतुर्वेदी, एखादा अयान रंजन अशा अन्याय्य व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्यांना धमकावलं जात आहे. हे केवळ चित्रपटात घडतं आहे असं नाही तर हे वास्तवातही घडतं आहे. अनेक कार्यकत्रे या व्यवस्थेतून दलितांना बाहेर काढण्याचं, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याचं बळ देताहेत. ‘तुम्हाला यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला बोलायला हवं, या व्यवस्थेविरोधात ठामपणे उभं राहायला हवं,’ असं सांगताहेत. आणि अनेक आंबेडकरवादी तसे उभेही राहताहेत. पण तरीही हवा तसा बदल घडताना दिसत नाही. वर्तमानपत्रात रोज ‘ऑनर किलिंग’च्या बातम्या येताहेत. ‘खालच्या’ जातीच्या मुलाशी लग्न केलं म्हणून दोघांनाही मारलं जातं आहे. मारण्याची सुपारी उच्चवर्णीय मुलीचे बाप किंवा भाऊ देताहेत. दलित, अदिवासी स्त्रिया तर उपभोग्य वस्तूच असतात अनेक उच्चवर्णीयांसाठी. तिला भोगल्याने कोणत्याही प्रकारचा बाट नाही लागत या सोवळेधारी पुरुषांना. गोिवद निहलानी यांच्या ‘आक्रोश’ या चित्रपटात जेव्हा भास्कर कुलकर्णी त्याच्या गुरुस्थानी असलेल्या नावाजलेल्या वकिलाला त्याला येणाऱ्या धमक्यांविषयी तसेच लहान्याच्या बायकोवर बलात्कार करून तिला समाजातील उच्चविभूषित आणि प्रतिष्ठित लोकांनी कसं मारलं याविषयी कळवळून सांगतो तेव्हा हा अदिवासी समाजातूनच वर आलेला पण व्यवस्थेचा भाग झालेला वकीलही म्हणतो, ‘‘हे वर्षांनुर्वष चालत आलं आहे. स्त्रियांच्या बाबातीत तर हे होतंच आहे. त्याचा एवढा बाऊ का करायचा? लहान्यानं परस्पर प्रकरण मिटवलं असतं तर ही वेळ आलीच नसती.’’

या व्यवस्थेनं आणि त्यातील लोकांनी बदल घडवायचे म्हटले तरी ते घडत नाहीत. त्याला कारण केवळ जन्मानं आलेली जातीय सत्ता उपभोगणारे लोक आजही या देशात आहेत. शिवाय ते त्याचा अभिमान बाळगत आहेत. मध्यंतरी स्थलांतरावर केलेल्या एका सर्वेक्षणात स्थलांतराची कारणं देताना आर्थिक कारणाबरोबरच जातव्यवस्था हेही मुख्य कारण असल्याचं म्हटलं गेलं. केवळ उत्तरेकडील राज्यांतच नाही तर पुरोगामी महाराष्ट्रातील गावखेडय़ातील माणसं दिल्ली, मुंबईसारख्या शहरात स्थलांतरित होतात कारण ते जेव्हा इथं येऊन चहाची टपरी टाकतात तेव्हा त्यांना कोणी जात विचारून त्यांच्याकडे चहा प्यायला जात नाही की कोणी जात विचारून टॅक्सी किंवा रिक्षात बसत नाहीत. महानगरांत त्यांच्या जातीचा उल्लेख करून कोणी त्यांना डागण्या देत नाहीत. इथं ते चार पसे मिळवून जगू शकतात. पण स्वतच्या गावात मात्र ‘नीच जात का’ असं म्हणून त्यांनी उघडलेल्या दुकानात कोणी पाऊलही टाकत नाही.

आपल्या देशात असलेला हा जातव्यवस्थेचा दांडा इथल्या राजकारण्यांनीही इतका बळकट केला आहे की हे लोकही उरात भय बाळगून आपापल्या जातीच्या गोटात राहू लागले आहेत. तुलनेनं कमी असली तरी महाराष्ट्राचीही तीच गत आहे. म्हणूनच जब्यानं उगारलेला जातव्यवस्थेवरचा दगड ‘फँड्री’ पाहून चित्रपटगृहामधून बाहेर पडल्यावर आपल्याच अंगावर येऊन पडल्यासारख्या वाटतो. गावखेडय़ाचं जे मनोहारी रूप मनात घेऊन आपण जगत असतो त्यावरही हा दगड जोरात येऊन आदळतो. ‘आर्टकिल १५’चित्रपटामध्ये अयान रंजन जेव्हा सुरुवातीला गावात येतो तेव्हा त्याच्याही डोळ्यात असंच हिरवाईनं नटलेल्या, निसर्गातील अनेक रंगांची उधळण करणाऱ्या गावाचं चित्र असतं. अशा गावात नेमणूक झाल्यावर खुशालून गेलेल्या अयानला या गावाच्या चेहऱ्यावर लागलेला हिंसेचा, उच्चवर्णीयांच्या मग्रुरीचा आणि खालच्या वर्णाच्या असहायतेचा रंग हळूहळू दिसायला लागतो आणि तो व्यथित होतो. निषादच्या ‘कभी हम हरिजन होते है, कभी बहुजन, मगर केवल जन नहीं होते.’या वाक्याने व्यथित होतो. आणि मग मात्र आपणच तयार केलेल्या या दलदलीत कधी ना कधी आपल्यालाच उतरायला हवं आणि त्यासाठी संविधानाचा उपयोग करायलाच हवा, असं ठामपणे म्हणतो.

चित्रपटगृहातून बाहेर पडताना हे असे शब्द, अशी वाक्यं सोबत घेऊन आपण बाहेर पडतो. पण पुन्हा एकदा शिरतो आपल्या नेहमीच्या जगात. विसरून जातो ती क्षणभर वाटलेली अस्वस्थता, अयानचा संघर्ष आणि त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थ करणारा निषादचा व्यवस्थेनं घेतलेला बळी. दलितांना प्रेम करण्याचा अधिकार नसतो, त्यांना बंड करण्याचा अधिकार नसतो, त्यांच्या माणसांसाठी लढण्याचाही अधिकार नसतो. सत्तेच्या विरोधात गेलात, मग ती सत्ता उच्चवर्णीयांची असेल की राजसत्ता असेल, तुम्हाला ताबडतोब देशद्रोही, नक्षल ठरवून कायमचं आत टाकलं जातं. सत्तेविरोधात बोलण्याचा अधिकार काढून घेतला जातो. अन्यायाविरोधात लढण्याच्या साऱ्या वाटा बंद केल्या जातात. कधी-कधी फाशीवर लटकावून समलैंगिक असल्याचे नाही तर देशद्रोही असल्याचे आरोप केले जातात. शिक्षणसंस्थांमधली किंवा विद्यापीठांमधली आत्महत्येचा दोर लटकावता येतील अशी झाडंदेखील त्यांच्यासाठी निवडली जातात.

हे सारं अस्वस्थ करत असलं तरी चित्रपटगृहांतून बाहेर पडून आपल्या जगात शिरल्यावर लोक का विसरतात हे सारंच? का जगायला लागतात पुन्हा एकदा मनात खोलवर रुतलेली श्रेष्ठत्वाची किंवा कनिष्ठत्वाची भावना घेऊन? का सामील होतात पुन्हा एकदा आपल्या कळपात? का पळवाट काढतात काही अपवादात्मक लोकांच्या दोषांकडे बोट दाखवून? का हिणवतात ‘ते आंबेडकरवाले’, ‘हे जयभीमवाले’ किंवा ‘ते’ लोक म्हणून? अयानला प्रश्न पडतो ‘ते’ लोक म्हणजे नेमके कोणते? हा प्रश्न का नाही पडत त्यांना? की त्यांच्यासाठी हा केवळ एक वर्ग आहे फक्त विशिष्ट ‘जात’ असलेला? सहा डिसेंबरला मुंबईत आपल्या ‘मसीहा’ला भेटायला आलेल्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता दिसत असूनही मुंबईतले लोक आपणच हीन केलेल्या या लोकांकडे परग्रहावरून आल्यासारखं पाहतात तेव्हा अयान रंजनला पडलेला ‘कौन है ‘ये’ लोग’ हा प्रश्न का पडत नाही त्यांनाही?

‘मेरा भारत महान’ असलेल्या या देशातलं हे विदारक वास्तव आणि समाजजीवनातील विविध पातळ्यांवरचं शोषण ऐंशीच्या दशकात कुठंही भडकपणा येऊ न देता श्याम बेनेगल, गोिवद निहलानी यांनी ‘अंकुर’, ‘आक्रोश’ यांसारख्या चित्रपटांत मांडलं होतं. तेच वास्तव गेल्या काही वर्षांत आपल्यासमोर अनेक चित्रपटातून वेगवेगळ्या संदर्भात आलं होतं आणि तेच आज अनुभव सिन्हा यांना पुन्हा एकदा ‘आर्टकिल १५’ या चित्रपटात मांडावं लागतंय याचा अर्थच हा आहे की आपण आजही सामाजिक न्यायाच्या जवळपासही पोचलेलो नाही आणि पोचण्याची शक्यताही नजीकच्या काळात दिसत नाही. पण तरीही संवेदनशील कवी, लेखक, नाटककार, पटकथालेखक, दिग्दर्शक कोणत्या तरी कोनाडय़ात मंद दिव्याखाली बसून जुळवत राहतील शब्द, तयार करतील चित्रपटाच्या फ्रेम्स आणि मांडत राहातील समस्त शोषितांचं दु:ख त्यांच्या वेगवेगळ्या सृजनात्मक कृतीतून.

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 12:07 am

Web Title: aakrosh article 15 mpg 94
Next Stories
1 आईपणाची गोष्ट
2 लोकसहभागातून शिक्षण
3 कल्पतरु
Just Now!
X