22 July 2019

News Flash

ज्ञानमूर्तीचे स्मरण

आभाळमाया

गोविंद तळवलकर

डॉ. निरुपमा गोविंद तळवलकर

सुषमा गोविंद तळवलकर

साक्षेपी संपादक गोविंदराव तळवलकर यांच्या २१ मार्च या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कन्या डॉ. निरुपमा व सुषमा तळवलकर यांनी लिहिलेल्या ज्ञानमूर्तीच्या सहवासातील या आठवणी.

‘‘सर्व शास्त्रे व कला (यात साहित्यही आले) यांचे मूल अधिष्ठान एकच आहे. कलेत विज्ञान आहे आणि विज्ञानात कला आहे. विषयाचा गाभा आत्मसात करून, आपले ज्ञान व स्वतंत्र बुद्धी वापरून, त्या प्रश्नाबद्दल वेगळा विचार करावा, स्वतंत्र उपपत्ती बसवावी. एखादा राग आळवावा किंवा उत्कृष्ट चित्र वा शिल्प साकारावे अशी अग्रलेखाची, लेखाची वा ग्रंथाची मनोज्ञ मांडणी करावी. पण त्याच वेळी वैज्ञानिकाप्रमाणे सखोल संशोधन करून सर्व पुराव्यांनिशी जमा केलेल्या माहितीच्या संदर्भाचा आधार घ्यावा, शास्त्रीय सिद्धांताच्या पायऱ्यांप्रमाणे नेमके विवेचन करावे. एकही शब्द जास्त नाही वा कमी नाही. सरलता ही त्या क्षेत्रातील संसिद्धीची द्योतक आहे. ती सर्वात कठीण असते. क्लिष्टता, दुबरेधता, अघळपघळता ही गोंधळाची, विषय न समजल्याची द्योतक आहेत. ख्याल गायकीची शैली ठुमरीपेक्षा वेगळी; तशी वैचारिक आणि ललित लेखनाची वेगळी; पण दोन्हीला सूर बरोबर लागला पाहिजे आणि विस्तार नेमका, पण स्वतंत्र प्रतिभेने केला पाहिजे,’’ असे आमचे वडील, गोविंदराव तळवलकर नेहमी आम्हाला सांगत. ही त्यांच्या बुद्धीची ठेवण होती. त्यांचा स्वभाव सरळ, मितभाषी, ज्ञानविज्ञाननिष्ठ, धर्यशील, दयाशील आणि क्षमाशील होता. अनेक विषयांत रस घेऊन सर्व कामे आस्थेने, निस्पृह, लोकहितवादीवृत्तीने, शिस्तीत, भराभर करायचे. स्वभावानुरूप त्यांची शैली सुबोध, सुसंस्कृत, संयमी, गतिमान, नेमकी पण विचारसमृद्ध, सामर्थ्यशाली,

परखड पण रसिकतेची व कारुण्याची झालर असलेली आहे. गोरेपान, अतिशय देखणे व तेजस्वी व्यक्तित्व होते, तसेच सहजसुंदर, प्रभावी लेखन!

टिळकांच्या व्यक्तित्वावर ‘लो. टिळक दर्शन’  व ‘बाळ गंगाधर टिळक’; तसेच रानडे यांच्यावर ‘विराट ज्ञानी न्या. रानडे’  ही पुस्तके बाबांनी लिहिली. ‘हे राजा! तुला माझी पर्वा नसेल तर मला तुझी त्याहिपेक्षा नाही, मी चाललो!’, हे भर्तृहरिचे टिळकांनी उद्धृत केलेले वचन बाबा आम्हाला नेहमी सांगायचे. पुढारी आणि विविध क्षेत्रांतील अधिकारपदस्थ व्यक्ती यांच्याबाबत बाबांची हीच वृत्ती होती. उक्ती तशी कृती होती. वैचारिक विषयांऐवजी ‘लोकांना ताई-माईच्या गोष्टी व उथळ वाचण्याचे छंद-चाळे असतात, हे पारतंत्र्यातील राष्ट्र सर्व बाजूंनी कसे मद्दड बनते याचे एक गमक आहे’, हे टिळकांचे मत बाबांनी उद्धृत केले आहे. स्वराज्यातसुद्धा लोकांच्या वाचनाची पातळी सुधारली नाही, इंटरनेटच्या जमान्यात तर वाचन आणि लेखन पार रसातळाला गेले आहेत, हे बाबांना उद्वेगजनक वाटे. ‘ज्ञानातील गुंतवणूक चांगली फायद्याची असते’, असे बाबांनी एका व्यापाऱ्याला त्याच्याच परिभाषेत सांगितले होते.

बाबांच्या अग्रलेखांच्या वाचनाचा कार्यक्रम गावोगावी करावा, अशी पु.ल. देशपांडेकाकांची योजना होती, पण ती राहूनच गेली. अग्रलेख लिहावा तो बाबांनीच, असे त्यांचे मत होते. बाबांवर बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांनी ’अग्रलेखक’ असा लेख लिहिला होता. ‘चार शब्द’ हे त्यांचे पुस्तक त्यांनी बाबांना अर्पण केले आहे. त्या अर्पणपत्रिकेत ते लिहितात, – ‘‘प्रिय गोविंदराव तळवलकर यांना : पत्रकारितेतून तुम्ही निवृत्त झाल्यामुळे तुमची ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून होणारी नित्याची भेट दुरावली. तुमच्या लेखनातून उपजत प्रतिभेचा आणि ग्रंथोपासनेतून मिळालेल्या प्रज्ञेचा मला सदैव खूप आनंद मिळाला. पत्रकारांच्या क्षेत्रातील एक भाष्यकार या नात्याने तुम्ही असंख्य वाचकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे. त्या कृतज्ञ वाचकांतला तुमचा एक वाचक आणि निकटचा स्नेही या भावनेपोटी ‘चार शब्द’  हा मी निरनिराळ्या ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावनांचा संग्रह तुम्हाला सप्रेम अर्पण करीत आहे. स्वीकार करावा ही विनंती. तुमचा पी. एल.’’

बाबांच्या इतका कामाचा उरक क्वचितच दिसेल. बाबांनी राजकीय, आर्थिक, सामाजिक प्रश्नांवर विचारप्रवर्तक अग्रलेख व लेख लिहिले, गंभीर तसेच ललित विषयांवर लिहून वाचकांना जागतिक विचारप्रवाहांची, संस्कृतींची ओळख करून दिली. संपादकीय दर्जा काय असावा याचे उदाहरण घालून दिले. बाबांनी मांडलेले सिद्धान्त, निष्कर्ष व अंदाज त्या काळाच्या मानाने खूपच पुढे होते. अनेकविध विषय व व्यक्तींवरील बाबांचे अग्रलेख व लेख अभिजात, बहर, अग्रलेख , पुष्पांजली, अक्षय, व्यक्ती आणि वाङ्मय, प्रासंगिक, ग्रंथसंगती, सौरभ, मधुघट, डिकन्स आणि ट्रोलॉप, वैचारिक व्यासपीठे  या संग्रहांत आहेत. ‘वाचता वाचता’ची नवी आवृत्ती ‘साधना’ने गेल्या २२ जुलैला (बाबांच्या जयंतीला) प्रसिद्ध केली. पु.भा.भावेकाका आणि ग.दि.माडगूळकरकाका यांना बाबांबरोबर इंग्लंडचा प्रवास करून शेक्सपिअर, वर्डस्वर्थ इत्यादी बाबांच्या ‘जननांतर सुहृदां’च्या घरी जायची खूप इच्छा होती, पण ते राहूनच गेले. ‘स्वप्नभूमी’ या बाबांच्या लेखामुळे मराठी लोकांना लेक डिस्ट्रिक्टबद्दल कुतूहल निर्माण होऊन ते तेथे जाऊ लागले. एकदा मुंबईला विमानतळावर आम्हाला एक पुढारी भेटले. बाबांचा लेख वाचल्यामुळे ते सुटीत सर्व कुटुंबास घेऊन लेक डिस्ट्रिक्टला चालले होते.

‘नेक नामदार गोखले ’ या स्वतच्या पुस्तकात काही बदल करून बाबांनी स्वतच त्याचे इंग्रजीत रूपांतर केले – Gopal Krishna Gokhale: Gandhils Political Guru अभ्यासकांनी बाबांची पुस्तके वाचणे आवश्यक आहे, असे रामचंद्र गुहा इत्यादींनी लिहिले आहे. गेल्या वर्षी बाबांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गुहांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये आदरांजलीपर लेख लिहिला होता. त्यात ते लिहितात – ‘‘मराठी पत्रकारितेत ‘टिळकयुगा’नंतर ‘तळवलकरयुग’ महत्त्वाचे समजतात. महाराष्ट्राच्या समाजजीवनावर तळवलकरांच्या लेखनाचा जो प्रभाव पडला, त्यामुळे टिळकांनंतरचा प्रभावी संपादक असा त्यांचा उल्लेख केला जातो. ते समाजसुधारक व देशभक्त होते. विचारवंत होते, पण त्याच वेळी वास्तवाचे भान राखून होते. पक्षपातापासून अलिप्त असे उदारमतवादी संपादक होते. राजकीय पक्षांच्या भूमिकांसाठी आपल्या मतांना व विचारप्रणालीला मुरड घातली जाणार नाही याची त्यांनी सदैव दक्षता घेतली. त्यामुळे विविधांगी वैचारिक भूमिका असलेला वाचकवर्ग त्यांचा आदर करत असे आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या विचारसरणीचे राजकीय नेतेही त्यांना दबून असत. सर्व पक्षाच्या लोकांवर त्यांनी टीका केली. त्यांचे वैचारिक स्वातंत्र्य आणि त्याच वेळी सचोटीदेखील परिपूर्ण होती. मराठी व इंग्लिश या दोन्ही भाषांवर उत्तम प्रभुत्व होते. त्यांनी वृत्तपत्रीय लेखन व ललित लेखन तर केलेच, पण सखोल संशोधनावर आधारित गंभीर पुस्तकेही लिहिली. प्रादेशिक प्रश्नांबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचीही त्यांना बारकाईने माहिती असायची व त्यावर त्यांचे भाष्य लक्षणीय असायचे. माझ्याप्रमाणे इतरही अनेक इतिहासकारांना त्यांचे मार्गदर्शन झाले होते. प्रत्येक राज्यात तळवलकरांसारखा पत्रकार-संपादक असता, तर आज ज्या अवस्थेत भारतीय प्रसारमाध्यमे आहेत, त्यापेक्षा ती अधिक चांगल्या अवस्थेत दिसली असती. त्यांची परंपरा महाराष्ट्राबाहेरच्या आजकालच्या संपादकांनीही आदर्श समजून पुढे चालू ठेवायला हवी.’’

बाबा लिहितात, ‘‘इतिहासकारास कल्पक सहानुभूती असणे व त्याने राजकीय बदलांबरोबरच तत्कालीन भौतिक, नैतिक, वैचारिक व सांस्कृतिक जीवन आणि जागतिक संदर्भही लक्षात घेऊन स्वतंत्र उपपत्ती लावणे महत्त्वाचे आहे.’’ नवरोजी ते नेहरू’, त्रिखंडात्मक सत्तांतर : १९४७ , मंथन, नेक नामदार गोखले, भारत आणि जग, द्विखंडात्मक गांधीपर्व, चार खंडात्मक सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त-  या व बाबांच्या सर्वच ग्रंथांत असा सर्वागीण व अभिजात विचार दिसतो. गहन विषयांचेसुद्धा सोप्या, प्रासादिक पण निल्रेप नव्हे अशा भाषेत, मोजक्या शब्दांत, मार्मिक विश्लेषण करणे, हे बाबांचे वैशिष्टय़च. सत्तांतर व सोव्हिएतवरील पुस्तकांचे हिंदी भाषांतर  येत्या २१ मार्चला ‘संवाद प्रकाशन’ प्रसिद्ध करणार आहे, बाकीच्या पुस्तकांचे नंतर.  ‘यशवंतराव चव्हाण:  व्यक्तित्व व कर्तृत्व ’ या स्वतच्या पुस्तकाचे बाबांनीच इंग्रजीत केलेले भाषांतर म्हणजे ‘.Y.B.Chavan: Life & Times’. अमेरिकेतील ग्रंथालयांचा बाबांना उपयोग झाला. ते गमतीने म्हणायचे, ‘‘रशियावर पुस्तक लिहिण्यासाठी मी अमेरिकेत आलो.’’

बाबा प्रसिद्धिपराङ्मुख होते. त्यांच्या व्यक्तित्वाच्या अनेकविध पलूंची लोकांना माहिती व्हावी, या उद्देशाने आम्ही ‘ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर ’ हे  पुस्तक लिहिले. ते ‘साधना’ने गेल्या २१ मार्चला बाबांच्या प्रथम स्मृतिदिनी प्रसिद्ध केले. अनेक विषयांत बाबांना रस होता. शेक्सपिअरच्या नाटकांतील पदांत  संगीत आहेच, पण गद्यातही लय व ताल आहे, असे बाबा सांगायचे. त्यांतील अनेक वाक्ये त्यांना पाठ होती. ते ती लयतालावर म्हणत. बाबांनी खूप ध्वनिमुद्रिका व ध्वनिफिती विकत घेतल्या होत्या. आम्ही मोटारीने लांबचा प्रवास करायचो तेव्हा आईबाबा   आम्हाला ‘शुंदर हृदि रंजन तुमि’ हे रवींद्रनाथांचे गीत व ‘गोपालम्’ हे सुब्बलक्ष्मी यांनी गायलेले गीत म्हणायला सांगायचे. आई व आम्ही दोघी गाण्याच्या भेंडय़ा खेळायचो. बाबा सगल, पंकज मलिक यांची गाणी गात त्यात भाग घ्यायचे. आम्ही १९७५च्या आधीच्या हिंदी सिनेमातील गाणीही गायचो. सगलचा ‘देवदास’ बाबांना काव्यमय वाटायचा. दिलीपकुमार हे नट म्हणून बाबांना आवडत होते, पण त्यांचा ‘देवदास’ चित्रपट मात्र बाबांना निराशाजनक वाटला. तो निघाला तेव्हा बाबांनी ‘लोकसत्ता’त मोठा लेखही लिहिला होता. तथापि त्यातील वैजयंतीमालाची नृत्ये आम्हाला चौघांना फार आवडायची.

बाबांच्या सौंदर्यदृष्टीचे भावेकाका, माडगूळकरकाका, पु.ल.काका नेहमी कौतुक करायचे. डोंबिवलीला बाबांनी अतिशय सुरेखित बाग लावली होती. एका भागाची रचना आयताकृतीतील वर्तुळांच्या भौमितिक सौंदर्याकृतीसारखी होती तर आणखी काही भाग वळणावळणाचे, सहजसुंदर, कुतूहलजनक असे मुक्तहस्तचित्र होते. पुढे बाबांनी अमेरिकेत माउंट व्हर्ननला जॉर्ज वॉशिंग्टनने लावलेली शोभिवंत बाग बघितली तेव्हा त्यानेही याच प्रकारे विचार केला होता हे पाहून बाबांना फार आनंद झाला आणि वॉशिंग्टनबद्दल खास आत्मीयता निर्माण झाली. जेफर्सन, रूझवेल्ट, चर्चिल, वर्डस्वर्थ, शेक्सपिअरची पत्नी अ‍ॅन हॅथवे यांनी आरेखिलेल्या बागांना त्यांनी आवर्जून भेट दिली होती. फ्रेंच चित्रकार मोने याच्या जिव्हार्नी येथील बागेबद्दलची पुस्तके बाबांनी मुद्दाम विकत घेतली होती. ‘बदलता युरोप’मध्ये पॉट्सडॅम येथील राजवाडय़ाच्या व्हर्सायच्या धर्तीवरील रम्य उद्यानाचे त्यांनी कौतुक केले आहे.

आदरयुक्त भीतीबरोबरच आपुलकी वाटावी असे बाबांचे व्यक्तित्व होते. विस्कळीत राहू नये, नेटके राहावे, असा त्यांचा आग्रह होता. शबनम पिशवी खांद्यावर टाकून जॉर्ज फर्नाडिस आमच्या घरी यायचे. बाबा त्यांना म्हणायचे, ‘ही झोळीसारखी पिशवी तुम्ही का घेता?’ हल्ली कोणीही लोक अमेरिकेच्या अध्यक्षाच्या खांद्यावर हात ठेवतात, पाठीवर थाप मारतात किंवा मिठीही मारतात. बाबांना ते जरासुद्धा पसंत नव्हते. असे कोणी अतिसलगी करताना दिसले की बाबा आम्हा तिघींना वॉशिंग्टन यांच्याबद्दलची एक कथा सांगायचे. एकदा स्नेहसंमेलनात कोणी तरी वॉशिंग्टन यांच्या खांद्यावर हात ठेवला. वॉशिंग्टन यांनी त्याच्याकडे नुसते पाहिले, त्याबरोबर त्या गृहस्थाने हात काढून घेतला. परत कोणी वॉशिंग्टन यांच्याशी अशी सलगी केली नाही. बाबा हावभाव करून आम्हाला हे सांगायचे. आम्ही खूप हसायचो. आता भारतीय नटही पंतप्रधानांना भेटतात तेव्हा लोफरसारखे कपडे घालतात. बाबा म्हणायचे, ‘पूर्वीचे नट नेहरूंना भेटायचे तेव्हा सूटबूट किंवा पारंपरिक वेश, असे सुसंस्कृत कपडे घालून जात.’

बाबा एकदा पठाणी पोशाख घालून राजीव गांधींना भेटायला गेले होते. राजीवजींना तो फार आवडला. तो कोणत्या दुकानातून घेतला याची त्यांनी चौकशी केली. बाबांना सगळेच कपडे फार छान दिसायचे. ‘जंजीर’मधील ‘यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी’ या मन्ना डेंच्या गाण्यावरील पठाणी वेशातील प्राण यांचे नृत्य बाबांना आवडायचे. अफगाणिस्तान युद्धावरील ‘अग्निकांड ’ या पुस्तकात त्यांनी याचा उल्लेख करून बजावले आहे की मध्यपूर्व, अफगाणिस्तान व पाकिस्तान येथे मात्र कोणीही विश्वासपात्र नाहीत.

अनेकांवर बाबांनी मर्मभेदक टीका केली, पण व्यक्तिगत टीका आणि व्यक्तीवरील टीका यांच्या सीमारेषेसंबंधी भान राखले. आत्मनिरपेक्ष शैली, त्याचप्रमाणे टीकाही व्यक्तिनिरपेक्ष. केंद्र सरकारचे वा राज्य सरकारचे धोरण लोकशाहीला विघातक असेल वा चुकीच्या धोरणामुळे देशातील वा राज्यातील जनतेचा प्रक्षोभ माजून दुरवस्थेचा प्रसंग निर्माण होत असेल, तर काही वेळा बाबा त्या संबंधित पुढाऱ्यांशी, मंत्र्यांशी वा त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ते धोरण बदलणे कसे आवश्यक आहे हे पटवून देत. अनेकदा मग त्याप्रमाणे ते धोरण बदलण्यात येई व जनतेचा प्रकोप शांत होऊन सर्व व्यवहार परत सुरळीत होत. असे फोन ते अनेकदा घरून करीत. राजीव गांधींनी त्यांचा फॅक्स नंबर बाबांना दिला होता. फाउंटनच्या तारगृहातून बाबा कधी कधी राजीवना तार पाठवायचे, आमच्या घराजवळील दुकानातून फॅक्स पाठवायचे. बाबा क्रियावान पंडित होते. अध्यात्माची वायफळ चर्चा न करता ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हे ब्रीद त्यांनी सदैव पाळले. आपखुशीने त्याग करण्यास नैतिक बळ लागते, ते त्यांच्याकडे अपार होते. कुठेही वाच्यता न करता, कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ लोकहितासाठी बाबा हे कार्य करीत असत. बोलणी झालेली छापणार नाही असे आश्वासन देऊन बाबांच्या इंदिरा गांधींबरोबर तसेच सर्व पक्षांतल्या नेत्यांबरोबर अनौपचारिक बठका होत असत; पण त्याबद्दल बाबांनी कधीही वाच्यता केली नाही. शब्दाला जागले. काही गोष्टी फक्त आईला व आम्हाला सांगितल्या होत्या. अलीकडे ट्रम्प यांनी काही पत्रकारांशी गुप्त बोलणी केली, पण काहींनी ती लगेच जाहीर केली. अशी अव्यावसायिक वृत्ती बाबांना निषिद्ध वाटायची.

वृत्तपत्रांतील बातमी वा टीका योग्य वाटली नाही तर त्याविरुद्ध बदनामीची फिर्याद लावून कारवाई करण्याचा सरकारला हक्क असेल, असा कायदा करण्याबद्दल राजीव गांधींनी सप्टेंबर १९८८ मध्ये लोकसभेत ठराव मांडला होता. यामुळे वृत्तस्वातंत्र्यावर गदा येत असल्याने पत्रकार, विरोधी पक्ष, जनता आदी सर्वानीच देशभर जोरदार विरोध केला, सभा घेतल्या, मोच्रे काढले. यामुळे गोंधळ माजला होता. काही काँग्रेसनेत्यांचाही या ठरावास विरोध होता. हा कायदा लोकशाहीला विघातक असल्यामुळे बाबांचा त्याला सक्त विरोध होता. काही पत्रकार मोच्रे काढून घोषणा देत होते. बाबांनी असे काही केले नाही. त्यांनी आमच्या घरून राजीवजींनाच फोन केला व तो ठराव लगेच मागे घेणे देशहिताच्या दृष्टीने कसे आवश्यक आहे, हे त्यांना सांगितले. राजीवजींना बाबांबद्दल फार आदर होता, बाबा सल्ला देतील तो योग्यच असेल हे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी तो सल्ला मानून २-३ दिवसांतच तातडीने तो ठराव मागे घेतल्याचे जाहीर केले. तसे करणार हे बाबांना माहिती होते. बाबांनी याचा कोठेही गाजावाजा केला नव्हता. कार्यालयातही कोणाला सांगितले नव्हते. ज्या दिवशी मागे घेणार त्या दिवशी राजीवजींच्या कार्यालयातून सुमन दुबे यांनी बाबांना फोनवरून सांगितले, की रात्री पावणेबारा वाजता राजीव ते विधेयक मागे घेतील. बाबांनी आम्हाला सांगितले. दुसऱ्या दिवशीच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या अंकात त्यासाठी जागा ठेवावी अशी सूचना बाबांनी कार्यालयातील सहकाऱ्यांना देऊन ठेवली. रात्री पावणेबारा वाजता राजीवजींनी ते विधेयक मागे घेतले. वृत्तस्वातंत्र्य अबाधित राखण्याचे कार्य बाबांनी अशा रीतीने पार पाडले. हे त्यांनी कसे घडवून आणले याबद्दल त्यांनी नंतरही कोठे लिहिले नाही वा कोणाला आपणहून सांगितले नाही. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असता शिवसेनेची दंगल पेटण्याचा संभव निर्माण झाला होता. तेव्हा ‘विवेकशक्तीस आवाहन’ असा अग्रलेख लिहून बाबांनी दोन्ही पक्षांत संवाद घडवून आणल्यामुळे दंगल टळली. मृणाल गोरे, फर्नाडिस इत्यादींशी बोलून काही संप त्यांनी मिटविले होते. अशी बरीच उदाहरणे आहेत.

जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले तेव्हा पूर्वी बाबांनी त्यांच्याबद्दल आम्हाला काय सांगितले याची आठवण झाली. बर्लिनची भिंत पडली तेव्हा अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष थोरले बुश जर्मनीत गेले नाहीत. बुश म्हणाले, ‘मी तेथे जाऊन नाचणार नाही, हा जर्मन लोकांचा दिवस आहे.’ बाबा म्हणायचे, तो बुश यांचा मोठेपणा होता. दुसरा कोणी अध्यक्ष असता तर मिरवायला गेला असता. त्यांचे पुत्र जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी २००३ मध्ये इराकवर हल्ला करून सद्दामला ठार मारले, यास बाबांचा विरोध होता. सद्दाम गेल्यावर त्या भागात पोकळी निर्माण होईल व सर्व भाग अस्थिर होईल, असे बाबांचे मत होते. तसेच झाले. बाबा आम्हाला म्हणाले, ‘‘थोरले बुश यांनी १९९१ च्या इराक युद्धात सद्दामला ठार मारले नाही व सत्तेवरून पदच्युत केले नाही याचे हेच कारण होते; सद्दामला कह्य़ात ठेवायचा, पण मारायचे नाही असे धोरण होते, तेच योग्य होते.’’ ‘राइझ ऑफ व्हल्कन्स’  हे पुस्तक बाबांनी आम्हाला वाचायला सांगितले होते. युद्धापूर्वी अनेक वर्षे पॉल वुल्फोविट्स, रिचर्ड पर्ल, चेनी वगरे इराकमधील तेल मिळविण्याच्या विचारात होते. बाबांनी हे सर्व ‘इराक दहन ’ या पुस्तकात लिहिले आहे.

‘सीस्पॅन’च्या तिन्ही वाहिन्यांवरील कार्यक्रम बाबांना आवडायचे.२००३ मध्ये कोलिन पॉवेल यांनी युनोतील प्रतिनिधीसभेपुढे छायाचित्रे इत्यादी दाखवून इराककडे संहारक शस्त्रे असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. बाबांनी ते ‘सीस्पॅन’वर पाहिले. त्यापूर्वी हॅन्स ब्लिक्स यांचा अहवाल व बाकीचे अहवाल बाबांनी वाचले होते. त्यामुळे पॉवेल यांच्या निवेदनावर बाबांचा थोडासुद्धा विश्वास बसला नाही. बाबा आम्हाला म्हणाले, ‘‘पॉवेल व अ‍ॅडलाय स्टीव्हन्सन यांच्यात खूप फरक आहे. क्युबामध्ये सोव्हिएत युनियनने अण्वस्त्रे ठेवली होती व आणखी ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमेरिकेचे युनोतील प्रतिनिधी स्टीव्हन्सन यांनी छायाचित्रे दाखवून या अण्वस्त्रांची माहिती दिल्यामुळे व अध्यक्ष केनेडी यांनी क्युबाकडे जाणाऱ्या सोव्हिएत युनियनच्या बोटींची नाकेबंदी केल्यामुळे त्यास माघार घ्यावी लागली होती.’’ बाबांनी ‘इराक दहन ’मध्ये हे लिहिले आहे. बाबा म्हणाले, ‘‘अमेरिकेच्या शब्दाला तेव्हा महत्त्व होते; ट्रम्प यांच्या राज्यात अमेरिकेतील कोणाच्याच शब्दाला किंमत राहिलेली नाही.’’

मुस्लीम दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी रशिया व अमेरिकेने सहकार्य केले पाहिजे, असे पुतिन यांनी धाकटे बुश यांना सांगितले होते. ते धोरण योग्य असल्याचे बाबांनी ‘अग्निकांड’ मध्ये लिहिले आहे. पाकिस्तान अमेरिकेची मदत घेते, पण दहशतवाद्यांना पोसते. डेमॉक्रॅटिक पक्षाचे लोक आपल्या बाजूचे आहेत ही भारतीयांची चुकीची समजूत आहे, केनेडीबंधू व जॉन्सन यांच्यानंतर डेमॉक्रॅटिक पक्षाचे सर्व लोक (क्लिंटन व ओबामासह) कायम भारताच्या विरुद्ध पाकिस्तानला पाठिंबा देत आले आहेत, रिपब्लिकनच भारताच्या बाजूचे आहेत, असे बाबांनी ‘साधना’तील लेखात लिहिले होते.

रशिया व चीनमधील कम्युनिस्ट राजवटींतील जीवनपद्धतींबद्दलचे बाबांचे लेख ‘लाल गुलाग’मध्ये आहेत. अमेरिकेचे अफगाणिस्तानयुद्ध सुरू झाल्यापासून पाकिस्तान व चीन यांच्यात होत असलेले सहकार्य भारत व अमेरिका यांना धोकादायक आहे, असा इशारा बाबांनी २००१ मध्ये दिला होता. जगभरच्या चीनच्या वाढत्या प्रभावास आळा घालणे आवश्यक आहे. अमेरिकेतील किसिंजर यांसारखे पूर्वी मोठय़ा पदावर असलेले अनेकजण चीनचे प्रवक्ते असल्यासारखे वागतात, काहीजण तर चीनचे दलाल आहेत. चीन व मुस्लीम दहशतवाद हे आजच्या काळातले सर्वात गंभीर धोके आहेत, असे बाबांचे मत होते.

या वर्षी महात्मा गांधींची १५० वी जयंती आहे. १९३७ ते १९४७ मधील भारतीय स्वातंत्र्यलढय़ांच्या इतिहासासंबंधी २०१० मध्ये बाबांनी लिहिलेला ‘गांधीपर्व : खंड १’, गेल्या वर्षी ‘मौज’ने प्रकाशित केला. खंड २ बाबांनी २०१६ मध्ये लिहून तयार ठेवला आहे; तो लवकरच प्रसिद्ध होईल. त्यांत बाबा लिहितात, ‘भारताची हिंदुराष्ट्र म्हणून घोषणा करणे योग्य नाही, असे वल्लभभाईंनी स्पष्ट लिहिले होते. नेहरूंनी ७ ऑगस्ट १९४७ रोजी राजेंद्रप्रसाद यांना लिहिले होते, की आपल्या देशात हिंदू बहुसंख्य असल्यामुळे आपल्या कार्यावर त्यांच्या विचारांचा प्रभाव पडेल. पण आपण सर्वधर्मसमावेशक राष्ट्र आहोत, की हिंदुराष्ट्र आहोत, याचा विचार करणे आवश्यक आहे. बापू किती कडवे गोरक्षक आहेत हे तुम्ही जाणताच, पण सक्तीची गोवधबंदी करण्यास त्यांचा विरोध आहे.

फाळणी झाली आणि दोन्ही देशांत आपापले सरकार आले. नंतर काहींनी फाळणीचे गुन्हेगार ठरवले. गांधींना फाळणी मान्य नव्हती, पण नेहरू, पटेल इत्यादी काँग्रेसचे नेते सत्तेसाठी अधीर असल्यामुळे फाळणी झाली आणि तेच फाळणीचे गुन्हेगार, असे ठरवण्यात आले. तथापि बंगाल व पंजाबची फाळणी करण्यात सावरकर व शामाप्रसाद मुखर्जी यांचा पुढाकार होता. मग अखंड भारत कसा निर्माण होणार होता? फाळणी करून आसाम, बंगाल, पंजाब, सिंधमधील हिंदू भाग बाकीच्या हिंदुस्थानला जोडायचे; हा अखंड हिंदुस्थान होईल, असे पत्रक सावरकरांनी काढले होते. शामाप्रसाद म्हणाले, की देशाचे तुकडे होणार हे ऐकून कोणाला भोवळ येण्याची गरज नाही.’’

बाबांनी त्याच पुस्तकात असेही लिहिले आहे की ‘१९४६ मध्ये पंजाबमध्ये विधिमंडळाची निवडणूक झाली, तेव्हा उमेदवार आपल्या मतदारांना मतदानाच्या आदल्या रात्री मेजवानी देत होते.’ त्यासंदर्भात बाबांनी आम्हाला लिंडन जॉन्सन पहिल्या दोन वेळा सेनेटच्या निवडणुकीसाठी टेक्सासमधून उभे राहिले तेव्हा मते कशी विकत घेतली जात, हे सांगितले. नक्की कोण जिंकून आले ते फक्त परमेश्वरालाच माहीत, असे एक म्हणाला. बाबा म्हणाले, ‘शुद्ध गुंडगिरी, परमेश्वर मते मोजत नव्हता, त्यामुळे जॉन्सन निवडून आले.’

बाबांनी जेम्स मॅडिसन यांचे नवीन चरित्र वाचल्यावर आम्हाला सांगितले, की त्या काळात स्थानिक निवडणुकीत जो उमेदवार जास्त चांगले जेवण व भरपूर मद्य देईल त्याला मते मिळायची. मॅडिसन पहिल्यांदा उभे राहिले तेव्हा त्यांनी अशी लाच द्यायचे नाकारले. ते पडले. पुढच्या वेळी त्यांनी चूक सुधारली व निवडून आले. काही महिन्यांपूर्वी उत्तर कॅरोलायनामध्ये ‘मतपत्रिकांबाबत फसवेगिरी’चे प्रकरण झाले, तेव्हा याची आठवण झाली. अलीकडे अंबानी यांनी पाहुण्यांच्या सरबराईवर जो खर्च केला, तो बघता मॅडिसन यांच्या काळातील निवडणुकीची पद्धत आता भारतात वापरण्याचे कोणी ठरविले तर अंबानी यांना सगळ्यात जास्त मते मिळण्यास हरकत नाही.

ट्रम्प यांना केवळ विरोधासाठी विरोध करून खोटा प्रचार करणाऱ्या अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी पत्रकारितेचा दर्जा इतका खालावला आहे, की पत्रकारिता उरलेलीच नाही, याची बाबांना खंत वाटे. ‘रशियातील बातमीसंस्था ‘प्रावदा’चा अर्थ सत्य आणि ‘इझवेस्तिया’चा अर्थ बातमी असा आहे; पण ‘प्रावदा’त सत्य नाही आणि ‘इझवेस्तिया’त बातमी नाही, प्रचार आहे’’, असे बाबांनी लिहिले होते. ‘‘आता अमेरिकेतील प्रसारमाध्यमे ही मूर्खपंडितांची प्रचारमाध्यमे झाली आहेत; ऑर्वेलने नवी परिभाषा सुचविली होती, ती अनुभवास येत आहे,’’ असे बाबा म्हणत. ‘अमेरिकेतील गुप्तचर संस्था फार प्रबळ आहेत. ते लोक चांगले कार्य करतात, पण काहीजण अधिकाराचा दुरुपयोगही करतात, खोटे बोलतात. निवडणुकीच्या आधीच्या जाहीर सभांमध्ये ट्रम्प त्यांच्यावर टीका करीत; ते योग्य नाही, खासगीत सांगावे, नाहीतर ते लोक अनेक अडचणी उभ्या करतील, ते देशाला चांगले नाही. पूर्वी हूवर यांनी केनेडी, जॉन्सन इत्यादी अध्यक्षांना त्रास दिला होता.’ असे बाबा रोज म्हणायचे. आता ट्रम्प यांना तो अनुभव येत आहे.

‘यापुढचे युग हे इलेक्ट्रॉनिक्सचे आहे. त्यात कौशल्य मिळवूनच देशाची प्रगती होईल. पण या कंपन्यांमुळे एकाधिकारशाही निर्माण होण्याचा धोका आहे,’ हे बाबांनी इंटरनेटच्या अवतरणापूर्वीच लिहिले होते. ही दूरदृष्टी लक्षणीय आहे. इंटरनेटचा उपयोग ज्ञानसंवर्धनासाठी करण्याऐवजी स्वतचा चेहरा, नाव, माहिती, मते हे इंटरनेटवर दिसावे (एवढेच वाचन) या हव्यासापायी लोक फेसबुक वगरे वापरतात, नाही तर ईमेल असताना अशा कंपन्यांची गरजच काय, त्यांच्यावर अंकुश न ठेवल्यास त्या धोकादायक ठरतील, अशी बाबांना चिंता वाटे. अमेरिकेतील राजकारण्यांचे नातलग फेसबुक, गूगल यांसारख्या कंपन्यांचे दलाल असतात. राजकारणी लोक निवृत्त झाल्यावर स्वतसुद्धा कंपन्यांचे दलाल होतात वा त्यांच्या बोर्डावर जातात. असे हितसंबंध असल्यावर अंकुश कोण ठेवणार? अमेरिकेच्या काँग्रेसपुढे चौकशीसाठी झुकरबर्ग यांना बोलावण्याचे नाटक गेल्या वर्षी झाले. अमेरिकेच्या काँग्रेस वा सेनेटपुढे होणाऱ्या चौकश्या बाबा नेहमी टी.व्ही.वर बघायचे. बाबा म्हणायचे, की त्यात ठरलेले असते; ज्या व्यक्तीची चौकशी असते तिच्या बाजूचा पक्ष तिची खूप स्तुती करतो व तिच्या विरुद्धचा पक्ष ती व्यक्ती फार मोठी गुन्हेगार आहे अशा थाटात धारेवर धरतो; या हास्यास्पद प्रकारातून क्वचितच काही निष्पन्न होते.

सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा उंच रामाचा पुतळा आदित्यनाथ उभारणार आहेत, हे वाचल्यावर बाबांच्या ‘हा पुतळा व तो’ या ‘दिव्य मराठी’तील २०१३ च्या डिसेंबरमध्ये लिहिलेल्या लेखाची आठवण झाली. सर्वसामान्य लोकांना अन्नपाणी, वीज, रस्ते, वाहतूक, शिक्षण, रोजच्या सुविधा उपलब्ध करून देणे, प्रदूषणाला आळा घालणे, इत्यादी लोककल्याणकारी योजना राबविण्याऐवजी पुतळे उभारून पशाचा अपव्यय करणे रामराज्याच्या तत्त्वात बसत नाही, सरदार पटेलांनी पुतळ्यांना पहिला विरोध केला असता; पाश्चात्त्य देश व चीन यांच्याशी स्पर्धा करता येईल असे शिक्षण व सुविधा यांस प्राधान्य द्यायला पाहिजे, अशी बाबांची धारणा होती.

१५ ऑगस्टला भाषणात काय बोलावे याबद्दल सूचना कराव्या, असे मोदींनी सांगितल्यावर ‘आउटलुक’मध्ये २०१५ च्या जुलैत ‘सायलेन्स इज गोल्डन’ हा लेख लिहून बाबांनी सुचविले, की स्वातंत्र्य दिनाला लांबलचक रटाळ भाषणे करण्याचे बंद करून युरोप व अमेरिकेत स्वातंत्र्य दिनाला लोक करमणुकीचे कार्यक्रम बघून आनंदोत्सव करतात तसे आपल्याकडेही करावे, भाषणांची प्रथा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दहा वर्षांनी बंद करायला पाहिजे होती. सर्व पक्षांच्या नेत्यांचा फक्त घोषणाबाजी व अधिकारावर नसतील तेव्हा जाळपोळ आणि आंदोलने, एवढाच कार्यक्रम असतो. विधायक कार्य करून देशाला प्रगतिपथावर न्यावे, इतर देशांशी स्पर्धा करून आपण वरचढ व्हावे या दृष्टीने कोणी काही करताना दिसत नाही. स्वतची सरंजामशाही निर्माण करून लोकांकडून खंडणी उकळण्यापलीकडे कोणाची मजल जात नाही, हे बाबांना चिंताजनक वाटायचे.

अ.भि. शहाकाका राजस्थानात प्राध्यापक होते तेथेच रजनीशही प्राध्यापक होते. रजनीश तत्त्ववेत्ता म्हणवून घेण्याइतके ज्ञानी कधी झाले, असा प्रश्न शहाकाकांना होता. बाबांनी रजनीश यांच्यावर ३ मार्च १९७३ रोजी ‘घाऊक अध्यात्म (प्र)दर्शन’ हा लेख लिहिला होता, तो उपरोधिक लिखाणाचा उत्तम नमुना आहे. केव्हाही वाचला तरी हसता हसता पुरेवाट होते. रजनीश यांच्याकडे अमेरिकेत ९० रोल्स रॉइस होत्या. त्यांच्या आश्रमात रासायनिक व जैविक जंतू करण्याची प्रयोगशाळा होती आणि त्या गावाचा कायमचा ताबा घेण्याचा त्यांचा बेत होता. अनेक गुन्ह्य़ांमुळे त्यांना अमेरिकेत तुरुंगात टाकणार होते. अमेरिकेने त्यांना हद्दपार केल्यामुळे ते भारतात परतले. बाबांनी त्यांच्याविरुद्ध बरेच लेख लिहिले. २ ऑगस्ट १९८६ रोजी ‘बेताल भगवान’ हा लेख लिहिला होता.

बाबांची दृष्टी वास्तव आणि पुरोगामी होती. आदित्यनाथ उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री झाले तेव्हा बाबा फार अस्वस्थ झाले. गोवधाच्या अफवांवरून गेल्या दोन वर्षांत उत्तरप्रदेशात दंगली व खून झाल्याचे वाचून बाबांना फार दुख झाले असते. १९७६ मध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबईतील सर्व संपादकांना गोवधबंदीवर चर्चा करण्यासाठी बोलाविले होते. जवळजवळ सर्वाचा विनोबांना पाठिंबा होता. बाबा चव्हाणांना म्हणाले, ‘‘विनोबांनी संन्यास घेतला आहे, तुम्ही राज्यकत्रे आहात; मोठे युद्ध सुरू झाले तर वांगी, बटाटे पाठवून सनिकांना पोषक अन्न मिळणार नाही, कोंबडी आणि मटण पुरणार नाही. दोन्ही महायुद्धांच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा असल्यामुळे वेगवेगळ्या देशांच्या सरकारांना सनिकांना घोडय़ाचे मांस देण्याची वेळ आली होती. म.म. काणे व डॉ.आंबेडकरांनी सांगितले होते, की वैदिक काळात गाईचे मांस ते कोवळे असल्यामुळेच हिंदू खात होते. लग्नात गाईचे मांस खाण्याआधी म्हणण्याचा संस्कृत श्लोक लक्ष्मणशास्त्रीजी मला अनेक वेळा म्हणून दाखवितात.़’’ बाबांचे बोलणे ऐकून शंकररावांना आश्चर्य वाटले. मग शंकररावांनी जो गोवधबंदी कायदा केला त्यातून भाकड गाई वगळल्या. विनोबांनी उपोषण सोडल्यामुळे देशभर गोवधबंदी झाली नाही. नंतर जनता दलाचे राज्य असता विनोबांनी परत गोवधबंदीसाठी उपोषण केले. बाबांनी ‘दुराग्रही उपोषण’, ‘गाईचे अर्थशास्त्र’ व ‘रा.स्व. संघाचा विजय’, असे अग्रलेख एप्रिल १९७९ मध्ये लिहिले होते. ते ‘अग्रलेख ’ या पुस्तकात आहेत. १ जून २०१५ ला ‘आउटलुक’मध्ये याच विषयावर लेख लिहिला होता. कन्हय्या कुमार यांच्यावर खटला भरणार असल्याची बातमी काही महिन्यांपूर्वी वाचली, तेव्हा बाबांचा ‘कन्हय्या कुमारची भुरळ’ हा छोटासा लेख आठवला.

नेहरूंना वगळून फक्त सुभाषबाबूंचा व भगतसिंगांचा जे उल्लेख करतात, त्यांनी बाबांचा २८ ऑक्टोबर २०१६ च्या ‘साधना’मधील ‘भगतसिंग, बोस, नेहरू’ हा लेख वाचावा. त्यात भगतसिंगांचे बोस व नेहरू यांच्याबद्दलचे विचार दिले आहेत. बाबांनी ‘मौज’ २०१५ च्या दिवाळी अंकात ‘सुभाषचंद्रांचा काव्यशास्त्रविनोद’ हा लेख लिहिल्यावर संजय भागवत यांना लिहिले होते, की हा लेख जितक्या भारतीय भाषांतून येईल तितके चांगले, आपल्या एका नेत्याचे असे स्वरूप अपवादात्मक आहे. सुभाषबाबूंचे निधन विमान अपघातात झाले हे २०१५ मध्ये जपान, इंग्लंड व रशियाकडून मिळविलेले पुरावे देऊन सिद्ध करणारे बाबा पहिले आहेत. त्याबद्दलचे लेख बाबांनी ‘ट्रिब्यून’ व ‘महराष्ट्र टाइम्स’मध्ये लिहिल्यावर ते पुरावे सुभाषबाबूंचे भाचे आशीष रे यांना दिले. अनेक वर्षांत लोकांना जमले नाही, ते बाबांनी सहा महिन्यांत केले.

आम्ही बॉस्टनच्या ब्रुकलाइन भागात बीकन स्ट्रीटवर राहात होतो. समोरच कुलीज कॉर्नरजवळ ‘बार्न्‍स अँड नोबल’ हे पुस्तकांचे दुकान होते. बाबा तेथे रोज जायचे. कधी कधी तेथील पदपथावरच्या बाकावर पुस्तक वाचीत बसायचे. तेथून जवळच हार्वर्ड स्ट्रीटवर अध्यक्ष केनेडी ज्या घरात जन्मले, ते घर आहे. आम्ही ते बघितले. बाबांना चार्ल्स नदी आवडायची. ती नदी पार केली की हार्वर्डचा परिसर लागतो. तो बाबांना आवडायचा.

जॉन हे (ऌं८) लिंकन यांचे खाजगी सचिव होते. ऱ्होड आयलंडमधील ब्राउन विद्यापीठातील ग्रंथालयाच्या आवारात फिरताना बाबांना ‘जॉन हे ग्रंथालया’ची इमारत लागली. बाबा लगेच आत गेले. ग्रंथपालाला त्यांनी आपण कोण हे सांगितले. ग्रंथपालाने आम्हाला ग्रंथालयाची माहिती दिली व अनेक जुनी पुस्तके उघडून दाखविली. काही अतिशय दुर्मीळ पुस्तकांना कोणाला हात लावून दिला जात नाही, पण बाबांना त्या ग्रंथपालाने हात लावू दिला. एकाच ठिकाणी शेक्सपिअरचे फोलिओ, नेपोलिअन व लिंकन यांच्या संबंधी जुने दस्तऐवज बघायला मिळाल्याने बाबांना आनंद झाला. अमेरिकेतील व एकंदरीत पाश्चात्त्य देशांतील लोकांची विद्वानांचा आदर ठेवण्याची, त्यांच्या वस्तू, पुस्तके व लिखाण जपून ठेवण्याची वृत्ती, ग्रंथांबद्दलचे प्रेम यांचे बाबांना फार कौतुक वाटायचे. बाबा म्हणायचे, ‘‘येथे श्रीमंत लोक विद्वान लोकांची पुस्तके व त्यांच्या वस्तू वगरे खूप पैसे देऊन विकत घेतात व ग्रंथालयांना भेट म्हणून देतात. अनेक ग्रंथालयेसुद्धा खूप पैसे देऊन असा अमूल्य ठेवा विकत घेतात, त्या विद्वानांबद्दलची कागदपत्रेही जपून ठेवतात, त्यांची अतिशय काटेकोर नोंद करून ठेवतात, त्यांची पूर्ण माहिती करून घेतात व अतिशय अभिमानाने वर्षांनुवर्षे लोकांना दाखवितात. याला खरी संस्कृती म्हणतात.’’ ज्ञानाचे विस्तीर्ण क्षेत्र असून त्यात अमेरिका आघाडीवर आहे आणि त्या समाजाचे ते सामर्थ्य आहे, असे बाबांनी ‘बहर ’मधील लेखात लिहिले आहे.

बाबांचे वाचन, लेखन आणि ग्रंथखरेदी समृद्धवेगाने होत. त्यामुळे आमच्या मुंबईच्या घरात हजारो पुस्तके होती, हजारो त्यांनी वाचली होती, काही चाळली होती. काही ग्रंथालयांना दान केली. येथे अमेरिकेतही बाबांचा ग्रंथसंग्रह हजारावर आहे. नुसती शोभेसाठी ठेवायला बाबांनी कधीही पुस्तके घेतली नव्हती. पाच हजार पुस्तके बाबा निवृत्त झाल्यावर मुंबईहून नाशिकला आमच्या घरात नेऊन ठेवली.

२२ जुलै २०१७ रोजी बाबांच्या प्रथम जयंतीला त्यांच्या नावाने एका स्वतंत्र दालनाचे उद्घाटन करून बाबांचे अमूल्य ग्रंथभांडार पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत ठेवण्यात आले. आईबाबांनी भांडारकर संस्थेला प्राचीन पुस्तके डिजिटाइज करण्यासाठी दहा लाख रुपये दिले; ‘साधना’ला बाबांचे लेख व पुस्तके यांचे मानधन म्हणजे पाच लाख रुपये दिले.

टीका वा आंदोलन करताना साध्यसाधनविवेकाचे भान ठेवणे आवश्यक आहे, अशी बाबांची धारणा होती. टीका करताना त्यांनी पर्यायी उपायही सुचविले, सर्वपक्षसमभाव दाखवला, तसेच सर्वजातिधर्मसमभावही. कुठल्याही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नसावी, यावर त्यांचा कटाक्ष होता. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी बाबांचे चांगले संबंध होते. परंतु बाबा कोणत्याच पक्षाचे नव्हते. विविध पक्षांचे लोक आमच्या घरी बाबांशी चर्चा करायला, सल्ला घ्यायला यायचे. अडचणीत अनेकांनी बाबांची मदत घेतली. काही साहित्यिकांनी बाबांच्या वशिल्याने पद्मपुरस्कार मिळवला. तथापि बाबांनी स्वतसाठी कधीही काही मागितले नाही.

‘तळवलकरांच्या विचारधनावर महाराष्ट्रातील तीन पिढय़ांचे पोषण झाले आहे’, असे ‘मराठी वाङ्मयकोशां’त म्हटले आहे. भारताच्या स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्षे होतील. त्यातील बाबांचे कार्य बहुमोल आहे. बाबा गेल्यावर पत्रकार साईनाथ यांनी आम्हाला लिहिले, की ‘बाबांच्या स्मृत्यर्थ काही तरी (संस्था, शिष्यवृत्ती, भाषणे इत्यादी) कायम स्वरूपाचे करणे सर्वाचे कर्तव्य आहे आणि ‘टाइम्स’ने व इतरांनी यात पुढाकार घेतला पाहिजे’.

माडगूळकरकाका बाबांना ज्ञानमूर्ती व ज्ञानगुणसागर म्हणायचे. बाबांचा स्मृतिदिन हा ‘ज्ञानमूर्ती दिन’ म्हणून आम्ही मानतो, असे वाचकांनी आम्हाला लिहिले.

stalwalkar@hotmail.com

chaturang@expressindia.com

First Published on March 16, 2019 1:13 am

Web Title: abhalmaya article on govindrao talwalkar