हमीद दाभोलकर

साधारणपणे पाचवीसहावीत असताना एकदा मी बाबांना चिडून म्हणालो होतो की, ‘‘मी तुमचा मुलगा होण्यापेक्षा कार्यकर्ता झालो असतो तर अधिक बरे झाले असते म्हणजे तुम्ही माझ्यावर जरा जास्त प्रेम केले असते.’’ आज मागे वळून बघताना मला असे वाटते की माझ्या कार्यकर्ता बनण्यामागच्या बाकीच्या प्रेरणांइतकीच हीदेखील एक महत्त्वाची प्रेरणा असेल. त्यांच्या ध्येयाप्रति असलेले त्यांचे समर्पण इतके नैसर्गिक आणि संपूर्ण होते की त्यांचे काम आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व वेगळे करणे अशक्य होते. बाबांचे मोठेपण असे की माझ्या आणि मुक्ताबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांचे वैचारिक पालकत्व केले. आमच्यावर अशी ‘विचारमाया’ केली म्हणून त्यांच्या जाण्याचे शल्य लोकांना अजूनही बोचते.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
swapnil joshi reaction on campaign for political party
राजकीय पक्षांचा प्रचार करणार का? स्वप्नील जोशीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “पैसे घेऊन विशिष्ट…”
loksatta editorial income tax issue notice to congress
अग्रलेख: धनराशी जाता मूढापाशी..
devendra fadnavis
उद्धव ठाकरेंनी एक वाक्य तरी विकासावर बोलावे!

काही दिवसांपूर्वी मी जेव्हा ‘‘आभाळमाया’ या सदरात बाबांविषयी लेख लिहिण्यासाठी मला विचारले आहे,’’ असे मी आईला सांगितले तेव्हा तिची प्रतिक्रिया होती, ‘‘चांगला शब्द आहे की हा ‘आभाळमाया’! बाबांनी तुझ्यावर आणि मुक्तावर केलेल्या प्रेमाला चपखल बसणारा!’’ तिचे म्हणणे ऐकून मी अंतर्मुख झालो.. आभाळमायेमध्ये अभिप्रेत असलेले सव्र्यव्यापी आणि अखंड प्रेम या अंगाने विचार केला तर आईचे म्हणणे खरेच होते. पण दुसऱ्या बाजूने आभाळमायेमध्ये एक दुरस्थपणा आहे. आभाळ आपल्याबरोबर असते पण आपल्याला त्याला स्पर्श करता येत नाही आणि त्यालाही आपल्याला जवळ घेता येत नाही. ही माया असते आणि ती आपल्याला समजून घ्यायला लागते. माझ्यामुक्ताच्या आणि बाबांच्या नात्याचे असेच काहीसे होते. मानसशास्त्रात ‘अब्सेंट फादर’ (अनुपलब्ध बाप) नावाची एक संकल्पना आहे. वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मुलांना सातत्याने अनुपलब्ध असणाऱ्या पित्याला ‘अब्सेंट फादर’ म्हटले जाते. बाबांच्या पालकत्वाचे वर्णन करायचे असेल तर ते ‘अब्सेंट फादर’ या शब्दांनी करता येईल. हा सगळा प्रवास कसा घडला ते सांगायची सुरुवात माझ्या लहानपणापासून करतो.

सुरुवात माझ्या नावापासून होते. आज मी चाळीस वर्षांचा झालो तरी तुमचे नाव ‘हमीद’ कसे? हा प्रश्न विचारणारी एक तरी व्यक्ती मला प्रत्येक आठवडय़ात भेटते. ‘नावावरून माणसाचा धर्म ओळखला जाऊ नये’ याबरोबरच ‘मुस्लीम सत्यशोधक समाज’चे संस्थापक हमीद दलवाई यांची स्मृती म्हणून’ बाबांनी माझे नाव हमीद ठेवले. तुम्ही जर धर्मचिकित्सेच्या क्षेत्रात कार्यरत असाल तर असे नाव ठेवायला मोठी निर्भयता लागते. चाळीस वर्षांपूर्वी हे धाडस बाबांनी दाखवले. तुला या नावाचा त्रास झाला का? असा प्रश्न विचारणारे देखील अनेक लोक मला भेटतात. खरे सांगायचे झाले तर त्रास तर अजिबात नाही पण उलट या नावाचा अभिमान मात्र मला नक्कीच वाटतो. गमतीने काही वेळा मी असे देखील म्हणतो की, ‘‘माझ्या नावाच्या मागचा भावार्थ म्हणजेच ‘हमीद दलवाई’ आणि ‘नरेंद्र दाभोलकर’ हे धर्मचिकित्सा आणि मानवतावाद याविषयी काय म्हणू इच्छित होते? हे जर आपल्या देश बांधवांनी समजून घेतले तर आजचा आपल्या देशातील सर्वात अवघड आणि महत्त्वाचा ‘हिंदूमुस्लीम’ प्रश्न सुटू शकेल!’’ तर हे झाले नावाचे.

माझा जन्म झाला आणि बाबांनी दवाखाना बंद केला आणि पूर्णवेळ सामाजिक काम करायचे ठरवले. तेव्हापासून त्यांची जी फिरती चालू झाली ती शेवटच्या श्वासापर्यंत! महिन्यातील २० ते २२ दिवस ते बाहेर असत. स्वाभाविक आहे की वाढदिवस, घरातील महत्त्वाचे प्रसंग, शाळेच्या परीक्षा अशा बहुतांश वेळा ते आमच्या आजूबाजूला नसत. माझ्या लहानपणीची त्याविषयीची आठवण आहे. साधारणपणे पाचवीसहावीत असताना एकदा मी त्यांना चिडून म्हणालो होतो की, ‘‘मी तुमचा मुलगा होण्यापेक्षा कार्यकर्ता झालो असतो तर अधिक बरे झाले असते म्हणजे तुम्ही माझ्यावर जरा जास्त प्रेम केले असते.’’ आज मागे वळून बघताना मला असे वाटते की माझ्या कार्यकर्ता बनण्यामागच्या बाकीच्या प्रेरणांइतकीच हीदेखील एक महत्त्वाची प्रेरणा असेल. त्यांच्या ध्येयाप्रति असलेले त्यांचे समर्पण इतके नैसर्गिक आणि संपूर्ण होते की त्यांचे काम आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व वेगळे करणे अशक्य होते. त्यामुळे त्यांच्याशी अर्थपूर्ण नाते टिकवायचा रस्ता हा त्यांच्यातील कार्यकर्त्यांला टाळून पुढे जाऊच शकत नव्हता असे मला वाटते.

आज मनोविकारतज्ज्ञ म्हणून आमच्या नात्याकडे दुरस्थपणे बघताना मला हे जाणवते पण प्रत्यक्षात मात्र ते फार विचारपूर्वक झाले असे नाही. ते घडण्याची दोन प्रमुख करणे मला दिसतात. पहिले म्हणजे माझी आई आणि बाकीचे सारे कुटुंब यांना बाबांच्या कामाविषयी अगदी सुरुवातीपासून (जेव्हा त्यांना आजच्यासारखी मान्यता मिळाली नव्हती तेव्हापासून) अत्यंत आस्था आणि सार्थ अभिमान होता. बाबा आपल्या वाटय़ाला येत नाहीत याचे कारण ते आपल्या सगळ्यांच्या हितासाठी त्याहीपेक्षा महत्त्वाचे काही करीत आहेत हीच भावना व्यक्त आणि अव्यक्त पातळीवर आमच्यापर्यंत पोहचत राहिली. हा कुटुंबाचा आधार हा आमच्या आणि बाबांच्या नात्यातील एक खूप मोठा अदृश्य पाठीराखा होता. याबरोबर दुसरे महत्त्वाचे कारण होते बाबांनी त्यांच्या कामाच्या पाठीशी उभा केलेला एक जीवनदृष्टी देणारा विवेकवादाचा विचार. जसे मला समजू लागले आणि मी विचार करू लागलो तसे ती जीवनदृष्टी मला पटू लागली. बाबांनी त्यांचे ‘विचार तर कराल’ हे पुस्तक मला आणि मुक्ताला अर्पण केले आहे. त्याच्या अर्पणपत्रिकेत ते म्हणतात, ‘विवेकाचा वसा निर्धारपूर्वक चालवण्यासाठी..’ यामधील विवेक, वसा आणि निर्धार हे तीनही शब्द मला खूप महत्त्वाचे वाटतात. भले मी डॉक्टर दाभोलकरांचा मुलगा नसतो तरी या तीन शब्दांनी जीवनदृष्टी देणारे म्हणून ते माझे हिरो झालेच असते असे आज मला वाटते.

कामाकडे वळण्याआधी दोन छोटय़ा आठवणी सांगतो. पहिली खेळाशी संबंधित आहे. ते स्वत: कबड्डीचे उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू होते. त्यांच्या कबड्डीची, खासकरून ‘हनुमानउडीची’ आठवण सांगणारी माणसे अजून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मला भेटतात. समोरून पकड करण्यास कोणी आल्यास ते त्यांच्या पायात स्प्रिंग असल्यासारखी उडी मारत. एका जागेवर उभ्या उभ्या सहा फुटांपर्यंत ती उडी जायची. आमच्या घराच्या हॉलमध्ये आम्ही कबड्डी खेळायचो आणि काही वेळा मला ते ती उडी मारून दाखवायचे. त्या आठवणीने अजूनदेखील मला रोमांचित व्हायला होते. गेल्या पाच वर्षांत मला वेगवेगळ्या ठिकाणी अशी पाचसहा माणसे भेटली आहेत जी स्वतंत्रपणे मला असे म्हणाली की, ‘‘नरुभाऊचे (कबड्डीतील लोक त्यांना या नावाने ओळखायचे) मारेकरी मागून आले म्हणून, ते जर समोरून आले असते तर नरुभाऊनी नक्की हनुमानउडी मारली असती.’’ बाबांचा खून झाला त्याच वर्षी प्रोकबड्डीची स्पर्धा चालू झाली आणि कबड्डीला परत चांगले दिवस आले. माझा मुलगा अरिन आणि मुक्ताचा मुलगा असीम दोघेही कबड्डीचे फॅन आहेत आणि एकत्र असले की घरात जिथे जागा मिळेल तिथे ते कबड्डी खेळत असतात. तेव्हा आम्हाला बाबांची खूपच आठवण येते. ते असते तर हमखास अरिनअसीमबरोबर कबड्डी खेळले असते आणि हौसेने त्यांना प्रोकबड्डी बघायलाही घेऊन गेले असते असे राहून राहून वाटत राहते.

दुसरी चित्रपटासंबधित आहे. मी मेडिकलच्या दुसऱ्या वर्षांला असताना माझ्या पहिल्या पेपरच्या आधी ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तोपर्यंत मी मुग्धाच्या प्रेमात पडलेलो असल्याने काही केल्या मला पहिल्या दिवशी चित्रपट बघायचा होता. चुकून त्या दिवशी बाबा घरी होते आणि चित्रपटाला चाललो आहे हे कळल्यावर पहिल्यांदाच ते मला म्हणाले की, ‘‘उद्या पेपर असताना चित्रपटाला जायची काही गरज नाही.’’ सहसा ते असा थेट सल्ला कधी देत नसत. मुलांना स्वतंत्र विचार करायला शिकवले की काय परिणाम होतात त्याची चव मी त्या दिवशी त्यांना चाखायला दिली आणि ‘मी सिनेमाला जाण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे आणि तो मी आता बदलणार नाही’ असे बाणेदार उत्तर दिले होते. त्यावर त्यांनी क्षणभर विचार केला, मग हसले आणि ‘बरं, आल्यावर तरी अभ्यास कर’ असे म्हणून त्यांनी तो विषय संपवला.

निळू फुले आणि श्रीराम लागू हे प्रख्यात नट सामाजिक कामात त्यांचे ज्येष्ठ सहकारी राहिले. पण त्यांची चित्रपटांची आवड एकदम रांगडी म्हणावी अशी होती. त्यांना त्याच्या विचारांपेक्षा एकदम वेगळेच असलेले ब्रूस लीचे किंवा अशोक सराफ, दादा कोंडके यांचे चित्रपट आवडत. पण त्यांची कामाप्रति बांधिलकी इतकी तीव्र होती की खेळ, चित्रपट, नाटक, कौटुंबिक सहली अशा विरंगुळ्याच्या गोष्टींवर त्यांनी पूर्ण काट मारून टाकली होती. कामासाठी जाणीवपूर्वक आपल्या व्यक्तिमत्त्वाचे त्यांनी बराकीकरण केले होते. आज मागे वळून बघताना मला वाटते की त्यांनी हे टाळायला हवे होते. पुढे मी मनोविकारतज्ज्ञ झाल्यावर ते मला ‘अमुक बाबतीत मानसशास्त्र काय म्हणते’ असे म्हणून मत विचारत. त्याचा गैरफायदा घेऊन याविषयी त्यांना मी सल्ले देत असे. बाबांच्या खुनाच्या साधारण एकदोन महिने आधीची गोष्ट असेल. ते आणि मी पुण्याला सोबत जात असताना त्यांनी डॉ. लागूंना एका कार्यक्रमासाठी फोन केला. डॉक्टर लागू त्यांना म्हणाले, ‘‘काय रे नरेंद्र, तू केवळ कामाचाच विचार करत असतोस का? कधी तरी नुसता गप्पा मारायला पण फोन करत जा की!’’ तो धागा पकडून मी त्यांना भरपूर लेक्चर दिले. ते शांतचित्ताने ऐकून घेऊन ते मला म्हणाले, ‘‘बरोबर आहे तू म्हणतोस ते. मी प्रयत्न करीन..’’ त्याचं एक चांगले होते की त्यांना एखादी गोष्ट पटली की ती पटकन अमलात आणायचे. पण २० ऑगस्ट २०१३ ने ती संधी त्यांच्याकडून कायमची हिरावून नेली. स्वत:च्या व्यायामाच्याविषयी ते टोकाचे काटेकोर होते म्हणजे प्रवासात रेल्वेच्या बर्थवर देखील ते योगासने करत असत. याच काटेकोरपणामुळे त्यांचा घात झाला. विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मॉर्निग वॉकला जाताना त्यांचा खून करण्यात आला.

त्या घटनेनंतरचे बाबांचे आणि माझे नाते ही एक पूर्ण वेगळीच गोष्ट आहे. आज त्यांच्या खुनाला पाच वर्षे उलटून गेली. गेल्या पाच वर्षांत असा एकही दिवस गेला नसेल की बाबांचा विचार किंवा त्यांचे काम माझ्याबरोबर नाही.

ग्रेट भेट’साठी, निखिल वागळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांच्या जिवाला असलेल्या संभाव्य धोक्याविषयी बोलताना बाबा म्हणाले होते की, ‘‘समजा मला चुकून काही झालेच तर मला याची पूर्ण खात्री आहे की त्यामधून माझी चळवळ दुप्पट जोमाने वाढेल’’, आज त्यांचे म्हणणे शब्दश: खरे झाले आहे.

आज बाबांनी चालू केलेली तीनही महत्त्वाची कामे दुप्पट निर्धाराने चालू आहेत. सीबीआयने जे आरोपपत्र पुणे कोर्टात दाखल केले आहे ते आरोपपत्र पुराव्यांसकट असे म्हणते की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून हा त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला विरोध म्हणून करण्यात आला. ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आज थांबलेले नाही, संपलेले नाही. उलट दुप्पट जोमाने चालू आहे. महाराष्ट्र अंनिसने गेल्या पाच वर्षांत ‘जादूटोणाविरोधी कायदा’ आणि ‘सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा’ हे दोन महत्त्वाचे सामाजिक कायदे शासनाकडून मान्य करून घेतले. जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गेल्या पाच वर्षांत पाचशेपेक्षा अधिक सर्वधर्मीय भोंदूबाबा, बुवा, अम्मा गजाआड गेल्या आहेत. केवळ परराज्यातून नव्हे तर परदेशातून अंनिसच्या कामाला मागणी वाढत आहे. ‘अमेझॉन’ने बाबांचे पहिले इंग्लिश पुस्तक ‘द केस फॉर रीझन’ बाजारात आणले. ते ‘अमेझॉन बेस्ट सेलर’च्या यादीत आहे. महाराष्ट्र अंनिसचे ‘पर्यावरणपूरक गणपती’ आणि ‘फटाकेमुक्त दिवाळी’ हे उपक्रम आज राज्य शासनाचे अधिकृत उपक्रम झाले आहेत. अशा अजूनही खूप गोष्टी सांगता येतील. ‘साधना’ साप्ताहिकाचे अंक त्याच दर्जाने अविरत निघत आहेत. ‘बालकुमार साधना’ची दर वर्षी सरासरी तीन लाख विक्री होते. यांच्या तुलनेत लोकांना कमी माहीत असेलेले ‘परिवर्तन’ या डॉ. दाभोलकरांनी व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रात काम करण्यासाठी चालू केलेल्या संस्थेच्या कामाची राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे.

अनेक सामाजिक चळवळी त्या नेत्याच्या हयातीत निष्प्रभ झाल्याचे बघणे त्यांच्या वाटय़ाला येते किंवा करिश्मा असलेल्या नेत्याच्या पश्चात त्यांची कामे थंडावतात. बाबांच्या बाबतीत हे झाले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक संघटनेमध्ये त्यांनी कामाची सक्षम फळी उभी केली होती आणि आपल्या हयातीतच त्यांना नेतृत्वाची संधी दिली होती. हा त्यांचा गुण मला वैयक्तिक पातळीवर फारच महत्त्वाचा आणि अनुकरणीय वाटतो. गेल्या पाच वर्षांतील आमचे आयुष्य अत्यंत ताणाचे आणि अनिश्चिततेने भरलेले राहिले आहे. माझ्यासाठी एखाद्या गोष्टीविषयी मनात दुविधा निर्माण झाली तर ‘बाबा’ या प्रसंगी कसे वागले असते हा एक महत्त्वाचा निकष मी त्या प्रसंगांना उत्तर शोधताना लावत आलो आहे. त्याचा मला आणि कामांना खूपच फायदा झाला आहे असे मला वाटते.

मी साधारण २००५ च्या सुमारास ‘विवेकवाहिनी’चे काम करायला सुरुवात केली. त्या निमित्ताने मी बाबांबरोबर महाराष्ट्रभर फिरलो. त्या कालखंडात त्यांचे ‘कार्यकर्ता’ म्हणून जवळून निरीक्षण करण्याची मला संधी मिळाली. त्याचा मला खूप फायदा झाला. शासन यंत्रणेने त्यांच्या खुनाच्या तपासात टोकाचा गलथानपणा केला. त्यामधून पुढे कॉम्रेड पानसरे, प्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश यांना जीव गमवावे लागले. तरीदेखील आम्ही आमची लढाई ही कायदेशीर मार्गानेच लढली. कितीही राग आला, उचकवले गेले, टीका झाली, खोटे आरोप झाले, त्रास देण्यासाठी खोटय़ा केसेस घालण्यात आल्या, तरी आम्ही आमची लढाई संविधानिक मार्गानेच चालू ठेवली. यामागे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा विचार होता. त्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याच्या लढाईमधून संघटनेला सनदशीर मार्गाने सातत्यपूर्ण लढाई करण्याचे दिलेले प्रशिक्षण होते. इथे एक गोष्ट मुद्दाम नमूद करायला हवी ती अशी की, जरी इथे मी हा लेख त्यांचा मुलगा म्हणून लिहीत असलो तरी अशी लढाई कधीच एकटय़ाने लढली जात नाही. ‘लढे अंधश्रद्धेचे’ या पुस्तकात बाबाच म्हणाले आहेत, ‘कुठलाही लढा हा संघटनेच्या सामुदायिक इच्छाशक्तीचे प्रतीक असतो आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या जिवापाड मेहनतीतून उभा राहात असतो.’ तसेच या लढाईचे देखील आहे. अंनिस, साधना, परिवर्तनचे शेकडो कार्यकत्रे, हितचिंतक, न्यायलयीन लढाईमध्ये आमची साथ देणारे वकील अभय नेवगी यांच्यासारखे लोक यांच्या बरोबरीने ही लढाई उभी राहिली. बाबांचे मोठेपण असे की माझ्या आणि मुक्ताच्याबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांचे वैचारिक पालकत्व केले. महाराष्ट्रात अंनिसचे अनेक कार्यकत्रे आहेत ज्यांनी स्वत: हे मला सांगितले आहे की, ‘‘आमचे स्वत:चे पालक गेल्यावर जेवढे दु:ख आम्हाला झाले त्यापेक्षा कितीतरी अधिक दु:ख आम्हाला डॉ. दाभोलकरांच्या खुनाने झाले.’’ यामागचे मला उमजलेले कारण असे की, आपण माया फक्त भावनिक असते असे धरून चालतो. एखाद्या वेळी थोडी भावनिकता कमी पडली तरी चालेल पण योग्य विचार करायला शिकवणे हा माया करण्याचा उन्नत मार्ग आपण समजूनच घेत नाही. बाबांनी सांगितलेला विचार तसा अगदी साधा आहे आणि तेच म्हणत असत की त्यामध्ये फार नवीन असे देखील काही नाही पण स्वत:च्या इच्छेने आयुष्य जगू पाहणाऱ्या कुठल्याही माणसाला तो एक भक्कम आधार देतो. त्यांचे एवढेच साधे सांगणे होते की, ‘प्रत्येक माणसाला प्राण्यांपेक्षा वेगळी अशी विचार करण्याची क्षमता असते आणि त्या क्षमतेचा वापर करून तो आपल्या आयुष्यातील प्रश्न सोडवू शकतो. त्यासाठी इतर कुठल्याही बा आधाराची गरज नाही.’ बाबांनी माझ्यावर, मुक्तावर आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांवर अशी ‘विचारमाया’ केली म्हणून त्यांच्या जाण्याचे शल्य लोकांना अजून बोचते.

त्यांना महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचे मोठे आकर्षण होते. वर वर पाहता स्वत:ला ‘सनातनी हिंदू’ म्हणवून घेणारे गांधी, विज्ञानाची भूमिका, विवेकवाद या गोष्टी सांगणाऱ्या दाभोलकरांना कसे भावतात, असा प्रश्न सहज पडू शकतो. पण सत्याचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हे जसे गांधींच्या जीवनाचे ध्येय होते तसेच ते विज्ञानाचे देखील ध्येय असते हे ध्यानात घेतले की आपल्याला बाबांचे गांधींविषयीचे आकर्षण समजू शकते. त्यांच्या स्वभावात एक स्वत:ला उधळून टाकण्याची उर्मी होती आणि त्यांना आत खोलवर कुठे तरी दिव्यत्वाची ओढ होती असे आज मला मागे वळून पाहताना जाणवत राहते. या पार्श्वभूमीवर त्यांना मृत्यूदेखील त्यांच्या हिरोसारखाच यावा हा अपघात वाटत नाही.

बाबांच्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे अनेक मानसन्मान माझ्या आणि मुक्ताच्या वाटय़ाला येतात. लोकांचे खूप प्रेम आणि आदर मिळतो. मन घट्ट करून आम्ही तो स्वीकारतो आणि त्यांना आवडते काम अधिक जोमदार व्हावे यासाठी तो वापरण्याचा प्रयत्न करतो. पण हे आपले कर्तृत्व नाही याची नम्र जाणीव मनामध्ये कायम राहते. हे त्यांचे श्रेय त्यांना अनुभवायला मिळायला हवे होते हे राहून राहून वाटत राहते. बाबा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देताना शेवटी कायम त्यांच्याकडून म्हणून घेत असत ‘उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही.’ याच भावनेने ही ‘विचारमाया’ सोबत घेऊन आम्ही चालत आहोत.

hamid.dabholkar@gmail.com

chaturang@expressindia.com