आलापिनी मोडक – ढेकणे

‘‘ज्या गाण्यासाठी अंजली मराठे यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्या ‘भुई भेगाळली खोल’ या अप्रतिम गाण्याचे संगीतकार, ७ वेळा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, ३ वेळा फिल्म- फेअर पुरस्कार, अल्फा गौरव, चत्रबन, ग. दि. माडगूळकर पुरस्कार आणि अशा असंख्य पुरस्कारांनी ते गौरविले गेले परंतु या सगळ्यापेक्षा त्यांना स्वतची ‘प्रयोगशील संगीतकार’ हीच ओळख अत्यंत प्रिय होती,’’ सांगताहेत  आलापिनी मोडक-ढेकणे पिता सुप्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक यांच्याविषयी.

Swargandharva Sudhir Phadke musical biopic trailer launch
राम जन्मला गं सखी…; बाबुजींच्या भावसंगीताचा रंजक प्रवास, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
laxmikant berde son abhinay berde
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण! पहिल्या नाटकाबद्दल अभिनय म्हणाला, “आज आईबाबांच्या आशीर्वादाने…”
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

बाबांचे (आनंद मोडक) लहानपण अकोल्यात गेले, आमचे आजोबा पुढारलेल्या स्वभावाचे होते, असे बाबा कायम सांगत, कारण लग्नानंतर देखील त्यांनी आजीला शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले. लहानपणी आम्हीही आजीकडून बाबांच्या लहानपणीचे बरेच किस्से ऐकले आहेत. त्यातला एक किस्सा आठवतोय, बाबांच्या लहानपणी ऐपत नसतानादेखील आजीने त्यांना तबल्याच्या क्लासला पाठविले होते, कारण बाबा घरी मिळेल ती वस्तू मग ते ताट असेल किंवा डबा त्यावर ठेका धरत असत. एक वर्ष हा क्लास केल्यानंतर त्यांचा शाळेत येणारा पहिला क्रमांक तिसऱ्यावर गेल्यामुळे त्यांचा क्लास आजीने बंद केला.

गाण्याचे संस्कार त्यांच्यावर अकोल्यातच झाले, असे म्हणावे लागेल. अकोल्यात शकुंतलाताई पळसोकर यांच्याकडे बाबांनी गाण्याचे प्राथमिक धडे गिरवले, लहानपणापासूनच गाणे हाच श्वास असणाऱ्या बाबांचा तबल्याचा क्लास सुटल्यानंतरचा पहिला गुरू म्हणजे रेडिओ. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने त्या काळी विविध भारतीपासून रेडिओ सिलोनपर्यंत विविध प्रकारच्या रेडिओ स्टेशन्सवर बाबा प्रचंड गाणी ऐकत असत. रेडिओवर विविध प्रांतांचे लोकसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, चित्रपट संगीत ऐकत ऐकतच ते मोठे झाले. संगीत हेच आयुष्य असल्याने प्रत्येक गाण्याचे शब्द, त्यातील स्वर, दोन कडव्यांमधील मध्ये वाजणारे संगीत त्यांना जवळपास पाठ होतं. आम्हाला लहानपणीच्या आठवणी सांगताना बाबा नेहमी ‘रिगल टॉकीज’ला लागलेला जवळपास प्रत्येक चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्याचे सांगत. कितीतरी चित्रपटांची तर त्यांनी केवळ गाणी ऐकण्यासाठी कित्येकदा पारायणे केली होती. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. स.प. महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय इथे शिकता शिकता ते ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ (पिडीए) या संस्थेत सहभागी झाले. खरेतर त्यांना गायक होण्याची खूप इच्छा होती, परंतु वयानुसार आवाज बदलल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. या संस्थेतील कलाकारांनी (ज्यात सतीश आळेकर, रवींद्र साठे, मोहन आगाशे होते) नंतर ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ ही अत्यंत नावाजलेली संस्था स्थापन केली. त्या वेळी संस्थेने विजय तेंडुलकर यांचे अजरामर नाटक ‘घाशीराम कोतवाल’ बसवले होते आणि या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर बाबांचे सर्वप्रथम पदार्पण झाले. ‘घाशिराम’चे संगीतकार होते भास्कर चंदावरकर. साहाय्यक म्हणून काम करता करता त्यांच्याकडून बाबांनी त्या वेळी संगीतकार म्हणून लागणारे गुण आत्मसात केले. नंतर १९७४ मध्ये सतीश आळेकर यांनी त्यांच्या अजरामर ‘महानिर्वाण’ या नाटकाची जबाबदारी बाबांवर सोपवली. ज्याचे बाबांनी शब्दश सोने केले, ‘महानिर्वाण’ हे नाटक आणि त्याचे संगीत प्रचंड गाजले. बाबांना शेवटपर्यंत आपण ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ या संस्थेच्या संस्थापकांपैकी एक आहोत, याचा अत्यंत अभिमान होता.

त्यानंतर त्यांनी ‘बेगम बर्वे’, ‘महापूर’, ‘तीन पशांचा तमाशा’ आणि इतर बऱ्याच नाटकांना संगीत दिले. १९७५ मध्ये त्यांना

‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये नोकरी मिळाली. ती करतानाही बाबांचा संगीतप्रवासदेखील जोमाने सुरू होता. काही काळानंतर बऱ्यापैकी चित्रपट मिळायला लागल्यावर सकाळी बँक, संध्याकाळी रेकॉìडग आणि रात्री आमच्या पुण्यातील तीन

खोल्यांच्या घरामध्ये स्वयंपाकघर आणि बाथरूम यांच्या मधल्या जागेत बसून गाण्यांना चाली लावणे असा त्यांचा दिनक्रम असायचा. त्या वेळी आमच्या घरी चित्रपटसृष्टीतील अनेक जण नेहमी येत. रवींद्र साठे , विजय कुवळेकर, सुधीर मोघे, स्मिता तळवलकर, सुनील सुकथनकर, सुमित्रा भावे, जब्बार पटेल, चंद्रकांत काळे, माधुरी पुरंदरे  आणि इतर बऱ्याच जणांचा यात समावेश होता.

सुरुवातीच्या काळात अत्यंत चांगले संगीत निर्माण करूनदेखील बाबांना पहिला चित्रपट १९७९ ला  त्यांच्या लग्नानंतर मिळाला. नचिकेत आणि जयू पटवर्धन यांचा ‘२२ जून १८९७’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर दुसरा चित्रपट मिळायला १९८८ हे साल उजाडावे लागले. त्या चित्रपटाचे नाव ‘नशीबवान.’ या चित्रपटानंतर बाबांनी मागे वळून पहिलेच नाही. त्यानंतर २००० पर्यंत बाबांचे वर्षांला साधारण २ ते ३ चित्रपट येत असत. ज्यात, ‘एक होता विदूषक’, ‘कळत नकळत’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘रावसाहेब’, ‘चौकट राजा’, ‘आई’, ‘लपंडाव’, ‘सरकारनामा’, ‘तू तिथे मी’, ‘राजू’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश होता. ‘एक होता विदूषक’साठी तर बाबांनी २० लावण्या आणि इतर गाणी केली होती. याव्यतिरिक्त बाबा चंद्रकांत काळे यांच्यासोबत त्यांच्या ‘शब्दवेध’ या संस्थेसाठीदेखील काम करत असत, या संस्थेअंतर्गत ‘अमृतगाथा’, ‘प्रीतरंग’, ‘आख्यान तुकोबाराय’, ‘साजणवेळा’ आणि इतर अनेक कार्यक्रम त्यांनी केले.

आयुष्यभर बाबांनी नोकरी करत करतच संगीतसेवा सुरू ठेवली. बाबा गेल्यानंतर नरेंद्र भिडेने ‘लोकसत्ता’मध्येच बाबांवर एक अत्यंत सुंदर लेख लिहिला होता. ज्यात त्याने म्हटले होते, कोणतीही कला ही प्रयोगशीलता आणि लोकप्रियता या दोन चाकांवर चालते. बाबांनी लोकप्रियतेचे चाक फार पळविले नाही पण प्रयोगशीलता ही त्यांच्यात प्रचंड भिनली होती. कोणतेही गाणे करताना त्यात काही नवीन प्रयोग केला नाही तर त्यांना अपराधी वाटत असे. मागणी तसा पुरवठा करणे त्यांना कधीच जमले नाही. आणि या क्षेत्रातील अनिश्तिततादेखील त्यांना चांगलीच ठाऊक होती म्हणूनच उद्या काम मिळणे बंद झाले तर कुटुंबाला होणारा त्रास टाळण्यासाठीच त्यांनी आयुष्यभर नोकरी केली, आणि त्यांचा हा निर्णय योग्यच होता. कारण २००० मध्ये आलेल्या आणि अत्यंत गाजलेल्या ‘राजू’ या चित्रपटानंतर (या चित्रपटासाठी त्या वर्षीचे जवळपास सर्व पुरस्कार बाबांना मिळाले होते.) पुढील चित्रपट मिळायला बाबांना तब्बल ६ वर्षे वाट पाहावी लागली.

‘एक होता विदूषक’ला राज्य शासनाचा पुरस्कार नक्की मिळेल असे बाबांना वाटत होते, कारण त्या वर्षी सर्वार्थाने इतकी सुरेख गाणी असणारा इतर कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता, परंतु सर्वोत्कृष्ट संगीतकार सोडून इतर सर्व पुरस्कार त्या वर्षी ‘विदूषका’ने पटकावले. त्यानंतर कोणाबद्दलही एक शब्दही वाईट न बोलता बाबांनी पुन्हा कधीही कोणत्याच पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली नाही. नंतर त्यांना मिळालेले पुरस्कार त्या त्या चित्रपटाचे दिग्दर्शक अथवा निर्माते बाबांना घरी आणून देत असत.

हल्लीच्या काळासारखे आधी चाल करणे आणि नंतर त्यावर शब्द लिहून घेणे त्यांना आवडायचे नाही. बाबांना अगदी कधीही आणि कुठेही चाल सुचायची म्हणजे अगदी बँकेत काम करता करता, स्कूटर चालवताना, घरी दाढी करताना, आमच्याशी गप्पा मारताना अशी अगदी कुठेही.. आणि एकदा का चाल सुचली की ते दिवसभर कितीही कामात असतील, तरी त्यांच्या बरोबर लक्षात राहायची आणि घरी आले की त्यांची आवडती पेटी (जी आईने त्यांना भेट दिली होती) काढून ते ती चाल स्वतच्या आवाजात रेकॉर्ड करत असत. शब्द आणि गाणे चित्रपटामध्ये कोणत्या प्रसंगासाठी आहे हे अगोदर माहीत असायचेच.  १९८९ मध्ये आलेला स्मिता तळवलकर निर्मित आणि कांचन नायक दिग्दर्शित ‘कळत नकळत’ चित्रपट खूप गाजला. अशोक सराफ यांच्याकडून या चित्रपटात ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ हे गाणे गाऊन घेतले. या गाण्यात बाबांनी त्यांचा अत्यंत आवडता ‘अभिनेता गायक’ हा प्रयोग केला. फक्त अशोक सराफच नाही तर दिलीप प्रभावळकर (‘विठ्ठला’ हे नाटक, ‘चौकट राजा’ चित्रपट), सुनील बर्वे (‘अफलातून’ हे नाटक, ‘दिवसेंदिवस’ हा चित्रपट) हे अभिनेतेदेखील बाबांकडे गायले आहेत. त्याच वर्षी बाबांनी ‘सूर्योदय’ चित्रपट केला, त्यानंतर १९९० मध्ये बाबांनी सई परांजपे यांचा ‘दिशा’ हा पहिला हिंदी चित्रपट केला. ज्यामध्ये शबाना आझमी, नाना पाटेकर, ओम पुरी, रघुवीर यादव यांच्या भूमिका होत्या. १९९१ ला पुन्हा एकदा स्मिता तळवलकर आणि संजय सूरकर यांच्यासोबत ‘चौकट राजा ’ चित्रपट केला. हा चित्रपट आणि त्यातील गाणी दोन्ही खूप गाजले. त्यातील आशा भोसले यांनी गायलेले ‘एक झोका’ हे गाणे आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. त्यानंतर आलेला श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘लपंडाव’ चित्रपटदेखील हिट झाला. त्याच्याच पुढील वर्षांपासून सलग ३ वर्षे बाबांना सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून महाराष्ट्र राज्य शासन पुरस्काराने गौरविले गेले, ते तीन चित्रपट म्हणजे १९९४ ‘मुक्ता’, १९९५ ‘दोघी’ आणि १९९६ ‘रावसाहेब’ हे होत. (मराठी चित्रपटसृष्टीतील कदाचित एकमेव संगीतकार ज्यांना राज्य पुरस्कार सलग ३ वर्षे मिळाला.)

त्यानंतर अनुक्रमे १९९७ आणि ९८ मध्ये प्रदर्शित झालेले ‘सरकारनामा’ आणि ‘तू तिथे मी’ हे चित्रपट आणि त्यातील गाणी खूप गाजली. ‘तू तिथे मी’साठी बाबांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कारदेखील मिळाला. २००० मध्ये ‘राजू’ आणि ‘जिंदगी जिंदाबाद’ (हिंदी) हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘राजू’ या चित्रपटाच्या संगीतासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून बाबांना त्या वर्षीचे जवळजवळ सगळे पुरस्कार मिळाले.  २००६ मध्ये बाबांचे एकूण ४ चित्रपट प्रदर्शित झाले ‘दिवसेंदिवस’, ‘थांग’, ‘Quest’ (इंग्रजी), आणि ‘नातीगोती’. यासोबतच त्यांनी ‘बाईमाणूस’ आणि ‘फकिरा’ हेदेखील चित्रपट केले, परंतु ते प्रदर्शित होऊ शकले नाहीत. २००९ मध्ये ज्येष्ठ समीक्षक अशोक राणे यांचा ‘कथा तिच्या लग्नाची’, परेश मोकाशी यांचा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि अमोल पालेकर यांचा ‘समांतर’ हे चित्रपट आले. पैकी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा चित्रपट भारतातर्फे अधिकृतपणे ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात आला होता. या चित्रपटामध्ये एकही गाणे नव्हते, पण संपूर्ण पार्श्वसंगीत बाबांनी केले होते. त्यानंतर २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय दत्त यांच्या ‘आरंभ’ या चित्रपटातील गाण्यासाठी श्रेया घोषाल यांना पहिला ‘मराठी झी गौरव पुरस्कार’ मिळाला. नंतर २०११ मध्ये मकरंद अनासपुरे यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘डॅम्बीस’ बाबांनी संगीतबद्ध केला. २०१२ मध्ये गिरीश आणि संदेश कुलकर्णीच्या ‘मसाला’ चित्रपटाला बाबांनी संगीत दिले. या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते पहिल्यांदा गायले. मध्यंतरीच्या काळात ‘लोकसत्ता’साठी ‘स्मरणस्वर’ या सदराखाली लेखन आणि जवळपास ९ चित्रपटांचे काम बाबा करत होते. बँकेतून निवृत्त झाल्यानंतर ज्या पद्धतीने स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत काम करायला हवे, त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष के ले. त्या वेळी ‘म्हैस’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘जयशंकर’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’,

‘रमा माधव’, ‘एलिझाबेथ एकादशी’ असे उत्तम चित्रपट बाबा करत होते. त्यासाठी संगीत संयोजक म्हणून अर्थातच बाबांचे अत्यंत लाडके आणि त्यांच्या सोबत जवळपास दीड तप काम केलेले नरेंद्र भिडे काम करत होते.

बाबांची शेगावच्या गजानन महाराजांवर प्रचंड श्रद्धा होती. त्यांच्या ‘गजानन विजय’ या ग्रंथाचे सांगीतिक रूपांतर बाबा व रवींद्र साठे करत होते. १८ मे २०१३ रोजी अंतराच्या म्हणजेच माझ्या मोठय़ा बहिणीच्या मुलाचा पुण्यात नामकरण सोहळा संपन्न झाला. त्या वेळी आलेल्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रांना बाबांनी आता माझी सर्व कर्तव्यांमधून सुटका झाली आहे. आणि यापुढील आयुष्य केवळ संगीत आणि पत्नी यांसाठीच असल्याचे ते बोलून दाखवत होते. ‘गजानन विजय’ ग्रंथाच्या ध्वनिमुद्रणासाठी त्यांना २३ मे ला सकाळी अभिरुची येथील भिडय़ांच्या स्टुडिओमध्ये जायचे होते. त्याच्या आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत घरी काम केले. सकाळी उठल्यावर नेहमीची कामे आटपून त्यांनी रवींद्र साठे यांना फोन करून मी थोडा उशिरा येतोय असे कळवले. नंतर थोडय़ा उशिराने पूर्ण तयार होऊन घरातून बाहेर पडण्याआधी त्यांच्याच खोलीत त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. अक्षरश: आम्हा घरातल्यांनादेखील न कळता त्यांचे निधन झाले.

तशी कायमस्वरूपी नोकरी आणि सततची रेकॉर्डिग्स आणि इतर कार्यक्रम यामुळे आम्हा दोघींना बाबांचा सहवास तसा कमी लाभला. आमच्या आईनेच स्वत:ची नोकरी आमच्याकरता सोडून आम्हाला लहानाचे मोठे केले. तरीदेखील आमच्या प्रत्येक वाढदिवसाला, आमच्या आजारपणाला आम्हाला जेव्हा केव्हा त्यांचा आधार लागेल, त्या त्या सर्व क्षणी ते कायम आमच्या सोबत होते आणि आहेत.

आजही आम्हाला जेव्हा एखादी अडचण येते, तेव्हा बाबांनी या वेळी काय निर्णय दिला असता किंवा घेतला असता हा विचार करून आम्ही पुढे जातो. नवोदित, उदयोन्मुख गायक, गायिका, दिग्दर्शक आणि इतर कोणालाही त्यांनी कसल्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता वेळेला स्वत:च्या खिशातून पैसा खर्च करून मदत केली आहे. त्याची बरीच उदाहरणे देता येतील. ‘एफटीआय’ या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी ते दरवर्षी एखाद्या लघुचित्रपटाला कोणतेही मानधन न घेता संगीत देत असत. तसेच अत्यंत तुटपुंज्या मानधनावर आणि या कामातून आपल्याला फारशी प्रसिद्धी मिळणार नाही, हे माहीत असूनसुद्धा आकाशवाणीसोबत शेवटपर्यंत काम केले.

सध्याचे अनेक प्रथितयश गायक आणि गायिका यांनी त्यांचे पहिले व्यावसायिक गाणे बाबांकडेच गायले आहे. त्यातील काही नावे म्हणजे अजय आणि अतुल गोगावले, महेश काळे, अंजली मराठे, शरयू दाते. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरणे म्हणजे प्रियंका बर्वे. यातील जवळजवळ प्रत्येकाला बाबांकडे गायलेल्या पहिल्याच गाण्यासाठी नामांकन/ पुरस्कार मिळाला आहे.

मराठीव्यतिरिक्त बाबांनी हिंदीतील गायकांकडूनदेखील मराठी गाणी गाऊन घेतली आहेत. ज्यामध्ये शंकर महादेवन, श्रेया घोषाल, कविता कृष्णमूर्ती, रूपकुमार राठोड, अनूप जलोटा या दिग्गजांचा समावेश आहे. परंतु इतके उच्च प्रतीचे काम करूनदेखील बाबांच्या वाटय़ाला अवहेलनेचे क्षणदेखील आले. ज्यांना संगीतातील काही कळत नाही, असे निर्माते दिग्दर्शकांनी केवळ गल्लाभरू स्वभावांमुळे बाबांची काही सर्वोत्कृष्ट गाणी चित्रपटात घेतली नाहीत. परंतु त्याबद्दलदेखील बाबांनी कधी कोणाकडे तक्रार अथवा वाईट मत प्रदर्शित केल्याचे आम्ही कधीच पाहिले नाही.

‘लोकसत्ता’मधील सदर लिहीत असताना एका वाचकाने अत्यंत कडवट शब्दांत प्रचंड अपमानास्पद पत्र त्यांना लिहिले होते. परंतु बाबांनी अत्यंत संयत भाषेत स्वत:च्या मुद्दय़ावर ठाम राहून त्याला उत्तर दिले. आणि त्यानंतर ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ हा लेख त्यांनी स्वत:साठी लिहिला. ज्यामध्ये निंदकाची आपल्या आयुष्यात खरोखरच किती गरज आहे हेदेखील नमूद केले. असे अनेक पेचप्रसंग, अपमान, अवहेलना त्यांनी आयुष्यभर सहन केल्या असतील. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात ह्य़ा गोष्टीचे प्रतिबिंब कधीही उमटले नाही.

कामाप्रति त्यांची निष्ठा सिद्ध करणारे अनेक क्षण आम्ही पाहिले आहेत. एकदा स्कूटरवरून पडल्यामुळे त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती आणि डॉक्टरांनी त्यांना ६ महिने सक्तीची विश्रांती घ्यायला लागेल असे सांगितले होते. परंतु संगीत हे आयुष्य असणाऱ्या आमच्या बाबांनी त्या ६ महिन्यांतदेखील त्या वेळचे उदयोन्मुख मुकुंद फणसळकर आणि बाबांचे अत्यंत लाडके कविमित्र सुधीर मोघे यांच्या सोबत ‘तुझियासाठी’ या नावाचा उत्तम गाणी असलेला अल्बम ध्वनिमुद्रित केला होता. परंतु दुर्दैवाने तो अल्बम प्रदर्शित होऊ शकला नाही.

बाबा गेल्यानंतर त्यांची सर्व दुर्मीळ पुस्तके, जवळपास तीन कपाटे भरून कॅसेट, बाबा परदेश दौऱ्यावर गेले असताना तिथून त्यांनी आणलेल्या अनेक दुर्मीळ रेकॉर्ड ज्यांना बाबा नेहमी हीच माझी संपत्ती असे म्हणत, हा त्यांचा अनमोल ठेवा पुण्यातील सुप्रसिद्ध तबलावादक स्वर-ताल-साधना या सुप्रसिद्ध संस्थेचे संचालक आणि आमच्या सख्ख्या मावस बहिणीचे पती संजय करंदीकर यांच्याकडे आम्ही अभ्यासकांना फायदा व्हावा म्हणून सुपूर्द केला. त्यांनी सदाशिव पेठेसारख्या पुण्याच्या मध्यवर्ती भागात ‘आनंद मोडक संगीत अभ्यासिका’ सुरू करून सदर दुर्मीळ ठेवा अभ्यासकांसाठी खुला केला आहे. बाबा आजही आमच्या सोबत प्रत्येक सुख-दु:खात आहेत, हा ठाम विश्वास आम्हाला सर्वानाच आहे. आज त्यांच्या आम्ही दोन्ही मुली आपापल्या संसार आणि मुलांबाळांत स्थिरस्थावर आहोत. आईदेखील तिच्या मनाप्रमाणे आम्हा दोघींकडे राहायला असते. आजही आम्हाला बाबांची वेगळी आठवण काढावी लागत नाही. ते सदैव आमच्या मनांत आहेत आणि राहतील.

आवाहन तरुण कथालेखिकांसाठी

मराठी साहित्यात कथेचं समृद्ध दालन आहे. आत्तापर्यंत अनेकांनी दर्जेदार कथा लिहीत मराठी साहित्याचं हे दालन जिवंत ठेवलं, नव्हे वाढवलं, मोठं केलं. आजच्या तरुण कथालेखिका, ज्यांचं वय चाळिशीच्या आत आहे,  पाठवू शकतात आपल्या कथा आमच्याकडे. २०२० च्या ‘चतुरंग’ पुरवणीत असेल त्यांच्या दर्जेदार कथांचं दालन, जे असेल मराठी साहित्यात महत्त्वाची भर घालणारं!  कथेला विषयांची मर्यादा नाही, की शैलीचं बंधन नाही. कथा कुठेही घडणारी, कुठल्याही काळातली असली तरी चालेल, मात्र माणसाच्या अस्सल जाणिवांना हात घालणारी असावी. जगण्याच्या वास्तवाला भिडत कल्पनेच्या रंजकतेून उतरलेल्या रसरशीत अनुभवगाथा आम्ही प्रसिद्ध करू शनिवारच्या अंकांतून. शब्दमर्यादा १५०० ते १८०० शब्दांपर्यंत. पाठवा chaturangnew@gmail.com  किंवा  चतुरंग,  ई एल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४००७१० या पत्त्यावर.  पाकिटावर वा सब्जेटमध्ये – ‘कथा चतुरंग’ लिहिणे आवश्यक.

aalapinidhekane@gmail.com

chaturang@expressindia.com