दीप्ती भोगले

‘‘प्रतिकूल परिस्थितीची वादळे येऊनसुद्धा नाना समाधानी आयुष्य जगले. नानांमुळे आईची स्वरसाधना कणखरपणे टिकून राहिली. त्या दोघांची आनंदी वृत्ती आमचंही जीवन उबदार करून गेली. आईचे सदाफुलीसारखे प्रसन्न संस्कार आणि त्यामागची, औचित्यविवेक सांभाळणारी नानांची उत्स्फूर्त प्रतिभा.. ही देवदुर्लभ देणगी पुन:पुन्हा मिळावी म्हणून तर आम्ही जिवाच्या निकरानं संगीत नाटक केलं.. पुढच्या जन्माची बेगमी म्हणून या जन्मीचा हा वसा न उतता, न मातता जिवापाड सांभाळला.. लोकांना वाटतं आम्ही संगीत नाटक केलं. छे हो.. आम्ही हे व्रत फक्त सांभाळलं..’’ सांगताहेत दीप्ती भोगले आपले नाना-आई, जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी तेवत ठेवलेल्या संगीतमय तपश्चर्येविषयी..

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Textile Mill Workers, Transit Camps, Hazardous Building, Issue Persists, shivadi, byculla, lalbaug, parel,
संक्रमण शिबिरांना कंटाळलेल्या गिरणी कामगारांची सुटका कधी ? चाळी मोडकळीस, पुनर्विकास रखडलेला
When a leopard came in front of Karkare couple who were giving nature education to students
पाऊलखुणा दिसताच ‘ते’ थांबले; समोर गेल्यानंतर ‘तो’ पुढ्यात उभा ठाकला; निसर्ग शिक्षणाचे धडे देणाऱ्या दाम्पत्याला…

‘‘मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाना ।

मन केवढं केवढं त्यात आभाय माईना ॥’’

बहिणाबाईंनी मनाचं किती सार्थ वर्णन केलंय. प्रत्येकाच्या मनात एक आभाळ असतं. त्या आभाळात वैयक्तिक अडचणींचे ढग नेहमीच गडगडत असतात. आमच्याही मनातलं आभाळ संकटग्रस्त ढगांनी झाकोळलेलं असायचं. पण संगीताची निळाई आश्वासक सोबतीसारखी सतत आमच्या आभाळात येत राहायची.. आमचे नाना-आई, जयराम आणि जयमाला शिलेदार.. फुलानं सुगंध जपावा तसं दोघांनी ही संगीताची निळाई जपली.. आयुष्यभर फक्त संगीत नाटकावरच प्रेम केलं..

सतत फिरत्या नाटय़ कंपनीबरोबर राहिल्यानं नाना-आईही सतत रंगमंचावर काम करत असलेले दिसायचे.. आम्हाला रंगपटात झोपवलेलं असायचं. मध्येच जाग आली तर मान उचलून प्रकाशाकडे बघायचं.. तिथे विंगेपलीकडे वेगवेगळ्या वेशांत, तेजस्वी प्रकाशात, नाना-आई गात असलेले दिसायचे.. आई-नाना जवळच आहेत हा विश्वास रंगपटानं दिला. विंगेकडून विंगेपलीकडे जाणाऱ्या प्रवासाचं बाळकडू आम्हाला सहजगत्या मिळत गेलं.. रंगभूमीवरच्या जगाचं दर्शन आम्हाला अगदी सहज घडलं.

आमच्या पुण्यातल्या घराच्या अनेक आठवणी आहेत.  पुण्यातलं घर.. ‘आधार’, गणेशबाग, कचरेपाटलांच्या विहिरीजवळ, प्रभातरोड, हा आमचा पत्ता.. नानांची वामकुक्षी चालायची तेव्हा बहीण कीर्ती (शिलेदार) सरळ त्यांच्या कपाळावर तबल्याचे बोल वाजवायची.. ‘धाकीनाकी नाकीनाना ताकीनाना तांगतांग..’ एकदा नुकतेच दौऱ्याहून परतलेले नाना-आई जेवून झोपलेले होते. आमच्या भांडणानं त्यांच्या झोपेत व्यत्यय आला आणि आईनं आम्हा दोघींना खसकन आतल्या खोलीत ढकलून बाहेरून कडी लावून टाकली. नुकतेच राहायला आल्याने त्या खोलीत नाटकाच्या नेपथ्याच्या विंगा, पडदे वगैरे सर्व सामान एकावर एक रचून ठेवलं होतं. चिंचोळी जागा मोकळी होती. दार बंद केल्यावर एकाएकी अंधार दाटून आला, आमच्या भांडणाचा ट्रान्सफरसीन झाला. दोन मिनिटांपूर्वी एकमेकींच्या दुष्मन असलेल्या आम्ही, ‘हिंदी चिनी भाई भाई’ झालो. केविलवाण्या आवाजात आईला हाका मारू लागलो. तिनं मुळीच लक्ष दिलं नाही. रडून रडून कंटाळा आल्यानंतर आम्हाला ध्रुवाची गोष्ट आठवली. आम्ही लगेच देवाचा धावा करायचं ठरवलं. तपश्चर्या करून आईची खोड मोडायची ठरवलं. माझ्यात जन्मजात भाबडेपणा असावा. कीर्ती मात्र सहाव्या वर्षीही इब्लिस.. तिनं शंका काढायला सुरुवात केली. ‘‘अगं, पण ध्रुव अरण्यात गेला होता, इथं अरण्य कुठाय?’’

मी मोठेपणाचा आव आणून तिला सांगितलं, ‘‘नाटकाच्या या सामानात जंगलाचा पडदा आहे.’’

‘‘पण वाघसिंह?’’

‘‘आता गप्प बसतेस का?’’

‘‘ ते नसतील पण पाली, झुरळं असतीलच की.’’ ती असं म्हणाली आणि आम्हीच  घाबरलो. मोठय़ानं देवाचा धावा करायला लागलो, जप करायला लागलो. ‘ओम नमो भगवते वासुदेवाय..’ आई दाराआडून ऐकत होती. तिचं चांगलंच मनोरंजन होत होतं. तिनं नानांनाही बोलावून त्यात सहभागी करून घेतलं. आता तिनं नाही का नानांची झोपमोड केली? पण मोठय़ांना कोण बोलणार?

१९६० नंतरचं दशक नाना, आई आणि छोटा गंधर्व या त्रिकुटानं गाजवलं. विशेषत: ‘सौभद्र’ आणि ‘मानापमान’. पुण्यातल्या बहुतेक रंगमंदिरांतील पहिले प्रयोग शिलेदारांच्या साक्षीने झाले. नवीन नाटय़निर्मितीने उद्घाटन करायला नानांना फार आवडायचं. बडोद्याला ४२वं मराठी नाटय़ संमेलन झालं तेव्हा ‘कवी अनंत फंदी’चा प्रयोग त्यांनी केला. ९ सप्टेंबर १९६०  रोजी भानुविलास चित्रपटगृहात ‘गा भरवी गा’ नाटकाचा पहिला प्रयोग केला. नानासाहेब गोखले लिखित ‘सरंध्री’ नाटकात नाना कीचक आणि आई सरंध्री. नाना उन्मत्त कीचक छान रंगवायचे. नानांनी रंगवलेले बाजीराव, राम जोशी आम्हाला अगदी जवळचे वाटायचे, पण त्यांच्या कीचक किंवा ‘मृच्छकटिक’मधल्या शकाराचा फार राग यायचा. त्याच वेळी गोपीनाथ सावकार यांच्या ‘कलामंदिर’ संस्थेत नाना ‘सुवर्णतुला’ नाटकात कृष्णाचं खूप छान काम करायचे. छोटा गंधर्व नारद, तर शरदबाला काळसेकर ही सत्यभामेचं काम सुंदर करायची..

१ ऑक्टोबर १९४९ रोजी त्यांनी ‘मराठी रंगभूमी, पुणे’ या संगीत नाटय़संस्थेची स्थापना केली. त्यात पारंपरिक नाटकांबरोबरच नवीन संगीत नाटकांची सातत्याने निर्मिती केली. बिऱ्हाडी स्वरूपाची म्हणजे पगार, जेवणखाण, निवास अशा सगळ्या जबाबदाऱ्या असलेली ही बहुधा शेवटची नाटकमंडळी. मुंबई प्रांतात मनोरंजनाचा दांडगा कर असल्याने ‘मराठी रंगभूमी’ विदर्भात जास्त फिरली. नाटय़सृष्टीला बाळ कोल्हटकरांसारखा नाटककार दिला. त्यांच्या ‘मुंबईची माणसं’ या नाटकाने नागपुरात सलग महिनाभर हाऊसफुल्ल उत्पन्नाचा विक्रम केला. १९५२ या वर्षीच्या ९ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या बाळ कोल्हटकर लिखित ‘उषास्वप्न’ या नाटकाचं संगीत दिग्दर्शन नानांनी केलं होतं. वृत्तपत्रसमीक्षणात संगीताचा विशेष गौरव झाला.

नाटक कंपनीत तर समस्त स्त्रीवर्गावर नानांचा दरारा असायचा. पाठ झाकून दोन्ही खांद्यांवर पदर असलाच पाहिजे. नाटकाशिवाय चेहऱ्याला रंगरंगोटी करायची नाही. वेगवेगळ्या गावांत कंपनीचा महिना-महिना मुक्काम असल्याने स्थानिक लोकांकडून कंपनीतल्या लोकांना चहापानाला बोलावणी यायची. नानांचा दंडक असा की, आमंत्रण देणाऱ्याबरोबर त्याची पत्नी असेल तरच कंपनीतल्या स्त्रियांनी आमंत्रण स्वीकारायचं. थोडक्यात कुटुंबाकडून बोलावणं असेल तरच जायचं. चहापानाचा एक प्रसंग आठवतोय, नाना-आईंना गावातल्या एका मान्यवर बाईंनी चहाला बोलावलं, नाना-आई गेले, आपल्या नेहमीच्या साध्यासुध्या वेशात.. त्या बाई वारंवार दाराकडे बघत होत्या. शेवटी त्यांनी विचारलं, ‘‘जयमालाबाई नाही आल्या?’’ नानांनी आईकडे बोट दाखवलं. त्या बाईंना धक्काच बसला. त्यांनी व्याख्यानच झोडलं, ‘नटीनं  कसं राहायला हवं. कसं वागायला हवं’ वगैरे वगैरे. नानांनी त्यांना एकाच वाक्यात थांबवलं, ‘ती तशी राहिली असती तर मी तिच्याकडे बघितलं नसतं.’ नानांना आवडतं म्हणून नव्हे तर आईला स्वत:लाही साधं राहायला आवडायचं. त्यांची ही साधी राहणी नजरेसमोर असल्यानं आम्हीही साध्या राहिलो.

या सगळ्या नाटय़मय वातावरणात आमचेही दिवस छान जात होते. एरवीच्या आयुष्यात आणि नाटकांच्या अनुभवात साम्य शोधायची एक गमतीदार सवय आम्हाला लागली. सुप्रसिद्ध नाटककार माधवराव जोशी यांनी ‘मानापमान’ नाटकातल्या गाण्यांची मजेशीर विडंबनं आपल्या ‘विनोद’ नाटकात केली आहेत.

मूळ गाणं असं – माता दिसली समरी विहारत, नेत सकल नरवीर रणासी ॥धृ॥

मस्तकामाला गुंफित कालमहेश्वरी

पती सेवेसी ॥१॥

माधवरावांनी केलेले विडंबन असे..

माता बसली स्वगृही रखडत घाशीत ताटपाळयांसी तव्यासी ॥धृ॥

गोमय गोळा घेऊन हातही लिंपित वैलचुलीपाशी ॥१॥

अंगडी चोळ्या कुंच्या दुपटी लुगडीही नेत नदीसी धुण्यासी ॥२॥

या दोन्ही पदांतील मातारूपात, माझी रंगभूमीवरची आई आणि स्वयंपाकगृहातील आई यात फारसा फरक नाही. तिच्याबाबतीत माधवराव जोशींचा ‘रखडत’ हा शब्द जुळत नाही. अगदी वयाच्या ८६ व्या वर्षांपर्यंतही नाही. तेव्हा तर ती चुळचुळ मुंगळी होती. (हा शब्द गो. नी. दांडेकर यांनी वापरला आहे.) ताट, तवे, पळ्या तिनं घासल्या आहेत. घरात फरशी असल्यानं गोमयानं जमीन सावरण्याचा प्रसंग मात्र तिच्यावर आला नाही. पण हातात ब्रश घेऊन घराच्या भिंती तिनं वारंवार रंगवल्या आहेत. गॅसस्टोव्हमुळे वैलचुलीशी संबंध आला नाही. अंगडी दुपटी शिवली की नाही माहीत नाही, पण नाटकातले कपडे भरपूर शिवलेले आहेत. सतत तिच्या हातात विणकाम असायचं. नाटकासाठी कंबरपट्टे, गळपेंडी, बाजुबंद, कर्णकुंडलं, बिंदी यांची तिनं केलेली डिझाइन्स आजही मोहक वाटतात. खाडिलकरांच्या मातारूपातील आई रंगभूमीवरच्या प्रकाशमान जगात छानपैकी ‘विहरली’. तिथली आई नेहमी सुंदरच असायची. तिथं ‘कालमहेश्वर’ पत्नीचं रूप अजिबात नसायचं. पण घरात आमच्या काही चुका झाल्या तर मात्र ‘माता दिसली समरी विहरत’ ही ओळ सार्थ ठरायची. बऱ्याच वेळा तिनं रुद्रावतार धारण केलेला आहे, पण त्याच बरोबरीने ‘शिकवीत भक्ता’ ही ओळ तिनं वेगवेगळ्या अर्थानं सार्थ केलेली आहे. तिच्या लहानपणापासून ते वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षांपर्यंत तिनं सहजसुंदर साधेपणानं नाटय़संगीत शिकवलं आहे. संगीतकला तिनं कधी ‘भीषण’ होऊ दिली नाही.

डॉ. वसंतराव गोवारीकर यांनी चांगल्या माणसाचं वर्णन केलंय, ‘आश्रिताला आश्रय देणाऱ्या, मूक प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या, अभिजात कला, संगीत, वाचनामध्ये रस घेणाऱ्या, समाजाचं आपण काही देणं लागतो याचं भान असणाऱ्या, मुक्त, स्वच्छ मनाची माणसं मी निरंतर मोठी मानतो.’ हे सगळं वर्णन नानांना समोर ठेवून केलंय असं वाटावं असंच नानांचं व्यक्तिमत्त्व! परिसस्पर्शाप्रमाणे इतरांना शेवटपर्यंत प्रभावित करणारे आमचे नाना. आम्हा दोघींना घेतल्याशिवाय ते कुठं गेले नाहीत. पेशवेपार्क असो, गाण्याचा कार्यक्रम असो, नाटक बघणं असो नाही तर सत्कार समारंभ किंवा कुणाच्या घरी.. आम्ही चौघं सतत बरोबर. कमलाताई फडके तर म्हणायच्या, ‘आली सरगम!’

आई बंदिशीचा अभ्यास करायची. शास्त्रीय संगीतावरच्या पुस्तकांचा तिचा संग्रह दांडगा. १९६३ मध्ये गांधर्व महाविद्यालयाची ‘संगीत अलंकार’ ही पदवी ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तेव्हापासून जाहिरातीत ‘संगीत अलंकार जयमाला शिलेदार’ असं तिचं नाव यायला लागलं. आईचं शास्त्रीय संगीतावर अतिशय प्रेम. याआधी नागपूरच्या महिनाभराच्या मुक्कामात तिनं नाना आणि कंपनीतले इतर सहा जण यांच्याकडून ‘संगीत विशारद’ या पदवीचा अभ्यास करवून घेतला. ते सातही संगीत विशारद पदवीधारक झाले. दोघांनाही शिक्षणाचं महत्त्व कळलेलं असल्यानं आमच्या शालेय शिक्षणाकडे त्यांनी नेहमी लक्ष पुरवलं. आपल्या भावाबहिणींच्या मुलांना त्यांनी पुण्यात आणलं. चुलतभाऊ सुरेशही आमच्याबरोबर नाटक पाहू लागला. नानांनी आम्हाला विचारलं, ‘करणार का नाटक?’ आम्ही आनंदानं ओरडलो ‘हो..’ आठ, दहा, बारा या वयात त्यांनी आमच्या हातात दिलं एक सोनेरी स्वप्न- ‘सौभद्र’..

नानांच्या भोवती आयुष्यभर हितशत्रूंचा कोंडाळा होता. लहान मुलांचं ‘सौभद्र’ नाटक करणार हे कळल्यावर त्यांनी नानांना वेडय़ातच काढलं, ‘‘लहान वय आहे पोरांचं, खेळू दे जरा.’’ तेव्हा मिस्कीलपणे नाना म्हणाले, ‘‘तेच तर करतोय. त्यांना असा खेळ देतोय, जो त्यांना आयुष्यभर पुरेल.’’ नानांनी रंगावृत्ती तयार केली. आमची शाळा सकाळची. जेवण झाल्यावर आई हार्मोनियम घेऊन दुपारी २ ते ४ गाण्याची तालीम घ्यायची. ५ वाजता गोविंदराव कुलकर्णी यायचे. ते गद्याची तालीम घ्यायचे. स्त्री-पुरुष भूमिकेत उभं राहण्याचा पवित्रा कसा असावा, हातवाऱ्यांचा डौलदारपणा हे आमच्याकडून घोटून घेतलं. पुरुष भूमिकेत मोकळ्या हालचाली असाव्यात, याउलट स्त्री भूमिकेत मनातला संकोच प्रकट झाला पाहिजे, शब्दांचे उच्चार करताना कोणत्या अक्षरांना घुमारा द्यायचा, कोणत्या अक्षरांवर जोर द्यायचा, संवादातील लय कशी-कशी सांभाळायची, अर्थाप्रमाणे शब्दांना स्वरांचे आंदोलन.. हे रोजचे शिक्षण जे सुरू झालं ते पूर्ण वर्षभर.. आमच्या कुवतीप्रमाणे पदांमधले स्वरांचे अलंकार शिकवण्याचे आव्हान आईनं स्वीकारलं. या शिक्षणाची पसंती नानांकडून मिळाल्याशिवाय तालीम पुढे सरकायची नाही. आमच्या ‘सौभद्र’चा प्रयोग रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजना या सर्व बाबतींत सफाईदार होई. आदरणीय साहित्यिक ना. सी. फडके यांनी नानांना पत्र लिहिले, ‘नटेश्वराच्या चरणी तुम्ही हे सुंदर त्रिदल अर्पण केलंय.’

नाना खूप हौशी होते. ‘शाकुंतल’, ‘अभोगी’, ‘रामराज्यवियोग’ ही अप्रचलित नाटकं त्यांनी केली. तेव्हा नानांनी त्या नाटकांच्या पद्यावली छापून प्रेक्षकांना वाटल्या होत्या. दर दिवाळीला ‘मराठी रंगभूमी, पुणे’कडून शुभेच्छापत्रं पाठवली जात. कधी चांगल्या कलाकाराकडून नाटकाच्या अक्षरांची सुंदर डिझाइन्स करून, नाटकातले फोटो छापून देखणी ग्रीटिंग्ज तयार व्हायची. प्रत्येक नवीन नाटय़निर्मितीच्यावेळी त्या नाटकातील सर्व प्रवेशांचे फोटो काढून ठेवले (आज आमच्याकडे एकेका नाटकातील तीन-तीन पिढय़ांचे फोटो आहेत.). नेपथ्य मांडणी असो, कथाकल्पनांचे विषय असोत, नानांना नवीन कल्पना सुचत असत. त्यांच्यातला असामान्य स्वभावविशेष हा की त्या कल्पना इतरांना सांगून त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यप्रवृत्त करायचं. शिवाय आपण त्याचं कुठलंही श्रेय न उपटता त्या साकार कल्पनांचा आनंद लुटणे हे त्यांनी आयुष्यभर केलं. आनंद देणं, आनंद घेणं ही त्यांची स्वाभाविक वृत्ती! त्यामुळे आईही कलाक्षेत्रात सतत कार्यरत राहिली. एरवीच्या जीवनात संगीत नायिकेचं वेगळेपण आईनं कधीच मिरवलं नाही. गाताना सुरेलपणाचा हट्ट कधी सोडला नाही. ‘सुधाबाणी सुधमुद्रा’ हे तिचं खास वैशिष्टय़! नाटक हे नाना-आईचं प्रेम, तर गाणं हा आत्मा! ‘पशानं सुख विकत मिळतं’ या दृष्टीनं ते सुखी झाले की नाही माहीत नाही, कारण आयुष्यभर पसा लिमिटेडच राहिला. पण कलेचं ईश्वरी वरदान मिळाल्यामुळे शिलेदार मंडळी तृप्त आयुष्य जगली हे नक्की..

असे वाटेल की या शिलेदारांना अडचणी, दु:ख, संकटं यांचा वाराही लागलेला नसेल.. तर तसं अजिबात नाही. रसिकांनी अमाप प्रेम केलं, त्याच मापात नशिबानं कौटुंबिक दु:खंही भरपूर दिली. कित्येकदा विश्वासाच्या माणसांकडून सणसणीत चटके बसले.. कलेचा गंध नसलेल्या नातेवाईकांनी सर्व बाजूंनी नाना-आईंना मनस्ताप दिला. शिलकीच्या खात्यात नेहमी भलंमोठं शून्य.. सहाध्यायी कलाकारांना नानांचा आधार असायचा. कित्येकांच्या आजारपणात नानांनी त्यांना सांभाळलंय. पण काही मित्रांनी अपमानाचा डाग दिला. गंधर्व जन्मशताब्दीपर्यंत मला वाटत होतं की, आमचे नाना अजातशत्रू आहेत. माझा भ्रमनिरास झाला. आम्हाला कळलं, सगळ्यात जास्त शत्रू तर शिलेदारांनाच आहेत. सरकारी योजनेचा सगळा फायदा शिलेदारांना मिळेल, या भीतीनं बाकीच्यांनी इतक्या वेगवेगळ्या योजना दिल्या, की सगळंच केरात गेलं. संगीत नाटकाबद्दल भरीव काही घडू शकलं असतं.. असो. आमच्या घरात मी संतापी असल्याने यावरून माझ्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. नानांनी मला एका वाक्यात शांत केलं. ‘‘याचा अर्थ तुम्ही योग्य मार्गावर आहेत. लोकांनी तुमच्याकडे लक्षच दिलं नसतं तर? यापुढे तुम्ही स्वत:च्या कष्टांकडे जबाबदारीने पाहायला हवं..’’ आज मन म्हणतं, पण नाना, आमच्या डोक्यावर आभाळाची निळाई होती तोपर्यंत हे सगळं सहज जमत होतं. आज काळ प्रचंड वेगानं बदललाय.. समर्पित शब्दाचा अर्थ आज समजत नाही. ‘अर्था’ला वेगळ्या अर्थाने महत्त्व आलं. कलेतील नजाकत नाहीशी झाली. उथळपणाला मान मिळू लागलाय. काय सांगायचं, आपल्या संगीत नाटकाची हवाच नाहीशी झाल्यासारखी वाटतेय. आमचं आभाळ दिसेनासं झालंय. पण संगीत नाटक तर कल्पवृक्ष आहे ना.. मग हे संवेदनाहीन झालेलं जग बदलेल? मग स्वत:लाच त्याचं उत्तर मिळतं, नक्की बदलेल थोडी वाट पाहावी लागेल..

नाना-आईंची संवेदनशीलता गंधर्वसुरांनी प्रेरित झाली. आनंदाचा निर्मळ अनुभव त्यांना बालगंधर्वामुळे मिळाला. त्यांच्या आयुष्याचे ध्येय ठरले, संगीत नाटकातली स्वाभाविक सुंदरता आपण जपायची. मग संगीत नाटकातले शब्द आणि स्वर यांची विठोबा-रखुमाईप्रमाणे पूजा करण्याचा संस्कार त्यांनी गंधर्वाकडून घेतला, वसा म्हणून जपला, पुढच्या पिढीपर्यंत पोचवला.. एक संपूर्ण कुटुंब ‘संगीत रंगभूमी’ या एकाच विचाराशी निगडित राहून कार्य करते हा माझ्या अभिमानाचा विषय आहे.. ‘गाणारं घर’ असा उल्लेख मला फार आवडतो..

आम्हाला गाण्याची नजर येण्यासाठी आई-नानांनी विलक्षण धडपड केली. आईनं आमच्या गाण्याची चौकट पक्की केली. आम्हाला गाताना ती मोकळं सोडायची. स्वत: कमी शिकवायची. आमचं आम्हाला गायला लावायची. या पद्धतीनं तिनं आमच्या गाण्यातला नैसर्गिक ढंग जपला. आज मला ही फार कठीण गोष्ट  वाटते. स्वत:प्रमाणे तिनं आमची गायकी बनवली नाही आणि आमच्याही गळ्यावर चढवली नाही. त्यामुळे एकाच घरात, एकाच संगीताच्या छायेत आम्हा तिघींच्या गाणं सादर करण्याच्या शैलीत वेगळेपणा राहिला.

प्रतिकूल परिस्थितीची खूप वादळं येऊनसुद्धा नाना समाधानी आयुष्य जगले. ‘या जगण्यावर शतदा प्रेम करणाऱ्या’ नानांमुळे आईची स्वरसाधना कणखरपणे टिकून राहिली. आतूनच असलेली त्या दोघांची आनंदी वृत्ती आमचंही जीवन उबदार करून गेली. आनंद देणाऱ्या संगीतकलेचे ते दोघे उपासक असल्याने आमचा दिवस हौसेने उजाडत असे आणि समाधानाने मावळत असे.. मागच्या जन्मी काही तरी पुण्य मी नक्कीच कमावलेलं असणार त्यामुळेच तर नाना, आई, मी, कीर्ती यांच्या लहानशा जगात देवानं आम्हा चौघांचे प्राण गुंफले. मुलांवर आईवडिलांची नित्य पाखर असणं या भावनेचं मोल ज्यांना समजत असेल त्यांना हेवा वाटावा असं संपन्न बालपण आम्हाला मिळालं.

संगीत नाटक आमच्यासाठी ऊर्जेचा स्रोत आहे. नाना-आईने संगीताचे वेगवेगळे विभ्रम अनुभवण्याची संधी दिली आणि आम्ही अंतर्बाह्य़ सुंदर होऊन गेलो. नाना म्हणायचे, ‘‘संवाद म्हणताना आधी बघा मग बोला. डोळ्यात भावना आल्यावर आपोआप चेहऱ्यावर भाव उमटू लागतात, तुमच्या कृतीनं तुमच्या मनाला आनंद झाला तरच तो समोरच्या रसिकांना होईल. परंपरेचा जरतारी धागा अजिबात सोडायचा नाही. तरीही नावीन्याचा शोध थांबवायचा नाही..’’ आईचे सदाफुलीसारखे प्रसन्न संस्कार आणि त्यामागची, औचित्यविवेक सांभाळणारी नानांची उत्स्फूर्त प्रतिभा.. ही देवदुर्लभ देणगी पुन:पुन्हा मिळावी म्हणून तर आम्ही जिवाच्या निकरानं संगीत नाटक केलं.. पुढच्या जन्माची बेगमी म्हणून या जन्मीचा हा वसा न उतता, न मातता जिवापाड सांभाळला.. लोकांना वाटतं आम्ही संगीत नाटक केलं. छे हो.. आम्ही हे व्रत फक्त सांभाळलं.. संगीत नाटय़कलाकारांना ही साधना मन:पूर्वक कशी करायची याचा आदर्श एका ‘राजहंसा’नंच घालून दिला, नाही का! बालगंधर्वानी कलेचं कलाकारांशी असलेलं नातं जगून दाखवलं. ते नातं आहे तेलवातीचं, म्हणजे ज्योतीचं.. तेवण्यातून डोळ्यासमोर येतो तो तेजाळ लखलखाट.. तेवण्याची तपश्चर्या मात्र कलाकारांनी करायची. त्या तपस्व्याची वाट पाहायची.. सगळ्यांसाठी आभाळ पुन्हा निळंशार होईल..

bhogaledeepti@gmail.com

chaturang@expressindia.com