21 September 2020

News Flash

न संपणाऱ्या आठवणींचा खजिना

आभाळमाया

बहीण बिंबा जोशी, ‘स्टुडंट एक्स्चेंज’च्या माध्यमातून घरी आलेल्या वल्ली, आई मालिनी आणि वडील दि. बा. मोकाशी यांच्यासह ज्योती.

ज्योती मोकाशी-कानिटकर

दि. बा. मोकाशी, माझ्या वडिलांकडून मला दोन महत्त्वाच्या गोष्टी मिळाल्या, स्वातंत्र्य आणि बंडखोरी! ती त्यांच्यातही होती. ते नेहमी म्हणायचे, ‘‘कुणालाही घाबरून, कुणाला काय वाटेल याचा विचार करून लिहायचं नसतं, जे स्वत:ला पटेल तेच लिहायचं.’’ त्यांची एक एक पुस्तकं पाहा, ‘पालखी’, ‘देव चालले’, ‘कामसूत्रकार वात्स्यायन’, ‘अठरा लक्ष पावलं’, ‘संध्याकाळचं पुणं’  या कोणत्याही साहित्यात ते ‘समाजमान्य’ लिहीत नाहीत. ‘पालखी’त वारकरी सांप्रदायावर टीका आहे. ‘अठरा लक्ष पावलं’मध्ये तर त्यांचा मूळ पदयात्रेच्या तत्त्वांवरच आक्षेप होता, ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ हा विषय १९७८ मध्ये ‘सगळं लपून छपून’ करणाऱ्या आपल्या समाजाला न पचणारा होता, १९६०च्या ‘देव चालले’ या नितांतसुंदर कादंबरीत तर  त्यांनी स्वत:ची नास्तिकता सांगितली.’’ सांगताहेत दि. बा. मोकाशी यांच्या कन्या ज्योती मोकाशी-कानिटकर

मी दि. बा. मोकाशी नावाच्या फार मोठ्ठय़ा लेखकाची मुलगी आहे याची पहिली जाणीव मला कधी झाली? कदाचित ते गेले त्या दिवशी. म्हणजे माझी वयाची पहिली वीस वर्ष, माझं संपूर्ण बालपण आणि पुढचीही काही वर्ष मस्त अज्ञानात गेली. वडिलांच्या नावाचं, कर्तृत्वाचं कुठलंच ओझं डोक्यावर नव्हतं. याचं पूर्ण श्रेय आईला आणि बाबांना. स्वत:च्या कलेचा, प्रसिद्धीचा, मोठेपणाचा कोणताच आव, गर्व नसणारा हा साधा माणूस म्हणजे माझे वडील, दि. बा. मोकाशी!

ज्या वयात अनेक लेखक चाचपडत असतात त्या चाळिशीच्या सुरुवातीलाच ‘आमोद सुनासी आले’ अणि ‘देव चालले’ लिहिणारे माझे वडील होते. ‘आमोद..’ आणि ‘देव चालले’ हेच कशाला, अनेक उत्तमोत्तम कथांचे निर्माते, साध्या, सोपा, सुंदर आणि सहज भाषेचे जनक, हे माझेही जनक होते, ही जाणीव मला माझं वय आणि समज वाढल्यावरच झाली. या जाणिवेपूर्वी ते फक्त एक वडील होते, ते लिहायचेसुद्धा आणि रेडिओ दुरुस्तीसुद्धा करायचे. असा भारी माणूस वडील म्हणून मिळायला भाग्य लागतं.

काका गेले (वडिलांना मी काका म्हणत असे.) तेव्हा मी फक्त वीस वर्षांची होते. त्या वयातल्या दुर्दम्य आशावादामुळे वाटायचं की काका बरे होतील. त्यांच्या जाण्याचा विचार त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मनाला शिवला नव्हता. ते गेल्यानंतरचा धक्का आईच्या असण्यामुळे बराचसा सुसह्य़ झाला. काका गेल्यानंतर साधारणपणे तेरा वर्ष आई होती. पण ती पूर्वीची आई नव्हती. काकांशिवाय ती अर्धीच शिल्लक होती, केवळ माझ्यासाठी आणि तिच्या नातवंडांसाठी तग धरून होती. काकांच्या जाण्यानं मोकाशींचं सगळं कुटुंबच विझल्यासारखं झालं. आई १९९४ मध्ये गेली आणि तेव्हा मला भयंकर जाणीव झाली की, इतकी वर्षे आईबरोबर काकाही आमच्यात आहेत असंच मला वाटत राह्य़लं होतं, आणि ती गेल्यावर ती एकटी नाही तर काकाही आता गेलेत. एकाच दिवशी आई-वडील दोघांना गमावण्याचं पोरकेपण फार भयंकर होतं!

आई-काकांचं पालकत्व फार भारी होतं. तुम्ही हट्ट करता, रडता, कधी पाय आपटता (हे माझं!) आणि तरीही तुमचे आई-वडील अगदी शांतच नाही तर मस्त गालातल्या गालात हसत असतात, तुम्हाला रागवत नाहीत. थोडय़ा वेळाने तुमचा राग शांत होतो आणि जे झालं त्याचा कधी उल्लेखही होत नाही तेव्हा तुमच्याकडे पालकांविषयी तक्रार करायला काहीच नसतं. आमच्या घरात हे असंच होतं कायम! मुलींना रागवायचं नाही हे काकांचं व्रतच होतं. फारच वेडेपणा केला तर आईला म्हणायचे, ‘‘मालू, जरा रागाव तिला.’’ मग आई म्हणायची, ‘‘मी? तुम्ही रागवा की थोडं.’’ अशा गप्पात तो प्रसंग निघून जायचा.

‘शिस्त लावणं’ हा प्रकार आमच्या घराला माहीत नव्हता. म्हणजे आईने काही तरी मूलभूत शिस्त लावली. पण सर्वसाधारणपणे अमुक केलंच पाहिजे, अभ्यास करायचाच, अमुक वेळी घरी यायचं, इतके वाजता उठायचं-झोपायचं, अमुक-तमुक वाचायचं, मैत्रिणी अशाच हव्यात, मित्र नकोत, कपडे कोणते घालायचे, मार्क किती मिळवायचे, मोठेपणी किमान डॉक्टर व्हायचंच वगैरे काहीही या दोघांनी आम्हाला कधीही सांगितलं नाही. त्यांच्यासारखे न सांगता अनेक गोष्टी शिकवणारे पालक विरळा.  मी या त्यांच्या न शिकवण्यातून बरंच काही मिळवलं ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे.. त्यांनी दिलेले पालकत्त्वाचे धडे मी आई झाल्यावर गिरवले. ते धडे किती योग्य होते हे माझं मलाच समजलं.

बहुतेक सर्वच कलावंतांच्या घरात तो / ती महत्त्वाचे असतात. सगळं घर त्यांच्याभोवती फिरत असतं. त्यांच्या कामाच्या वेळानुसार इतरांचंही वेळापत्रक ठरतं, मुलांनी तेव्हा शांत असणं अपेक्षित असतं. वगैरे वगैरे. दोन-अडीच खोल्यांच्या घरात तर सगळंच फार कठीण असतं. काकांच्या लेखनाच्या वेळा ठरलेल्या नव्हत्या, म्हणजे दिवसभर डोक्यात लेखनाचेच विचार, इच्छा झाली की वही गुडघ्यावर घ्यायची की लिहायला सुरुवात! त्यांची एकाग्रता हे एक मोठ्ठं आश्चर्य आहे. ज्यांनी प्रत्यक्ष पाहिली त्यांनाच ती समजू शकते. मला आजही आमच्या दोन खोल्यांच्या घरात बाहेरच्या खोलीतल्या मोठ्ठय़ा लाकडी दिवाणावर तक्क्याला टेकून बसलेली त्यांची मूर्ती आठवते. एक पाय लांब पसरलेला, एक उभा दुमडलेला. त्या गुडघ्यावर लिहिण्याच्या पॅडला लावलेली वही. हातात केशरी रंगाचं ‘पार्कर’चं पेन, तेही मित्राकडून हट्टानं भांडून घेतलेलं. (ती एक वेगळीच कथा आहे.) शेजारच्या वाडय़ातून सतत येणारे भांडणतंटय़ांचे आवाज आणि आरडा-ओरडा. माझं वावटळीसारखं घरात येणं, सततची बडबड. वाडय़ातल्या मुलांच्या त्यांच्याशी गप्पा मारायला होणाऱ्या खेपा. लेखक-प्रकाशक आणि इतर मित्रांची येजा. या सगळ्यातही त्यांची समाधी भंग पावायची नाही. गप्पा मारायला कोणी आलं की हातातली वही तशीच डावीकडे ठेवली जायची. पेन अनेकदा उघडं तेही बाजूला सारायचं. आलेल्याचं ‘या या’ म्हणून हसतमुखाने स्वागत व्हायचं. वि. ग. कानिटकर, श्री. ग. माजगांवकर असतील तर खासच. तेही कधी विचारायचे नाहीत, ‘‘मोकाशी डिस्टर्ब करतोय का?’’ मग काकांची आईला हाक जायची, ‘‘मालू, अगं, कानिटकर आलेत चहा टाक.’’ तो आईने आधीच टाकलेला असे. मग मस्त गप्पा रंगायच्या. मित्रांचं पाऊल बाहेर पडलं की त्याच क्षणी वही उचलली जायची आणि एक क्षणही विचार करावा न लागता अर्धा टाकलेला शब्द – वाक्य पुढे लिहिलं जायचं. याचा अर्थ असा नव्हता की त्यांचं सगळं लेखन इतक्या सहजतेने पूर्ण केलं जायचं. पण त्या कथांची जी मांडणी असायची ती पूर्णपणे डोक्यात तयार व्हायची आणि मग सलग कागदावर उतरायची. कथेसाठी काही नोंदी तयार झाल्या, त्याचा शेवट काय होणार हे लिहून ठेवलं, कथेतल्या पात्रांबद्दल काही टिपणं केली, असं त्यांनी कधीच केलं नाही. पण त्यांचं कथांच्या कल्पना लिहिणं फारच भन्नाट होतं. खिशात एक अगदी छोटी डायरी असायची. स्वत:चा स्वभाव पूर्ण विसराळू आहे यांची पूर्ण जाणीव असल्यामुळे ही डायरीची सोय. काका सायकल चालवायचे. चालवताना जर एखादी कल्पना सुचली की तिथेच थांबायचे. डायरीत दोन शब्द, एका वाक्यात कल्पना टिपून ठेवायचे आणि मग पुढे निघायचे. बहुतेक सर्वच कथा अशा दोन शब्दांच्या कल्पनेतून साकारलेल्या..

काका त्यांच्या तरुणपणी डाव्या विचारांचे होते, मग ‘रॉयिस्ट’ होते आणि नंतर ते असे कोणाचेच नव्हते. याबरोबरच आमच्याकडे विविध विचारधारांची फार मोठी माणसं सतत येत. हमीद दलवाई, ना. ग. गोरे, द. म. सुतार,

ग. प्र. प्रधान, श्री. ग. माजगांवकर,

वि. ग. कानिटकर आणि जवळपास सगळेच लेखक – प्रकाशक. डावे, उजवे, काँग्रेसचे आणि इतर अनेक विचारधारेच्या व्यक्तींबरोबर घरात गप्पांच्या मैफिली रंगत. या सर्वाच्या गप्पा सुरू असताना मला आईच्या शेजारी बसून ऐकण्याची परवानगीच नाही, तर तसा आग्रह असायचा. हे सगळे विचार, तत्त्वज्ञान, सिद्धांत माझ्या कानावर पडावेत हा कटाक्ष असे. त्या वयात मला किती समजणार होतं? पण त्यातूनच माझी मतं आणि विचार तयार होत गेले. आज मी सगळ्या टोकाच्या विचारधारा सोडून स्वत:ला ‘मानवतावादी’ म्हणू शकते ती यामुळेच.

माझ्या वडिलांकडून मला आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी मिळाल्या, स्वातंत्र्य आणि बंडखोरी. आम्हाला जे काही मिळालं त्याला स्वातंत्र्य आणि बंडखोरी ही नावं मी अर्थातच समज आल्यावर दिली. हा इतका सौम्य प्रवृत्तीचा माणूस आपल्या लेखनातून बंडखोर विचार मांडतोय हेही बरेचदा कळलं नाही. त्यांना जे पटायचं तेच ते कागदावर मांडायचे. कोणत्याही कारणासाठी त्यांनी आपल्या विचारांशी तडजोड केली नाही.  एक गोष्ट मात्र त्यांनी नेहमीच स्पष्टपणे सांगितली, ‘कुणालाही घाबरून, कुणाला काय वाटेल याचा विचार करून लिहायचं नसतं, जे स्वत:ला पटेल तेच लिहायचं.’ आणि तेही कायम तसेच वागत आले.

काकांची एकएक पुस्तकं पाहा, उदा. ‘पालखी’, ‘देव चालले’, ‘कामसूत्रकार वात्स्यायन’, ‘अठरा लक्ष पावलं’, ‘संध्याकाळचं पुणं’,  त्यांच्या कथा, या कोणत्याही साहित्यात ते ‘समाजमान्य’ लिहीत नाहीत. ‘पालखी’त वारकरी सांप्रदायावर टीका आहे, वारकऱ्यांवर टीका आहे, ‘अठरा लक्ष पावलं’मध्ये तर त्यांचा मूळ पदयात्रेच्या तत्त्वांवरच आक्षेप होता, ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ हा विषय १९७८ मध्ये ‘सगळं लपून छपून’ करणाऱ्या आपल्या समाजाला न पचणारा होता, १९६० च्या ‘देव चालले’ या नितांतसुंदर कादंबरीत तर त्यांनी स्वत:ची नास्तिकता सांगितली, ‘संध्याकाळचं पुणं’मधले लेख समाजावर, व्यक्तींवर टीका करणारे आहेत.

‘देव चालले’ आणि ‘आमोद सुनासी आले’ ही दोन्ही माझ्या जन्माच्या आधीची पुस्तकं. त्यामुळे या दोन्हींच्या जन्माच्या वेळी त्यांना काय वाटत होतं, ही कादंबरी त्यांनी कशी लिहिली, त्यावर प्रतिक्रिया काय आल्या याची फारशी कल्पना मला नाही. पण ‘आमोद..’ या कथासंग्रहाला आणि ‘देव चालले’ या कादंबरीला एकाच वर्षी महाराष्ट्र सरकारची पारितोषिकं मिळाली ही गोष्ट माझ्यासाठी खासच, कारण माझा जन्म झाला आणि पुढच्या १० -१२ दिवसांत ही पारितोषिकं जाहीर झाली. ‘पालखी’ही याच वेळची. म्हणजे ‘पालखी’ हे पुस्तकं कसं लिहिलं गेलं हेपण मला ऐकूनच माहिती. पुढे मी कॉलेजमध्ये असताना फिलिप एन्गब्लुम या अमेरिकन संशोधकाने ‘पालखी’चं इंग्रजीत भाषांतर केलं. त्या वेळी काकांच्या आणि फिलिपच्या वारकरी संप्रदाय आणि संतसाहित्यावर रंगलेल्या गप्पा मात्र मला आठवतात.

काकांचं वाचन अक्षरश: चौफेर होतं. आमच्या घरातलं प्रत्येक कपाट, एक स्वयंपाकघरातलं कपाट वगळता, पुस्तकांनी व्यापलेलं होतं. काकांची पुस्तकं, हस्तलिखितं, पत्रव्यवहार सांभाळायचं काम अर्थातच आईचं. नवी पुस्तकं विकत घेणं जरा म्हणजे खूपच कठीण होतं त्यामुळे जुन्या पुस्तकांची दुकानं, रद्दीची दुकानं, कॅम्पात रस्त्यावर बसणारे पुस्तकविक्रेते आणि त्यांचे खास मित्र तात्या ढमढेरे (यांच्याकडे जुन्या दुर्मीळ पुस्तकांचा खजिना होता.) यांच्याकडून पुस्तकं घेतली जात. टॉलस्टॉय, चेकॉव्ह (हा त्यांचा फार आवडता लेखक) ते इंग्रजीतील हलक्या-फुलक्या कादंबऱ्यांचे लेखक लुई लमूर, याच्या मधलं काहीही. एका वेळी अनेक पुस्तकं त्यांच्या कॉटवर आणि खिडकीत पसरलेली असायची. काका पुण्यातल्या सगळ्यात उत्तम ग्रंथालयांमध्ये जात असत. मीही त्यांच्याबरोबर अगदी लहान म्हणजे चार-पाच वर्षांची असल्यापासून जात असे. पुणे विद्यापीठ, फग्र्युसन कॉलेज, भांडारकर इन्स्टिटय़ूट, इतिहास संशोधन मंडळ आणि ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी. या सगळ्या प्रवासात मी कधी नीट वाचायला लागले ते त्यांना आणि मलाही समजलं नाही. ‘ब्रिटिश कौन्सिल’ म्हणजे आनंदी आनंद. आत शिरल्यावर काका मला म्हणायचे, ‘‘जा हिंड लायब्ररीत, पुस्तकं, मासिकं बघ.’’ तेव्हा तिथे लहान मुलांच्या पुस्तकाचा खास भाग होता असं आठवतंय.

त्यांची एक गोष्ट मला पक्की माहीत आहे. कोणतंही पुस्तक, कादंबरी, कथा, ललित लिहिताना पूर्ण अभ्यास केल्याशिवाय ते कधीही लिहीत नसत. म्हणजे ‘आमोद सुनासी आले’ लिहिताना गाय व्यायच्या वेळी काय होतं, कशी काळजी घेतात इथपासून अर्थातच अमृतानुभवापर्यंत सगळ्याचा अभ्यास. ही कथा मोकाशींनी कशी लिहिली याबद्दल ‘फुलेची झाली भ्रमर’ या नावाची अरविंद गोखले यांची फार सुंदर कथा आहे.

संत साहित्याचा त्यांचा अभ्यास तर प्रचंड होता. मग ‘आनंद ओवरी’च्या वेळी तुकारामांचं साहित्य घरभर दिसे. काका ते वाचत आणि आईबरोबर त्याबद्दल सतत बोलत. माझ्या आठवणीत ‘आनंद ओवरी’ फार आहे. मी नववीत असेन. काका अस्वस्थ असायचे. खरं तर तो कथांचा काळ, म्हणजे दिवाळी अंकांसाठी कथा लिहायचा काळ असावा, पण त्या वर्षी ते तुकारामांवरच्या कादंबरीत अडकले होते. त्यांना समजलेला तुकाराम कसा मांडावा हे सुरुवातीला उलगडत नव्हतं. त्यांच्या वृत्तीनुसार आणि विश्वासानुसार तुकाराम बराचसा ‘पछाडलेला’ माणूस आणि एक फार मोठा कवी होता. लोकांच्या मनात असलेला, म्हणजे ‘विठ्ठलभक्त आणि देवाने विमान पाठवून ज्याला नेलं’ असा काकांना अभिप्रेतच नव्हता. मग कधी तरी त्यांना हवी ती ‘रचना’ सापडली आणि तुकारामाच्या भावाच्या, कान्होबाच्या तोंडून आणि नजरेतून त्यांनी एका वेगळ्याच तुकारामाला शब्दबद्ध केलं.

माझ्या दृष्टीने आणखी एक वेगळी गोष्ट. काका एक-एक पान किंवा संवाद लिहायचे आणि म्हणायचे, ‘मालू ऐक’ आणि ‘मालू ऐक’ म्हणजे घरात मी असले तर ‘ज्योती तूही ऐकच’ असं! माझं नशीब मोठं की ‘आनंद ओवरी’ मी पहिल्यांदा ऐकली काकांच्या तोंडून आणि नंतर वाचली. आजही ती वाचताना माझ्या कानात काकांचा आवाज घुमत रहातो.

याच सुमारास त्यांनी ‘वात्स्यायना’वर पूर्ण काल्पनिक कादंबरी लिहायचं ठरवलं. महाराष्ट्रात सर्वाना ‘कामसूत्र’ निदान ऐकून तरी माहीत आहेच.  सातव्या शतकात अशा विषयाचा इतका सखोल अभ्यास करणारा माणूस कोण असेल, कसा असेल, त्या काळचा समाज कसा होता, लोकांचं राहणं कसं होतं, कुटुंबसंस्था कशी होती या सगळ्याचा विचार करणं कादंबरी लिहिण्यासाठी गरजेचं होतं. म्हणूनच ही कादंबरी लिहिणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतंच. आई सांगायची, ‘‘जवळपास आठ वेळा त्यांनी ही कादंबरी लिहिली.’’

ही कादंबरी त्या वेळी गाजली नाही याचं कारण मला वाटतं, १९७८ मध्ये आपला समाज या विषयावर बोलण्यासाठी तयार नव्हता. पण काकांचं लेखन नेहमीच समाजाच्या फार पुढचं होतं. त्यामुळेच आज ते गेल्यानंतर जवळपास ४० वर्षांनीही त्यांच्या कोणत्याच कथा-कादंबऱ्या  जुन्या वाटत नाहीत.

काकांना १९७८ मध्ये कर्करोग झाला. त्यातून ते थोडेफार बरे झाले, लेखन सुरूच होतं. तेव्हा ‘संध्याकाळचं पुणं’ची कल्पना सुचली. आजच्यासारखे तेव्हाही पुण्यात संध्याकाळी भरघोस कार्यक्रम असत. आई-काका दोघेही कार्यक्रमांना जात, त्यातला जो विषय भावायचा त्यावर मग छान लेख तयार होत असे. पण हा लेखही त्या कार्यक्रमाबद्दलच नसायचा तर त्यानिमित्ताने समाज आणि व्यक्तींबद्दल त्यात भाष्य असे. हे लेख आणि मग पुस्तकही खूप गाजलं. खरं तर ‘पालखी’, ‘अठरा लक्ष पावलं’ आणि ‘संध्याकाळचं पुणं’ ही तीनही पुस्तकं पत्रकारितेची फार सुंदर उदाहरणं आहेत.

आईचं आणि त्याचं नातंही विलक्षण होतं. काही वर्षांपूर्वी रागिणीबाई पुंडलीक (‘साथसंगत’ आत्मचरित्राच्या लेखिका) गप्पा मारताना मला म्हणाल्या, ‘‘ज्योती, तुझ्या आई-काकांचं सगळं वेगळंच होतं. इतकी एकरूपता कुणाच्यातच दिसत नाही.’’ आई – काकांचा प्रेमविवाह, नात्यातला. ते भेटले १९४२ मध्ये. आई तेव्हा मुंबईला के. ई. एम.ला नर्सिगच्या शिक्षणासाठी आली होती. काका  कल्याणला त्यांच्या मोठय़ा डॉक्टर बंधूंकडे राहत असत. त्या काळी रेडिओ आकाराने मोठे असत. त्यामुळे घरी जाऊन रेडिओ दुरुस्ती करावी लागे. ते त्यासाठी के. ई. एम. हॉस्पिटललाही जात. आई-काका यांच्यातला संवाद आणि साथ देण्याची सुरुवात तेव्हापासूनच झाली. त्यांनी लग्न केलं १९४८ मध्ये. आईने सांगितलं, ‘‘धाकटा भाऊ पायावर उभा राहिस्तोवर लग्न करणार नाही.’’ यांनी ते मानलं.  मग त्यांची सहा वर्षांची सुंदर ‘कोर्टशिप’ सुरू झाली. या त्यांच्या स्वानुभवावरच्या इतर बऱ्याच प्रेमकथा असतील, पण त्यांची कदाचित सगळ्यात सुंदर प्रेमकथा ‘रोमच्या सुताराची गोष्ट’ ही याच काळातली!

लग्नानंतर पुण्याला स्थायिक होण्याचा निर्णय दोघांचा, पण यात पुढाकार काकांचा होता. भाऊ-वहिनी आणि मागे आलेल्या मोठय़ा बहिणीशी कितीही जिव्हाळ्याचे, अगदी पराकोटीच्या प्रेमाचे संबंध असले तरी ‘एकत्र कुटुंबात आपल्या पत्नीला त्रास होऊ शकतो’ हा महत्त्वाचा विचार यामागे होता. पत्नीच्या स्वास्थ्याचा आणि आनंदाचा विचार करणारा आणि १९४८ मध्ये विभक्त कुटुंबपद्धती निवडणारा नवरा खासच म्हणायला हवा. त्यांच्या दोघांमधला सततचा संवाद, विश्वास, प्रेम यांच्याबरोबरीची आणि मला फार महत्त्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे पत्नीला सतत आदराने वागवणं, ती स्वत:च्या बरोबरीची आहे याची जाणीव ठेवणं. हे आजकालच्या नवऱ्यांनाही कठीण जातं. ते माझे वडील त्या काळीही जाणीवपूर्वक करत.  त्यांच्या मूळ सवयी अगदीच भिन्न होत्या. म्हणजे ते प्रचंड अव्यवस्थित आणि आई प्रचंड व्यवस्थित, वडिलांना ‘वेळापत्रक’ ही कल्पनाच मान्य नाही आणि आई त्याच्या उलट, आईचा शास्त्र-गणिताकडे ओढा तर यांचा आणि आकडय़ांचा काहीही संबंध नाही, आई जरा तापट तर हे अगदी बुद्धाचा अवतार. या सगळ्या वरवरच्या गोष्टी ठरल्या. त्यांच्या नात्यातील मूळ मूल्यांचा पाया फार भक्कम होता. माझं लग्न आणि माझं माझ्या नवऱ्याशी असलेलं नातं ही माझ्या या अनुभवांची देणगी आहे. मला नेहमी वाटतं, पती-पत्नीचं नातं कसं हवं तर आई-काकांसारखं!

आई-काका जाऊन इतकी वर्षे झाली परंतु त्यांची शिकवण मनावर घट्ट रोवली गेली आहे. काकांची पुस्तकं  तर आजही साथसोबत करत असतात. कुठलंही पुस्तक काढा, कधीही वाचा.. माझ्या आयुष्यातली ती पहिली वीस वर्षे म्हणजे कधीही न संपणाऱ्या आठवणीचा सुंदर खजिनाच आहे.

ajitjyotik@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 12:02 am

Web Title: abhalmaya special memories article by jyoti mokashi kanitkar
Next Stories
1 पुस्तकं आयुष्य बदलवणारी.. इतिहास घडविणारी..
2 गर्भावस्थेतील आहार
3 हा भारत माझा (?)
Just Now!
X