03 April 2020

News Flash

आभाळमाया : मायेचा पैस

आप्पा लेखनातून जीवनाचं गाणं गात गेले, व्यथा, आनंद, प्रकाश, तिमिर जे जे अनुभवलं त्यांचं, कशाचं भांडवल न करता.

(संग्रहित छायाचित्र)

वीणा देव

‘‘आप्पा लेखनातून जीवनाचं गाणं गात गेले, व्यथा, आनंद, प्रकाश, तिमिर जे जे अनुभवलं त्यांचं, कशाचं भांडवल न करता.  सर्व वयाचे वाचक ते सारं अनुभवत राहिले आणि आप्पांना अन् आम्हाला उदंड जिव्हाळा देत राहिले. आप्पांच्या आभाळागत मायेचा पैस खूप मोठा होता,  मी खूप भाग्याची म्हणून असे वडील मला लाभले. त्यांच्याकडून माझ्याकडे आली, ती संवेदनशीलता. शब्द, स्पर्श, रूप, रंग, गंध कसे अनुभवायचे याची जाण. माझ्या घरातलं कलाप्रेम मी त्यामुळे जिवंत ठेवू शकले. मी, विजय, मृणाल, मधुरा, जावई, नातवंडं सगळे एकत्र आलो की संवेदनांचा परिमळ दरवळू लागतो. त्याचं मूळ आप्पांच्या सहज आणि सतत आनंद वाटण्याच्या वृत्तीत आणि ‘दृष्टी’ देण्यात आहे. ’’ सांगताहेत वीणा देव आपले आप्पा गो.नी. दांडेकर यांच्याविषयी.

मी पाच-सहा वर्षांची असेन तेव्हाची आठवण आहे. आमच्या तळेगावच्या लहानशा घरात आप्पा, आई, आजी (आप्पांची आई) आणि मी असे चौघे राहत असू. स्वयंपाक घर आणि बैठकीची खोली, अशा दोन खोल्या. बैठकीच्या खोलीतच आई-आप्पांजवळ मी झोपे. त्या वेळी मला डांग्या खोकला झाला होता. प्रचंड ढास लागे. खोकून खोकून जीव कंठाशी येई. एरवी आईच सगळं करी माझं. आप्पा बरेचदा गावाला गेलेले असत. एकदा कशासाठी कोण जाणे, आई गावाला गेली होती. त्या रात्री मी आप्पांच्या कुशीत झोपले होते. पहाटे अचानक माझा खोकला बळावला. थांबेचना. आजी होतीच. पण माझी अवस्था बघून आप्पा खूप गडबडले. त्यांना काय करावं सुचेना. आजीनं काढा दिला. मला शेकू लागली. पण ढास थांबेना. आप्पांनी ज्येष्ठमधाची कांडी दिली. गरम पाणी दिलं. खडीसाखर दिली. पण काही उपयोग होत नव्हता. आप्पा अतिशय अस्वस्थ. जवळजवळ तासाभरानं खोकला उबाला. आप्पा माझं डोकं मांडीवर घेऊन थोपटत बसले. माझा जरा डोळा लागला. पण गालावर पाण्याचा थेंब पडला. डोळे उघडून पाहिलं, तर आप्पांचे डोळे झरत होते. मी उठलेच तर म्हणाले, ‘‘उठू नका राजी, झोपा. किती त्रास होतोय तुम्हाला. आता उजाडलं, की आधी डॉक्टरांकडे जाऊ या.’’ तिथे जाईपर्यंत त्यांना चैन नव्हती. मीही त्यांच्या गळ्यात हात घालून बसून राहिले. पण ते किती खंबीर आहेत हेही कळलं. ते खूप भावनाशील आहेत, हे मोठी झाल्यावर कळलंच. त्यांच्या डोळ्यात – खरं तर कोणाही पुरुषाच्या डोळ्यात मी असं पाणी पहिल्यांदाच पाहत होते.

तसे ते अधिक संवेदनशील होतेच. म्हणून तर त्यांचं लेखन वाचकांच्या मनाला भिडतं. राहणीही निराळी. दाढी वाढवलेली, केसही लांबच. धोतर, कोपरी असा साधा वेश, गळ्यात तुळशीची माळ, पुढे एकदा त्यामुळे एक गमतशीर प्रसंगही घडला. ते आणि मी माझी मॅट्रिकची परीक्षा झाल्यावर गोव्याला जात होतो. एसटीच्या प्रवासात मी त्यांच्या मांडीवर झोपले होते. तर मागून एक माणूस मोठ्ठय़ानं म्हणाला, ‘ते बघ, बुवा तेथे बाया!’ – मी उठल्यावर आप्पांनी सांगितलं, आमची हसून पुरेवाट! तळेगावातही ते वेगळेच जाणवायचे; माझ्या मैत्रिणींच्या वडिलांपेक्षा नोकरीला न जाता घरीच सतत लिहिण्याचं काम करत असलेले, उरलेल्या वेळात वाचन. सारखा प्रवास करणारे. किल्ल्यांवर जाणारे, ऐतिहासिक वस्तू, सुंदर खडे गोळा करणारे. फोटोग्राफी करणारे, अत्तरं जमवणारे, प्रवचनं, कीर्तनं, भाषणं करणारे. तळेगावकरांना ते आवडायचे कारण ते आपल्या या छंदांमध्ये शक्य तितक्यांना सामील करून घ्यायचे. आमच्या प्राथमिक शाळेत लोकनृत्यांच्या गीतांवर आम्हाला नृत्य शिकवणारे आप्पा तर सगळ्यांना थक्क करायचे. गीतं त्यांनीच लिहिलेली असत. मला त्या वेळी फार अभिमान वाटायचा.

मराठीतले लेखक म्हणून मला त्यांचा परिचय थोडा उशिराच झाला. १९६०चा सुमार असेल. आई मला त्यांची छोटी छोटी पुस्तकं वाचायला द्यायची म्हणून मुलांसाठी गोष्टी लिहिणारे आप्पा मला माहीत होते. एके सकाळी ‘काँटिनेंटल प्रकाशना’चे प्रकाशक अनंतराव कुलकर्णी तळेगावला आले. त्यांनी हार आणि पेढय़ांचा पुडा आणला होता. म्हणाले. ‘‘आप्पा, अभिनंदन. तुमचं ‘पवनाकाठचा धोंडी’ (१९५५) पुणे विद्यापीठात अभ्यासक्रमात घेतलं गेलं.’’ ते खूप खूश होते. आप्पाही आनंदले. मला ‘पुस्तक लागलं’ म्हणजे काय हे सांगितल्यावर माझ्या मनातल्या त्यांच्या लेखकपणावर शिक्का बसला. मग लेखक गोपाल नीलकण्ठ दांडेकरही हळूहळू कळत गेले. माणूस म्हणूनही कळत गेले. कारण ते साहित्याशी संबंधित कार्यक्रमांना लेखकांच्या घरी भेटायला जाताना मला बरोबर घेऊन जाऊ लागले. तेव्हाच्या त्या भेटींमध्येही मला जाणवे की ते त्या समूहात असतात. पण त्यात खूप रमत नाहीत. ते सगळे बहुधा शहरवासी इंग्रजीचा प्रभाव असलेले असत. आप्पांचा स्वत:चा मार्ग स्वतंत्र होता. अखेपर्यंत ते त्या मार्गानेच  गेले. कधी कोणाशी स्पर्धा केली नाही.

माझ्या लहानपणची एक आठवण आहे. मला वाटतं, मी चौथीत असेन. परीक्षेचा निकाल लागला होता. निकालपत्र घेऊन मी पळत घरी आले; आणि त्यांना अतिशय आनंदानं सांगितलं, ‘‘आप्पा माझी मैत्रीण दोन्ही तुकडय़ामध्ये पहिली आली.’’ माझ्याकडे टक लावून बघत म्हणाले, ‘‘अरे वा! आणि तुम्ही?’’

‘‘मी चौथी.’’

‘‘इतक्या खुशीत सांगताय मैत्रिणीचं, तुम्हाला मत्सर नाही वाटला तिचा?’’

‘‘नाही आप्पा, ती हुशारच आहे तेवढी.’’ असं मी म्हणताच मला जवळ घेऊन पाठीवर जी थाप मारली, ती अजून लक्षात आहे.

‘‘वा बाळा! असंच स्वत:ला नीट ओळखून जगावं. कधीही मत्सर करू नये कोणाचा, प्रत्येकाकडे एक वेगळेपण असतं. ते जाणावं. आपण प्रगतीच्या वाटेवरनं नक्कीच जावं. खूप कष्ट करावेत. पण स्पर्धा करू नये विनाकारण.’’ असेच जगले ते.

मी हायस्कूलमध्ये जाईपर्यंत आमची आर्थिक परिस्थिती अगदी बेताचीच होती. गरजेच्या गोष्टी मिळत. पण हौसमौज करता येत नसे. मात्र पैसा कमी असतानाही जीवनातला आनंद कसा लुटता येतो, हे आप्पांनी दाखवून दिलं. सुट्टीत किल्ल्यांवर राहायला जायचं महिना-पंधरा दिवस. कमीत कमी सामान न्यायचं. यथेच्छ उनाडायचं. रानमेवा खायचा. गाणी, गप्पा, खेळ अन् शिवाजी महाराजांच्या प्रेरक कथा ऐकायच्या. किल्ला बारकाईने पाहायचा. तिथले ऋ तू अनुभवायचे. किल्ल्यावरचे रहिवासी आप्पांचे मित्र. ते आमचे आप्त. माणसा- माणसातला भेद आमच्या घरात कधीही केला गेला नाही. मी वयानं मोठी होत गेले, तशी त्यांची माझी मैत्री वाढत गेली. सगळ्याच वडिलांचं लेकीवर असतं तसं त्यांचं माझ्यावर फार प्रेम. एक तर मी एकुलती एक. दिसणं बरंचसं त्यांच्यासारखं. अभ्यासाचा विषय मराठी. साहित्य, संगीत कलांवरचं प्रेम हा समान धागा. त्यांनी मला कानसेन केलं. रसिकवृत्ती जोपासली. एकदा त्यांनी पुण्याला नेलं, बिमल रॉय दिग्दर्शित ‘बंदिनी’ पाहायला. मी नूतनला पहिल्यांदाच पाहत होते पडद्यावर. म्हटलं, ‘‘आप्पा, किती उभट चेहरा, उंचीही जास्त.’’ तर म्हणाले, ‘‘त्यावर जाऊ नको. तिच्या चेहऱ्यावरचे उत्कट भाव बघ. तिचे भावस्पर्शी डोळे बघ – ते इतकं बोलतात, की बाकी सगळं विसरून आपण तिच्या कहाणीत रमून जातो.’’ मग अनुभवलं, ‘मोरा गोरा अंग’, ‘जोगी जबसे’, ‘मेरे साजन है उस पार’- एक कलात्मक नजर दिली आप्पांनी.

हळूहळू मी मनानं त्यांच्या खूप जवळ गेले. माझी आई तशी कडक शिस्तीची होती. कोणाशी कधी, काय, किती बोलायचं याचे तिचे आग्रह होते आणि निग्रहही. मात्र आप्पांचा सगळा गोतावळा तिनं मायेनं सांभाळला. आप्पा आणि माझ्यात खूप खुला संवाद होता पण आई माझी मैत्रीण झाली आमच्या मृणालच्या जन्मानंतर. आमच्या चौघांच्या छोटय़ाशा कुटुंबात विजय देव जावई म्हणून आले, त्यानं आप्पा खूप सुखावले. आपल्यासारखा जीवनावर प्रेम करणारा, अदम्य उत्साहानं सगळं काही करण्यात रस असलेला, निरपेक्ष स्नेह करणारा सुजन आनंदयात्री जावई मिळाल्यानं दोघेही सुखावले. तेही आप्पांच्या मायेच्या पंखाखाली रमले. त्यांच्याकडून कळत-नकळत खूप शिकले. हे शिकणं-शिकवणं, दाखवणं कुटुंबापुरतं मर्यादित नव्हतंच. जिथे आप्पा जात तिथली माणसं – सर्व वयाची – जोडली जात. हे सगळं आम्हा सगळ्यांपर्यंत झिरपत गेलंय.

आपला मोठेपणा त्यांनी कधी मिरवला नाही. लादला तर नाहीच. आयुष्यात हिम्मत बांधून राहणं महत्त्वाचं हे त्यांच्यांमुळे आणि माझ्या आईमुळे उमगलं. संकटप्रसंगी मन हळवं होतं, पण खंबीर होऊन उभं राहायला हवं, हेही. त्यामुळे त्यांचं प्रदीर्घ आजारपण, देहावसान, अगदी पाठोपाठ आईचं गंभीर आजारपण आणि निधन, विजयचं अवघड आजारपण आणि हे जग सोडून जाणं, अशी सलग पंधरा-सोळा वर्ष मी धिरानं उभी राहू शकले, ते केवळ त्या उभयतांनी मायेनं सोपवलेल्या पाथेयामुळे. जगण्याची दिशा त्यांनी दाखवून दिली. सक्ती न करता. कोणतेही निर्बंध न घालता मोकळीक दिली.

माझी आई कोकणात वाढलेली. शहराचं वारं तिच्यापर्यंत पोचलं नव्हतं. पण तिच्यातले उपजत गुण ओळखून आप्पांनी तिच्या व्यक्तिविकासाला संधी दिली. माझी मावशी सांगायची, ‘‘आप्पा तिला म्हणाले, ‘नीराबाई तुम्ही औंधातल्या या देवळात कीर्तन करा.’ ती बावरली. म्हणाली, ‘अहो काय म्हणताय? मी आजपर्यंत असं काही केलेलं नाही. तुम्ही करा काय करायचं ते.’ आप्पा म्हणाले, ‘नीराबाई तुम्ही गाता चांगल्या. कथा चांगल्या सांगता. सभाधीटपणा येईल तुमच्यात मला खात्री आहे.’ तिला खूप समजावून, कीर्तनाचं आख्यान लिहून ते करून घेतलं तिच्याकडून.’’ मावशीनं हे सांगितलं पण ते कीर्तन ऐकलेले कित्येक जण मला नंतर भेटले. पुढे ती आप्पांचं प्रत्येक हस्तलिखित तयार झाल्याबरोबर वाचू लागली. मत देऊ लागली. मराठी रंगभूमीवर स्त्रिया काम करायला लागल्या होत्या. त्यांचा आदर्श ठेवून आप्पांनी तिला नाटकांतही काम करायला लावलं. हे प्रोत्साहन सतत असायचं. इतकंच काय माझ्या हिम्मतवान आजीनं गोवामुक्ती संग्रामात सत्याग्रही म्हणून भाग घेतला, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी झाली, ते आप्पांच्या पाठिंब्यानंच. आपलं कलाप्रेम, दुर्गप्रेम त्यांनी मृणाल, मधुरा या दोन्ही नातींपर्यंतही पोहचवलं. अतिशय सहजपणे!

इथे त्यांच्या वाचकांबद्दलही सांगायला हवं. आप्पांना न भेटता त्यांच्या कादंबऱ्या वाचून आप्पा आपले आप्त आहेत, असं मानणारे शेकडो वाचक आहेत. आजही. आप्पांच्या नायिका, नायक त्यांना दिशार्शक वाटतात. तसं ते लिहून, भेटून कळवतात. आप्पांच्या लेखनातले उतारेच्या उतारे, कित्येकदा तर त्यांच्या पूर्ण कादंबऱ्या पाठ आहेत त्यांच्या, हेही जाणवतं. ही त्यांच्या लेखणीची मायाच की! पुन्हा पाशात न गुंतवणारी. कुठल्याही व्यावहारिक फायद्याची अपेक्षा नसलेली.

जीवनाचं गाणं आप्पा लेखनातून गात गेले. व्यथा, आनंद, प्रकाश, तिमिर जे जे अनुभवलं त्यांचं. कशाचं भांडवल न करता. सर्व वयाचे वाचक ते सारं अनुभवत राहिले आणि आप्पांना अन् आम्हाला उदंड जिव्हाळा देत राहिले. मी खूप भाग्याची म्हणून असे वडील मला लाभले. त्यांच्याकडून माझ्याकडे आली संवेदनशीलता. शब्द, स्पर्श, रूप, रंग, गंध कसे अनुभवायचे याची जाण. त्यांच्या कलावंतपणाशी माझी तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण माझ्या घरातलं कलाप्रेम मी त्यामुळे जिवंत ठेवू शकले. मी, विजय, मृणाल, मधुरा, जावई, नातवंडं सगळे एकत्र आलो की संवेदनांचा परिमळ दरवळू लागतो. त्याचं मूळ आप्पांच्या सहज आणि सतत आनंद वाटण्याच्या वृत्तीत आहे. आणि ‘दृष्टी’ देण्यात आहे.

माझी महाविद्यालयात मराठी विषयाची प्राध्यापक म्हणून निवड झाली, तेव्हाची गोष्ट. मला जवळ बसवून म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना शिकवताना कधीही तयारी केल्याशिवाय जाऊ नका. तुमच्या महाविद्यालयातले बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातले असतील. त्यांना विषय उमजेल असं शिकवावं.’’ ‘‘म्हणजे विषय खूपच सोपा करून शिकवावा लागेल आप्पा. त्यांचं वाचन काहीच नसतं. अभ्यासाक्रमाबाहेरचं.’’ ‘‘शिक्षक म्हणून तुम्हाला तेही करून घ्यावं लागेल त्यांच्याकडून जमेल तेवढं.’’ मी पटकन विचारलं, ‘‘अन् कधी बाहेरच्या श्रोत्यांसाठी बोलेन तेव्हा?’’ ‘‘सभेचे श्रोते सर्व वयाचे असतात; वेगवेगळ्या समजुतीचे. त्या सर्वाशी संवाद साधत तुम्हाला तुमचे विचार त्यांच्यापर्यंत पोचवायला हवेत. त्यांना कोडय़ात पाडायचं नाही. आणि दिलेल्या वेळेचं भान नेहमी पाळायचं.’’ आणखी एक आत्ताच सांगून ठेवतो. कधी लेखन केलंत, तर जे अनुभवलं असेल, तेच गाभ्याशी ठेवा.’’ त्यांची ही आस्थेची शिकवण मला कायमच उपयोगी पडली आहे. ‘‘कितीही मोजकं काम केलंत एखाद्या क्षेत्रात, तरी ते स्वत:च्या कर्तबगारीवर मिळवावं. ‘दांडेकरांची मुलगी’ म्हणून एखादी संधी मिळेल. पण वर्षांनुवर्षे आपण समाजाला काही देऊ शकतो ते स्वत:च्या गुणांमुळे,परिश्रमांमुळे’’ ते म्हणाले होते.

मी त्या मार्गानं चालले आहे. मी लिहू लागले, तेव्हा ते थकले होते. तरी त्यांनी त्यांच्या परीनं कौतुक केलंच. पुढचं वाचायला ते आपल्यात राहिलेच नाहीत. त्यांचं लेखन मात्र अखेपर्यंत छापायला जाण्यापूर्वी मी वाचलं. माझा चेहरा वाचत ते फेऱ्या घालायचे. माझं मत त्यांना हवंच असायचं. मी मराठीची प्राध्यापक. जाणिवा जाग्या ठेवून मी साहित्यविश्वात वावरत होते. मग मध्येच काही खास प्राध्यापैकी अभिप्राय द्यायचे. ते ऐकून तर घ्यायचेच. मग थोडा वेळ शांत बसायचे आणि म्हणायचे, ‘‘ज्ञानोबा आणि तुकोबा हे माझे गुरू. सोपं लिहावं. माणूस म्हणून चांगले संस्कार होतील, असं लिहायला हवं, असंच माझं मत आहे.’’ हीच ती लेखकाची लेखनामागची भूमिका, त्याची प्रकृती, हे समजून मग मी इतर लेखकांचं लेखनही त्याकडे लक्ष देऊन वाचू लागले. एक मनावर ठसलेली आठवण. एकदा ते आणि मी दोघंच होतो घरात. ‘जैत रे जैत’ त्यांनी नुकतंच लिहून संपवलं होतं. १९७८ ची गोष्ट आहे. ते म्हणाले, तुम्हाला थोडं वाचून दाखवतो. नाग्याच्या ढोल वाजवण्याची त्यांनी केलेली वर्णनं ते वाचू लागले.. एकेका वाक्यानं त्याची लय, ताल, घूमित्कारातून उमटणारा भाव, त्यातल्या नाग्याच्या भावनांचा अंत:सूर सगळं सगळं प्रकट होत होतं. तो एक श्रवणसुंदर अनुभव होता. एक विलक्षण संवेदनशील लेखक एका लंगोटी नेसलेल्या ठाकर कलाकाराची कला उलगडत होता. त्यातल्या माणसाच्या मनाचा वेध घेत होता. मी भारून गेले. आप्पांमधला कलाकार आणि व्यक्तिरेखेशी एकरूप झालेला माणूस मला खूप भावला. १९७४ मधली गोष्ट, त्यांचा माझा एका विषयावर सतत संवाद चाले. ज्ञानेश्वरीच्या सप्त जन्मशताब्दीच्या निमित्तानं ज्ञानेश्वरांवर एक चरित्रात्मक कादंबरी लिहावी, असं त्यांच्या मनात आलं. तेराव्या वर्षी घरातून पळाल्यानंतर हिंडत-हिंडत ते आळंदीला पोचले होते. तिथल्या वारकरी शिक्षण संस्थेत ते राहिले आणि ज्ञानेश्वरीचा यथासांग अभ्यास केला. ज्ञानेश्वर त्यांचे दैवत झाले. पुढे जन्मभर त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली, त्यावर परोपरीनं लिहिलं. अगदी दहा पानी छोटय़ांसाठी लिहिलेल्या पुस्तकापासून सार्थ ज्ञानेश्वरीपर्यंत. ज्ञानेश्वर चरित्राचा तर परिचय होताच. त्यातले ठळक प्रसंग माहिती नसतील, असा मराठी भाषिक सापडणं अवघड. पण आप्पांना चरित्र लिहायचं नव्हतं. तर त्यांच्या सृजनशील लेखणीला आता नवीन काही लिहायचे होते. वाचकांना ज्ञानेश्वर, त्यांचे माता – पिता, भावंडं यांच्यासंबंधी नवी जाणीव व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचं लेखनकौशल्य, प्रयोगशीलता महाराष्ट्रानं मान्य करून त्यांना प्रतिभावंत साहित्यिक म्हणून मान्यता दिली होती. त्यांनी लेखनाचा आराखडा तयार केला. आवश्यक ती टिपणं करून घेतली आणि लिहायला प्रारंभ केला. मला फोन आला, ‘‘राजी, आज ‘मोगरा फुलला’ लिहायला प्रारंभ करतो आहे. जसजसा पुढे जाईन तसतसं कळवीत जाईन.’’ मलाही आनंद झाला. ते आरंभ करताहेत म्हणूनही. आणि त्या लेखनाच्या प्रक्रियेत माझा वेळोवेळी ऐकून, वाचून सहभागी होण्याच्या संधीचाही. पण आठ  पंधरा दिवस झाले. आप्पा त्यासंबंधी काही बोलेनात. फोन रोज करायचे. पण अजून मनाजोगं लेखन होत नाही, म्हणायचे. मीही मग गप्प राहिले. त्यांचा ताण वाढू नये म्हणून. एका पहाटे फोनची रिंग वाजली. ‘‘राजी, अजून लिहायची वाट सापडत नाही. अद्यतन (आजच्या) भाषेत मी लिहायचा प्रयत्न करतो आहे. पण माझ्यापुढे ज्ञानोबा साक्षात्कृत होत नाही, काय करावं? अशी बेचैनी आजवर कधीच आली नव्हती.’’ मी नुसतीच ऐकत होते. काय उत्तर देणार होते मी? पण दुसऱ्याच दिवशी नेहमीपेक्षा लवकर फोन आला. पहाटे पाच वाजता, ‘‘राजी, तुम्हाला लवकर उठवलं खरं, पण मार्ग सापडला. ज्ञानोबानेच दाखवला. ज्ञानेश्वरीतला ओव्यांचा अन्वय करून पाहिला आणि त्या भाषेचा बाज वापरता येईल, असं लक्षात आलं. आता मार्ग निर्वेध झाला राजी, मनावरचा फार मोठा ताण उतरला.’’ सुदैवानं मला ‘अन्वय’चा अर्थ ठाऊक होता. (कवितेतल्या शब्दांची सरळ गद्यासारखी रचना करणे) मलाही आनंद झाला. त्यांना मार्ग सापडला, याचाही आणि त्यांच्या ताणलेल्या मन:स्थितीत त्यांनी माझ्याशी असा संवाद साधला, आणि त्या माझ्या सृजनशील वडिलांना माझी किंचितशी मदत झाली, म्हणूनही. आमचं असं बोलणं नेहमी व्हायचं. कधीमधी मतभेदही व्यक्त करायची मी. आग्रह धरत नसे. पण वेगळं मत मांडण्याइतकं खुलं नातं आमच्यात नक्कीच होतं. आपण आता पुढलं लेखन काय करणार आहोत याबद्दल ते फार आधी सांगत नसत. अगदी लिहायला सुरुवात करतानासुद्धा, पण कधी विषय आम्हाला कळला, तरी त्याला शब्दरूप कसं मिळेल याचा अंदाज करणं अवघड असे. वेगवेगळे प्रदेश अगदी वेगळी बोलीभाषा, प्रदेशात मुरलेल्या व्यक्तिरेखा, वेगवेगळे काळ, त्या त्या वेळचं समाजजीवन हे सगळं ते कसं उभं करतात याचं दर वेळी नव्यानं आश्चर्य वाटे. पुढे आम्ही त्यांच्या कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे शेकडो प्रयोग केले. पण अजूनही एखादा वाक् प्रचार, म्हण, नेमका तत्कालीन अर्थवाही शब्द त्यांना कसा सुचला असेल याचं पुन:पुन्हा आश्चर्य वाटत राहातं. ‘श्रुतयोजन’ (पूर्वी केव्हा तरी ऐकलेल्या, वाचलेल्या शब्दाचं नेमक्या वेळी नेमक्या ठिकाणी योजन) ही संकल्पना आप्पांच्या लेखनात अनेकदा अनुभवून आनंद मिळतो. मग ते संत साहित्य, प्रादेशिक साहित्य, वैदिक, धार्मिक वाङ्मय, सगळीकडे त्यांच्या जन्मभराच्या हिंडण्याचा, अभ्यासाचा, जातिवंत प्रतिभेचा तो परिपाक आहे.

१९८३ मध्ये असं झालं, ‘दुर्गभ्रमणगाथा’ प्रसिद्ध झाली. त्याची पहिली प्रत त्यांनी मला दिली. म्हणाले, ‘‘प्रस्तावना वाचा.’’ त्यांनी लिहिलं आहे, ‘परवा वीणाजवळ नव्या कादंबरीचा प्रस्ताव करता ती म्हणाली, ‘‘ते असू दे. किल्ले भटकलात. इथं तिथं त्यासंबंधी लिहिलंही आहात. पण जन्मभर किल्ल्यांशी जे तुमचं भावनिक नातं जुळलं, त्यासंबंधी तुम्ही लिहायला हवं आहे. ते काम करील असं तुम्ही वगळता दुसरं कुणी दिसत नाही. त्याची फार गरज आहे. आम्ही त्या ग्रंथाची वाट पाहत आहोत. वीणानं ही अशी ढुसकणी दिली नसती, तर आयुष्याच्या संध्याकाळी हे लिहून झालं नसतं.’’ मी रुसले त्यांच्यावर; हे लिहायचं कशाला म्हणून. तर म्हणाले, ‘‘तुमच्या आमच्या मैत्रीची वेगळी खूण नाही का ही?’’ आजही हजारो दुर्गप्रेमी ते पुस्तक घेऊन गडावर जातात, डोळसपणे गड बघतात. त्यांच्या लालित्यपूर्ण शब्दांनी, जिवंत वर्णनांनी आप्पांच्या शब्दांच्या आभाळाखाली विश्वासानं विसावतात, जाणून घेतात.

अशी माया त्यांच्या सहवासाबरोबरच जो कोणी त्यांचं लेखन मन:पूर्वक वाचेल, त्यालाही कवेत घेणारी. त्यांच्या आभाळागत मायेचा पैस खूप मोठा आहे, केवळ आमच्यापुरता तर नाहीच नाही!

2veenadeo@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2019 1:13 am

Web Title: abhalmaya special memories article go ni dandekar abn 97
Next Stories
1 भूमिकन्यांची होरपळ
2 व्यवस्थापन कामाचं
3 मनातलं कागदावर : त्या दोघींचा पाऊस
Just Now!
X