शंतनू मोघे

लहानपणी मला सायकल शिकवणारा, मी दमेपर्यंत माझ्याशी न थकता खेळणारा, बागेत घेऊन जाणारा, स्वत:चं वय विसरून माझ्या वयाचा होऊ पाहणारा, माझा सगळ्यात जवळचा मित्र, माझा बाबा. अभिनेता म्हणून त्याची प्रामुख्याने जाणवणारी बाब म्हणजे त्याचं अष्टपैलुत्व! ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये विनोदाचा बाज सांभाळणारा, ‘शेर शिवाजी’मध्ये ऐतिहासिक बाज पेलणारा, ‘स्वामी’, ‘मृत्युंजय’मध्ये खलनायक तर ‘तुज आहे तुजपाशी’, ‘अजून यौवनात मी’, ‘संकेत मीलनाचा’मधला विलोभनीय नायक साकारणारा माझा आवडता नट श्रीकांत मोघे! माझ्यासाठी आजही हा वटवृक्ष सावली धरून उभा आहे. हक्काने त्या सुखावणाऱ्या सावलीत विसावायचं आणि नवीन ऊर्जा, जोश घेऊन पुढील वाटचाल सुरू ठेवायची, कारण माझं भक्तिस्थानही तेच आणि शक्तिस्थानही!’’ सांगताहेत शंतनू मोघे आपले पिता श्रीकांत मोघे यांच्याविषयी.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

जन्मापासून आपल्याला पहिलीवहिली ओळख मिळते, ती आपल्या नावाची. पण स्वत:च्या नावाची ओळख होण्याइतपत कर्तृत्वाला वावच मिळालेला नसतो. म्हणून लहान असताना ही ओळख असते ती बाबांच्या नावाची आणि नंतर आडनावाची. बाबाचं छत्र- प्रेमाचं, मायेचं, आपुलकीचं, ममत्वाचं, संस्काराचं, शिकवणीचं, जबाबदारीचं, संयमाचं, सुरक्षेचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचारांचं!  माझ्या डोक्यावर असलेलं हे छत्र फारच मोठं, सर्वार्थानं! मुळात स्वकर्तृत्वानं कमावलेलं नावच मोठं, श्रीकांत राम मोघे. आणि या नावापलीकडचं वलय, हुशारी, धीरोदात्तपणा, ऊर्जा, वाक् चातुर्य, स्वभाव, दूरदृष्टी, समतोल, सगळंच विलक्षण!

लहान असताना प्रत्येकालाच आपला बाबा ‘हिरो’ वाटतो. पण समजण्याच्या वयात पोहोचेपर्यंत फारच कमी लोकांची आपल्या बाबाबद्दलची ‘हिरो’ प्रतिमा अबाधित राहते. पण बाबानेच शिकवलेल्या ‘सच्चाई’ला स्मरून मी सांगू शकतो, की मी त्या काही लोकांपैकी एक. बाबा हा माझा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय. आद्यकवी केशवसुतांनी म्हटलंच आहे, ‘जगाचा विस्तार केवढा- ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा.’ याचाच आधार घेऊन एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला मज पामराच्या नजरेतून मांडण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न. खरं तर माझा बाबा या एका लेखात मावण्याइतका नाहीच. भरगच्च सभेसमोर राजकीय नेत्याला माईक देताना ‘आवरतं घ्या’ किंवा फेरारी देऊन वेगमर्यादा ६० मैल प्रति तास आहे, असं सांगण्यासारखंच आहे हे. पण मिळालेली संधी कधीही सोडायची नाही हे बाबानेच शिकवलं. मनातल्या हर्षकल्लोळाला दिशा देणे किती अवघड असतं हे आज जाणवतंय. काही गोष्टी राहून जातील, त्या माझ्या जाणिवेच्या असमर्थपणामुळे आणि काही आनंदाने भांबावून गेल्यामुळे. असो..

त्याचा प्रवास थोडक्यात सांगायचा तर किलरेस्करवाडीचा जन्म, आई गृहिणी, बाबा नोकरदार आणि कीर्तनकारही. एक बहीण, एक भाऊ. शिक्षण बीएस्सी, दिल्ली रेडिओत नोकरी, दरम्यान नाटक, मग आर्किटेक्ट, एक समर्थ अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि सामाजिक भान कधीही न ढळू देणारा माणूस! कोणालाही हेवा वाटावा, असंच माझं लहानपण गेलं. आई डॉ. शोभना मोघे – बाबा श्रीकांत मोघे. मी एकुलता एक – खूप लाडात वाढलो. लहानपणी बाबा मला ‘जिनी’ वाटायचा. बोट ठेवून मागाल, ते तत्क्षणी आपलं झालेलं असायचं. एकही शब्द खाली नाही पडला. प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम! मी स्वत:ला श्रीमंत समजण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, लहानाचा मोठा होत असताना, मला माझा बाबा सतत मिळाला. याचं संपूर्ण श्रेय त्यालाच जातं. त्याचा विचार स्पष्ट होता. ‘मला माझा मुलगा डोळ्यांसमोर मोठा होताना अनुभवायचंय. त्याचमुळे त्याने कामं सांभाळून उर्वरित वेळ केवळ घरासाठी दिला. आमच्या पिढीला, आजच्या जीवनशैलीनुसार जगताना, ही संकल्पना अनावश्यक वाटेल कदाचित, पण तुमच्या घडणीच्या वयात जी व्यक्ती तुमच्या सोबत असते. ती पुढे जाऊन दुरावणं शक्यच नसतं. ‘सेलिब्रिटी चाइल्ड’ ही जाणीवच न होऊन देण्यामागचं सगळं श्रेय माझ्या आई-बाबांना! त्या काळी नाटकाचे दौरे खूप असायचे आणि मोठेही. पण घरी असला की बाबाने मला शाळेत सोडलंय, घ्यायला आलाय, जेवण भरवलंय, आई सांगते अगदी ‘शी- शू’सुद्धा धुतलीय. फक्त अभ्यास कधी घेतला नाही आणि त्याचा कधी बाऊही केला नाही.

लहान वयातच माझा बाबा कोणीतरी विशेष आहे, हे इतर लोकांच्या संभाषणातून जाणवायचं. इतर म्हणजे, घरचे, नातेवाईक, मित्रपरिवार आणि प्रचंड मोठा चाहतावर्ग. पण माझ्यासाठी मात्र, सायकल शिकवणारा, मी दमेपर्यंत माझ्याशी न थकता खेळणारा, बागेत घेऊन जाणारा, स्वत:चं वय विसरून माझ्या वयाचा होऊ पाहणारा, माझा सगळ्यात जवळचा मित्र, ‘माझा बाबा.’ खेळत असताना अचानक लपणारा अन् दुरून माझ्या त्याला शोधण्याच्या कृतीकडे लक्ष ठेवणारा, कदाचित मला लहानपणापासून धीट बनवण्याचा हा त्याचा मार्ग असावा. एक आठवण पक्की आहे, पक्षी पिल्लांना जसं चोचीने भरवतात तसा हा मला कणसाचे दाणे त्याच्या दातांनी तोडून भरवायचा. सायकल आणि पोहणं, मला दोन्ही येत नसताना त्याच्या डोळ्यात माझ्याविषयी काळजी दिसायची. पण मी जेव्हा स्वत: पोहू लागलो तेव्हाचा त्याचा तो आनंदाने हसणारा चेहरा अजूनही आठवतोय. एक प्रसंग लख्खपणे मनात आहे, सायकल शिकत असताना, एके दिवशी सायकलचा वेग वाढवत वाढवत मी एकटाच पुढे जात राहिलो तेव्हा जीव मुठीत धरून मागे पळणाऱ्या बाबाचा वेग कमी कमी होत गेला, पण त्यावेळचा त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि अभिमान यांचा मिलाफ.. तो अनुभव शब्दात न मांडता येणारा, कुठल्याही मुलाने चुकवू नये असाच. गोटय़ा, विटीदांडूपासून लॉन टेनिस आणि घोडेस्वारीपर्यंत सगळ्या खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या बाबाने मला आयुष्यात प्रत्येक गोष्टीची मजा वेगळी असते हे नजरेस आणून दिलं. संगीताचे कार्यक्रम, चित्रपट, नाटक दाखवण्यापासून अगदी त्या काळी पंचतारांकित हॉटेल्समध्ये राबता ठेवण्यापर्यंत अनेक गोष्टी त्याने माझ्यासाठी मुद्दाम केल्या. विचार हाच की माझ्या मुलाला ‘जे जे उत्तम उदात्त’ ते ते सगळं मिळालं पाहिजे.

बाबाच्या प्रत्येक कृतीमागे एक ठाम विचार असतो. पण त्याचा विचार त्याने आयुष्यात कुणावर कधीही लादला नाही. मतभेद झाले, तरी कधीही आवाज न चढवता, समोरच्याची आकलनशक्ती आणि कुवत ओळखून ‘मतभेद असू शकतात’ हे स्वीकारत समोरच्याच्या भावना न दुखावता तो चर्चेचा समारोप करायचा, असा अत्यंत शांत, विचारी आणि चतुरही! आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते हसतमुखाने जगलं पाहिजे, हे त्याने माझ्यात बिंबवलं. मराठी माणसात अत्यंत दुर्मीळ असलेला एक गुण बाबामध्ये भरभरून आहे. तो म्हणजे समोरच्या व्यक्तीचं, त्याच्या कलागुणांचं, मनाला भावणाऱ्या सगळ्या गोष्टींना दिलखुलास दाद देण्याचा, कौतुक करण्याचा स्वभाव. यातून दिसणारं त्यांचं नितळ आणि पारदर्शी मन तुमच्या मनाचा वेध घेतल्याशिवाय राहात नाही. कदाचित आधी किलरेस्करवाडीसारख्या सुसंस्कृत गावात आणि मग दिल्लीच्या उत्तर भारतीय मित्रांमुळे हे घडलं असावं. अहंकार हा शब्द त्याच्या शब्दकोशामध्येच नाही, पण अहंकार आणि आत्मप्रतिष्ठा या मधला फरक जाणून घेण्यात तो असमर्थ ठरतो तेव्हा आम्हाला त्रास होतो.

लहानपणी माझ्याबाबतीत आईचं मन काळजीनं व्यापलेलं असायचं तर बाबा बेधडक आणि बिनधास्त! पण जसा मोठा होत गेलो तसं मात्र, फिरत्या रंगमंचावरचा देखावा जितक्या बेमालूमपणे आपल्या डोळ्यासमोर बदलतो, तसं हे समीकरण बदललं. हे नक्की कधी, कसं घडलं, ते जाणून घेणं अवघडच!  शाळेत असताना उगीचच हुशार म्हणून ‘बदनाम’ झालेला मी, पुढे जाऊन एका अपघाताला सामोरा गेलो. मी अभियंता झालो. ते ही डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही मिळवत. बाबाला सांगितलं, ‘‘झालो खरा, पण मन काही रमत नाही.’’ तेव्हा मला समजावण्याच्या सुरात काका सुधीर मोघे यांचं वाक्य त्याने ऐकवलं ‘आभाळाच्या छताखाली काही वाया जात नाही.’ त्याच्या मते शिक्षण खूप महत्त्वाचं. तो स्वत: बी.एस्सी. झाला. पण सृजनाचा भोक्ता असल्याकारणानं, प्रस्थापित नट झाल्यानंतरही आर्किटेक्ट झाला. नाटकाच्या प्रयोगादरम्यान विंगेत बसून अभ्यास केला. अंगभूत हुशारी आणि त्याला मिळालेली शिक्षणाची जोड हे समीकरण दुर्मीळच. नाटकाच्या दौऱ्यांनिमित्त जग फिरला, महाराष्ट्र तर पिंजूनच काढला. तेव्हा अगदी कोकणातल्या झापाच्या थिएटर्सपासून ते ब्रॉडवेपर्यंतच्या कलाकृतींबद्दलची त्याची उत्सुकता अजूनही ताजी आहे. बाबा खाण्यापिण्याचा शौकीन. जाती-पातींचा बेंबीच्या देठापासून विरोध करणारा माझा बाबा, खाण्याच्या बाबतीत मात्र मिश्किलपणे म्हणतो, ‘जाती-पाती असण्याचा एकच फायदा, त्या नसत्या तर विविध प्रकारच्या उत्तम खाद्याला मुकलो असतो.’ अस्सल खवय्या! संगीताचीही खूप आवड. रागांपासून तालांपर्यंत सगळ्याची उत्तम जाण असलेला. ‘राग’ या शब्दाचा संदर्भ फक्त संगीताशी लावणारा..

व्यसन? प्रामुख्याने एकच – वाचन! नानाविध पुस्तकांत रमणारा. कवितांपासून राजकारणापर्यंत, वर्तमानपत्रांपासून कथा-कादंबऱ्यांपर्यंत, सगळ्याचा अधाशासारखा फडशा पाडणारा. एखादं नवं खेळणं बघून लहान मुलाचे जसे डोळे चमकतात, तसे पुस्तक बघून बाबाचे चमकतात. ऊर्जेचा स्रोत, प्रेमाचा झरा, उत्साहाचा धबधबा म्हणजे बाबा! त्याच्या दानतीचे अनेक किस्से, मला थेट बॅकस्टेज आर्टिस्ट्सपासून ते त्याच्या मित्रांपर्यंत सगळ्यांनी वारंवार ऐकवलेत. लोकसमूहात रमणारा, आनंद वाटताना स्वत:ला विसरून जाणारा, सच्चा माणूस, विचारवंत, सामाजिक बांधिलकी जोपासणारा माझा बाबा, मला आजवर फक्त ‘प्रेम आणि प्रेरणा’ देत आलाय. अशा या ‘विद्वाना’कडे अभियांत्रिकीच्या अपघातावर मलमपट्टी करायला गेलो असता, ‘‘जीवनाची गाडी भरधाव वेगानं धावण्यासाठी काय करायची इच्छा आहे?’’ असं त्यानं विचारलं. मी म्हटलं, ‘‘नट व्हायचंय.’’ (फिरोदिया करंडक, पुरुषोत्तम करंडक, अनेक आंतर महाविद्यालयीन स्पर्धाचा चस्का लागल्यामुळे – ग्लॅमरमुळे नाही) ऐकून आनंद झाला असावा. कारण ज्या क्षेत्रानं बाबाला हे सगळं दिलं, त्या क्षेत्रात मुलाने येऊ नये असं सांगण्याचा प्रश्नच नव्हता. पुन्हा एकदा ‘तुझा आनंद हाच माझा आनंद’ म्हणत, सर्व ‘प्रोज अ‍ॅन्ड कॉन्स’ विचारात घेत, माझ्या नवीन कारकीर्दीला शुभेच्छा देत, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा ठाकला. हा विश्वास पाहून ‘अख्खं जग एकीकडे आणि माझा बाबा एकीकडे’ ही भावना आजही अढळ आहे. अभिनयाकडे वळायचं ठरल्यानंतर एक गोष्ट अगदीच स्वाभाविक होती. बाबाशी त्याविषयी चर्चा, विचारांची देवाणघेवाण आणि त्याने रंगवलेल्या पात्रांचं अचूक विश्लेषण!

आज बाबा, एक अभिनेता म्हणून कसा आहे हे मी सांगणं म्हणजे काजव्याने सूर्यासमोर चमकण्याजोगंच आहे. पण सकारात्मकरीत्या पाहिलं, तर एका शिष्याने गुरूविषयी अत्यंत आदरपूर्वक आणि तटस्थ राहून केलेल्या नोंदी तुमच्यासमोर मांडतो. अतिशयोक्ती न करता, एका समर्थ, प्रगल्भ नटाच्या अंगी असणारे सगळे गुण बाबात आहेत. निसर्गत: मिळालेलं देखणेपण, मेहनतीने कमावलेली शरीरयष्टी आणि बुलंद आवाज; भाषा, वाणी आणि उच्चारांवर कमालीची पकड; प्रभावी डोळे! पण मला सगळ्यात भावणारा गुण म्हणजे त्याचं कोणत्याही पात्राशी समरस होऊन जाण्याचं कसब! अर्थात याला त्याची हुशारी, विचारपद्धती, कामाप्रति निष्ठा, अंतर्मनाचा शोध घेण्याचा ध्यास हे सगळं कारणीभूत आहे. स्मरणशक्तीचं वरदान त्याला कदाचित माझ्या कीर्तनकार आजोबांकडून मिळालं असावं. देहबोली, डोळ्यांचा वापर आणि संवादफेक हे त्याच्या विचारप्रक्रियेमधून आपसूक येणारे. त्याचा ‘स्क्रीन प्रेझेन्स’ आणि रंगमंचावरचा सहजसुंदर वावर हा नेहमीच माझ्यासह रसिक प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणारा. रंगमंचावरचं त्याचं ‘फुटवर्क आणि इझ’ पाहून अचंबित व्हायला होतं. त्याला गाणं येतं हे आणखी एक बलस्थान. म्हणूनच ‘लेकुरे उदंड जाहली’ आणि ‘बिकटवाट वहिवाट’सारखी अजरामर नाटकं त्याच्या वाटय़ाला आली. त्याचा करिअर ग्राफ पाहिला तर प्रामुख्यानं जाणवणारी बाब म्हणजे त्याचं अष्टपैलुत्व! ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये विनोदाचा बाज यशस्वीरीत्या सांभाळणारा, ‘शेर शिवाजी’मध्ये ऐतिहासिक बाजही तितक्याच समर्थपणे पेलणारा..‘स्वामी’, ‘मृत्युंजय’मध्ये खलनायक तर कधी ‘तुज आहे तुजपाशी’, ‘अजून यौवनात मी’, ‘अश्वमेध’, ‘संकेत मीलनाचा’मधला विलोभनीय नायक. त्या त्या भावनांशी आपली नाळ जोडून रंगमंचावर मुक्तपणे बागडणारा, माझा आवडता नट श्रीकांत मोघे!

एका विलक्षण घटनेचा मी मुद्दाम उल्लेख करतो, कारण माझ्या मते अशी घटना व्यावसायिक रंगभूमीवर अगदी राष्ट्रीय पातळीवरही कदाचित घडली नसावी. कडाक्याच्या थंडीत, जालन्याला ‘सीमेवरून परत जा’ या नाटकाच्या ‘ओपन एअर’ शोला खचाखच गर्दी झाली होती. नाटक ऐन रंगात आलं होतं आणि त्याच वेळी फुटलाइट्सची ऊब घेण्यासाठी एक साप थेट रंगभूमीवरच आला. बाबाच्या नजरेस पडला, मात्र स्वत:ची वाक्यं बोलत असताना डोक्यात, साप विंगेत गेला तर आतील लोकांची भंबेरी उडेल आणि प्रेक्षकांत गेला तर हलकल्लोळ माजेल हे विचार. तत्क्षणी जगज्जेता सिकंदरची भूमिका निभावत, त्याने कमरेची तलवार उपसली आणि सापावर वार करून त्याचा खात्मा केला. प्रेक्षकांना तो नाटकाचा भाग वाटला आणि त्याच्या या कृतीवर प्रेक्षकांच्या टाळ्याही पडल्या. काहींनी तर विचारलंदेखील, ‘प्रत्येक प्रयोगातच असा साप मारता का?’ बाबाच्या या प्रसंगावधानाला माझा साक्षात दंडवत!

कधी कधी वाटतं, या इतक्या मोठय़ा कलाकारावर नशिबानं थोडा अन्याय केला का? कदाचित स्वत:ची पुंगी वाजवण्यात कमी पडला असेल, कदाचित कंपूशाहीचा फटका बसला असेल.. असो, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यावर चर्चा नको.

त्याच्या आयुष्यात, रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असणारी दोन नाती म्हणजे पु. ल. देशपांडे आणि सुलोचना दीदी यांच्याबरोबरची. आजही त्यांच्याविषयी बोलताना, त्या दोहोंबद्दल असलेलं प्रेम, आदर त्याच्या शब्दांपेक्षा, स्वरातून, डोळ्यांतून अधिक व्यक्त होतो. या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा लाभलेला प्रदीर्घ सहवास हा बाबाच्या आयुष्यातला अमूल्य ठेवा. बाबाविषयी त्यांना असणारा आशीर्वादपर जिव्हाळा हे बाबाचं संचित. नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम, चंद्रकांत गोखले, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या कलाकृती त्याला नेहमीच भुरळ घालत. कलागुणसंपन्न अशा अनेक थोरामोठय़ांचा त्याला खूप जवळून सहवास लाभला. वैचारिक श्रीमंती आणि अभिरुची या गुणिजनांमुळे अधिक फुलत गेली.

अनेक जण मला म्हणतात, की तुझ्या घरीच बाबा हे एक ‘विद्यापीठ’ आहे. अगदी खरं; पण या विद्यापीठाचा अभ्यासक्रम आणि शिक्षणपद्धती जरा वेगळीच. इथं सगळ्यात जास्त भर दिला जातो तो स्वतंत्र व्यक्तिमत्त्वावर. मग ती अभिनयशैली असो अथवा व्यक्तित्व. चांगली पुस्तकं, चांगले चित्रपट हे अभ्यासपूर्ण नजरेने पाहावेत, त्यावर आपले विचार मांडावेत हा भाग झालाच; पण स्वत:चा साच्यातला गणपती न होऊ देणं हा मानस. आपल्या कामावर कोणाची तरी छाप असण्यापेक्षा, स्वत:ची एक वेगळी छाप निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असणं. या विद्यापीठामध्ये शिकवण्यापेक्षा रुजवण्याचा भाग महत्त्वाचा. माझं काम बघून, त्याने कधीही घरातल्या दिवाणखान्यात बसून मला सल्ले दिले नाहीत. कारण चित्रीकरणस्थळी किंवा रंगमंचावरच्या अनेकविध अडचणी आणि अचानक उद्भवणाऱ्या समस्यांचा त्यालाही अनुभव आहेच.

एक दुग्धशर्करा योग असा, की आम्हा दोघांच्याही वाटय़ाला एक अशी भूमिका आली, जी प्रत्येक अभिनेत्याला जगावीशी वाटते. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! या महामानवाची भूमिका बाबाने रंगमंचावर आणि मी छोटय़ा पडद्यावर साकारली. दोघेही महाराजांचे भक्त. त्याच्या वाटय़ाला आलेली व्यक्तिरेखा, पुढे जाऊन त्याच्या मुलानेही साकारावी आणि त्याने ती ‘याचि देही याचि डोळा’ पाहावी, ही त्या मुलानं त्याच्या वडिलांना दिलेली सगळ्यात मौल्यवान भेट. अतीव आनंद आणि समाधान – दोघांनाही! एकत्र काम करता आलं नाही याची मात्र रुखरुख आहेच.

नाटय़ संमेलनाध्यक्षाचं पद भूषवणं, पुस्तक लिहिणं, हे सुरू असतानाच पुण्यात बसून माझ्या नाटकाच्या प्रयोगांचं बुकिंग ते अगदी माझ्या मित्र आणि ‘विशेष मैत्रिणी’बद्दलची माहिती ठेवणं हे कधी चुकलं नाही. तो नेहमीच मला मित्र जास्त वाटला. वाह, बापलेकाचं नातं असावं तर असं!

या सगळ्यात एक खंत वाटते, ती म्हणजे बाबाला ‘व्यवहार’ फारसा जमला नाही. पैशाचं पारडं कधी जड झालं नाही. ‘स्वामी’सारखी सुरेख मालिका असो किंवा ‘शेर शिवाजी’सारखं महाराजांवरचं नाटक असो; निर्माता म्हणून यश हाती लागलं नाही. त्याचं प्रमुख कारण म्हणजे, आजूबाजूच्या लोकांवर चांगुलपणाने विश्वास ठेवला आणि त्यांनी घात केला. तरी आर्थिक संकटांवर मात करून फिनिक्स पक्ष्यासारखा एकटा त्यातून बाहेरही पडला. मनावरची जळमटं झटकताना, आम्हा दोघांमध्ये हे विषय निघतात तेव्हा ‘वरची शून्यं ही नशिबाची असतात’ असं म्हणून पुन्हा विचारांच्या बुचकळ्यात टाकणारा बाबा कधी सुधीर काकाच्या ओळीही ऐकवतो- ‘मित्रा, एका जागी नाही असे फार थांबायचे’ किंवा ‘प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो, तरीही वसंत फुलतो.’ कधी बोलून जातो, ‘आर्थिक यश नसेल मिळालं, पण जीवनाला अर्थ लाभला.’ या वाक्यावर मात्र मी स्वत:चे ओठ शिवून त्याची सकारात्मक ऊर्जा माझ्या नसानसांत उतरवण्याचा किंवा खरं तर भिनवण्याचा प्रयत्न करतो; पण तरीही वाटतंच ‘नॉट फेअर!’ ‘बनानेवाले ने कमी न की – अब किसे क्या मिला ये तो मुकद्दर की बात है।’

आयुष्यातले सगळे चढउतार अनुभवतानाही माझा बाबा कधी डगमगला नाही, ना कधी यशाची हवा डोक्यात जाऊ दिली. व्यसनाधीन न होता, स्वत:ची आणि परिवाराची पत, प्रतिष्ठा जपत, सगळ्यांना आदर-सन्मानाने वागवत, यशाची नवनवीन शिखरं गाठणारा माझा बाबा. त्याचा सार्थ अभिमान वाटतो आम्हाला. आईने बाबाला दिलेली अतूट साथ, भाऊ सुधीर मोघे आणि बहीण हेमा श्रीखंडे यांचा त्याच्याशी असलेला विशेष ऋ णानुबंध. वहिनी शुभदा मोघे हिचं मोघे घरात पाण्यातल्या साखरेसारखं विरघळणं, सून प्रियाची त्याला प्रत्येक वेळी भेटण्याची ओढ आणि या सगळ्यांवर त्याची मायेची पाखर – नि:संशय! ही व्यक्ती आपल्या पाठीशी उभी असली तर आपल्याला जग जिंकता येईल, ही भावना कुणाच्या मनात आली नाही तर नवलच. माझ्यासाठी तर आजही हा वटवृक्ष सावली धरून उभा आहे. हक्काने त्या सुखावणाऱ्या सावलीत विसावायचं आणि नवीन ऊर्जा, जोश घेऊन पुढील वाटचाल सुरू ठेवायची. कारण माझं भक्तिस्थानही तेच आणि शक्तिस्थानही!

कधी विचार करतो, बाबा – हे रसायन देवाला नेमकं कसं जमलं असेल? बहिणाबाईंच्या शब्दांत देवाला विचारायचं तर ‘कुठं जागेपनी तुला असं सपान पडलं?’ यासाठी हात जोडून मनोभावे देवाचे आभार मानावे, स्वत:ला भाग्यवान समजावे, की अशी व्यक्ती बाबा म्हणून माझ्या नशिबी आली त्याची जाण ठेवावी? काही प्रश्नांची उत्तरं नसतात, हेच खरे!

बाबाच्या प्रसंगावधानाची एक विलक्षण घटना आहे. कडाक्याच्या थंडीत, जालन्याला ‘सीमेवरून परत जा’ या नाटकाच्या ओपन एअर शोला खचाखच गर्दी झाली होती. नाटक ऐन रंगात आलं होतं आणि त्याच वेळी फुटलाइट्सची ऊब घेण्यासाठी एक साप थेट रंगभूमीवरच आला. बाबाच्या नजरेस पडला, स्वत:ची वाक्यं बोलत असतानाच डोक्यात मात्र, साप विंगेत गेला तर आतील लोकांची भंबेरी उडेल आणि प्रेक्षकांत गेला तर हलकल्लोळ माजेल हे विचार. तत्क्षणी जगज्जेता सिकंदरची भूमिका निभावत, त्याने कमरेची तलवार उपसली आणि सापावर वार करून त्याचा खात्मा केला. प्रेक्षकांना तो नाटकाचा भाग वाटला आणि त्याच्या या कृतीवर प्रेक्षकांच्या टाळ्याही पडल्या. काहींनी तर विचारलंदेखील, ‘प्रत्येक प्रयोगातच असा साप मारता का?’ बाबाच्या या प्रसंगावधानाला माझा साक्षात दंडवत!

shantanusmoghe@gmail.com

chaturang@expressindia.com