अतुल दाते

‘‘बाबा शिकत असताना आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे क्लासला जाणं परवडणारं नव्हतं. शिकायची इच्छा तर दांडगी होतीच. त्यावेळी त्यांचे गुरू के. महावीर खारला राहात असत. बाबा त्यांच्या घरी जायचे. खार ते कुलाबा अशी १- लिमिटेड डबलडेकर बस असायची. दुपारच्या, कमी गर्दीच्या वेळी ते दोघे बसच्या वरच्या मजल्यावर जाऊन बसायचे. खार ते कुलाबा महावीरजी बाबांच्या कानात गुणगुणून एखादी चीज किंवा गीत शिकवायचे आणि परतताना बाबा तीच चीज महावीरजींना गुणगुणून दाखवायचे. असं साधारण दोन वर्ष केलं. ज्या कलाकाराला एखाद्या उत्तम गुरूकडून गाणं शिकायचं असेल आणि एखाद्या गुरूलासुद्धा ते मनापासून शिकवायचे असेल तर ते कसं साध्य करायचं याचं हे अत्यंत बोलकं उदाहरण आहे.’’ सांगताहेत अतुल दाते आपल्या जगण्यावर, गाण्यावर प्रेम असणाऱ्या बाबा अरुण दाते यांच्याविषयी..

दाते घराण्यामध्ये जन्म घेणं ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. मला साधारण वयाच्या चौथ्या- पाचव्या वर्षांपासून संगीतात रुची निर्माण झाली. दहाव्या-अकराव्या वर्षी ‘आपण कधीही गाऊ नये.’ ही अक्कलही आली आणि चौदाव्या वर्षी ठरवून टाकले, की आजोबांचं, रामूभैया दाते आणि वडिलांचं, अरुण दाते यांचं नाव चिरंतन टिकवायचं असेल तर आपण गायन क्षेत्रात न गेलेलंच बरं. पण अरुण दाते, वडील असणे म्हणजे काय, याचे आयुष्य समृद्ध करणारे अनेक अनुभव माझं आयुष्य घडवत गेले.

माझ्या वयाच्या साधारण सातव्या वर्षी मी बाबांचा कार्यक्रम पहिल्यांदा पाहिला. कार्यक्रम पाहिला खरा, पण अस्वस्थ झालो. आपले बाबा किती मोठे आहेत हे कळण्याचं ते वयच नव्हतं. पण ज्यांना मी ऐकत होतो ते कुणीतरी वेगळेच भासत होते. हे आपले रोज भेटणारे बाबा? असा प्रश्न पडावा इतके वेगळे वाटले तेव्हा ते. विलक्षण वेगळी अनुभूती होती ती. त्यांचं मोठेपण कळत नव्हतं पण जाणवत होतं. पुढचे दोन दिवस बाबांच्या त्या वेगळ्या रूपाच्या प्रभावाखाली मी दबकूनच वागत होतो. पुढे त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यक्रमाला सतत गेल्यामुळे असेल, मराठी भावगीत क्षेत्रातले ते एक नामवंत गायक असल्याचं कळू लागलं. आणि मग हळूहळू हेसुद्धा जाणवलं, की ते एक सच्चे कलावंत आणि एक उमदा माणूसही आहेत. त्यांच्या अंतरंगाला सच्चेपणा आणि मनाचा मोठेपणा दिवसेंदिवस अधिकच जाणवायला लागला. त्याचा परिणाम म्हणजे वयाच्या पंधरा-सोळा वर्षांपर्यंत ‘ए बाबा’ म्हणणारा मी माझ्याही नकळत ‘अहो बाबा’ म्हणायला लागलो. अर्थात, त्यामुळे आमच्यातलं अंतर वाढलं नाही उलट कमीच झालं. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. फक्त आपल्या मुलांनाच नाही तर भेटणाऱ्या प्रत्येकाला जवळ करणं, आपलंसं करणं, ही तर बाबांची खासियत होती.

मुक्तकंठानं कौतुक करणं ही सोपी गोष्ट नाही, पण बाबांना ती कधीच अवघड वाटली नाही. ज्या गीतकार, संगीतकारांची गाणी त्यांनी गायली त्या सगळ्यांचं ऋ ण त्यांनी नेहमीच मान्य केलं. एखाद्या चांगल्या गायकाचं गाणं बाबा तन्मयतेनं ऐकत आणि त्याचं कौतुकही करत. मग तो कलाकार दिग्गज असो किंवा उदयोन्मुख. बाबा त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या कलाकाराला कधीही कमी लेखत नसत. उलट तो किती चांगलं गातो हे कौतुकानं सर्वाना सांगत. त्याचं उदाहरणच द्यायचं झालं, तर बाबांनी त्यांच्या ‘शुक्रतारा’ या आत्मचरित्रात म्हटलं आहे, ‘मला जर सुरेश वाडकर यांच्यासारखं गाता आलं असतं तर मी स्वत:ला भाग्यवान मानलं असतं.’ कौतुक करणं, दाद देणं हे मला वाटतं, आमच्या घराण्यातच रुजलेलं आहे. माझ्या आजोबांचा म्हणजे रामूभैय्या दाते यांचा कलाकारसंग्रह किती मोठा, उदंड आणि खऱ्या प्रेमानं कसा बांधलेला होता हे सर्वश्रुतच आहे. बाबांनी तीच प्रथा पुढे चालू ठेवली होती. माझा जन्म संपूर्णत: संगीतमय वातावरणात झाला. मी रामूभैय्या दाते आणि अरुण दाते यांच्या पुढच्या पिढीतला. या घरात संगीताची केवळ आवड नसून वेड असलेलं मी पाहिलं आहे.

माझ्या वडिलांचं जगभरात गायक म्हणून नाव झालं, पण सुरुवातीच्या काळात ते तबला शिकत होते, तर माझे काका तबलावादक रवी दाते, सुरुवातीला गाणं शिकत होते. पण घडलं वेगळंच. काही वर्षांनी काका तबला वाजवायला लागले आणि बाबा गाणं शिकायला, गायला लागले आणि बाबांनी भावगीताच्या इतिहासात अमूल्य कामगिरी केली. मात्र ‘आपण जे केलंय ते इतकं सुंदर आणि अलौकिक आहे,’ अशा मीपणाची बाधा न होणं, हेच किती मोठं आहे. बाबा त्यातलेच एक होते. स्वत:च्या नम्र स्वभावामुळे ते कायम जमिनीवर राहिले, म्हणूनच गानप्रेमींनी त्यांना स्वत:च्या मनात उच्च आणि अढळ स्थान दिलं.

मित्रपरिवार कसा सांभाळावा हे मला बाबांकडे पाहूनच उमगले. एक फार बोलका किस्सा आहे याबाबतचा. ‘विक्रांत’ ही युद्धनौका जेव्हा मुंबई बंदरात आली होती. ते सत्तरचं दशक होतं. तेव्हा ती पाहायला खास लोकांना आमंत्रण होतं. त्यावर काही कार्यक्रमही आयोजित केले होते. मराठी गाणी गाण्याचा मान बाबांना मिळाला होता. त्यासाठी पंधरा हजार रुपये मानधन देण्यात येणार होते. बाबांबरोबर निवडक तीन-चार लोकांनाच बोटीवर प्रवेश मिळणार होता. तेव्हा ते आयोजकांना म्हणाले, ‘तुम्ही मला बिदागी नाही दिलीत तरी चालेल, पण माझ्याबरोबर तीस-चाळीस मित्रांना ही नौका बघण्याची संधी द्यावी,’ आणि खरोखरच बिदागी न घेता बाबांनी सगळ्यांना ती नौका दाखविली. मैत्री कशी असावी तर सुभाषितात म्हटल्याप्रमाणे – वृक्षासारखी! उन्हात उभं राहून मित्रावर सावली धरणारी. हे तर बाबांनी प्रत्यक्ष त्यांच्या कृतीतूनच दाखवलं. एकदा पाडगांवकर काका (कवी मंगेश पाडगांवकर), बाबा आणि मी ‘शुक्रतारा’ या कार्यक्रमासाठी गोव्याला गेलो होतो. आम्ही गोवा विमानतळावरून बाहेर आलो, आणि कळलं की आयोजकांना यायला वेळ होता. दुपारी तीन- साडेतीनची वेळ होती. ऊन मी म्हणत होतं. आडोसा नव्हता. पाडगांवकर काका व्हीलचेअरवर बसले होते. बाबा त्यांच्या मागे जाऊन उभे राहिले, की जेणेकरून त्यांना उन्हाचा अजिबात त्रास होऊ नये. एवढंच नाही, तर बाबांनी मलाही आडोसा म्हणून उभं केलं. पाडगांवकर काकांसारखीच हृदयनाथ काका आणि बाबांची मैत्री होती. ही मैत्री फक्त सांगीतिक नव्हती तर वैयक्तिक पातळीवरही होती. नाशिकला एकदा बाबा आणि पाडगांवकर काकांचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला हृदयनाथ मंगेशकर आवर्जून आले होते. कार्यक्रमादरम्यान हृदयनाथ काका रसिकांशी बोलले, तेव्हा जाहिररीत्या म्हणाले, ‘‘मला ‘बाळ’ म्हणण्याचा अधिकार फार म्हणजे फारच कमी जणांना आहे. माझ्या घरची मंडळी सोडली, तर फक्त अरुण मला ‘बाळ’ या नावाने हाक मारू शकतो. यापेक्षा माझ्या आणि त्याच्या नात्याबद्दल मी वेगळं काय बोलू?’’ अनेकदा हृदयनाथ काका खासगी मैफिलीत असंही म्हणाले आहेत, ‘‘माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी मी घरी कधी बोललो नसेन; पण अरुणला नेहमी सांगायचो.’’ यावरून त्या दोघांचं नातं किती घट्ट होतं याचा अंदाज येतो.

बाबांनी नेहमी स्वत:पेक्षा त्यांच्या सुहृदांची, जवळच्या लोकांची खूप काळजी घेतली. काळजी घेताना त्यांनी कधीही समोरच्यावर अधिकार गाजवला नाही. आपले विचार कधी दुसऱ्यावर लादले नाहीत. प्रत्येक गोष्ट जिव्हाळ्यानं करणं हा त्यांचा स्वभाव होता. याच जिव्हाळ्यानं त्यांनी अनेकांना बांधून ठेवलं होतं. अर्थप्राप्ती, प्रतिष्ठा यापेक्षा त्यांनी प्रत्येक वेळेला माणूसच मोठा मानला. बाबा म्हणायचे, ‘‘आधी तुम्ही माणसाशी माणसासारखं वागा, मग कलाकार नाही झालात तरी चालेल.’’ त्यांनी मला त्यांच्या वागण्यातून, माणसं कशी जोडावीत हे शिकवलं. ‘पैसे सगळेच कमावतात. आपणही ते कमवायला हवेत. घर चालवायला पैसे लागतातच, पण त्याहीपेक्षा आपण मित्र कमवायला हवेत. मैत्री किंवा माणुसकी कधीही विसरता कामा नये आणि वेळच आली तर पैसा बाजूला ठेवून, माणसं जपली पाहिजेत’ असंच ते नेहमी सांगत.

रामूभैय्या दाते आणि माणिक दाते यांच्या सांगीतिक घरात जन्म झाला म्हणून असेल पण संगीत बाबांच्या रक्तातच होतं. ‘ऐकण्याचा’ कान तयार झाला होता म्हणूनच हिंदुस्थानातल्या मोठमोठय़ा कलाकारांचं गाणं, वादन त्यांनी ऐकता आलं आणि त्यांनी ते ऐकलं. त्यातूनच त्यांच्या आवडीमध्ये वैविध्य येत गेलं. बाबांना जितकं लता मंगेशकर, आशा भोसले, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, बेगम अख्तर, किशोरी आमोणकर, मेहदी हसन या कलाकारांचं गाणं आवडायचं; तितकंच त्यांना मायकल जॅक्सनसुद्धा आवडायचा. एकदा मी त्यांना भारतातील एका प्रसिद्ध गझल गायकाचं नाव घेऊन म्हटलं, ‘इतके उत्तम गझल गायक आपण ऐकले आहेत, मग यांचं गाणं आपण कसं ऐकू शकता?’ त्यावर बाबा म्हणाले, ‘त्याचं गाणं तुला आवडत नाही याचा अर्थ तुझ्या ऐकण्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे.’ बाबांच्या या उद्गारांनी मला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले.

बाबा एक प्रसिद्ध मराठी भावगीत गायक असल्यामुळे मराठी भावसंगीताचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांचं जेव्हा ‘शुक्रतारा मंद वारा’ हे पहिलं मराठी गाणं प्रसिद्ध झालं, तेव्हा बाबांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं की, आपण इंदौरचे असल्यामुळे तू बहुधा मराठी भावसंगीत कमी ऐकलं असशील. (कारण बाबांच्या म्हणण्याप्रमाणे त्या काळात मध्य प्रदेशात मराठी भावगीत गायक खूप कमी येत असत आणि रेडिओवर अजिबात मराठी गाणी वाजत नसत) पण तुझं पहिलंच गाणं इतकं लोकप्रिय झालंय म्हणजे मराठी भावगीत गायक म्हणून तुझी जबाबदारी वाढली आहे. माझं ऐकशील तर सुधीर फडके यांची जास्तीत जास्त मराठी गाणी ऐकायला सुरुवात कर. त्यातून तुला कळेल की शब्दांची, उच्चारांची सुस्पष्टता आणि स्वरांची शुद्धता म्हणजे नेमकं  काय? आणि त्यानंतर बाबांनी मनोमन कायमच बाबूजींना भावसंगीतातला गुरू मानलेलं मी बघितलंय. बाबांमध्ये एक अजब कला होती. कोणत्याही संगीतातलं चांगलं शोधायची त्यांना गरजच भासत नसे. ते आपोआपच त्यांच्यापर्यंत पोहोचत असे. याचं कारण म्हणजे संगीतावर त्यांची मनापासून श्रद्धा होती आणि अतिशय शुद्ध मनानं संगीताचा अभ्यास त्यांनी केला. बहुधा हीच शुद्धता रसिकांनाही जाणवली असावी. म्हणूनच त्यांच गाणं पंचावन्न वर्ष टिकून राहिलं.

अशा एका प्रसंगाचा मी साक्षीदार आहे, ज्यातून बाबांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक ठळक पैलू दिसून येतो. गजानन वाटवे यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्याच्या ‘बालगंधर्व मंदिर’मध्ये एक खूप मोठा कार्यक्रम आयोजत करण्याचं ठरत होतं. बाबांनी पुढाकार घेऊन वाटवे यांच्यासाठी आपण पैसे जमवायला हवेत अशी लोकांशी बोलणी सुरू केली. पण पुण्यात कार्यक्रम असूनसुद्धा या नामवंत कलाकाराच्या ८५व्या वाढदिवसाला अल्प प्रतिसाद मिळालेला पाहून बाबा अतिशय निराश झाले. तत्क्षणी त्यांनी निर्णय घेतला की त्यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना ८५ हजार रुपयांची थैली एकटय़ाने द्यायची. बाबांनी ८५ हजार रुपयांची ती थैली सर्वासमक्ष गजानन वाटवे यांच्याकडे सुपूर्द केली आणि तेथे उपस्थित असलेल्या सुमारे हजार प्रेक्षकांसमोर वाटवे यांना अक्षरश: साष्टांग नमस्कार घातला. त्याक्षणी टाळ्यांचा कडकडाट झाला. बाबा उठले आणि मायक्रोफोन हातात घेऊन म्हणाले, ‘‘हे मी कोणाला दाखवण्यासाठी किंवा टाळ्यांसाठी केलेले नाही. वाटवेसाहेबांनी महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली जाऊन मराठी भावसंगीताचे कार्यक्रम केले नसते तर अरुण दाते नावाचा भावसंगीत गायक तुम्हाला कधीच दिसला नसता. मराठी भावसंगीत महाराष्ट्रापुढे, भारतापुढे किंवा जगापुढे नेण्याचे प्रथम श्रेय वाटवे यांनाच जाते.’’बाबा माझ्या मनात मोठे होत गेले ते अशा घटनांमुळे.

बाबांचे पहिले गुरू खऱ्या अर्थाने के. महावीर. पण बाबांना पहिलं गाणं कुमार गंधर्व यांनी शिकवलं. म्हणजे तसं बघायला गेलं तर आयुष्यातले त्यांचे पहिले गुरू कुमार गंधर्व. त्यानंतर मुंबईला व्ही.जे.टी.आय. मध्ये इंजिनीअरिंगसाठी आल्यावर त्यांनी के. महावीर यांना आपले गुरू मानले. गुरूवर किती श्रद्धा असावी आणि खऱ्या अर्थानं शिष्याचं कर्तव्य कसं निभवावं हे बाबांकडून शिकावं. महावीरजी बाबांपेक्षा दोन-तीन वर्षांनी लहान होते, पण त्यांचं कर्तृत्व जाणून बाबांनी त्यांना योग्य तो मान दिला. महावरीजींचंसुद्धा बाबांवर अतिशय प्रेम होतं. बाबा व्ही.जे.टी.आय.मध्ये शिकत असताना दाते कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे रीतसर पैसे भरून क्लासला वगैरे जाणं परवडणारे नव्हते. पण शिकायची इच्छा तर दांडगी होती. आणि अशी सच्ची महत्त्वाकांक्षा असणाऱ्याला गुरूही जर सच्चा मिळाला तर चमत्कार घडतो तसं बाबा आणि त्यांच्या गुरूंमधलं नातं होतं.

के. महावीर त्या काळात खारला राहत असत. बाबा माटुंग्याहून खारला त्यांच्या घरी जायचे. खार ते कुलाबा अशी १-लिमिटेड डबलडेकर बस असायची. त्या बसच्या वरच्या मजल्यावर जाऊन दोघे बसायचे. दुपारच्या वेळी गर्दी नसायची. मग खार ते कुलाबा महावीरजी बाबांच्या कानात गुणगुणून एखादी चीज किंवा गीत शिकवायचे आणि कुलाब्याहून परतताना बाबा त्यांना ते कळलं आहे किंवा नाही यासाठी तीच चीज महावीरजींच्या कानात गुणगुणून दाखवायचे. असं साधारण दोन वर्ष त्यांनी बसच्या वरच्या मजल्यावर संगीताचं शिक्षण घेतलं. ज्या कलाकाराला एखाद्या उत्तम गुरूकडून खरंच मनापासून गाणं शिकायचं असेल आणि एखाद्या गुरूलासुद्धा ते मनापासून शिकवायचे असेल तर ते कसं साध्य करायचं याचं हे अत्यंत बोलकं उदाहरण आहे.

मी मात्र आमच्या घराण्याचा वारसा म्हणून मला मिळालेलं गाणं नाही पुढे नेऊ शकलो. मात्र याची बाबांना कधीही खंत वाटली नाही. ‘माझा मुलगा माझ्यासारखा गायकच व्हावा.’ असंही ते कधी म्हणाले नाहीत. त्यांनी मला आवडेल ते करण्याची मुभा दिली होती. ते म्हणत, ‘तुला ज्या क्षेत्रात जायचं असेल तिथं जा पण जिथे जाशील तिथे शंभर टक्के जीव ओतून काम कर.’ यातूनच प्रेरणा घेऊन जेव्हा मी ‘सारेगम’ची संकल्पना मांडली. तेव्हा बाबांनी माझं खूप कौतुक केलं. ‘सारेगम’ सोडताना अनेक आठवणींचं आणि अनुभवांचं गाठोडं माझ्याबरोबर होतं. सुदैवानं लहानपणापासून माझा संबंध अनेक मोठय़ा कवी, संगीतकार आणि गायकांशी आला. बाबांच्या शब्दांत सांगायचं झालं तर ‘‘कुठल्याही गाण्याचे शब्द उत्तम दर्जाचे नसतील तर ते गाणं कधीच चिरंतन टिकत नाही.’’ मलाही हे मनोमन पटलं होतं. हे सगळं म्हणजेच ‘जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते,’ सगळं रसिक प्रेक्षकांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचवावं असं मला वाटलं आणि त्यातून जन्म झाला ‘माणिक एन्टरटेन्मेंट’चा. माझ्या आजीचं नाव माणिक होतं. तिची आठवण अधिक चांगल्या प्रकारे माझ्याबरोबर राहावी आणि तिनं सतत माझ्या कामाची पाठराखण करावी म्हणून ‘माणिक एन्टरटेन्मेंट’मार्फत काही तरी नवीन करायचं असं मी ठरवलं होतं. अप्रत्यक्षपणे या सगळ्याची प्रेरणा मला बाबांकडूनच मिळाली होती.

बाबा आणि पाडगावकर काका यांना एकत्र घेऊन ‘शुक्रतारा मंद वारा’ या कार्यक्रमाचे तीन वर्षांत पंचावन्न प्रयोग केले. यानिमित्ताने बाबा आणि पाडगावकर काका यांच्यासोबत खूप प्रवास करता आला. यादरम्यान या दोघांकडून कळत-नकळत बरंच काही शिकायला मिळालं आणि मी अधिकाधिक समृद्ध होत गेलो. मी अनुभवली एक खरी, निखळ मैत्री, त्यांचं एकमेकांवरचं प्रेम आणि श्रद्धा. त्यांची कला आणि कामावरची निष्ठा. बाबांचे अनेक कलाकार मित्र होते. त्यांपैकी एक होते अव्वल दर्जाचे नृत्यकार गोपीकृष्ण. बाबा त्यांचे फॅन होते आणि ते बाबांचे मित्र होते. ‘झनक झनक पायल बाजे’ हा चित्रपट तयार होत होता. त्याचे नृत्यदिग्दर्शक होते गोपीकृष्ण. त्या काळी त्यांना आजच्या इतके पैसे मिळत नसत. एकदा तर त्यांच्याकडे चित्रीकरणाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारे पैसेही नव्हते. बाबा तेव्हा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकत होते. गोपीकृष्णजी बाबांना भेटले आणि स्वत:ची अडचण सांगितली. बाबांनी कुठलाही विचार न करता त्यांना जो पॉकेटमनी मिळायचा तो गोपीकृष्णजींना देऊन टाकला. ही घटना जेव्हा मला आईने सांगितली तेव्हा बाबांच्या मदत करण्याच्या आणि कलाकारातील कलागुण ओळखण्याच्या स्वभावाला दाद द्यावीशी वाटली. आपला पुढचा महिना पैशाविना कसा जाईल, हा विचार न करता एका गुणी कलाकाराचं काम पैशांअभावी अडायला नको हा विचार बाबांनी आधी केला. कलेबाबत आणि एकंदरीतच बाबांचा स्वभाव अतिशय सच्चा होता. त्यामुळे सहसा त्यांच्यापासून कोणी दुरावलं नाही. त्यांनी माणसं त्यांच्याशी जोडलेलीच राहत.

माणूस कितीही मोठा असला, लोकप्रिय असला, चांगला असला तरी वय आणि काळ कोणासाठी थांबत नाही. ज्या कलाकारांना कुठे थांबावं ते नेमकं उमगतं त्या कलाकारांच्या चांगल्या अविष्कारांच्या आठवणी दीर्घकाळ रसिकांच्या मनात रेंगाळत राहतात. हा सगळा विचार करून २०१४-१५ च्या अखेरीस बाबांनी गाण्याचे कार्यक्रम थांबवले. रसिकांना बाबांच्या गाण्यांचा पुन्हा-पुन्हा आनंद घेण्याची इच्छा असेल तर त्यासाठी काही तरी केलं पाहिजे असं वाटून, मी २०१६-१७ च्या आसपास हळूहळू ‘शुक्रतारा’ पुन्हा नव्या संचात सुरू केला. बाबा स्वत: या कार्यक्रमात गायक म्हणून सहभागी होणार नव्हते. म्हणून या कार्यक्रमाचं नाव आम्ही ‘नवा शुक्रतारा’ असं दिलं. बाबांनी ऐकलेले आणि त्यांना आवडलेले दोन गायक त्यांनीच नक्की केले. ते म्हणजे मंदार आपटे आणि श्रीरंग भावे. या दोन गुणी गायकांना घेऊन आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. बाबा गेल्यानंतरही त्यांचा चाहतावर्ग किती मोठा आहे, याची अनुभूती हा कार्यक्रम सादर करताना आम्हाला वेळोवेळी येते. आज बाबा नसले तरीही प्रत्येक प्रयोगाला कुठे तरी प्रेक्षकांमध्ये ते असल्याचा भास होतो. आमचा प्रत्येक प्रयोग बाबांच्या चरणी अर्पण आहे.

मला आई आणि बाबांनी कसं आणि काय शिकवलं याचा विचार करताना वाटतं, की मला सायकल कशी चालवायची हे माझ्या आईनं शिकवलं, पण आयुष्याचा तोल कसा सांभाळायचा हे बाबांनी शिकवलं. पोहायला आईने शिकवलं पण न बुडता कुठल्याही परिस्थितीत पार कसं जायचं हे बाबांनी शिकवलं. माझं लग्न झाल्यानंतरच्या काळात बाबा माझे मित्रच झाले. माझे वडीलच मला मित्र म्हणून लाभले यापेक्षा अजून काय पाहिजे? त्यांनी आयुष्यभर नाती जपली आणि त्यांच्या वागण्यातून आम्हालाही जपायला शिकवली. बाबांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मी अनेक गोष्टी शिकलो. असं म्हणतात, की मुलगा वडिलांचं अनुकरण करतो. मला असं वाटतं, की माझ्या बाबांच्यातला एक अंश जरी मला घेता आला तरी मी धन्य होईन. बाबांसारखेच माझेही पाय कायम जमिनीवर राहावेत हेच देवाकडे मागणं. ‘या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’ हे गाणं बाबांनी फक्त गायलेलं नाही, तर ते त्यांचं जीवनगाणंच होतं. ‘बाबा’ या नात्यात सामावणारं आकाश शब्दात मावणारं नाही. शेवटी एवढंच म्हणेन, ‘या आकाशाखाली, या पृथ्वीतलावर पुढचा जन्म कुठलाही मिळाला तरी बाबा मात्र हेच हवेत.’ हीच इच्छा त्या परमेश्वर चरणी!

atul.date@gmail.com

chaturang@expressindia.com