सुवर्णा साधू-बॅनर्जी

‘‘डॅडी, म्हणजे ख्यातनाम पत्रकार, सुप्रसिद्ध लेखक. अत्यंत शांत स्वभावाचे डॅडी, काहीही न बोलता पुष्कळ काही सांगून जात आणि प्रत्यक्ष न शिकवता स्वत:च्या कृत्यांनी खूप काही शिकवून जात. शिस्त, वेळेचं महत्त्व, आत्मविश्वास, तत्त्वनिष्ठ असणं, स्वच्छ राहणं, जे पानात वाढलंय ते खाणं, निरंतर वाचत राहणं, मुंबईचा पाऊस, मुंबईची गर्दी, एकूणच मुंबई शहरावर प्रेम करणं.. चांगले चित्रपट, उत्तम नाटकं, मधुर संगीत, सुंदर चित्रं, चविष्ट जेवण, यांची मजा लुटणं.. खंडाळ्याचा घाट, घाटातले ढग, वाहणाऱ्या धबधब्यांचे सौंदर्य आणि अशाच असंख्य गोष्टी आम्ही बहिणींनी वारसा म्हणून घेतल्यात.’’  सांगताहेत  सुवर्णा साधू-बॅनर्जी वडील, साक्षेपी पत्रकार-लेखक अरुण साधू यांच्याविषयी..

‘‘डॅडी, चिनी भाषा अजिबातच सोपी नसेल नाही का, खूप अभ्यास करावा लागेल ना?’’

मी आणि डॅडी, १९८७ च्या उन्हाळ्यात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी अर्थात जेएनयूमध्ये माझ्या प्रवेशासाठी येत असताना, मी गाडीत त्यांना विचारलं. ‘‘कठीण नसेल, इतकी प्रचंड जनसंख्या जर ती भाषा बोलू शकते, तर नक्कीच कठीण नसणार..’’ इति डॅडी. ‘‘आणि अभ्यासाचं म्हणशील तर तुला जर अभ्यास करायचा असेल तर तो कशातही करावाच लागेल ना!’’ विषय संपला. डॅडींचं हे नेहमीचंच, २-३ वाक्यात स्वत:चं म्हणणं फक्त मांडायचंच नाही तर पटवूनही द्यायचं.

डॅडी, म्हणजे ख्यातनाम पत्रकार, सुप्रसिद्ध लेखक अशी अनेक बिरुदं असलेले अरुण साधू. अत्यंत शांत स्वभावाचे डॅडी, काहीही न बोलता पुष्कळ काही सांगून जात आणि प्रत्यक्ष न शिकवता स्वत:च्या कृत्यांनी खूप काही शिकवून जात. डॅडींनी आम्हाला स्वत: असं काहीच शिकवलं नाही किंवा कधी अभ्यासाचं पुस्तक घेऊन आम्हाला शिकवलंय असं आठवतंच नाही. अर्थात, मी जे करतो तेच बरोबर आहे किंवा मी जे करतो तसंच आणि तेच तुम्ही करायला हवं, असा आग्रह, अट्टहास कधीच धरला नाही. पण त्यांच्या छोटय़ा-छोटय़ा गोष्टीच खूप काही शिकवून जात.

अरुण साधू.. या नावाला जे वलय आहे, ते प्रथम जाणवलं ग्रंथ यात्रेच्या वेळेस. १९८१-८२ चं वर्ष असावं ते. मी सातवी-आठवीत असेन. आमच्यासाठी ती एक मोठी सहलच होती. वेगवेगळ्या गावात जायचं, कार्यक्रम करायचे, पुस्तकांच्या स्टॉलवर बसायचं.. एकूणच धमाल! आम्ही सगळ्या लहानच होतो. (आम्ही म्हणजे मी आणि माझी बहिण शेफाली, आणि दोघी दिनकर गांगल कन्या अपर्णा व दीपाली) त्यामुळे सगळे आमचे लाडदेखील करत असत. पण या सगळ्या प्रवासादरम्यान एक गोष्ट मात्र प्रकर्षांने जाणवत होती. एखाद्या गावात यात्रा पोचली, की पुस्तकं विकत घेण्यासाठी जशी झुंबड उडत असे, तशीच झुंबड सोबत असलेल्या साहित्यिकांच्या, कवींच्या भोवती असायची. अशा लोकांना प्रत्यक्षात भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांची सही घेणं, हे त्या लहानलहान गावातल्या लोकांसाठी अप्रूप होतं. अशी गर्दी अरुण साधू यांच्याभोवतीदेखील असायची, किंबहुना इतरांपेक्षा जास्तच. अरुण साधू आणि नारायण सुर्वे यांच्या सह्य़ांसाठी सगळ्यात जास्त गर्दी मी पहिली. तेंव्हा प्रथमच जाणवलं, आपले  ‘डॅडी’ हे कोणीतरी खूप मोठे आहेत. तोवर त्यांचं लिखाण माझ्या आवाक्यातच नव्हतं. मी काहीच वाचलं नव्हतं. त्याच्या आधी म्हणजे मी आणखीन लहान असतांना, डॅडींच्या पुस्तकावर बेतलेला ‘सिंहासन’ चित्रपट आला होता आणि आम्ही तो पाहिलाही होता. पण तो चित्रपट कळण्याचं ते वयच नव्हतं, त्यामुळे डॅडींचं लिखाण हे किती प्रगल्भ आणि प्रभावी आहे ते त्यावेळी माहीतच नव्हतं.

आम्ही लहान असतांना ते आम्हाला गोष्टी सांगायचे. त्या ऐकायला खूप मजा वाटायची. कारण त्यांच्या गोष्टीतले वाघ, सिंह, घोडे, पाखरे, अगदी ऋषी, देव आणि राक्षससुद्धा; सकाळी उठल्यावर टूथब्रशने दात घासत, स्वत:ची गादी आवरून ठेवत, दूध पीत, साबण लावून स्वच्छ आंघोळ, व्यायाम करत असत आणि शाळेत किंवा कामावर वेळेवर पोचत असत. या आणि अशाच असंख्य छोटय़ा गोष्टी त्यांनी आम्हाला नकळत शिकवल्या. ते स्वत:देखील या गोष्टी पाळत असत. वाचून झाल्यावर वर्तमानपत्र व्यवस्थित घडी करून ठेवणे, पुस्तक वाचताना, कधीच ते उपडे न ठेवता त्यात कुठलाही चिटोरा ‘बुकमार्क’ म्हणून ठेवणे, पानात पहिल्यांदा वाढलेलं सगळं संपवायचं, वाया घालवायचं नाही, अगदी पाणीसुद्धा! अर्ध्या पेल्याची तहान आहे, मग अर्धा पेलाच पाणी घ्यायचं. पेलाभर घेऊन अर्धा पेला टाकायचं नाही, असं सगळं ते काटेकोरपणे पाळायचे.

शेफाली लहान असताना ते तिला कधीतरी भरवत. तेव्हा प्रत्येक घास दुरून यायचा, ‘हा घास आगगाडीचा..’ मग ती आगगाडी झुकझुक करत यायची आणि तो घास तोंडात जायचा. कधी विमान, कधी कोकीळ, कधी डुक्कर, तर कधी पोपट किंवा वाघ. प्रत्येक घास ते-ते आवाज घेऊन शेफालीच्या तोंडात पडायचे. आम्हाला ही मजा वाटायची. चटणी, लोणचं तिखट असलं तरी खाऊन पाहायचं, म्हणायचे, ३२ वेळा चाव, म्हणजे पाहा गोड लागतं की नाही.’’ या आणि अशा असंख्य गोष्टी, रोजच्या व्यवहारातल्या, त्यांनी न शिकवता आम्ही शिकलो.

१९८५ ला त्यांना अमेरिकेतल्या आयोवा विद्यापीठाकडून ‘इंटरनॅशनल वर्कशॉप फॉर रायटर्स’ साठी ४ महिन्यांची शिष्यवृत्ती मिळाली. भारतातून निवड झालेले ते बहुधा एकटेच होते. ही गोष्ट आमच्यासाठी फार मोठी होती. त्यादरम्यान मी त्यांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचा आवाका किती विस्तृत आहे ते कळलं. राजकारण, विज्ञान, रोजच्या जीवनातल्या गोष्टी.. काय नव्हतं त्यांच्या कथा कादंबऱ्यांमध्ये? या रोजच्या गोष्टी शब्दांमध्ये गुंफण्याची आणि त्यायोगे वाचकांना खिळवून ठेवण्याची किमया त्या पुस्तकांमध्ये होती.. नव्हे अजूनही आहेच.

२००७ ला ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या नावाभोवतीचं वलय विस्तारतच चाललंय हे लक्षात आलं. केवळ त्यांचं भाषण ऐकण्यासाठी छोटय़ा-छोटय़ा गावातून लोकं आलेले मी पहिले आहेत. जोरदार पाऊस सुरू झाला, की ‘‘अहाहा .. काय पाऊस पडतोय! बघ काय सर आली आहे!’’ असं म्हणणारे डॅडी, कधी लहर आली की बडे गुलाम अली किंवा कुमार गंधर्वाचा एखादा तुकडा गुणगुणारे डॅडी, सुस्वर बासरी वाजवणारे डॅडी, सुंदर चित्रं काढणारे डॅडी.. त्यांना इतकं मोठं, इतकं सन्माननीय व्यासपीठ मिळालं आणि परत एकदा त्यांच्या नावाच्या वलयाचं मोठेपण प्रकर्षांने जाणवलं. पुढे ते पुन्हा-पुन्हा जाणवत गेलं.

डॅडी हाडाचे पत्रकार. पण म्हणजे नक्की त्याचं काम काय हे आम्हाला माहीतच नव्हतं. फक्त कुठे संप असला किंवा बंद जाहीर झाला, की मत्रिणींच्या आई-वडिलांच्या कार्यालयाला सुट्टी असे, डॅडींना मात्र अशा वेळेस घरी यायला रोजच्यापेक्षा जास्तच उशीर होत असे. एकदा ते मला त्यांचं कार्यालय दाखवायला घेऊन गेले होते. मी लहान होते, पण आजही मला चांगलं आठवतंय, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ची ती भव्य वास्तू, ते असंख्य लोक, ती टाइपरायटर्सची अखंड खडखड आणि लोकांची लगबग. डॅडींचं टेबल नाही आठवत पण ते छापून निघालेले वर्तमानपत्र, ती अनेक काका लोकांशी झालेली भेट आणि लगबगीत भेटलेले आर. के. लक्ष्मण! मी अचंबित झाले होते. मात्र ‘तुम्ही पत्रकार व्हा’, असं त्यांनी कधीही आम्हाला सांगितलं नाही.

घर पुस्तकाचं भांडार, येणारे जाणारे डॅडींचे मित्र, म्हणजे आज आपण ज्यांना ‘सेलिब्रिटी’ म्हणतो असे लोक. त्यामुळे नकळत का होईना, पण त्या चर्चा कानावर पडत आणि आपसूक विचार करायला लावत. लहानपणी त्यांनी ‘हे पुस्तक वाच, किंवा हे नको वाचूस’, असं कधीच सांगितलं नाही, मात्र नेहमी ‘वाचन करीत चला’, हा त्यांचा धोशा असायचा. रोजचं वर्तमानपत्र वाचणे, इंग्रजी मराठी दोन्ही, ही सवय आम्हाला आपसूक लागली होती.

डॅडींचं वाचन अफाट, निरीक्षण अत्यंत सूक्ष्म आणि म्हणूनच ते जितके उत्तम लेखक होते तितकीच विश्लेषणात्मक आणि तर्कसंगत त्यांची पत्रकारिता होती. आता सांगायला हरकत नाही, पण एक वर्ष जेव्हा एका नामांकित इंग्रजी दैनिकात काम करायला लागले, तेव्हा पत्रकारिता म्हणजे नक्की काय हे कळलं आणि डॅडींनी ती या काळात का सोडली तेही थोडंफार उमगलं. अर्थात, पत्रकारिता हा माझा पिंडच नव्हता हे त्या वर्षभरातच मला कळलं ही गोष्टदेखील खरी आहे. डॅडींसारखी ती धडाडी आणि ती सरळसाधे प्रश्न थोडक्यात विचारून खरी गोष्ट काढून घ्यायची लकबसुद्धा माझ्यात नव्हती.

डॅडींचे अनेक पत्रकार मित्र होते जे घरी परतताना कुठली तरी भेटवस्तू घेऊन येत. या भेटवस्तू बहुतेकदा कुठल्या न कुठल्या पत्रकार परिषदेत मिळालेल्या असत. डॅडी मात्र नेहमी रिकाम्या हातीच येत असत. एकदा मी विचारलंच, ‘‘डॅडी, तुम्हाला का नाही देत ते लोक काही?’’ असं एकदा विचारल्यावर ते नुसतेच हसले, ‘‘तुला काय पाहिजे, आपण आणूयात.’’ नंतर पुष्कळ वर्षांनी त्यांची ही तत्त्वं समजली. त्यांची ही तत्त्वं, त्यांची मूल्ये, त्याच्याचमुळे जेव्हा पत्रकारितेत पसा यायला सुरुवात झाली, नेमकी तेव्हाच त्यांनी सक्रिय पत्रकारिता सोडली. पण पत्रकारितेत काय-काय नवीन घडतंय याची त्यांना साग्रसंगीत माहिती होती. म्हणूनच शिकवण्याचा काहीही अनुभव नसताना त्यांनी रानडे इन्स्टिय़ूटमधली (पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन विभागातली) शिकवण्याची जबाबदारी भक्कमपणे पेलली, नव्हे त्यांचे विद्यार्थी आजही, ‘असा शिक्षक होणे नाही’, असंच म्हणतात. तिथे त्यांनी नवनवीन सुधारणा आणल्या, संगणक कसा वापरावा हेदेखील शिकवलं.

स्वत:च्या मूल्यांना, तत्त्वांना आळा घालायचा नाही, हेसुद्धा एक तत्त्वच आणि साहित्य संमेलनात त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं. राष्ट्रपतींच्या भाषणाला जास्त वेळ आणि मुख्य संमेलनाध्यक्षाला कमी वेळ, याचा त्यांनी केवळ तोंडी किंवा लिखित निषेध न नोंदवता खरोखरच ‘वॉक-आऊट’ करून आपला निषेध नोंदवला. डॅडींचा कधी देवावर विश्वास नव्हता, की कुठल्याही कर्मकांडावर. आईचा मात्र पूजा-पोथी यांवर विश्वास. पण डॅडींनी कधीच आईला आडकाठी आणली नाही. त्यांचा तो स्वभावच नव्हता. मात्र त्यांना कोणी या विषयी विचारलं, की ते अगदी प्रामाणिकपणे स्वत:ची बाजू मांडत आणि पटवून देत. या दोन पूर्ण परस्परविरोधी माणसांनी जवळजवळ पन्नास वर्षे एकत्र संसार केला. तो विश्वास आणि एकमेकांच्या मतांचा आदर, याच भांडवलावर.

१९९२ मधल्या डिसेंबरच्या दंगलीच्या काही दिवस आधी मी दोन चिनी लोकांना घेऊन मुंबईला आले होते, त्यांची दुभाषी म्हणून. गेटवेसमोरच्या ताज हॉटेलमध्ये आमची सोय केलेली होती. अचानक दंगली सुरू झाल्या आणि आम्ही हॉटेलमध्ये जवळजवळ कैद झालो. पाहुण्यांचं परतीचं विमानही रद्द झालं. आई घाबरली होती. म्हणाली, ‘‘तू घरी ये पाहू, तुला आणण्याची व्यवस्था करतील डॅडी.’’ मी जाऊ शकले असते आणि जर मी सांगितलं असतं तर डॅडींनी तशी व्यवस्थाही केली असती. पण त्या पाहुण्यांची जबाबदारी आपल्यावर आहे, असं वाटलं, आणि मी ‘नाही’ सांगितलं. पुढे केव्हा तरी डॅडी ही गोष्ट कोणाला तरी फोनवर अभिमानाने सांगताना ऐकलं आणि बरं वाटलं. पण डॅडींनी आमच्यासमोर कधीच हे म्हटलं नाही.

माझे दिल्लीतले अनेक मित्र-मत्रिणी मुंबईला येत आणि त्यांना ‘मुंबई दाखवणे’ हा अर्थातच एक कार्यक्रम असे. मी त्यांना आधीच सांगायचे, ‘‘तुम्हाला ती ‘टिपिकल’ पर्यटनस्थळे दाखवण्यात मला स्वारस्य नाही. ती तुम्ही कोणत्याही कंपनीबरोबर बुकिंग करून बघू शकता.’’ मी त्यांना दाखवायचे मुंबईच्या इमारती. कुलाब्यामधल्या गेटवेपासून ते क्रॉफर्ड मार्केट (सध्याची महात्मा फुले मंडई)वरचं म्युरल आणि सीएसएमटी स्थानकाच्या इमारतीपासून त्या रांगेत असलेल्या सगळ्या जुन्या इमारती जे. जे. कला महाविद्यालय, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ इमारत इत्यादी आणि वांद्रे येथील जुन्या ख्रिश्चन घरांपासून ते दादर, लालबाग परळच्या चाळींपर्यंत. मी त्यांना दाखवायचे मुंबईची गर्दी, चर्चगेट स्टेशन, सीएसएमटी स्थानका बाहेर पडणारी लोकल ट्रेनमधली गर्दी. त्यांना घेऊन जायचे समुद्र दाखवायला पण तो महालक्ष्मी देवळामागचा खडकाळ समुद्र, खाऊ घालायचे तेही इराण्याच्या हॉटेलात. कारण डॅडींनी आम्हाला हीच मुंबई दाखवली होती. डॅडींचं मुंबईवर अतोनात प्रेम. प्रत्येक इमारत, समुद्र, समुद्रावरचा सूर्यास्त, मुंबईचा पाऊस, मुंबईची गर्दी, हे त्यांना खूप आवडायचं आणि ते आम्हाला दाखवायचेदेखील. ५-६ वर्षांपूर्वी दोन्ही नातवंडांना ते मुंबई दाखवायला घेऊन गेले होते. तेव्हादेखील तोच उत्साह होता. इमारतींमागे असलेला इतिहास सांगत होते, पण त्याचबरोबर बदलणाऱ्या मुंबईविषयी त्यांच्या मनात थोडी हळहळदेखील होती.

शिक्षणाच्या निमित्ताने मी खूप लवकर घराबाहेर पडले. आतासारखा इंटरनेटचा जमाना नव्हता. पत्र हाच संवादाचा मार्ग!, त्यातही आई आणि बहिणीबरोबर पत्रांची देवाणघेवाण जास्त असायची. डॅडींची आणि डॅडींना महिन्याकाठी फार-फार तर २-३ पत्रं, असं प्रमाण. डॅडींची पत्रंदेखील फार लहान असायची, अगदी थोडक्यात. मात्र अनेकदा वेगवेगळ्या विषयांवरची वर्तमानपत्रातली कात्रणं ते माझ्यासाठी पाठवत. पण ती वाचलीस का, हे त्यांनी कधीच नाही विचारलं, हा विश्वास. म्हणूनच हळूहळू आपण त्यांच्या विश्वासाला पात्र ठरतोय की नाही, हे आजमावणं ही एक जबाबदारी वाटायला लागली.

मी चिनी भाषा दिल्लीला जाऊन शिकायचा निर्णय घेतला, शेफालीने चित्रकला शिकण्याचा निर्णय घेतला, आम्ही दोघी बहिणींनी बंगाली मुलांशी लग्न करायचा निर्णय घेतला, लग्नानंतर आम्ही नोकरी न करता व्यवसाय करायचा निर्णय घेतला, या आणि अनेक अशा छोटय़ा-मोठय़ा प्रत्येक निर्णयाला डॅडींचा नेहमीच पाठिंबा असे. मी माझी पीएच.डी. अर्धवट सोडायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी मला सांगितलं, ‘‘तुला जर वाटतंय, की तुझी चूक नाहीये. देन स्टिक टू युवर डिसिजन.’’

डॅडींनी आम्हाला आत्मविश्वास दिला. स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायची क्षमता दिली, स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवण्याची ताकद दिली. त्यांचा स्वत:चा या गोष्टींवर विश्वास होता. त्यांच्या मते, स्त्री ही पुरुषापेक्षा अनेक बाबींमध्ये श्रेष्ठ आहे. तिने मनात आणलं तर ती खूप काही करू शकते हा विश्वास त्यांना होता. त्यांना स्त्रियांच्या कर्तृत्वाविषयी अभिमान होता. म्हणूनच बहुतेक, ते स्त्रियांच्या भावना, त्यांच्या शंका-कुशंका, अगदी बारकाव्यांसकट ओळखू शकत. म्हणूनच बहुतेक, आमच्याशीसुद्धा फारसं न बोलताही त्यांना आमच्या अनेक गोष्टी कळत असाव्यात. त्यांच्या प्रत्येक पुस्तकातील स्त्री, लाचार कधीच नव्हती. त्या स्त्रियांना स्वत:चं असं वेगळं अस्तित्व आहे, त्यांच्यात आत्मविश्वास आहे. त्या स्वतंत्र, स्वत:चे निर्णय स्वत:च घेणाऱ्या आहेत. मग ती ‘मुखवटा’ मधली म्हातारी नानी असो किंवा ‘शोधयात्रा’ तली बिनधास्त शशी असो. कळत-नकळत का होईना, पण मी आणि शेफालीनेदेखील, हीच मूल्ये, हीच तत्त्वं आत्मसात केली, अंगी बाणवली.

‘डॅडींना आम्ही ‘डॅडी’ का म्हणतो आणि बाबा का नाही,’ हेदेखील अनेक लोक विचारतात. त्यांना जेव्हा माझ्या मुलीने प्रथम ‘ए डॅडी आबा’ म्हटलं तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘तिने जर मला ‘अरुण’ अशी जरी हाक मारली असती तरी मला आवडलं असतं!’’ आमच्याशी कमी बोलणारे डॅडी नातवंडांबरोबर मात्र मस्त रमत. त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांची गाणी ऐकणं, त्यांच्याबरोबर नवनव्या ‘टेक्निक्स’ शिकणं असे त्यांचं चालू असे. अर्थात, जेव्हा ही मुले तंत्रज्ञानाचा अतिवापर करताहेत, असं त्यांना वाटलं, की ते थोडेसे नाराज व्हायचे. पुस्तकांना पर्याय नाही, वाचनाला पर्याय नाही हे त्याचं म्हणणं ते आजच्या मुलांना पटवू पाहायचे.

शिस्त, वेळेचं महत्त्व, आत्मविश्वास, तत्त्वनिष्ठ असणं, स्वच्छ राहणं, जे पानात वाढलंय ते खाणं, निरंतर वाचत राहणं, मुंबईचा पाऊस, मुंबईची गर्दी, एकूणच मुंबई शहरावर प्रेम करणं.. चांगले चित्रपट, उत्तम नाटकं, मधुर संगीत, सुंदर चित्रं, चविष्ट जेवण, यांची मजा लुटणं.. खंडाळ्याचा घाट, घाटातले ढग, वाहणाऱ्या धबधब्यांचे सौंदर्य आणि अशाच असंख्य गोष्टी आम्ही बहिणींनी वारसा म्हणून घेतल्यात.

आठवडय़ापूर्वी माझी मुलगी मला सांगत होती, ‘‘आई, असं-असं झालं आणि मला त्या लोकांचा इतका राग आला, कीविचारू नकोस. मी जोरदार भांडण करणार होते, पण मग मला डॅडी आबा आठवले आणि मी विचार केला, ते जर असते तर त्यांनी काय केला असतं? न भांडता, शांतपणे समजावून सांगितलं असतं, पटवून दिलं असतं. मी तेच केलं आई.. अ‍ॅण्ड इट वक्र्ड!’’

.. डॅडींचा ‘वारसा’ आता तिसरी पिढी चालवतेय!

suvarna@t2office.com

chaturang@expressindia.com