News Flash

आभाळमाया : अमीट ठसा

सांगताहेत आशा गाडगीळ पिता ‘वारा फोफावला..’,‘नाखवा वल्हव वल्हव’ आदींचे गीतकार बाबूराव गोखले यांच्याविषयी.. 

(संग्रहित छायाचित्र)

आशा गाडगीळ

‘‘दादांच्या गुणांचा अमीट ठसा आम्हा सर्वच भावंडांवर पडला आहे. त्यांचं गाणं घेतलं, नाटय़लेखन घेतलं तसं त्यांचा फिटनेसचा मंत्रही आम्ही आत्मसात केला.

‘नटली चैत्राची नवलाई’ हे लताबाईंचं पहिलं ध्वनिमुद्रित गीत. त्याचा मान माझ्या दादांचा आहे. दादांनी अनेक नाटके लिहिली, सादर केली, त्यासाठी ‘थ्री स्टार्स’ ही कंपनी स्थापन करून अनेक उत्तम नाटके दिली. दिग्दर्शक, निर्माते, प्रमुख भूमिका, पार्श्वसंगीत, म्युझिक सेट्स तयार करणं या सगळ्यांत अग्रेसर असणारे दादा मनाने अगदी हळवे होते.’’ सांगताहेत आशा गाडगीळ पिता ‘वारा फोफावला..’,‘नाखवा वल्हव वल्हव’ आदींचे गीतकार बाबूराव गोखले यांच्याविषयी..

‘आभाळमाया’ या सदरासाठी लिहिताना यातल्या शब्दांची वाटणी मला माझ्या आई आणि वडिलांमध्ये करावीशी वाटते. वडिलांचं आभाळ अन् आईची माया! आम्ही पाच भावंडं. मी सर्वात मोठी, एकटी मुलगी अन् पाठीवरचे चार भाऊ. म्हणून, ‘मी नशीबवान आहे,’ असं आजी मला म्हणायची.

माझ्या जन्माचा काळ म्हणजे महाराष्ट्रात भावगीत अन् दर्यागीतांचा काळ होता. वडिलांनी, आमच्या दादांनी अनेक भावगीतं लिहिली, परंतु गजानन वाटवे यांनी गायलेलं आणि दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलेलं ‘वारा फोफावला..’ हे गीत फार गाजलं. इतकं की, ‘वारा फोफावला’चे बाबूराव गोखले असंच त्यांना ओळखलं जाऊ लागलं.  पुढे वाटवे यांनी आपल्या नव्वदीच्या वाढदिवसाला सत्कारात सांगितलं की, ‘वारा फोफावला’ची चालही बाबूरावांचीच आहे. ‘नाखवा वल्हव वल्हव..’ हे त्यांचं गीतसुद्धा त्या वेळी लोकप्रिय झालं होतं. दर्यागीताच्या लोकप्रियतेवर पु. ल. देशपांडे यांनी त्यावेळी मिश्कीलपणे उद्गार काढले होते, ‘‘सध्या महाराष्ट्रात नौकानयनशास्त्र तेजीत आलेलं दिसतंय.’’ ग. का. रायकर यांनी काढलेल्या ‘गोड गोड भावगीतं’ या पुस्तकाचे बरेच भाग प्रसिद्ध झाले होते. त्यात वडिलांचा फोटो आणि त्यांनी लिहिलेली गाणी आम्ही लहानपणी बघायचो, अभिमान वाटायचा.

दादांनी महाविद्यालयीन काळातच, एस. पी. महाविद्यालयात शिकताना नाटकं लिहिणं, ती बसवणं सुरू केलं होतं. पुढे मराठी चित्रपटांसाठी त्यांनी अनेक गाणी लिहिली. ते पाहूनच मास्टर विनायक यांनी त्यांना कोल्हापूरला बोलावून घेतलं. ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटासाठी दादांनी गाणी लिहिली. दत्ता डावजेकरच संगीत देणार होते. गाणार होती एक चिमुरडी, लहान मुलगी. या मुलीने स्नेहप्रभा प्रधान या नायिकेबरोबरसुद्धा एक गाणं गायलंय. ही मुलगी म्हणजे आजच्या लता मंगेशकर! ‘नटली चैत्राची नवलाई’ हे लताबाईंचं  पहिलं ध्वनिमुद्रित गीत. त्याचा मान माझे दादा, बाबूराव गोखले यांचा आहे. ‘आले आले छकुल्या’ हे गाणंही त्यात आहे. ‘जागा भाडय़ाने देणे आहे’ या चित्रपटात दादांनी लिहिलेलं गीत वसंतराव देशपांडे यांनी अगदी मस्त गायलंय. ‘जागा मिळेल का हो शेजारी’ हे लताबाईंचं गीत आपलं आहे याचा त्यांना अभिमान होता. पुढे लताबाईंनी त्यांच्या आवडत्या कॅसेट्सचा संच बाजारात आणला त्यात त्यांचं निवेदनही आहे. लताबाईंनी त्यात लिहिलंय की, ‘माझं पहिलं गीत बाबूराव गोखल्यांचंच आहे.’ हे वाचून दादांना फार आनंद झाला असता, मात्र तोपर्यंत दादा आम्हाला सोडून गेले होते.

दादांनी मराठी चित्रपटासाठी पटकथा लेखन, साहाय्यक दिग्दर्शन, गीतलेखन, अभिनय सर्व केलं. एवढंच काय, चित्रपटनिर्मितीसुद्धा केली. ‘राजा गोसावीची गोष्ट’ यात ‘सब कुछ बाबूराव गोखले’ अशी जाहिरात असायची. इतकंच नाही तर त्यांनी ‘निरांजन’ नावाने दिवाळी अंकही प्रसिद्ध केला होता. आचार्य अत्रे यांच्या ‘बाईलवेडा’ या चित्रपटात दादांनी वनमालाबाईंबरोबर नायकाचं काम केलं होतं. त्या वेळी अत्रे यांच्यासमोर अभिनय करताना कसा संकोच वाटायचा याचं वर्णन त्यांनी अगदी मजेदार पद्धतीने आपल्या आत्मचरित्रात, ‘अन् झालं भलतंच’मध्ये केलं आहे.

पण दादांना खरं यश मिळालं ते मात्र १९५१ ला ‘करायला गेलो एक’ हे नाटक लिहून-बसवून- सादर केलं तेव्हा. ‘थ्री स्टार्स’ या कंपनीचं बारसं झालं; पण पहिल्यांदाच त्यांनी सहकारी तत्त्वावर नाटक कंपनी चालवली. म्हणजे प्रत्येक प्रयोगानंतर मिळालेला नफा सर्व नटांनी वाटून घ्यायचा, हे ठरलं. त्या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री इंदिरा चिटणीस यांचे उच्चशिक्षित यजमान अधट राव सर्व हिशोब चोख ठेवत. इतका की प्रत्येक प्रयोगानंतर प्रत्येकाची पाकिटे तयार असायची. १९५६ पासून हळूहळू तेच कंपनीचे मालक झाले आणि नाटकालाही तुफान यश मिळू लागलं. १९५६ ते १९६८  हा दादांचा सुवर्णकाळ. दादांनी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची निर्मिती केली आणि मुख्य भूमिकाही केल्या. ‘वेगळं व्हायचंय मला’ हे बाळ कोल्हटकर यांचं नाटक, ‘वऱ्हाडी माणसं’ हे पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाटक आणि शि. मो. घैसास यांचं ‘स्वयंसिद्धा’ हे नाटक. बाकी छोटी-मोठी नाटकं कंपनी करतच होती. दरम्यान, त्यांच्या लिखाणातही खंड पडला नव्हता ‘अन् झालं भलतंच’, ‘कटी पतंग’, ‘खुनाला वाचा फुटली’, ‘संसार पहावा मोडून’, अशी त्यांची नाटकेही चालूच होती. ते उत्तम गात असत. त्यामुळे नाटकाचं पार्श्वसंगीतही तेच करायचे. अर्थात दादांचं हे यश जसं मी अनुभवलं तसं त्यांचे कष्टही पाहिले. दिग्दर्शक, निर्माते, प्रमुख भूमिका, बॅकग्राऊंड, म्युझिक सेट्स तयार करणं, या सगळ्याच गोष्टी तेच बघायचे. त्यांनी कधीही कुणाचेही पैसे बाकी ठेवले नाहीत. इतकंच नाही तर कंपनी बंद करताना त्यांनी प्रत्येकाचा हिशेब चुकता केला.

आमच्या अभ्यासावर मात्र आमची आई आणि आजी (वडिलांची मावशी आमच्या घरीच होती.) लक्ष ठेवून असायच्या. दोघीही शिक्षिका होत्या. माझे तीन भाऊ अमेरिकेला जाऊन आपापल्या विषयांत डॉक्टरेट करून आले. आमच्या सर्व कुटुंबाच्या आशा-आकांक्षा माझ्या चारही भावांनी पूर्ण केल्या. आजी आणि आईला, तसंच वडिलांनाही या यशाचं फार कौतुक होतं. बाकी शाळेचं प्रगती-पुस्तक आम्ही दादांसमोर सही करायला ठेवायचो तेव्हा ते विचारायचे ‘‘कितवीत?’’ आम्ही आमची त्या वेळची इयत्ता सांगायचो. एवढाच त्यांचा आमच्या अभ्यासाशी संबंध.

मी लग्नाच्या वयाची झाले तेव्हा मात्र दादांनी वरसंशोधनात फार रस घेतला. त्यांनी आजीला सांगितलं, ‘‘आशाचा नवरा मीच पसंत करणार. माझ्या संमतीशिवाय काही करायचं नाही.’’ त्यांना माणसाची जाण आणि पारख होती. आणि झालंही तसंच. यांना (माधव गाडगीळ) बघितलं आणि त्यांचा शोध थांबला. यांना पाहून दादा खूप खूश झाले आणि माझं लग्न झालं. लग्नानंतर ४० वर्षे मी दिल्लीत होते. त्यामुळे माझं माहेरी येणं दादांना हळवं करायचं.

त्यांच्या विविध गुणांचा वारसा आम्हा पाचही जणांत आहे. त्यांच्याकडून मिळालेलं एक महत्त्वाचं अंग म्हणजे गाणं. आम्हा सर्वाना गाणं येतंच. अनेक वाद्यंही वाजवता येतात. मी आणि माझा भाऊ अजितला नाटकाचं अंग आहे. तो विनोदी एकांकिका लिहितो, दिग्दर्शित करतो. मला दिल्लीत अनेक संधी मिळाल्या. रेडिओवरच्या नाटकांत, तीनअंकी नाटकांत, स्पर्धेच्या नाटकांत मी अनेक भूमिका केल्या. अनेक कार्यक्रमांचं निवेदन ही माझी खासियत होती. कारण मी लहानपणापासून घरात साहित्य, अभिनय, गाणं पाहात, ऐकत होते. त्या सगळ्याचं निरीक्षण करून आत्मसात करण्यासाठी माझी स्मरणशक्तीही उत्तम होती. बऱ्याच नाटय़स्पर्धाची मी परीक्षकही झाले. एका कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षकाचं मनोगत म्हणून केलेलं भाषण ऐकून अनेक स्पर्धकांनी मला भेटून विचारलं, की इतके बारकावे तुम्हाला कसे ठाऊक? मी म्हटलं, ‘‘माझ्या घरातच नाटकाचं विद्यापीठ होतं ना!’’ दादा नाटकाच्या तालमी करून घरी आले, की वैशिष्टय़पूर्ण काही शिकवलं असेल तर ते इत्थंभूत सांगायचे. मला आठवतं, स्टेजवर कसं उभं राहायचं, नऊवारीत कसं चालायचं, अगदी हेसुद्धा ते शिकवायचे. ‘करायला गेलो एक’ची नायिका शीला गुप्तेच पुढे ‘वेगळं व्हायचं मला’मध्ये सोशीक-सोज्वळ सून म्हणून नऊवारी नेसून काम करणार होती. तिला त्यांनी उत्तम ‘ट्रेन’ केलं. ‘स्वयंसिद्धा’मध्ये लता काळेला, सामान्य मुलीला सासरे मुकुट घालतात तेव्हा देहबोलीत बदल करून घरातल्या मोठय़ा सुनेचा आव कसा आणायचा, संवादफेक आणि अन्य गोष्टींमध्ये बदल कसा करायचा, हे त्यांनी बारकाव्यांसकट दाखवलं होतं. हे सगळं पक्कं डोक्यात होतं त्यामुळे कुठलीही भूमिका करताना मी विचार करूनच काम केलं. मी दिल्लीत ‘करायला गेलो एक’ हे नाटक सादर केलं तेव्हा त्यांनी मला मनापासून मार्गदर्शन केलं. मी त्यात झेलमची भूमिका केली होती. त्या वेळचे फोटो मी त्यांना दाखवले. ते बघून मला म्हणाले, ‘‘मला अशीच झेलम हवी होती.’’

त्यांची दुसरी आवड होती वेळेवर नाटक सुरू करण्याची आणि संपवण्याची सुद्धा. नाटय़क्षेत्रात पहिल्यांदाच कुणी अशी अनाऊन्समेंट केली असेल, की रात्रीच्या प्रयोगानंतर शेवटची लोकल मिळेल. (अर्थात मुंबईमध्ये .) त्यांची पहिली अनाऊन्समेंट लोकप्रिय होती. ‘रेडियो टाइम नऊ वाजत आहेत. ‘थ्री स्टार्स’ नेहमीप्रमाणे सादर करीत आहे बाबूराव गोखले लिखित तीन अंकी विनोदी नाटक. नाटकाचे दोन इंटरव्हल. पहिला १७ मिनिटांचा आणि दुसरा १३ मिनिटांचा.’ ही वेळेवर नाटकं सुरू करण्याची पद्धत फक्त त्यांचीच. याचा प्रभाव आम्हा सर्व भावंडांवर कायमस्वरूपी पडला. आम्ही पाचही जणं आपापल्या गावात काही ना काही कार्यक्रम करत असतो. त्याच्या तालमींना वेळेवरच आलं पाहिजे ही आमची शिस्त सहकाऱ्यांना कधी-कधी जाचक वाटते, पण त्याचा प्रत्येकाला फायदाच होतो. दिल्लीत असताना ‘कन्यादान’ हे विजय तेंडुलकर यांचं नाटक आम्ही सादर केलं होतं. ‘सागर महाराष्ट्र मंडळ’ आणि तिथेच असलेल्या ‘मराठा रेजिमेंट’ने गणपती उत्सवात आम्हाला ते नाटक सादर करायचं निमंत्रण दिलं होतं. ‘मराठा रेजिमेंट’ म्हणजे कडक शिस्त. त्यांनी सांगितलं, ‘‘आमचे मोठे साहेब बरोबर सातला येणार. तेव्हा नाटक सुरू करा आणि नऊ वाजता नाटक संपलं पाहिजे. त्यानंतर तुमच्याबरोबर जेवण होईल आणि रात्रीच्या गाडीला आम्ही तुम्हाला बसवून देऊ. कारण दिल्लीची गाडी अवेळी असते.’’ आम्ही म्हटलं, ‘‘तसंच होईल.’’ त्याप्रमाणे सातच्या ठोक्याला आम्ही नाटक सुरू केलं अन् वेळेत संपवलं. ही रक्तात आलेली वेळेची शिस्त म्हणजे वडिलांचीच देणगी. पण गमतीचा भाग म्हणजे संपूर्ण नाटकभर कुणीही हसलं नाही की रडलं नाही. कोणताच प्रतिसाद नाही. शेवटी नाटक संपल्यावर त्यांच्या ‘बॉस’ने कौतुक करून, टाळ्या वाजवायची ‘ऑर्डर’ दिल्यावर स्टँडिंग ओव्हेशन आणि टाळ्याही मिळाल्या.

दादांना फिटनेसचं वेड होतं. त्यांच्या व्यवसायाला त्याची गरजही होती. त्यामुळे ते तब्येतीची उत्तम काळजी ठेवत, चित्रपट, नाटकांच्या विचित्र वेळापत्रकातही त्यांनी स्वत:चं आरोग्य जपलं होतं, त्यामुळे ते कधीच आजारी पडले नाहीत. ते म्हणायचे, ‘‘तुमची तब्येत उत्तम असेल तर तुम्ही वाट्टेल ते करू शकता. निरोगी माणसाचं मनही प्रसन्न राहतं. वर्षभर सगळे दौरे आटोपले की पावसाळ्यात मात्र ते घरी असायचे तेव्हा खोटं-खोटं आजारी पडायचे आणि आमच्याकडून सेवा करून घ्यायचे. त्यावेळी दादांसोबत आमच्या निवांत जेवणं-गप्पा चालायच्या. दादांचं हे फिटनेस वेड आमच्या पाचही जणांत उतरलं आहे. रोजच्या व्यायामाची आवड आम्हाला आहेच. दादा तर उत्तम खेळाडू होते. त्यांच्या तरुणपणी ते एस. पी. कॉलेजचे डावखुरे गोलंदाज होते. देवधर सरांकडे शिकलेले आणि रणजी ट्रॉफीपर्यंत जाण्याची क्षमता असलेले. आम्हीही उत्तम खेळाडू होतो, अजूनही आहोत. आम्ही भावंडं बऱ्याच ‘इंटर कॉलेजिएट मॅचेस’मध्ये खेळलो होतो. दादा विटीदांडूसुद्धा मस्त खेळायचे. आमच्या बंगल्यात आम्ही विटीदांडू खेळायचो तेव्हा दादांनी मारलेली विटी थेट शेजारच्या तिसऱ्या वाडय़ात पोचायची. पुढे लग्नानंतर जेव्हा कुटुंबाबरोबर पुण्याला येणं होई तेव्हा रात्री गच्चीत पत्त्यांचे डाव रंगायचे. ‘नॉट अ‍ॅट होम’ आणि ‘झब्बू’ हे दोन खेळ दादांना आवडायचे. शेजारी कधी हार्मोनियम असायचा. मनात आलं की  ‘शूरा मी वंदिले’सारख्या नाटय़गीतांची मैफल रंगायची. आमच्या बंगल्यात बॅडमिंटन कोर्टही होतं. त्यावर आत्या, आई आणि आम्ही सर्वच जण खेळायचो. पुढे दादांनी नाटकासाठी बस घेतली होती ती बंगल्यासमोरच्या जागेतच उभी असायची. इतकी मोठी ती जागा होती.

माझे तीन भाऊ अमेरिकेत शिकायला होते. आई तीन वेळा त्यांच्याकडे जाऊन आली. दादा व्यग्र असल्याने त्यांना नाही जाता यायचं. त्याचं त्यांना वाईटही वाटायचं. पण आईला मिष्कीलपणे म्हणायचे, ‘‘तुम्ही तिकडे गेलात तरी तुमचं नऊवारी नेसणं तसंच ठेवा. तेच तुम्हाला सुरेख दिसतं.’’ आमची आई अप्रतिम सुंदर. अगदी मराठी सौंदर्याचा नमुना. ती नात्यात काशिनाथ घाणेकरांची चुलतबहीण लागायची. पण दोघांत विलक्षण साम्य. सदा तरुण दिसणारी घाणेकर मंडळी!

मी सर्वांत मोठी असल्याने साहजिकच मला वडिलांचा जास्त सहवास मिळाला. पण दौऱ्यांमुळे ते जास्त बाहेर असत. पण ते परतले की आम्ही सगळे जण एकत्र जेवायला बसायचो. दादा आम्हाला दौऱ्यांमधल्या गमतीजमती नकला करून सांगायचे. आमची हसता हसता पुरेवाट व्हायची. इतकी, की पाटावर जेवताना खाली लोळण घ्यायची वेळ यायची. अशी वेळ आता आम्ही भावंडं जमलो, की येते. माझे भाऊही विनोदाला कमी नाहीत. एकाहून एक मजा आणतात. मात्र तेच दादा मांजराला, उंदराला आणि इंजेक्शनला घाबरायचे. त्यापासून अक्षरश: पळ काढायचे. त्याचीही फार मजा वाटायची.

आमच्या नाटक कंपनीत प्रसिद्ध नट असावेत असं आम्हाला वाटायचं, पण दादांचा दृष्टिकोन वेगळा होता. नटांच्या तारखा जुळवताना होणारी धावपळ त्यांना मान्य नव्हती. अनेक जणांचे संसार ‘थ्री स्टार्स’वर अवलंबून होते. त्यासाठी ‘तारखांसाठी आपण असतो आपल्यासाठी तारखा नसतात.’ हे तत्त्व आचरणात आणणारे नटच त्यांना कंपनीसाठी योग्य वाटत. ‘करायला गेलो एक’मुळे राजा गोसावी, शरद तळवलकर टॉपवर पोचले. ‘कला ही केवळ बुद्धिवंतांची किंवा समीक्षकांची नसून ती सर्वसामान्य रसिकांसाठी असते.’ हा विचार दादांनी मांडला. गीतसुद्धा श्रोत्यांना पटकन गाता येईल असं असावं हा त्यांचा आग्रह असायचा. त्यांनी लिहिलेली गीतं ऐकल्यावर त्याची साक्ष पटते.

दादा उत्तम संपादकसुद्धा होते. त्यांनी ‘स्वयंसिद्धा’ नाटकात बरेच बदल केले होते. दारव्हेकरांच्या ‘वऱ्हाडी माणसं’मधील वऱ्हाडी भाषा मुंबई-पुण्यातल्या प्रेक्षकांना समजणं अवघड होतं. त्यामुळे दारव्हेकरांना ते न आवडूनही त्यांनी त्यात वऱ्हाडी भाषेचा लहेजा कायम ठेवून भाषा लोकांना समजेल अशी बदलली. त्यामुळे नंतर नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सवंग लोकप्रियता हा कधीच त्यांचा उद्देश नसायचा.

आमच्यापैकी कुणीही नाटक-चित्रपट व्यवसायात जायचं नाही हे आमच्या घरात पक्कं ठरलेलं होतं. माझ्यासमोरच एका निर्मात्याने आशा नाटकात काम करेल का, अशी विचारणा केली तेव्हा दादांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. मला गाण्याचं अंग असूनही दादांनी गाणं शिकू दिलं नाही, पण लग्न झाल्यावर मी उस्ताद सुलतान खाँ यांच्याकडे शिकले. अनेक कलावंतांच्या माझ्या घरी गाण्याच्या मैफली रंगत तेव्हा दादा मला गाण्यातले बारकावे किंवा वेगवेगळ्या गायकांच्या वैशिष्टय़ांविषयी विचारायचे. त्यावर आमच्या गप्पा व्हायच्या.

ही नट मंडळी कणखर असल्याचं दाखवतात, पण प्रत्यक्षात अतिशय भावनाप्रधान किंवा हळवी असतात. दादाही तसेच होते. मला पहिली मुलगी झाली तेव्हा दादांचे दौरे जोरात सुरू होते. एका दौऱ्याहून दादा लगबगीने पहाटेच परत आले. सकाळी सहाला हॉस्पिटलला येऊन आम्हा दोघींना बघितलं आणि दुसऱ्या दौऱ्याला गेलेही. दहा दिवसांनी मी हॉस्पिटलमधून घरी जायच्यावेळी ते स्वत: टॅक्सी घेऊन आले. मला आणि नातीला घरी घेऊन आले. आमच्या घरातल्यांसाठी ही चकित करणारी गोष्ट होती. पुढे दर मे महिन्यात मुलांना घेऊन दिल्लीतून पुण्याला माहेरी यायचे. मी यायच्यावेळी दादा न चुकता दारात उभे असायचे स्वागताला. घरातल्यांना जावयाच्या पोरांची काळजी घ्यायला सांगायचे. आम्ही निघालो, की हळवे होत, ‘‘आता पुन्हा केव्हा?’’ असं विचारायचे. एके वर्षी त्यांना दारात उभं असलेलं बघितलं आणि ढासळलेली तब्येत पाहून धक्काच बसला. परत जाताना भावाला म्हटलं, ‘‘काही वाटलं तर मी किंवा हे येऊ. फोन कर.’’ आणि तसंच झालं. दोन महिन्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवल्याचा फोन आला अन् चार दिवसांत ते गेले.

आमच्यावर आपला अमीट ठसा उमटवून दादा गेले. मी त्यांना घरात कुणावरही रागावताना कधीही बघितलं नाही. आईवर तर कधीच नाही. त्या दोघांना भांडतानाही आम्ही मुलांनी कधीच पाहिलं नाही. आपण आई-वडिलांनी प्रत्यक्ष शिकवण्याची वाट पाहात नाही तर स्वत:हून शिकतो. आम्हीही असेच घडलो, त्यांना पाहात, अनुभवत मोठे झालो. दादांचं आभाळ आणि आईची माया आम्हाला आयुष्यभर पुरली.. पुरून उरलीच आहे..

artigadgil@yahoo.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 5:02 am

Web Title: abhalmaya special memories baburao gokhale abn 97
Next Stories
1 अवकाशवाटेवर..
2 अवघे पाऊणशे वयमान : जगलेल्या क्षणांतला आनंद
3 आरोग्यम् धनसंपदा : पित्तविकारावरील आहारोपचार
Just Now!
X