ज्ञानेश पेंढारकर

‘‘ललितकलादर्शच्या शताब्दीचा ध्यास अण्णांनी तिच्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमात घेतला होता. त्या वेळी अण्णांनी साठी ओलांडली होती आणि ते पंचवीस वर्षांनंतर घडणाऱ्या घटनेचा वेध घेत होते. संगीताचा वसा चालवणाऱ्या या नाटय़कर्मीने एखादी गोष्ट स्वीकारली, की ती पूर्णाशानं स्वीकारायची हा त्यांनी दिलेला मोठा धडा होता आमच्यासाठी. पुढच्या वर्षी अण्णांची जन्मशताब्दी सुरू  होते आहे, त्यानिमित्तानं हा वसा पुढे चालावा यासाठी आम्ही खास प्रयत्न करणार आहोत. ’’ सांगताहेत ज्ञानेश पेंढारकर पिता भालचंद्र पेंढारकर यांच्या नाटय़ वारशाविषयी..

Saleel Kulkarni Shared special post for son shubhankar kulkarni
“आमच्या शुभूने…”, सलील कुलकर्णींची मुलासाठी खास पोस्ट; त्याचं पहिलं हिंदी गाणं येतंय श्रोत्यांच्या भेटीला
Swargandharva Sudhir Phadke musical biopic trailer launch
राम जन्मला गं सखी…; बाबुजींच्या भावसंगीताचा रंजक प्रवास, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Purshottam Berde Reaction on sharad ponkshe and nana patekar trolling
“मी सावरकरांबद्दल बोलू का? असं तो कधीच…”, शरद पोंक्षेंच्या ट्रोलिंगबद्दल पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं मत; नाना पाटेकरांबाबत म्हणाले…
laxmikant berde son abhinay berde
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण! पहिल्या नाटकाबद्दल अभिनय म्हणाला, “आज आईबाबांच्या आशीर्वादाने…”

एक छोटासा मुलगा, त्याचे वडील त्याला रोज साहित्य संघात घेऊन जातात, तो तिथं चाललेल्या तालमी बघत राहतो, गाणं ऐकत राहतो, नाटकं पाहात राहतो. एक दिवस सहा वर्षांच्या त्या मुलाला त्याचे वडील म्हणतात, ‘‘तुला ‘रमा रमणा’ गाता येतं का रे?’’ तो ‘‘हो’’ म्हणतो. जवळच गोविंदराव पटवर्धन, मधुकाका बर्वे, दामूअण्णा पार्सेकर बसलेले असतात. वडील त्यांना सूर द्यायला सांगतात, साथ द्यायला सांगतात. सहा वर्षांच्या त्या मुलाच्या तोंडून काहीही निघू लागतं पण ते ऐकताना वडील प्रसन्न होतात. म्हणतात, ‘‘उद्या ‘जय जय गौरीशंकर’चा प्रयोग आहे, तू स्टेजवर गाशील का?’’ तो छोटा मुलगा, त्याच्या वडिलांवर असलेल्या विश्वासामुळे सहज ‘हो’ म्हणतो. त्याला कुठे ठाऊक असतं, रंगभूमीवर गायचं म्हणजे काय दडपण असतं ते! ‘बिर्ला मातोश्री’ रंगमंदिरात ‘जय जय गौरीशंकर’चा प्रयोग सुरू.. त्या छोटय़ा मुलाला, त्याचे वडील एका संवादानंतर स्वत:च्या एंट्रीऐवजी ‘नारायण, नारायण’ म्हणत नारदाच्या भूमिकेत रंगमंचावर पाठवलं. मुलगा गाऊ  लागतो, ‘रमा रमणाऽऽ’. रंगमंचावर झालेल्या त्याच्या अनपेक्षित प्रवेशामुळे त्याची अभिनेत्री आई विंगेत धास्तावते, प्रेक्षक उत्साहित होतात, त्याच्या गायनाला दाद देऊ  लागतात. इकडे मोठय़ा नारदाच्या वेशातील त्याचे वडील नि:श्वास सोडतात. ‘याला रंगभूमीवरील तणाव झेपेल का? याला इतक्या लहान वयात रंगभूमीवर ढकलून मी त्याचं नुकसान तर नाही करणार ना?’ या मनातल्या शंकेला रोखत विंगेतच स्वगत म्हणतात,  ‘‘चला वळचणीचं पाणी वळचणीलाच गेलं. ज्ञानेश रंगभूमीवर आला!’’

ही सारी कथा माझी व माझे वडील, ज्यांना सारा महाराष्ट्र ‘अण्णा’ म्हणून ओळखतो, त्या भालचंद्र पेंढारकर यांची! माझी आई मालतीबाई पेंढारकर, हीसुद्धा गायिका, अभिनेत्री होती. पण इंग्रजीत म्हणतात त्याप्रमाणे अण्णा माझ्यासाठी फ्रेंड, फिलॉसॉफर व गाइड होते. आमचे अण्णा कमी बोलत आणि जास्त बघत. त्यांची नजर स्थिर असे, पण ती नजर अवतीभवती घडणाऱ्या सर्व गोष्टींचा ठाव घेणारी होती. ‘ललितकलादर्श’चा वारसा त्यांना परंपरेनं लाभला होता. त्यांच्या वडिलांची म्हणजे बापूराव पेंढारकरांची इच्छा नव्हती, की चंदूने (अण्णांना नावाचा असा केलेला अपभ्रंश मुळीच आवडत  नसे. पण माझे आजोबा बापूराव, बालगंधर्व, केशवराव दाते यांच्यासारखे बुजुर्ग त्यांना ‘चंदू’ म्हणत. ते त्यांना पटत नसलं तरी त्यामागील स्नेहभाव कळल्यामुळे तसे दाखवत नसत. आम्हा सर्वाना त्यांनी संपूर्ण नावानं हाक मारली, व सर्वाना संपूर्ण नावानं हाक मारायला लावली. माझा कधी ‘ज्ञानू’ झाला नाही किंवा माझा मावसभाऊ  वीरेन्द्र याला आम्ही कोणी ‘विरू’ अशी हाक दिली नाही, अण्णांचा तो संस्कार होता.) नाटकात यावं. ते स्वत: अ‍ॅटोमोबाइल डिप्लोमा इंजिनीअर होते. त्यामुळे आजी व अण्णांचं बिऱ्हाड त्यांनी नाटक मंडळीपासून वेगळं ठेवलं.

बापूरावांचं अकाली निधन झालं. अण्णांचा कर्मकांडावर कधीही विश्वास नव्हता. ग्वाल्हेरला असताना बापूरावांचं निधन झालं तेव्हा अण्णा जेमतेम सोळा वर्षांचे होते. दहाव्या दिवशी पिंडदानाच्या वेळी बराच वेळ कावळा शिवेना, तेव्हा कोणी तरी (बहुधा माझी आजीच असावी) अण्णांना सांगितलं, की म्हण, ‘ललितकलादर्श’ चालवेन.’ अण्णांनी तसं म्हटलं आणि पिंडाला कावळा शिवला. तो शब्द अण्णांनी अखेपर्यंत सांभाळला. हे सांगताना अचानक एक आठवण मनात जागी झाली. अण्णांची २००७ मध्ये बायपास सर्जरी झाली होती. अवघड शस्त्रक्रिया होती. ते हळूहळू शुद्धीवर येऊ  लागले होते. मी आयसीयूमध्ये डोकावलो. ते काही तरी पुटपुटत होते, ‘‘चला, लवकर चला. वेळेत पोचायला हवं. चहा घ्या. नाटक वेळेवर सुरू व्हायला हवं.’’ काही वेळानं ते पूर्णपणे शुद्धीवर आले, त्यांनी डोळे उघडले, माझ्याकडे पाहिलं व हसले. त्यांनी मला जवळ बोलावलं, ‘‘मी काय बोलतो, ते ऐकू येतं का? कळतंय का?’’ मी ‘‘हो’’ म्हणालो. तसे ते म्हणाले, ‘‘चला बरं झालं, मी आता ‘ललितकलादर्श’च्या शताब्दीत गाऊ  शकेन.’’ वडिलांच्या आत्म्याला दिलेला शब्द मुलगा प्राणपणानं जपत होता. ‘ललितकलादर्श’च्या शताब्दीचा ध्यास त्यांनी तिच्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमात घेतला होता व माझ्या बहिणीला, गिरिजाला त्यांनी पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमातच शताब्दीचं आमंत्रण द्यायला सांगितलं. त्यावेळी अण्णांनी साठी ओलांडली होती आणि ते पंचवीस वर्षांनंतर घडणाऱ्या घटनेचा वेध घेत होते. एखादी गोष्ट स्वीकारली, की ती पूर्णाशानं स्वीकारायची हा त्यांनी दिलेला मोठा धडा होता आम्हाला.

अण्णा नेहमी सांगत, की आपलं काम सर्वात महत्त्वाचं. व्यक्तिगत गोष्टींसाठी कामाची हानी करू नका किंवा ते वेगळंही ठेऊ  नका. बापूरावांचं देहावसान झालं त्याच संध्याकाळी अण्णांना त्यांची आई म्हणाली, ‘‘आज राजवाडय़ावर शिंदे सरकारांकडे हिराबाई बडोदेकरांचं गाणं आहे, ते ऐकायला जा.’’ अण्णा राजवाडय़ावर गेले. सोळा वर्षांच्या मुलाला आत कोण सोडणार? त्यांनी दरवानाला सांगितलं, की ‘‘मी बापूरावांचा मुलगा आहे, हिराबाई मला ओळखतात, त्यांना तसं सांगा.’’ हिराबाईंना निरोप गेला. त्यांना आश्चर्य वाटलं. आज सकाळी बापूरावांचं निधन झालं आणि मुलगा गाणं ऐकायला आलाय? त्या प्रेमानं बाहेर आल्या, त्यांनी अण्णांना हात धरून आत नेलं. शिंदे सरकारांनी अण्णांचं सांत्वन केलं आणि मग हिराबाई गायला बसल्या. त्यांनी पहिलाच षड्ज लावला, तो ऐकताक्षणी अण्णांच्या डोळ्यांसमोर एक शुभ्र प्रकाश पसरला. त्यांनी डोळे मिटून घेतले नाहीत, तर त्या प्रकाशाला ते सामोरे गेले. घरी गेल्यावर ते आईला म्हणाले, ‘‘मला गाणं शिकायचंय.’’ माझी आजी त्यांना घेऊन मुंबईत आली. अण्णा ग्वाल्हेर घराण्याच्या रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे गाणं शिकले. हिराबाईंनी षड्ज लावल्यावर दिसलेला प्रकाश अण्णांना बालगंधर्वाचं गाणं ऐकताना त्यांनी लावलेल्या षड्जानंतर पुन्हा दिसला व तिसऱ्यांदा तो षड्ज लता मंगेशकर यांनी रंगमंचावर ‘भावबंधन’मध्ये गाताना षड्ज लावला त्यावेळी दिसला.

‘ललितकलादर्श’चा हीरक महोत्सव आला, तेव्हा तो भव्य साजरा करू, असं अण्णांनी ठरवलं. परंतु महोत्सवाच्या तारखांच्या काही दिवस आधी कोयना भूकंप झाला आणि सगळा कार्यक्रम फसत गेला. त्यापायी अण्णांना त्या काळात ६८ हजार रुपयांचं कर्ज झालं. मात्र अण्णांचा हिशेब चोख असायचा. प्रत्येक नाटकाचं बुकिंग कितीही असो, ठरलेली ‘नाइट’ पाकिटातून प्रत्येक  कलाकारास मिळत असे. याही नाटकांचे पैसे तर द्यावेच लागणार होते. अण्णांचे व्यवस्थापक होते भार्गवराम पांगे. त्यांना अण्णांनी विचारलं, ‘‘आता हे पैसे परत करण्यासाठी आपल्याला काही व्यवस्था करायला हवी.’’ पांगे म्हणाले, ‘‘इथं गिरगावात एक तबेला नावाचा भाग आहे, तिथून आपणास कर्जाऊ  पैसे मिळतील.’’ अण्णा म्हणाले, ‘‘ठीक आहे. तिथून पैसे उभे करू या.’’ तो भाग गुंडांचा होता. पांगे अण्णांना घेऊन तिथं गेले. कर्ज देणाऱ्या माणसानं अण्णांना पाहिलं व तो पटकन उभा राहिला. तो पांग्यांना म्हणाला, ‘‘या देवमाणसाला इथं का आणलंत? त्यांनी या भागात येणं योग्य नाही.’’ अण्णांनी उत्तर दिलं, ‘‘मला इतक्या-इतक्या पैशांची गरज आहे. तुम्ही म्हणाल तितके व्याज देण्याचा मी प्रयत्न करेन.’’ तो गृहस्थ घरात गेला. त्याने पैसे आणले आणि अण्णांच्या हातावर ठेवले. त्यानं हाक मारून स्वत:च्या मुलाला बोलावलं व सांगितलं, ‘‘हे भालचंद्र पेंढारकर. यांची नाटकं पाहून आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यांना पाहून मला आईची आठवण झाली. पेंढारकर जसे जमतील तसे ते पैसे आणून देतील. जर मध्येच मी मेलो, तरी त्यांच्याकडे पैशांसाठी जायचं नाही आणि त्यांच्याकडून व्याजाचा एक पैसाही घ्यायचा नाही.’’ अण्णांनी थोडे थोडे करून वीस वर्षांनी ते पैसे फेडले. दरम्यानच्या काळात त्या गृहस्थांचं निधन झालं पण त्यांच्या मुलानं कधीही पैसे मागितले नाहीत, ही अण्णांची पुण्याई!

या साऱ्या गोष्टी आम्हाला अण्णांनी सांगितल्या नाहीत. अण्णा खूप कमी बोलत असत. मात्र ते रोज डायरी लिहीत. त्यांच्या देहावसानानंतर त्यांच्या डायऱ्यांतून या गोष्टींची माहिती आम्हाला मिळाली. आपल्या विवंचना आपल्याजवळ, आपल्या मुलांना त्याची झळ लागू द्यायची नाही, हे त्यांचं तत्त्व होतं. ते आमच्यातही पाझरलं.

सकाळी सहा वाजता उठलेले अण्णा भरपूर न्याहारी वगैरे करत नसत. ब्रेड-बटर, एक केळं व ग्लासभर दूध एवढंच. ते दुपारचं जेवत नसत. एकभुक्त होते. पण उत्तम प्रकृतीचे नैसर्गिक वरदान त्यांना लाभलेले होते. अण्णांना साधंसं शाकाहारी जेवण आवडत असे. एखादी भाजी, दोन फुलके, आमटी, वरण-भात एवढंच जेवण त्यांना पुरत असे. ते शक्यतो बाहेरचं खाण्याचं टाळत असत. आम्हालाही तशीच सवय लागली. आमच्या घरी रात्री सारे एकत्र जेवत असू. माझी आई वरण-भात उत्तम कालवत असे. ती घरातल्या सगळ्यांसाठी वरण-भात कालवायची व सर्वाना भरवायचीही. ती अण्णांनाही भरवत असे आणि अण्णाही मिटक्या मारत तो घास खात असत. त्यांच्यातलं प्रेम अद्भुत होतं. न बोलता, वेडंवाकडं न वागता, आपलं प्रेम व्यक्त करण्याची त्यांची कृती विलोभनीय असे. अण्णा फारसे बोलत नसत पण आमच्याबरोबर खेळत असत. त्यांना क्रिकेट खेळायला आवडे. खाली अंगणात ते पोरांबरोबर खेळत असत. त्यांना ‘चायनीज चेकर्स’ हा खेळ आवडत असे. तो आमच्यासमवेत खेळत. मुलांकरता सर्व काही करण्याची त्यांची वृत्ती होती. आम्हाला खेळण्यासाठी म्हणून त्यांनी मेकॅनो आणला होता. मी सहज म्हणून बाजारात त्याची चौकशी केली, तर कळलं की आज त्याची किंमत ७५ हजार रुपये आहे. त्याही काळात तो महागच असणार पण आपल्या मुलांसाठी सर्व काही करणारा पिता होता तो. ते आम्हा मुलांमध्ये बसून मेकॅनोतून अनेक गोष्टी आवडीनं तयार करत व आम्हाला शिकवत.

‘कोणत्याही गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय त्या गोष्टीला हात लावू नये’, असं त्यांचं ठाम मत होतं. त्यांना तंत्रज्ञानाची खूप आवड होती. इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित गोष्टींबद्दल त्यांना उत्सुकता होती. आमच्या लहानपणी त्यांनी एक जर्मन स्पूलचा टेपरेकॉर्डर घेतला होता. तो घेतल्यावर ते पंधरा दिवस नुसते त्याच्याकडे पाहात बसायचे. त्याचं बुकलेट होतं. ते समजून घेण्यासाठी स्वत:च जर्मन भाषा शिकले. बुकलेट नीट वाचलं व मगच त्यांनी तो टेपरेकॉर्डर उघडला. ‘कोणत्याही गोष्टीमागचं तंत्र कळल्याशिवाय चालणार नाही.’ असा त्यांचा दंडक होता. अण्णांनी साहित्य संघात त्यांना मिळालेल्या एका खोलीत रेकॉìडग स्टुडिओ थाटला होता. अनेक नाटकांचं व नाटकासाठीचं रेकॉìडग त्यांनी इथे केलंय, तेही पैसे न घेता. समजा कोणी पैसे दिलेच, तर त्याचे निम्मे निम्मे भाग करून ते पैसे ते नाटय़ परिषदेला आणि साहित्य संघाला देत असत. त्या पावत्यांची नोंदही स्वत:जवळ करून ठेवत असत.

आमच्याकडे अण्णांचा चाहतावर्ग खूप यायचा. त्यातलाच एक गोंडा रेळे नावाचा मुलगा होता. तो सावलीसारखा त्यांच्यासोबत असायचा. नंदलाल रेळेचा तो मोठा भाऊ . एकदा मी खूप आजारी पडलो होतो. फार तर चार वर्षांचा असेन. ताप चढत होता. तो १०३ पर्यंत पोचला. मला टेपरेकॉर्डरवर गाणी ऐकायला आवडायचं. का कोण जाणे, पण मी टेपरेकॉर्डरला ‘आगिल्ला’ असं म्हणायचो. तापाच्या धुंदीत मी ‘आगिल्ला आगिल्ला’ असं ओरडत होतो. अण्णांनी तो टेपरकॉर्डर व त्याच्या स्पूल्स माझ्या हवाली केल्या. एका स्पूलची किंमत त्यावेळी सातशे रुपये होती. त्या स्पूलमधली टेप मी हाताने खेचून काढत होतो, आत घालत होतो. आई चिडली, ‘‘इतकी महागडी वस्तू मुलांच्या हाती का देता?’’ त्यावर अण्णा म्हणाले, ‘‘अगं, टेप सातशे रुपयांची आहे, ती गेली तर आणता येईल, पण मुलगा हातातून गेला तर?’’ टेपशी खेळता खेळता माझा ताप उतरला. अण्णांनी नंतर गोंडाला बोलावलं व त्या दोघांनी मिळून त्या टेप नीट गुंडाळल्या. मी जिथं तोडल्या होत्या त्या नीट जोडून ठेवल्या.

आमच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन ते जोरदार करायचे. आमच्याकडे त्या काळात प्रोजेक्टर होता. त्यावर आम्ही सोळा एम. एम. च्या फिल्म्स आणून चित्रपट पाहात असू. अण्णाही आमच्यात बसून चित्रपट पाहात असत. त्यांना किशोरकुमारचा अभिनय आवडे. आम्ही कित्येक वेळा ‘चलती का नाम गाडी’  घरी प्रोजेक्टरवर पाहिला असेल. त्यांना अशोककुमार, बलराज साहनीही आवडत. नव्या जमान्यातला अमिताभ बच्चन हा त्यांचा आवडता अभिनेता होता आणि रेखाही. ते संगीत रंगभूमीवरील अभिनेते असूनही त्यांचा कल गद्य रंगभूमीकडे अधिक होता. त्यांना आवाजाचा योग्य वापर करणारे कलाकार आवडत असत. त्यांना विनोद आवडायचा. एक गोष्ट सांगितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांना त्यांचं ‘दुरितांचे तिमीर जावो’ हे नाटक त्याच्या गंभीर प्रकृतीमुळे फारसे आवडत नसे.

मला अण्णांकडेच गाणं शिकायचं होतं. पण ते काही मला शिकवेनात. एकदा मला म्हणाले, ‘‘गाणं हे सोपं नाही. तू उद्यापासून सकाळी पाच वाजता ऊठ आणि सहा महिन्यांपर्यंत, सकाळी सात वाजेपर्यंत फक्त ‘सा’ लाव, मग शिकवेन.’’ मी ते केलं. अण्णा सकाळी पाच वाजता उठून मला तानपुरा लावून द्यायचे व सांगायचे, ‘‘आता ‘सा’ लाव.’’ व मग परत निजायचे. त्यांचं माझ्या रियाजाकडे लक्ष होतं. पण काही दिवसांनी कंटाळून मी रियाज बंद केला व आईकडे तक्रार केली, की अण्णा मला शिकवत नाहीत. आईनं त्यांना विचारलं, ‘‘असं का? तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो मेहनत करतोय ना? मग काय हरकत आहे.’’ अण्णांचे मित्र गोखले अण्णा म्हणजे विद्याधर गोखले. ते मला म्हणाले, ‘‘तुला तेच कशाला हवेत. जा दुसऱ्याकडे, स्वत:चा मार्ग स्वत: शोधायला हवा.’’ पण मीही अण्णांचाच मुलगा होतो. मीही हटून बसलो. एकदा ‘बावनखणी’चा पुणे दौरा आटोपून आम्ही पहाटे तीनच्या सुमारास घरी परतलो. मी अण्णांना म्हणालो, ‘‘आज मी सुरुवात करणार, पाच वाजता.’’ असं म्हटलं खरं आणि मग कपाळावर हात मारला. आत्ता तीन वाजले आहेत आणि दोन तासांनी मी रियाजाला बसणार असल्याची घोषणा करून बसलो. अण्णा पाचला दहा मिनिटं असताना उठले, त्यांनी तानपुरा जुळवला, मीही पाचला दोन-चार मिनिटे असताना उठलो व रियाजाला बसलो. तसा नियम मी वर्षभर पाळला. एक दिवस अण्णांनी मला ‘मम बंधु सखा’ हे नाटय़पद शिकवलं व म्हणाले ‘आता गा.’ मला ते जमेना, तेव्हा आई त्यांना म्हणाली, ‘‘अहो, पहिल्याच दिवशी त्याला इतकं अवघड पद दिलंत. कसं जमेल त्याला?’’ अण्णा म्हणाले, ‘‘जमायला हवं.’’ पण, अण्णांनी नंतर आईला सांगितलं, ‘‘याला शास्त्रीय संगीत शिकवायला हवं. मी गातो, पण शास्त्रीय संगीत शिकवायला मी योग्य गुरू नाही. तो सध्या अग्नीबुवांकडे जातोय, हे मला माहिती आहे. त्याला त्यांच्याकडेच जाऊ  दे.’’

त्यांना वाचनाची छान आवड होती. ‘कॅप्टन दीप’ त्यांचा लाडका! त्यांना ‘विचित्र विश्व’ हे मासिकही वाचायला आवडे. नाटकाचं पुस्तक ते शंभर वेळा वाचून काढत असत. आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे ते रेल्वेचं टाइम टेबल वाचत असत. त्यांना देशातली कोणती आगगाडी कोठून कोठे जाते, तिचे थांबे कोणते, त्यात पँट्री आहे किंवा नाही याची सविस्तर माहिती असे. त्यांना रेल्वेचे सर्व नियमही तोंडपाठ होते. नाटक कंपनीच्या मालकाला प्रवासाचं सर्व माहिती असायला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

मी लहान असल्यापासून अण्णा मला ‘साहित्य संघा’मध्ये घेऊन जात असत. त्यांनी एक लहान मुलगा म्हणून मला फारसं वागवलं नाही. मीही संघात आनंदानं जात असे. तिथं चालणाऱ्या नाटकांच्या तालमी, विविध ध्वनिमुद्रणं मी ऐकत व पाहात असे. त्याचा फायदा मला झालाच. एकदा ‘परंपरा’ नावाचा एक कार्यक्रम आम्ही ‘दादर माटुंगा कल्चरल सेंटर’वर करत होतो. मी, मुकुंद मराठे, कीर्ती शिलेदार, शुभदा दादरकर असे त्यात होतो. अचानक गाता गाता माझा आवाज बसला. तोंडातून फक्त हवा यायला लागली. मी हवालदिल झालो. दुसऱ्या दिवशी ठाण्यात तोच कार्यक्रम करायचा होता. मी शुभदाला म्हणालो, ‘‘मला गाता येणार नाही.’’ घरी येऊन नीलाक्षीला सांगितलं. ही गोष्ट २०१४ ची. अण्णांनी ऐकलं. त्यांचं विस्मरण सुरू झालं होतं. माझं नाव त्यांना आठवेना. त्यांना घेऊन या असं ते म्हणाले. मी समोर उभा राहिलो.

अण्णा म्हणाले, ‘‘उद्या गायलाच हवं, कसंही होईना पण गा.’’

‘‘अण्णा, या आवाजात कसं गाणार?’’

‘‘मार्ग काढा, पण गा..’’ त्यांची आज्ञा शिरसावंद्य! मी विचार करत बसलो, आपला आवाज कोणत्या क्षणी बसला ते आठवू लागलो. आणि लक्षात आलं, की आपण ‘आ’कार लावताना आपला घसा बसलाय. ‘आ’कार लावताना शक्ती लागते. मी ‘ए’काराने सुरू करू या असा विचार केला आणि पहाटे तीनच्या सुमारास झोप लागली. सकाळी ‘ए’कार लावून गाऊन पाहिलं. आवाज निघत होता. संध्याकाळी जेव्हा मी गायला बसलो, तेव्हा अण्णांच्या आशीर्वादाचं स्मरण करून ‘ए’कार लावला आणि हळूहळू माझा आवाज सुटत गेला. कीर्ती, शुभदा साऱ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. घरी आल्यावर अण्णांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘स्वत:चा मार्ग स्वत:च शोधावा लागतो.’’

अण्णा कोणाहीबाबत वाईट बोलत नसत. ते सांगायचे, ‘‘कोणीही सर्वगुणसंपन्न नसतो. प्रत्येकात गुणावगुण असणारच. आपण त्यांच्यातले गुण घ्यायचे, अवगुण सोडायचे.’’ नीरक्षीरविवेक करता आला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. त्या आग्रहानेच आम्हाला घडवलं. एक नक्की सांगू शकतो की, आपला जन्म कोणाच्या पोटी होणं हे आपल्या हाती नसतं, मात्र मिळालेला जन्म सार्थकी लावणं, किमान त्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हाती असतं. पुढच्या वर्षी अण्णांची जन्मशताब्दी सुरू होते आहे, त्यानिमित्तानं आम्ही हा प्रयत्न करणार आहोत. मी महाराष्ट्रातल्या एका महान संगीत-नाटय़ अभिनेत्याच्या व अभिनेत्रीच्या पोटी जन्म घेतला हे माझं भाग्य, त्यांचा संगीत नाटकाचा वसा जपण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो, ते आमचं सद्भाग्य!

शब्दांकन- प्रा. नितीन आरेकर

dnyaneshkumar@yahoo.co.in

chaturang@expressindia.com