News Flash

आभाळमाया : अभिजात संगीताचा गायक

प्रत्येकजण नेहमीच आपल्या आई-वडिलांचं अस्तित्व  जाणता-अजाणता आयुष्यभर अनुभवत असतो.

(संग्रहित छायाचित्र)

श्रीनिवास जोशी

‘‘आषाढी एकादशीच्या काळात गावोगावी भक्तिसंगीताचे कार्यक्रम किती होतात, हे सांगायला नको. याच गाणाऱ्या सर्वावर बाबांचे ऋण आहे. कारण संतरचना ‘कॉन्सर्ट प्लॅटफॉर्म’वर आणणारे ते पहिलेच. या ‘संतवाणी’ला इतकी मागणी होती की, एका महिन्यात बाबांनी ‘संतवाणी’चे बावीस कार्यक्रम केले. सुगम संगीताचे कार्यक्रम कधीही शास्त्रीय संगीतापेक्षा लोकप्रिय आणि आर्थिकदृष्टय़ा लाभप्रद असतात; पण त्यांना वाटायला लागलं की, आपलं शास्त्रीय गायनाकडे दुर्लक्ष होतं आहे तेव्हा त्यांनी ‘संतवाणी’चे कार्यक्रम कमी केले. पुढे काहींनी त्यांना लोकप्रिय गाणी गायची विनंती केली होती, पण बाबांनी नकार दिला. म्हणाले, ‘जिस चीजके लक्षण अच्छे नही होते वह मैं करता नहीं!’  त्यांचा नकार मला उमगला. तिथेही भरपूर पैसे मिळाले असते, पण त्यांना आपली ‘अभिजात संगीताचा गायक’ ही प्रतिमा, त्या वयातला वागण्यातला आब महत्त्वाचा वाटला.’’ सांगताहेत श्रीनिवास जोशी आपले पिता भीमसेन जोशी यांच्याविषयी..

प्रत्येकजण नेहमीच आपल्या आई-वडिलांचं अस्तित्व  जाणता-अजाणता आयुष्यभर अनुभवत असतो. आपली मूल्ये, प्रत्येक प्रसंगाला तोंड देतानाची आपली वर्तणूक आणि निर्णय घेण्याची क्षमता बऱ्याचदा आपल्या आई-वडिलांच्या व्यक्तिमत्त्वातून, वागणुकीतून आले आहेत, असं अनेकदा जाणवतं. त्यामुळे आज बाबा जाऊन इतकी वर्षे होऊनही ते शरीराने नसले तरी मानसरूपाने माझ्याबरोबर आहेत हे सतत जाणवत राहतं.

प्रामाणिकपणे सांगायचं तर लहानपणी मला त्याचं वेगळेपण कधी जाणवलंच नव्हतं याचं कारण अर्थात त्यांचं अत्यंत साधं राहणं- वागणं, पण हळूहळू त्यांच्या रसिकांकडूनच त्यांच्यातील असामान्य कला आणि अतिमानुषता समजून घेता आली. माझे आई-बाबा दोघेही गायक असले तरी मुलांवर मात्र त्यांनी कधीच गाण्याची सक्ती केली नाही, पण आमच्या घरी कलासक्त वातावरण होतं. कला क्षेत्रातील आणि इतरही मोठय़ा माणसांची घरात ये-जा होती. त्यांच्या आणि बाबांच्या गप्पा ऐकणं, ही एक पर्वणी असायची आमच्यासाठी!

त्यांच्या गाण्याच्या जेव्हा ध्वनिमुद्रिका निघत, तेव्हा कलाकाराला एक वा दोन कॉपी मिळत. त्या आल्या, की त्यांची पारायणे व्हायची. बाबांची ‘मिया मल्हार’ची रेकॉर्ड माझ्या फार आवडीची, मला ते गायला लावत. तसंच त्यांची अभंगवाणी, ‘पिया तो मानत नाही,’ ही ठुमरीसुद्धा गायला लावायचे आणि आम्हा मुलांचे कौतुकही करायचे. शिवाय आमचे बंधू  सिनेसंगीत, मेहदी हसन, गुलाम अली क्वचित पाश्चात्त्य ध्वनिमुद्रिकाही आणत. बाबांना त्याचं वावडं नसे. ते ती गाणीही ऐकायचे. बाबांचे शिष्य घरी येत. साहजिकच त्यांना शिकवताना किंवा बाबांच्या गाण्याच्या घरी चालणाऱ्या तालमींमधूनही माझ्यावर संगीताचे संस्कार होत गेले. पुढे पुढे त्यांची अनेक गाणी मुंबईत रेकॉर्ड झाली. त्या वेळी बऱ्याचदा मी त्यांच्या सोबत असायचो, साहजिकच वेगळाच गानसंस्कार माझ्यावर होत गेला.

आमचं संगोपन, शिक्षण वगैरेची सर्व जबाबदारी माझ्या आईवर असल्याने बाबा निश्चिंत असत. माझी आई वत्सला जोशी हे एक तेजस्वी आणि मनस्वी व्यक्तिमत्त्व होतं. अगदी बाबांच्या तोडीस तोड! संगीतावरील निरपेक्ष प्रेम, हा तिला आणि बाबांना सांधणारा समान दुवा होता. महाराष्ट्रातील एका मोठय़ा घराण्यात तिचा जन्म झाला होता. बालपणापासून सुधारक विचारांचं वारं तिच्यावर वेगळे संस्कार करून गेलं. युवा अवस्थेत निजाम राज्यातील एक उत्तम गायिका म्हणून तिचं नावही झालं होतं. तिचे सर्व नातेवाईक सरदार, जहागीरदार, लष्करात उच्चाधिकारी होते. पण हे सर्व सोडून एका गायकाशी लग्न करणं म्हणजे पुराणातल्या शिव-पार्वती कथेची आठवण करून देणारं होतं. स्वत:च्या कलेला दुय्यम स्थान देऊन बाबांना आणि आम्हा मुलांना रुळावर ठेवण्यात तिनं आयुष्यभर झगडा केला. तिच्या निश्चयी साधनेचं मोल आत्ता आत्ता लक्षात येऊ लागलं आहे. अनेक गायक, त्यांची विविध प्रकारची गायकी, यांचा परिचय तिच्यामुळे मला झाला. तिला वाचन आणि पुस्तकांचं खूप मोल होतं. घरात आर्थिक परिस्थिती काही रेलचेलीची नसे, पण उत्तम पुस्तकं आणून आम्हा मुलांनाही तिनं वाचनाची गोडी लावली होती. माझ्यासाठी ती काहीशी मागच्या पिढीतली होती, पण काही बाबतीत तिची मते आश्चर्य वाटावी इतकी आधुनिक होती. पण तिच्या ठाम श्रद्धा तिने कधीही बदलल्या नाहीत.

माझ्या आई-बाबांच्या पिढीत श्रद्धा जास्तच होती, असं म्हणायला हरकत नाही. उदाहरणार्थ, पं. जवाहरलाल नेहरू वारले तेव्हा, तसंच लालबहादूर शास्त्री वारले तेव्हा तिने दोन्ही वेळा एक दिवस उपवास केला होता. आज आमच्या काहीशा टवाळ आणि अश्रद्ध पिढीत असं काही घडेल, हे अवघडच. पण अशी मनस्वी, श्रद्धावान माणसं असू शकतात हे मला माझ्या आईबाबांच्या उदाहरणामुळे बघायला तरी मिळाली. आमच्या पिढीतल्या लोकांच्या मुलांना हे भाग्य मिळणार आहे का?

आई आणि बाबांमध्ये तसा रूढार्थाने व्यवहारीपणा नव्हता. दोघांच्याही ऐहिक गरजा कमी होत्या. पण काही गोष्ट घ्यायची तर उत्तमातली उत्तम घ्यायची, नाही तर नाही, असा राजाचा स्वभाव दोघांचाही होता. इतर गायकांच्या गाण्याला जाणं, त्यातली एखादी चांगली गोष्ट बाबांच्या लक्षात आणून देणं, बंदिशीतील शब्दांचा अर्थ समजून घेणं, प्रसंगी वाईटपणा घेऊनही बाबांच्या कलंदर स्वभावाचा कुणाला गैरफायदा घेऊ न देणं, मुलांचं संगोपन, घरी राहणाऱ्या शिष्यांच्या गायनाकडे लक्ष, संसारातील  बरी-वाईट आव्हाने अशा अनेक आघाडय़ांवर लढण्यात आईचं आयुष्य गेलं. स्वत:मधला कलाकार जरा बाजूला ठेवावा लागला ही रुखरुख असली तरी बाबांच्या गाण्यात तिला आनंद मिळे. बाबांची ती सर्वात खरी आणि मोठी चाहती होती. पुढे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ती बाबांबरोबर प्रवासाला जाऊ शकत नसे तेव्हा मी जायचो. रात्री-बेरात्री उशिरा जरी आम्ही घरी पोहोचलो तरी बाबांना, ‘काय गायलात, कसे गायलात’ हे विचारण्याचा तिचा उत्साह कधी मावळला नाही आणि या प्रश्नांना उत्तर देण्याची बाबांचीही उत्सुकता मावळली नाही. शिस्त आईने लावायची आणि लाड बाबांनी करायचे, अशी ढोबळ विभागणी होती. घरी तसं धार्मिक वातावरण होतं. गणपती, दिवाळी वगैरे ते दोघं हौसेने करत. दिवाळीचे खाद्यपदार्थ आई घरीच स्वत: बनवायची. बाबाही पूजेला स्वत: बसत. त्यांची धार्मिकता वेगळी होती. विविध प्रांतांतले, भाषेचे, संस्कृतीचे लोक यांच्याशी सहज मिसळत. यात त्यांची धार्मिकता आड येत नसे. आमचं घर किती परंपरानिष्ठ आणि किती आधुनिक होतं हे आजही मला नक्की सांगता येणार नाही. मात्र माझे आई-बाबा श्रद्धावंत होते, हे नक्की. देवस्थाने, साधू-संत यांचा सहवास त्यांना आवडे. बाबांच्या बाबतीत सांगायचं तर वरच्या स्थानी देव आणि त्याच्या खाली माझी आई होती. आईबरोबरचं त्यांचं नातं फार गहिरं होतं. ते एकमेकांशी खूप मोकळेपणाने भांडतही. मात्र एकमेकांबद्दल आंतरिक चाड आणि आदर त्यांच्यात शेवटपर्यंत कायम राहिला.

बरीच वर्षे सुटीत बाबा प्रवासाची टूम काढत. म्हणजे सर्व कुटुंब घेऊन ते स्वत: गाडी चालवत दूरवर दौरा काढत. मला लहानपणी दक्षिण भारतातले असे दौरे आठवतात. माझ्या जन्माआधी तर घरच्यांना घेऊन गाडी चालवत त्यांनी श्रीनगपर्यंत सहल काढली होती. प्रवासात आपले कुटुंबीय एका वेगळ्या रीतीने कळतात. एकतर नेहमीच्या जगण्यातली बंधने नसतात आणि सगळे निवांत असतात. अशा प्रवासात मग रात्री कुठे तरी उतरायचो आणि मग पत्ते खेळणं वगैरे चालू व्हायचं. बाबाही उत्साहाने खेळत. पुढच्या काळात आई-बाबांबरोबर परदेश सहलीही केल्या. त्या वेळी विमान पकडण्यासाठी केलेल्या धावपळी आठवतात. कधी कधी चुकलेली विमानं आठवतात आणि हसू येतं.

आमचं घर झालं तेव्हापासून आमच्या घरी कुत्रा होता. बाबांना कुत्र्यांची फार आवड होती. त्यांचे बेळगावचे एक स्नेही अशोकराव गरगट्टी,  त्यांना चांगली पिल्ले द्यायचे. मग त्या कुत्र्यांची आंघोळ, त्यांचे संगोपन, त्यांना फिरायला नेणं वगैरे गोष्टी बाबा हौसेने करत.

काळ पुढे सरकत गेला आणि मीही शाळा वगैरे टप्पे पार पाडत बालपणाला ‘टाटा’ केला. (म्हणजे तो झालाच! मी किंवा कुणीही कितीही इच्छा असली तरी काळ थांबवू शकत नाही).

आता कट टू.. काही वर्षांनंतर मी दिल्लीला चार वर्षांसाठी शिकायला चाललो होतो. वसतिगृहात आणि पुणं सोडून प्रथमच. तेव्हा मला पोचवायला आणि खोली लावायला मदत म्हणून बाबा स्वत: माझ्याबरोबर आले होते. त्यांची ती त्या वेळची  लगबग बघून तिथले सगळीजण आणि मुख्य म्हणजे मीच ओशाळवाणा झालो होतो. कारण बाबा तोपर्यंत एक प्रसिद्ध आणि मोठी असामी झाले होते. पण आयुष्यभर आपण एक ‘सेलिब्रिटी’ आहोत हे त्यांना स्वत:ला कधीच वाटलं नाही. त्या वेळी मला सोडून निघताना त्यांचा आवाज थोडा गहिवरला, पण इतकंच. स्वत:च्या भावनांचं प्रदर्शन करायचा त्यांचा स्वभाव नव्हता. या चार वर्षांनंतर मी पुण्याला आलो आणि आमचं सहवासपर्व ते त्यांना अखेरचा निरोप देईपर्यंत चाललं..

पण बाबांचा गायकीचा वारसा माझ्याकडे येणार होताच. मी गांभीर्याने त्यांच्याकडे गाण्याची तालीम सुरू केली. लवकरच त्यांच्याबरोबर प्रत्येक प्रवासात ‘शागिर्दी’ करायला, म्हणजे तंबोरा वाजवणं, जुळवणं, गायनसाथ, अगदी त्यांचे पाय दाबणं, लोकांशी त्यांच्या वतीने बोलणं, थोडक्यात, पडेल ते करायला लागलो. ही शेवटची काही वर्षे त्यांना खूप जवळून पाहायला मिळालं. त्यात लक्षात आली त्यांची नि:संग वृत्ती! दिल्लीला, कोलकात्याला, सगळीकडेच त्यांच्या पाया पडण्यासाठी उभी माणसं, जगभर त्यांचं असणारं वलय..  थक्क करणारं!

मला आठवतंय, नाशिकला पिंपळपारावर पहाटे त्यांची ‘संतवाणी’ होती. कोणत्याही भिंतींशिवाय, मोकळ्यावर. मी तंबोऱ्याला – आणि संधी दिल्यास गायला होतो. रस्त्यावर त्यांना ऐकायला हजारोंची गर्दी! ही गोष्ट त्यांचं वय ऐंशीपलीकडे असतानाची आहे. एका शास्त्रीय संगीत गायकाला मिळणारा असा प्रतिसाद हे खरोखर कोडं होतं. तसाच एक ‘संतवाणी’चा कार्यक्रम ठाण्याला स्टेडियमवर होता. खचाखच गर्दी झाली होती. बाबांच्या साथीला उस्ताद झाकीर हुसेन होते; पण स्वत:च एक ‘सुपरस्टार’ असलेले झाकीरजी बाबांबद्दल शशी व्यासजींना म्हणाले, ‘आज सुपरस्टार काय असतो ते पाहिलं!’  एखाद्या चित्रपट अभिनेत्याबद्दल किंवा पाश्र्वगायकांबद्दल असं बोलणं ठीक आहे; पण एक शास्त्रीय गायक सुपरस्टार? मला वाटतं, हा सगळा उत्तम गायक वगैरेपलीकडचा करिश्मा आहे. एवढी अचाट लोकप्रियता असूनही त्यांना त्याचा कसा वापर करता येईल, ती कशी ‘एनकॅश’ करता येईल याचा कधीही विचार नसे. लोकांशी काही तरी आव आणून वागणं, तामझाम, सेक्रेटरीमार्फत बोलणं, असं त्यांनी कधीच केलं नाही. आयुष्यात त्यांनी जितके पैसे मिळवले त्यापेक्षा शंभरपट ते सहज कमवू शकले असते, मी ‘नि:संग वृत्ती’ म्हणतो ती हीच. तीच नि:संगता त्यांच्या ‘संतवाणी’चं उदाहरण देऊन सांगतो. आजही आषाढी एकादशीच्या काळात गावोगावी भक्तिसंगीताचे कार्यक्रम किती होतात, हे सांगायला नको. याच गाणाऱ्या सर्वावर बाबांचे ऋण आहे. कारण संतरचना ‘कॉन्सर्ट प्लॅटफॉर्म’वर आणणारे ते पहिलेच. या ‘संतवाणी’ला इतकी मागणी होती की, एका महिन्यात बाबांनी ‘संतवाणी’चे बावीस कार्यक्रम केले; पण दरम्यान त्यांना वाटायला लागलं की, आपलं शास्त्रीय गायनाकडे दुर्लक्ष होतं आहे. सुगम संगीताचे कार्यक्रम कधीही शास्त्रीय संगीतापेक्षा लोकप्रिय आणि आर्थिकदृष्टय़ा लाभप्रद असतात;. पण आपण ‘ख्यालिये’, ‘क्लासिकलवाले’ आहोत ही जाणीव त्यांना अधिक महत्त्वाची वाटली आणि ‘संतवाणी’चे कार्यक्रम त्यांनी अगदीच बंद नाही, पण लक्षणीय प्रमाणात कमी केले.

त्या वेळी ‘सुरभी’ हा कार्यक्रम ‘दूरदर्शन’वर प्रसारित होई. त्यात त्यांना याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ‘बेसिकली मैं क्लासिकल गानेवाला हूँ, भजनगायक नहीं हूँ।’ असं उत्तर त्यांनी दिलं होतं. असा सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीसारखा कार्यक्रम कमी करणं आजकाल पाहायला मिळेल? तसेच एक आत्मभानही त्यांच्यात होते. उदाहरणच देतो. तुम्ही जगजितसिंग यांच्या आवाजात ‘चिठ्ठी न कोई संदेस’ हे सिनेगीत ऐकलंय का? हे बाबांनी म्हणावं म्हणून संगीत दिग्दर्शक उत्तमसिंग ‘डेमो’ द्यायला आले होते. तसेच संगीत दिग्दर्शक अजय-अतुल त्यांच्या गाजलेल्या (शंकर महादेवन यांनी नंतर गायलेल्या) ‘विश्वविनायक’ची गाणी घेऊन आले होते, हा अल्बम बाबांनी गावा म्हणून; पण बाबांनी नकार दिला. मला म्हणाले, ‘‘माझ्या या वयात (तेव्हा ते ऐंशीच्या पलीकडे होते) मला हे प्रयोग जमतील का आणि शोभतील का, हे मला सांगता येत नाही. म्हणून नको.’’ हे वाक्य ऐकताच मला त्यांच्याच एका वाक्याची आठवण झाली. ते हिंदीत ऐकलं होतं, ‘जिस चीज के लक्षण अच्छे नही होते वह मैं करता नहीं!’ स्वत:बद्दल साशंक असणे याशिवाय ‘लक्षण अच्छे नही होते’ काय असणार? म्हणून त्यांचा नकार मला उमगला. तिथेही भरपूर पैसे मिळाले असते आणि ते गाऊ नक्कीच शकले असते; पण त्यांना आपली ‘अभिजात संगीताचा गायक’ ही प्रतिमा, त्या वयातला वागण्यातला आब महत्त्वाचा वाटला.

संगीतात, सादरीकरणात आणि जगण्यात एकीकडे ही नि:संग वृत्ती, तर एकीकडे कुठल्याही गोष्टीतला आत्मा चटकन ग्रहण करणारी अफाट बुद्धी आणि प्रतिभा. त्यांचा सर्वोत्कृष्टतेचा ध्यास, स्वत:चीच गायकी सतत बदलत राहण्याचं सतत साहस (‘दुकान चालतंय तर कशाला स्वत:ला बदला’ असं न म्हणता) बेफाट, बेफाम साहस, चमत्कार वाटावा असा त्यांच्यातला अ‍ॅथलीट, किती रूपं सांगावीत पाहिलेली.. शब्द कमी पडतील. माझ्यासारख्या शेंडेफळ मुलाचे बाबा हेच त्यांचं रूप मला सर्वात प्रिय आहे. तरी त्यांच्या ‘गुरू’ या रूपाबद्दल बोलणे आज आवश्यक वाटते. नुसते आम्ही प्रत्यक्ष शिष्य नाही, तर गेल्या तीन पिढय़ांमधले बरेच नामवंत गायक त्यांना गुरुस्थानी मानतात. त्यांच्याकडून काही न काही घेतात. त्यांचा प्रभाव पडल्याचं सांगतात. माझा मुलगा विराज लहानपणीच गाऊ लागला. त्याच्यावर त्याच्या आजोबांच्या गायकीचा पूर्ण प्रभाव आहे. गेली काही वर्षे मी त्याला शिकवतोय आणि त्यामुळे बाबांचं ‘गुरू’ रूप नेहमीच संदर्भ म्हणून मी वापरतो.

त्यांचं म्हणणं होतं, की रियाज ही जे येत नाही ते यावं यासाठीच्या प्रयत्नाची जागा आहे आणि गाण्याचं व्यासपीठ हे जे येतं तेच उत्तमरीत्या मांडण्याची जागा आहे आणि ‘डोळस रियाज असावा’ ही दोन सूत्रं आहेत. विराजला शिकवताना याचा अर्थ जो मी समजलो त्याआधारे मी पुढे जातो आहे. ‘डोळस रियाज असावा’ म्हणजे पूर्वसुरींनी सांगितलेल्या गोष्टी डोळे झाकून करण्यापेक्षा त्यातील मर्म ओळखून आपल्या आवाजाला आवश्यक आणि त्या-त्या वेळेस झेपणारा सराव असे मला वाटते. उदाहरणार्थ, ते स्वत: तरुण वयात खूप काळ मंद्र साधना करीत; पण माझा आवाज ऐकून मला त्यांनी केवळ अर्धा तास करायला सांगितली. दुसरे सूत्र तर आजच्या काळात फारच महत्त्वाचे आहे. व्यासपीठावर आपले गायनकौशल्य दाखवण्याचा हक्क आणि काहीशी अपरिहार्यता आहेच; पण त्या नादात रागाचा माहौल बनणे, कलानिर्मिती याकडे दुर्लक्ष होते. ‘फार जबरदस्त गाणारा/री आहे’ अशी श्रोत्यांवर छाप पडते. जी व्यावसायिकदृष्टय़ा आवश्यकच आहे – पण तो राग, ते गाणं अजिबात लक्षात राहत नाही.

संगीतावर बाबांचं निस्सीम प्रेम होतं, स्वत:वर नंतर. गाताना त्यांचं हे भान कधी सुटलं नाही. आज गेल्या पाच पिढय़ा आणि ते गेल्यावरची लहान पिढीही त्यांचं गाणं ऐकताना दिसते. मला वाटतं हा मनस्वी संगीतप्रेमी वर्ग त्यांनाही जाणवत असला पाहिजे. त्यांना गायकी आवडत होती म्हणून ते गायले, हे मुख्य. त्यामुळे देवाने आपल्याला गाऊ दिलं याचंच त्यांना आंतरिक समाधान होतं. ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि संगीतात झळके. ठरावीक मुलाखतकर्ते विचारतात, तसा ‘तुम्ही गायक झाला नसता तर काय झाला असतात,’ हा प्रश्न आल्यावर त्यांनी ‘मी गॅरेज काढलं असतं आणि मेकॅनिक झालो असतो’ असं उत्तर दिलं होतं. त्यांची झेप, त्यांची उंची बघता मी एवढं नक्की म्हणेन, की गाडीदुरुस्ती या क्षेत्रातही ते भारतप्रसिद्ध, सर्वोच्च आणि प्रतिभासंपन्न पथदर्शक कामगिरी करणारे झाले असते.

आम्ही दोघे वेगवेगळ्या व्यक्ती होतो. पुलंच्या भाषेत ‘ब्रह्मदेवाच्या दरबारात प्रत्येक भांडे निराळे.’ आम्हा दोघांत सगळंच छान छान, गोड गोड होतं असं नाही. कधी एकमेकांचा रागही आला असेल; पण आमचे ऋणानुबंध इतके घट्ट होते, की आज असं काही गंभीर, कलहकारक आठवतही नाही. एकूण गोळाबेरीज त्यांच्याबद्दल प्रेम आणि भक्ती अशीच राहिली आहे. मी गायला लागलो आणि कुठल्याही मोठय़ा माणसाच्या मुलाला जी तुलना भोगावी लागते, ती माझ्यावरही आदळू लागली. त्या वेळी माझा बाबांशी संवाद झाला, तो असा –

मी – बाबा, फार कटकट आहे. माझ्याबद्दल स्वतंत्र विचारच कुणी करत नाही. सतत तुमच्याशी तुलना.

ते – तुला काय कटकट आहे रे? आमच्या वेळी आम्ही काय भोगलंय माहितीये का? आम्ही (यानंतर त्यांच्या सुरुवातीला त्यांनी काढलेल्या खस्ता, भोगलेले अपमान, पडलेले कष्ट, यांची एक यादी सांगत) तुम्हाला काय अडचण आहे त्यामानाने?

मी – एक मोठी अडचण अशी आहे, जी तुम्हाला येऊच शकत नाही.

ते – ती कोणती?

मी – तुमचे वडील कुठे भीमसेन जोशी होते?

हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. ही एक समस्या सुरुवातीला आली खरी; पण समस्या हे आव्हान मानून, लढा देण्याची प्रेरणा हीसुद्धा त्यांच्याच जीवनातून मिळाली होती.

एके काळी त्यांच्यापासून दूर दिल्लीला गेलेला त्यांचा हा मुलगा त्यांची संगीत परंपरा पुढे नेईल, असं त्या काळी वाटलंही नव्हतं; पण नियती अशी होती की, त्यांच्या अनेक गोष्टींतला वारसा मला सांभाळावा लागला. आई गेल्यावर तर ते विरक्तच झाले आणि म्हातारपण आणि त्यातील मरणव्याधी यांचे भोग त्यांच्या आणि पर्यायाने आम्हा कुटुंबीयांच्याही नशिबी आले.

अखेर एक दिवस ते देहाने गेले तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचं गायक म्हणून, एक माणूस म्हणून अस्तित्व, स्वत: या सर्व वाटांवर प्रवास करून आणि जगून, मला समजू-उमजू लागलं. त्यातून कळलं, की ते सर्वासाठीच मागे काय काय ठेवून गेलेत ते. एक सकारात्मकता, सर्वोत्कृष्ट होण्यासाठी तपश्चर्या करण्याची अथक ऊर्मी. साधेपणा, सच्चेपणा, अशक्य ते शक्य करण्याची महत्त्वाकांक्षा, सर्जनशीलता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं असूनही समाधानी वृत्ती. मला वाटतं, हे पाथेय सर्वानाच आपापल्या प्रवासात पुरणार आहे..

joshishrijoshi@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 1:34 am

Web Title: abhalmaya special memories bhimsen joshi abn 97
Next Stories
1 एक ‘टाका’ प्रतिष्ठेचा!
2 एक ‘टाका’ आत्मविश्वासाचा!
3 प्रतिदाहक ग्लुटॅथिऑन
Just Now!
X