28 February 2021

News Flash

आभाळमाया : मी देणं लागते तुला!

बाप नसणं म्हणजे काय-काय नसणं आणि तो नसतानाही त्याचं असणं म्हणजे काय-काय असणं हे दोन दशकांहूनही अधिक काळ अनुभवते आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. प्रज्ञा दया पवार

‘‘दादांसारखी माणसं जेव्हा अचानक निघून जातात कामात खोलवर बुडालेली असताना, तेव्हा ती केवळ देहाने जात नसतात. एक चालतंबोलतं भौतिक अस्तित्व पुसलं गेलं अशी निव्वळ कौटुंबिक पातळीवरची, बापाचं छत डोक्यावर नसण्याची पोकळी नसते ती, त्याला त्यांनी अनेक स्तरांवरून केलेल्या सामाजिक- वैचारिक संघर्षांचा बहुपदरी संदर्भ असतो. ‘जागल्या’ हे त्यांच्या एका पुस्तकाचं शीर्षक त्यांच्याबाबत अत्यंत चपखल होतं! हा जागल्या नेहमीच जिवंत राहिला त्यांच्यातला. तो त्यांना सतत ढुसण्या देत असला पाहिजे. त्यातूनच ‘बलुतं’चा जन्म झाला. शोषित-वंचितांच्या जगण्याला, त्यांच्या कष्टांना- श्रमाला, जित्याजागत्या हाडामांसाच्या माणसांना जणू ती अदृश्यच आहेत असं मानून चालणाऱ्या वाङ्मयीन व्यवस्थेला कसलाही आव न आणता ‘बलुतं’ने भानावर आणलं.’’ सांगताहेत प्रज्ञा पवार आपले पिता दया पवार यांच्याविषयी..

कुठल्या तरी बर्फगार हाडं गोठवणाऱ्या तळघरात एक देह त्याच्या घरापासून, जिवाभावाच्या-रक्ताच्या माणसांपासून दूरवर निष्प्राण पडून आहे. सगळे सोपस्कार पार पडल्यावर आणला जातो तो देह विमानातून. शवपेटी उघडताच प्राणांवर नभ धरणाऱ्या, माझ्या जिवलग बापाचा जिवंतपणाची कुठलीच ओळख नसलेला चेहरा पाहताच मी किंचाळून मूर्च्छित होऊन पडते. हे माझ्या झोपेतलं, कधीही पुसता न येणारं दृश्य झालं आहे. बऱ्याचदा दिसतं ते मला आणि जाग आल्यावरही सोबत राहतं. त्याला स्वप्नही म्हणू शकत नाही मी.

बाप नसणं म्हणजे काय-काय नसणं आणि तो नसतानाही त्याचं असणं म्हणजे काय-काय असणं हे दोन दशकांहूनही अधिक काळ अनुभवते आहे. असे कैक क्षण आले जेव्हा फार निकडीने वाटून गेलं- अजूनही असता हा दया पवार नावाचा आयुष्याला प्रयोगशाळा मानणारा मनस्वी थांबा तर असं भिंगुळवाणं वाटत राहिलं नसतं. अर्थात त्यावर मात करतानाही पुन्हा पुन्हा त्यांनाच वाचलं मी. त्यांच्या गावकुसाबाहेरच्या ओरखडय़ांना न् अपमानबोधाला. महानगरात स्थलांतरित झाल्यानंतरच्या कावाखान्यातल्या त्यांच्या लुंपेन प्रोलेटरियट दिवसांना. दगडू मारुती पवारपासून दया पवापर्यंतच्या त्यांच्या अनेकरेषीय प्रवासाला. अत्यंत जहाल असा वाङ्मयीन, सांस्कृतिक फलक धगधगत असताना त्यांच्या हातून लिहिल्या जाणाऱ्या काहीशा संयत कवितेला. त्या तप्त कोलाहलातल्या त्यांच्या स्पष्ट पण न एकारलेल्या आवाजाला. विद्रोहाच्या वेगळ्या परिमाणांना!

त्या अमिट, अम्लान अक्षरांनीच मला अनेक वाटा दाखवल्या. अनवट वाटा. आणि त्यावरून न डगमगता चालण्याचं धाडसही! त्यांच्यासारखी माणसं जेव्हा अशी अचानक जातात कामात खोलवर बुडालेली असताना, तेव्हा ती केवळ देहाने जात नसतात. एक चालतंबोलतं भौतिक अस्तित्व पुसलं गेलं अशी निव्वळ कौटुंबिक पातळीवरची, बापाचं छत डोक्यावर नसण्याची पोकळी नसते ती. त्याला त्यांनी अनेक स्तरांवरून केलेल्या सामाजिक-वैचारिक संघर्षांचा बहुपदरी संदर्भ असतो. लगतच्या आणि येणाऱ्या काळाच्या पोटातली गुंतागुंतीची आव्हानं पेलण्याचा संदर्भ असतो. त्या चलनवलनात दिशा शोधण्याचा असतो. एक कार्यकर्ता कवी-लेखक म्हणून दया पवारांचा वावर हा मोठय़ा विस्तारत जाणाऱ्या परिघावरचा वावर होता. ‘जागल्या’ हे त्यांच्या एका पुस्तकाचं शीर्षक त्यांच्याबाबत अत्यंत चपखल होतं! हा जागल्या नेहमीच जिवंत राहिला त्यांच्यातला. तो त्यांना सतत ढुसण्या देत असला पाहिजे. त्यातूनच ‘बलुतं’चा जन्म झाला. शोषित-वंचितांच्या जगण्याला, त्यांच्या कष्टांना- श्रमाला, जित्याजागत्या हाडामांसाच्या माणसांना जणू ती अदृश्यच आहेत असं मानून चालणाऱ्या वाङ्मयीन व्यवस्थेला कसलाही आव न आणता ‘बलुतं’ने भानावर आणलं. काही पुस्तकं इतिहास घडवत असतात हे विधान ‘बलुतं’बाबत अत्यंत सार्थ ठरताना आपण अनुभवत आहोत जवळपास तीन-चार दशकांपासून. सामाजिक चळवळींना ऊर्जा पुरवणाऱ्या आत्मकथनात्मक लेखनाचा जणू प्रपातच उभा राहिला ‘बलुतं’मुळे. जागतिक साहित्याच्या पटलावर ‘बलुतं’ने उभ्या केलेल्या उठाठेवी पोहोचल्या नसत्या तरच आश्चर्य!

‘लेखकरावात’ हमखास आढळून येणाऱ्या काही एवंगुणविशिष्टांचा दादांमध्ये (आम्ही तीन भावंडं; मी, वैशाली आणि प्रशांत त्यांना ‘दादा’ म्हणत असू.) मुळातच अभाव असल्याने त्यांच्याभोवती माणसांचं मोहोळ कायम घोंघावत असायचं. अगदी काल-परवा लिहू लागलेला एखादा उभरता कवीही त्यांना ‘अरे दया’ अशी सहज हाक घालू शकत होता. लेखनातल्या ‘नई फसल’चे ते चाहते होते. त्यातल्या ताकदीच्या जागा ओळखून ते कायम त्यांची पाठराखण करायचे. एक पूलच होते ते! अखंड वर्दळ चालायची त्या पुलावरून तऱ्हेतऱ्हेच्या माणसांची. पण त्यात केवळ त्यांचे समवयीन, समकालीन साहित्यिकच होते असं नाही. किंबहुना तो पूल अ-साहित्यिकांच्या साध्यासुध्या पण विलक्षण जगण्यानेच सळसळत असायचा.

एका मोठय़ा गतिमान अशा काळाचे ते महत्त्वाचे भागीदार राहिले. पर्यायी चळवळी टोकदार असण्यापासून ते त्यांची टोकं बोथट बनत जाण्यापर्यंतचा काळ त्यांनी पाहिला. पण टप्पा कोणताही असो, त्यांच्या धारणा, भूमिका मुक्तिदायी परिवर्तनाला सतत सन्मुख राहिल्या. ठाम राहिल्या. ते कधीच विकले गेले नाहीत आणि अत्यंत नेकीने आयुष्यभर पश्चिम रेल्वेत ऑडिटरपदाची नोकरी करून त्यांनी त्यांच्या संसाराचा वेल मांडवावर नेला. कष्टसाध्यतेला त्यांनी कसलेच शॉर्टकट शोधले नाहीत. आणि आयुष्यभर वणवण करत असताना कुणालाच न सांगता आकस्मिकपणे ते मरूनही गेले. दिल्लीला एका आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये ‘अल्पसंख्याक आणि साहित्य’ या विषयाची मांडणी त्यांनी केली. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने एकाएकी ते खाली कोसळले आणि..

तसे ते कमालीचे सौम्य होते, पण हा सौम्यपणा भूमिकांच्या आड कधी आला नाही. तिथे त्यांचा एरवीचा भिडस्तपणा गळून पडायचा. शांतपणे समोरच्यांपर्यंत आपलं म्हणणं पोहचवायचे ते. स्वभावात खोलवर मुरलेली समस्त वस्तुजातांविषयीची आर्त सहसंवेदना असलेला माझा बाप कधी कधी मला या दुनियेतला वाटायचाच नाही. ‘संत सखू’ चित्रपट पाहून ते ओक्साबोक्शी रडल्याचं स्मरणात राहिलंय. माझ्या धाकटय़ा बहिणीच्या- वैशालीच्या लग्नातही ते असेच फुटून फुटून रडले होते ‘माझं लाडकं कोकरू सासरी चाललं’ म्हणत. माझ्या प्रसूतीच्या वेळी ते कार्यक्रमासाठी गेले होते. घरी आल्यावर त्यांना कळलं तेव्हा ते त्वरेने आले हॉस्पिटलमध्ये, पण माझी वेदना, तडफड साहवेना त्यांना. आईला रडवेल्या सुरात म्हणाले, ‘‘हिरा, मी नाही थांबत इथे. ममुला (माझं घरातलं नाव) नाही पाहू शकत या अवस्थेत. किती हाल हाल तिचे आई होताना.’’ शेवटी आईनेच त्यांना आधार दिला. ‘‘अहो, असं व्हायचंच. जा तुम्ही घरी. मी कळवते तुम्हाला बातमी.’’

असा हा हळवा बाप. ‘ग्रंथाली’ने त्यांचा षष्ठय़ब्दीपूर्तीचा सोहळा आयोजित केला तेव्हाही त्यांचे डोळे झरत होते – मी प्रेक्षकांत बसलेले असताना माझ्या नावाचा पुकारा करून मला स्टेजवर बोलवलं गेलं आणि ‘दयाची कवयित्री लेक आता दयावर बोलेल,’ असं दिनकर गांगल यांनी अचानक घोषित केलं तेव्हा. मी दादांवर नेमकं काय बोलले ते आता आठवत नाही, पण माझ्या भाषणाने ते फारच सद्गदित झाले. काळीज सुपाएवढं झालं त्यांचं. स्टेजवर बसलेले होते, पण त्यांना रडू आवरेना. अख्ख्या सभेनं हे दृश्य पाहिलं. पुरुष रडतोय भर सभेत ही बाब पुरुषत्वाच्या संकल्पनेशी फटकून वगैरे आहे, हे तर त्यांच्या गावीही नव्हतं.

अनेकदा मुलाखतींमधून हा प्रश्न विचारला जातो, ‘तुम्ही दया पवारांचा वारसा चालवता. कसं गेलं तुमचं बालपण? त्यांनी नेमके कसे केले संस्कार तुमच्यावर? कशा घडलात तुम्ही?’ असे काही ठरवून संस्कारबिस्कार करण्याइतकी चन नव्हती त्यांच्याजवळ. बहुधा दादांच्या पिढीतल्या कोणाकडेच नव्हती. ‘नाही रे’ वर्गातल्या जगण्याशी दोन हात करणाऱ्या माणसांच्या मनात आपल्या मुलाबाळांविषयी नेमके काय विचार येत असतील? आपली मुलं आपले पांग फेडतील असं वाटत असेल का त्यांना? मुलांनी पुढे काय करावं असं वाटत असेल त्यांना? माझ्याबाबतीत त्यांचं एक स्वप्न होतं. आपली लेक प्राध्यापिका व्हावी. परिस्थितीमुळे ते स्वत: प्राध्यापक होऊ शकले नव्हते. पण माझ्यात ते साकार होताना फार आनंद झाला होता त्यांना. मी कविता लिहिते हे त्यांना फार उशिरा कळलं. जेव्हा त्यांना वाचून दाखवल्या तेव्हा त्यांचे हलकेसे भुऱ्या रंगाचे डोळे अक्षरश: लकाकत होते.

त्यांच्या शैलीची कणभरही छाप नसलेली, ख्यातनाम कवी असलेल्या बापाचं कसलंही ओझं न बाळगणारी त्यांच्या लेकीची स्व-तंत्र कविता वाचून ते नक्कीच खुशालले असतील. पण त्यांनी कधीही माझ्या कवितेचं कौतुक केल्याचं मला आठवत नाही. अर्थात त्यांच्या मित्रमंडळींना आवर्जून सांगत असत, प्रज्ञाची कविता अमुक अमुक मासिकात छापून आलीय. वेगळं लिहिते. स्टाईलही तिची स्वतची आहे. कधी कधी तर गंमत व्हायची. आम्ही बाप-लेक अनेकदा एकाच विचारमंचावर वक्ता म्हणून निमंत्रित असायचो. त्यांनी मांडलेल्या एखाद्या मुद्दय़ाशी असहमती दर्शवत मी त्यांचा तो मुद्दा खोडून काढला की, त्यांना बरंच वाटत असे. आईला लगोलग सांगत, ‘‘कसं आज ममुने मला निरुत्तर करुन टाकलं. भलतीच अभ्यासू आहे.’’ कधी मी त्यांना फोन करून विचारायचे, ‘‘दादा तुम्ही काय बोलणार आहात परवाच्या परिसंवादात? त्या विषयाबद्दल काय वाटतं तुम्हाला?’’ त्यांनी काही बोलण्याचा अवकाश, लगोलग आई त्यांना सावध करायची. ‘‘अहो, काही सांगू नका तिला. तुमचं ऐकून नंतर त्याविरोधात बोलेल ती. कसं कळत नाही हो तुम्हाला? तुमच्याकडूनच काढून घेतेय ती मुद्दे. मग म्हणेल कार्यक्रमात, पवारांच्या त्या अमुकढमुक मुद्दय़ाशी सहमत होणं कठीण आहे. माझा विरोध आहे वगैरे. आणि तुम्हीही बसाल मान डोलवत.’’ एकदा अर्जुन डांगळे त्यांना म्हणाले होते, ‘‘दया आता लवकरच तुला सगळे प्रज्ञापिता म्हणून ओळखू लागतील.’’  तेव्हा ते हसत हसत म्हणाले, ‘‘बेटी बाप से सवाई!’’

‘अंत:स्थ’ हा माझा पहिलावहिला कवितासंग्रहच तोवर प्रकाशित झालेला होता. मी नंतर लिहिलेली अक्षरं, त्या अक्षरांनी घेतलेली वाक्वळणं पाहण्याआधीच ते निघून गेले हे दुखवत राहतं मनाला.

त्यांच्या मोठेपणाचं मी कधीच दडपण घेतलं नाही हे जरी खरं असलं, तरी माझ्या बापाचं कवी – लेखक म्हणून असलेलं योगदान मला नीटच आकळलेलं आहे. ‘दया पवार’ या नामाभिधानात मी इतकी रुजलेली असल्यानेच की काय, माझ्या आयुष्यातल्या त्यांच्या मृत्युपश्चात उलथापालथीच्या पर्वात मी माझं विवाहानंतरचं ‘प्रज्ञा लोखंडे’ हे तब्बल अठरा-एकोणीस वर्ष धारण केलेलं आणि त्याच नावाने लेखन करत असलेलं नाव बदलून ‘प्रज्ञा दया पवार’ हे नाव धारण केलं. मला माझ्या पाळामुळांकडे जाण्याचाच प्रवास वाटला हा. तो प्रवास खचितच रम्य नव्हता. आडवळणांनी, खाचखळग्यांनी भरलेला होता. एकाकीपणाचा होता. पण तो ‘स्व’च्या शोधातला होता जो समष्टीशी अभिन्नपणे जोडलेला असावा अशी माझी धडपड होती. दादा असते तर त्यांना माझी ही सगळी यातायात सहन झाली असती का, पाहवली असती का असा प्रश्न मला कधी कधी पडतो. काही घटना-प्रसंगांत ते माझ्याशी बाप म्हणून पारंपरिक वागलेही पण त्यांच्या निर्वविाद मोठेपणाच्या माझ्या मनातल्या प्रतिमेला जराही तडा गेलेला नाही आजवर. अनेकदा त्यांनी त्यांच्यातल्या पारंपरिक बापपणावर मात केली हे मी अनुभवलं आहे. तशीच त्यांनी ती नंतरही केली असती.

माझ्या मनातली ‘आदर्श पुरुष’ म्हणून जी प्रतिमा आहे ती बव्हंशी दादांशी मिळतीजुळती आहे. कुटुंबावर प्रचंड प्रेम करणारे, पण व्यक्तिवादाच्या सापळ्यात घरातली माणसं अडकून पडणार नाहीत याबाबत सजग असणारे, व्यक्ती आणि समाज यातलं द्वंद्वात्मक नातं अचूक ओळखणारे, आईला किंबहुना नात्यातल्या, मत्रीतल्या सगळ्याच स्त्रियांना अकृत्रिम मत्रभावाने, आदराने वागवणारे दादा त्यांचे लाडके होते अतीव. माझ्या आईशी असलेलं त्याचं नातं फार रसरशीत होतं. आई एका अर्थाने आमच्या घरात ‘बॉस’ होती. त्यांनाही तिचा वरचष्मा आवडायचा. त्यांच्या स्वभावातला मवाळपणा त्यांना कोणत्याही अटीतटीच्या प्रसंगी कधीच सोडून जात नसल्यामुळे आणि सहसा कुणालाच न दुखावण्याच्या त्यांच्या पवित्र्यामुळे आईला खूपदा वाईटपणा पत्करावा लागला. किंबहुना आईच्या दक्ष, रोखठोक, शिस्तशीर, व्यवहारनिपुण अशा गुणसमुच्चयांमुळेच त्यांचा संसार नीटपणे मार्गी लागू शकला हे दादाही वारंवार मान्य करत असत.

माणूस इतका साधा कसा काय बरं असू शकतो हे आम्हा घरच्यांना त्यांच्याबाबत पडलेलं कोडंच होतं. आजच्या काळात तर हे अधिक तीव्रतेनं जाणवतं मला. ‘‘दादा, तुम्हाला राग कधी येतच नाही का?’’ असं आम्ही रागावूनच विचारायचो. यावर हसायचे ते फक्त. एकाच वेळी प्रचंड कौतुक, अफाट प्रसिद्धी, प्रतिष्ठेचे मानले जाणारे मान-सन्मान आणि जणू त्याला लगटूनच वाटय़ाला येणारी प्रच्छन्न टीका, सभ्यतेची मर्यादा ओलांडणारे, कमालीचे दुखावणारे, जिव्हारी लागणारे अश्लाघ्य हल्ले विचलित न होता झेलू शकणारे दादा मी माझ्या कळत्या वयापासून पाहत आले. त्यांना जवळून ओळखणारी माणसं कधी कधी त्यांना गमतीने ‘संत तुकाराम’ म्हणत असत. त्यांच्यातलं अजातशत्रूपण आश्चर्यकारक वाटावं असं होतं. पण म्हणूनच की काय आईला कायम ‘आवली’ व्हावं लागलं या तुकारामाशी संसार करताना. माझ्या आईने आयुष्यभर नोकरी केली शिक्षिकेची. याचं कोण कौतुक दादांना! स्त्रिया स्वतच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, त्यांनी अर्थाजन केलं पाहिजे, त्यांचं शिक्षण केवळ बासनात बांधण्यापुरतं राहू नये याबाबत ते कमालीचे आग्रही होते. त्यांच्या दोन्ही मुलींनी हाच कित्ता गिरवला आहे. स्त्रीने नोकरी केल्यामुळे अथवा तिच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कामामुळे संसारात विक्षेप येतो, मुलांना वाढवण्यात अडथळे येतात अथवा तिच्या आईपणाला त्यातून बाधा निर्माण होते असं मानणं हा निव्वळ वैचारिक मागासलेपणा आहे किंबहुना अशी मानसिकता बाळगणारे पुरुषच असुरक्षिततेचे शिकार असू शकतात, असं विषादाने म्हणायचे ते!

माझी आई ही त्यांची द्वितीय पत्नी. त्यांनी त्यांच्या आधीच्या पत्नीशी रीतसर फारकत न घेतल्यामुळे (त्या काळातल्या परिपाठाप्रमाणे दादांनी वर्तमानपत्रात एक नोटीस छापली होती फारकतीसंदर्भात) माझ्या आईला त्यांच्याशी इतकी वर्ष संसार करूनही ती त्यांची अधिकृत पत्नी आहे, हे न्यायालयात सिद्ध करावं लागलं त्यांच्या निधनानंतर. आमच्या सावत्र बहिणीनेच आईला न्यायालयात खेचलं. आईला तिच्या हक्कांसाठी, तिच्या स्थानासाठी प्रचंड झगडावं लागलं. ती धर्याने झगडलीही. पण फार विद्ध झाली. वारंवार अपमानित झाली. संताप संताप झाला तिच्या जिवाचा. तिची काहीही चूक नसताना तिच्या वाटय़ाला अपरिमित यातना आल्या. यात दोष नेमका कुणाचा? जगाच्या चांगुलपणावर अतोनात विश्वास असणाऱ्या आमच्या दादांचा की.. गंमत म्हणजे आमच्या या बहिणीबाबतची सर्व कर्तव्यं दादांइतक्याच प्रेमाने पार पाडूनही आईच्या वाटय़ाला हे अघटित यावं यामुळे एक ठणका राहिलाय माझ्या मनाला दुखवत गेली वीस-बावीस वर्ष. आता तर माझी आई माझी मत्रीणच झालीय. तिचे सगळे जिव्हार माझ्या काठावर तिला मोकळेपणाने उतरवता येतात हे सुंदर आहे आणि संत्रस्त करणारंही. बहीण- वैशाली तर तिची आईच झाली आहे तिला हवं-नको ते सगळं पाहणारी आणि मुख्य म्हणजे एका छताखाली तिच्यासोबत राहणारी. दादा या जगात नसल्याच्या पोकळीने असं आम्हा तिघी मायलेकींना घट्ट जोडून टाकलं आहे.

आईने अलीकडेच लिहिलेल्या तिच्या ‘सांगायची गोष्ट म्हणजे’ या आत्मकथनात अर्थातच दादा केंद्रस्थानी आहेत. तिने दादांविषयी भरभरून लिहिलेलं आहे त्यात. तिच्या या लिहिण्याला दादांची पाठराखण कशी कळीची ठरली याचा उल्लेख आईने अनेकदा केला आहे. ‘बलुतं’मध्ये तिच्याविषयीचं संबोधन ‘शिकलेली बायको’ इतकंच आलं हे तिच्याच इच्छेनं झालं होतं. आपल्या आयुष्याची सार्वजनिक चर्चा करू न इच्छिणारी आई आत्मकथनापर्यंत येऊन पोहचते हे ‘बलुतं’चंच सार्थ फलित होतं.

पण ‘बलुतं’चं फलित गोडच राहिलं असं मात्र अजिबात नाही. ‘बलुतं’ प्रसिद्ध होऊन पंचवीस वर्ष झाल्याच्या निमित्ताने लिहिलेल्या एका लेखात मी नोंदवलं होतं, ‘‘बलुतंमधला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना विफल होताना दिसते. संघर्षांत वाटय़ाला आलेला भ्रमनिरास दिसतो. यातून येणारं दुभंगलेपण दिसतं. दलित समाजातलं लढाऊ स्पिरिट नासवून टाकण्यातले नेतृत्वाच्या पातळीवरचे डावपेच दिसतात. दलित समाजातल्या सुशिक्षितांच्या मध्यमवर्गीय होत जाण्याच्या प्रक्रियेचे, त्यातल्या अनतिहासिकतेचे, अ-सामाजिक होत जाण्याचे अत्यंत गंभीर धोके दिसतात. ‘बलुतं’चा निवेदक सतत एका मूल्यात्मक पेचाकडे सेक्टेरियन (एकजातीय) भूमिका न घेता व्यक्ती-समष्टी संबंधात, स्त्री-पुरुष संबंधात कसलंही सोपं समीकरण न मांडता, माणसांमधल्या अंतर्वरिोधावर मानवी पातळीवरून भाष्य करतो.’’

हे सगळं करणं त्या वेळी सोपं नव्हतं. काळ्यापांढऱ्या रंगात दुनिया पाहायची सोडून असं स्वत:लाही माफ न करणारं आत्मकथन कुणाच्याच, विशेषत: कथित आप्तस्वकीयांच्या पचनी पडणारं नव्हतं. साहजिकच दादांना सर्वाधिक विरोध याच समूहाकडून झाला. लेखनाची मोठी किंमत चुकवावी लागली. आणि तरीही या सगळ्या विपरीत स्थितीतून ते तरून निघू शकले कारण महाराष्ट्रातला प्रगतिशील, उदारमतवादी विचारांचा जोर तोवर तरी काहीसा टिकून होता.

आता चाळीस वर्षांत परिस्थिती पूर्णपणे बदलून गेलेली आहे. आजच्या काळाचं वर्णन अ-स्वातंत्र्याचा काळ, अनुदारवादी ते सत्योत्तर अशा विविध शब्दांनी केलं जात आहे. साहजिकच अशा काळात लेखकांना पोलिसांच्या संरक्षणात फिरावं लागतं आणि हे चुकीचं आहे असं कुणाला वाटेनासं झालं आहे. अस्मितांचं मोहोळ इतक्या जोरकसपणे चोहोबाजूंनी उठलं आहे की, भलेभले विचारक नि आचारक आपल्या आजवरच्या भूमिका बदलून अस्मितेचा मळवट माथी चढवून उभे ठाकले आहेत. जे अल्पस्वल्प या प्रवाहापासून स्वत:ला प्रयत्नपूर्वक दूर ठेवू पाहत आहेत त्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवघड आणि अक्षरश: केविलवाणी झालेली दिसते. पण या अवघड जगण्यासाठी एक बारीकसा का होईना, पण आशेचा किरण लागतो, दूरवरचा का होईना पण एक आदर्श असा दीपस्तंभ लागतो. आजच्या अस्वातंत्र्याच्या हिंसक काळात दया पवारांसारखा लेखक आणि त्यांचं समग्र लेखनविश्व हा त्याच दीपस्तंभाची भूमिका बजावू शकतो हे मात्र निर्वविाद.

pradnyadpawar@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2019 1:01 am

Web Title: abhalmaya special memories daya pawar dr pradnya daya pawar abn 97
Next Stories
1 रॅगिंग : मानसिक हिंसाच!
2 अवघे पाऊणशे वयमान : .. सौख्य जे मला हवे
3 आरोग्यम् धनसंपदा : ग्लुटेन आहार आणि आरोग्य
Just Now!
X