डॉ.  रूपा रेगे नित्सुरे

‘‘आज पपा गेल्यानंतरच्या माझ्या आयुष्याकडे जेव्हा मी वळून बघते तेव्हा जाणवतं की त्यांच्यानंतरचं आयुष्यही मी सुंदरपणे व सक्षमपणे जगू शकले, यात त्यांचा निश्चितच मोठा वाटा आहे. त्यांची माया, त्यांनी फुलवलेला आत्मविश्वास, वेळोवेळी सांगितलेल्या अनेक युक्तीच्या गोष्टी, आमच्यातील चर्चा-संवाद व त्यांचे विपुल लिखाण यांनी कायमच मला साथ दिली. मृत्यूही त्यांना माझ्यापासून हिरावून घेऊ शकला नाही.’’ सांगताहेत रूपा रेगे नित्सुरे आपले पपा मे.पुं. रेगे तथा मेघश्याम पुंडलिक रेगे यांच्याविषयी..

Devendra Fadnavis Has Shani Sadesati Effect
“फडणवीसांच्या मागे साडेसाती, घाईत शत्रूवर मात करताना..”, उपमुख्यमंत्र्यांच्या कुंडलीवरून ज्योतिषांची भविष्यवाणी
BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”

२८ डिसेंबर, २००० रोजी पपांचं आकस्मिक निधन झालं. कधी नव्हे ते २७ तारखेला मी त्यांना दोनदा भेटले होते. एकत्र बसून, चहा पीत आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. नुकतेच ते नागपूरहून तत्त्वज्ञानाची दीर्घ हिवाळी शाळा संपवून परतले होते. उत्साहात होते. सुनीती देव यांनी संपादित केलेल्या

‘प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान’ या गौरवग्रंथाची खास माझ्यासाठी राखून ठेवलेली प्रत त्यांनी मला दिली. ‘‘हे पुस्तक सुनीतीने दि. य. देशपांडेंना अर्पण केलंय ते बरं झालं गं; खूप थकलेत ते आता; कधीही काहीही होऊ  शकतं,’’ असं भयही व्यक्त केलं. एकीकडे खूप आनंदात गप्पा चालू होत्या तर दुसरीकडे मृत्यूचा विषयही घोटाळत होता. मी ताईबरोबर महाबळेश्वरला जाऊन त्यांच्यासाठी आणलेल्या गालिच्याचं त्यांनी कौतुक केलं; यापुढचे अभ्यासवर्ग यावर बसूनच घेणार, असंही म्हणाले. त्यांच्या मनातल्या अनेक प्रकल्पांविषयी बोलले.

मग अचानक ज्या ज्येष्ठ साहित्यिकांचा त्या वेळी मृत्यू झाला होता, त्याविषयी बोलणं सुरू केलं. मी जाणीवपूर्वक विषय बदलला. ‘‘ते वयाने तुमच्यापेक्षा मोठे होते हो, तुम्हाला अजून किती आणि काय काय करायचंय,’’असं काहीसं मी कावरंबावरं होऊन म्हटल्यावर त्यांनीही हलकंफुलकं बोलणं पुन्हा सुरू केलं. मला हसून निरोप दिला. त्यानंतर संध्याकाळी ते विजया राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या समारंभात सामील झाले, आपल्या जिवाभावाच्या अनेक लोकांना भेटले, रात्री त्यांच्या लाडक्या पंपडबरोबर (माझी ताई)फोनवरून गप्पाही  मारल्या. आणि त्या रात्रीच ते गेले. स्वत:च्या घरात, आईच्या शेजारी, गाढ झोपेत, हृदयविकाराच्या सौम्य झटक्याने ते गेले. कुणाचाच विश्वास बसत नव्हता. कुमार सप्तर्षी म्हणाले तशी जणू त्यांनी समाधी घेतली. किती शांत आणि प्रसन्न मुद्रा होती त्यांची मृत्यूसमयीदेखील. दुसऱ्या दिवशी जेव्हा मिलिंद मालशे (त्यांचा खूप आवडता विद्यार्थी, जो त्यांना आदल्या रात्रीच भेटला होता.) फोनवर म्हणाला, ‘‘रेगे नसलेल्या जगात आपण जगायचं कसं?’’ तेव्हा माझ्या अंतस्थ मनातली भीती वर उफाळून आली. मी बधिर झाले होते. पपा कायम आपल्यासोबतच असणारेत, असं गृहीत धरून तर जगले होते मी तोपर्यंत!

आज पपा गेल्यानंतरच्या माझ्या आयुष्याकडे जेव्हा मी वळून बघते तेव्हा जाणवतं, की त्यांच्यानंतरचं आयुष्यही मी सुंदरपणे व सक्षमपणे जगू शकले, यात त्यांचा निश्चितच मोठा वाटा आहे. त्यांची माया, त्यांनी फुलवलेला आत्मविश्वास, वेळोवेळी सांगितलेल्या अनेक युक्तीच्या गोष्टी, आमच्यातील चर्चा-संवाद व त्यांचे विपुल लिखाण, यांनी कायमच मला साथ दिली. मृत्यूही त्यांना माझ्यापासून हिरावून घेऊ  शकला नाही. आमचं बालपण खूप सुखात गेलं. कीर्ती कॉलेजमधील ऐसपैस घर, समोर बाग, खेळायला कॉलेजचं मैदान, अशा सुंदर परिसरात नारळाच्या झावळ्यांची सळसळ व समुद्राची गाज ऐकत आम्ही मोठे झालो. आमचं घर एखाद्या गोकुळासारखं होतं. आजी-आजोबा, आई-पपा, आत्या, दादा-ताई (डॉ. किरण रेगे आणि डॉ. चित्रा दाभोलकर) व मी असे आठजण तर कायम असायचोच, पण घरात कायम पैपाहुण्यांचा राबता असायचा. कोकणातून शिकायला आलेल्या आत्या, सणावारांना न चुकता येणारे काका, हॉस्टेलवर राहून शिकणाऱ्या नात्यागोत्यातील मुलांच्या फेऱ्या, पपांच्या सामाजिक वर्तुळातील स्नेही, पपांचे विद्यार्थी – अशा अनेकांनी घर गजबजलेलं असायचं. दिवसभर घराचं दार सताड उघडं असायचं. कानामागून येऊन तिखट झालेली एक देखणी मनीमाऊ देखील या गोकुळाची सदस्या होती.

पपा या गोकुळाचं चैतन्य होतं. ते घरात असले की अखंडपणे मिश्कीलपणा, आमच्या व आईच्या फिरक्या घेणं, कोटय़ा करणं, आमच्यासोबत दंगामस्ती करणं, आजीला चिडवणं, हे प्रकार चालू असायचे. हसून हसून आमची लोळण-फुगडी व्हायची. आजोबांना मात्र ते घाबरायचे. आम्ही आजोबांच्या छातीवर बसून, त्यांच्या मिश्या ओढत त्यांच्याशी गप्पा मारतो हे बघून ते आम्हाला सलाम ठोकायचे. पपांनी आम्हाला त्यांची अशी खास नावं ठेवली होती. शेवटपर्यंत ते आम्हाला याच नावांनी हाकारायचे. आमच्या चिमखडय़ा बोलांच्या विशिष्ट आठवणी त्यांच्या मनात नेहमी असायच्या. आम्ही समोर असलो, की त्या हमखास बाहेर यायच्या. मी म्हणे बोलायला सुरुवात केल्यावर कधीतरी त्यांना म्हटलं होतं, ‘‘ए पपा, मी आता भोपते, तू मला फापट’’.  झालं. इतक्यांदा त्यांना ते आठवायचं. प्रत्येक वेळी अगदी खळखळून हसत ते हे सांगायचे. डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या असायच्या. त्यांच्या मनात आमच्या दुडदुडणाऱ्या प्रतिमा कायम जिवंत असत.

पपांचा आम्हाला अजिबातच धाक नव्हता असं नव्हतं, पण शिस्त लावण्याची त्यांची पद्धत निराळी होती. त्यात पंतोजीपणा, मारपीट, हे प्रकार नव्हते. त्यांचा चेहरा गंभीर झाला, डोळे बारीक झाले की आम्हाला सिग्नल मिळायचा. मी पूर्वप्राथमिक शाळेत असतानाची एक गोष्ट आठवते. एका सुट्टीत पपांबरोबर वाईला गेले असताना आम्हा छोटय़ा मुलांचा छान ग्रुप जमला होता. एक मुलगी मात्र जरा दांडगट होती, राग आला की आम्हाला मस्त पिटून काढायची. एकदा तिने काहीतरी गडबड केली म्हणून तिच्या काकांनी तिला चोप दिला. ते पाहून आम्ही बाकीची मुले फार खूश झालो. बरी खोड जिरली म्हणून. पपांनी ते कुठूनतरी पाहिलं. त्यानंतर अनेक तास ते माझ्याशी बोलले नाहीत. मी खूप अस्वस्थ झाले. आईलाही कळेना की काय झालं. रात्री मला जवळ घेऊन ते शांतपणे म्हणाले, ‘‘दुसऱ्याच्या दु:खानं माझ्या बाळाला आनंद झाला हे मला आवडलं नाही. मग त्या माणसानं आपल्याला कितीही का त्रास दिला असेना.’’ बस्स. दु:खाकडे बघण्याची माझी दृष्टी कायमसाठी बदलली.

सर्वाचीच मानसिकता त्यांना उत्तम समजायची, पण लहान मुलांच्या बाबतीत ते विशेष संवेदनशील होते. मी चौथीत असताना, आमच्या शाळेने आम्हाला चाळीस पानी वहीमध्ये ‘श्रीराम जय राम, जय जय राम’ असं लिहून आणायला सांगितलं होतं. पाऊस पडावा म्हणून कुठलातरी यज्ञ करण्याची योजना होती. आम्ही लगेच कोरीव अक्षरात लिहिणे सुरू केले. पपांना अर्थातच कल्पना नव्हती. शाळेतील काही पुरोगामी शिक्षक पपांकडे तक्रार घेऊन आले तेव्हा त्यांनी मला बोलावून खात्री करून घेतली, पण एकाही शब्दाने त्यांनी मला विरोध केला नाही वा माझ्यासमोर शाळेविषयी ते वावगं बोलले नाहीत. मात्र ते तातडीने त्या शिक्षकांसोबत शाळेत गेले, तिथे जाऊन चर्चा केली आणि शांतपणे शाळेला हा निर्णय फिरवायला लावला. दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्गशिक्षिकांनी आम्हाला हे काम थांबवायला सांगितलं, तेव्हा आम्ही ते थांबवलं. ज्या शांतपणे आणि सकारात्मक पद्धतीने पपांनी हा पेच सोडवला ते विलक्षण होतं. हे करत असताना ते शाळेच्या आणि माझ्या मध्ये ते आले नाहीत. माझ्यासाठी कुठलाही अवघडलेपणा वा गैरसोय त्यांनी निर्माण केली नाही. शाळेबद्दलच्या माझ्या मनातील आदराला त्यांनी धक्का लागू दिला नाही. चर्चेने व सामंजस्याने कठिणातील कठीण समस्या सोडवता येते, हे मला दिसून आलं.

पपा अखंड वाचत असायचे. अगदी बस थांब्यावर बसची वाट बघत असताना, प्रवासातही डोळ्यांसमोर सतत पुस्तक. वाचनही चौफेर. कुठल्याही मर्यादा नसलेलं. डिटेक्टिव्ह पुस्तकंही भरपूर वाचायचे. ही पुस्तके वाचल्याचा त्यांना इतका फायदा झाला की कीर्ती कॉलेजमधला, जमा-खर्चातील एक मोठा घोटाळा त्यांनी एकटय़ाने शोधून काढला. मात्र हे सर्व प्रकरण त्यांनी अत्यंत माणुसकीनं हाताळलं. ज्या गरीब व्यक्तीनं हा घोटाळा केला होता त्याला विशेष शिक्षा होणार नाही, त्याच्या कुटुंबीयांचे हाल होणार नाहीत व पैशांची वसुलीही होईल- हे त्यांनी बघितलं. माणुसकीशी तडजोड न करता, शांतपणे परिणामकारकता कशी साधावी हे मी पपांकडून शिकले.

पपा रूढ अर्थाने संसारी पुरुष नव्हते. संसाराची बाजू प्रामुख्याने आईने व माझ्या आजोबांनी सांभाळली. आई (शांता रेगे) खरंतर उच्चपदस्थ सरकारी अधिकारी होती, पण तिचा कामाचा वेग व आवाका प्रचंड होता. आमच्या संगोपनात आजी-आजोबांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे पपांना व्यासंगासाठी तसेच विविध सामाजिक चळवळींसाठी पुरेसा वेळ देता आला. मात्र अभ्यासाला व संशोधनाला लागणारी शांतता त्यांना घरात मिळत नसे. मग ते रात्री जागून लिखाण करत व पहाटेच्या सुमारास झोपी जात. कीर्ती कॉलेजमध्ये त्यांनी कायम त्यांच्या कामाची खोली वाचनालयात ठेवली होती. त्याचा प्रचंड फायदा आम्हाला झाला. कारण पपा शनिवार-रविवारीदेखील काम करत व आम्हाला वाचनालयात बसून भरपूर पुस्तकं वाचता येत. दिनकर बर्वेकाकांच्या परिश्रमांवर उभे असलेले हे वाचनालय म्हणजे खजिनाच होता आमच्यासाठी. कधी कधी शांततेच्या शोधात असलेले माझे वडील एखाद्या रेस्तराँमध्ये बसून लिखाणाचे काम करत. अशाच एका रेस्तराँचा मालक त्यांच्यावर फार प्रेम करायचा. ते तिथे काम करायला बसले की ठरावीक वेळानंतर त्यांना गरमागरम चहा द्यायचा. तो कीर्ती कॉलेजचा माजी विद्यार्थी होता म्हणे. पुढे ते रेस्तराँ एकाएकी बंद पडले व त्या मालकाला तस्करीच्या गुन्ह्य़ासाठी अटक झाली. आम्ही हबकलोच. पण ‘नवभारत’, ‘सत्यकथा’, ‘छंद’ वगैरेंसाठीचे अनेक महत्वाचे लेख तिथे बसून लिहिले गेले, हे सत्य आहे.

पपांनी आमच्या व्यवसायमार्गाच्या निवडीत अजिबात लुडबुड केली नाही. मी दहावीत चांगले गुण मिळवूनही कला शाखेला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा फक्त म्हणाले, ‘‘तू एकटी पडशील बाळा.’’ येणाऱ्या काळावर विज्ञानाचे राज्य असणार आहे. मग मी त्यांना एक पत्र लिहिलं, माझी भूमिका सांगणारं. ते वाचल्यावर त्यांना पटलं, की मी व्यवस्थित विचार करून निर्णय घेत आहे. मग मात्र माझ्यामागे ते ठामपणे उभे राहिले. कुणी म्हणालं, कला शाखेचे विषय काय आपले आपण वाचूनही शिकता येतात. विज्ञानाचं तसं नाही. त्यासाठी प्रयोगांची गरज असते. ती व्यक्ती गेल्यावर पपा मला म्हणाले, ‘‘तू असल्या भाकड-कथांकडे लक्ष देऊ नकोस. विज्ञानाच्या नावाखाली प्रयोगशाळांमध्ये काय चालतं ते मी जवळून पाहिलं आहे. सर्वच विषय शेवटी आपले आपणच शिकायचे असतात.’’ मी रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथील शिक्षक (विशेषकरून गणिताचे व भाषांचे) मला अतिशय आवडले. वातावरण गंभीर व अभ्यासाला पोषक होतं. मी बारावीत बोर्डात आल्यावर पपांच्या एका मित्राने त्यांना सल्ला दिला की आता रूपाला दक्षिण मुंबईतील कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला सांगा. कशासाठी तर ते जास्त आव्हानात्मक ठरेल. पपा म्हणाले, ‘‘काहीही गरज नाही, तिथे मिळणाऱ्या आव्हानांत तिला काडीचा रस नाही.’’ हे खरंच होतं. रुईया कॉलेज, तेथील शिक्षक, वादविवाद स्पर्धा, वाङ्मय मंडळ, प्रतिभावान मित्र-मैत्रिणी व सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकरावी-बारावीत मला जवळून लाभलेला पपांचा सहवास, यामुळे माझ्या भावी आयुष्याचा भक्कम पाया तयार झाला. पुढे मी पुण्याच्या गोखले इन्स्टिटय़ूटमधून एम.ए., एम.फिल. व डॉक्टरेट केलं. पुण्यातले माझे दिवस स्वर्गीय सुखाचे होते. वि. म. दांडेकर, नीळकंठ रथ, आनंद नाडकर्णी, विकास चित्रे, वेंकटरामैया, बी.एस.आर. राव, बी.जी.बापट, श्रीकांतन, बिबेक देबराय इत्यादींसारखे आम्हाला धारेवर धरणारे दिग्गज शिक्षक, सततच्या परीक्षा, मारुतीच्या शेपटासारख्या लांबलचक वाचन-याद्या, या संस्थेचा ‘सांख्यिकीय विश्लेषण व बौद्धिक प्रामाणिकपणा’वर असणारा भर – हे सर्वच मला खूप भावत होतं, आंतरिक समाधान देत होतं. माझं नशीब इतकं थोर, की त्याच काळात पपाही पुण्यात भारतीय शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते. ते नियमितपणे मला हॉस्टेलवर भेटण्यास येत.

‘गोखले’मधील शिक्षणाने माझ्यात होणारा बदल त्यांना निश्चितच सुखावत होता. त्या वेळी ‘गोखले’त पूर्व-युरोपीय देशांसाठीचे नवीन संशोधन केंद्र सुरू झाले होते. हे देश त्या वेळी सोव्हिएत संघाचा भाग होते. मी एम.फिल. करत असताना पपांनी मला आव्हान दिलं, की जर हे कम्युनिस्ट देश असा दावा करतात की त्यांच्याकडे महागाई नाही, व्यावसायिक/चक्रीय चढउतार नाहीत तर मग तिथे एवढे आर्थिक तणाव का आहेत? त्यांचे प्रकटीकरण नक्की कसे होते? या प्रश्नातून जे विचारमंथन माझ्या डोक्यात सुरू झाले, त्यातून मी रशियासकट सात-आठ कम्युनिस्ट देशांसाठी ‘दडपलेल्या महागाईचे निर्देशांक’ बनवले. या देशांच्या आर्थिक व वित्तीय क्षेत्रांतील अनेक असमतोलांचे सांख्यिकीय मापन केले व ‘हा खोटेपणावर आधारित डोलारा टिकून राहणे निव्वळ अशक्य,’ असे भाकीत केलेला प्रबंध १९८५ मध्ये (सोव्हिएत संघाच्या विघटनाच्या सहा वर्षे अगोदर) सादर केला. या प्रबंधाच्या बाह्य़-परीक्षकांची (जे ‘जेएनयू’चे होते) शाबासकी त्या कोवळ्या वयात माझ्यासाठी महत्त्वाची ठरलीच, पण या कामामुळे ‘अनुभवजन्य संशोधन’ या प्रांतात मी आत्मविश्वासाने उतरले.

यानंतरच्या माझ्या सर्व टप्प्यांवर – लग्न, डॉक्टरेट, नोकरी (सध्या समूहप्रमुख अर्थतज्ज्ञ, लार्सन अँड टुब्रो फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस) पपा सावलीसारखे माझ्यामागे उभे होते. अनेकदा स्वत:च्या विलक्षण सुंदर व रेखीव अक्षरातील लेखांच्या मूळ प्रती मला पोस्टाने पाठवून वाचायला लावायचे, फोन करून चर्चा करायचे. त्या वेळी ते वाईत राहून मराठी विश्वकोश, धर्मकोश, सर्व धर्म अध्ययन केंद्र, अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत होते. अर्थात फोनवरून बाकीची धम्मालही चालायचीच – पाककृतींची देवाणघेवाण, आई-ताई व माझ्यातील ‘सुपरफास्ट’ दळणवळणाची खिल्ली, सुगत-सुजन-निश्चय या त्यांच्या गोडुल्या नातवंडांच्या करामती – असे अनेक विषय त्यात असायचे. जवळपास रोज संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान त्यांचा फोन यायचा. त्याची मला इतकी सवय झाली होती, की ते गेल्यानंतरही त्या वेळेत कधी फोन वाजला तर  ‘पपांचा फोन’ म्हणून मी धावल्याचं मला आठवतंय.

आयुष्यात जेव्हा केव्हा माझ्याकडून चुकीच्या उडय़ा मारल्या गेल्या तेव्हा सगळ्यात आधी पपाच माझ्या मदतीला धावून आले. अशाच एका प्रसंगी, मी हॉस्टेलवर राहात असताना ‘ढंस्र्ं उ्रेल्लॠ; उँी१ वस्र्’अशी तार पाठवून त्यांनी माझा ताण हलका केल्याचं आठवतंय. ‘एखाद्या अवघड परिस्थितीत जेव्हा आपण सापडतो तेव्हा आपल्याला जे जाणवतं ते इतरांनाही जाणवेल, ही अपेक्षा करणं चुकीचं आहे, कारण खऱ्या अर्थाने ते लोक त्या परिस्थितीत नसतातच.’ किंवा ‘एखाद्या गोष्टीचं (वा व्यक्तीचं) आपल्या आयुष्यातील स्थान ऑक्सिजनसारखं असतं. तिच्यामुळे आपण जगत असलो तरी ती असेपर्यंत तिचं अस्तित्वही आपल्याला जाणवत नसतं. मात्र ती मिळेनाशी झाली की आपली अक्षरश: तडफड सुरू होते. अशा गोष्टी (वा व्यक्ती) आपल्याला योग्य वेळी ओळखता आल्या पाहिजेत.’ किंवा ‘कठीण प्रसंगात स्वत:कडे साक्षीभावाने बघता आलं पाहिजे,’ यांसारख्या कळीच्या वाक्यांनी त्यांनी मला वेळोवेळी शहाणं केलं.

लहानपणी खूप आजारी असताना त्यांनी मला जवळ घेऊन ‘देवाची प्रार्थना कर, बरं वाटेल तुला,’ असं म्हटलं होतं व प्रार्थना करून मला खरोखरच छान वाटलं होतं. तेव्हापासून मी नियमितपणे प्रार्थना करत आले आहे (अर्थातच कुठल्याही कर्मकांडाशिवाय, कारण कर्मकांडामुळे जातीव्यवस्थेचे समर्थन होते, जे मला पटत नाही). पपाही पूजाअर्चा, उपासतापास, व्रतवैकल्ये पाळणारे धार्मिक नव्हते. धर्मातील अन्याय्य गोष्टी, अंधश्रद्धा यांना त्यांचा ठाम विरोधच होता. मात्र विज्ञानयुगात आधुनिकीकरणाच्या नावाखाली, विरळ होत चाललेली ‘पुण्य भावना’ व झपाटय़ाने वाढत चाललेला ‘उपयुक्ततावाद’ त्यांना डाचायचा. स्वत: तत्त्वज्ञ असल्यामुळे त्यांना प्रार्थना करणे जमत नसे, पण ‘कधीतरी मनोभावे प्रार्थना करण्याची क्षमता मला प्राप्त होईल’, अशी आशा ते व्यक्त करायचे. मला त्यांनी प्रार्थनेचं औषध दिलं असणार ते ‘वेडय़ा बापाची वेडी ही माया’ या भावनेतून. सोपं आहे हे समजायला. आई-बापाची साथ पुरत नाही पण देवाची पुरते. तत्त्वज्ञ न होण्याने (जमलं नसतं हे सोडा) मी सुटले. विशेष गुंता न होऊ  देता प्रार्थना करता येते मला.

पपा जसे पाश्चत्त्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते तसेच भारतीय प्राचीन परंपरा, नैतिक मूल्ये व न्यायशास्त्राचेही (नव्यन्याय- भारतीय तर्कशास्त्र) अभ्यासक होते. आमच्या घरी पुरोगामी समाजवादी, परिवर्तनवादी, रॉयिस्ट ग्रुप, सर्वोदयी, गांधीवादी, कम्युनिस्ट, जनसंघीय, दलित पँथर, मुस्लीम सत्यशोधक समाज, युवक क्रांती दल अशा विविध गटांच्या व विचारप्रणालींच्या लोकांची ऊठबस होती. यांपैकी अनेकजण पपांचे जिवलग मित्र वा विद्यार्थी होते. आपल्या स्वार्थापलीकडे जाऊन, देशासाठी व मानवतेसाठी व्यापकपणे काम करणाऱ्या सर्व लोकांबद्दल त्यांना नेहमीच खूप प्रेम असायचं, आदर असायचा. अनेक सामाजिक चळवळींत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. पण तरीही ते ना कुठल्या पंथाचा वा चमूचा भाग बनले, ना कुठल्याही राजकीय प्रणालीचे गुलाम बनले. त्यांनी कायम स्वत:चे वैचरिक स्वातंत्र्य अबाधित राखले. बौद्धिक प्रामाणिकपणाला (सचोटीला) त्यांच्यालेखी अनन्यसाधारण महत्त्व होते. यामुळेच काही वेळा नावाजलेल्या विचारवंतांच्या / तत्त्वज्ञांच्या कामांवर परखड टीका करणे त्यांना गरजेचे वाटले. त्यावरून अनेकदा मोठी वादळे निर्माण झाली. मात्र पपांची टीका कधीच व्यक्तिलक्ष्यी नव्हती. विद्वत्तेचे वस्तुनिष्ठ निकष निर्माण करणे हा त्यांच्या व्यवसायाचा भाग होता. ना या वादांमुळे त्यांच्या मनात कटुता तयार झाली, ना कधी आमच्या घरी कुठल्या कुचाळक्या (गॉसिपिंग) झाल्या. मात्र ‘वाद’ आणि ‘वितंड’ यातील फरक ओळखायला शिकलं पाहिजे, असं ते नेहमी म्हणायचे.

पपांकडून मला काय वारसा मिळाला? – अधिकारपदांवरील व्यक्तींसमोर निर्भीडपणे जे पटतं ते सांगायला न कचरणं, कुठल्याही राजकीय विचारप्रणालीच्या आहारी न जाता अनुभवजन्य संशोधनाच्या आधारे आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं, कळपाबाहेरचं मेंढरू होण्यास न घाबरणं – हे जे मला बऱ्यापैकी जमतं, त्याचं श्रेय टुणकन उडी मारून माझ्या बापाच्या पदरात जातं. माझ्या नशिबाने नितीनसाठी (माझ्या नवऱ्यासाठी) देखील ही मूल्यं आत्यंतिक महत्त्वाची असल्यामुळे, लग्नानंतरही कुठला संघर्ष करण्याची वेळ माझ्यावर आली नाही. आत्मनिर्भरतेच्या मार्गावरील माझा प्रवास सुखाचा झाला.

मात्र वैचारिक वारसा, बौद्धिक वारसा या सगळ्यालाच ओलांडून पुढे जाते ती ‘आभाळमाया’. आजही जेव्हा दिवसभराच्या श्रमाने थकून जाऊन मी बिछान्यावर पडते व मला झोप येत नसते तेव्हा मीच मला म्हणते, ‘‘ए पपा मी आता भोपते. तू मला फापट’’.

खरच सांगते, मला अगदी शांत झोप लागते..

rupa.nitsure@ltfs.com

chaturang@expressindia.com