25 September 2020

News Flash

अक्षय दीप

आभाळमाया

(संग्रहित छायाचित्र)

मोनिका गजेंद्रगडकर

‘‘आज २७ वर्ष झाली अण्णांना जाऊन. त्यांनी त्यांच्या गळ्यातले स्वर काढून माझ्या बोटांवर ठेवले, पण देता देता त्या स्वरांना लगटून त्यांचे शब्दही माझ्या त्याच बोटांवर उतरले होते, हे त्यांनाही कळलं नव्हतं ना मलाही.. त्यांच्यासारखंच माझंही साध्य नि साधन शब्दच! एका बाजूला दिसते ती त्यांची अभंग लेखननिष्ठा तर दुसरीकडे मनात ठळक होत जातं ते त्यांचं सज्जन, सात्त्विक असं माणूसपण! ते माझ्यात वारसा म्हणून आलेलं संचित आहे, जे अक्षय दीप बनून माझ्या आयुष्याला उजळवत ठेवत आजही तेवतो आहे.. ’’

मोनिका गजेंद्रगडकर सांगताहेत आपले वडील विद्याधर पुंडलिक यांच्याविषयी..

आजही ‘लेखक विद्याधर पुंडलिक यांची ही मुलगी’, अशी माझी ओळख कुणी करून दिली की वडील म्हणून लाभलेल्या या ‘आभाळा’बद्दल मन कृतज्ञतेनं भरून येतं. वाटतं, माझं अस्तित्व गणलं जातंय कारण मला इथपर्यंत घेऊन येणारे माझे वडील कुणी ‘खास’ होते. खास म्हणजे ‘शब्द ज्यांचं साध्य आणि साधनही होतं’, असे प्रतिभावान साहित्यकार ज्यांनी केवळ शब्दांच्या, विचारांच्या, चिंतनाच्या बळावर काही अभिजात निर्माण करू पाहिलं. त्यांचा पैत्रक वारसा म्हणजे मला एक संचितच वाटतं. जे संचित एक अक्षय दीप बनून माझ्या आयुष्याला उजळवत ठेवत आजही तेवतो आहे.

माझ्यावरच्या माझ्या वडिलांच्या – ज्यांना मी ‘अण्णा’ संबोधत असे. त्यांच्या अथांग मायेचं एका वाक्यात वर्णन करायचं तर मी म्हणेन, पेस्टल रंग वापरून काढलेल्या एखाद्या चित्रकाराच्या तरल तैलचित्रासारखी त्यांची माया होती. तिचा पोतच मुळी अलवार, हळवा, कोमल होता. त्या आभाळमायेला वेगवेगळ्या संवेदनांचं, भावनांचं उबदार अस्तर होतं. खरंतर आईच्या पोटात चुकून रुजलेला माझा गर्भ. त्याच वेळी बळावलेला अण्णांचा अल्सर. तो फुटला म्हणून तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. अण्णांच्या जिवाला धोका होता. अशा वेळी बरं-वाईट घडलंच तर या गर्भाला निपटून टाक.. असं सांगून अण्णा ‘ऑपरेशन थिएटर’मध्ये शिरले नि सुखरूप बरे होऊन बाहेरही आले. म्हणजे माझा जन्म नियतीने सन्मानपूर्वक रेखला होता – ‘आपल्याला एकतरी मुलगी हवी, तीच घराचं घरपण राखते’ असं कायम म्हणत आलेल्या एका तीव्र संवेदनाक्षम लेखकाच्या शब्दभरल्या घरात!

‘तू मुलगी आहेस म्हणून’, या लिंगसूचक भेदभावाचा इतकासाही उच्चार माझ्या कानांवर अण्णांकडून आणि आईकडून पडला नाही. त्यामुळे दादा – संजय आणि अश्विन – या माझ्या दोन भावांवर झालेल्या मला, स्वातंत्र्याचा उच्चारही न होता एक दिलखुलास मुक्तता मिळाली. इतकी की स्त्री म्हणून तिला लग्नानंतर अपरिहार्यपणे करावं लागणारच आहे तर आत्ता तिला तिच्या मनासारखं हवं ते करू दे.. असं म्हणत या मुक्ततेच्या पंखांवरून हवं तसं बागडण्याचं मनमुराद स्वातंत्र्य बहाल करणारा वडील नावाचा पुरुष माझ्या आयुष्यातला पहिला दिलदार पुरुष ठरला होता! (आमच्या घरात तीन पुरुष विरुद्ध दोन स्त्रिया असं प्रमाण असलं तरी वर्चस्व होतं आम्हां दोघींचच.) अण्णांनी माझ्यावर बंधनंच जर आणली असतील तर ती वाचनाची, पुस्तकांच्या सहवासात राहण्याची. वेगवेगळ्या कवी-लेखकांच्या शब्दांवरून जीव ओवाळून टाकण्याची. शास्त्रीय संगीताच्या-वादनाच्या-मैफिली मनमुराद ऐकण्याची. उत्तम नाटकं, चित्रपट आवर्जून पाहण्याची, चित्र-शिल्पकला, कलात्मक वस्तू, पुस्तक आदी प्रदर्शनांना भेटी द्यायची. या अशा सुंदर बंधनांमुळे माझ्या आयुष्यातले लहानसहान क्षण उत्कट होऊन गेले. साधे संस्कारही वारशाच्या रूपात माझ्याकडे जमा होत गेले.

मी कळती होण्याअगोदरपासूनच अण्णा मला म्हणायचे, ‘‘तू चारचौघींसारखी मळलेल्या वाटेवरून चालू नकोस. तुझ्यासाठी तुझं असं काहीतरी वेगळं शोध. ज्यातून तुझी तुला ओळख सापडेल.’’ त्यामुळेच ज्या वयात माझ्या मैत्रिणी खेळण्यात, भटकण्यात मग्न असायच्या, त्या वयात मला मात्र अण्णांनी सतार शिकायला लावलं. सतार वाजवायला तशीही अवघड म्हणून जाणीवपूर्वक सतारच निवडली. शिवाय अण्णा स्वत: उत्तम गात असत. आंघोळीच्या वेळी त्यांचा पातळ, सानुनासिक आवाज इतका तापायचा की त्यांची रोजची आंघोळ म्हणजे आमच्यासाठी मैफिल ठरायची! सतार शिकायला सुरुवात केल्यावर अण्णा रोज रात्री जेवण झाल्यावर मला बरोबर घेऊन बाहेर पडायचे. पुण्यातील एस.पी. कॉलेजला लागून असणारा रस्ता. वर्दळ मालवलेला. त्या शांत, नीरव रस्त्यावरून अण्णांबरोबर चालणारी मी. अण्णा रंगात येत. वेगवेगळ्या आलाप, ताना, सुरावटी आकारात गात आणि मला त्यातले स्वर ओळखायला लावत. त्यांनी घेतलेल्या मिंडेतला एखादा कणस्वर मी ओळखला की ते खूष होऊन ‘‘वा सतारिया माझी!’’ म्हणत.  ‘‘तुझ्या वडिलांनी तुला दिलेली ही स्वरांची भेट कायम सांभाळ. चिरंतन आनंद देणारे स्वर तुला मी दिलेत.’’ असं म्हणणाऱ्या अण्णांनी माझ्या लग्नात मला घरचा आहेर म्हणून काय अनपेक्षित भेट दिली असेल तर ती कोलकाताची अप्रतिम कोरीव काम केलेल्या सतारीची! आजही त्याच सतारीवर माझा रियाज चालू आहे.

खरं म्हणजे मला मिळालेले वडील चारचौघांपेक्षा वेगळे आहेत, ही जाणीव फार लवकर मला झाली. कारण ‘हिचे वडील नं लेखक आहेत.’ ‘विद्याधर पुंडलिक तुझे वडील?’ या हमखास अप्रुपाने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सवय मला झाली होती. परंतु वडील म्हणून असणाऱ्या माझ्या बालबुद्धीच्या अपेक्षा मात्र अण्णांकडून कधीकधी पुऱ्या होत नसत. शिवाय लेखक म्हणून एक मनस्वीपण, स्वकेंद्रीपणा त्यांच्यात होता तसा धांदरटपणा, विसराळूपणाही जात्याच होता. शिवाय एखादी कथा त्यांच्या डोक्यात असेल तर त्या धांदरटपणात भरच पडायची. एका दिवाळीत आम्ही दोघं त्यांच्या अजब वाहनावरून – विकीवरून मिठाई खरेदीला गेलो होतो. सगळ्या पिशव्या घेऊन मी बाहेर आले नि त्यांच्या ‘विकी’वर बसणार तो त्यांनी विकी स्टार्टही केली नि ते भुर्रकन निघून गेले. मी त्यांच्याबरोबर आहे, हे ते क्षणात विसरले होते. मी चिडून घरी ओझी वाहात आले तर अण्णा घरी आलेल्या लेखक मित्राशी गप्पा मारत बसलेले. मला पाहताच म्हणाले, ‘‘ही माझी लेक हं. कुठून तरी दिवाळीची खरेदी करून येतीय वाटतं. त्यावरून तुम्हाला माझी मुलगी कामसू वाटेल. पण तशी नाहीये. आहे आळशी नि धांदरट – माझ्यासारखी!’’ मला आठवतच नाही की इतर मैत्रिणींच्या वडिलांसारखे अण्णा माझ्या शाळेत पालक म्हणून शिक्षकांना भेटायला आलेत, ना कधी ते मला माझे गुण विचारायचे. इतकंच नाही तर मी कितवीत आहे, हेही त्यांना ठाऊक नसायचं. कुणी विचारलं तर ते अडखळून मलाच विचारत, ‘‘अगं खरंच तू यंदा कितवीत आहेस?’ मी खट्ट व्हायचे. पण हेच माझ्या वडिलांचं अधोरेखित करावं असं वेगळेपण आहे, हे कळलं, जेव्हा १०वीचा गणिताचा पेपर मला विलक्षण अवघड गेला. घरी येताच मी रडत सुटले. अण्णा शांतपणे मला समजावत म्हणाले, ‘‘पास होशील नं, मग झालं तर! अगं नाही जमली ती फत्रुड आकडेवारी तर नाही जमली. तुझ्यासारखी सुंदर सतार वाजवणं किती जणांना जमतं सांग?’’

अण्णांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करताना मला प्रश्न पडतो, लेखक म्हणून त्यांचं मोठेपण अधिक मानायचं की माणूस म्हणून त्यांचं ‘सुजनत्व’ मोठं होतं? ‘‘मला जीवन समजून घ्यावेसे वाटते. मानवी अस्तित्व सामावून घेणारे एक विशाल, करून शहाणपण – त्याचा एखादाच थेंब माझ्या लेखणीने टिपून – शोषून घ्यावा ही माझी आस आहे.’’ अशी भूमिका घेऊन लिहिणाऱ्या त्यांच्यातल्या लेखकाला माणूस समजून घ्यायची विलक्षण भूक होती. पण ती केवळ लेखक म्हणून होती असं नाही. एखादा माणूस त्यांना कळला नाही, तो समजून घेता आला नाही – त्याचं मैत्र दुरावलं तर ते घायाळ होत. व्यथित होऊन ते स्वत:ला पुन:पुन्हा तपासत राहत. सामान्य, गरीब माणसांबद्दल त्यांना वाटणाऱ्या अनुकंपने, कणवेने ते वारंवार अस्वस्थ होत. मग घरावरून रात्री एकतारीवर भजनं म्हणणाऱ्या वारकरीबुवांचं दारिद्रय़ त्यांना विकल करून सोडी. घरातली मांजरी विताना कळा देतानाचं तिचं म्लान केविलवाणं ओरडण्याने त्यांच्या डोळ्यांत पाणी जमा होई. कधी चुकून जरी आम्हा मुलांवर ते ओरडले, कधी आईवर अन्याय होतोय असं वाटलं तर ते चक्क हात जोडून माफी मागत. अण्णांची ही संवेदनशीलता, त्यांचं हे सुजनत्व. त्यांची ही रूपं एकीकडे नि दुसरीकडे, खोलीतल्या एका कोपऱ्यात इतक्याशा टेबलाच्या चौकोनावर, जगापासून स्वत:ला तोडून घेत, शब्द शब्द जुळवत एकेक कथा, नाटक वा व्यक्तिचित्र लिहिणारा त्यांच्यातला लेखक, त्या लेखकाची ती अभंग लेखननिष्ठा. माझ्या मनात जास्त ठळक होत जातं ते त्यांचं सज्जन, सात्त्विक असं माणूसपण! ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं. ते माझ्यात वारसा म्हणून आलं आहे का?.. मी स्वत:ला आजमावत राहते.

एक मुलगी आपल्या वडिलांना तिच्या आयुष्यातला पहिला पुरुष म्हणूनही पाहत असते. खरंतर अण्णांमधला ‘पुरुष’ टिपिकल पुरुष असा नव्हताच. ते लेखक म्हणून की काय, एखाद्या स्त्रीसारखी कोमलता, सहृदयता त्यांच्यात होती. त्यांच्या पुरुषीपणाला कधी आक्रमकतेचा स्पर्श नव्हता. मला ठामपणे वाटतं, माझ्या जडणघडणीत त्यांच्या या पुरुष असूनही पुरुषाप्रमाणे न वागण्याचा गुणाचा मोठा संस्कार आहे. म्हणूनही असेल, कुठलीच स्त्री मला कधीच दुबळी, अबला वगैरे वाटत नाही. माझं स्त्रीपण मला अभिमानाने मिरवावंस कायम वाटतं. लेखिका म्हणून माझ्या कथांमध्ये आक्रस्ताळ, चढय़ा स्वराचा स्त्रीवाद म्हणूनही येत नसेल. माझ्या स्त्री व्यक्तिरेखांना असणारी स्वत्त्वाची, आंतरिक स्वसामर्थ्यांची जाणीव, त्यांच्या मुळाशी मी पहिला पुरुष म्हणून पाहिल्या – अनुभवलेल्या माझ्या वडिलांच्या या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असावा, असं मला वाटतं.

खरंतर त्यांचा पिंडच मुळी हळवा, अतिभावनाशील. पण कधीकधी ते विलक्षण कणखर, धीरोदत्त बनत. असंच त्यांचं एक रूप ‘सती’ कथेच्या वेळचं, माझ्या मनावर कोरलं गेलेलं – आज त्यांच्यासारखीच एक लेखिका म्हणून वावरताना त्यांच्या- माझ्यातल्या नात्याची वीण अधिक घट्ट करणारं.. त्यांच्या ‘सती’ कथेवर खटला उभा केला गेला. सावरकरांना बदनाम करण्यासाठीच पुंडलिकनी ‘सती’ कथा लिहिली असा गलिच्छ आरोप त्यांच्यावर केला गेला. मला आठवतं, आमच्या घरावर शंभर एक शस्त्रधारी लोकांचा संतप्त जमाव आला होता. अण्णांनी एकटय़ाने त्या जमावाला थोपवून धरत लेखक म्हणून आपल्या कथेमागची भूमिका ठासून सांगितली. ‘असामान्य पतीच्या कर्तृत्वाने झाकोळून टाकलेल्या एका सामान्य स्त्रीच्या घुसमटीचे मूक हुंकार टिपणारी माझी ही कथा आहे.’ अण्णांना वारंवार ‘आरोपी’ म्हटलं जात होतं. पण अण्णा ठाम होते, स्थिरही. शेवटी निश्चयी स्वरात ते एवढंच म्हणाले, ‘‘मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी कलेचं स्वातंत्र्य मानणारा लेखक आहे. मी माफी मागणार नाही कारण माझ्या लेखनाशी मी प्रामाणिक आहे. तुम्हीही माझ्या या स्वातंत्र्याचा सन्मान करावा.’’

हा लेख लिहिताना, ‘तुमचं नि तुमच्या वडिलांचं नातं वाढत कसं गेलं?’ असा एक मुद्दा ‘चतुरंग’ने सुचवला होता.. त्या मुद्दय़ाकडे येताना मी काहीशी स्तब्ध झाले पण जे वास्तव आहे ते लपवून कसे येईल ओलांडता?.. सतारवादिका मी व्हावं, ही अण्णांबरोबर माझीही मनीषा होती. मी त्यासाठी आर्ट्स निवडलं. अण्णांचाच विषय समाजशास्त्र घेतला. एम.ए. करताना वाटलं, एमएसडब्ल्यू करावं. प्रोफेसर होण्यापेक्षा कुठेतरी चांगली नोकरी मिळेल. अण्णांना माझा हा विचार समजला असावा. मार्मिकपणे त्यांनी मला प्रश्न विचारला, ‘‘समाजसेवा करून पैसे मिळवायचे स्वप्न आहे का तुझे? तुझा पिंड सच्च्या समाजसेवेचा आहे? समाजाची सेवा म्हणजे एक बांधिलकी असते. सेवेचा वसा असतो तो. नोकरीसाठी समाजसेवा करणार असशील तर चूक करते आहेस!’’ मी सावध झाले. खरोखरीच समाजासाठी झोकून देऊन करण्याची तळमळ माझ्यात कमी होती.. अण्णांनी त्यांच्या मुलीला बरोबर ओळखले होते!

या सर्व काळात आमच्यातलं नातं असं वाढत होतं, पण विचित्र आंदोळत..

१९८० मध्ये माझा मधला भाऊ अश्विन अकस्मातपणे सिंहगडाचा कडा चढताना पडून वारला आणि अण्णा त्या दु:खाचे होऊन गेले. त्यांचं लेखकपण – माणूसपण त्या मृत्यूने कुरतडून खाल्लं जसं. आईची, दादाची, माझी आम्हा साऱ्यांची धडपड होती की त्यांनी स्वत:भोवती घालून घेतलेला तो दु:खाचा विळखा दूर करावा. अण्णांची ती अंधारयात्राच सुरू झाली होती.. यात आम्हा मुलांवरची ती आभाळमाया मूक होत गेली, तरीही ती मूकपणे खूप काही सांगू बोलू पाहत राहिली. त्यांचीही या घाल्यातून बाहेर पडण्याची धडपड, तगमग जाणवायची. पण त्यांना तो दु:खाचा हात झिडकारता आला नाही आणि आमच्या हातांतले त्यांचे हात मात्र सुटत सुटत गेले. माझ्या-त्यांच्या नात्यात विवरं निर्माण होत गेली. तरीही वादळातल्या झाडा-झुडपांप्रमाणे ते नातं वाकत, उन्मळत पण चिवटपणे सावरत तग धरून होतं – कारण शेवटी ते बापलेकीचं उमाळ्याचं नातं होतं.

अण्णांच्या मूक आभाळमायेचा थकलेला हात तरीही सदैव माझी पाठराखण करत होता, हे जाणवलं जेव्हा माझं लग्न ठरलं. अभिजित सगळ्याच अर्थाने चांगला जोडीदार असूनही मला त्याची खात्री वाटत नव्हती. का कुणास ठाऊक मी साशंक होते. लग्नाची तारीखही ठरली होती. अण्णांना माझी तगमग कशी कुणास ठाऊक, पण जाणवली. मला म्हणाले, ‘‘तुला अभिजित पूर्णपणे आवडला नाही का? स्वत:वर लादू नकोस. तुला शंका असेल तर आपण थांबवू या सगळं. तू मला तुझ्या लग्नाने मोहरलेली दिसायला हवीस..’’ आणि त्यांनी सरळ अभिजितला थेट सांगून मला पुन्हा त्याला भेटायला भाग पाडले.. मी आश्वस्त झाल्यावरच लग्न निश्चित केले.

आपला बुद्धिमान मुलगा वाचू शकलेला नाही, हे सत्य समोर दाणकन आदळले असता ‘त्याचे डोळे तरी वाचवा रे’ म्हणत वेदनेने विव्हळणाऱ्या माझ्या वडिलांनी त्यांच्यातल्याच एका धीरोदात्त बापाचं दर्शन मला अकस्मातपणे घडवलं होतं. आकाशपाताळ एक करून अश्विनचे नेत्रदान त्यांनी करायला लावलं. आणि खरोखरीच केवळ अण्णांच्या या हट्टामुळेच अश्विन आज डोळ्यांच्या रूपाने ‘चिरंजीव’ ठरला. ‘सती’च्या वेळचे ते ठाम लेखक अण्णा आणि अश्विन गेल्यानंतरचे हे कणखर अण्णा – माणूस म्हणून मला पुन्हा दिसयाला हवे होते.. पण..

आज २७ वर्ष झाली अण्णांना जाऊन. त्यांनी त्यांच्या गळ्यातले स्वर काढून माझ्या बोटांवर ठेवले पण देता देता त्या स्वरांना लगटून त्यांचे शब्दही माझ्या त्याच बोटांवर उतरले होते, हे त्यांनाही कळलं नव्हतं ना मलाही.. त्यांच्यासारखंच माझंही साध्य नि साधन शब्दच! गंमत वाटते, या वारशाची! त्यांच्यासारखीच मी कथाच कशी लिहू लागले? माझं अक्षर चांगलं म्हणून ते मला त्यांच्या कथा लिहायला बसवायचे. प्रत्येक शब्द वापरण्याआधी चिंतन, वाक्य न् वाक्य, अक्षर न् अक्षर कसदारच हवं हा ध्यास.. परिपूर्णतेचा अट्टहास.. कमी लिहीन पण जे लिहीन ते अभिजात ठरावं.. अशी आकांक्षा.. याच वारशाचा धाक, अंकुश नकळत माझ्यावर.. स्वत:शीच लेखक म्हणून आत्यंतिक प्रामाणिक राहण्याची निष्ठा.. पुन:पुन्हा लिहिणं.. सतत शब्दांबद्दल, कथेबद्दल असमाधान.. तशीच असंतुष्टता – कुठून कसा येतो हा वारसा?.. ही संगती कुठून कशी येऊन आम्हां दोघांचं नातं असंही दृढ असल्याची जाणीव करून देते?

मी आईच्या पोटात असताना अण्णा त्यांच्या ‘चक्र’ या एकांकिकेचं लेखन करत होते. जरा एखादा संवाद सुचला की ते आईला समोर बसवून वाचून दाखवत. अण्णांच्या या ‘चक्र’वरून मीही शाळेत असताना एक नाटिका लिहिली होती.. ‘देवी आणि द्रौपदी’ नावाची. अनुकरणच होतं ते अण्णांच्या ‘चक्र’चं.  ते वाचता वाचता अण्णा इतके हसले होते की त्यांच्या डोळ्यांत पाणी जमलं होतं. ते माझे पहिले शब्द.. जे त्यांच्या नजरेखालून प्रथम गेले आणि तेच शेवटचेही गेले..

अण्णांनी स्वत:च्या लेखनाबद्दल लिहिताना म्हटलं आहे – कबीराच्या प्रार्थनेचा आधार घेऊन की, ‘‘माझ्या मागावरचे सूत अखंड आणि पक्के राहू दे. त्याचा धागा कधी तुटू न दे..’’ कदाचित तो धागा माझ्या हातात त्यांनीच अलगदपणे दिला आहे. जो मला त्यांच्या त्या आभाळमायेची अव्यक्त, अबोल खूण वाटते!

monikagadkar@gmail.com

chaturang@expressindia.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 1:04 am

Web Title: abhalmaya special memories monika gajendrudkar father vidyadhar pundalik
Next Stories
1 परित्यक्ता चळवळ स्त्री-पुरुषांच्या मुक्ततेसाठी
2 सप्तपदीतलं वचन
3 अ‍ॅनिमिया
Just Now!
X