12 July 2020

News Flash

आभाळमाया : शुभंकर मार्दव

राजेंद्र पै आई, लेखिका-कवयित्री शिरीष पै यांच्या आभाळमायेविषयी..

(संग्रहित छायाचित्र)

राजेंद्र पै

‘‘नवयुग’ आणि ‘मराठा’मध्ये पपांना (आचार्य अत्रे) आई आणि दादा (व्यंकटेश प) यांची समर्थ साथ मिळाली. अर्वाचीन मराठी वृत्तपत्रसृष्टीत रविवारच्या पुरवणीला पूर्ण साहित्यिक पेहराव चढवण्याची प्रथा आईनेच सुरू केली. त्याचप्रमाणे नवीन लेखक, दलित लेखक आणि कविता यांना तिने पुरवणी आणि ‘नवयुग’ दिवाळी अंकात अग्रगण्य स्थान प्राप्त करून दिले. हा सर्व तिच्या साहित्यिक आणि पत्रकारितेतील कर्तृत्वाचा एक भाग. आईने तिच्या जगण्यातून माझ्यासमोर सहृदयतेचा वस्तुपाठ उभा केला. तिचे शुभंकर मार्दव माझ्यावर बिंबले नसते तर कदाचित आयुष्याच्या आजच्या टप्प्यावर मी इतक्या सुलभतेने पोचूही शकलो नसतो.’’ सांगताहेत राजेंद्र पै आई, लेखिका-कवयित्री शिरीष पै यांच्या आभाळमायेविषयी..

पिता आणि कविता या दोन सबळ श्रद्धांच्या बळावर आयुष्यातील सारे चढउतार सहज पार पाडून लीलया पलतीरी गेलेली स्त्री म्हणजे माझी आई, शिरीष प. पती (व्यंकटेश प) आणि आम्हा दोन्ही पुत्रांवर तिचे निरतिशय प्रेम होतं. सुना आणि नातवंडांवर तिने नेहमीच चिरंतन मायेचा वर्षांव केला. तिच्या बहिणीसाठी (मीना देशपांडे) तिच्या हृदयाच्या कप्प्यात एक जिव्हाळ्याचं ध्रुवस्थान तिने राखून ठेवलं होतं. तिच्या भवसागरात आणि भावसागरात ज्या ज्या व्यक्ती तिच्या सान्निध्यात आल्या त्या सर्व तिचे प्रियजन होऊन गेल्या. परंतु या साऱ्या नात्यागोत्यांपाठी जी भक्कम बैठक होती ती पिता आणि कविता याच दोन सबळ श्रद्धांची!

आयुष्याच्या संध्याकाळचे तीन टप्पे गाठताना तिचे तीन सत्कार झाले. पंचाहत्तरीचा सोहळा ‘रंगशारदा’ येथे झाला; आशा भोसले आणि विजय तेंडुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत. एक्याऐंशीव्या वर्षी ‘सहस्रचंद्रदर्शन’ झाले रवींद्र नाटय़मंदिरात. पंचाऐंशीचा समारंभ झाला शिवाजी मंदिरात. सर्वच समारंभांत तिच्या असंख्य प्रियजनांचा सहभाग होता. शिवाजी मंदिरातील शेवटच्या समारंभात ती म्हणाली, ‘‘तुम्हाला वाटतं, की मी पंचाऐंशी वर्षांची झालेय, पण कधी-कधी पहाटे मी डोळे उघडते तेव्हा दृश्य समोर उभं राहतं ते पुण्यातील माडीवाले कॉलनीतील आमच्या त्यावेळच्या घरातलं. आठ-नऊ वर्षांची होते मी. वरच्या मजल्यावर पपांची एक लेखनाची खोली होती. मी हळूच उठून चोरपावलांनी त्या खोलीत प्रवेश करायची. पहाटेच्या धूसर प्रकाशात समोर दिसायचे टेबलावर खिडकीकडे तोंड करून लिखाणाच्या धुंदीत बसलेले पपा. त्यांच्या डोक्यावर टांगलेला पेटता दिवा. पपा लिहिताहेत, लिहिताहेत. एखादा कागद टेबलावरून उडून खाली पडतोय, पण त्याचं त्यांना भान आहे कुठं? आणि माझ्या स्तिमित डोळ्यांनी मी पाहते आहे ती समोर दिसणारी त्यांची प्रचंड उघडीबंब पाठ.. अजूनही खूपदा पहाटे पपांची त्या अवस्थेतील ती पाठ येते माझ्या डोळ्यासमोर..’’ पपांविषयीचं तेच प्रेम, तेच कौतुक आणि तीच श्रद्धा तिच्या नसानसांत कायम धगधगत राहिली. लेखिका म्हणून ती खूप मोठी झाली. नाटककार, कथाकार, संपादक, पत्रकार आणि मुख्यत: कवयित्री या नात्याने तिने खूप मोठा पल्ला गाठला. पण पंचाऐंशीव्या वर्षीही आठ वर्षांच्या वयात दिसलेली पपांची ती पाठ आठवणारी आई ही शेवटपर्यंत पपांची नानीच राहिली. एकदा पपांच्या कुठल्या तरी नाटकाचा एक लिहून पूर्ण झालेला एक अंक पपांनी तिला वाचून दाखविला आणि तेच तिला म्हणाले, ‘‘नाने, काय फर्स्ट क्लास उतरलाय हा अंक..’’ ती पपांकडे कौतुकाने पाहात राहिली आणि खुद्कन हसत म्हणाली, ‘‘पपा, कुठून पदा केलीत तुम्ही स्वत:वरतीच इतकं खूश होण्याची कला?’’

‘नवयुग’ आणि ‘मराठा’मध्ये पपांना आई आणि दादा (व्यंकटेश प) यांची समर्थ साथ मिळाली यात काही शंकाच नाही. ‘मराठा’च्या रविवारच्या पुरवणीची जबाबदारी स्वीकारल्यावर आईने तिचे रूपच पालटून टाकलं. अर्वाचीन मराठी वृत्तपत्रसृष्टीत रविवारच्या पुरवणीला पूर्ण साहित्यिक पेहराव चढवण्याची प्रथा आईनेच सुरू केली. त्याचप्रमाणे नवीन लेखक, दलित लेखक आणि कविता यांना तिने रविवारची पुरवणी आणि ‘नवयुग’ दिवाळी अंकात अग्रगण्य स्थान प्राप्त करून दिलं. ‘नवयुग’ कथा स्पर्धेमधून अनेक नवनवीन लेखक उदयाला आणले. बाबूराव बागुल, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, केशव मेश्राम, रजनी परुळेकर यांच्यासारखे अनेक लेखक आणि कवी या माध्यमांतून प्रकाशात आले. त्याकाळच्या नवसाहित्याबद्दल पपांना फारसं काही अप्रूप नव्हतं. परंतु प्रसंगी पपांचा रोष पत्करूनसुद्धा त्यावेळचे नवसाहित्य आणि विशेषत: नवकविता यांना तिने सक्रिय प्रोत्साहनही दिलं. हा सर्व तिच्या साहित्यिक आणि पत्रकारितेतील कर्तृत्वाचा एक भाग. परंतु हे सर्व असतानाही तिच्या मनात नेहमी ‘पपा तुम्ही म्हणजे तुम्हीच,’ ही भावना राहिली.

या सर्वाचा परिणाम म्हणजे साहित्याकडे आणि माणसांकडे निकोप नजरेने पाहण्याच्या तिच्या दृष्टिकोनाचे बाळकडू लहानपणापासूनच मला मिळाले. प्रत्येक कवितेला एक व्यक्तिमत्त्व असते. प्रत्येक व्यक्तीही एक कविताच असते. दोघांनाही काही उद्दिष्टे असतात. मनातले सर्व गंड बाजूला ठेवून त्यांचा कौतुकाने मागोवा घ्यावा, हीच वृत्ती तिने शेवटपर्यंत जोपासली आणि असंख्यांना आपलेसे करून घेतले. लोकांना आपलेसे करून घेण्यासाठी आवश्यक असलेले इतरही अनेक गुण तिच्याकडे होते. ती उत्कृष्ट स्वयंपाक करायची आणि मुख्य म्हणजे अगत्याने खाऊ घालायची. कोणाला काय आवडतं ते तिला बरोबर माहिती असायचे. घरी दादांच्या अनेक मेजवान्या व्हायच्या. त्यात आमंत्रितांच्या आवडीचे प्रकार ती नेमकी करायची. नवनवीन प्रकार ती सतत शिकत राहायची. कोकणनगरमधील आमच्या घरात बोरकरांनी (बाकीबाब ऊर्फ कविवर्य बा. भ. बोरकर) गोव्यातील मासळी आणि कोळंबीचे अनेक प्रकार तिच्या बरोबरीने उभे राहून तिला शिकविले होते. तिथल्याच ओकआजींकडून बेसनाचे लाडू तिने वळून घेतले होते. माझी आत्या, वत्सला आक्कांकडून सारे सारस्वत प्रकार तिने आत्मसात केले होते. दादा परचुरे यांच्या पत्नी परचुरे वहिनींकडून थालीपिठे, डाळिंबीची उसळ

आणि लोणची, तर जयंतराव साळगांवकर यांच्या पत्नी सुशीताईंकडून मालवणी पद्धतीची शहाळ्याची भाजी, चण्याची आमटी आणि इतर अनेक प्रकार तिने शिकून घेतले होते. स्वत:ची आजी अन्नपूर्णाबाई अत्रे यांच्याकडून उत्कृष्ट वरण, पंचामृत आणि पुरणपोळीचे पक्के धडे घेतले होते. चांगल्या काव्याबरोबरच चांगल्या स्वयंपाकाबद्दल तितकाच आदर तिला होता. म्हणूनच ‘माझ्या आजीचा हात’सारखी प्रतिभा आणि अनुभव यांची सांगड घालणारी कविता ती लिहू शकली. त्यातील तीन कडवी वानगीदाखल-

‘माझ्या आजीचा हो हात

कसा साजूक तुपाचा

खरपूस भाजणीचा

खमंगश्या फोडणीचा

 

तिची पुरणाची पोळी

जन्मोजन्म आठवावी

स्मृती मेथीच्या भाजीची

लसणीत साठवावी

 

तिच्या हाती कडूपणा

देते सोडून कारले

बेसनाच्या लाडवात

सारे ब्रह्मांड भरले’

आई कारल्याचे गोड लोणचे करायची. त्याची आठवण अनेक जण आजही काढतात. एक आठवण सांगतो. एका उन्हाळ्यात भर दुपारी कविवर्य सोपानदेव चौधरी घामाघूम आणि भुकेने व्याकूळ होऊन घरी आले. ‘‘नाने, मला फक्त तुझ्या हातचे वरण, भात, तूप, लिंबू वाढ..’’ म्हणून पुकारा केला आणि बाथरूममध्ये गेले. ते आवरून येईपर्यंत आई पटपट स्वयंपाकाला लागली. सोपानकाका टेबलावर आले आणि आईने आंबेमोहर तांदळाचा गरमागरम किंचित चिकटसा भात, तिच्या हातचे खास वाफाळलेले वरण, घरचे तूप आणि लिंबू त्यांच्या ताटात वाढले. सोपानकाकांनी या सर्व प्रकारांची एक मस्त ताटकविता कुस्करली, दोन-तीन मनसोक्त भुरके मारले आणि दाद दिली, ‘‘नाने, तो तांब्या (कविवर्य भा. रा. तांबे) उगाच म्हणतो की मरणात खरोखरच जग जगते.. अरे, मी सांगतो ना, वरणात खरोखर जग जगते..!’’ तर असे हे सोपानकाका आणि अशी ही आई. जितकं उत्कृष्ट पिठलं करायची तितकीच उत्तम खिम्याची बॉलकरी करायची. हैदराबादी, कॉन्टिनेंटल, चायनीज आणि ब्राह्मणी पदार्थही तितक्याच प्रावीण्याने करायची. हृदयनाथ मंगेशकरांना खुसखुशीत चकलीबरोबर पांढरे लोणी आठवणीने द्यायची. माझे अमराठी मित्र येणार असतील तर त्यांना आवडणारे तिच्या हातचे चिकन पायनॅपल न विसरता करून ठेवायची. पपांना खायला घालताना काय करू आणि काय नको असं तिला होऊन जायचं. पपांचा आहार फार नव्हता, पण वैविध्य अपरंपार. एखाद्या एकादशीला संपूर्ण उपासाचे पदार्थ तर दुसऱ्या दिवशी मटण बिर्याणी. एखाद्या दिवशी न्याहारीला परचुरे वहिनींकडून आलेलं थालीपीठ खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकला मनाबाई भोळ्यांकडे खाल्लेले हाफ फ्राय एग्ज आणि कलेजी चिली फ्राय ब्रेकफास्टला लागायचे.

पपांच्या वाढदिवशी दरवर्षी १३ ऑगस्टला ‘दै. मराठा’च्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी शाही मेजवानी असायची. सर्व व्यवस्था अर्थात आईची. दोन पंगती समोरासमोर बसायच्या. एक शाकाहारी दुसरी मांसाहारी. शाकाहारी पंगतीत बसायचे हमीद दलवाई तर मांसाहारी पंगतीत बाळाराव सावरकर. या सर्व धबडग्यात आम्ही दोघे भाऊ आईबरोबर इतक्या अतिउत्साहाने भाग घ्यायचो की आमची नावे पडली होती- अतिबळेश्वर आणि महाबळेश्वर.

आईच्या खाद्यसंसाराबरोबरच तिचा साहित्यसंसारही विस्तीर्ण होता. ती निव्वळ साहित्यिक आणि कवयित्री नव्हती तर काव्योपासक होती. तिच्या ‘एका पावसाळ्यात’ या काव्यसंग्रहाला राज्य सरकारचे उत्कृष्ट पद्यनिर्मितेचे पारितोषिक मिळाले. एक वेगळी शैली त्यातील कवितांमधून तिने आविष्कृत केली. त्यातील ‘आपले पाय’ या कवितेतील व्यक्तता विजय तेंडुलकरांना इतकी भावली, की त्यांनी ती ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकात आवर्जून वापरली.

‘आपले पाय चालत असतात

एक अज्ञात संकटाची वाट

लाटेमागे फुटत जाते

आंधळी होऊन एकेक लाट

पुन्हा-पुन्हा उजळून मिसळतो

प्रकाश काळोखात

विझून-विझून परत जळतात

आपलेच हे मातीचे हात

ठाऊक असते सारे काही..

सारे काही दिसत असते

वाहण्यासाठी जन्मलेली

एक जखम इमानाने वहात असते

..अशीही एक लढाई असते

जिचा शेवट असतो पराभव

वाया जाण्यासाठीच घ्यायचे असतात

असे काही काही अनुभव’

कथाकार म्हणून तिचे मराठी साहित्यातील योगदान लक्षणीय आहेच. तिच्या ‘खडकचाफा’, ‘कांचनबहार’, ‘हापूसचे आंबे’, ‘जुनून’सारख्या कथासंग्रहांतील कथा खूप गाजल्या आणि लोकप्रियही झाल्या. परंतु तिने जी नेमकीच नाटके लिहिली तीसुद्धा विलक्षण. तिने लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं ‘हा खेळ सावल्यांचा’ हे नाटक. त्याला हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेले पाश्र्वसंगीत, त्यातील सतीश दुभाषी आणि विशेषत: अरुण सरनाईक यांच्या भूमिका हा सर्वच मेळ कल्पनातीत स्तुत्य ठरला.

एका तरुण कवयित्रीच्या जीवनावर तिने लिहिलेले ‘कळी एकदा फुलली होती’ हे नाटक खूप गाजलं. प्रिया तेंडुलकर आणि मी स्वत:, आम्हा दोघांचं रंगमंचावर पदार्पण याच नाटकाद्वारे झालं. या दोन्ही नाटकांचे विषय अतिशय वेगळेच होते. त्यांची केलेली हाताळणी आईच्या प्रतिभेची थोरवी दाखवून गेली. या नाटकांच्या दरम्यान आईबरोबर होणारे वाद आणि चर्चा माझं स्वत:चं भावविश्व परिपूर्ण करण्यास मला अत्यंत उपयुक्त ठरल्या. त्या वेळी मी अवघा विशीत होतो, पण आईने माझ्या वयाची जाणीव मला कधीच होऊ दिली नाही. किंबहुना त्या वेळी चर्चेत असलेल्या सर्व विषयांवर विचार करण्यास आणि बोलण्यास तिने मला नेहमीच उद्युक्त केलं.

मलाच काय पण आईने कधीच कोणाला त्याच्या पोरवयाची जाणीव करून दिली नाही किंवा कुणाच्या थोरवयासमोर ती अकारण दबून गेली नाही. आईचा काव्याचा अभ्यास प्रचंड होता. कालिदास आणि ज्ञानेश्वरांपासून आधुनिक कवींपर्यंत सर्व काव्यप्रकार तिने अभ्यासले होते. सर्व अर्वाचीन काव्यप्रकार तिने हाताळले होते. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, प्रभाकर गोरे, विजय तेंडुलकर, जयंतराव साळगांवकर, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखे अनेक मान्यवर तिच्याशी अनेक विषयांवर देवाणघेवाण करत आणि अनेक शंकांची उकल करण्यासाठी येत. नव्याजुन्या पिढीतल्या अनेक ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री तिच्या घनिष्ठ मत्रिणी होत्या.

‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ या कार्यक्रमाच्या वेळी ज्या सिद्धतेने तिने पपांचा जीवनपट अशोक हांडेंकडून वदवून घेतला ते तर अतुलनीय. त्यातील माझा सहभाग हे पपांच्या आयुष्याचे सिंहावलोकन करण्यासाठी मला तिच्याकडून मिळालेलं वरदान मानतो. ज्या पातळीवर तिचा हा सर्व संवाद चाले, अगदी त्याच पातळीवर जाऊन ती एखाद्या होतकरू नवकवीबरोबरही गप्पा मारू शकत होती. अशा कवीची कविता ही जणू दोघांनी मिळून केलेली कविता आहे अशा स्वरात ती त्याच्याशी किंवा तिच्याशी चर्चाचर्वण करी. कवितेत उणीव असेल तर दूर करून देई. बलस्थान असेल तर ते अधिक बळकट कसे करता येईल याचा सल्ला देई. तिच्या दारातून एकही कवी कधी विन्मुख गेला नाही.

तिने असंख्य कवितासंग्रहांना दिलेल्या प्रस्तावना हाच तिच्या या दातृत्वाचा दाखला आहे. कवितेवर तिचं उत्कट प्रेम होतं आणि कविता करणाऱ्यांबद्दल तिला अतीव आपुलकी होती. जणू ही सर्व मंडळी आणि ती एकाच जमातीमधील होती. त्याचा अर्थ तिने कधी कुणाचे फाजील लाड केले असा नाही. कुणाला कविताच येत नव्हती तर त्याला तिने या नादी लागू नकोस, असा स्पष्ट सल्लाही दिला. तर कुणाला ‘आधी वाचावे नंतर लिहिण्याचा प्रयत्न करावा.’ असे सांगून काय काय वाचायचे याचेही मार्गदर्शन केले. पपा म्हणायचे, ‘‘मी प्रथम विद्यार्थी आणि नंतर शिक्षक आहे. मी शेवटपर्यंत जीवनाचा विद्यार्थी राहिलो. जीवनाचा मला लोभ नाही, पण मोह आहे. प्रत्येक गोष्ट मला कळली पाहिजे, आली पाहिजे या ईष्रेने मी जीवनभर सद्गुणांच्या दाराशी माधुकरी मागत आलो.’’ आईनेही तोच मंत्र पाळला आणि ‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळजन’ हेच तंत्र तिनेही अमलात आणले.

मी मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनुभवली. ती ‘हायकू’कार शिरीष प. बऱ्याचशा लोकांचा समज आहे, की तीन ओळींचा हायकू तो काय.. कुणालाही जमेल; पण मी स्वानुभवाने सांगतो, की हायकू हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे.

आईने आधी किती तरी ‘स्वल्पकविता’ किंवा ‘कणिका’ लिहिल्या होत्या, त्याही अगदी सकस आणि सुंदर. आता याच बघा ना –

 

रोज उठतात तरंग

करू काय?

भरतीवर समुद्राला

सापडला उपाय?

लोक म्हणतील फार तर

वाया गेले आयुष्य हे

एकदा देऊन टाकल्यावर

त्याची काय पर्वा आहे

लिहिणार नाही मी नाव कवितेखाली

तू ओळखावीस म्हणून

दरवळला नाही गंध अजून

कळेल तुला माझी फुलांची खूण

डोळे भिडवून डोळ्यांना

श्वासामधे मिसळून श्वास

ओठ बोलले ओठांना

हेच सत्य बाकी भास

या आणि अशा अनेक. एकदा कधी तरी विजय तेंडुलकरांनी एका जपानी हायकूंच्या इंग्रजी अनुवादांचे पुस्तक आईला आणून दिले. ते वाचले तेव्हा आईला जाणवले, की आपल्या या स्वल्पकवितेत हायकूचे बीज असले तरी ते हायकू नाहीत. अनेक श्रेष्ठ जपानी कवींचे इंग्रजी अनुवाद तिने मिळवले. हायकू म्हणजे काय हे उमजून घ्यायचा अभ्यास तिने सुरू केला. जपानी हायकू संस्कृती जाणून घ्यायला सुरुवात केली. त्यातला एक हायकू आईने मला ऐकवला. तो इतका विलक्षण होता, की त्याची जपानी पूर्वपीठिका समजून घेतल्याशिवाय त्याचा अर्थच कळणे अशक्य होते. तिनेच तो मला उमजावून सांगितला. म्हणजे असतं काय, की उन्हाळ्यात जपानी लोक खातात कमी आणि शक्यतो तऱ्हेतऱ्हेचे चहा दिवसभर पितात. साहजिकच त्यांचं वजन उतरतं. त्याला ते ‘समर सिकनेस’ म्हणतात. संबंधित हायकूमधे झालंय काय, तर ‘ती’ ‘त्या’च्यासाठी फार फार झुरतेय. ‘ती’चं प्रेम मात्र काही केल्या ‘त्या’ मूर्खाला कळतच नाही, म्हणूनच ‘ती’चं वजन उतरत चाललंय. उन्हाळ्याचेच दिवस आहेत आणि ‘तो’ ‘ती’ला विचारतोय की, काय गं अशी आजारी का दिसतेस..?, तेव्हा ‘ती’च्या लक्षात येतं, या शुंभाला काही कळणार नाही आणि ‘त्या’च्या प्रश्नाला ‘ती’ने दिलेले उत्तर म्हणजे हा हायकू –

समर सिकनेस डियर

शी सेड

अ‍ॅन्ड ड्रॉप्ड अ टिअर

तीन ओळींमागे केवढी कहाणी आहे! अर्थात, या हायकूमध्ये भावनेचं प्रदर्शन आहे. निखळ हायकूमध्ये निसर्गातला एखादा क्षण आणि मानवी मनातील एखादी भावना यांचं नकळत नातं जुळून जातं. उदाहरणार्थ, एका विषण्ण क्षणी आईला सुचलेला हा हायकू –

कधीपासून करतोय काव काव

खिडकीवरला एकाकी कावळा

इतका भरून आलाय त्याचा गळा…

किंवा

इतक्या वेगात गाडी पुढे गेली

रस्त्यावर उमललेली रानफुलं

डोळे भरून पाहताही नाही आली

किंवा

नको रे पकडूस चिमटीत

फुलपाखराचे नाजूक अंग

दुखतोय.. पंखावरला रंग

इतकी विलक्षण आर्तता आणि भावनिकता अंगी बाणवल्याशिवाय हायकू पाझरणं अशक्य आहे. आईला तो जमला कारण तिनं तो अभ्यासला आणि मनात मुरवला. आईच्या अनेक हायकूंचा मी पहिला श्रोता आहे. तिच्या कित्येक हायकूंच्या अंतिम ‘साफसफाईत’ मी भाग घेतला आहे. तिच्या पहिल्या हायकू संग्रहाचे नाव ‘ध्रुवा’ मीच सुचविले होते. ते तिला अतिशय आवडलं आणि लगेच आम्ही ते ‘डिंपल प्रकाशन’च्या अशोक मुळेंना कळवून टाकले. त्यांनीच तो संग्रह प्रकाशित केला आहे.

आईचं आणखी एक प्रेम म्हणजे प्राणिप्रेम. त्याची उपजसुद्धा मजेदार आहे. तेव्हा आई   ‘अत्रे थिएटर्स’मध्ये सक्रिय होती. ‘लग्नाची बेडी’ नाटक ‘अत्रे थिएटर्स’तर्फे पुन्हा सुरू करायचं ठरलं. पपांनी सारी जबाबदारी साहजिकच आईवर टाकली होती. पपांनी ठरवले, की त्यातील रश्मीची रंगमंचावरची एन्ट्री खऱ्याखुऱ्या कुत्र्यासकट होईल. झालं, आईने क्रॉफर्ड मार्केटमध्ये जाऊन एक पामेरियन जातीचा कुत्रा विकत आणला. त्याचं नाव बॅम्बी. तो इतका द्वाड निघाला, की तालमींमध्ये तो आई सोडून सगळ्यांना चावायचा. नाटकात तर सोडा, पण तालमीतसुद्धा बॅम्बीला कोणी उभं करायला तयार नव्हतं. मग बॅम्बीची रवानगी साहजिकच आमच्या घरी झाली. बॅम्बी एकटा नको म्हणून त्याच्या जोडीला त्याच जातीची एक कुत्री तिने घरी आणली. तिचे नाव च्युईंगम. तेव्हापासून आई जाईपर्यंत आमच्याकडे पाळीव प्राणी राहिलेच. एकदा तर आमच्या घरात एकाच वेळी कुत्रे, मांजरे, दोन ससे, एक मोठ्ठं कासव, एक खार आणि एक हरिणी एकत्र नांदत होते. दादांना जुन्या गाडय़ा बदलत राहायचा एक छंद होता. त्या वेळी अमेरिकेतून एक मोठी व्हॅन चालवत हिप्पी मंडळींचा एक चमू भारतात येऊन पोचला. वाटेत अरेबियाच्या वाळवंटात त्यांना एक छोटी हरिणी मिळाली. त्यांनी त्या व्हॅनमधून तिलाही भारतात आणले. हिप्पी जे अमली पदार्थ वापरत ते त्या हरिणीलाही देत. मुंबईला पोचेपर्यंत ती हरिणी मरायला टेकली होती. तो हिप्पी चमूही सारे पैसे संपवून बसला होता. अशा परिस्थितीत एका गाडी दलालातर्फे ती व्हॅन दादांना स्वस्त किमतीत मिळण्याची संधी आली. अट एकच. व्हॅनबरोबर हरिणीही स्वीकारावी. दादांनी ती व्हॅन या प्रस्तावासोबत घरी आणली आणि आईला ही बातमी सांगितली. आईला ती व्हॅन किंवा तिच्या किमतीत रस नव्हता. ती धावत गेली आणि त्या कोवळ्या हरिणीला उचलून आधी घरी घेऊन आली. इतके दिवस बंद गाडीतून प्रवास केलेली ती हरिणी आमच्या घरासमोरच्या हिरव्यागार बागेत प्रवेश करताच टुणकन् उडी मारून उभी राहिली आणि माहेरी आल्यासारखी आईला बिलगली. दादांनी ती व्हॅन विकत घेतली हे ओघाने आलंच. त्यानंतर अनेक महिने ती हरिणी आमच्या घरी आधीच असलेल्या ससे, कासव आणि इतर प्राण्यांसकट आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनली. आई रोज तिला ससे आणि कासवाबरोबर फ्लॉवर-कोबीची पानं, सालासकट केळी वगैरे पदार्थ खाऊ घालायची. बागेत सू-शी वगैरे झाल्यावर ती हरिणी सरळ घरात येऊन ऐटीत आई-दादांच्या पलंगावर उडी मारून विराजमान व्हायची. आमची बाग म्हणजे ‘राणीची बाग’च झाली होती. अनेक मुलं या प्राण्यांना पाहायला यायची. पुढे सरकारने वन्यप्राणी कायद्याची अंमलबजावणी सुरू केली. कुत्रे आणि मांजर सोडून इतर सर्व प्राणी आम्हाला ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त भेट म्हणून द्यावे लागले. त्या वेळी आईचा त्या हरिणीशी झालेला विरह शब्दातीत होता.

पपांचे श्वानप्रेम तर सर्वज्ञात आहे. पपांच्या ‘जॅक’ या कुत्र्याचे मातृत्व पपा गेल्यानंतर आईनेच स्वीकारले आणि शेवटपर्यंत निभावले. लहानपणापासून मांजरांचा लळा आईला होताच. आईची एक लाडकी मांजर ‘कळी’ दिसायला खूप सुंदर, आजारी पडली, आचके देऊ लागली. मी तिला माझ्या मांडीवर घेतलं. आई तिला चमच्याने पाणी पाजू लागली. कळीने तिच्या निळाशार डोळ्यांतून आईच्या डोळ्यांत नजर रोखून प्राण सोडला. त्या क्षणाला अनुसरून मी नंतर एक कविताही केली होती.. ‘मांजरंसुद्धा मरता-मरता कधी माणसं होऊन जातात..’ ट्रली नावाची तिची आवडती कुत्री एका दुर्धर रोगाने आजारी पडली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिच्या रोगाचा इलाज मरण हाच होता. डॉक्टरांनी ट्रलीचा रोग आणि जीवन एका इंजेक्शनमध्ये संपवून तिचा देह घरी पाठवला तेव्हाचा आईचा शांत आणि समजूतदार शोक आम्हा सर्वाना खूप काही शिकवून गेला. आमच्या बागेतच तिने ट्रलीचं दफन करायला लावलं. नंतर तिथेच एक जास्वंदीचं झाडही लावलं. अशा अनेक क्षणांनी आणि प्रसंगांनी आईचे माझ्यावरचे ऋण शब्दांशिवाय संवादित झाले होते.

आई, पपा आणि दादा यांची सर्वच कहाणी सांगत बसलो तर हे व्यासपीठ अपुरे पडेल. आईला जाऊन दोन वर्षे पूर्ण झाली (मृत्यू- २ सप्टेंबर २०१७) आणि काल (जन्म -१५ नोव्हेंबर १९२९) आईचा जन्मदिवस.. आईला आठवताना जाणवतं की, तिने माझ्यासमोर सहृदयतेचा वस्तुपाठ उभा केला. माझ्या हृदयाला डोळस केलं. तिचे शुभंकर मार्दव माझ्यावर बिंबले नसते तर कदाचित आयुष्याच्या आजच्या टप्प्यावर मी इतक्या सुलभतेने पोचूही शकलो नसतो.

माझे दोन संसार झाले. आईने सर्वाना भरभरून स्वीकारले. आज माझे आणि माझी पूर्वपत्नी आणि सद्यपत्नी यांचे संबंध सौहार्दाचे आहेत. माझी दोन्ही मुले खरं तर सावत्र भाऊ, पण आज दोघेही जुळ्या भावंडांपेक्षा एकमेकांना घट्ट  धरून आहेत. याचं श्रेय फक्त आईला. कारण तिने केलेली प्रेमाच्या दिव्य किरणांची पखरण आणि त्या सर्वानी स्वीकारलेली तिची आभाळमाया.. यापेक्षा अधिक आज काय लिहू..?

rajupai54@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2019 4:12 am

Web Title: abhalmaya special memories shirish pai abn 97
Next Stories
1 सूक्ष्म अन्नघटक : पोषणरोधकांचा सुवर्णमध्य
2 विचित्र निर्मिती : दस्तावेज
3 ‘मी’ची गोष्ट : मला काहीच व्हायचं नाहीये..
Just Now!
X