19 February 2020

News Flash

आभाळमाया : गझलेतलं ‘स्थिरयमक’

सुरेश भट हे मराठी गझलेतलं ‘स्थिरयमक’ आहे!’’ सांगत आहेत चित्तरंजन भट बाबा सुरेश भट यांच्याविषयी.

(संग्रहित छायाचित्र)

चित्तरंजन भट

‘‘बाबांचा गझलसंग्रह ‘एल्गार’ १९८२ मध्ये प्रकाशित झाला. गाजला. आणि मराठीत गझलेचा ‘रुतबा’ खऱ्या अर्थानं वाढला. त्या काळच्या बहुतेक सगळ्या कवींना गझल लिहावीशी वाटू लागली. त्यांच्यापैकी किती जणांनी मराठी गझल किती पुढं नेली आहे हा खरंच अभ्यासाचा विषय आहे. तरीही आजही मराठी गझलेची ओळख ही सुरेश भटांमुळेच होत असते ही वस्तुस्थिती आहे. सुरेश भट हे मराठी गझलेतलं ‘स्थिरयमक’ आहे!’’ सांगत आहेत चित्तरंजन भट बाबा सुरेश भट यांच्याविषयी.

माझा जन्म १९७० चा. अमरावतीचा. माझे आजोबा डॉक्टर श्रीधर रंगनाथ भट आणि आजी शांताबाई श्रीधर भट यांचे थोरले अपत्य म्हणजे माझे बाबा सुरेश भट. माझ्या आईचं नाव पुष्पा. आम्ही तीन भावंडं. थोरली विशाखा, मधला हर्षवर्धन आणि मी धाकटा. आम्ही १९७४ पर्यंत राहायला अमरावतीतच होतो. तोपर्यंतच्या काही आठवणी माझ्याकडं नाहीत. त्यापुढच्या काळातल्या अनेक गोष्टी स्मरणात ठसून आहेत..

अमरावतीत बाबांनी अनेक वर्तमानपत्रांत काम केलं. विदर्भातल्या गावोगावी त्यांनी मास्तरकीही केली. एवढंच काय पण, १९५३-५४ च्या सुमाराला मुंबईत असताना बाबांनी एका पानठेल्यावरही काही महिने काम केलं होतं. त्या काळात बाबा कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या घरी राहायला होते, असे माझे काका दिलीप श्रीधर भट यांनी एका आठवणीत नमूद केलेले आहे. हा झाला त्यांच्या प्रौढत्वाच्या आधीचा काळ. याच काळात त्यांनी ‘डंका’ या साप्ताहिकाचे संपादकपद भूषविले. स्वत:ची साप्ताहिकंही – ‘आझाद’, ‘जागृत विदर्भ’ – काढून पाहिली. पण तिथं काही हवा तसा जम बसला नाही. मग बाबांनी अमरावतीहून नागपूरला मुक्काम हलवायचं ठरवलं आणि ते आम्हा कुटुंबीयांना घेऊन १९७४ मध्ये नागपूरला स्थलांतरित झाले. नागपूरला आल्यावर आम्ही रामदास पेठेत सोनक यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहू लागलो. विशाखा आणि हर्षवर्धन यांनी ‘हडस शाळे’त प्रवेश घेतला आणि मी धरम पेठेतल्या परांजपे शाळेतल्या बालक मंदिरात जाऊ लागलो. बाबांनी तेव्हा श्रीकृष्ण चांडक यांच्या दै ‘महासागर’साठी संपादक म्हणून काम सुरू केलं. सीताबर्डीवर आसनदास कल्याणी यांचं ‘विश्वभारती’ नावाचं पुस्तकांचं दुकान होतं. तिथं ते मला घेऊन जात. आमच्या घराजवळच असलेल्या ‘साहित्य प्रसार केंद्रा’तही कधी कधी जाणं व्हायचं. तिथून मग ‘विदर्भ साहित्य संघा’कडं आमची स्वारी वळत असे. तिथल्या अंगणात चर्चा झडत असत. बरेचदा अशा बठकींत फिलबदी (ऐनवेळच्या) मफली होत. कविता सुनावण्याची फर्माईश बाबांना या मफलींत  होत असे आणि मग बाबा आपली एखादी ताजी कविता गाऊन ऐकवत. आपले वडील कवी आहेत हे तेव्हा मला कळत नसे.

एव्हाना बाबांच्या काही कविता/गाणी वेगवेगळ्या संगीतकारांनी स्वरबद्ध केली होती. बाबांची काही गाणी [मेंदीच्या पानावर.. (गायिका : लता मंगेशकर, संगीतकार : हृदयनाथ मंगेशकर), मल्मली तारुण्य माझे..(गायिका : आशा भोसले, संगीतकार : सी. रामचंद्र)] तर खूपच गाजली. आमच्याकडं एक रेकॉर्ड प्लेअर होता. त्यावर कधी कधी आम्ही त्या ईपी लावल्या की आपला बाप कवी म्हणून खूप ग्रेट आहे असं वाटू लागायचं. अर्थात कविता कळण्याचं ते वय नव्हतं. मात्र, त्या तबकडीवर मुद्रित झालेली आपल्या बाबांची गाणी लता मंगेशकर गात आहेत ही गोष्टच मला तेव्हा अत्यंत अद्भुत वाटत असे. एकीकडं बाबांच्या काही कविता अशा तबकडीबद्ध झाल्या होत्या आणि दुसरीकडं ‘रूपगंधा’ आणि ‘रंग माझा वेगळा’ या त्यांच्या कवितासंग्रहांनाही महाराष्ट्र शासनाचे वाङ्मयीन पुरस्कार लाभले होते. मात्र, अशा (त्या काळातल्या!) पुरस्कारांचंही महत्त्व कळण्याइतकं माझं तेव्हा वय नव्हतं.

अडीच वर्षांचे असल्यापासून पोलिओमुळे बाबांचा उजवा पाय कायमचा अधू झाला. त्या अधूपणामुळे ते मदानी खेळ कधी खेळू शकले नाहीत; पण ते उत्तम बुद्धिबळपटू मात्र होते. लहान असताना आम्ही बाप-लेक भरपूर बुद्धिबळ खेळलो आहोत. सुरुवातीला मी नेहमीच हरायचो आणि त्यामुळे कधी कधी चिडून, निराश होऊन डाव उधळून लावायचो. मग ते हसून प्रेमानं मला जवळ बोलवायचे आणि आम्ही नवा डाव सुरू करायचो. माझी आणि बाबांची कडाक्याची भांडणं भरपूर झाली, वाद झाले; पण प्रत्येक वेळी ते माझ्या चुका विसरत आणि आम्ही नवीन डाव खेळायला सुरुवात करत असू!

बाबांचा वावर अठरापगड लोकांमध्ये असायचा. लोकांच्या मदतीला धावून जाणारा आणि दिलेल्या शब्दाला जागणारा त्यांचा स्वभाव होता. त्यासाठी अनेकदा त्यांनी वाईटपणाही घेताना आणि ज्यांना मदत केली त्यांनी ती विसरताना मी अनेकदा बघितलेले आहे. सगळ्या वयोगटांतल्या माणसांशी त्यांची दोस्ती होई. लहान मुलांसोबत ते लहान व्हायचे. कॉमिक्स वाचायला त्यांना आवडायचं. एखाद्या लहान मित्राला घेऊन ते पुस्तकांच्या दुकानात गेले की चक्क फरशीवर बसून त्याच्यासोबत ते कॉमिक्स चाळत बसायचे. सॅटेलाइट टीव्हीचं आगमन झाल्यावर कॉमिक्सची जागा कार्टून नेटवर्कनं घेतली. कार्टून्सच्या मालिकाही बाबा आवडीनं बघत. त्यांची दुसरी आवड म्हणजे डब केलेले ‘कुंगफू’पट.

‘डंका’, ‘विदर्भ जागृती’नंतर पुढं बऱ्याच कालावधीनंतर बाबांनी ‘बहुमत’ नावाचं स्वत:चं नियतकालिक सुरू केलं. ‘बहुमत’त अंक छापून आला की बाबा मला तो वाचायला लावत असत. त्यातल्या शुद्धलेखनाच्या चुका काढायला सांगत असत. त्यामुळे लहानपणापासूनच माझं ‘शुद्धलेखन’ बरं होतं आणि आहे. ‘तुमच्या उपसंपादकांपेक्षा माझ्या मुलाचं शुद्धलेखन चांगलं आहे’, असं बाबा अनेकदा त्यांच्या काही संपादकमित्रांना सांगत. अर्थातच त्यात गमतीचा भाग जास्त असे.

त्या काळात बाबांचं काम दुपटीनं वाढलं होतं. जाहिराती आणणं, संपादकीय मजकूर मिळवणं, लेख लिहिणं, अन्य लेखकांच्या लेखांचं संपादन करणं ही सगळी कामं ते जवळपास एकहाती करत असत. बाबांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या काळी ते ‘राक्षसासारखं’ काम करायचे. ‘बहुमत’शिवाय उत्पन्नाचं दुसरं कुठलंच साधन नव्हतं. माझी आई पूर्णवेळ गृहिणी होती. तिने कधीच नोकरी केली नाही. घराकडं पूर्ण वेळ लक्ष देणं हेच तिचं प्राधान्य होतं. आमच्याकडं त्या काळी आर्थिक सुबत्ता किंवा स्थर्य नसलं तरी बाबांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीची तोशीस पडू दिली नाही. अर्थात यात आईच्या गृहव्यवस्थापनाचा वाटा मोठा असायचा.

तसं सांगायचं झालं तर इतर टिपिकल कुटुंबांसारखं आमचं कुटुंब नव्हतंच. म्हणजे असं की आम्ही कुठंही कधी एकत्र सहलीला गेलो नाही (आईबरोबर उन्हाळ्यात नागपूरहून पुण्याला आजोळी जाणं हीच आम्हा भावंडांसाठी ‘सहल’ असायची), चित्रपटाला गेलो नाही की नाटकंही आम्ही कधी एकत्र पाहिली नाहीत. बाबांना हिंदी चित्रपटांची तेवढी आवडही नव्हती म्हणा. जुन्या जमान्यातला नट शेख मुख्तारचं नाव मात्र यायचं त्यांच्या तोंडी कधी कधी.

माझे बाबा पट्टीचे खवय्ये होते आणि त्यांना हॉटेलिंगची मनस्वी आवड होती. आम्हा भावंडांसाठी चंगळ म्हणजे नागपूरच्या सदर भागातल्या ‘अशोका रेस्टॉरंट’मध्ये जाणं आणि तिथलं नोगा आणि टूटीफ्रूटी वगरे असलेलं ‘अशोका स्पेशल आइस्क्रीम’ खाणं. बाबा खूप खूश असले की ‘अशोका’त जात असत.  मात्र, आईला बाहेरचं खाणं अजिबात आवडत नसे. बाबांना मांसाहार आवडायचा. त्यांनीच मला मटण खायला शिकवलं. ‘बहुमत’मध्ये एजाझ नावाचा हिशेबनीस होता. ‘‘कधी चित्तूला तुझ्या घरी घेऊन जा आणि खास मटण समोसे खाऊ घाल,’’ असा त्यांनी एकदा एजाझला आदेश दिला होता. आणि ‘‘त्यातला खिमा खूप बारीकही नको; पण दाणेदार हवा,’’ हेही त्यांनी त्याला बजावलं होतं. मग एक दिवस एजाझ सायकलवरून मला त्याच्या घरी घेऊन गेला होता. खिमा अगदी बाबांच्या ‘आदेशा’नुसार करण्यात आला होता हे सांगायला नकोच!

मात्र, बाबांचा मांसाहार घराबाहेर चालायचा. घरी आई मांसाहार चालवून घेत नसे. घरी मेथीची भाजी, मूगवडय़ा, वालाची उसळ, कारल्याची भाजी बाबांना आवडत असे. धणे, सुक्या लाल मिरच्या, तमालपत्र टाकून केलेलं व मोहरीच्या तेलाची फोडणी दिलेलं वरण त्यांना आवडायचं. तमालपत्र का? कारण, तमालपत्र टाकल्यानं मोहरीचा उग्रपणा कमी होतो. क्वचित कधी मूड आला तर बाबा स्वत:ही स्वयंपाक करत असत. बाबांसोबत जेवायला बसल्यावर बोलता बोलता इकडचीतिकडची खूप माहिती मला मिळत असे. मिरची कुठून आली? शिवाजी महाराजांच्या काळात तिखटासाठी मिरची वापरली जात असे का? ज्या तव्यावर तुझी आई फुलके करते आहे तो ‘तवा’ नक्की कुठला? चंगेझ खानाचं दुसरं नाव किंवा खरं नाव काय? ते नाव त्याला कसं पडलं? आपली ‘रेस’ (वंश) कुठली? आपण खरेच ‘आर्य’ आहोत की ‘खिचडी’ आहोत? अशा असंख्य प्रश्नांची प्राथमिक उत्तरं मला जेवणाच्या वेळी होणाऱ्या चर्चामधून बाबांकडून मिळाली आहेत.

बाबांचं वाचन प्रचंड होतं. आणि हे वाचन रात्र रात्रभर चालायचं. टेबल लॅम्प, पुस्तकं आणि तंबाखू-चुन्याची पुडी या ‘सामग्री’ची टेबलावर नीट व्यवस्था लावून मग ते खुर्चीत बैठक जमवून वाचनाला बसत असत. रात्र जास्त झाली की मग खुर्ची सोडून ते बिछान्याकडं वळत आणि मग तिथला बेडलॅम्प लावून गादीवर पहुडून त्यांचा वाचनयज्ञ पहाट उलटून जाईपर्यंत सुरू राही. मध्ये मध्ये चहाची तल्लफ आली की मग चहासाठी आवाज दिला जात असे. मी जागा असलो तर मी त्यांना चहा करून द्यायचो आणि कधी कधी पोहेही. माझ्या हातचे पोहे त्यांना आवडायचे. ‘‘तुला काहीच जमलं नाही तर चहा-पोह्य़ांची गाडी टाक. खूप कमावशील,’’ असं ते मला गमतीनं म्हणत.

माझे बाबा नास्तिक होते. आई मात्र अत्यंत धार्मिक होती आणि आहे. म्हणजे संध्याकाळ झाली की ‘रामरक्षा’ आणि ‘भीमरूपी’ म्हटल्याशिवाय अन्नग्रहण नाही वगरे. बाबा पक्के नास्तिक असताना आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला असावा, असा मला प्रश्न पडतो. मला वाटतं याचं एक उत्तर हे, की बौद्ध धर्म हा ईश्वराचं अस्तित्व नाकारणारा धर्म आहे. दुसरं उत्तर, बौद्ध धर्म हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धर्म आहे.

डॉ. बाबासाहेब हे त्यांचं श्रद्धास्थान होतं. बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन यांच्यासारख्या प्रकांड पंडिताशी बाबांच्या चर्चा घडत असत. अनेक बौद्धविहारांच्या मदतीसाठी बाबांनी आपल्या काव्यगायनाचे जाहीर कार्यक्रमही केले होते. अशा अनेक कारणांमुळे त्यांचं मन बौद्ध धर्माकडे वळलं असावं, असं मला वाटतं.

खामल्याच्या घरातून आम्ही १९७७ मध्ये धनतोलीत वझलवार यांच्या घरात राहायला गेलो. ‘बहुमत’ सुरूच होतं; पण यथातथाच सुरू होतं. याच दरम्यान बाबांचं गझललेखन मात्र नव्या जोमानं चाललं होतं. ‘गझल म्हणजे काय’ हे मला तोपर्यंत कळत नव्हतं; पण ‘गझल’ हा शब्द वारंवार कानी पडू लागला होता. बाबांची नवी गझल लिहून झाली की त्या गझलेची पहिली वाचक बरेचदा माझी आई असे. कधी कधी आम्हा भावंडांनाही ती वाचायला मिळे. एखाद्या शब्दाच्या वापराबाबत बाबा अडले, की ते पहिल्यांदा सरळ आईला विचारत असत. पुरुषांपेक्षा स्त्रियांची शब्दसंपदा समृद्ध असते आणि त्यांना भाषा जास्त कळते, हे बाबांचं मत होतं. आपल्याला माहीत नसलेले भाषेतले बारकावे, कंगोरे माहीत करून घेण्यात त्यांना विलक्षण आनंद मिळत असे आणि याबाबतीत इतरांना विचारण्यात त्यांना कधीही कुठलाही कमीपणा वाटत नसे. असं काही नवीन कानी पडलं, कळलं की हा आनंद ते इतरांसोबत वाटून घेत असत.

आमच्या घरात भरपूर शब्दकोश होते. बाबा शब्दांच्या अचूक वापराबद्दल आग्रही असायचे. त्यामुळे शब्दांच्या वापराबद्दलच्या त्यांच्या शंका ते आजूबाजूच्या अगदी साध्यासुध्या माणसांना, आज्या-मावश्यांनाही विचारत असत. कारण, सामान्य मराठी माणसं जिवंत, खळखळती व कलदार मराठी भाषा बोलतात यावर त्यांचा विश्वास होता. आपण साध्यासुध्या मराठी माणसांसाठी कविता लिहितो याचं त्यांना भान होतं आणि अभिमानही होता.

‘जो आपल्या मातृभाषेवर प्रेम करत नाही त्याच्यासारखा करंटा दुसरा कुणी नाही’ हे बाबांचं वाक्य मी इतरांना नेहमी ऐकवत असतो. बाबांना मराठीचा अभिमान होता. त्याला बळकट कारणही होतं. बाबा हे कट्टर ‘संयुक्त महाराष्ट्रवादी’ होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचारकार्यासाठी गाणीही लिहिली होती. त्यातलं एक गाणं म्हणजे ‘गीत तुझे मी आई गाईन.’ कॉम्रेड शाहीर अमर शेख यांनी आपल्या बुलंद आवाजात हे गाणं गायलं होतं. याच कालावधीतली बाबांची दुसरी शब्दरचना म्हणजे ‘लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी’

हे गीत. मातृभाषेच्या नात्यानं मराठीवर बाबांचं प्रेम असणं साहजिकच होतं. मात्र, त्यांचं इतर भाषांवरही प्रेम होतं. वलीऊर्रहमान सिद्दिकी हे बाबांचे जीवश्चकंठश्च मित्र. बाबा त्यांच्याबरोबर असले की ते वलीकाकांच्या भाषेत – उर्दूत – बोलू लागत असत. एखादी भाषा आत्मसात करायची म्हणजे त्या भाषेत हसता-खिदळता-रडता-आनंदता यायला हवं. वलीकाका आणि बाबा यांच्यातल्या अशा किती तरी ‘बातचिती’ हे त्याचं अगदी जिवंत उदाहरण असायचं.

१९८० च्या आसपास आमच्या घरी पहिला कॅसेट प्लेअर आला आणि सोबत बेगम अख्तर यांच्यासह मेहदी हसन, अमानत अली खाँ, फरीदा खानम, गुलाम अली, मेहनाझ, आबीदा परवीन इत्यादींच्या कॅसेटही येऊ लागल्या. वलीकाकांच्या बहिणीचे, कुर्रतआपाचे यजमान उमरभाई देसाई हे सौदीतून असा खूप मालमसाला खास बाबांसाठी आणत असत. या सगळ्या गायकांच्या गझला ऐकणं आणि त्या इतरांनाही ऐकवणं हा एक अद्भुत सोहळा रोज आमच्या घरी चालायचा. घरातला संपूर्ण ‘माहौल’ गझलमय होऊन जायचा. त्या काळी ‘रेडिओ पाकिस्तान’ लावून एखादी नवीन चीज मिळते आहे का हे मी बघत असे. आमच्याकडं ‘टू इन वन’ रेकॉर्ड प्लेअर आल्यावर अशा काही नवीन गझला मिळाल्या की मी रेकॉर्ड करून त्या लगेच बाबांना ऐकवत असे. आबीदा परवीननं गायलेली ‘हम ना नकहत है ना गुल है’ ही गझल मला अशीच रेडिओवर मिळाली होती. ती मी बाबांना ऐकवल्यावर त्यांना अगदी कोहिनूर सापडल्यासारखा आनंद झाला होता.

याच काळात जाहीर काव्यवाचनाचे कार्यक्रम स्वीकारायला बाबांनी सुरुवात केल्यामुळे त्यांची भ्रमंती बरीच वाढली होती.. ते उभा-आडवा महाराष्ट्र फिरत. उपजीविकेसाठी कविता हेच त्यांचं एकमेव साधन होतं. त्यांचं काव्यगायन पाहणं आणि ऐकणं हा विलक्षण अनुभव असायचा. त्यांचं सादरीकरण तर जोमदारच असे. कविता सादर करताना बाकीचं सगळं विसरून ते कवितेशी इतके एकरूप आणि तल्लीन होत असत की एखादा सूफीच!

बाबांनी त्यांच्या काही रचनांना (बहुतकरून गझला आणि काही गीतं) स्वत: चाली दिलेल्या आहेत. या चाली मला अतिशय आवडतात. चांगल्या गायकांकडून त्या गाऊन घ्यायला हव्यात असं मला वाटतं. तसं मी बाबांना सांगितलंही होतं.

‘एल्गार’ हा बाबांचा गझलसंग्रह (बोटांवर मोजता येतील एवढय़ा गझलेतर रचनाही या संग्रहात समाविष्ट आहेत) १९८२ मध्ये तो प्रकाशित झाला. गाजला. आणि मराठीत गझलेचा ‘रुतबा’ खऱ्या अर्थानं वाढला. त्या काळच्या बहुतेक सगळ्या कवींना गझल लिहावीशी वाटू लागली. मला आठवतं, ‘मेनका’ या मासिकात ‘गझलिस्तान’ या नावाचं केवळ गझलांचं (अन्य कवींच्या; बहुतकरून होतकरू कवींच्या गझलांचं) सदर बाबा तेव्हा चालवत असत. बाबांनी निवडलेल्या गझला त्या सदरात प्रसिद्ध होत असत. आमच्या घरी त्या काळी गझलांचे किंवा गझल समजून पाठवलेल्या रचनांचे ढीगच्या ढीग येऊन पडत असत. त्या सगळ्या रचना वाचणं, कवींना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित करणं यात बाबांचा खूप वेळ जायचा, खूप ऊर्जा जायची. बौद्धिक परिश्रम करावे लागायचे. गझलेच्या प्रचारा-प्रसारासाठी बाबांनी महाराष्ट्रातल्या (आणि काही महाराष्ट्राबाहेरच्याही) नवोदित कवींशी केलेला अतिप्रचंड पत्रव्यवहार याची ग्वाही देतो.

या पत्रव्यवहारापायी त्यांचा एकंदर किती वर्षांचा सर्जनशील काळ खर्ची पडला त्याचा हिशेब करणं अवघड! पत्रव्यवहाराची बाबांची म्हणून एक स्वतंत्र अशी अतिशय शिस्तबद्ध शैली होती. काळी, लाल, हिरवी, निळी अशा वेगवेगळ्या ‘शाईं’चा मुद्दय़ानुरूप ‘रंगोत्सव’ त्यांच्या पत्रांमधून जणू भरत असे.

असंख्य कवी किंवा कवी म्हणवून घेणारे अनेक जण या पत्रव्यवहारामुळे गझलेकडं वळले आणि किमान शास्त्रशुद्ध गझल लिहू लागले. त्यातले किती तरी जण आजही गझल लिहीत आहेत आणि जे आजही गझल लिहीत आहेत त्यांच्यापैकी किती जणांनी मराठी गझल किती पुढं नेली आहे हा खरंच अभ्यासाचा विषय आहे. असो. माझ्या मते, अशा कवींची संख्या दोन-अडीच जणांपेक्षा जास्त नसावी. अशी आहे मराठी गझलेची आजची स्थिती! आजही मराठी गझलेची ओळख ही सुरेश भटांमुळेच होत असते ही वस्तुस्थिती आहे. सुरेश भट हे मराठी गझलेतलं ‘स्थिरयमक’ आहे!

सुरेश भटांनी मराठी गझलेची स्वत:ची अशी भाषा किंवा ‘इडियम’ प्रस्थापित केली आणि मराठी गझलेचा पाया रचला, हे माझ्या मते त्यांचं सगळ्यात मोठं योगदान होय.

गझल लिहिणाऱ्या असंख्य कवींना बाबांनी ‘मेनका’शिवाय इतरही अनेक नियतकालिकांद्वारे आणि वर्तमानपत्रांद्वारे प्रकाशात आणलं. हे करताना बाबांवर अनेकदा अन्याय्य टीकेची झोडही चहुबाजूंनी उठवण्यात आली; पण त्यांनी ती टीका, ती खिल्ली, तो उपहास छातीवर झेलला आणि ते एकांडे चालत राहिले.. कुठलंही स्थिर आणि निश्चित स्वरूपाचं उत्पन्न नसताना बाबांनी संसाराचा डोलारा सांभाळला आणि साहित्यविश्वातून सतत उपेक्षा होत असूनही गझलेचाही बेडा पार केला. हा माझ्या लेखी एक मोठाच चमत्कार आहे.

बाबांच्या निधनाच्या (१४ मार्च २००३) आधी काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. सुरेश प्रभू यांनी ‘पद्मश्री’ किताबासाठी बाबांचं नाव सुचवलं होतं. माझ्या आठवणीनुसार, त्याआधीही एकदा त्यांचं नाव या किताबासाठी सुचवण्यात आलं होतं. याच दरम्यान माझा थोरला भाऊ हर्षवर्धन आमच्यातून कायमचा निघून गेला. बाबा वरून दाखवत नसले तरी हर्षवर्धनच्या अकाली निधनामुळं ते आतून खचले होतेच. प्रभू यांनी ‘पद्मश्री’साठी पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेलं पत्र बाबांनी मला दाखवलं. ते पत्र दाखवल्यावर मी त्यांना म्हटलं, ‘‘बाबा,  तुम्हाला ‘पद्मश्री’ किताबाची काय गरज आहे? तुम्ही गझलेचे ‘खलिफा’ आहात आणि ही गोष्ट कुणीही पुसून किंवा नष्ट करून टाकू शकत नाही. त्यामुळे तुम्ही कुठलीही अपेक्षा ठेवू नका. मिळाला तर मिळाला. तुमचं काम त्यापेक्षाही खूप खूप मोठं आहे.’’

माझं हे बोलणं ऐकून बाबा किंचित हसले आणि माझा तळहात त्यांनी त्यांच्या हातात घेतला व त्यांच्या खास शैलीत हलकेच दाबला.

आज बाबा जाऊन १६ वर्ष उलटली आहेत.. पण ते गेले आहेत असं अजूनही वाटत नाही. बाबा सतत माझ्यासोबत असतात. मला त्यांची वेगळी आठवण करावी लागत नाही.

csbhat@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on September 7, 2019 12:02 am

Web Title: abhalmaya special memories suresh bhat abn 97
Next Stories
1 सगुण ते निर्गुण
2 आधी चितारू तुज मोरया.
3 सुगंध मातीचा
Just Now!
X