News Flash

चालते बोलते विद्यापीठ

सांगताहेत मधुरा जसराज आपले पिता शांताराम राजाराम वणकुद्रे अर्थात व्ही. शांताराम यांच्याविषयी..

|| मधुरा पंडित जसराज

‘‘एनएफडीसीमध्ये ‘आदमी’, ‘दुनिया ना माने’ आणि ‘पडोसी’ हे पपांचे तीन चित्रपट दिग्दर्शनाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात होते, हे कळल्यावर पपांचा खूप अभिमान वाटला. पपा द्रष्टे होते. त्यामुळे चित्रपटांचे विषय, त्यांची तांत्रिक बाजू, दिग्दर्शनाचे तंत्र, या सर्वच गोष्टींत ते काळाच्या खूप पुढचा विचार करत. ‘कुंकू’ हा सामाजिक विषयावरचा चित्रपटसृष्टीतला पहिला चित्रपट. ‘आदमी’मध्ये त्यांनी वेश्या आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या पोलिसाची कथा मांडली तर ‘शेजारी’त हिंदू-मुस्लीम मैत्रीचा संवेदनशील विषय घेतला. ‘दो आँखे बारह हाथ’ हा तर त्यांच्या कारकीर्दीतला मैलाचा दगड ठरावा. ’’ सांगताहेत मधुरा जसराज आपले पिता शांताराम राजाराम वणकुद्रे अर्थात व्ही. शांताराम यांच्याविषयी.

व्ही. शांताराम.. चित्रपटमहर्षी.. माझे पपा! आभाळाएवढय़ा माणसाच्या शीतल छायेत मायेचा गारवा अनुभवलेली आम्ही सात भावंडं! स्वत: उन्हाचे चटके सोसत असतानाही, आपल्या मुलांना मात्र त्याची झळ लागू नये यासाठी सदैव तत्पर राहणारे पपा!

मला आठवताहेत ते पपा सतत त्यांच्या कामात व्यग्र असणारे. विशेषत: एखाद्या चित्रपटाचं एडिटिंग अर्थात संकलन सुरू असेल तर ‘राजकमल’ स्टुडिओमध्ये न थकता १८ ते २० तास काम करत. प्रत्येक काम अचूक व्हावं यावर त्यांचा भर असे.  चित्रपटांबाबत ते जितके काटेकोर तेवढेच आम्हा मुलांबाबतही! आम्हा सातही भावंडांवर त्यांचं बारीक लक्ष असे. मुलं, विशेषत: मुलगे चुकले की थप्पड पडायची. मुलींवर मात्र त्यांनी कधी हात उचलला नाही. खरंतर ते दिवसभर घराबाहेर असायचे. पण आईकडून त्यांना आमची खडान्खडा हकिगत कळायची.

लहानपणापासून मला लिखाणाची खूप आवड. १४-१५ वर्षांची असताना माझ्या गोष्टी, निबंध यांचं मी एक हस्तलिखित तयार केलं होतं. तेसुद्धा त्यांनी आवर्जून वाचलं होतं. प्रत्येक मुलाच्या अशा छोटय़ा-छोटय़ा गोष्टींसाठी ते कसा वेळ काढत कोण जाणे? त्यांनी कधीही आपली मतं वा आवडीनिवडी मुलांवर लादल्या नाहीत.  माझ्या बहिणीने एकदा त्यांना म्हटलं, मला गाणं शिकायला नाही आवडत, मी सतार शिकते. लगेच त्यांनी तिच्यासाठी सतारीची शिकवणी सुरू केली. मी स्वत: मणिपुरी, भरतनाटय़म् शिकले होते. ‘झनक झनक पायल बाजे’ चित्रपटात गोपीकृष्ण यांचं नृत्य पाहिलं. ‘‘मी त्यांच्याकडे कथ्थक शिकू का?’’ असं विचारलं. पपांनी आनंदाने परवानगी दिली. आमच्या सरोजताईला चित्रकलेत खूप रस होता. पपांनी थोर चित्रकार बाबा गजमल यांना विनंती केली. ते तिला पोट्र्रेट पेंटिंग शिकवायला येत. ती उत्तम करत असे. नृत्य, गाणं, लिखाण, चित्रकला – प्रत्येक कलाप्रकाराचा आपल्या आवडीप्रमाणे आस्वाद कसा घ्यायचा, त्यातून भरभरून आनंद कसा मिळवायचा हे पपांनीच आम्हाला शिकवलं. त्यामुळे आमच्या जीवनाला निश्चित दिशा मिळाली.  पपा केवळ शिकवणी लावून मोकळे होत नसत. आमच्या प्रगतीवर त्यांचं बारीक लक्ष असे. मला आठवतं, मी गाणं शिकायला लागले तर मालपेकरांकडून ते त्याची माहिती घ्यायचे, ‘मधु कसं गातेय? तिचा कार्यक्रम कसा झाला?’ मग एखादे दिवशी मला सांगायचे, ‘‘मला समजलं, त्या अमुक कार्यक्रमात तू ही जागा चुकलीस. ती दुरुस्त कर. बाकी चांगली गातेस. अशीच गात रहा.’’

कलेच्या प्रांतात मुशाफिरी करताना त्यांनी आमच्यावर त्या काळातसुद्धा कधीही कोणतीही बंधनं घातली नाहीत. मला आठवतं, त्या काळात म्हणजे जवळजवळ  साठ-पासष्ट वर्षांपूर्वी मी गाण्याच्या मैफिलींना जात असे. त्यासाठी पपा मला गाडी-ड्रायव्हर आवर्जून देत.  हे गाण्याचे कार्यक्रम रात्री सुरू होऊन पहाटे संपत. आई त्यांच्याकडे तक्रार करत असे. मधु रात्री घराबाहेर पडते ती पहाटे येते. तरण्याताठय़ा मुलीने असं रात्रभर घराबाहेर राहणं बरं दिसतं का?’’ ‘सातच्या आत घरात’चा तो काळ. पण पपा आईला म्हणत, ‘ चांगलं गाणं ऐकू दे तिला.’ पपांच्या प्रोत्साहनामुळे मी त्या काळातल्या  गुलामअली साहेब, अमीरखाँ साहेब, विलायत खाँ साहेब, रविशंकरजी अशा सगळ्या मातब्बर मंडळींच्या कार्यक्रमाला जात असे.  पपाही शहरातल्या सर्व चांगल्या कार्यक्रमांना आम्हा सर्वाना स्वत: घेऊन जात. उदयशंकर, मृणालिनी साराभाई यांचे सोलो कार्यक्रम, गाण्यांच्या मैफिली, चांगले चित्रपट, नाटकं ; कायम पुढच्या रांगेची तिकिटं काढून  दाखवत.  खरंतर त्यांच्या एका फोनवर कोणीही त्यांना दहा-बारा फ्री पासेस पाठवू शकत होते. पण त्यांनी तसं कधीही केलं नाही. आमचं मिनी थिएटर होतं. फिल्म फेस्टिव्हलचे सगळे चित्रपट बघायला ते आम्हाला तिथे बोलवायचे. प्रत्येक चित्रपटात काय चांगलं आहे, चुका आहेत, अभिनयापासून तंत्रापर्यंत प्रत्येक गोष्ट ते आम्हा मुलांना छान समजावून सांगत.

पपांचा आम्हाला असा श्रीमंत करणारा सहवास मिळत असे. शनिवार-रविवार शाळेला सुट्टी असली, की आम्हाला सेटवर किंवा ‘राजकमल’मध्ये जाण्याची परवानगी असे. ‘तिथे येऊन काही शिका’ असाही पपाचा आग्रह नसायचा. फक्त तिथे हजर राहून फिल्म मेकिंगचं काम शांतपणे बघा, समजून घ्या एवढीच त्यांची अपेक्षा असे. खरंतर आमच्यासाठी पपा स्वत:च चित्रपटनिर्मितीचं  एक चालतं-बोलतं विद्यापीठ होतं. त्यांच्या विद्यापीठातले विद्यार्थी असणंच आमच्यासाठी गौरवाचं होतं. मला नेहमी वाटतं, पपांना आपल्या मुलांनी रट्टे मारून, घोकंपट्टी करून अभ्यासात अव्वल येण्यापेक्षा त्यांचं व्यक्तिमत्त्व चहुअंगांनी फुलावं, असं वाटत असावं. मला लहानपणाची एक मजेदार गोष्ट आठवते. मी सेंट कोलंबोची विद्यार्थिनी! एकदा प्रायमरीत असताना माझा रिझल्ट लागला. मी अभ्यासात हुशार होतेच. पण त्या परीक्षेत मी गणितात नापास झाले. आई माझ्यावर खूप रागावली. म्हणाली, ‘‘पपा आले की सांगते त्यांना.’’ एडिटिंग नसलं की पपा बरोबर आठ वाजता घरी यायचे. मी त्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजताच झोपेचं सोंग घेऊन पडून राहिले. पपा आले. त्यांनी प्रगतीपुस्तक पाहिलं. आता मोठ्ठा धमाका होणार या आशंकेने मी डोळे गच्च मिटले. ते हसले. आईला म्हणाले, ‘‘अगं विमल, मीपण गणितात नापास व्हायचो. जाऊ दे. झोपू दे तिला.’’ मी बिछान्यातच खुदकन हसले.

त्या काळात आमचं वास्तव्य होतं पेडर रोडवरच्या उच्चभ्रू वस्तीत. पपांचा नावलौकिक मोठा. पण त्यामुळे आम्हाला शाळेत कधीही खास वागणूक मिळाली नाही. उलट मस्ती केली की शिक्षा व्हायची. आपण जसं स्वकर्तृत्वानं नाव कमवलं तसं आपल्या मुलांनीही स्वकर्तृत्वावरच पुढे यावं, असं त्यांना वाटत असावं. मी आकाशवाणीची मान्यताप्राप्त गायिका होते. पण ते स्थान मी माझ्या गायनकौशल्यावर मिळवलं. त्यांनी कोणाकडेही माझ्या नावाची शिफारस केली नाही. एकदा माझं गाणं ऐकलं आणि मिश्कीलपणे म्हणाले, ‘‘अरे वा, माझी मुलगी असून छान गातेस!’’ माझं लेखन, दिग्दर्शन, गायन यातलं टॅलेंट कळत असूनही त्यांनी मला फारसं प्रोत्साहन  दिलं नाही. आपल्या मुलांनी चित्रपटसृष्टीत येऊ नये, असं त्यांना ठामपणे वाटत असे. आज मागे वळून पाहताना वाटतं, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ते चित्रपटसृष्टीत आले. साठ वर्षे त्यांनी ही मायानगरी खूप जवळून पाहिली, अनुभवली. त्या अनुभवावरून मोह, अडथळे यामुळे आपल्या मुलींची आयुष्यं खराब होऊ नये असं त्यांना वाटलं असावं. त्यामुळे एकदा एका नामांकित संगीतकारानं मला गाण्यासाठी भेटायला बोलवलंय म्हटल्यावर ते चिडले आणि ‘त्या माणसाला भेटायला जायचं नाही,’ असं निक्षून बजावलं. तेव्हा खंत वाटली, पण आज वाटतं, ही खरी आभाळमाया!

पपा तत्त्वनिष्ठ होते. स्वत:च्या विचारांशी किंवा वक्तव्याशी विसंगत ते कधीही वागले नाहीत. मी सतरा-अठरा वर्षांची होते तेव्हा. मला आठवतं, एकदा पपांनी ‘फिल्म फेअर’मध्ये एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं, ‘आपण इंग्रजी चित्रपट कशाला पाहावे? आपण हिंदी चित्रपटच पाहायला हवे.’ त्यांनी हे नुसतं लिहिलं नाही. त्याची सुरुवातच आमच्या घरात फतवा काढून झाली. त्यामुळे आमचे इंग्रजी चित्रपट पाहणं बंद झालं. नेमका त्याच वेळी ‘माय फेअर लेडी’ चित्रपट गाजत होता आणि मला तो पाहायचा होता. पण त्यांचा आदेश मोडायची हिंमत कोण करणार? पण मीसुद्धा शेवटी त्यांचीच मुलगी. मी घरात जाहीर केलं, ‘मी आजपासून कोणताच चित्रपट पाहणार नाही. इंग्लिश नाही आणि हिंदीही नाही.’ त्याचवेळी ‘नवरंग’ चित्रपटाची ट्रायल होती. आईने मला निरोप दिला, ‘‘तुला पपांनी ‘नवरंग’च्या ट्रायलला बोलवलं आहे.’’ आता आली का पंचाईत! मग मी शक्कल लढवली. आईला म्हटलं, ‘‘त्यांनी मला का नाही फोन केला? मी नाही जाणार.’’ मला वाटलं, एवढय़ा गडबडीत पपा मला कसले फोन करतायत? पण थोडय़ाच वेळात त्यांचा खरंच फोन आला. मग मी ‘नवरंग’ पाहिला, खूपच आवडला. एका रविवारी जेवणाच्या टेबलावर मी त्यातल्या मला भावलेल्या एकेक गोष्टी सांगायला लागले. चित्रपटातील एकेक शॉटस्, फूटस्टेप्स, नृत्य, गाणी, संवाद.. ते तासभर गालावर हात ठेवून शांतपणे ऐकत होते. सतरा-अठराचं माझं वय. मला काय अक्कल असेल तेव्हा? पण पुढे तीन दिवस ते रोज माझं बोलणं ऐकून घेत होते. आज असं वाटतं, माझ्या माध्यमातून सामान्य प्रेक्षकांना नेमकं काय आवडतं हे ते तपासून पाहात होते. शेवटच्या दिवशी त्यांनी मला मिठी मारली. म्हणाले, ‘‘खूप हुशार आहेस गं मधु तू!’’ पपा नेहमी मोजक्या शब्दांत कौतुक करत.

‘‘कान कहानी सुनियो करे’ हा बॅले मी केला. त्यात व्हिडीओ, डान्स, ड्रामा, म्युझिक असं सर्व काही होतं. त्याचं संगीत पंडित जसराजजींचं होतं. त्या वेळी पपांनी काही न बोलता मान उडवली. पण नंतर मात्र त्यांनी माझं आणि जसराजजींचं इतकं भरभरून कौतुक केलं की बस्स! माझंच नव्हे कोणाचाही एखादा चित्रपट त्यांना आवडला की त्या माणसाचं ते भरभरून कौतुक करत. पपांमध्ये हा उमदेपणा होता तितकाच स्पष्टवक्तेपणाही होता. सत्यजीत रेंचा ‘पथेर पांचाली’ चित्रपट त्यांना खूप आवडला. त्यांनी तसं सत्यजीत रे यांना कळवलं. पण त्याच वेळी ‘आपल्या देशातली गरिबी आपण परदेशात का दाखवायची?’ असं त्यांना स्पष्टपणे सांगायलाही ते चुकले नाहीत. आपण कितीही वास्तववादी असलो तरी लोकांपर्यंत नेमकं काय पोचवायचं याचं भान  असलं पाहिजे याबद्दल ते फार आग्रही होते.

पपांच्या अशाच छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून आम्ही खूप काही शिकत गेलो. मी जेव्हा त्यांच्यावर लघुपट करायचा ठरवलं तेव्हा शाम बेनेगल, हृषीकेश मुखर्जीसारखे दिग्गज कलाकार त्यांच्याविषयी बोलायला तात्काळ तयार झाले. नौशादजी तर म्हणाले, ‘‘उनके लिए बोलना ये तो हमारी इज्जत है।’’ अमीरखाँ म्हणाले, ‘‘मी दर दोन-तीन महिन्यांनी त्यांचा ‘दो आँखे बारह हाथ’ बघतो. काय चित्रपट केलाय त्यांनी.’’ खरंतर चित्रपटसृष्टीतली ही दिग्गज मंडळी, पण पपांबद्दल त्यांचा आदर पाहून आम्हाला खूप आनंद वाटतो. हृषीकेश मुखर्जी त्यांच्या नव्या चित्रपटांच्या रिळांचे डब्बे घेऊन ‘राजकमल’मध्ये येत. पपांनी त्या डब्यांना आशीर्वादाचा हात लावल्यानंतरच ते डबे उचलत असत. साक्षात राज कपूरसुद्धा त्यांना नम्रपणे नमस्कार करत. खरंतर ही सगळीच मंडळी किती महान! एकदा तर गंमत झाली. एका विमान प्रवासात यश चोप्रांनी माझी यश जोहर यांच्यांशी ओळख करून दिली.  ‘‘ये शांताराम बापूकी लडकी, मधुरा जसराज.’’ अहो तो एवढा मोठा माणूस पटकन माझ्या पाया पडला. मी गोंधळले. ते लगेच म्हणाले, ‘‘आप इतने बडे बापकी बेटी है। मेरे भाग खुल गये।’’ पपांच्या पश्चात त्यांच्या मुलांना सन्मान मिळणं हे संचित!

एकदा मी ‘एनएफडीसी’ (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉपरेरेशन) मध्ये गेले होते. तिथे पपांचे तीन चित्रपट ‘आदमी’, ‘दुनिया ना माने’ आणि ‘पडोसी’ हे दिग्दर्शनाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात होते. मला हे कळलं तेव्हा पपांचा खूप अभिमान वाटला. पपा द्रष्टे होते. त्यामुळे चित्रपटांचे विषय, त्यांची तांत्रिक बाजू, दिग्दर्शनाचे तंत्र, या सर्वच गोष्टींत ते काळाच्या खूप पुढचा विचार करत. ‘कुंकू ’ हा सामाजिक विषयावरचा चित्रपटसृष्टीतला पहिला चित्रपट. त्यांचे विषय किती धाडसी असत पाहा, ‘आदमी’मध्ये त्यांनी वेश्या आणि तिच्यावर प्रेम करणारा पोलीस-ज्याने तिला वेश्याव्यवसायातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं, हा विषय रंगवला. ‘शेजारी’ चित्रपटात त्या काळातला अत्यंत संवेदनशील विषय हाताळला. हिंदू-मुस्लीम मैत्री या विषयावरचा हा चित्रपट मुजफ्फरनगरमध्ये त्या काळात २५ आठवडे चालला होता. सामाजिक आशयाचे चित्रपट तयार करणं, त्यातून काळाच्या पुढचा विचार मांडणं आणि ते उत्तमरीतीने सादर करणं यात त्यांचा हातखंडा होता. कारण मुळात सामाजिक बांधिलकीचं भान असणारं असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. सामाजिक प्रश्नांबाबत ते अत्यंत जागरूक होते. त्यांच्या चित्रपटांत विषयांचं किती वैविध्य असावं? ‘तीन बत्ती चार रास्ता’ चित्रपटातून वेगवेगळ्या प्रांतांतल्या सुनाही कुटुंबात किती सलोखा आणू शकतात हे त्यांनी हसतखेळत दाखवलं. हुंडाबळीसारखा ज्वलंत विषयही त्यांनी हाताळला. ‘राम जोशी’, ‘पिंजरा’, ‘अमर भूपाळी’, ‘दहेज’,

‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’ असे कितीतरी चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरले.  ‘दो आँखे बारह हाथ’ हा तर त्यांच्या कारकीर्दीतला मैलाचा दगड ठरावा असा चित्रपट. दरोडेखोर, गुन्हेगारीतूनही चांगला माणूस कसा बनू शकतो हे दाखवणाऱ्या अशा चित्रपटांमधून त्यांनी नेहमीच लोकांसमोर सकारात्मक विचारांचा संदेश दिला. या चित्रपटाला जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार्ली चॅप्लीन यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. मात्र डोळ्यांच्या व्याधीमुळे ते त्या समारंभाला जाऊ शकले नाहीत. माझा भाऊ प्रभातकुमार त्या समारंभाला गेला. मात्र अमेरिकेत याच चित्रपटाला उत्कृष्ट परदेशी चित्रपट पुरस्कार मिळाला तेव्हा ते स्वत: गेले होते. त्यांचा आवडता दिग्दर्शक अल्फ्रेड हिचकॉक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला तेव्हा ते फार आनंदित झाले होते.

केवळ कथा, आशय नव्हे तांत्रिक गोष्टींतही ते काळाच्या फार पुढे होते. मला वाटतं, ‘झनक झनक पायल बाजे’ ही टेक्निकलरमध्ये बनलेली पहिली फिल्म असावी. ‘जलबीन मछली नृत्य बीन बिजली’च्या गाण्याच्या रेकॉर्डिगला मी स्वत: हजर होते. त्यांनी मंगेश देसाई आणि परमार यांच्या साहाय्याने त्यातल्या गाण्यांचं स्टिरीओफोनिक रेकॉर्डिग केलं. ‘सैरंध्री’ चित्रपट त्यांनी भारतात शूट केला पण त्याची प्रिंट काढण्यासाठी मात्र ते जर्मनीला गेले. ‘झनक झनक पायल बाजे’ची प्रिंट त्यांनी इंग्लंडला जाऊन काढली. त्यामुळे तोही तांत्रिकदृष्टय़ा सरस होता. ‘शकुंतला’ चित्रपट ‘स्वस्तिक सिनेमा’मध्ये ११० आठवडे चालला. ‘अयोध्येचा राजा’ चित्रपट बघायला लोक मिळेल त्या वाहनाने येत. थिएटरबाहेर त्या काळात अनेक बैलगाडय़ा दिसत असत.

एकदा मी पुण्यातल्या वार्ताहर परिषदेत गेले होते. तिथे पपांनी पहिला सॅली शॉट कसा घेतला ते मी सांगितलं. चार सायकलींना रश्शी बांधून त्यावर लाकडाच्या फळ्या टाकल्या. त्यावर उभं राहून  पपा, कॅमेरामन आणि स्पॉटबॉय यांनी ट्रॉली शॉटस् घेतले. अशाच प्रकारे चित्रपटांमध्ये क्रेन शॉटस्ही त्यांनी घेतले. महेश भट्ट हे ऐकून अवाक्  झाले. पपांच्या कल्पकतेला त्यांनी अक्षरश: सलाम केला.

मी त्यांच्या जीवनावर ‘पोट्र्रेट ऑफ अ पायोनियर’ ही लघुचित्रफीत इंग्रजीतून केली. त्याची पहिली कॉपी तब्बल पाच तासांची होती.  त्यांनी माझ्या कामात कधीही हस्तक्षेप केला नाही. पण मी एडिटिंग करताना ते पाठीशी शांतपणे उभे रहात.  फक्त एकदाच ते मला म्हणाले, ‘‘मधु, वडिलांच्या प्रेमात पडू नकोस. मी तुझा बाप आहे हे विसर. तुझ्या दुश्मनाची फिल्म कापतेस असं समजून फिल्म काप.’’ शेवटची संकलित फिल्म पावणेदोन तासांची झाली. ती पाहिली आणि फक्त दोनच शब्द म्हणाले. ‘‘व्यवस्थित करतेस. कर!’’ संकलनाचं खरं कौशल्य मी त्यांच्याकडून असं शिकले. ही ध्वनिचित्रफीत पूर्ण झाली. त्यांना ती खूप आवडली. मग मी त्यांच्या मागे लागले. पपा तुम्ही भारतीय चित्रपटाचा साक्षात इतिहास आहात. आता तुम्ही  आत्मचरित्र लिहाच. ते एवढंच म्हणायचे, ‘‘मधु आपला मोठेपणा आपणच कसा सांगायचा?’’ मला बरेचजण सांगायचे, ‘तुम्हीच त्यांचं चरित्र लिहा.’ बरीच वर्षे पपांनी नकार दिला, पण

१८ नोव्हेंबर १९८०, त्यांच्या वाढदिवशी त्यांनी सर्वासमोर जाहीर केलं, ‘मधु माझं आत्मचरित्र लिहिणार आहे.’ त्या दिवशी नोटपॅड, पेन, रेकॉर्डर घेऊन ‘राजकमल’च्या त्यांच्या ऑफिसमध्ये मी लिखाणाला रीतसर सुरुवात केली. पपांसारख्या ‘परफेक्शनिस्ट’ माणसाचं चरित्र लिहिणं हे माझ्यासाठी शिवधनुष्य पेलण्याइतकं अवघड होतं. तत्पूर्वी फ्रँक काप्रा आणि अल्फ्रेड हिचकॉक या फिल्ममेकर्सच्या चरित्रांचा अभ्यास केला. पपांवरील अनेक लेख आणि मुलाखती वाचून काढल्या. संपूर्ण तयारीनिशी त्यांच्यासमोर आत्मविश्वासाने बैठक मारली. त्यांनी ‘राजकमल’मध्ये मला एक खोली, मदतनीस दिला. ते स्वत: गोष्टी आठवतील तशा सांगत. मी घरी गेल्यावर ते संगतवार लिहून काढी. या वेळी त्यांचं वय पंचाहत्तर पार होतं. पण त्यांची स्मरणशक्ती कमालीची तल्लख होती. लिखाणाचे पेपर्स माझ्या घरी टेबलावर असत. ते मला फोन करायचे. आधीच्या मजकुरातलं पूर्ण वाक्य जसंच्या तसं म्हणून दाखवायचे आणि सांगायचे ‘असं नको तसं लिही.’ शेवटचा चॅप्टर मात्र त्यांनी स्वत: लिहिलाय. वेळ आणि शिस्तीबाबत ते काटेकोर असत. आमचं काम चाले तेव्हा ते फोन घेत नसत. कोणाला भेटतही नसत. एकदा मला त्यांनी बारा वाजता बोलावलं. मी १२ वाजून २५ मिनिटांनी पोहोचले. त्यांनी घडय़ाळाकडे एक नजर टाकली. म्हणाले, ‘‘किती वाजले?’’ म्हटलं, ‘बारा वाजून पंचवीस मिनिटं.’ त्यांचा ताडकन प्रश्न, ‘‘व्ही. शांतारामच्या पंचवीस मिनिटांची किंमत ठाऊक आहे तुम्हाला?’’  पुस्तकाच्या निमित्ताने त्यांचा निकट सहवास लाभत होता. मी अनेक गोष्टी शिकत होते. असं वाटलं, तोवर मी लहान होते. त्यानंतर मी खऱ्या अर्थाने ‘मोठी’ झाले.. सहा-सात वर्ष पुस्तकाचं काम चालू होतं. एकदा धर्मवीर भारती मला म्हणाले, ‘‘मधु तू त्यांची मुलगी आहेस. त्यांच्या आयुष्यातल्या खासगी गोष्टी ते तुझ्याशी मोकळेपणाने कसं बोलतील?’’ मलाही ते जाणवत होतं. ते मोकळेपणाने बोलले नाहीत तर हे पुस्तक फार वरवरचं होईल.

एके दिवशी सकाळी फोन आला, ‘‘अकरा वाजता ये.’’ मी गेले. ते म्हणाले, ‘‘आज मी तुला माझ्या आयुष्यातल्या अत्यंत खासगी गोष्टी सांगणार आहे.’’ ऐन पंचविशीतसुद्धा पपांनी मोहाचे क्षण कठोरपणे टाळले होते. अनैतिक संबंधांबद्दल त्यांना घृणा होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, ‘ज्या स्त्रीबद्दल मला आकर्षण वाटलं तिला मी पत्नीचं स्थान दिलं.’ विचारांच्या पारदर्शक निखळपणामुळे मुलीला हे सांगण्याचं धैर्य त्यांच्या ठायी होतं हे विशेष!

पपांच्या आणि माझ्या नात्यात इतका निखळपणा होता, की मी पंडित जसराजजींशी एकदा त्यांची ओळख करून दिली आणि सांगितलं, ‘‘यांच्यावर माझं प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे.’’ पपांनी आधी एका विश्वासू माणसाला कोलकात्याला पाठवलं. त्यांच्या कुटुंबाची नीट चौकशी केली. त्या वेळी पंडितजींची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, असं त्यांना कळलं. पपा ताडकन् उत्तरले, ‘‘मी स्वत: शून्यातून वर आलोय. तसा हा तरुणपण येईल.’’ आणि त्यांनी लग्नाला संमती दिली. इतकंच नव्हे तर स्वत:च्या नावलौकिकाचा, ऐश्वर्याचा बाऊ न करता त्या वेळच्या त्या साध्याशा तरुणाशी मराठी पद्धतीने माझं थाटात लग्न लावून दिलं. आमच्या लग्नाला यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

लग्नानंतरही माझं वैवाहिक जीवन कसं चाललंय यावर त्यांचं बारीक लक्ष होतं. एकदाच ते पंडितजींना म्हणाले, ‘‘तुला मुलगा झालाय आणि अजून तुझं बस्तान बसत नाही. तू संगीत दिग्दर्शकाचा साहाय्यक हो. तुला रीतसर पगार मिळेल.’’ त्यावर पंडितजी ठामपणे म्हणाले, ‘‘मला शास्त्रीय संगीतात स्वतंत्रपणे करिअर करायचं आहे. मी कोणाचा साहाय्यक म्हणून काम करणार नाही.’’ बस्स. त्यानंतर पंडितजींच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचेल असं ते कधीही बोलले नाहीत. वागले नाहीत. पंडितजींना त्यांनी कायम सन्मानाने वागवलं.  वास्तविक त्या काळात माझ्या संसाराला हातभार लागावा यासाठी काही रक्कम पाठवणं त्यांना कठीण नव्हतं. पण त्यांनी तसं कधीही केलं नाही. ‘राजकमल’मध्ये गणेशोत्सवात पंडितजींचं गाणं असायचं. पपा पहिल्या रांगेत मांडी घालून तल्लीन होऊन त्यांचं गाणं ऐकत. मला आठवतं, एकदा पपा कामानिमित्त कोलकात्याला येणार होते. मी त्यांना घरी जेवायला बोलवलं. त्यांच्याबरोबर फिल्म डिस्ट्रिब्युटर होता. तो त्यांचा एकेकाळचा ‘प्रभात’चा सहकारी होता. मी त्या दोघांची जमिनीवर पानं मांडली. ते हसून म्हणाले, ‘‘क्युं जमनभाई, ‘प्रभात’का समय याद आया ना?’’ त्यांचं हे वाक्य खूप बोलकं होतं. या वाक्यातून त्यांनी हे दर्शवून दिलं, की मीसुद्धा अशाच परिस्थितीतून वर आलोय. उद्या हिचीसुद्धा परिस्थिती बदलेल. पपांनी अचूक ओळखलं होतं, की आपल्या मुलीची निवड योग्य आहे. हा कलाकार आज पैशाने श्रीमंत नसेल, पण सुरांचं ऐश्वर्य त्याच्याकडे आहे. पुढे झालंही तसंच! पपांप्रमाणे पंडित जसराजजीही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार झाले. पपांच्या चरित्राचं काम पूर्ण झालं आणि एक दिवस ते म्हणाले, ‘मधु, माझा पुढचा प्रकल्प आहे ‘उत्तर महाभारत!’ महाभारताचा पुढील कालखंड. मी संपूर्ण भारतीय संस्कृतीवर पन्नासच्या वर चित्रपट तयार करणार आहे. ‘व्ही. शांताराम मोशन पिक्चर सायंटिफिक रिसर्च अँड कल्चरल फाऊंडेशन’मधून मी पैशांची तजवीज करेन. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी इतिहासकार, संशोधक, तज्ज्ञ लेखकांची टीम उभी करेन. हा प्रकल्प पूर्ण होत नाही तोवर मी मरणार नाही. दीडशे वर्षे जगणार आहे. माझं स्वप्न सत्यात उतरलेलं ‘याचि देही याचि डोळा’ पाहणार आहे!’’  एकोणऐंशी वर्षांच्या त्या भीष्माचार्याकडे पाहताना माझे डोळे भरून आले. मी त्यांच्या पायाशी वाकले. माझ्या डोळ्यांतल्या अश्रूंनी त्यांची पावलं भिजली. पण ३० ऑक्टोबर १९९० ला पपा गेले आणि माझ्या मनाने आकांत मांडला. पपा, तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दीडशे वर्ष जगणार होतात? मग आम्हाला असं का फसवलंत? अंतर्मनात पपांचे शब्द निनादले. भगवान श्रीकृष्णाचं वचन ते बोलत होते. ‘‘माझा प्रवास सुरू राहणार आहे. अनंतापर्यंत. माझं विहित कार्य पूर्णत्वास जाईपर्यंत? शरीररूपी वस्त्र बदलेल. काळ बदलेल. माझं अंतिम ध्येय पूर्णत्वास जाईपर्यंत.. अनंतकाळ माझा प्रवास चालू राहील..

शब्दांकन : माधुरी ताम्हणे

madhuri.m.tamhane@gmail.com

madhurapanditjasraj@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 12:02 am

Web Title: abhalmaya special memories v shantaram mpg 94
Next Stories
1 दोन पिढय़ांतील वाढतं अंतर
2 शाळेतलं आजोळ
3 अवघे पाऊणशे वयमान : परोपकार: पुण्याय
Just Now!
X