15 August 2020

News Flash

गृहविष्णू

‘‘आज दुथडी भरून उरात माया आहे. राग, लोभ, द्वेष, चढाओढ यापासून आम्ही कोसो दूर आहोत. कारण अंगणात प्राजक्ताचा सुगंधी सडा आहे आणि निशिगंधाचे डौलदार तुरे

| October 4, 2014 01:01 am

‘‘आज दुथडी भरून उरात माया आहे. राग, लोभ, द्वेष, चढाओढ यापासून आम्ही कोसो दूर आहोत. कारण अंगणात प्राजक्ताचा सुगंधी सडा आहे आणि निशिगंधाचे डौलदार तुरे आमचे आयुष्य सुंदर करीत आहेत. आम्ही दोघांनीही आयुष्याच्या वहीतली दु:खाची पाने चिकटवून टाकली आहेत. म्हणून उरलेल्या पानांवरली अक्षरे मोत्यांची झाली आहेत.’’ सांगताहेत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड आपल्या ४५ वर्षांच्या सहजीवनाविषयी.
मी पीएच.डी. करीत असताना आमच्या फार मारामाऱ्या व्हायच्या. कारण सोमवार ते शुक्रवार मी उदयाचल हायस्कूल गोदरेज येथे नोकरीस जायचे नि शनिवार-रविवार मुंबई विद्यापीठाच्या कालिना अथवा फ्लोरा फाऊंटनजवळच्या ग्रंथालयात. मुली चिमुकल्या होत्या आणि सोमवार ते शुक्रवार माझ्या सासूबाई त्यांना सांभाळायच्या. शनिवार-रविवार त्यांनी स्वत:चे छंद जोपासण्यासाठी वा अगदी निव्वळ मौजेसाठी मनी धरिले तरी त्यात वावगे काही नव्हते. पण दर शनिवार-रविवार मुलींना बघणे यांच्या सहनशक्तीपलीकडे गेले. मग शब्द-युद्ध! जायचे नाही, गेलीस तर याद राख, घराबाहेर पाऊल टाकू नको.. अशी यांची दमदाटी. नि मी जाणार, कोण मला अडवतो ते बघतेच, घरात अभ्यास होतो का? ..अशी माझी प्रत्युत्तरं! पण मी जायचे म्हणजे जायचेच.
एक दिवस यांना ते असह्य़ झालं. माझ्या चपलाच सापडेनात. ‘इथपर्यंत मजल गेली?’ मला अनावर राग आला. मी तशीच तडतडत निघाले.  मला तर बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, कफ परेड, कुलाबा इथे जायचं होतं. गेले तशीच. दिवसभर मी खूप खूप अभ्यास केला. नोट्स काढल्या आणि परत निघाले. सकाळचे यांचे निर्वाणीचे शब्द आठवले नि माझं पार पानिपत झालं. ‘आज माझं ऐकलं नाहीस तर घरी येऊ नकोस!’ अन् मी ऐकलं कुठे होतं? काय झालं असतं एक दिवस यांचं ऐकलं असतं तर? पण आता असं वाटून काय उपयोग होता? सगळी पश्चात बुद्धी.
‘घरी जाऊ ना?’ डोळे घळघळा वाहू लागले. तेव्हा आम्ही मुलुंडला राहात असू. मी मनाशी काही विचार केला. यांना पुढल्या रविवारी ठाण्याच्या डॉक्टर विजय कारखानीसकडे ब्रिज खेळायला जाऊ द्यायचं! आपण घरी राहू. पण ते सकाळचे निर्वाणीचे शब्द? ‘आज माझं ऐकलं नाहीस तर घरी येऊ नकोस!’ तशीच मनाचा हिय्या करत ट्रेन पकडली.  मी मुलुंडला उतरले तर डॉ. विजयकुमार वाड फलाटावर पहिल्या वर्गाच्या डब्यापाशी उभे होते. माझ्या सानुल्या दोही अंगी त्यांना लगटून! निशूच्या हातात माझ्या चपला होत्या. ‘‘अशीच गेलीस चपला न घालता? तुला टोचलं का काही आई?’’ ती म्हणाली. मी रडत रडत पायात चपला घातल्या. यांच्याकडे बघितलं. ‘दीडशहाणी’ यांनी रडूबाईला आपला रुमाल दिला. प्राजूने मला बिलगून माझे डोळे पुसले.
त्या दिवशी हे आम्हाला आईस्क्रीम खायला घेऊन गेले. आमचं भांडण न वाढता मिटलं. पण डॉ. वाड- ज्यांना मी मुली म्हणतात तसं बाबाच म्हणते- यांना मी पंधरा दिवसांनी एकदा ब्रिज खेळू द्यायला स्पेस देऊ लागले.  नावामागे ‘डॉ.’ लावायचं तर बाईला आईपणाची किंमत द्यावीच लागते ना?
मला आठवतं.. विशीत माझं लग्न लागलं ते अगदी चहा-पोहे खाऊन. फक्त ते, मी नि दादानं वाडांच्या घरी पोहे खाल्ले. लग्न झालं. नंतर भराभरा दोन मुली झाल्या. कारण नंतर मला करिअर करायचं होतं. पहिली प्राजक्ता म्हणून दुसरीचं नाव मी निशिगंधा ठेवलं. बारशाला आलेली माझी एक मैत्रीण म्हणाली, ‘‘आता तुला तिसरा मुलगा झाला की त्याचं नाव झेंडू ठेव’’ माझी फुलबाग कम्प्लीट करायची केवढी घाई ना तिला? पण आपल्या आई-वडिलांचे एकुलते एक असलेले माझे यजमान पुढे आले नि म्हणाले, ‘‘आता ती मलाच झेंडू म्हणेल. आम्हाला तिसरे अपत्य नको. मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर आमच्या मुली या आमच्या प्राणज्योती असतील.’’ मला यांचा किती अभिमान वाटला म्हणून सांगू!
डॉ. वाड व्यवसायानं डेंटिस्ट. पण पैसा कमवणे त्यांना कधी जमले नाही. आधी सैन्यात होते. १९६५चं युद्ध लढले. भारत-पाक युद्ध. त्यात त्यांना ‘रक्षा मेडल’ मिळालं. एकवीस दिवस ते खंदकात राहिले आहेत. मी याच कारणे त्यांच्याशी विवाह केला होता. पुढे इमर्जन्सी कमिशन संपवून ते परत आले नि ठाण्याला प्रॅक्टिस करू लागले. पण ‘‘अगं, त्या गरीब रिक्षावाल्याकडून काय पैसे घ्यायचे?’ ‘अगं, त्याचा खिसा अगदीच फाटका होता.’’ .. हे मी ऐकायचे. मला पैशांचे आकर्षण नव्हते. त्यामुळे हा वादाचा मुद्दा आमच्यात कधी झाला नाही. पण मला आयुष्यभर नोकरी करावी लागली.
मला तरुणपणी फार वाटे, यांनी एमडीएस करावे. मी फार मागे लागले तेव्हा हे म्हणाले, ‘‘अगं, तुझा नवरा बीडीएस् झाला हे तुझं नशीब समज!’’ माझी बोलती बंद!
आई नि वडील म्हणजे माझ्या पतीचं दैवत. आम्ही त्यांना घेतल्याशिवाय कधीही नाटक, सिनेमा पाहू शकलो नाही. तरुणपणी वाटते ना हौस..‘राजाराणी’ ट्रॅव्हलची? पण ते शक्यच नाही झाले. मग माझे ‘श्रावणबाळाशी’ कडाक्याचे भांडण होई. पण हे बधत नसत. शांत राहात. तिकिटे मात्र आई-बापू, मी, हे नि मुली अशीच निघत.
माझी लेखणी, माझी प्रयोगशीलता यांच्या आड मात्र ते कधीही आले नाहीत. एकदा माझ्या ‘अतोल’ या कादंबरीस पुरस्कार मिळाला तेव्हा ‘लोकप्रभे’ची एक अगदी तरुण वार्ताहर आमच्या घरी आली होती. ‘‘विजया बाईंच्या लिखाणात आपले योगदान काय?’’ तिने यांना विचारले. ‘‘मी तिला लिहीत असताना कधी त्रास देत नाही. हे खायला दे.. ते माझ्यासाठी कर.. असं काही नाही मागत. हे मोठं काँट्रिब्युशन आहे ना? तुझे लग्न झाले की कळेल तुला!’’ ती  बघतच राहिली. माझ्या कादंबऱ्याचा वाचकवर्ग मला पत्रे लिहून कळवू लागला (९० चे दशक पत्रांचे होते.) की हे म्हणत ‘सुरुवात आकर्षक झालीय. नि शेवट दिलखेचक!’
प्रत्येक कादंबरीला हाच अभिप्राय! माझ्या सासूबाई एकदा म्हणाल्या, ‘‘अरे विजा, जरा दुसरं काही बोलायला शीक. नाहीतर या कारणे तुमच्यात युद्ध होतील.’’
पण मी शहाण्या बायकोसारखं यांचं ‘न वाचणं’ मुकाट स्वीकारलं. (मी थयथयाट करून ते वाचणार होते थोडेच?) पुढे मी ‘कथुल्या’ हा लेखन प्रकार माझ्या लिखाणासाठी वापरू लागले नि त्याचा आस्वाद मात्र हे घेऊ लागले. माझ्या दोघी पोरी मात्र माझ्या पहिल्या वाचक नि समीक्षक.
मुलींना वाढवितांना बाबांनी मला अहर्निश साथ दिली आहे. निशिगंधाने नाटकाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळविली आणि इयत्ता सहावीपासून तिचे जग बदलले. ती रंगभूमीची झाली. सुलभाताई देशपांडे यांच्याकडे नाटय़शिक्षणाचे धडे घेऊ लागली. तिला नाटक करताना कधी रात्रीचा प्रयोग असला की हे घ्यायला जायचे. ती ‘अभिनेत्री’ व्हायचे म्हणाली तरी यांनी म्हटले, ‘‘विद्या संपादनास प्राधान्य  दे आणि मग आयुष्यभर जे हवे ते क्षेत्र निवड.’’ प्राजक्ता आपल्या पतीबरोबर वॉशिंग्टन स्टेटमध्ये ‘याकिमा’ येथे असताना तिने सर्जरीचे पदव्युत्तर शिक्षण(एमएस) इथे घेतले असूनही तेथे एमडी केले. तिचं पिल्लू पावणेदोन वर्षांचं होतं. हे नातू सांभाळायला प्रॅक्टिस बंद करून गेले. का? तर मी तेव्हा पोदारमध्ये प्राचार्यपदी होते. ‘‘तुला एवढी रजा घेऊन जाणे जड जाईल आणि तुझी करिअर बहरत असताना तुला मी हाराकिरी करू देणार नाही. तू सर्वार्थानं फुलत राहा.’’ हे म्हणाले, तेव्हा मला रडू अनावर झाले होते. पण यांनी आपल्या मुलीसाठी दवाखाना बंद ठेवला नि बायकोला थोडाही ‘गिल्ट’ न देता खुशीने चार महिने लेकीला साथ दिली.
उदयाचलात असताना मी ‘स्वच्छ सुंदर हिरवे विक्रोळी स्टेशन’ हा प्रकल्प केला होता. ५०० विद्यार्थी नि ११ शिक्षक यांच्यासह हे बाजारात गेले नि तोंडाला बांधायचे हिरवे मास्क स्वत:चे पैसे खर्च करून घेऊन आले. ‘लोकांची मुले स्टेशन झाडणार, त्यांच्या नाकातोंडात धूळ माती नको गं जायला.’ इतकी आत्मीयता. हे काम मी मनावर घेतले होते. मी एक ‘स्वच्छता अभियानाची’ फिल्म तयार केली. ती एडिट करताना रात्रीचे बारा वाजले नि शेवटच्या लोकलने मी घरी गेले. नोकरीत असताना इतक्या रात्री घरी जायचा तो प्रथमच प्रसंग होता. हे आणि मुली सोसायटीच्या गेटपाशी उभे होते.
‘‘अगं तुला कोणी नोबेल प्राईझ देणारे का या कामाबद्दल? किती वाहावत जातेस?’’ हे म्हणाले. खरंच.. त्या प्रोजेक्टला १९९५ चं ‘कॅथे पॅसिफिक’ बेस्ट प्रोजेक्ट म्हणून ५० हजार रुपयांचे पारितोषिक शाळेला मिळाले नि दोन विद्यार्थी आफ्रिकेत ‘लायलाला’ इथे गेले. शाळेच्या मासिकात दोन ओळी होत्या. ‘धिस प्रोजेक्ट वॉज कन्सीव्हड अँड को-ऑर्डिनेटेड बाय विजया वाड.’ पण काम करताना ते झोकून देऊनच करायचे ही वृत्ती मला स्वस्थ बसू देत नाही त्याला काय करणार?
मी विश्वकोशाचे काम हाती घेतले तेव्हा अनेकांनी माझ्यावर टीका केली. मला ठाऊक होते की हे काम मी नक्की करू शकेन. माझी करिअर उत्कृष्ट होती. मला बीएड, एमए या परीक्षांना विद्यापीठात मानांकन होते. मी ज्या ज्या कॉलेजात शिकले तेथे सवरेत्कृष्ट विद्यार्थिनी हा किताब पटकावला होता. टाटा मेमोरिअल शिष्यवृत्तीची मानकरी होते. ‘तरी का ही टीका?’ मी म्हटलं. हे म्हणाले, ‘‘प्रत्येकाला आपण आवडू ही अशक्य गोष्ट आहे. तू टीकेकडे सकारात्मक दृष्टीने बघ ना. तुला झपाटून काम करता येते हे ठाऊक आहे मला. कामाला लाग. मी गृहविष्णू होतो. घर मजवर सोड. तुझे कामच तुझ्याबद्दल बोलेल, मला विश्वास आहे.’’ आणि खरोखर हे घरची सारी जबाबदारी घेऊन गृहविष्णू झाले. मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या टीकाकारांनीही मी चांगले काम केले तेव्हा तेव्हा मला मनापासून शाबासकी दिली. माझी उमेद वाढविली.
विश्वकोशाचे सदस्य, सारा वाईचा परिवार, मुंबईचे सहकारी सगळे बाबांचे चाहते आहेत. बाबा सर्वाना आवडतात. तेही प्रेमाने सगळ्यांची चौकशी करतात. घरी बोलावतात. ते कोणाचाही मत्सर कधीच करत नाहीत. ही असाधारण गोष्ट आहे, असं माझ्या मैत्रिणी म्हणतात. माझे विद्यार्थी बाबांना भेटतात तेव्हा म्हणतात, ‘‘बाबांच्या मिठीत काहीतरी विशेष आपुलकी आहे. ही इज डिव्हाईन.’’
सहजीवन म्हणजे सहिष्णुतेची कमाल मर्यादा. दोन माणसे मोठय़ा हौसेने एकत्र जीवन जगण्याचा करार करतात नि लगेचच लक्षात येते की, हा तर फक्त ‘सोसण्याचा’ करार आहे. मी एकुलती एक सून असल्याने माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी नम्र, सोशिक नि अजिबात उलट उत्तरं न देणारी, वाडांच्या घरास सुखी करणारी असले पाहिजे.. लाडबीड होतील; पण धिस इज  मस्ट! मग यांना मी एकेरी नावाने हाक मारणे शक्यच नव्हते. ‘‘गडी आहे का तो? नवऱ्याचा मान आम्ही जिवंत असे तो राखा.’’.. माझे विशीतले ते पोरकट स्वप्न मला छळीत असे. हे म्हणत, ‘‘आपण दोघेच असलो की म्हण तू मला ‘ए’ ..हव्या त्या नावाने हाक मार.’’ पण त्यात मला गंमत वाटत नसे. ‘‘अगं, पुरुषसुद्धा खूप सोसतो बरं! त्याला फक्त बाईसारखे रडून दाखविता येत नाही.’’ हे म्हणत. याची खरी किंमत मात्र मुलींच्या लग्नानंतर मला कळली. मुली एका महिन्याच्या अंतराने प्रेमलग्न करून माझ्या आयुष्यातून गेल्या नि मी एकटी पडले. फार कैफात जगायचे ना! माझ्या मुली.. माझ्या मुली! निशूच्या डेट्स, तिचे कपडे, तिची ऐनभरात असलेली चित्रपट कारकीर्द.. प्राजूचा मेडिकल कॉलेजात पाठवायचा सकाळ-संध्याकाळचा डबा! सारे मीच सांभाळायची. चोवीस र्वष मुली.. मुली! नि मग फक्त नैराश्य. हे माझ्याहून आठ वर्षांनी मोठे आहेत, पण त्या काळात त्यांनी मला आठ वर्षांच्या पोरीगत खूप मायेने सांभाळले. ‘‘चल, भारत दर्शन करू. तुला नवे विषय मिळतील.’’ असं म्हणून दक्षिण भारतात घेऊन गेले. तेव्हा त्यांचा डावा पाय खूप दुखत होता. पण ‘‘हरकत नाही. हळू चालूया.’’ असं म्हणत हे खूप भटकले माझ्याबरोबर. विवेकानंदांची समाधी बघितल्यावर मी म्हणाले, ‘‘मी राहाते इथेच’’ तेव्हा म्हणाले, ‘‘मग मला कोण? मुलींच्या लग्नाने मीही फार एकटा झालोय गं. पण बोललो नाही कधी. आत आत रडलोय खूपदा.’’ मुलींच्या आईबापांना आमचे दु:ख नक्की कळेल. हळूहळू आम्ही सावरलो. मी परत लिहिती झाले. नुकतंच माझं  १०० वे पुस्तक आलंय,  ‘वेधक विजया वाड.’
आम्ही आता दोघंच राहातो. मुली आपापल्या जगात रमल्या आहेत. सासू-सासरे शेवटपर्यंत मजजवळ होते. माझी तिन्ही नातवंडे ‘ओल्ड मॅन इज गोल्ड मॅन’ म्हणून यांना बिलगतात नि ‘नानीच्या केसातलं सिल्व्हर खूप एथनिक दिसतं’ म्हणत माझ्या गळ्यात पडतात तेव्हा वाटतं खूप चढ उतारानंतर मी नि हे इथं पोहोचलो..
आज दुथडी भरून उरात माया आहे. राग, लोभ, द्वेष, चढाओढ यापासून आम्ही कोसो दूर आहोत. कारण अंगणात प्राजक्ताचा सुगंधी सडा आहे आणि निशिगंधाचे डौलदार तुरे आमचे आयुष्य सुंदर करीत आहेत. आम्ही दोघांनीही आयुष्याच्या वहीतली दु:खाची पाने चिकटवून टाकली आहेत. म्हणून उरलेल्या पानांवरली अक्षरे मोत्यांची झाली आहेत.
‘सूर्य देव रोज देतो नव्या दिवसाची भेट
‘सोने कर या दिवसाचे रोज सांगतो थेट’
तसे सुवर्णकण प्रतिदिनी गोळा करताना आणि ते प्रेमरुपाने सर्वाना वाटताना किती आनंद होतो म्हणून सांगू? माझे प्रिय वाचक, विद्यार्थी, मित्रपरिवार नि सहकारी या प्रेमावर हक्क सांगतात तेव्हा आम्हाला सर्वाधिक समाधान वाटते नि मग कळ्यांची फुलेच फुले होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2014 1:01 am

Web Title: about senior writer dr vijaya wad 45 years of married life
टॅग Chaturang
Next Stories
1 प्रतिकूल ते अनुकूल
2 गरज आणि वासना
3 श्वसनावर नियंत्रण
Just Now!
X