आयुर्वेदातील पंचकर्माची पताका खेडोपाडी नेणारे धुळ्याचे वैद्य प्रभाकर तानाजी जोशी तथा नाना जोशी आज ७८व्या वर्षीही आपली आयुर्वेदाची सेवा करीतच आहेत. सर्वासाठी आयुर्वेद आणि स्वस्त आयुर्वेद समाजात रुजण्यासाठी नानांनी अथक प्रयत्न केले. एकटय़ा धुळे जिल्ह्य़ात ५३७ शिबिरे झाली. ज्यांचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरांसाठी नानांनी सेवाभावी अशा ११ वैद्यांचा ‘आयुर्वेद प्रसारक संघ’ उभा केला. त्यांनी नानांच्या बरोबरीने झपाटल्यासारखी कामं केली आणि आयुर्वेद धुळे जिल्ह्य़ातील घराघरात पोहचवला.
देखणे ते चेहरे, जे प्राजंळाचे आरसे
सावळे की गोमटे, या मोल ना फारसे
चेहऱ्याच्या आरशात त्या व्यक्तीच्या प्रांजळ अंत:करणाचं  प्रतिबिंब पडलं की तो आपोआप उजळून निघतो हे सांगणाऱ्या या बा. भ. बोरकरांच्या पंक्ती. आयुर्वेदातील पंचकर्माची पताका खेडोपाडी नेणारे धुळ्याचे वैद्य प्रभाकर तानाजी जोशी तथा नाना जोशी यांना भेटल्यावर नेमका हाच अनुभव येतो. आज मोठय़ा शहरांमधून पंचकर्म उपचार केवळ सधन वर्गापुरते सीमित राहिले असताना, गरिबातील गरीब रुग्णाला परवडेल अशा पद्धतीने या चिकित्सेचा प्रसार करणाऱ्या नानांना यासाठीच (पंच)कर्मयोगी असं संबोधलं जातं.
 हजारो रुग्णांना पंचकर्माच्या साहाय्याने व्याधीमुक्त करणाऱ्या या वटवृक्षाने अनेक शिष्य निर्माण करून ही परंपरा अखंड तेवत ठेवली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत सहज-सुलभ पंचकर्माची तीर्थक्षेत्रं निर्माण केली. ‘वाचेचा रसाळ, अंतरीचा निर्मळ। तुळशीमाळ गळा असो, नसो!’  हा संत तुकारामांचा अभंग नानांना तंतोतंत लागू पडतो. त्याचं गोड बोलणं, प्रसन्नता आणि दिलखुलास हास्य समोरच्या रुग्णांला लगेचच आपलंसं करून घेतं.
७८ वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्य़ातील विखरण या गावी नानांचा जन्म झाला. घरची अत्यंत गरिबी. महाविद्यालयीन शिक्षण अशक्यच वाटत होतं. पण नाशिकच्या आयुर्वेद महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला. सकाळी पेपर टाकायचे, संध्याकाळी कंपाऊंडरचं काम करायचं या पद्धतीने त्यांनी शिक्षण पूर्ण के लं.
कालांतराने धुळे नगर परिषदेतर्फे आयुर्वेद दवाखाना सुरू झाला आणि आयुर्वेदतज्ज्ञ म्हणून नाना तिथे रुजू झाले. १९६९ चा तो काळ. त्या वेळी आयुर्वेदिक उपचार म्हणजे नाडी तपासून पुडी देणं (घे पुडी आणि ऱ्हाय पडी) हाच रिवाज होता. परंतु नानांना शोधन चिकित्सा करण्याची इच्छा होती. योगायोगाने त्यांनी ‘आयुर्वेद पत्रिका’ या मासिकातील अमरावतीचे वैद्य व्यं. म. गोगटे यांची ‘माझ्या निरीक्षणाचे निष्कर्ष’ ही लेखमाला वाचली. त्यातून पंचकर्म हा आरोग्यासाठी रामबाण उपाय असल्याचं त्याना जाणवलं आणि ते प्रभावित झाले. त्यानंतर गुरुवर्य गोगटे यांच्याकडे राहून त्यांनी पंचशोधनाबद्दल संपूर्ण ज्ञान मिळवलं व नंतर अनेक अडचणींना तोंड देत १९७४ पासून धुळे नगरपरिषदेच्या दवाखान्यात पंचकर्म विभाग सुरू केला.
सुरुवात झाली तेव्हा तपासणी अधिक सात दिवसांचं औषध, यासाठी नानांची फी होती केवळ पंचवीस पैसे. नगर परिषदेच्या दवाखान्यात येणारे रुग्ण अत्यंत गरीब परिस्थतीतले असल्याने हे २५ पैसेही अनेकदा नानांच्या खिशातून जात. एवढंच नव्हे तर कधी कधी रुग्ण बोलता बोलता रडू लागला तर नानांच्या पाकिटातील ५-१० रुपयांची नोटही त्यांच्या खिशांत जात असे. चार जणांनी धरून, उचलून आणलेला रुग्ण पंचकर्मातील आवश्यक त्या उपचारांनंतर आपल्या पायांवर हसत हसत परतताना बघून रुग्णांची संख्या वाढायला लागली. पहिल्या वर्षी दिवसाला २०० ते २५० रुग्ण हा आकडा पुढच्या काही वर्षांतच ४०० ते ५००च्या घरात पोहचला. त्याबरोबर रोज किमान १० ते १२ होम व्हिझिटस्.. त्याही फुकट. अशा प्रकारे सोमवार ते शनिवार दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांवर इलाज आणि रविवारी जवळपासच्या खेडय़ात शिबीर हा नानांचा त्या वेळचा दिनक्रम.
त्यांच्या पंचकर्म शिबिरांच्या कथा ऐकताना आपली मती कुंठित होते. चूर्ण, गोळ्या, काढे.. अशी औषधं घरी तयार करायची, बस्ती, वमन, रक्तपरीक्षा, आदी चिकित्सांसाठीचं साहित्य घ्यायचं.  हे सर्व शिबिरस्थळी घेऊन जाण्यासाठी वाहन व्यवस्था बघायची.. शिबिरासाठी सहकारी निवडायचे.. त्यांची येण्याजाण्याची भोजनाची सोय करायची (म्हणजे घरूनच डबा घ्यायचा) स्थळी पोहचल्यावर स्वत:च बोर्ड लावायचा, सतरंज्या घालायच्या. हे सर्व न कंटाळता न थकता त्यांनी वर्षांनुर्वष केलं. त्यातही तिथे एनिमा घ्यायला कुणी लाजत असेल तर त्याला तो घरी जाऊन द्यायचा. अशा प्रकारे सर्वासाठी आयुर्वेद आणि स्वस्त आयुर्वेद समाजात रुजण्यासाठी नानांनी अथक प्रयत्न केले. एकटय़ा धुळे जिल्ह्य़ात ५३७ शिबिरं झाली. ज्यांचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरांसाठी नानांनी सेवाभावी अशा ११ वैद्यांचा ‘आयुर्वेद प्रसारक संघ’ उभा केला. शंकर सिंह गिरासे, भगवान भाई पटेल, सुभाष पंचभाई अशा वैद्यांनी नानांच्या बरोबरीने झपाटल्यासारखी कामं केली आणि आयुर्वेद धुळे जिल्ह्य़ातील घराघरात पोहचवला.
संपूर्ण महाराष्ट्रात आजही एकटय़ा धुळे नगर पालिकेच्या दवाखान्यात सुसज्ज असं पंचकर्म केंद्र आहे. ते सुरू होण्यामागील घटना अशी, धुळ्यातील एक श्रीमंत-मारवाडी नंदलाल मोदी क्षयरोगाने आजारी होते. जवळजवळ मरणाच्या दारातच, सर्व उपचार करून झाल्यावर शेवटचा उपाय म्हणून नानांना बोलावलं. नाना गेले तेव्हा त्यांच्या नोकराने मालकांसाठी मिल्कशेक आणलं होतं. ते त्यांनी रुग्णाला पाजलं व नंतर वमनाची पुडी दिली आणि ते घरी आले, थोडय़ा वेळाने रुग्णाला भडभडून उलटी झाली. पोटातली सगळी घाण, कफ बाहेर पडला आणि नंतर त्यांना प्रथमच भूक लागली.
मग नानांनी त्यांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इतर औषधं दिली आणि ८ दिवसांत रुग्ण घरातल्या घरात फिरायला लागला. तीन महिन्यांनी पूर्ण बरं झालेल्या शेटजींनी नानांच्या हातात एक चेक ठेवला त्यावर रक्कम होती एक लाख रुपये (नानांच्या भाषेत एका उलटीची किंमत). नानांनी त्या चेकवरचं आपलं नाव बदलायला लावून तो नगर परिषदेच्या नावे घेतला. गावातील इतर दानशूरांनी या रकमेत भर घातली आणि १९९० पासून धुळे नगरपालिकेचं ३० खाटांचं ‘नंदलाल मुखजी मोदी पंचकर्म चिकित्सालय’ कार्यान्वित झालं.
अशा प्रकारे यमाच्या दाढेतील क्षयरोगाचा रुग्ण बरा झाल्यावर नानांनी या व्याधीच्या उपचारांवर प्रबंध लिहायचं ठरवलं. त्यासाठी त्यांना क्षयरोगाचे आणखी रुग्ण हवे होते म्हणून ते धुळ्याच्या नागरी रुग्णालयामध्ये गेले. तिथल्या डॉक्टरांनी उपकार केल्यासारखा एक रुग्ण दिला की ज्याच्या थुंकीतूनही रक्त पडत होतं. त्याला पाहताच नाना अडुळशाचं तूप घेऊन आले आणि त्या रुग्णाला त्यांनी तासातासाने थोडं थोडं तूप पाजलं. थोडय़ाच वेळात त्याच्या उलटय़ा थांबल्या, खोकला शांत झाला, थुंकीतलं रक्तदेखील गायब झालं आणि त्याला प्रथमच शांत झोप लागली. या घटनेचा परिणाम असा की नानांना ताबडतोब हवे तेवढे क्षयरोगाचे रुग्ण अभ्यासासाठी मिळाले. या प्रबंधासाठी त्यांना नाशिक महाविद्यालयाचं अखिल भारतीय पातळीवरचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्याची रक्कमही त्यांनी दर वर्षी आपल्या गुरूंच्या नावे (त्र्यं. म. गोगटे पंचकर्म भिषक (वैद्य) पुरस्कार) पुरस्कार देण्यासाठी त्या महाविद्यालयाच्या स्वाधीन केली.
नानांची गुरुभक्ती एवढी विलक्षण की जेव्हा त्यांना पुण्याच्या वैद्य खडीवाले संशोधन संस्थेतून पुरस्कार जाहीर झाला तेव्हा माझ्या गुरूंअगोदर मी हा सन्मान कसा घेऊ म्हणत त्यांनी तो नाकारला व पुढच्या वर्षी गुरू-शिष्य दोघांनी एकत्र पुरस्कार स्वीकारला. गोगटय़ांची व्याख्यानं नानांनी ध्वनिमुद्रित केली व त्या ठेव्याची पुढे पुस्तकं प्रकाशित केली. हीच परंपरा पुढे नेत नानांचे शिष्य वैद्य शिवानंद तोंडे यांनी ही नानांच्या पंचकर्मावर आधारित रुग्णकथांचा ‘किमया पंचकर्माची’ नावाचा संग्रह प्रसिद्ध केला. गुरुवर्य गोगटे धुळ्याला आयुर्वेदाची काशी म्हणत आणि आपल्या या शिष्याला (नाना जोशी) काशीविश्वेश्वर मालेगाव येथील साने गुरुजी रुग्णालयात झालेल्या नानांच्या सत्कारसोहळ्यात वैद्य गोगटे यांनी आपल्या शिष्याला गौरवलं. यापेक्षा मोठा सन्मान कोणता?
मालेगावच्या साने गुरुजी रुग्णालयाची जन्मकथाही अशीच अभूतपूर्व. तिथल्या एक जैन साध्वी प्रीती सुधाजी यांचा मायग्रेनचा अनेक वर्षांचा त्रास नानांनी दिलेल्या पंचकर्माच्या उपचाराने कायमचा गेला. याची परिणती म्हणजे लोकवर्गणीतून उभं राहिलेलं हे आयुर्वेदिक रुग्णालय. या ठिकाणी नानांची एक शिष्या सरिता कांबळे हिने त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म रुजवलं आणि आयुर्वेद सर्व स्तरांपर्यंत पोहचवला.
साधी, सोपी औषधं वापरणं हा नानांचा विशेष. आत्यंतिक अवस्थेत आयुर्वेदिक चिकित्सा कशी करावी याचे असंख्य अनुभव त्यांच्यापाशी आहेत. नांदेडच्या एका परिषदेमध्ये एक ग्रामीण मजूर स्त्री तिच्या अचानक अंध झालेल्या मुलीला घेऊन आली. नानांनी तिला ३० मि.ली. तूप पाजून ६० मि.ली.चा बस्ती दिला. थोडय़ाच वेळात तिला शौचाची भावना झाली. त्यानंतर येताना ती लांबूनच ओरडली, ‘आई मला दिसतंय!’
आयुर्वेदाचे हे गाढे पंडित यांनी तोंड उघडायचं आणि लोकांनी पैशांच्या थैल्यांची तोंडं उघडायची इतकं याचं ज्ञान. पण कमी पैशात रुग्णसेवा करता यावी म्हणून त्यांनी सरकारी रुग्णालयातील नोकरीचा मार्ग स्वीकारला. पुढे ८४-८५ पासून त्यांनी संध्याकाळी आपला दवाखाना सुरू केला खरा पण त्यांच्याकडे कितीही श्रीमंत रुग्ण आला तरी ते त्याला, ‘नगरपालिकेच्या रुग्णालयात या, तिथे कमी पैशात काम होईल’ असं सांगत. रुग्णाने घरी बोलावलं तरी ते स्वत:हून कधीच पैसे सांगत नसत. ‘देगा उसका भी भला, न देगा उसका भी भला’ हीच त्यांची वृत्ती होती, आहे.
नानांना आयुर्वेदाचं चालतं-बोलतं विद्यापीठ म्हणावं इतके विद्यार्थी (अंदाजे ३५००) महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून त्यांच्याकडे येऊन, राहून शिकून गेले आहेत. पुस्तकातील क्लिष्ट आयुर्वेद त्यांनी सरळ, सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर आणला. ते म्हणतात, ‘आयुर्वैदय़ांची पहिली पायरी म्हणजे अनुष्ठान. याचा अर्थ वैद्याने या शास्त्रातील जेवढय़ा जमतील तेवढय़ा क्रिया स्वत: अनुभवल्या पाहिजेत. बस्ती घ्यावा, बस्ती द्यावा, बस्ती जीवाचा विसावा’ हे त्यांचं आवडतं वाक्य. नानांचे विद्यार्थी आज ठिकठिकाणी आयुर्वेदाची यशस्वी चिकित्सा करताना दिसतात. परिषदेच्या निमित्ताने जेव्हा त्यांची आपल्या या गुरूशी भेट होते तेव्हा हे शिष्य अक्षरश: परब्रह्म भेटावं अशा भक्तिभावाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवताना दिसतात.
विद्यार्थ्यांना पंचकर्माचं मोफत सराव शिक्षण देण्याची परंपरा नानांच्या मुलांनी वैद्य प्रवीण व वैद्य शेखर यांनी पुढे चालवली आहे. त्यांची राहण्याची सोय (तीही विनामूल्य) त्यांच्या रुग्णालयाच्या वरच्या भागात केली आहे. अभ्यासासाठी वैद्य गोगटे व नाना यांच्या व्याख्यानाच्या सी.डी. उपलब्ध आहेत. नानांची पत्नी ही खऱ्या अर्थाने त्यांची अर्धागिनी आहे. पंचकर्माचं शिबीर म्हटलं की औषध बनवण्यापासून पॅकिंगपर्यंत सर्व पूर्वतयारीत त्यांचा सिंहाचा वाटा असे. १९८२ पासून सुरू झालेल्या नानांच्या ‘धन्वंतरी आयुर्वेद फार्मसी’ या आयुर्वेदिक औषधांच्या कारखान्याची धुरा आजही मुख्यत्वे त्यांच्याच खांद्यावर आहे. नानांच्या दोन्ही सुनाही वैद्य आहेत. एवढंच नव्हे तर त्यांची तिसरी पिढीही आयुर्वेदाचाच अभ्यास करत आहे.
नाना विपश्यनेचे निष्ठावान साधक आहेत. साधनेसाठी ते मधून-मधून इगतपुरीला जात असतात. तिथे गेल्यावरही परिसरात राहणाऱ्या सेवार्थीच्या घरी जाऊन त्यांच्या व्याधीचं निवारण करतात. संस्कृत ग्रंथांचं वाचन हा त्यांचा आवडता छंद. वाग्भट हा त्यांचा आवडता गं्रथ. धुळ्यात आयुर्वेदाचं कोणतंही संघटनात्मक काम असो त्यात नाना जोशी असणारच असा त्यांचा लौकिक आहे. आज ७८व्या वर्षीही ते आपल्या पंचकर्म केंद्रात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात तसंच अनेक आयुर्वेदिक महाविद्यालयांतून व्याख्यानं देत असतात.
आयुर्वेद हा त्यांचा श्वास आहे आणि देह जळो अन् जग उजळो हा धर्म. जग आजही सुंदर आहे ते अशा व्रतस्थ माणसांमुळेच!   
wagalesampada@gmail.com संपर्क –  ashtang.ayur.pharma@gmail.com