सुरुवातीला मुलांकडून काही चूक झाली तर ती आई-वडिलांना सांगतात. पण आई-वडील काय करतात? त्यांना रागावतात, फटकारतातही. मग तुमच्या या वागण्यामुळे मुलं तुमच्यापासून सत्य लपवायला लागतात. तुमच्याकडे त्यांनी येऊन खरं सांगणं चांगलं की तुमच्यापासून लपवणं चांगलं? खरं तर त्यांना खरं बोलायला प्रोत्साहित केलं गेलं पाहिजे.
‘हार्मनी इन रिलेशनशिप’ अर्थात नातेसंबंधातील माधुर्य. आमच्या विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासिका दादी जानकीजी म्हणतात, हारमनी अर्थात हार मानी. आपल्या वागण्याने किंवा बोलण्याने दुसऱ्याला उद्विग्नता वाटणार नाही, त्याची मन:स्थिती बिघडणार नाही; उलट त्याला सौम्यतेची, आपलेपणाची अनुभूती होईल, असं आचरण करणं, आपल्या जीवनात नम्रता आणणं खूप गरजेचं आहे. कारण गर्वाने देव दानव बनतात, तर नम्रतेने दानवही ‘मानव’ बनतात. पण खरोखर आजच्या या धकाधकीच्या जीवनात नातेसंबंधात ही मधुरता किंवा ऐक्य फार कमी ठिकाणी पाहावयास मिळतं. सर्वात महत्त्वाचं नातं अर्थात आई-वडील व मुलांचं. या नात्यातही तेवढी निकोपता खरंच राहिली आहे का?
एकदा एक मुलगा क्लासला गेला होता. संध्याकाळी ६ वाजता त्याचा क्लास सुटायचा. पण साडेसहा झाले, सात झाले तरी त्याचा पत्ता नाही. आई चिंताक्रांत झाली. मनात भरपूर नकारात्मक विचार येऊ लागतात. अपघात तर झाला तसेच ना, कुठे कुठे चौकशी करावी लागेल, मित्रांना फोन करावा का, अगदी इथपासून ते तो जर माझ्या आयुष्यातून निघून गेला तर माझे काय होईल, इथपर्यंत संपूर्ण तासभर ही विचारचक्रं मनात सतत फिरत होती. बरोबर सव्वासात वाजता मुलगा घरात आला. आल्यानंतर त्याच्यावर प्रश्नांच्या गोळय़ांचा मारा सुरू झाला. पुढचं आपल्याला माहीतच आहे. आपणा सर्वाच्या बाबतीत हे घडून गेलं आहे. पण समजा, एखाद्या दिवशी मुलगा आईला म्हणाला, ‘आज जर का माझा अपघात झाला तर?’ तेव्हा आई पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवते. म्हणते, ‘असं अशुभ बोलू नकोस.’ पण त्याच आईने त्या एका तासात स्वत: मुलाबाबत किती अशुभ विचार केले? आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचं सर्वच शुभ व्हावं, चांगलं व्हावं असं आपणास वाटतं, पण जेव्हा आपण अशुभ विचार करतो तेव्हा वाटतं, आपण त्या व्यक्तीवर प्रेम करतोय ना, मग असे विचार येतातच कसे? अगदी एखाद्या छोटय़ाशा प्रसंगातही कधी कधी मुलांकडून चूक होते. त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता असते. ही कमतरता त्यांनी स्वत:च भरायला शिकवायचं असतं. पण होतं काय प्रत्यक्षात? मुलांकडून चुका झाल्या तर आई-वडिलांचा सरळ हात उठतो मुलांवर. काही आई-वडील तर शिवीगाळही करतात त्यांच्यावर, अगदी कधी तर त्यांच्या मित्रांसमोरही त्यांना खूप अपमानास्पद बोललं जातं. पण समजा, पती-पत्नी आहेत. काही कारणास्तव पतीचा हात जर का पत्नीवर उठला तर पत्नीला काय वाटेल? तिला चीड किंवा संताप येणार नाही का? नवऱ्याच्या मनात आपल्याबद्दल यत्किंचितही आदर नाही. त्याला आपली थोडीही कदर नाही. किती तरी भावनांचा कल्लोळ दाटतो त्या वेळी पत्नीच्या मनात. मग हीच गोष्ट मुलांबाबतीतही लागू होते की. तुम्ही जेव्हा मुलांवर हात उचलता, तेव्हा त्यांनाही तुम्ही अपमानित करता. तुम्ही त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवता. त्यांना स्वत:च्या व इतरांच्या नजरेतून उतरवता. त्याने खरंच ही मुलं सुधारतील का? मला आई-बाबा का समजून घेत नाहीत, असंच मुलाला वाटत राहतं. आई-वडिलांची इच्छा असते, आमच्या मुलाने शारीरिकदृष्टय़ा सशक्त असावं. मुलं काही भाज्या खात नाहीत. तरी काही घरांतून त्यांना मारूनही भरवलं जातं; तो शारीरिकदृष्टय़ा सक्षम व्हावा यासाठी.  मुलांना अभ्यासात कशाचीच कमतरता भासू नये यासाठी सर्वतोपरी आई-वडील प्रयत्न करतात. त्यांना चांगल्या क्लासला घालणं, स्वत:ही त्यांच्या अभ्यासासाठी वेळ देणं, यामुळे ते मुलांना बौद्धिकदृष्टय़ा सक्षम करू इच्छितात. पण तितकंच त्यांना भावनिकदृष्टय़ा सक्षम केलं जातं का? एकदा रस्त्यावरून जात असताना मुलाच्या हातातून त्याचे शाळेचं दप्तर पडलं. सकाळची घाईची वेळ. बाबांना पण ऑफिसची घाई. त्याला खेचतच ते घेऊन चालले होते. दप्तर पडल्यामुळे सर्वासमोर वडिलांनी मुलाला थोबाडीत मारलं. त्याचे ओठ थरथरू लागले. तो काही बोलूही शकला नाही. मी ते दृश्य पाहून खूप अस्वस्थ झाले. मग ते करताना जन्मदाता का अस्वस्थ झाला नाही?
अभ्यासासाठी मुलांच्या मागे लागलं जातं. चांगले मार्क्‍स मिळाले तर चांगली नोकरी मिळते हे लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. पण नोकरी लागल्यानंतर पुन्हा किती वेळ ती मार्कशीट आपण उघडून बघतो? ते मार्क्‍स पुढच्या आयुष्यात किती उपयोगी पडतात? तर नोकरी मिळेपर्यंत, पण नंतर उपयोग शून्य. सुरुवातीला मुलांकडून काही चूक झाली तर ते आई-वडिलांना सांगतात. आई-वडील काय करतात? त्यांना रागावतात, फटकारतातही. मग तुमच्या या अवसानाला पाहून मुलं तुमच्यापासून सत्य लपवायला लागतात. तुमच्याकडे त्यांनी येऊन खरं सांगणं चांगलं की तुमच्यापासून लपवणं चांगलं? खरं तर त्यांना खरं बोलायला प्रोत्साहित केलं गेलं पाहिजे. फक्त आई-वडिलांमध्ये ती शक्ती असणं गरजेचं आहे, त्यांनी बोललेलं सत्य पचविण्याची.
आजच्या जगातही पाहा ना, ऑफिसात रजा हवी तर कारण लिहावं लागतं. समजा, एखाद्याने लिहिलं, मला क्रिकेट मॅच बघण्यासाठी रजा हवी आहे, तर खरंच रजा मिळेल का, पण त्याऐवजी पत्नी आजारी आहे, असं लिहिलं तर लगेच रजा मिळेल. मोठी माणसंदेखील स्वत:च्या सोयीकरिता खोटय़ाचा आधार घेतात. पण या साध्या वाटणाऱ्या गोष्टींचा परिणाम होतो मुलांवर, त्यांच्याबरोबरच्या नातेसंबंधावर.
एकदा एका १८ वर्षांच्या मुलाला त्याचे आई-वडील माझ्याकडे घेऊन आले. कारण तो धूम्रपान करू लागला होता. व्यसनी झाला होता. आई-वडिलांची अवस्था खूपच भयानक होती. त्यांच्या चेहऱ्यावर मुलाबद्दल राग, तिरस्कार, घृणा तसेच चारचौघांत या मुलामुळे त्यांची झालेली बेअब्रू असं सारं काही दाटून आलं होतं. आपण काय कमावलं होतं आयुष्यभर कष्ट करून, पण या मुलामुळे सर्व धुळीला मिळालं, अशी त्यांची भावना होती. त्यांना मी बाहेर बसायला सांगितलं व मुलाशी बोलू लागले. त्याला विचारलं, ‘तू असं का वागतोस?’ त्यावर तो काय म्हणाला माहीत आहे? ‘मी जाणीवपूर्वक करतोय. मी मुद्दाम असं वागतो. साध्या साध्या गोष्टींवरून देखील ते मला खूप बोलायचे. मी कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरीही ते नाखूश असायचे. मी घेतलेला कुठलाही निर्णय त्यांना कधी आवडला नाही. त्यांनी मला कधी नीट समजून घेतलंच नाही. त्यांच्या वागण्याचा मला खूप त्रास होऊ लागला. म्हणूनच मीदेखील ठरवलं त्यांना त्रास देऊन बघायचं.’’ बघा अशा अवस्थेपर्यंत आजची पिढी येऊन ठेपली आहे.
आई-वडिलांना वाटतं, आपल्या मुलाच्या भल्यासाठी आपण त्याला रागावतो. आपण नेहमी बरोबरच असतो, मुलंच चुकत असतात असं त्याचं ठाम मत असतं. जसं माझ्या हातात माइक आहे. मला तो कसा दिसतो? पांढऱ्या रंगाचा, तर प्रेक्षकांना तो दिसतोय काळय़ा रंगाचा. मला तो काळय़ा रंगाचा दिसावा असं वाटत असेल किंवा प्रेक्षकांना तो सफेद रंगाचा दिसावा असं वाटत असेल तर मला खाली यावं लागेल व प्रेक्षकांना स्टेजवर जावं लागेल किंवा माइक बदलावा लागेल. मला तो सफेद रंगाचा दिसतो म्हणून मी चूक नाही किंवा प्रेक्षकांना तो काळय़ा रंगाचा दिसतो म्हणून प्रेक्षकही चुकीचे नाहीत. प्रत्येक जण आपल्या जागी बरोबर आहे. म्हणून पालक जसे त्यांच्या नजरेतून योग्य असतात तसेच मुलंही त्यांच्या नजरेतून योग्यच असतात. त्यांच्या गुणदोषांसकट त्यांनाही स्वीकारा. कारण जर तुम्ही त्यांना ते जसे आहेत तसे स्वीकारलं नाही तर ते अधिकच चुका करीत राहतील. म्हणून म्हणावंसं वाटतं, accept them, respect them but not reject them मग पाहा. ही देवाघरची फुलं स्वत:च्या गुणांचा सुगंध चुहूकडे कसे पसरवतील. आणि या नात्याची वीण अगदी घट्ट होत जाईल.    
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ओम शांती मीडिया या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या आध्यात्मिक प्रवचनांचा मराठी अनुवाद)

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली