माझ्या वयाची ७२ वर्षे नुकतीच पूर्ण झाली असून अजूनही मी कामात व्यग्र असल्याचे मला समाधान आहे. माध्यमिक विद्यालयातून सेवानिवृत्त होतानाच आता आपण मुलांच्या आनंददायक किलबिलीच्या विश्वापासून दुरावणार असल्याची खंत जाणवत होती. मात्र मन म्हणत होते, ‘तू यानंतर स्वस्थ बसू नकोस. दुसऱ्या अनेक शाळांमधली विद्यार्थ्यांशी स्वत:ला जोडून घे.’  मी होतो गणित अध्यापक. त्यामुळे गणिताविषयी सामान्य विद्यार्थ्यांच्या मनातही अभिरुची वृद्धिंगत व्हावी म्हणून मी गणितातील काही क्लिष्ट क्रिया सोप्या पद्धतीने कशा करता येतात, यासंबंधी विद्यार्थ्यांपुढे भाषणे देऊ लागलो. गणितविषयीची गोडी, कुतूहल वाढावे म्हणून मी ‘गणित कोडी’ तयार करून त्यांना मनोरंजन कथेचा साज लेवून ती कोडी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू लागलो. माझ्या या प्रयत्नांची दखल विदर्भातील एका दैनिकाने घेतली. त्यांच्या खास विद्यार्थ्यांसाठी काढल्या जाणाऱ्या पुरवणीत मला सदर लिहण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. मी आनंदाने संमती दिली आणि त्यानंतर मी दर शनिवारी ‘कोडं आमचं डोकं तुमचं’ हे सदर चालवू लागलो. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची गणिताची कोडी तयार करून देऊ लागलो. कोडय़ांची रंजकता वाढावी म्हणून कोडय़ांना कथारूपात मांडू लागलो. हा उपक्रम आबालवृद्धांमध्येही लोकप्रिय झाला. हा अनुभव उत्साह द्विगुणित करणारा होता. त्यानंतर या कामी मी स्वत:ला झोकून दिले व मुलांमध्ये हसतखेळत गणित पोहोचण्याकामी यशस्वी झालो. यानंतर अनेक दिवाळी अंकांमधून माझे कथासाहित्य प्रकाशित झाले. आता मुलांसाठीच्या मालिकांमधून माझे गणित व विज्ञानविषयक तसेच बोधप्रद साहित्य प्रकाशित होत असते.
सेवानिवृत्तीनंतर आयुष्याची सेकंड इनिंग सुरू होते, या वेळी काही विधायक स्वरूपाचं काम आपल्या हातून घडले तर जीवन कृतार्थ होते. आणि ही तिच ठरते खरी आनंदाची निवृत्ती.
‘आनंदाची निवृत्ती’साठी मजकूर पाठवताना एकाच विषयावरचा अनुभव  १५०-२०० शब्दांत पाठवावा. पाकिटावर ‘आनंदाची निवृत्ती’ उल्लेख करावा. सोबत फोटो जरूर पाठवा.पत्ता- ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा. chaturang@expressindia.com