विवेकानंदांनी सांगितलेल्या क्रियाशीलतेचं अंतिम उद्दिष्ट ईश्वरप्राप्तीच असलं तरी ती क्रियाशीलता आपल्या सर्वसामान्यांच्या जगण्यात उपयोगी पडणारी, आपला विकास घडवून आणणारी आहे. आज व्यवसाय मार्गदर्शनातून आपलं मन, बुद्धी, क्षमता ओळखून कोणतं काम आपल्यासाठी योग्य असेल याची माहिती आपण करून घेतो. निवडलेलं काम जेव्हा आपण तळमळीने करतो, तेव्हा त्याचं अपेक्षित फळ मिळतं.
क्रि याशील अवस्थेतच मला जगू द्या आणि मरू द्या’ असं स्वामी विवेकानंद म्हणत असत. आपल्या कार्यावर, आपल्या विहित कर्मावर त्यांची गाढ श्रद्धा होती. मरगळ आलेल्या समाजाला त्यांनी प्रभावीपणे कार्यप्रवृत्त केलं. त्यांनी सांगितलेली क्रियाशीलता माणसाला विकासाभिमुख करणारी आहे. आपलं विहित कर्म म्हणजे काय तर अंगी असलेल्या वृत्ती, गुण, क्षमता, मनाचा कल यांच्यानुसार आपण जे काम स्वत:साठी आणि समाजासाठी करू शकू ते काम!
आपलं विहित काम काय ते एकदा ठरवलं की त्यात प्रावीण्य मिळवणं, ते अचूकपणे, उत्कृष्टपणे, सर्वस्व पणाला लावून करणं महत्त्वाचं असतं. आपलं आवडतं काम करताना त्यातून काय लाभ होईल, याचा फारसा विचार माणूस करीत नाही कारण त्या कामातच आनंद सामावलेला असतो. आपल्या मनाला, बुद्धीला आणि शरीराला योग्य असं काम मात्र आपण जाणीवपूर्वक निवडायला हवं. स्वामी विवेकानंद स्वत:च्या कामाबद्दल असं म्हणत, ‘‘मी माझ्यापरीने कसोशीने प्रयत्न करीन. माझ्यापाशी असलेलं सर्व काही पणाला लावीन. माझ्यातील वृत्ती मी इतरांमध्ये संक्रमित करीन. त्यांना प्रेरित केल्यास मी सुरू केलेलं काम ते पुढे नेतील. आता माघार नाही. क्षणभराची उसंत वा विश्रांती नाही. माझ्या कार्यात मग्न असतानाच मला मरण यावे.’’
आपल्या रोजच्या जगण्यातही अवधानपूर्वक काम करायला हवं, यावर स्वामीजींचा भर होता. आपल्या कामाशी मन पूर्णपणे संयुक्त व्हायला हवं. एकाग्रता साधायला हवी याबद्दल ते आग्रही होते. त्यांच्या वागण्या, बोलण्यातून हजारो तरुणांना स्फूर्ती मिळाली. स्वामीजींनी सांगितलेल्या क्रियाशीलतेचं अंतिम उद्दिष्ट ईश्वरप्राप्तीच असलं, तरी ती क्रियाशीलता आपल्या सर्वसामान्यांच्या जगण्यात उपयोगी पडणारी, आपला विकास घडवून आणणारी आहे. आज व्यवसाय मार्गदर्शनातून आपलं मन, बुद्धी, क्षमता ओळखून कोणतं काम आपल्यासाठी योग्य असेल याची माहिती आपण करून घेतो. निवडलेलं काम जेव्हा आपण तळमळीने करतो, तेव्हा त्याचं अपेक्षित फळ मिळतं. कधीकधी त्या कामात विघ्ने येतात. अपयश येतं. तरीही माणूस निराश होत नाही. कामातील आनंद घेत विघ्न, अपयश यांच्याशी लढत काम करीतच राहतो.
एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्यासाठी त्याला हजार वेळा प्रयोग करावे लागले. प्रत्येक प्रयोगानंतर अपयशाने खचून न जाता नव्या जोमाने प्रयत्न चालू ठेवले. त्याचे ‘विहित कर्म’.. विद्युत दिवा तयार करणे हे त्याच्या मनात अखंड जिवंत होते. ते प्रयोग करताना त्याला आनंद मिळत होता. अखेरीस त्याने विद्युत दिवा प्रकाशित केला, तेव्हा त्याला पत्रकारांनी विचारलं, ‘‘एवढय़ा वेळा अपयश येऊनही तुम्ही निराश कसे झाला नाहीत?’’ एडिसन म्हणाला, ‘‘ते अपयश नव्हतं. यशाकडे नेणाऱ्या हजार पायऱ्या होत्या. एखादं ध्येय साध्य करताना कामात ९० टक्के परिश्रम असतात आणि दहा टक्के अंत:स्फूर्ती असते.’’
अशाच अंत:स्फूर्तीतून ध्येय निश्चित करून परिश्रम करावे यावर स्वामीजींचा भर होता. सर्वसामान्य माणसेसुद्धा आपल्या दैनंदिन कामात वाकबगार  होतात. अनेक गोष्टी करीत असताना त्यांचे आपल्या मुख्य उद्दिष्टावरील लक्ष्य इतरत्र वळत नाही, हे सांगण्यासाठी स्वामीजी, रामकृष्ण परमहंस यांनी दिलेला दाखला सांगत असत. रामकृष्ण म्हणत, ‘‘प्रापंचिक जीवनात अखंड साधना आणि दक्षतेने कर्म करणं महत्त्वाचं आहे.’’ त्यासाठी ते कामार पुकुरला तांदूळ कांडणाऱ्या बायकांचे उदाहरण देत. या बायका एकाच वेळी एका हाताने मुसळ धरून घाव घालतात. दुसऱ्या हाताने तांदूळ सारत असतात. एकीकडे बाळाला पाजत असतात. त्याच वेळी तांदूळ कांडून घ्यायला येणाऱ्या लोकांशी व्यवहाराची बोलणी करीत असतात. तरीही मुसळाचा घाव हातावर पडू नये म्हणून त्यांचं लक्ष तांदूळ उखळात सारणाऱ्या हाताकडे व उखळात पडणाऱ्या मुसळाकडे असतं. संसारातील कामे अशा दक्षतेने करावीत, असे रामकृष्ण परमहंस सांगत असत. अर्थात ही दक्षता बाळगताना चित्तात ईश्वर असावा, असेही ते सांगत.
आपलं कार्य म्हणजे ईश्वरसेवा मानणारी किती तरी साधी माणसं आपल्याला आसपास दिसतात. अतिशय दक्षतेनं, तत्परतेनं ही माणसे प्रत्येक लहानसहान काम उत्कृष्ट तऱ्हेनं पार पाडत असतात. आपलं काम ईश्वरदत्त असल्याची मनाची धारणा असल्यानं कामात कसूर करीत नाहीत. त्या कामातून आपल्या पदरी काय पडेल याची त्यांना चिंता नसते. कर्तव्य उत्तम तऱ्हेने पार पाडण्याची ही भावना माणसाचे चारित्र्य घडविण्यात मोठा हातभार लावते. स्वामीजी असं म्हणत असत की, असे क्रियाशील, चारित्र्यसंपन्न दोन हजार युवक जरी माझ्याबरोबर काम करण्यास आले तरी मी देशाची शोचनीय परिस्थिती बदलू शकेन.
स्वामीजींनी असं समजावून सांगितलं आहे की, आपल्या वाटय़ाला जे येत राहते व जे आपण आत्मसात करू शकतो, ती सगळी योजना कर्मच करते. आपण जे आहोत त्याला आपणच जबाबदार असतो. आपण जी इच्छा मनात धरू त्याप्रमाणे स्वत:ला घडविण्याची ताकद आपल्या अंगी असते. आज या क्षणी आपण जे कोणी आहोत तो सगळा आपल्या भूतकालीन कृतींचा परिपाक आहे. हे गृहीतक मान्य केलं तर भविष्यात आपण कोण होऊ इच्छितो ते आपल्या वर्तमानकालीन कृती घडवू शकतात हे ओघाने आलंच. म्हणूनच प्राप्त काल सत्कारणी लावणे महत्त्वाचे.
कित्येक माणसे नेमके उलटे करीत असतात. आपल्या कामात चालढकल करायची, आळस करायचा, काम कसंबसं रेटायचं आणि मग अपयश आलं की त्याची जबाबदारी वेगवेगळ्या गोष्टींवर ढकलायची! क्रियाशीलतेला आपल्या जगण्यातून वजा करणारी अशी माणसे चारित्र्यसंपन्न होणं दूरच, त्यांना यश आणि आनंद काहीही मिळणार नाही. आपल्याला भावी काळात जे मिळवायचं ते प्राप्त करून घेण्यासाठी आता कोणती कृती कशी करायची, ते भगवद्गीतेतील कर्मयोग शिकवतो असं स्वामीजी सांगत असत.
कर्मयोगाची अगदी सोपी सुटसुटीत संकल्पना मांडताना त्यांनी म्हटलं आहे, ‘‘आपलं काम शहाणपणाने, एकाग्रतेने व शास्त्रीय पद्धतीने करीत त्यायोगे मनाचे उपजत सामथ्र्य प्रकट करून आत्म्याला जाग आणणे म्हणजे कर्मयोग.’’
या संकल्पनेत किती तरी गोष्टी सामावल्या आहेत. आपल्या कामाचे (काम म्हणजे कर्म.. यात आपलं बोलणं, हालचाली, इतरांशी वर्तणूक, आपल्या ऐच्छिक अनच्छिक क्रिया सारं समाविष्ट आहे. अशा कोणत्याही कर्माचे)आपल्यावर आणि इतरांवर काय परिणाम होणार आहेत? त्यातून अनिष्टता निर्माण होणार असेल तर ते कर्म करायचं की नाही या साऱ्यांची जाणीव म्हणजे शहाणपण. एकाग्रतेने करणं म्हणजे मन त्या कार्याशी संयुक्त होणं. आपलं ईश्वरदत्त कर्तव्य आहे या भावनेने ते काम करणं. काम अचूक, निर्दोष करण्याचा प्रयत्न करणं. तर्क आणि विवेकयुक्त पद्धतीने म्हणजे शास्त्रीय पद्धतीने करणं. या तऱ्हेने काम करीत गेल्यावर मानसिक सामथ्र्य मिळतं. त्याच्या जोरावर मन, बुद्धी अहंकारापलीकडे जाऊन आत्म्याचं स्वरूप समजावून घेणं ही शेवटची पायरी! तिथे महान योगीच पोहोचू शकतात. पण आधीच्या पायऱ्या तर आपण चढू शकतो! त्यायोगे क्रियाशील, चारित्र्यसंपन्न,आणि आनंदी जीवन जगू शकतो.    

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
korean skincare, K-beautyUnlock the secrets
तुम्हालाही हवीये Glass skin? कोरियन लोकांच्या सौंदर्याचे काय आहे रहस्य? तज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स