15 August 2020

News Flash

आध्यात्मिक बैठकीवरचं समजूतदार नातं

‘‘आम्ही कधीच कुठलेही हिशोब नात्यात मांडत बसलो नाही. समस्या आल्या, त्या शांत राहून सोडवल्या. राग धरणं सवयीचं होऊ दिलं नाही आणि मतभेद झालेच तर एकाने

| September 13, 2014 01:01 am

‘‘आम्ही कधीच कुठलेही हिशोब नात्यात मांडत बसलो नाही. समस्या आल्या, त्या शांत राहून सोडवल्या. राग धरणं सवयीचं होऊ दिलं नाही आणि मतभेद झालेच तर एकाने माघार घेत समजूतदारपणाचा मंत्र जपला. अहंकार आमच्यापेक्षा मोठे होऊ दिले नाहीत आणि गोष्टी धरून ठेवण्यापेक्षा ‘लेट गो’ करण्याचं कसब अंगी बाणवलं. तुटेपर्यंत ताणलं नाही आणि लपवून काही ठेवलं नाही. आमचं नातं एका वेगळ्याच उंचीवर जाण्याला आमची आध्यात्मिक बैठकही कारणीभूत ठरली आहे आणि हेच आमच्या सहजीवनाचा हा काळ समाधानपूर्वक व्यतीत करण्याचं सार आहे, असं मला वाटतं.’’ सांगताहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता जयकर आपले पती सॉलिसिटर मोहन जयकर यांच्याबरोबरच्या ३७ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
१८  डिसेंबर १९७७ रोजी मी आणि मोहन विवाहबद्ध झालो. प्रेमात पडून यशावकाश घरच्यांच्या संमतीने लग्न झाले. कायद्याचं शिक्षण वगैरे घेण्याचा विचार नव्हताच माझा, उलट मानसशास्त्र वा सामाजिक शास्त्रासारखा विषय घेऊन एम.ए. करण्याचा विचार होता. आई-बाबा हौशी कलाकार होते. गणपतीच्या वेळी चाळीतील कार्यक्रमात, नाटकात काम करायचे दोघे. त्यामुळे नकळत कलेकडे ओढा अधिक होता. मात्र मोहनच्या घरची मंडळी कायद्यात उच्चशिक्षण घेतलेली होती. त्यामुळे माझ्या घरचेही सगळे ‘कायद्याचे शिक्षण घे, त्याचा उपयोग होईल’ असं म्हणू लागले. शेवटी मी एलएल.बी. ला प्रवेश घेतला आणि त्याच दरम्यान माझं लग्न झालं.
माझं वय होतं अवघं २१-२२ वर्षांचं, जयकरांच्या घरचं प्रस्थ पाहून मी बावरून गेले. घरातलीच १६ माणसं, चार गडी. कामाचा व्याप इतका होता की मी बुजून जायचे. मात्र सगळी माणसं प्रेमळ होती. हळूहळू सासूबाईंचा लळा लागला. प्रमिलाताई जयकर, म्हणजे माझ्या सासूबाई त्या काळी फ्रेंच व इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाल्या होत्या. नऊवार साडीवर नेलपॉलिश लावलेले त्यांचे फोटो अजूनही माझ्या संग्रही आहेत. असं हे घर पुढारलेलं होतं. सगळी माणसं समजून घेणारी, आपुलकीनं वागणारी होती. मोहनही याच संस्कारात वाढलेला, कायद्यासारख्या रुक्ष विषयात त्याला रुची असली तरी तो रसिक मनाचा होता. त्यानेच मला खरं तर अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी पाठिंबा दिला.
 साल ८५-८६ असावं, अर्चित आणि सिद्धार्थ दोन्ही मुलं शाळेत जायला लागली होती. मोकळा वेळ हाती येऊ लागला. म्हणून सहज ‘दूरदर्शन’च्या कार्यालयात गेले, न्यूजअँकर वगैरे होता येईल का असा विचार होता. मात्र कायद्याची पदवी पाहता, तेथील कायदे विभागाचे प्रमुख सुधीर पाटणकर यांनी ‘कोर्टाची पायरी’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी दिली. तो माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट ठरला.
ओळखीचे लोक माझ्या कामाचं कौतुक करू लागले म्हणून एक दिवस मोहननेच मला पोर्टफोलिओ करून घे, असे सुचवले. मग मी गौतम राजाध्यक्ष आणि मिकी मेहता यांच्याकडून रीतसर फोटो-मेकअपसकट पोर्टफोलिओ केला. त्याच्या बळावर मला अनेक जाहिराती मिळाल्या. माझा फॉलो-अप कमी पडला की मोहन आठवण करून द्यायचा. अभिनय क्षेत्रात मी काम करावे, यासाठी त्याचा पाठिंबा कायमच होता. पुढे-पुढे हिंदी मालिकांमध्ये, सिनेमांमध्ये काम केले तरी अगदी, सासऱ्यांनीही कौतुकच केले.
जुने दिवस आठवते तेव्हा नवल वाटते. ते दिवस खरंच मोरपंखी होते. माझं बालपण गिरगावचं. अस्सल मराठमोळं. नव्याने लग्न झालेलं, दोन्ही मुलं गुणी. एकीकडे हिंदी-मराठी मालिका यांच्या शूटिंगमध्ये अभिनेत्री स्मिता जयकर आयुष्यात व्यग्र होत चालली होती, तर सॉलिसिटर मोहन त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये जम बसवू लागले होते. आपापली क्षेत्रं आवडीची असल्याने आम्ही झपाटून काम करत होतो, एकमेकांना वेळ देणं पूर्वीपेक्षा कमी झालेलं असलं तरी ते सहज स्वीकारलं गेलं होतं आणि एकत्र कुटुंबामुळे मुलांकडेही दुर्लक्ष होण्याचा प्रश्नच नव्हता. तो काळ थोडा संघर्षांचा होता. मोहनला अवघा ९०० रुपये पगार होता. पण तो फक्त आमच्यासाठी होता. घरचा खर्च आमच्या वाटय़ाला आलेला नव्हता. त्यात आम्ही खूप मजा करायचे. मुलांना घेऊन सिनेमाला जाणं, फिरायला जाणं यासाठी वेळ काढायचो, खूप आनंद मिळायचा. पुन्हा आपापल्या कामात व्यग्र व्हायचो.
लग्न करून जेव्हा एकत्र कुटुंबात आले तेव्हा सकाळी साडेपाच वाजता उठणे, आंघोळ करून स्वयंपाक करणे, रोज नैवेद्य करणे असे सगळे सोपस्कार पार पाडत, जयकर कुटुंबाशी एक झाले. अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले, तेव्हाच इथल्या झगमगाटामागची एक कृत्रिम दुनिया जवळून दिसली. एकेकाळी मिळवलेल्या प्रसिद्धी, आदर, मानसन्मानाची उत्तरार्धात किंमत मोजावी लागलेले अनेकजण पाहिले. प्रचंड असुरक्षितता, त्यातून निर्माण होणारी असूया, स्पर्धा याने कधी तरी दुखावले गेले, पण वाहवत गेले नाही. माझे पाय जमिनीवर इतके घट्ट होते, आहेत की हवा डोक्यात गेल्याने येणाऱ्या कोणत्याच अडचणी, संकटं सुदैवाने माझ्यावर ओढवली नाहीत.
माझं आणि मोहनचं नातंही असंच समजूतदार, समंजस आणि अधिकाधिक अर्थपूर्ण होत गेलं. लाडिक रुसवेफुगवे संसारात येतातच, पण मोठी भांडणं, मतभेद यांचा सामना कधी करावा लागला नाही. दोन्ही घरी सुबत्ता असल्याने कसलीही ददात नव्हतीच आणि दोघे आपापल्या पेशात स्थिरावल्यावर तर आयुष्याला झळाळी आली.
मला आठवतं, मी हिंदी मालिकांमध्ये बऱ्यापकी स्थिरावल्यावर एखादवेळी शूटिंगच्या पूर्ण युनिटला घरी जेवायला आणण्याचा बेत आखत असे, अर्थात ही कल्पना मोहनचीच. तसंच श्रावणात दर सोमवारी काजूच्या पोळ्या करण्याची जयकरांची पद्धत होती, ती मीही कसोशीनं पाळली. काजूच्या पोळ्या करणं आणि त्या आग्रहाने इतरांना खिलवणं हा आनंद तर मी कित्येक वर्षे लुटला. अजूनही एखादा फोन येतोच, ‘सोमवार झाले सुरू, काजूपोळी कधी मिळणार.’ माणसं जोडण्याची, त्यांना वाट्टेल ती मदत करण्याची मोहनची ही सवय मला खूप आवडते; किंबहुना जयकरांच्या कुटुंबाचा तो संस्कारच आहे.   
कधी वाटतं, कशी गेली वर्षे? तेव्हा जाणवतं, आयुष्याचे दोन कप्पे केले गेले जणू. अभिनयाच्या क्षेत्रातलं चमचमतं आयुष्य एकीकडे तर दुसरीकडे आध्यात्मिक वाटचालीचा प्रवास. सेटवर एकदा गेले, तो मेकअप चढवला की आपोआप मी त्या भूमिकेची होऊन जाते..आईची भूमिका करते तेव्हा आपसूक ती ममता येतेच बोलण्यात, वागण्यात, देहबोलीत अगदी स्पर्शातसुद्धा. खूप विविधांगी भूमिका करायला मिळाल्या, यामुळे दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून विचार करण्याची देणगी मिळाली. देणगी अशासाठी की यामुळे खूप गरसमज टाळता आले. अनेक टोकाच्या भावनांना वेळीच मुरड पडली. म्हणून अहंकार कधी कोणत्याच नात्यात डोकावला नाही. त्याने नात्यांमध्ये सहजता कायम राहिली. हिंदू, मुस्लीम, पंजाबी, ख्रिश्चन स्त्रीच्या भूमिका करता आल्या. दृष्टिकोन अधिकाधिक विस्तारत गेला. मानवी स्वभाव, त्यांच्या सवयी जवळून पाहता आल्या, स्वतकडे बघण्याची वेगळी दृष्टी मिळाली. आज मी जी कुणी आहे ती पूर्वीच्या स्मितापेक्षा ३६०अंशाने बदललेली आवृत्ती आहे.
दोन्ही मुलं आणि मोहन माझ्या अभिनयाचे कट्टर समीक्षक आहेत. खटकलेली गोष्ट माझ्या कानीकपाळी ओरडून सांगतात ते. मुलांना माझे भावविवश झालेले, रडके रोल अजिबात आवडत नाहीत. उलट ‘सत्त्वपरीक्षा’ या मराठी सिनेमातील माझी थोडी खलनायकी भूमिका असणारा रोल मुलांनी दहावेळा तरी पाहिला असेल. आपली आई खंबीर आणि खमकी असली पाहिजे हा त्यांचा हट्ट असायचा. कुणाला मी आदर्श स्त्री वगैरे वाटेन, पण मी तशी नव्हते. थोडी रागीट होते. लोकांना मदत केल्यावर त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही की आतून दुखावली जायचे. कुणी वाईट वागल्यावर आपण चांगलं वागण्याचा मक्ता घेतलाय का, असं वाटून मनस्तापही करून घ्यायचे. पण हळूहळू स्वभावही परिपक्व होत गेला. कित्येक वर्षे मी सिनेसृष्टीतल्या कुणालाही माझ्या आध्यात्मिक शिक्षणाबद्दल काही बोलले नव्हते. कारण लोक एकतर टिंगल करत. ‘पन्नाशीनंतर कर हे, म्हातारी झाल्यावर’ अशी टर खेचत. पण मी आतून जाणून होते, यातून मला काय मिळतंय यावर माझा विश्वास होता. भोळी श्रद्धा मी कधीच ठेवली नाही. उलट ‘त्याची’ होऊन गेले. हेच जे मला उमगलं ते दुसऱ्याला द्यावं, या हेतूने मी आध्यात्मिक कार्यशाळा घेते. त्या कामी बरीच व्यग्र असते.
 म्हणूनच मला ‘पेज थ्री’ वर झळकण्याची कधी गरज वाटली नाही, तोंडावर खोटं-खोटं हसू आणणाऱ्या पाटर्य़ा कधी भावल्या नाहीत. किंबहुना मुखवटे घेऊन जगणाऱ्यांशी मला कधीच जमवून घेता आलं नाही. लोकांच्या मनात माझी अमुक छबी व्हावी म्हणून मी प्रयत्न केले नाहीत. मोहनच्या केसेसने मला कायम समाजातलं वास्तव डोळ्यापुढे ठेवत जमिनीवर राहायला मदतच केली. म्हणूनच आमची क्षेत्रं परस्परपूरक वाटतात मला. त्याच्या क्षेत्रात त्याला मिळणारा मान मला सुखावून जातो आणि माझ्या अभिनयाचं लोकांकडून होणाऱ्या कौतुकाचं त्याला अप्रूप वाटतं.
तरीही सुरुवातीच्या काळात मोहनच्या अतिकामाचा मला खूप त्रास व्हायचा. त्याला शांत बसणं माहीतच नाही. तो प्रचंड चळवळ्या आहे, कशात तरी गुंतलेला असतोच कायम. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही ऑफिसला जाऊन बसतो आणि एकदा का गेला की रोजच्यासारखा रात्री साडे नऊच्या आधी घरी येत नाही. पण यशावकाश याची सवय झाली मला आणि होणारा त्रासही निवळला. आम्ही कधीच कुठले हिशोब नात्यात मांडत बसलो नाही. समस्या आल्या, त्या शांत राहून सोडवल्या. राग धरणं सवयीचं होऊ दिलं नाही आणि मतभेद झालेच तर एकाने माघार घेत समजूतदारपणाचा मंत्र जपला. अहंकार आमच्यापेक्षा मोठे होऊ दिले नाहीत आणि गोष्टी धरून ठेवण्यापेक्षा ‘लेट गो’ करण्याचं कसब अंगी बाणवलं. तुटेपर्यंत ताणलं नाही आणि लपवून काही ठेवलं नाही, हेच आमच्या सहजीवनाची तीन तपापेक्षा जास्त काळ समाधानपूर्वक पूर्ण केल्याचं सार आहे असं मला वाटतं.
मोहन हाडाचा वकील आहे. पण आध्यात्मिक मार्गाचा वाटसरू झाल्यापासून व्यावसायिक व नैतिक मू्ल्यांची परीक्षा घेणारे अनेक प्रसंग आमच्या आयुष्यात आले, पण मोहनने योग्य वेळी योग्य मूल्याची निवड केली. मला आठवतं, आम्ही तेव्हा प्रार्थना समाजला राहायचो. त्यावेळी त्याच्याकडे एक बाई आल्या, मध्यमवयीन आणि बेताची परिस्थिती असणाऱ्या. मोहनची ख्याती ऐकून त्या आल्या होत्या. नवऱ्याकडून घटस्फोट हवा होता. पण तिचा नवरा बडी असामी होता. त्यामुळे कुणी वकील केस घेईना. मोहनने तिची केस घेतली. केस मागे घेण्यासाठी त्याला त्या काळी ९ लाख रुपये मिळणार होते. पण मोहनने ते नाकारले व त्या बाईंना घटस्फोट मिळवून दिला. त्यानंतर अक्षरश त्या बाईंनी त्याच्या पायावर डोकं ठेवलं. नंतरही कित्येक वर्षे त्या आमची आवर्जून भेट घ्यायच्या. या प्रसंगानं मोहन माझ्या नजरेत खूप मोठा झाला.
 ग्लॅमरच्या दुनियेत वावरत असले तरी माझी प्रसिद्धी कधीही मोहनच्या आणि माझ्या नात्यांमध्ये आली नाही. अहंकाराचा स्पर्शही विश्वासाने बांधल्या गेलेल्या नात्याला झाला नाही. मात्र आमचं नातं एका वेगळ्याच उंचीवर जाण्याला आमची आध्यात्मिक बैठकही कारणीभूत ठरली. ज्या वर्षी मी अभिनयाच्या क्षेत्रात आले त्याच वर्षी मी चेन्नईच्या ‘वननेस युनिव्हर्सिटीच्या आध्यात्मिक प्रबोधनाच्या सत्रांना जाऊ लागले. त्यानंतर आता गुरू दादाश्री यांचे मार्गदर्शन घेते आहे.
मला वाटतं, माणसाचं आयुष्य भीतीने ग्रासलेलं असतं. मृत्यूची भीती, नात्यांबद्दलची भीती, पैसा-यश-नोकरी अशा अनेक काळज्या माणसाचं मन अधिक अस्थिर करत असतात. मात्र या पलीकडे खरं आयुष्य आहे. राग-लोभ-मद-मत्सर अशा फुटकळ भावनांमध्ये माणूस अडकतो पण या गुंत्यातून पाय मोकळा ठेवणे हेच अवघड आहे. मानसिक शांती व समाधान यांचं स्थान आयुष्यात पशापेक्षाही पुढचं आहे, हे मी कळवळून सांगते. कदाचित यामुळेच मी आणि मोहन कधीच ‘टिपिकल’ नवरा-बायकोसारखे वागलो नाही. थोडय़ा-बहुत कुरबुरी आमच्याही संसारात होत्या, पण संकटं म्हणता येईल अशी परिस्थिती कधीच ओढवली नाही. आमच्या नात्याचा पाया प्रेमावर आधारलेला होताच, जोडीला आध्यात्मिक बठक लाभल्याने नात्याच्या आड येणारी नको ती आवरणे वेळीच गळून पडली व समृद्ध संगत-सोबत अनुभवत सहजीवन जगता आले.
साहजिकच आमच्या डायनिंग टेबलवर कायदेजगताच्या चर्चा खूप रंगतात. एखादी इंटरेस्टिंग केस, त्यातील घडामोडी यावर आम्ही खूप बोलतो, मुलंही हळूहळू या चर्चेत सहभागी व्हायला लागली. अर्चित तर जयकर घराण्याचा वकिलीचा वारसा पुढे नेतोय. धाकटा सिद्धार्थ व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये माहीर असून त्याचा गोरेगावला मोठा स्टुडिओ आहे.
आज मागे वळून पाहते तेव्हा जाणवतं, ठरवून मुलांना हेच कर, हे करू नको हे आम्ही कधी सांगितले नाही. घरात मोठी माणसं होती त्यांनी सांगितलं असेल तरच. पण मोहनमधला कणखर बाणा, बुद्धिमत्ता व दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा हे गुण दोन्ही मुलांमध्ये ठासून भरले आहेत. घरातली लॉ फर्म असतानाही मोहनने तेथे कधीच काम केले नाही. तो महत्त्वाकांक्षी आहे, विलक्षण बुद्धिमत्तेची देणगी लाभल्याने यथावकाश मान-सन्मान मिळत गेला त्याला. पण नावाजलेला सॉलिसिटर होण्यापूर्वीही त्याने जोडलेली माणसं माझ्यापेक्षा दुप्पटच होती. आम्ही दोघं अनेकांना मदत करतो, पण शक्यतो ते बोलून दाखवत नाही. अनेक आजारी लोकांना ‘हिलिंग’ करण्यासाठी वेळात वेळ काढून जातो. जेवढं होऊ शकेल तितकं दुसऱ्यांना देण्यात आम्हा दोघांनाही आनंद मिळतो. आमचं संपूर्ण कुटुंबच आध्यात्मिक रंगात बुडाल्यानं कौटुंबिक सलोख्याची आगळी अनुभूती आम्ही अनुभवत आहोत.
मोहन रसिक आहे. कामानिमित्त कुठे बाहेर गेला की आवर्जून भेटवस्तू आणतो. त्याची पसंती तर अप्रतिम आहे. अर्चितच्या लग्नातही माझे दागिने त्यानेच डिझाइन केले होते, इतकी सौंदर्य दृष्टी जपणारा जोडीदार लाभणं हाही आयुष्यातला सुंदर योगायोग आहे. नुकताच नातीचा जन्म झालाय. त्यामुळे आनंदाच्या वेलीवर आणखी एक फूल उमललंय, त्याने आयुष्याला पूर्णत्व आल्याची भावना आहे. आणखी काय हवं असतं आयुष्याला!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2014 1:01 am

Web Title: actress and spiritual healer smita jaykar and her husband solicitor mohan jaykar 37 year of successful married life
Next Stories
1 प्राणायाम
2 आजची व्यग्र स्त्री आणि अपराध भाव
3 क्वीन ऑफ शार्लोट स्ट्रीट
Just Now!
X