News Flash

मी, रोहिणी.. : भूमिकांमधील नव्या ‘जागा’!

मी प्रयत्न करत होते, पण कधी चुकलंय, कधी बरोबर आहे, काही तो बोलला नाही.

रोहिणी हट्टंगडी – hattangadyrohini@gmail.com

करिअरच्या सुरुवातीला करायला मिळालेल्या नाटकांमध्ये मला नवीन प्रयोग करण्याची संधी मिळाली. आव्हानात्मक प्रसंग साकारताना आणि दिग्दर्शकाशी चर्चा करत आपल्या विचारांना चालना देताना त्या भूमिके तल्या अनेक नवीन जागा सापडत जातात. जयदेव हट्टंगडी दिग्दर्शित ‘चांगुणा’ आणि ‘मेडिया’ या मी काम    के लेल्या नाटकांच्या बाबतीतही असंच झालं. परिणामांबद्दल आधीच अंदाज न बांधता प्रसंगानुरूप वेगळं काही करण्याचा प्रयत्न गरजेचा, हे अंगवळणी पडत गेलं. आजही अभिनय करताना ही सवय मला उपयोगी पडते.  

‘रा.ना.वि.’मधून (राष्ट्रीय नाटय़ विद्यालय) परत आल्यावर लगेच काम मिळणार नाही हे गृहीतच होतं. आमच्या आधी आलेल्यांनाही स्वत:ला ‘एस्टॅब्लिश’ करायला खूप धडपड करावी लागत होती. ‘शिकून आलात. बरं मग?’ असा एक छुपा सवाल जाणवत असेच! असो. तर, अशा वेळी एक अख्खं नाटक तुमच्या पदरात पडणं, हे भाग्य किती जणांनी अनुभवलं असेल? तेच नेमकं जयदेवच्या ( हट्टंगडी) आणि पर्यायानं माझ्या नशिबात आलं.

जयदेव आणि मी, ‘रा.ना.वि.’मध्ये एकाच बॅचचे. एकत्रच बाहेर पडलो. तो मुंबईला आणि मी पुण्याला. मुंबईत आल्यावर सुलभाताई (देशपांडे) आणि अरविंद देशपांडे यांनी आपल्या ‘आविष्कार’ संस्थेसाठी आरती हवालदार यांनी रूपांतरित केलेलं ‘चांगुणा’ नाटक करतोस का, असं जयदेवला विचारलं. एक नाटक असं ‘फुल बॅकिंग’नं करायला मिळणं! ‘चांगुणा’ हे मूळ फ्रेडरिक गार्सिया लॉर्का या स्पॅनिश लेखकाच्या (खरं तर कवीच तो) नाटक ‘यरमा’चं  रूपांतर. मूळ नाटक आम्ही वाचलंच होतं. सुलभाताईंना सांगून जयदेवनं मला फोन केला, ‘‘मुंबईत येऊन नाटक करशील का?’’ मला पर्वणीच. दादरला काकांकडे राहून काम करायची घरून परवानगी मिळाली आणि तालमी सुरू झाल्या.

मुख्य भूमिकांसाठी सतीश पुळेकर, देवीदास फेणाणी, खरे बाई, शरयू भोपटकर वगैरे नक्की झाले; पण नाटकात पाणवठय़ावरच्या, जत्रेच्या, जारणमारण करणाऱ्या व्यक्तींच्या प्रसंगांसाठी खूप बायका लागणार होत्या. त्या कुठून आणणार? तालमी रोज संध्याकाळी साडेसहानंतर. म्हणजे बायांसाठी कुटुंबीयांच्या दृष्टीनं अगदीच मोक्याची वेळ. सुलभाताईंनी तोडगा काढला, ‘‘प्रयत्न तर करू!’’ म्हणाल्या. आम्ही तिघं मिळून महिला मंडळाच्या वाऱ्या करू लागलो, त्यांच्या सभांमध्ये जाऊन कोणाला नाटकात काम करण्याची इच्छा आहे का विचारायला. करता करता चार-पाच जणी मिळाल्या. तरी कमीच पडत होत्या. शेवटी काकडे काकू  (अरुण काकडेंच्या पत्नी), नानी कामेरकर (सुलभाताईंच्या काकू) अशा घरच्या लोकांना अक्षरश: ‘उभं’ केलं. जत्रेच्या प्रसंगात एक नाच होता, म्हणजे अगदी ‘प्रिमिटिव्ह’ वाटेल असा. तो करायला शेवटी काकडेकाका आणि प्रतिमा कुलकर्णी तयार झाले. काय एकेक आठवणी!

‘चांगुणा’ ही एका मातृत्वाला आसुसलेल्या बाईची गोष्ट, चांगुणाची, पण नवरा मात्र सदासर्वकाळ शेतात रमलेला. बायकोकडे जराही लक्ष नसलेला. म्हाताऱ्या आजी तिला आडवळणानं मूल व्हायचा मंत्र देतात, तो ती झिडकारते. बालपणीच्या मित्राबद्दल वाटणारी ओढसुद्धा नाकारते. ‘मूल फक्त नवऱ्याकडूनच, नाही तर ते पाप’ या श्रद्धेमध्ये असणाऱ्या या बाईला नवरा दारूच्या नशेत सांगतो, की त्याला मुलं होऊ देण्यात स्वारस्य नाही. तेव्हा त्या निराशेच्या एका क्षणी झपाटल्यासारखी ती त्याचा गळा दाबून प्राण घेते आणि नंतर टाहो फोडते, ‘‘मी स्वत:च मारलं माझ्या पोराला.. नख लावलं त्याच्या चिमण्या जीवाला. आता तो कधीच यायचा नाही!’’ रूढींची बळी असलेली ही शोकांतिका! गोष्ट छोटय़ा खेडेगावातली. जयदेवनं प्लॅटफॉम्र्स वापरून सेट उभा केला होता. बायकांचा धोबीघाटाच्या प्रसंगासाठी ज्या पायऱ्या वापरल्या होत्या, त्याच नंतर जत्रेच्या सीनला होत्या. चांगुणाचं घर आणि जारणमारण करणाऱ्या बाईचं घर, यालाही प्लॅटफॉम्र्स. एखादी ‘डोअर फ्रेम’ आणि छोटं कुंपण. सगळं गेरूच्या रंगात; तिच्या आयुष्यातला ओसाडपणा, रखरखीतपणा जाणवून देणारं.

‘‘तुझं आंगडं टोपडं, राजा करिते मी धुणं, व्हडा व्हाईल झुळझुळा, सोन्या तुझंच हसणं!’अशा हळुवार ओवीनं नाटक सुरू व्हायचं. चांगुणाची मैत्रीण पोटुशी असते. चांगुणा तिला ‘‘कसं वाटतं गं?’’ विचारते. तेव्हा ती ‘‘जितं पाखरू वंजळीत धरल्यागत वाटतंय बग,’’ असं उत्तर देते. मला ते वाक्य खूप भावलं होतं! लोर्का कवीच ना. मला आठवतंय, मी खरंच कोंबडीचं छोटं पिल्लू बंद ओंजळीत हळुवार पकडून पाहिलं होतं. त्याचा मऊ मऊ स्पर्श, धडधड अनुभवली. खरंच करून बघा! वेगळंच काही तरी जाणवेल. अशा हळुवारपणे उलगडत जाणाऱ्या गोष्टीचा शेवट शोकांतिकेत होतो. टाहो फोडणारी चांगुणा लक्षात राहाण्यासारखं दृश्य जयदेवला अभिप्रेत होतं. त्याने मला शेवटच्या वाक्यानंतर गुडघ्यावर बसून, आकाशाकडे तोंड करून विलाप करत, एक हात डोळ्यांवर आडवा ठेवून काही क्षण आवाजसुद्धा न करता स्तब्ध राहायला सांगितलं आणि नंतर खाली कोसळ म्हणाला. मी हे करत तर होते, पण तरी काही तरी राहून जातंय असं वाटत होतं. शेवटी तो म्हणाला, ‘‘तू एम. एफ. हुसेन यांचं पेंटिंग पाहिलं आहेस ना? घोडय़ांचं? ‘अ‍ॅगनी’ नावाचं? ‘आ’ वासून घोडे खिंकाळतायत. तसा मूकविलाप मला हवा आहे.’’ मग ते सर्व करणं मला सोपं गेलं.

त्यानंतर चार-पाच वर्षांनी जयदेवबरोबर ‘मेडिया’ या ग्रीक नाटकात काम केलं. हेही ‘आविष्कार’चं नाटक. मी ‘गांधी’ चित्रपटाचं चित्रीकरण संपवून आले आणि हे नाटक करायचं ठरवलं. भाषांतर होतं सदानंद रेगे यांचं. त्यांनी भाषाही जरा अवघड ठेवलेली, म्हणजे बोली भाषा नव्हती वापरली. ग्रीक नाटकं आपल्या संस्कृत नाटकांसारखी पुरातन. खुल्या रंगमंचावर त्याचे खेळ व्हायचे. म्हणजे टेकडीवर प्रेक्षक बसायचे आणि पायथ्याशी नाटक! गोल आखून त्या मधोमध एक उंचवटा- ‘आल्टर’. त्याभोवती नटांच्या हालचाली. शक्यतो नदी किंवा समुद्र नटांच्या पाठीकडे असायचा, जेणेकरून वाऱ्याबरोबर शब्द ऐकू यायचे. आता या खुल्या रंगमंचाचा नाटकांच्या प्रस्तुतीकरणावरही परिणाम होणारच. नाटकं ते ध्यानात ठेवून लिहिली जायची. सीन्स दोन जणांत असायचे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ‘कोरस’- समूह. हा समूह नाटक पुढे नेणार- कधी भाष्य करणार, कधी एक पात्र म्हणूनही मुख्य पात्राशी संवाद साधणार. टेकडीच्या उतारावर बसलेल्या माणसांना       नट-नटय़ा मंडळी खूप छोटी दिसत. म्हणून पोशाखाबरोबरच अभिनेते मुखवटे घालत. ही झाली ग्रीक नाटकाची पार्श्वभूमी. अर्थात आम्ही नाटक केलं ते दादरच्या ‘छबिलदास’मध्ये. बंदिस्त नाटय़गृहात. वरच्यापैकी आम्ही काहीच अनुभवणार नव्हतो. ते फक्त एक नाटकच होतं. कोरस अतिशय महत्त्वाचा. नाटक मेडिया या राजकन्येचं. तिचा नवरा दुसऱ्या एका राजकन्येशी लग्न करणार असतो. तिला जेव्हा हे कळतं, तेव्हा आपण फसवले गेलो आहोत या जाणिवेनं ती संतप्त होते. वरकरणी त्या राजकन्येला ती नजराणा पाठवते. अंगरखा आणि मुकुट; पण तो घालता क्षणीच त्या दुसऱ्या राजकन्येच्या अंगाची लाहीलाही होते आणि तो काटेरी मुकुट तिला टोचून टोचून रक्तबंबाळ करतो. त्यात तिचा अंत होतो. असा सूड उगवल्यानंतर मेडिया देश सोडून जाताना आपल्या दोन मुलांचीही नवऱ्यावर सूड म्हणून हत्या करते. माझ्यामागे मुलांना इथे नीट वागवलं जाणार नाही, असं तिला वाटत असतं. ‘अ वूमन स्कॉर्नड् इन लव्ह इज डेंजरस वूमन’ याचा प्रत्यय येतो. अशी ही शोकांतिका.

नाटकात सर्वाचे पोशाख पायघोळ अंगरखे होते. ‘कोरस’ला गडद तपकिरी, मेडियाला केशरी आणि जांभळा. बाकी सर्वाना असेच चॉकलेटी छटेमधले रंग. रंगमंचावर पसरट ‘एम’सारखा प्लॅटफॉर्म, बाजूला पायऱ्या, मध्यभागी दाराची चौकट, राजवाडय़ातून येणाऱ्यांसाठी. कोरसच्या हातात लांब काठय़ा. त्यांच्या हालचालीसुद्धा नीट बेतलेल्या. रंगमंचावर पात्रं अशी दोनच. संवाद फार कमी. जे काही होतं ते अधिक करून स्वगतासारखं. नाटकात आशा दंडवते (टीचर), अजित भुरे (मेडियाचा पती), प्रभाकर कर्ले (क्रेयॉन, राजकन्येचे वडील) मुख्य भूमिकांमध्ये होते. कोरस आठ स्त्रियांचा होता. संगीत असं नव्हतं, पण परिणाम साधण्यासाठी दाक्षिणात्य तालवाद्य ‘चंडा’चा उपयोग केला होता. हे तालवाद्य कथकलीमध्ये वापरतात. केरळमध्ये चित्रीकरणाला गेले असताना ऐकलं आहे मी. गुरुवायूर मंदिरात संध्याकाळी दीड-दोन तास दहा-बारा वादक वाजवायचे, सेवा म्हणून. माहोल जमायचा. आमच्या नाटकात या वाद्याचा सर्वात जास्त उपयोग आणि परिणाम झाला तो प्रसंग म्हणजे राजकन्येला नजराणा देऊन आल्यानंतर सेवक, त्या राजकन्येला कसा त्रास झाला त्याचं वर्णन करतो त्यावेळी. या सीनमध्ये सेवक बोलत असतो आणि मी- म्हणजे मेडिया ऐकत असते. हा सीन आणखी परिणामकारक करण्यासाठी जयदेवनं मला सांगितलं, की तू या सेवकाच्या निवेदनपर भाषणावर अभिनय करायचास, की जेणेकरून राजकन्येचा मुकुट आणि अंगरखा घातल्यानंतरच्या वेदना आणि मेडियाचा आसुरी आनंद दोन्ही प्रेक्षकांना दिसलं पाहिजे! अरे देवा.. हे कसं जमणार? माझ्या मनातलं जयदेव माझ्या चेहऱ्यावरूनच ओळखायचा. ‘‘हे चॅलेंज समज. कर इम्प्रोवाइज. कथकली नृत्य शिकलीयेस ना!’’ अशी ‘हिंट’ त्यानं दिली. मी प्रयत्न करत होते, पण कधी चुकलंय, कधी बरोबर आहे, काही तो बोलला नाही. त्या प्रसंगात तो स्वत: चंडा वाजवायचा माझ्या हालचालींकडे बघत. कल्पना करा, ग्रीक नाटकात चंडा! पण हळूहळू त्यात मजा यायला लागली. दर प्रयोगात वेगवेगळ्या जागा मिळायला लागल्या. छान व्हायचा प्रयोग!

दिग्दर्शक म्हणून जयदेवनं माझ्यावर विश्वास ठेवला. नट म्हणून मीही त्यानं जे सांगितलं ते करायचा प्रयत्न केला. प्रश्न नाही विचारले. जर हा प्रयोग अयशस्वी झाला असता, तर तो काढून टाकायचा पर्याय होताच ना; पण केलंच नसतं तर? म्हणून बहुतेक मी कोणत्याही दिग्दर्शकाबरोबर काम करताना आधी त्यानं सांगितल्याप्रमाणे करून बघते, प्रयत्न करते आणि नाहीच पटलं, तर माझी बाजू सांगायचा प्रयत्न करते. पटलं तर ठीक. नाही तर तुम्ही म्हणाल तसं!

शेवटी ती कलाकृती महत्त्वाची. ती चांगली उभी राहिली तर तुम्ही दिसणार ना? प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं. त्यासाठीच तर आम्ही मेहनत करतो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:31 am

Web Title: actress rohini hattangadi speaks about performance in drama zws 70
Next Stories
1 वसुंधरेच्या लेकी  : व्यक्तीपासून अभिव्यक्तीपर्यंत..
2 लिंगाधारित तफावत वाढतीच
3 समानतेसाठी  जाणीवपूर्वक प्रयत्न हवेत
Just Now!
X