रोहिणी हट्टंगडी hattangadyrohini@gmail.com

‘‘माझ्या अगदी सुरुवातीच्या नाटकांमध्ये ‘मित्राची गोष्ट’ हे विजय तेंडुलकरांचं धाडसी नाटक मला करायला मिळालं. नाटकाचा विषय होता समलैंगिकता. ४० वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलेली ही गोष्ट साकारण्यासाठी मला ‘मित्रा’ सापडणं गरजेचं होतं. मी सुमित्रा -मित्रा या व्यक्तिरेखेच्या मनाचा तळ शोधू लागले. आणि एकदा रेल्वे प्रवासात भेटलेल्या तृतीयपंथीयामुळे तिला काय वाटत असलं पाहिजे हे समजून घेता आलंही. पण या नाटकाचा शेवट.. तो तसाच असणं अपरिहार्य होतं?..’’ 

happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

‘मेडिया’ नाटकाच्या आगेमागेच, नव्हे त्या आधीच आणखी एक चांगलं नाटक करण्याचा योग आला. विनय आपटेचा फोन आला, ‘‘रोहिणी, मस्त नाटक हातात पडलंय.. तेंडुलकरांचं! नवीन! आणि त्यात काम करायला मला तू हवी आहेस.’’

ओहो! तेंडुलकरांचं नवीन नाटक.. मी उडीच मारली! म्हणाले, ‘‘म्हणजे काय?.. नक्कीच!’’

‘गांधी’ चित्रपट पूर्ण करून मी नुकतीच परदेशातून परत आले होते आणि जयदेवची (जयदेव हट्टंगडी) ‘मेडिया’ साठीची सुरुवातीची जुळवाजुळव चालू होती. त्याला जरा वेळ लागणार होता. म्हटलं, ‘‘चालेल. करता येईल.’’ पण दोन दिवसांतच परत विनयचा फोन आला, ‘‘सॉरी रोहिणी, अगं तेंडुलकर म्हणाले, तू प्रियाला (प्रिया तेंडुलकर) घेऊन हे नाटक कर. आता तेच म्हणताहेत तर..’’ मी म्हटलं, ‘‘अरे तुला तेंडुलकरांचं नवीन नाटक करायला मिळतंय ना? आपण नंतर कधीतरी एकत्र काम करू.’’ जरा वाईट वाटलं. चांगली संधी हुकली असं वाटलं. पण म्हणतात ना, नशिबात असेल तर.. पंधरा दिवसांत विनयचा पुन्हा फोन आला, ‘‘रोहिणी, ग्रीन सिग्नल! तेंडुलकर तालमीला आले होते. त्यांनीच सांगितलं, रोहिणीलाच घेऊन कर नाटक.’’ आणि लगेच आमच्या तालमी सुरूही झाल्या. मंगेश कुलकर्णी, सतीश पुळेकर, उज्ज्वला (लाली) जोग, विनय स्वत: आणि मी. नाटकाचा विषय अगदी वेगळा, जरा धाडसीच म्हणा ना! त्या वेळी तो धाडसीच म्हणायचा.. कारण ही १९८१ ची गोष्ट आहे. चाळीस वर्षांपूर्वी आम्ही हे नाटक केलं. समलिंगी आकर्षण. ‘लेस्बियन’ असलेल्या मुलीची गोष्ट. सुमित्राची.. मित्राची. ‘मित्राची गोष्ट’ हेच नाटकाचं नाव. शबाना आझमीचा ‘फायर’ चित्रपट आला, त्याच्या किती तरी आधी हा विषय मराठी नाटकात आला! नंतर कळलं, हे नाटक तेंडुलकरांच्याकडे सहा-सात वर्ष लिहून तयार होतं. म्हणजे बघा! तेंडुलकर खऱ्या अर्थानं काळाच्या पुढचे लेखक होते. आणि त्यांनी हे नव्या पिढीला करायला दिलं होतं.

विनयला नाटक व्यावसायिक करायचं होतं. पण असा विषय व्यावसायिक रंगभूमीवर चालणार का? लोक त्याला म्हणत, ‘का

उगाच खिशाला खड्डा पाडून घेतोयस?’ तरी विनयचा हट्टच होता! तालमी चालू झाल्या. सुरुवातीला आमच्या हातात एकच अंक होता. तेंडुलकरांनी विनयला सांगितलं होतं, ‘‘पहिला अंक मी पाहीन. आवडला, बरा वाटला, तर दुसरा हातात देईन.’’ तिशीतले आम्ही, तसे ‘स्ट्रगलर्स’. असा विषय हाताळणं आम्हाला जमतंय का, याविषयी तेंडुलकरांनी साशंक असणं स्वाभाविक होतं. असो.

तर सगळ्यात आधी समलैंगिकतेवर थोडं वाचन करणं जरुरीचं होतं. फार खोलात नाही, पण काय आहे हे तरी जाणून घ्यायला हवं. त्याचे प्रकार दोन. एक नैसर्गिक आणि दुसरं लादलेलं. लादलेलं हे परिस्थितीमुळे.. उदाहरणार्थ, तुरुंगात, जिथे ‘पार्टनर्स’ मिळत नाहीत अशा ठिकाणी. ‘उंबरठा’ या चित्रपटात अशा प्रकारचं एक दृश्य आहे. तर, या नाटकातली मित्रा, म्हणजे सुमित्रा, ही पहिल्या प्रकारातली. तसं नाटकात ते येतंच एका दृश्यात, जेव्हा ती स्वत:बद्दल बोलते, की पुरुषाबद्दल मला आकर्षण नाही वाटत. आपण काही वेगळ्या आहोत हे समजल्यानंतरची तिची सगळी घुसमट या नाटकात दाखवली आहे. त्याचबरोबर तिच्याविषयी सहानुभूती असणारा, तिला समजून घेणारा तिच्या कॉलेजातला बापू (मंगेश कुलकर्णी)( या दोघांचं शब्दातीत नातं नाटकात सुंदर उभं केलं आहे.) तिरस्कार करणारा मन्या (नमाचा बॉयफ्रें ड- सतीश पुळेकर), ‘मित्राच्या सान्निध्यात सुरक्षित वाटतं’ असं सांगणारी नमा (उज्ज्वला जोग) आणि मित्राकडे ती ‘वेगळी’ आहे हे कळेपर्यंत आकर्षित झालेला बापूचा

मित्र (विनय आपटे). अशा ‘वेगळ्या’ लोकांविषयी असणारा समाजाचा दृष्टिकोन, त्यांना समजून घेणारी माणसं, सहानुभूती असणारी माणसं, अशा कितीतरी गोष्टींना तेंडुलकरांनी स्पर्श केला आहे.

चांगले नाटककार व्यक्तिरेखा अशा काही रेखाटतात ना, की नाटकाच्या पलीकडे तुम्हाला फार अभ्यासाची गरजच नसते. यावरून राष्ट्रीय नाटय़ विद्यालयामधली (एन.एस.डी.) एक गंमत सांगते. दुसऱ्या वर्षांत असताना आम्हाला वर्गात ‘एक्सरसाइज’ म्हणून ज्यां पॉल सार्त् या नाटककाराचं ‘नो एक्झिट’ हे नाटक करायला सांगितलं. दिग्दर्शक आमचीच वर्गमैत्रीण. सार्त् हा मोठा तत्त्वज्ञ आणि त्यानं लिहिलेलं नाटक. म्हणजे त्याचं तत्त्वज्ञान माहीत असायला हवं. झालं. आमचा अभ्यास सुरू. तीन-चार दिवस गेले, पण डोक्यात काही उतरेच ना. एकमेकांत चर्चा करताना लक्षात आलं, म्हटलं, त्यानं नाटकात काय म्हटलं आहे ते बघू या ना! आपला मुद्दा मांडण्यासाठीच नाटक लिहिलं असेल ना त्यानं! तोच मुद्दा आपल्याला समजला की झालं. आपल्याला नाटक करायचं आहे. पीएच.डी. नाही मिळवायची!(हाहाहा!) अर्थात, एखाद्या गोष्टीचा अभ्यास असणं वाईट नाही. पण नाटक करताना अभ्यासातच गुंतून राहाणंही बरोबर नाही.

तर.. ‘मित्रा’ करताना तिचं वागणं, बोलणं, दिसणं, पेहराव सगळ्याच गोष्टी विचारपूर्वक करायला लागणार होत्या. आता आपल्याला पॅन्ट-शर्ट घालणाऱ्या मुलींबद्दल काही वेगळं वाटत नाही. पण नाटकाची पार्श्वभूमी, म्हणजे नाटकातला पुण्याचा उल्लेख, बापूच्या मित्राला ती ‘लेस्बियन’ आहे असं कळल्यावर तो लढाईवर निघून गेल्याचा उल्लेख, यावरून नाटकाचा काळ वगैरे.. याचा विचार केला तर मित्रानं शर्ट-पॅन्ट घालणंच काय, तिच्या केसांचा ‘बॉबकट’ही असणं शक्य नव्हतं. तेव्हा तिला बंद गळ्याचे ब्लाउज, साडी, केसांची घट्ट वेणी द्यायची असं ठरलं आणि हातात सिगारेट! मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला! दिसायला नेमकं दिसणार होतं खरं, पण स्टेजवर करायला मला लागणार होतं. ‘‘रोहिणी, तू सिगारेट पिणारी वाटली पाहिजेस. मला नुसतं ‘धुराडं’ नकोय!’’ विनयचा आग्रह! ‘‘तालमीत रोज एक याप्रमाणे तू सिगरेट पेटवायची. स्टेजवर हात थरथरता कामा नयेत.’’ मग काय?.. शिकले! व्यवस्थित सिगारेट पिणारी वाटू लागले. त्यानंतर एकदा विनय म्हणाला, ‘‘रोहिणी, तू वाटते आहेस सिगरेट पिणारी. आता एक आणखी ट्राय कर. धूर तोंडात ठेवून बोल. म्हणजे कसं, बोलताना फकफक करून धूर बाहेर येतो ना तसं. एकदम अट्टल वाटशील! कर ना!..’’ म्हटलं,

‘‘हद्द झाली विनय तुझी! अरे कोणाच्या एवढं लक्षात येणार आहे?’’ पहिल्या दोन लाइन्समधल्या लोकांना दिसलं तरी पुरे आहे!, असा त्याचा आग्रह. नाही नाही म्हणता ‘चॅलेंज’च दिलं. हुकमी. मग काय? घेतलं!.. आणि करून दाखवलं!

आमच्या तालमी विलेपाल्र्याला चालायच्या. ‘टिळक’ला. रात्री नऊला. मी दादरहून लोकल पकडून जायची. पूर्वेला उतरून ‘टिळक’मध्ये चालत जायची. (तेव्हापासून ते भाजी मार्केट खुणावायचं. अजूनही खुणावतं. ‘दीनानाथ’ला जाते ना.) रात्री मंगेश दादपर्यंत असायचा. जयदेव वडाळ्याहून येऊन तिथे मला पिकअप करायचा. तर, सांगायची गोष्ट अशी, की त्या प्रवासातच एक असा प्रसंग घडला, की ‘मित्रा’ मला जरा जास्त उमगली. झालं असं, त्या वेळी लोकलमध्ये रात्री आठनंतर एवढी गर्दी नसायची. ‘गांधी’ चित्रपट तयार झाला होता, पण अद्याप  प्रदर्शित झाला नव्हता. मी आरामात बस, ट्रेनमधून जाऊ शकत होते. गर्दी नसल्यामुळे मला आवडायचं तसं मी दारात उभं राहून प्रवास करू शकत होते. असंच एक दिवस एक तृतीयपंथी चढला. त्यानं ‘लेडीज’मध्ये चढणं, तेही गर्दी नसताना, तसं आक्षेपार्ह नव्हतं. माझ्यासमोरच पलीकडे उभा राहिला टेकून. पुढच्या स्टेशनला गाडी थांबली. काही बायका उतरल्या, काही डब्यात चढल्या. पण चढताना एका विशिष्ट नजरेनं त्याला बघून पुढे जात होत्या. ती नजर मी पाहात होते. पुढच्या स्टेशनवरही तेच. मला त्या नजरांनी खूप काही जाणवून दिलं. मी मित्राची भूमिका करत होते त्याचे विचार मनात होते म्हणून का? खरं तर ‘लेस्बियन’ आणि तृतीयपंथी वेगळे. पण त्यांच्यात काही साम्य असेल तर ते त्यांच्या वेगळेपणाचं, जे फारसं स्वीकारलं जात नाही. कमीपणा वाटतो त्यात. नाटकातल्या मन्याचं ‘मित्रा’शी वागणंसुद्धा तसंच. ‘‘तुमच्यासारख्या लोकांना चौकात उभं करून चाबकाने फटके द्यायला हवेत,’’ असं म्हणणारा. आपलं वेगळेपण जाणणारी आणि स्वीकारणारी मित्रा.. त्या बायकांची ती नजर.. त्या माझ्याकडे रोखून पाहात आहेत अशी नुसती कल्पनाही शहारे आणणारी होती. अचानक त्या समोरच्याशी माझी दृष्टीभेट झाली. माझे त्याच्याकडेच बघत विचार चालले होते. माझ्या नजरेत त्याला काय दिसलं माहीत नाही, पण त्यानं माझ्याकडे पाहून हलकं स्मित केल्यासारखं मला वाटलं. मीही बहुतेक केलं असावं. तितक्यात गाडी सुटता सुटता तो उतरून निघूनही गेला. असा एखादाच प्रसंग, अनुभव तुम्हाला खूप देऊन जातो. तुमच्या जगण्याच्या चाकोरीमधून ओढून बाहेर काढतो, माणूस बघायला शिकवतो. अर्थात, त्यासाठी कलाकारच असणं जरूर नसतं. संवेदनशील माणूस असावं लागतं!

नमा आणि मित्राला एकत्र पाहून मन्या भडकून तिला अद्वातद्वा बोलून गेल्यानंतर हिंस्र पशूसारखी भडकलेली आणि त्या उद्विग्नतेत स्वत:ला इजा करून घेणारी मित्रा, नमाचं लग्न ठरलंय कळल्यावर बापूच्या विनवण्यांना न जुमानता तिच्या पाठीमागे वेडय़ासारखी कोलकात्याला जाणारी मित्रा, बापूजवळ हातचं काही राखून न ठेवता मन मोकळं करणारी मित्रा. अशा मित्राचं शेवटी परिस्थितीशी न झगडता शरण जाणं हेलावून टाकतं.  ‘‘असं, तर असं!’’  म्हणत, गॉडी मेकअप करून कोणाबरोबरही ती जाते. बापूशीही संबंध तोडते. पण शेवटच्या स्वगतात ‘बापू माझी आई होता,’ असंही म्हणते!

नाटकाच्या सुरुवातीपासून एकटा बापू प्रेक्षकांशी बोलतो, निवेदकाचं काम करतो. मित्रा आणि प्रेक्षकां- मधला दुवाच तो. नाटकाच्या शेवटी बापूला त्याचा परत आलेला मित्र अतिशय ‘कॅज्युअली’ ‘‘तुझ्या त्या मित्राने आत्महत्या केली,’’ अशी बातमी सांगतो तेव्हा बापू स्तब्ध होतो. खाली मान घालून बसून राहातो आणि नाटक संपतं!

नाटकाचा शेवट तेंडुलकरांनी असा का केला असावा? अखेर एकदा त्यांना ते विचारलंच.. ‘‘मित्राला नाटकाच्या शेवटी का मारलीत?’’ त्यांनी उत्तर दिलं, ‘‘मी नाही मारली.. ती मेली!’’ त्या काळात असं असणं हे सर्वमान्य नव्हतं, किंबहुना ही विकृती मानली जात होती. अर्थात, आताही काही फार वेगळी परिस्थिती नाहीये म्हणा.. पण निदान हा विषय बोलला तरी जातो, चर्चा होतात, राजरोस नाती स्वीकृतही असतात! पण नाटकात साकारलेल्या पन्नासच्या दशकात काय भवितव्य असणार होतं मित्राचं?..