रोहिणी हट्टंगडी

‘गांधी’ चित्रपटाचं चित्रीकरण संपलं. पुढे हिंदीत डबिंग, चित्रपटाचा परदेशातला प्रीमियर आणि पुरस्कार सोहळा.. मिळालेली ‘अतिमहत्त्वाच्या’ पाहुण्यांसारखी वागणूक.. सारं काही विस्मयचकित करणारं, अविस्मरणीय! नामवंत अभिनेते असोत की प्रिन्स चार्ल्स, लेडी डायनाचं भेटणं, त्यांची शाबासकी सारं काही स्वप्नवत. हुरळून जायला लावणारं. त्याच वेळी बाबांचे उद्गार मात्र कायम जमिनीवर राहायला भाग पाडणारे..

‘गांधी’ चित्रपट माझ्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा आहे, की त्याबद्दल किती लिहू आणि किती नाही असं होऊन जातं! अर्थात फक्त हाच चित्रपट असं नाही, पण रंगमंच, चित्रपट, दूरचित्रवाणी, यात काम करताना आयुष्यात काय अनुभवलं, काय शिकले, याचा या लेखांच्या निमित्तानं आढावा घ्यायला मिळतोय. असो!

‘गांधी’मधल्या आणखी एका प्रसंगाविषयी लिहावंसं वाटतं. मागच्या लेखात मी समोरच्या माणसाच्या वेळेचा मान ठेवण्याविषयीचा उल्लेख केला होता. तसेच वेगळे अनुभव इतरही काही बाबतीत मला आले. चित्रपटातील आगाखान पॅलेसमधला प्रसंग. ‘बां’चं आजारपण बळावतं आणि त्या शेवटच्या घटका मोजताहेत तो प्रसंग. हा प्रसंग चित्रित करायचा होता त्याच्या दोन दिवस आधी रिचर्डनी (रिचर्ड अ‍ॅटनबरो) मला सांगितलं, ‘‘दोन दिवस तू फक्त पाणी-चहावर राहायचं. नो फू ड फॉर टू डेज!’’ माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून ते म्हणाले, ‘‘बांच्या मृत्यूचा सीन आहे. चेहरा मलूल दिसायला हवा आहे मला.’’ बेनलासुद्धा (बेन किं ग्जले) प्रत्येक उपोषणाच्या सीनला हेच करायला लागत होतं. सीनमध्ये मला तसं काहीच काम करायचं नव्हतं. नुसतं पलंगावर पडून राहायचं होतं, डोळे मिटून. थोडा जड श्वास! शॉट्स चालू झाले.. एक शॉट होता, जेव्हा गांधीजी पलंगाजवळ येतात, बांचा हात हातात घेऊन हळूच सांगतात, की माझी प्रार्थनेची वेळ झाली आहे. पण बा हात सोडत नाहीत. ते बघून गांधीजी त्यांच्याजवळच पलंगावर बसतात. हा प्रसंग चालू असताना, खरं तर अगदी सेटवर पाऊल ठेवल्यापासूनच बाहेरच्या पक्ष्यांच्या मधूनच येणाऱ्या आवाजाव्यतिरिक्त कोणताही आवाज कानावर येत नव्हता. सगळे गुपचूप आपलं काम करत होते. अगदी लाईट बॉईज, सेटवर सामान लावणारी माणसं, मेकअपमन, सगळे. रिचर्डसुद्धा सूचना फक्त ऐकणाऱ्यालाच ऐकू जातील अशा देत होते. गंभीर प्रसंगासाठी वातावरणही तसंच असेल तर अभिनेत्यांनाही मदतच होते एकाग्रतेनं काम करायला. कल्पना करा, इतक्या शांततेत मला डोळे मिटून फक्त पडून राहायचं होतं. गांधीजी बांच्या शेजारी बराच वेळ बसून आहेत, असा बेनचा क्लोज शॉट घेत होते. बेन काय करतोय, काय ‘एक्सप्रेशन्स’ देतोय ते बघण्याची माझी खूप इच्छा होत होती. पण सगळं एवढं ‘इंटेन्सली’ चालू होतं, की मी डोळे उघडले तर बेन डिस्टर्ब होईल अशी मला भीती वाटली आणि नाइलाजानं मी डोळे बंद ठेवले.. आणि तेवढय़ात माझा डोळा लागला असावा! अचानक काही आवाज होऊन मी डोळे उघडले आणि रिचर्डचा आवाज कानावर पडला,  कुजबुजल्यासारखा.. ‘‘रोहिणी, यू आर सपोज्ड टू बी डाईंग! क्लोज युअर आईज हनी!’’ म्हटलं, आता काय सांगू त्यांना माझी अवस्था! राहून राहून हा प्रसंग मला नेहमी आठवतो. आपल्याकडे आमच्या ‘सेट्स’वर तुमचा सीन भावनाप्रधान असू दे, की गंभीर असू दे.. सेटवर काम करणारे आरडाओरडा केल्याशिवाय कामच करू शकत नाहीत बहुतेक. किंवा आरडाओरडा केला तरच आपण काम केलं असं वाटतं की काय कोण जाणे! अर्थात, फक्त मीच नाही, पण ‘गांधी’ चित्रपटाच्या इतर भागांमध्ये काम करणारे अनेक जण त्यांच्या अनुभवांवरून खूप काही शिकले.

दिल्लीमध्ये आम्ही डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिने होतो. डिसेंबरमध्ये येणारा ख्रिसमस इंग्रजांसाठी मोठा सण, पण सुट्टी मात्र दोनच दिवसांची होती. ख्रिसमसच्या एक दिवस आधी माझ्याकडे एक ‘गिफ्ट’ आलं. उघडून पाहिलं तर कातडी फाईलसारखं कव्हर होतं, स्क्रिप्टला घालण्यासाठी. रिचर्डकडून होतं ते. त्यावर इंग्रजीमध्ये   ॅअठऊऌक  असं सोनेरी अक्षरांत ‘एम्बॉस’ केलं होतं. त्याखाली सन १९८०-८१ आणि उजव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यात माझी देवनागरीमधली स्वाक्षरी! आश्चर्यच वाटलं! (मी माझी स्वाक्षरी ‘गांधी’ चित्रपट सुरू असताना मुद्दाम देवनागरीत करण्याचं ठरवलं होतं. म्हटलं, या लोकांमध्ये वावरताना आपलं थोडं वेगळं! आपलं असं काहीतरी! लोक विचारायचे ‘‘इझ धिस हिंदी?’’ वगैरे. असो.) ते काळ्या रंगाचं कातडी कव्हर आणि त्यावर सोनेरी अक्षरातली माझी देवनागरीतली स्वाक्षरी पाहून म्हटलं, की ही यांनी कशी आणि कधी घेतली असेल? भारीच वाटलं! विचार केला, आपण काय द्यावं रिचर्डना? काही तरी वेगळं.. पण काय? सुचेना. चित्रपटाच्या निमित्तानं सूत कातताना एकदा विषय निघाला होता, हे लोक जे सूत काढतात नित्यनेमानं, त्याचं काय करतात? तेव्हा जे आम्हाला शिकवायला यायचे, ते म्हणाले होते, की खादी सदनात हे सूत घेतात आणि त्याची प्रत ठरवतात. ठराविक गुंडय़ा घेऊन त्याच्या बदल्यात कापड, पंचा असं काही देतात. मी ठरवलं. दोन महिन्यांत बऱ्याच गुंडय़ा सूत कातून झालं होतं. त्याच्या बऱ्यापैकी प्रतीच्या आठ-दहा गुंडय़ा निघाल्या. म्हटलं, याचं मला काय मिळेल?  त्यांनी सांगितलं फार तर एक हातरुमाल! म्हटलं, चालेल! मी कातलेल्या सुताचा आहे. त्याची किंमत नाही करता येणार! तो छान ‘गिफ्ट रॅप’ करून रिचर्डच्या हातात ठेवला. ‘मेरी ख्रिसमस’ म्हणून! त्यांनी लगेच उघडून पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं कौतुक आणि ‘‘थँक यू, माय डार्लिग!’’ असं म्हणत मला जवळ घेतलेलं अजूनही लक्षात आहे.

भारतातलं चित्रीकरण संपलं. आता एक आठवडा इंग्लंडमध्ये शूट असणार होतं. मलाही एका सीनसाठी जायचं होतं. साऊथ आफ्रिकेतला घराचा एक सेट तिथे स्टुडिओत लावला होता. शेवटच्या दिवशी खूप रिकामं रिकामं वाटत राहिलं. पंचवीस आठवडे एकत्र होतं सारं युनिट. नंतर परत चित्रपटाच्या ‘हिंदी डबिंग’साठी सर रिचर्ड मुंबईत आले. डबिंगला सहाय्य करण्यासाठी त्यांनी जयदेवला (जयदेव हट्टंगडी) विचारलं. जयदेव दिग्दर्शक, चित्रपट बनताना पाहिलेला आणि हिंदी-इंग्रजी दोन्ही भाषा चांगल्या जाणणारा. इंग्लिश अभिनेत्यांच्या भूमिका हिंदीत डब करायला हिंदीतले मोठमोठे कलाकार होते. संजीवकुमार, इफ्तेकार, सिमी गरेवालसारखे. गांधींचे सारे संवाद पंकज कपूरनं हिंदीत डब केले. त्याला पूर्ण चित्रपटासाठी एक आठवडा दिला होता, तर पठ्ठय़ानं पाच दिवसांत काम आटोपलं. बाकी आम्ही आमचंच डबिंग केलं.

हिंदी-इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित करायचा होता. चित्रपट तयार व्हायला सात-आठ महिने गेले होते. चित्रपटाचं ‘प्रीमिअर’ दिल्लीत होणार होतं. खरं तर प्रीमिअरचा आठवडाच! ३० नोव्हेंबर १९८२ ला दिल्लीत, २ डिसेंबर लंडन, नंतर न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, टोरांटो (कॅनडा). ११ तारखेला भारतात घरी होते. अशी वादळी टूर! दिल्लीच्या प्रिमिअरला तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, लंडनला प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना, लॉस एंजेलिसला अभिनेते डॅनी के हजर होते. सगळ्या ठिकाणी जयदेव आणि मी दोघेही होतो. बेनबरोबर त्याची बायको, सर रिचर्डबरोबर त्यांची बायको. सगळीकडे अर्थातच विमान प्रवास. लंडनहून न्यूयॉर्कला जाताना ‘काँकॉर्ड’ विमानातून! एरवी आठ तास लागणारा हा प्रवास, पण फक्त तीन तासात पोहोचलोही. आता ही विमानं बंद केली आहेत. तो अनुभव वेगळाच होता. प्रीमिअरच्या ठिकाणी पोहोचलो की उतरून विमानतळावरचे सोपस्कार लगेच व्हायचे. आम्ही ‘स्पेशल गेस्ट्स’ ना! सामानही मागून यायचं. लिमोझिन्स हजर असायच्या. आपापल्या गाडीत बसून हॉटेलवर पोहोचलो, की रिसेप्शनवर त्या दिवसाचा कार्यक्रम हातात पडायचा आणि हॉटेलच्या खोलीत नेलं जायचं. खोलीत फुलांचा मोठा बुके, चॉकलेट्स, वाईनची बाटली स्वागतासाठी असायची. पण वेळ कमीच मिळायचा. जेमतेम विश्रांती घेऊन संध्याकाळच्या प्रीमिअरच्या कार्यक्रमासाठी तयार व्हायला लागायचं. परत गाडय़ा वेळेवर हजर आम्हाला घेऊन जायला. तिथे ‘रेड कार्पेट’! चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मोठय़ा हॉटेलमध्ये स्वागत समारंभ. त्या-त्या शहरातल्या बडय़ा असामी, फिल्मी जगतातले लोक! लगेच दुसऱ्या दिवशी पुढचं शहर. केवळ अविस्मरणीय!

इंग्लंडचा ‘बाफ्टा’चा (ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्टस्) बक्षीस समारंभही असाच. जरा ‘वीकेंड’ला बाहेर जाऊन आल्यासारखा. मला नामांकन होतं म्हणून बोलावून घेतलं गेलं. शनिवारी मी आणि जयदेव पोहोचलो आणि रविवारी समारंभ. तेव्हा आपल्याकडे ही पद्धत नव्हती. बक्षिसं आधीच जाहीर व्हायची. फक्त ‘फिल्मफेअर’ होतं. त्यामुळे हे नवीनच होतं मला. रिचर्डनी विचारलं, की काय बोलणार आहेस ते ठरवलं आहेस का? जर अ‍ॅवॉर्ड मिळालं तर गोंधळून नको जायला. त्यातून इंग्रजीत बोलायला लागणार होतं. दोन-तीन वाक्यं ठरवली. त्यांनी माझ्याकडून म्हणवून घेतली! समारंभात मोठी-मोठी गोल टेबलं लावली होती दहा-दहा लोक बसतील अशी. त्यावर प्रत्येक चित्रपटाची टीम बसणार होती. ‘डिनर’ नंतर होणार होतं. अ‍ॅवॉर्ड समारंभाचं थेट प्रक्षेपण होणार होतं. आमचं टेबल आम्हाला दाखवलं. त्यावर आधीच आमची नावं लिहिली होती. इथेही सगळं पूर्वनियोजित! दहा-बारा कॅमेरे. त्यात चार-पाच जण कॅ मेरे हातात घेतलेले. तुमचं नामांकन झालेलं असेल तर तुमच्यासमोर कॅमेरा रोखून तयार. छातीतली धडधड वाढवणाराच तो प्रसंग. नामांकनांमध्ये माझं नाव घेतलं गेलं आणि नंतर ‘‘अँड अ‍ॅवॉर्ड गोज टू .. रोहिणी हट्टंगडी!’’ रॉबर्ट वॅग्नर या मोठय़ा कलाकाराच्या हस्ते मला अ‍ॅवॉर्ड मिळालं. हे अ‍ॅवॉर्ड विभागून होतं. मॉरीन स्टेपल्टन या एका ज्येष्ठ अभिनेत्रीबरोबर. बाजूला मोठा चौथरा बनवला होता, तिथे जाऊन अ‍ॅवॉर्ड घ्यायचं. ‘ऑस्कर’ला मात्र मला नामांकन नव्हतं.

‘बा’च्या भूमिकेसाठी मिळालेल्या दोन प्रतिक्रिया मला विसरताच येत नाहीत. प्रिन्स चार्ल्स लंडनच्या स्क्रिनिंगनंतर निघताना मागच्या रांगेतल्या माझ्याकडे वळून म्हणाले होते, ‘‘यू एज्ड ग्रेसफु ली. काँग्रॅच्युलेशन्स!’’ त्याच शोनंतरच्या डिनर पार्टीच्या वेळी ‘फिड्लर ऑन द रूफ’ चित्रपटात मुख्य भूमिका करणारा

के म टोपोल नावाचा नट- जो मला स्वत:ला खूप आवडतो, त्यानं आमच्या टेबलापाशी येऊन मला कॉम्लिमेंट दिली, ‘‘आय वॉझ ट्राईंग टू पिक फ्लॉज इन युअर परफॉर्मन्स. यू डिडंट डू इट!’’ एका कलाकाराकडून हे ऐकणं! आणखी काय हवं असतं?  या भूमिकेसाठी मला लाखोंनी प्रतिक्रिया मिळाल्या आजवर. पण माझ्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया मला नेहमी जमिनीवर ठेवते. निर्माते आणि नट मधुकर नाईक (‘कस्तुरीमृग’ या माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकात आम्ही एकत्र काम केलं होतं.) ‘गांधी’नंतर एकदा बाबांकडे त्यातल्या माझ्या कामाचं खूप कौतुक करत होते. बाबांनी शांतपणे ऐकलं आणि हसून त्यांना म्हणाले, ‘‘ठीक आहे, चांगलं करते ती काम!’’ नाईकांनी मला हे जेव्हा सांगितलं तेव्हा विचार आला, हुरळून न जाता आपल्या मुलीनं आणखी चांगली कामं करावीत असंच वाटलं असेल ना त्यांना?..

whattangadyrohini@gmail.com