रोहिणी हट्टंगडी hattangadyrohini@gmail.com

‘‘ज्येष्ठ आणि नावाजलेल्या अभिनेत्यांबरोबर काम करायला मिळणं ही नव्या कलाकारासाठी पर्वणी असते. मला माझं पहिलं व्यावसायिक नाटक ‘कस्तुरीमृग’ डॉ. श्रीराम लागूंबरोबर करायला मिळालं. त्यांचं अभिनय आणि दिग्दर्शनातील कसब, रंगमंचावर असताना आजूबाजूला काहीही घडलं तरी विचलित न होणं, हे थक्क व्हावं असंच होतं. नाटकातले लहान-लहान तपशीलही कसे महत्त्वाचे असतात, हे डॉक्टरांनी दाखवलं. त्यांच्याशी झालेल्या ओळखीतून पुढे मला एका अगदी वेगळ्या उपक्रमातही सहभागी होता आलं. तो उपक्रम म्हणजे ‘सामाजिक कृतज्ञता निधी’!’’

pune, Young Man Arrested, Raping College Girl, Threatening with girl obscne Video, Pune Police Investigate, girl attempted suicide, crime in pune, pune news,
धक्कादायक : मोबाइलवर चित्रफीत काढून महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
hotel owner attempts suicide in front of police station
हॉटेल व्यावसायिकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न; काय आहे प्रकार?
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

मला माझं पहिलं व्यावसायिक नाटक करायला मिळालं, डॉ. श्रीराम लागूंबरोबर. – ‘कस्तुरीमृग’. लेखक – वसंत कानेटकर, निर्माते- मोहन तोंडवळकर आणि दिग्दर्शक स्वत: डॉक्टर. पर्वणीच! झालं असं, की ‘रूपवेध’ या डॉक्टरांच्या संस्थेतर्फे ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’साठी जयदेव

(जयदेव हट्टंगडी) नाटय़ शिबीर घेत होता. मी त्याच्या मदतीला! जेवणाच्या सुट्टीत डॉक्टर तिथे आले. सोबत अभिनेता मोहन गोखले आणि व्यवस्थापक- निर्माते गोटय़ा सावंत (तो गोटय़ा होता हे नंतर कळलं).  मला वाटलं, ते शिबीर कसं चाललंय ते बघायला आलेत. पण ‘तुलाच भेटायला आलोय’ असं त्यांनी म्हटल्यावर आश्चर्य वाटलं. ‘मी एक व्यावसायिक नाटक करतोय. तुझा करायचा विचार आहे ना?’

‘आऊट ऑफ द ब्लू’ म्हणतात ना, तसंच वाटलं बघा! ते म्हणाले, ‘उद्यापासून ये तालमीला.’ असे असतात योगायोग. काय झालं, आधी त्या भूमिके साठी एक मुलगी ठरली होती. तिच्याबरोबर तालमीही सुरू झाल्या आणि काही कारणांमुळे तिला बदलायचं ठरलं आणि मला विचारलं गेलं. नाटकात विमलाबाई जोशी, मधुकर नाईक, लीलाधर कांबळी, बाळ बापट,

नंदा फडके, मोहन गोखले (त्याचंही पहिलंच व्यावसायिक नाटक) आणि डॉक्टर स्वत: – तेही चार भूमिकांमध्ये! या नाटकाची नायिका अंजनी. देवदासीची मुलगी. तिची मावशी तिच्यासाठी ‘यजमान’ शोधते. त्याला अंजनीचा कडकडून विरोध. पण परंपरेपुढे ती मान झुकवते. तिचं प्रेम आहे भाऊराव पटवर्धन या नटावर. त्यांच्याबरोबर ती दारू प्यायला लागते. त्यांच्या नाटकातल्या गाण्यांना चाली देते. पण प्रसिद्ध झालेल्या नाटकाच्या प्रतीमध्ये तिचं नाव वगळलं जातं. का, तर ती कलावंतीण म्हणून. घराण्याच्या शापाचा दुसरा आघात. मग दादासाहेब सरंजामे या लेखकाच्या बोलण्याला भुलून त्यांच्याबरोबर जाते. पण तेही तिला राजरोस स्वीकारायला तयार नसतात. या सगळ्यातून ती दारूच्या आहारी जाते, पुरती कोसळते. शेवटी ठेंगे नावाच्या ‘यजमाना’कडे जायला तयार होते. कलावंतीण म्हणून जन्माला आलेली ही मनस्वी मुलगी! तिच्या गाण्यामुळे, तिच्या अंगी असलेल्या विद्वत्तेमुळे तिच्याकडे आकर्षित होणारे पुरुष फक्त तिचा फायदा घेतात, पण प्रतिष्ठा मात्र नाकारतात. नाटकातल्या शेवटच्या तिच्या स्वगतात आपल्या बालमित्रासमोर- मंगेशसमोर मन उघड करते, की ज्या लोकांवर आयुष्य उधळलं, त्यांनी मानहानीशिवाय काहीच दिलं नाही. ‘सगळे पुरुष बिनचेहऱ्याचे, सगळ्या बायका बिनपायाच्या! माणसं तशी वाईट नाहीत रे, पण हे संबंध.. नर-मादी, शिकारी-सावज, भक्षक-भक्ष्य!’ अशा शब्दांत आयुष्यातल्या अनुभवांची उजळणी करते. एखाद्या पुरुषावर जीव ओवाळून टाकणाऱ्या स्त्रीला काय हवं असतं? एक मानाचं स्थान. पण ते तिला शेवटपर्यंत नाकारलं जातं. नाटकाच्या शेवटी आतडं पिळवटून ईश्वराला ती एकच प्रश्न विचारते, ‘देवा, कावळ्याच्या घरटय़ात मला जन्म दिलास. मग हे सोनेरी पंख का दिलेस?..’

तालमी चालू झाल्या. हळूहळू अंजनी मनात उभी राहायला लागली आणि एक दिवस नाटकाचं संगीत द्यायला हृदयनाथ मंगेशकरांना बोलावलं आहे, ते येणार आहेत असं कळलं. अरे देवा! नाटक कलावंतिणीच्या जीवनावर. म्हणजे गाणं आलंच. दुसऱ्या अंकात एकदा गुणगुणणं होतं आणि एकदा गात गात ‘एन्ट्री’ होती. मंगेशकरांनी मला गाणं येतं का ते विचारलं. मी ‘नाही’ म्हटल्यावर म्हणाले, ‘गुणगुणत तरी असाल ना? गुणगुणा थोडं.’. ‘धरणी पोटात घेईल तर बरं’ असं वाटणं म्हणजे काय, हे तेव्हा कळलं. मला ‘सा’ लावणंही कठीण! मी.. आणि त्यांच्यासमोर गाणं? ते समजले! मग ‘सुरात सूर मिळवता येईल का?’ विचारलं.  मी म्हणाले, ‘हो. तेवढं करू शकेन.’. मग असं ठरलं, की डॉक्टर सुरुवात करतील आणि मग मी सूर मिसळून गायचं. ते शक्य झालं. एन्ट्रीच्या वेळेस ज्या दोन ओळी होत्या त्या रेकॉर्ड करायच्या आणि त्या संपल्यावर मी एन्ट्री घ्यायची असं ठरलं! ‘रा.ना.वि.’मध्ये (एन.एस.डी.) संगीत विषय असल्यानं सुरात सूर तरी मिसळू शकले, नाही तर आमची धाव शाळेतल्या समरगीतापर्यंतच!

आता तालमी शेवटच्या टप्प्यात आल्या होत्या. मला शेवटी एक भलंमोठं स्वगत होतं. यजमान  ठेंगे या अतिशय व्यवहारी आणि कुरूप माणसाबरोबर जायच्या आधी दारू पिता पिता ते बोलायचं होतं. पाठांतर झालं. पण एका तालमीनंतर डॉक्टर म्हणाले, ‘तू ते नुसतं बोलते आहेस. त्यात दारूचा कुठेही परिणाम जाणवत नाहीये! घोट घेत घेत बोलतीयेस ना?  मग काही काळानंतर बोलण्यात हालचालीत काही फरक यायला हवा की नको?’. त्यांचे ते शब्द  काही केल्या मनातून जाईनात. काय करावं? कसं  बोललं तर तो ‘फील’ येईल? अल्काझी सरांनी (इब्राहिम अल्काझी) सांगितलेलं लक्षात होतं. दारू पिऊन तोल जात असलेला माणूस आपला तोल जात नाहीये, हे कसोशीनं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तेच बोलण्यात! जिभेवरून सटकणारे शब्द जास्तच स्पष्ट उच्चारतो. पण आधी जिभेवरचे शब्द ‘सटकवायचे’ कसे? रात्री अर्ध्या झोपेतही हे विचार चालूच होते आणि स्वगतही. आणि सुचलं. ही अवस्था म्हणजे गुंगीच! दुसऱ्या दिवशीपासूनच प्रयत्न करायला लागले. नंतर डॉक्टर काही बोलले नाहीत. म्हणजे जमलं असावं!

प्रयोग सुरू झाले. माझ्या कामाचं कौतुक होत होतं. ‘रावबहादूर पेंडसे’, ‘भाऊराव’, ‘दादासाहेब’ आणि ‘पंतठेंगे’ अशा चारही भूमिका डॉक्टर करायचे (आम्ही काय ‘डबल रोल’ करू असे!). वेशभूषा ठरवताना त्यांनी मला आणि विमलाबाईंना आमच्या साडय़ा आम्हालाच खरेदी करायला पाठवलं. मला सांगितलं, ‘पहिल्या अंकात तुझ्यासाठी निळी नऊवारी आणि शेवटच्या ठेंगेबरोबरच्या प्रवेशात पांढरी स्वच्छ. बुटी नाही की काठपदर नाही. मधल्या साडय़ा तू बघ. एकच नऊवार. बाकी सहावारी चालतील.’ मग मी निळ्यापासून पांढऱ्यापर्यंत उतरत्या भाजणीनं रंग निवडले. फार नाहीत, सगळ्या मिळून पाच. डॉक्टरांनी ‘ओके’ केल्या. एका प्रयोगानंतर आपल्या सुलोचनाबाईंनी साडय़ांच्या निवडीबद्दल कौतुक केलं, तेव्हा मी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. शेवटच्या पांढऱ्या साडीवर मी ‘प्लेन’ काळा ब्लाऊज घालत असे. तशीच रंगसंगती ठरवली होती. आमचा एक प्रयोग- बहुतेक बोरिवलीला होता. त्या वेळी बोरिवलीचं ‘ठाकरे’ आणि ठाण्याचं ‘रंगायतन’ही झालं नव्हतं. मांडवात प्रयोग होता. प्रयोग संपल्यावर उशीर झाला म्हणून मी फक्त साडी बदलली आणि ब्लाऊज उद्या येताना घेऊन येईन, असं सांगितलं. पण दुसऱ्या दिवशी नेमकी तो न्यायला विसरले. कपडेपटवाल्याच्या पण ते उशिरा लक्षात आलं. अगदी नाटक सुरू होताना. एक वापरात नसलेला ब्लाऊज सापडला, पण तो ‘कॉफी ब्राऊन’ रंगाचा होता आणि बाहीला जरीची किनार होती. म्हटलं, किनार लपवून घालते हा! प्रयोगानंतर डॉक्टरांनी विचारलं. भीतभीत ब्लाऊज विसरल्याचं कबूल केलं . मग काय? रागावले! म्हणाले, ‘‘एक तर बेजबाबदारपणे विसरलीसच कशी? आणि जर काही बदल होता तर समोरच्या सहकलाकाराला सांगायला नको?’’ धडाच होता तो माझ्यासाठी. नाटकात प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते. एक एकसंधता असते. आणि विश्वास हा फार महत्त्वाचा. नाटक करताना एकमेकांवर भरोसा असतो. सेटवाले सेट नीट लावतील, लाईटवाला लाईट्स नीट लावेल, रंगमंचावर वापरायच्या वस्तू जागच्या जागी असतील, कलाकार व्यवस्थित काम करत असतील, हे सगळं गृहीत असतं. एखाद्या वेळीच अनाहूत चूक होते. पण काही बदल असतील तर ते सांगण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते. काही विचारानंच वेशभूषेत काळा-पांढरा रंग दिग्दर्शकानं ठरवला होता ना! शिवाय अचानक डोळ्यासमोर काही वेगळं दिसलं तर गोंधळायला होतं, एकाग्रता तुटते. त्यामुळे समोरच्याला माहीत असलेलं केव्हाही चांगलं. खरंच धडा मिळाला.

डॉक्टरांच्या रंगमंचावरच्या एकाग्रतेची मला कमाल वाटायची आणि ती एकाग्रता तुटू न देण्याचीही! आमचा ठाण्याला प्रयोग होता. मला वाटतं, मो. ह. विद्यालयाच्या पटांगणात. स्टेज बांधलेलं, पण खुलं प्रेक्षागृह. दुसऱ्या अंकात माझा आणि डॉक्टरांचा सीन चालू होता. अचानक प्रेक्षकांमध्ये कुजबुज सुरू झाली. बारीकसा हशासुद्धा आला. मला काही कळेना. पण डॉक्टरांवर त्याचा काही परिणाम दिसत नव्हता. ते अजिबात विचलित झाल्याचं दिसलं नाही, मीच डिस्टर्ब झाले होते. सीन चालू ठेवून अंदाज घेत होते की काय झालं आहे? आणि मला जाणवलं की कुठून तरी एक कुत्र्याचं पिल्लू स्टेजवर आलं होतं आणि शेपूट हलवत उभं होतं! त्याला लोक हसत होते. आता डॉक्टरांना हे कळलं नसेल का? पण त्यांनी सीन पुढे चालूच ठेवला. अनेकदा तर नाटक चालू झाल्यावर उशिरा आलेल्या प्रेक्षकांमध्ये सीटवरून गोंधळ व्हायचा, आवाज वाढायचे. पण नाटक कधी थांबवलं गेलं नाही. इतर प्रेक्षकच त्यांना गप्प करायचे.  हे म्हणजे – ‘आम्ही आमचं काम चोख करतो आहोत. स्टेजवर चालू असलेल्या कार्यक्रमात व्यत्यय येऊ न देणं हे काम तुमचं! त्या छोटय़ा व्यत्ययामुळे रसभंग झाला, तर ‘लॉस इज युअर्स!’ ’. मध्यंतरी मोबाइलमुळे येणाऱ्या व्यत्ययाबाबत अनेक तऱ्हेनं प्रेक्षकांना समजावण्याचा प्रयत्न चालू होता. अनेक कलाकार नाटक थांबवत. रसभंग सगळ्यांचाच होतो हो! आपण एकमेकांचा आदर करू या ना! आणि वैयक्तिक आयुष्यात अप्रिय घटना घडलेली असूनही ‘शो मस्ट गो ऑन’ असं म्हणून कलाकार रंगमंचावर उभे राहिल्याची कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याकडे! जेव्हा मोबाइल नव्हते तेव्हा काय इमर्जन्सी आली नव्हती कुणाला? खूप मार्ग असतात हो, पण मला वाटतं तंत्रज्ञानानं आपल्याला आळशी बनवलंय. खूप मोठा विषय आहे हा. इथे नको. नाही? कुठून कुठे गेले मी! असो. पण स्वत:ला विचलित न होऊ देण्याचं तंत्र अशा प्रसंगांमधून आपोआपच शिकले.

डॉक्टरांमुळे एका मोठय़ा सामाजिक कामाला माझा हातभार लागला आणि जबाबदारीची जाणीवही झाली. ‘सामाजिक कृतज्ञता निधी’. डॉ. नरेंद्र दाभोलकर, बाबा आढाव, निळूभाऊ (निळू फु ले), डॉक्टर स्वत:, डॉ. अनिल अवचट वगैरे मंडळींच्या पुढाकारानं, विचारानं हा निधी गोळा करण्यासाठी एक नाटक करायचं होतं- ‘लग्नाची बेडी’. मराठीतले उत्तम कलाकार असणार होते त्यात. निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, सुहास जोशी, भारती आचरेकर, सुधीर जोशी आणि हिंदी चित्रपटातली मराठी अभिनेत्री तनुजा. अशी नामवंत मंडळी, त्यात मीपण! महाराष्ट्रभर एकवीस दिवसांचा दौरा करायचा, गावोगावी निधी गोळा करायचा, देणग्या मिळवायच्या. त्या-त्या गावी दुपापर्यंत पोहोचायचं. संध्याकाळी एक जाहीर सभा. सभेत निधीविषयी समजावून सांगायचं, देणग्यांसाठी आवाहन करायचं. रात्री नाटक करायचं. तिथेही आवाहन. पंचवीस लाखांचा निधी जमवायचा होता. जेणेकरून त्याच्या व्याजातून महाराष्ट्राच्या अगदी छोटय़ा छोटय़ा खेडय़ापाडय़ांतून विनामदत समाजकार्य करत असलेल्या लोकांना, त्यांच्या घरच्यांना सहाय्य व्हावं. ज्यांच्या मनात ही कल्पना आली ते लोक (म्हणजे बाबा आढाव, डॉ. दाभोलकर वगैरे) या अशा माणसांना ओळखत होतेच, त्यांचं कार्य जाणत होते आणि त्यांच्या अडचणीसुद्धा. खेडय़ात काम करणाऱ्यांना तिथले लोक सांभाळतात. पण तो कार्यकर्ता आपल्या कुटुंबीयांसाठी खर्च पाठवू शकत नाही. त्याला सहाय्य करायचं, म्हणजे तो निश्चिंतपणे काम करू शकतो. त्याच्या कामासाठी आपण कृतज्ञ आहोत, यासाठी हा निधी. आधी उर्वरित महाराष्ट्र, मग कोकण, नंतर अमेरिका आणि शेवटी कॅनडा. पण तिकडे वेगवेगळ्या नाटकातले प्रवेश असा एक तासाचा कार्यक्रम आणि कॅनडाला ‘कमला’ नाटकाचा दुसरा अंक, असं सादर केलं आणि निधी गोळा केला. परदेशी झालेल्या कार्यक्रमांसाठी डॉक्टर, निळूभाऊ, मोहन गोखले, चारुशीला वाच्छानी आणि मी एवढेच गेलो होतो. काही वर्षांपूर्वी डॉ. दाभोलकर असताना ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचा समारंभ झाला. अजून काम चालू आहे ते! ही जबाबदारीची जाणीव मनात निर्माण झाली आणि माझ्या परीनं मी ती निभावतेही. आपण देणं लागतो म्हणून नाही, पण नुसतं देऊन तर पाहा! आपल्यालाच बरं वाटतं!

नाटकाविषयी लिहिता लिहिता वेगळंच लिहिलं. पण हेही महत्त्वाचं.. माणूस म्हणून!