News Flash

मी, रोहिणी.. : खणखणीत दोघी                    

या दोन स्त्री व्यक्तीरेखा. एक कमी शिकलेली, पण स्वत:च्या पायावर उभं राहू पाहाणारी आणि दुसरी द्रष्टय़ा नवऱ्याच्या मागे फरफटत न जाता चालत जाणारी!

‘जगदंबा’

रोहिणी हट्टंगडी

मला  मिळालेल्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखांपैकी एक म्हणजे मूळच्या जुन्या बंगाली एकपात्री नाटकातली ‘अपराजिता’ ही साधी, परिस्थितीचे फटके  खाल्लेली, पण जिद्दीनं ठाम निर्णय घेणारी स्त्री. आणि दुसरी  व्यक्तिरेखा म्हणजे ‘जगदंबा’ या नाटकातली कस्तुरबांची भूमिका. गांधीजींची पत्नी असल्यामुळे अपरिहार्य गोष्टींना स्वीकारणारी, पण त्यांच्यामागे फरफटत न जाता ठामपणे चालणारी..

मराठी रंगभूमीला एकपात्री नाटक काही नवीन नाही. पु.ल. देशपांडय़ांच्या ‘बटाटय़ाची चाळ’, ‘असा मी असामी’ या प्रयोगांचं महाराष्ट्रातील रसिकांवर अजूनही गारूड आहे. मी नुकतीच अभिनयाच्या क्षेत्रात येऊ पाहात असताना मला आठवतंय, सुहासिनी मुळगांवकर एकपात्री ‘सौभद्र’सारखी नाटकं करायच्या. उंच, गोऱ्यापान, जरीची साडी, कमरेला शेला बांधलेल्या सुहासिनीबाई अख्खं नाटक करायच्या. अगदी सगळे संवाद आणि गाण्यांसकट!

मी चुकत नसेन तर सुमन धर्माधिकारी ‘घार हिंडते आकाशी’ नावाचं एकपात्री करायच्या. मला नेहमी वाटायचं, कसं करत असतील? एकटय़ानं लोकांना खुर्चीत खिळवून ठेवायचं? आणि बऱ्याच वर्षांनी असा योग माझ्या वाटय़ाला आला. सुलभाताईंनी (सुलभा देशपांडे) जयदेवच्या (जयदेव हट्टंगडी) हातात एक स्क्रिप्ट दिलं. म्हणाल्या, ‘‘बरेच दिवस माझ्याकडे होतं, पण मला आता जमेल असं वाटत नाही. रोहिणीला घेऊन होतंय का बघ. नाटकाचं नाव होतं, ‘अपराजिता’. मूळ बंगाली नाटकाचं मराठीत भाषांतर केलं होतं ताराबाई पंडित यांनी. मधूनमधून मराठी वृत्तपत्रात लिहायच्या त्या, पण वास्तव्य कोलकात्यात.

‘अपराजिता’.. मला आठवलं, १९७०-७१ मध्ये ‘रा.ना.वि.’मध्ये (एन.एस.डी.) असताना बंगाली ज्येष्ठ अभिनेत्री तृप्ती मित्रा यांना प्रत्यक्ष स्टेजवर बघायला मिळावं म्हणून भाषा कळत नसतानाही आम्ही पाहायला गेलो होतो ते हेच नाटक. बाकी काही कळलं नाही,  पण फोनवर बोलताना त्यांचा तो टिपिकल बंगाली उच्चारातला ‘हँ..’ मात्र लक्षात राहिला. सुती साडीतल्या, चष्मा लावलेल्या तृप्तीदींनी दोन अंक लोकांना खिळवून ठेवलं होतं. खरं तर झालं असं होतं, की तृप्तीदी आणि त्यांचे पती शंभू मित्रा यांच्यात आपल्या पु. ल. देशपांडेंचा विषय चालला होता, कसे ते एकटे प्रयोग करतात वगैरे. बोलता बोलता शंभूदांनी चॅलेंज केलं आणि तृप्तीदींनी ते स्वीकारलं! आणि नितीश सेन यांना हाताशी धरून नाटक लिहून घेतलं, तेच ‘अपराजिता’. तेच नाटक १९९६ मध्ये म्हणजे तब्बल पंचवीस वर्षांनी आम्ही करणार होतो. नाटक वाचलं. खूप संदर्भ जुने झाल्यासारखे होते. ते काढून टाकल्यावर नाटक दीड तासाचं होत होतं. नाटकाची मांडणीही अशी होती की मध्यंतर कुठे घ्यावं हे कळत नव्हतं.

नाटक सुरू होतं, ते अशा प्रसंगापासून- एक मध्यमवर्गीय कुटुंबातली सर्वसामान्य मुलगी- जी आपल्या भावाकडे राहाते आहे, ती एका महत्त्वाच्या फोनची वाट पाहातेय. वाट पाहात प्रेक्षकांशी बोलतेय. हळूहळू तिचं आयुष्य आपल्यासमोर उभं राहातं. तिला आवड असूनही गाण्याच्या, नाचाच्या क्लासला न जाऊ देणारे, एकदा पोरगी खपवली की डोक्यावरची जबाबदारी संपली, अशी वागणूक देणारे पालक. आपल्या नवऱ्याचं त्याच्याच मामीशी असलेलं ‘नातं’ तिला कळतं तेव्हा तिलाच घराबाहेर काढलं जातं. नवऱ्याचं घर सोडून ती आली आहे भावाकडे आश्रयाला. भाऊ-वहिनीनं घरात ठेवून घेतलंय, पण तेही उपकाराच्या भावनेतून, हे तिला कळतं आहे. आपल्या तीन वर्षांच्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी हिच्यावर टाकली आहे. पण आता तिला स्वत:च्या पायावर उभं राहायचं आहे. दादाच्या एका मित्रानं तिला एका नाटक कंपनीत काम मिळवून देतो म्हणून सांगितलं आहे आणि तोच फोन येणार आहे. आपल्या जीवनातले अनेक प्रसंग ती सांगते. एक सांगता सांगता दुसऱ्या प्रसंगात जाते आणि परत पहिल्यावर येते. प्रत्येक वेळी आपल्या त्या माणसांबद्दल बोलताना कधी त्यांच्या नकला करते. हे सगळं होत असताना वर्तमानात प्रेक्षकांसमोर काही प्रसंगही घडतायत. तिनं एका नाटक कंपनीमध्ये कोणाच्याही नकळत अर्ज केलेला असतो, त्या निर्मात्याचाही फोन येतो. तो तिला ऑफिसमध्ये न बोलावता मेट्रोजवळ बोलावतो. शेवटी दादाच्या मित्राचा फोन येतो आणि तोही अतिशय क्षुल्लक कारणावरून पलटी खातो. सगळीकडून कोंडी झालेली अपराजिता. मात्र शेवटी, आपल्यावर होणारा अन्याय सहन न करता उभं राहाण्याची वेळ आली आहे हे उमगलेली अपराजिता मेट्रोवरही जाणार नाही असं ठरवते आणि फोन वाजतच राहातो..

इतके सगळे प्रसंग, व्यक्ती, बोलणं लक्षात ठेवणं कठीणच होतं. माझं पाठांतरच होईना. मला सेट दाखवला होता, हालचालीही सांगितल्या होत्या, तरी! मग जयदेवनं ‘प्रॉपर्टी’ आणली. सॉफ्ट टॉईज. तिच्या घरात छोटं मूल आहे ना.. पण ते ‘टॉईज्’ होते नाटकात उल्लेख होणाऱ्या व्यक्तिरेखांशी मिळतेजुळते. म्हणजे आईबद्दल बोलताना हरीण, दादाबद्दल तर टेडीबेअर किंवा दादाच्या मित्राबद्दल तर सिंह.. वगैरे. ते सेटवर जागोजागी ठेवून त्यानं मला सांगितलं, ‘‘मी तुला काही जागा ठरवून देणार आहे. तू त्या त्या जागेमध्ये एकेका व्यक्तीबद्दल बोलताना जायचं आणि बोलताना ते विशिष्ट सॉफ्ट टॉय हातात खेळवत बोलायचं. तुझ्या मूव्हमेंट्सही तुला मिळाल्या. जा, वर्कआउट कर जा!’’ पण सांगते, जयदेवमुळे सगळं सोपं झालं! माझी व्यक्तिरेखा बऱ्यापैकी हातात आल्यावर मग त्यानं तालमीत यायला सुरवात केली. आधी येऊन उपयोगच नव्हता! गमतीत जयदेव म्हणायचा, ‘चांगल्या नटनटय़ांबरोबर काम करण्याचा हाच फायदा असतो!’ ‘अपराजिता’ करताना प्रत्येक सीनमध्ये काळवेळेचं भान ठेवायला लागत होतं. भूतकाळ- जो ती सांगते आहे, वर्तमान- जे घडतंय आणि त्यावर तिची प्रतिक्रिया काय आहे, ती काय निर्णय घेते आहे ते.

खरं म्हणजे मूळ बंगाली नाटकात शेवट वेगळा होता. ती ‘डिफायन्स’मध्ये- म्हणजे बंड करून ‘असं आहे का?.. मग ठीक आहे. असंच!’ या  आवेशात मेट्रोजवळ त्या निर्मात्याला भेटायला जाते, त्याचा हेतू माहीत असूनही. जयदेवला हा शेवट काही पटला नाही. त्याचं म्हणणं होतं, की ‘आजची स्त्री बंड करून विरोध करेल.. करायला पाहिजे! हार नाही मानणार. स्वत:वर अन्याय नाही होऊ देणार. मला ती मेट्रोवर जायला नकोय. त्या नंतर ती काय करेल, यापेक्षा ती स्वत: साठी निर्णय घेते याला जास्त महत्त्व आहे.’ त्यानं नितीशदांना (नाटककार नितीश सेन) परत फोन करून यासाठी परवानगी मागितली. आधी काटछाट करताना परवानगी घेतली होती, पण आता शेवट बदलणं म्हणजे..! नितीशदांनी सगळं ऐकून घेतलं आणि दिली परवानगी. आमचा पहिला प्रयोग कोलकात्यात होणार होता. रुद्रप्रसाद सेनगुप्ता यांच्या ‘नंदिकार’ संस्थेच्या महोत्सवात. रुद्रदांच्या आग्रहावरून मराठीत. (नंतर हिंदीतही केलं ‘अपराजिता’) मी टेन्शनमध्ये! नाही म्हटलं तरी तृप्तीदींनी केलेलं ‘अपराजिता’ लोकांनी पाहिलेलं असणारच ना!.. नितीशदा पण आले होते. नाटकानंतर भेटले. जयदेवला म्हणाले, ‘‘आज मी हे नाटक लिहिलं असतं, तर हाच शेवट केला असता.’’ मला म्हणाले, ‘‘चांगलं   के लंस. तुझ्या अपराजितामध्ये आणि तृप्तीच्या अपराजितामध्ये फरक आहे. तुझी अपराजिता अगदी साधी मध्यमवर्गीय आणि तृप्तीची जरा इंटलेक्चुअल वाटायची! पण चांगलं केलंस!’’.

नाटक लिहिलं गेलं १९७० मध्ये, आम्ही ते केलं १९९६ मध्ये, आज आहे २०२१. पन्नास वर्ष झाली नाटकाला! पण आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. शिक्षणाचा दर्जा वाढला असला तरी सामाजिक मानसिकता म्हणावी तशी बदललेली नाही. वैयक्तिक मतं आणि समाजात वावरत असतानाची त्याच लोकांची मतं.. केवढी तफावत असते ना? काळाबरोबर मानसिकता बदलत जाते, समाजही बदलतो. पण त्यासाठी त्याला आरसा दाखवण्याची गरज असते. ते काम नाटक करत असतं. ‘एकच प्याला’मधली गीता आगाऊ न वाटता ती आता का पटते?.. तेंडुलकरांची ‘मित्रा’आजच्या काळात असती, तर तिची घुसमट कमी झाली असती? अनेक वर्षांपूर्वी झालेल्या नाटकांबद्दल इथे मी बोलते आहे. काळ आपल्यावर, आपल्या विचारांवर परिणाम करत असतो. आपल्यात बदल करत असतो. पर्यायानं सामाजिक मानसिकता बदलत जाते आणि एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकतं.. आणि अशी संधी मला मिळाली. एक व्यक्तिरेखा काही वर्षांच्या अंतरानं मला करायला मिळाली- कस्तुरबा!

रामदास भटकळ यांना एकदा जयदेव म्हणाला होता, की रोहिणीला घेऊन करता येईल असं काहीतरी लिहाल का? त्यांनी थेट कस्तुरबांवरच लिहिलं- ‘जगदंबा’. पण मग जयदेव आजारी पडला. त्याच्याच्यानं नाटक करणं जमलंच नाही. त्याच्या प्रथम स्मृतिदिनाला ‘जगदंबा’ करशील का?, असं काकडेकाकांनी (अरुण काकडे) मला विचारलं. ‘‘आपण ‘आविष्कार’तर्फे करु या.’’ मलाही ते आवडलंच.  दिग्दर्शनासाठी प्रतिमा कुलकर्णीला विचारलं. तीही ‘‘हो’’ म्हणाली. नाटक मी वाचलं नव्हतं. पण जयदेवसाठी  ‘‘करू या’’ म्हटलं. तेच प्रतिमाचं. जयदेवसाठी लिहिलेलं आणि रोहिणी काम करणार म्हणून तिनं होकार दिला. पहिल्या वाचनानंतर लक्षात आलं, की खूप संस्कार करावे लागणार आहेत संहितेवर. भटकळांनी ‘क्रोनोलॉजिकली’ म्हणजे कालक्रमिक लिहिलं होतं. रंगमंचावर उभं करण्यासाठी खूप एडिटही करावं लागणार होतं. तरी लेखकाचा एकही शब्द न बदलता किंवा नवा न लिहिता त्याची रचना थोडी उलट सुलट करून भटकळांच्या परवानगीनं प्रतिमानं त्याचं अप्रतिम एडिटिंग केलं. जयदेवनं ‘अपराजिता’ करताना जसं रंगमंचावर जागा ठरवून देऊन पाठांतराला मदत केली होती तसंच प्रतिमानं हे नाटक एडिट करून मांडणीच अशी केली की त्याची मला मदत झाली. भटकळांनी लिहिलेले महत्त्वाचे प्रसंग तिनं विषयानुसार एकत्र केले. म्हणजे जर गांधींच्या उपचारांबद्दल बोलायचं, तर वेगवेगळ्या वेळी झालेले प्रसंग एकत्र सांगताहेत कस्तुरबा, असं.

‘गांधी’ चित्रपटाच्या वेळी अभ्यास तर झालाच होता. पण त्यापेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून या वेळी ‘बा’ शोधायच्या होत्या. या वेळी गांधींपेक्षा ‘बा’ महत्त्वाच्या होत्या. बांच्या मनोगतात गांधीजी हा अविभाज्य भाग असणारच होता, पण त्यापलीकडे जाऊन त्यांनी गांधीजींना साथ देताना केलेली तडजोड, कधी विरोध करून, कधी समजुतीनं त्यांच्या तत्त्वांशी केलेली हातमिळवणी, त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया.. त्याही जाणून घ्यायच्या होत्या. आता मी काही गोष्ट सांगायला नको, पण ‘जगदंबा’ नाटक गांधीजींचं नव्हतं. कस्तुरबांना आयुष्यात अनेक बदलांना सामोरं जावं लागलं. मग ते उंच टाचांचे बूट असोत, काटय़ा-चमच्यानं खाणं असो, किंवा सुनांसाठी सोनं बाळगणं असो. त्या स्वत:च्या मनाप्रमाणे वागूच शकल्या नाहीत. मुलांसाठीसुद्धा जीव तुटायचा त्यांचा. गांधीजींच्या तत्त्वाप्रमाणे मुलांना त्यांनी शाळेत कधीही पाठवलं नाही. याची त्यांना शेवटपर्यंत खंतच राहिली. ‘बॅरिस्टरची मुलं पण त्यांच्याकडे साधा शाळेचा दाखलासुद्धा नाही!’, नाटकातल्या या वाक्यात सगळं एकवटून येतं. पत्नी म्हणून, आई म्हणून त्यांच्याही काही अपेक्षा असणारच. पण आपला नवरा सर्वसामान्य नाही, हेही कुठेतरी जाणवलं असणार. त्या वेळी मनाला मोडता घालून त्यांचं म्हणणं स्वीकारणं ही काही साधी गोष्ट नाही. कसं केलं असेल या सगळ्या ओढाताणीमध्ये या चार अक्षरंही न शिकलेल्या स्त्रीनं?, कशी प्रत्येक वेळी समजूत काढली असेल स्वत:ची?, आश्रमातल्या मुलांना आपली मुलं समजणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे पोटच्या मुलांसाठी कशी रदबदली केली असेल?  पण त्याला यश कधीच आलं नाही म्हणा. हरिलाल आणि मणिलाल दोघांच्याही बाबतीत. हे आणि असे बरेच प्रसंग नाटकात आहेत. ते सांगताना कसं मांडते आहे, यावर बारीक लक्ष द्यावं लागत होतं. गांधीजींनी आपल्याला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ‘जेव्हा माझ्या तोंडून कलकत्याची राजधानी लाहोर असं ऐकल्यावर ताबडतोब तो बंद केला’, असं मिस्किलपणे स्वत:च सांगतात आणि पुढे टिप्पणीपण करतात, ‘मी काहीही म्हटलं तरी ती शहरं आजही जागच्या जागीच आहेत ना?’ नाटकात हरिलाल आणि मणिलाल या दोघांची मनोगतं आहेत. पण ते समोरासमोर येत नाहीत. त्या दोन्ही भूमिका माझ्या मुलानं, असीमनं केल्या. मणिलाल पहिल्या अंकात- जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या वास्तव्यातलं चित्रण आहे तेव्हा. आणि हरिलाल दुसऱ्या अंकात हिंदुस्थानात आल्यानंतर. असो.

या दोन स्त्री व्यक्तीरेखा. एक कमी शिकलेली, पण स्वत:च्या पायावर उभं राहू पाहाणारी आणि दुसरी द्रष्टय़ा नवऱ्याच्या मागे फरफटत न जाता चालत जाणारी! आपल्या आयुष्याबद्दल आपली काय तक्रार असू शकते? हं?

hattangadyrohini@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2021 1:05 am

Web Title: actress rohini hattangadi talk about role of kasturba in drama jagadamba zws 70
Next Stories
1 वसुंधरेच्या लेकी :  पृथ्वीला वाचवणारी पावले
2 फिरत्या चाकांवरचं ‘भटकं’ आयुष्य
3 ‘भटक्यां’चं विविधरंगी जग
Just Now!
X