सोनाली कुलकर्णी

आठवणींचे वाहक असणं हे जर आपल्या उरण्याचं प्रबळ कारण असेल तर ते फार जिव्हारी लागणारं आहे. पण तरी जाणारं माणूस जेव्हा एवढं मोठं असतं तेव्हा त्याच्या ऋणाने का होईना – आठवणी बाकीच्यांपर्यंत पोचवल्याच पाहिजेत.. नाहीतर मग आपण काय शिकलो.. कुणीतरी खायला घातलेला घास खाण्याची धमक पाहिजे. त्या हाताला लागलेली शीतंच बघत बसलो तर टापटिपीच्या नादात घास देणाऱ्याची माया स्वीकारणं राहूनच जाईल. आणि आपण सगळे कोरडे शंख आळवावरचे टचटचीत थेंब होऊ.  स्वातंत्र्याची गाणी ओरडून गाताना लक्षातच येणार नाही की कुणीतरी पदरचं मोडून आपल्याला देत होतं. आपण कुणीतरी लागत होतो. त्या माणसाचे..

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!

आम्ही कितीतरी जण सुमित्रा मावशींचे कुणीतरी लागत होतो. त्या आता नाहीत म्हणजे नक्की काय. हे समजायला बराच काळ जावा लागणार आहे. आम्ही शेवटचे कधी भेटलो होतो.. मावशींचा तो मऊ हात – तो स्पर्श शेवटचा कधी जाणवला, याची बेरीज वजाबाकी करायची वेळ येईल, असं वाटलं नव्हतं. अजूनही वाटत नाही. ‘ दोघी’, ‘जिंदगी जिंदाबाद’ ‘देवराई’ असा एकत्र प्रवास करूनही आता बरीच वर्ष उलटून गेली. आपलं जगणं कुणाला तरी समांतर असतं. त्यात ते माणूस आपल्या घरी नसतं, आपल्या घरचं नसतं.. पण आपल्या आयुष्यातल्या घडामोडींमुळे त्या माणसाला होणारा आनंद, दु:ख, निराशा याचं आपण काहीतरी देणं लागतो. सुमित्रा मावशींचं तर देणं लागतोच लागतो.

मी त्यांना भेटले तेव्हा फग्र्युसन कॉलेजमध्ये शिकत होते. संधी देताना मावशींनी कधीच जेवढय़ास तेवढं असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला नाही. त्या आमच्यात घुसल्या. त्यांनी आमच्यात खूप ढवळाढवळ केली, पण १०० टक्के हक्काने. एकत्र काम करताना, वावरताना आपल्यात एक शांत बाज येतो, तो बाज मावशींनी कायमच नाकारला. त्यांचं रसरशीत असणं हेच सगळ्यांना पुरून उरायचं. त्यांचं उत्तरा बावकरांवर प्रचंड प्रेम. त्या एकमेकींच्या एवढय़ा सख्ख्या कधी, कशामुळे झाल्या माहिती नाही – पण उत्तराताई पुढच्या सीनची तयारी करत असताना बाकीच्यांनी आवाज करायचा नाही, अशी ताकीद असे. त्यांना शांतता, एकांत मिळाला पाहिजे यासाठी मावशी जीव पाखडायच्या. मला फार कुतूहल वाटायचं की काम तर आपण सगळेच करतोय ना.. पण नाही.. उत्तराताई वयानं, अनुभवानं मोठय़ा होत्या आणि मावशी त्यांना ते कोंदण स्वखुशीनं देऊ करायच्या.

आम्ही  ‘दोघी’च्या शूटिंगपूर्वी कितीतरी तालमी केल्या. आमच्याकडे वेळच वेळ होता. युनिटमध्ये एकतर लहान आणि नवोदित मुलं नाहीतर एकदम दिग्गज. सूर्यकांत आमचे वडील असणार होते. मावशी आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेल्या होत्या – पहिली ओळख करून देण्यासाठी. तसं मावशींचं गावातलं- रास्तापेठेतलं घरंही खूप छान. किती सुंदर उजेड यायचा तिथे.. मी पहिल्यांदा गेले तेव्हा त्यांची आई – मोठी आई पण होती. माझी आणि रेणुकाची पहिली ‘लूक टेस्ट’ म्हणजे फोटोशूट  तिथेच झालं आणि मग वाचन आम्ही कोथरुडच्या घरी केलं. एक उत्साह आणि उत्सुकतेनं भारलेलं वातावरण असायचं तिथे. शूटिंग सोनोरीला झालं.  पुण्यापासून दोन तास सासवडच्या अलीकडे. आम्ही रोज जाऊन येऊन काम करायचो. मावशी प्रत्येक गोष्टीबद्दल दक्ष असायच्या. सगळ्यांना त्या फक्त दिग्दर्शक म्हणून माहिती आहेत. पण कलादिग्दर्शन, कॉस्च्युम्स् हे मावशींचे हातखंडा विभाग. जास्त मेकअप करायचा नाही याबद्दल त्या किती आग्रही असाव्या! काजळसुद्धा जास्त घातलेलं चालायचं नाही त्यांना. पण शूटिंगनंतरच्या परतीच्या प्रवासात जे कुणी मावशींच्या जीपमध्ये असतील त्यांच्यासाठी पर्वणीच असायची. बहारच.. जुन्या गाण्यांची साखळी उलगडत जायची.. त्यांना, उत्तराताईंना किती गाणी माहीत होती!

मावशी संसारात रमावं तशा सिनेमात रमल्या. त्यांनी फिल्ममेकिंगचा गाडा हाकला. आमचा निरागसपणा, धसमुसळेपणा, अशा सगळ्याला त्यांनी हक्काने दिशा दिली. मी अनेकदा मुलाखतींमध्ये सांगते ‘भुई भेगाळली खोल’ या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी मुल्ला सरांनी नगाऱ्यावर गाणं वाजवायला सुरुवात के ली आणि ते ऐकून मला अनिवार रडू यायला लागलं.. मावशींचं म्हणणं एकच , ‘‘तू रडू नकोस कॅमेऱ्यासमोर, कारण बघायला आलेल्या मुलासमोर कृष्णा रडणार नाही.’’ मला वाटत होतं, की तो माझा अ‍ॅक्टिंगचा चान्स आहे. रेणुका त्यांची फेव्हरेट. कारण भाचीच होती ना ती. म्हणून मला कमी अ‍ॅक्टिंग करायला देतायत.. आणि ते मी रडवेल्या स्वरात बोलूनही दाखवलं. त्यावर मला दटावत, ‘‘अगं, तसं काही नाही गं..’’ असं म्हणून त्यांनी त्यांना हवं तसंच गाणं शूट करून घेतलं. आजही ‘दोघी’तला तो संपूर्ण प्रसंग बघताना कृष्णा इतकंच आपणही व्याकू ळ होतो. आणि त्यांचं त्यावेळचं म्हणणं किती विचारपूर्वक होतं हेही लक्षात येतं. मावशींचा आवडता सीन म्हणजे ‘दोघी’मधलं दोन बहिणींचं खूप काळानंतर भेटणं.. तुळशी वृंदावनासमोर, दिवस संपताना रात्र होण्याआधी.. के वढं काय काय घडून गेल्यावर एकमेकींसमोर आलेल्या या दोघी पाहात राहतात एकमेकींच्या डोळ्यांत.. शोधत राहतात काळाच्या खुणा, विरह, प्रेम, घुसमट.. इतकं संपन्न, आर्त लेखन करणाऱ्या मावशींनी हा संपूर्ण प्रसंग नि:शब्द चित्रित के ला होता. तसंच  ‘देवराई’तलं सीनाचं शेवटचं निघणं.. ती गाडीत बसल्यावर वळून पाहते – तेव्हा हळद कुंकू लावलेल्या तिच्या चेहऱ्यावर आपल्या मनात आख्खा सिनेमा उमटून जातो.. असे एके क प्रसंग आठवावे तेवढेच थोडे.

‘जिंदगी जिंदाबाद’च्यावेळी माझी इतर चित्रपटांचीही बरीच कामे सुरू झाली होती. तिथून  कुठून तरी दुरून मी शूटिंगच्या ठिकाणी पोचले होते. त्याबद्दल त्यांनी माझं कौतुक केलं नाही हे त्यावेळी मला विचित्र वाटलं होतं, पण तेव्हा माझ्या लक्षात आलं नव्हतं, की त्यापेक्षा खूप मोठी गोष्ट त्यांनी केली होती, ते म्हणजे मला गृहीत धरलं होतं! असा आपलेपणा दाखवायला हिंमत लागते. ती हिंमत मावशींमध्ये ओतप्रोत भरलेली होती.

‘देवराई’च्या वेळी तर फार विलक्षण गोष्टी घडल्या. त्यांना हवीतशी सीना घडवण्यासाठी त्यांनी माझी खूप मोडतोड केली. मी कमर्शिअल हिंदी सिनेमात-इंटरनॅशनल सिनेमात कामं करत होते. मला चोख आणि प्रोफेशनली कामं करणाऱ्या युनीटची सवय झाली होती. बदललेले कपडे बाजूला ठेवून पुढच्या सीनसाठी तयार होऊन मी सेटवर गेले. त्यावेळी साडीवरून आमचं जोरदार भांडण झालेलं आठवतंय. कॉस्च्युमसाठी वेगळी टीम  होती. पण आधीच्या सीनमधल्या साडीची तू नीट घडी करून का ठेवली नाहीस, असं म्हणत त्यांनी सगळ्यांसमोर माझा पाणउतारा केला होता. तसंच आणखी एका हॉस्पिटलमधल्या प्रसंगाच्या शूटिंगच्या वेळी मला बाजूला घेऊन जोरदार कानउघडणी केली होती. तू असंच वागतेस, तू तसंच का करतेस.. खूप बोलल्या. शूटिंग व्यतिरिक्त मी मावशींच्या सेटवर जेवढी रडले तेवढी इतर कुठेच कधीही रडले नाही..

त्या त्या वेळी मनस्ताप झाला, पण आता या आठवणी मजेदार वाटतात कारण मावशींनी माझ्या रुसण्याला गोडवा दिला. कितीतरी लाड केले. वाढदिवस लक्षात ठेवले. चाग्ांलं काहीतरी झालं तर भेट पाठवली. फोनवर बोलायला वेळ दिला, मेसेजला उत्तरं पाठवली.. आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात मी खास मावशींना भेटायला पुण्याला गेले होते लेकीला, कावेरीला घेऊन तर त्यांनी लक्षात ठेवून मला आवडते म्हणून त्यांनी वापरलेली साडी माझ्यासाठी काढून ठेवली होती. त्याच्या वरताण मी म्हटलं, मला एक तुम्हाला न लागणारी तुमच्या स्वयंपाकघरातली वस्तू पाहिजे तर माझ्याशी बोलत बोलतच त्या स्वयंपाकघरात डोकावल्या आणि त्यांनी मला धान्य मोजायचं छोटं पितळेचं मापटं दिलं. त्यावेळी आम्ही किती तरी वेळ गप्पा मारत बसलो होतो.. मग ‘कासव’च्या स्पेशल शोला मी त्यांना दाखवायला ती साडी नेसून गेले होते.

गेल्या इतक्या सगळ्या वर्षांमध्ये मावशी कित्ती वेळा भेटल्या. कित्ती वेळा भेटायच्या राहून गेल्या.. फिल्म फेस्टिवल्सना तर कितीदा तरी एकत्र होतो. दोन वर्षांपूर्वी गोव्यात त्यांचा फोनच सापडेना. किती धावपळ झाली होती. मात्र मावशींसाठी धावपळ करणं, त्यांना जेवणाचं ताट आणून देणं, सोबत कुणी नाही म्हणून त्यांच्याबरोबर थांबणं, यात पराकोटीचा आनंद व्हायचा. आणि ते सगळं उमेश कुलकर्णी आणि सचिन कुंडलकरला सांगताना किती गंमत यायची. मावशींचा आम्हाला धाक होता. त्यात प्रेम होतं. दरारा नाही..

‘दोघी’च्या वेळची आग्रही हेडमिस्ट्रेस, ‘देवराई’च्या वेळची घुसखोर प्रिन्सिपल, ‘नितळ’चे गैरसमज, त्यांनी मला त्यांच्या काही चित्रपटांमध्ये न घेण्याचा माझा टिपिकल राग असो.. किं वा माझ्या इतर कामांबद्दल, आयुष्याबद्दल त्यांचं काही म्हणणं असो.. आम्ही किती बोललो या सगळ्यांबद्दल.. त्यामुळे स्वत:च्या भावनांची कधी लाज वाटली नाही. कारण मावशी कायमच हिरिरीनं कनेक्ट होत राहिल्या. त्यांना गुंत्याचं आकर्षण होतं की काय अशी शंका येते. पण गुंता, गोतावळा याच्याशी त्यांचं फार जमायचं, एकू ण भरभरून जगण्याशीच!

एक मात्र लक्षात येतंय. नव्याशी जुळवून घेताना मावशी कायम जुनी डहाळी जपत राहिल्या. डिजिटल जग, प्रवास, तब्येत, माणसांचं क्षेमकुशल, हे सगळं त्यांना हवं असायचं. त्यांना जितकं माझ्याशी बोलायचं असायचं  तितकंच कावेरीशीही..

समृद्ध, संपृक्त आणि अपार समज असणारं हे आमचं लाडकं माणूस. मी हे का लिहितीए, काय लिहितीए याचा संदर्भच कळेनासा झालाय. अंगावर येतायत त्या आठवणींच्या, क्षणांच्या लाटा.. मावशींचा परिवार फार मोठा आहे. उमराणी, दप्तरदार.. पण आम्हीही उरलो आहोत..

मावशी नसलेल्या या आपल्या जगाचं कसं होणार.. कोण समजूत घालणार? कोण मायेनं खांद्यावर हात ठेवणार? मला का सांगितलं नाहीस म्हणून कोण रागावणार?  मळभ जाण्याची आशा कोण दाखवणार?  ज्या श्वासात सुमित्रा मावशी म्हटलं जातं त्यात सुनीलही आलाच. त्याला आम्ही कसं सांभाळावं?  त्याचं त्यानंही कसं सावरावं. काम करून.. झपाटल्यासारखं, मुंगीसारखं, आयुष्याचा बाऊ न करता, आयुष्याला कवटाळून आणि मनावर एक मऊ मऊ हाताचा, पांढऱ्या केसांचा, खुद्कन हसणारा आणि आपल्यासाठी फार काही वाटून घेणारा इवल्याशा कुडीचा ढग आहे हे जाणवून चांगलं काम करत राहू या..