ch0331व्यसनाधीनता मुलांपुरती मर्यादित राहिलेली नसून मुलीसुद्धा याच्या आहारी जाऊ लागल्या आहेत. पालक या गोष्टी नाकारतात किंवा लपवून ठेवतात नाही तर मुलांना मारीत बसतात. या गोष्टी स्वीकारून समुपदेशकाचा, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. व्यसनाधीनतेचा विळखा वेळीच सोडवता येतो, हे सांगणाऱ्या लेखाचा हा भाग पहिला.
‘बा बा, मी रोज रात्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत चालत जातो ना त्यात एक वेगळीच मजा येते. एक रोमांचकारी अनुभव येतो. मी तर आता रोज रात्री जायचं ठरवलंय..’  
पंकज आपल्या वडिलांना धाडसाचं काम करतोय, अशा अविर्भावात सांगत होता. रात्र झाली की हा बाहेर पडायचा. मी जेव्हा त्याच्या या सवयीविषयी ऐकलं तेव्हा मला वेगळाच संशय आला. नंतर लक्षात आलं की, हा मुलगा रोज रात्री बाहेर जातो. अनेक दिवसांपासून तो रात्रीचं सोडाच, पण दिवसासुद्धा नीट झोपलेला नव्हता. देवळात जाण्याचा त्याचा बहाणा होता का? हा मुलगा मेफोड्रोन व्यसनाच्या आहारी तर गेला नव्हता ना?
एम केट, म्याऊ , एमडी किंवा मेथ या प्रकारातील अमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेमध्ये जी लक्षणं दिसून येतात तीच लक्षणं मला पंकजमध्ये आढळून आली. निद्रानाश, अचानक वजन कमी होत जाणं, अधून-मधून नाकातून रक्त येणं, स्वभावात भांडखोरपणा येणं, आक्रमक होणं हे पंकजमध्ये नव्याने झालेले बदल होते; अर्थातच हे बदल चांगले नव्हते. सुरुवातीला आनंद, मजा, उत्कंठा, उत्साह वाढविणारी द्रव्यं आता आपला खरा परिणाम दाखवू लागली होती. चघळायला, सिगारेटमध्ये टाकून ओढायला किंवा त्याच्या कॅप्सूल्स चावायला चांगली वाटणारी ही द्रव्यं प्रत्यक्षात अतिशय गंभीर परिणाम करणारी ड्रग्स आहेत हे मुलांना कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो. तुरटी किंवा खडीसाखरेसारख्या चमकणाऱ्या बारीक तुकडय़ांच्या स्वरूपात, कधी पावडरीतून तर कधी पांढऱ्या रंगाच्या कॅप्सूल्समधून ही ड्रग्स मुलांपर्यंत पोहचवली जातात. कुणी नाकाने ती ओढून घेतात तर कुणी कॅप्सूल्स गिळतात. पण परिणाम सगळ्याचे भयंकरच होतात. ड्रग्स घेणं थांबवलं की असह्य़ वेदना होऊ  लागतात. रक्तदाब वाढणं, स्मृतिभ्रंश होणं, मनोविकाराची सुरुवात होणं इथपासून ते मृत्यू येण्यापर्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतात. पंकजच्या बाबतीतसुद्धा असंच घडत होतं.  
माझ्या मनात पाल चुकचुकली आणि अखेर संशय खरा ठरला. मेंथएम्फटाइन ड्रग्सच्या विळख्यात तो अडकला होता. कॉलेजमध्ये पंकजचं नाव काळ्या यादीत गेलं होतं आणि परीक्षेत नापासही झाला होता. म्यांऊ , एमडी किंवा मेथसारखी ड्रग्स कॉलेज परिसरात सहज उपलब्ध असायची आणि मुंबई-दिल्लीसारख्या शहरांमध्ये तर खास करून तरुण वर्गामध्ये खळबळ माजवायची, मुलांना आकर्षित करायची.  सिगारेटमधूनही ही ड्रग्स दिली जायची आणि मुलांना त्यात मोठा चित्तथरारक काही तरी केल्यासारखं वाटायचं. पंकजला त्याच्याच कॉलेजमधील मुलं (ज्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं होतं.)  फुकट सिगारेट द्यायची. मात्र त्या सिगारेटमध्ये असलेल्या द्रव्याची पंकजला कल्पना नसायची. अकरावीत पंकज परीक्षेत नापास झाला आणि तो शिकण्यास असमर्थ/असक्षम ((Learning Disability)  असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गणला जाऊ  लागला. यापूर्वी शाळेत असताना असं कधीच झालं नव्हतं, किंबहुना असा शेराही त्याला कधी मिळाला नव्हता. त्याच्यावर उपचार सुरू झाले. औषधांच्या डोसाने त्याला थोडा आराम मिळाला आणि वेदना काही अंशी कमी झाल्या. पण औषधांइतकंच त्याच्याशी बोलणंसुद्धा खूप गरजेचं होतं आणि आमच्यात चांगला संवाद झाल्यामुळे त्याच्या मनावरचं ओझंही थोडं कमी झालं. औषधं आणि योग्य पद्धतीने केलेली अर्थपूर्ण सकारात्मक चर्चा यातून पंकज लवकर सावरला गेला. पण काही वेळेस मुलांना यापेक्षा अधिक उपचारांची गरज भासू शकते. काही प्रकरणांमध्ये मुलांना रुग्णालयात बरेच दिवस राहावंही लागतं जेणेकरून ती व्यसनापासून दूर राहतील. पंकज सहा महिन्यांत तीन वेळा घरातून पळाला होता, पण त्याची पूर्वस्थितीत येण्याची प्रक्रिया लवकर सुरू झाली आणि वाईट दिवस हळू हळू मागे पडू लागले.  
म्याऊ ड्रग्जवर आता कायद्याने बंदी आणण्यात आली आहे. सोलापूरमध्ये ज्या ठिकाणी ही ड्रग्ज बनत होती ती प्रयोगशाळा उद्ध्वस्त करण्यात आली तेव्हा त्याठिकाणी सुमारे ३१ कोटीं रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
नववीत शिकणाऱ्या अक्षयच्या बाबतीतही अशीच धक्कादायक गोष्ट घडली होती. तो परीक्षेत वारंवार नापास होऊ  लागला होता आणि घरात फार चिडचिड करू लागला होता. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहायचा.  केव्हाही, कधीही, कुठेही मित्रांना भेटायला धावत जायचा, इतका की सणावारांनासुद्धा घरी थांबायचा नाही. तसंच घरात काही अडचण असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून मित्रांच्या मागे पळायचा. त्याच्या पालकांना त्याच्या दप्तरात डोळ्यात टाकायच्या औषधाची बाटली आणि गवतासारखी हिरव्या रंगाची वनस्पती सापडली होती. त्याची जेव्हा युरिन टेस्ट केली तेव्हा त्यात गांजा सेवन केल्याचं आढळून आलं. दप्तरात सापडलेली वनस्पती म्हणजे गांजा होती. त्याच्या पालकांसाठी हा एक मोठा धक्का होता. अशा प्रकरणामध्ये युरीन टेस्ट करताना लक्ष ठेवावं लागतं कारण काही वेळेस मुलं टेस्टमध्ये काही आढळून येऊ  नये म्हणून लबाडी करतात आणि मित्रांची युरीन टेस्टला पाठवितात. म्हणून युरीनचा नमुना देताना सावधगिरी बाळगावी लागते. अक्षयशी बोलल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा झाला. त्याला त्याच्या बारावीत शिकणाऱ्या एका मित्राने एकदा सहज गम्मत म्हणून गांजा दिला होता आणि तो ओढायला शिकला. त्याच्या दप्तरात सापडलेली डोळ्यात घालायची औषधांची बाटली त्याने गांजा ओढल्यानंतर येणारा डोळ्याचा लालसरपणा कमी करण्यासाठी जवळ बाळगली होती. घरी जाताना तो डोळ्यात ते औषध घालायचा त्यामुळे पालकांना काही कळायचं नाही.
अक्षयशी बोलताना तो मला वारंवार गांजा ही वनस्पती कशी औषधी आहे, किती उपयुक्त आहे याचे दाखले देऊ  पाहत होता. मीसुद्धा त्याचं म्हणणं शांतपणे आणि त्याचा आदर ठेवून ऐकून घेतलं. ‘‘हे ‘औषध’ तू पुढचे शंभर दिवस घेऊ  नकोस, मग पाहू या आपण काय होतंय ते.’’ असं मी त्याला सुचवलं. ही मुलं वाईट नसतात पण व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्यामुळे त्यांची अवस्था दुख:द झालेली असते. काही वेळेस सिगारेट ओढणारी इतर माणसं घरातच असतात. मग त्या घरातील मुलं स्वत:चं व्यसन सोडायला किंवा त्यापासून काही दिवस दूर राहायला नकार देतात कारण त्यांचे वडीलच त्यांच्यासमोर अशी व्यसनं करीत असतात.
राकेशच्या उदाहरणातही असंच घडत होतं. जेव्हा जेव्हा त्याचे पालक त्याला विरोध करायचे तेव्हा तेव्हा तो अधिक आक्रमक व्हायचा. मी त्याला भेटलो तेव्हा तो नैराश्याने ग्रासलेला वाटला. त्याच्याशी खूप सखोल चर्चा केल्यानंतर त्याच्या घरातील अनेक जण काही ना काही कारणांमुळे नैराश्याने ग्रासलेले असल्याचं कळलं तर दोन नातेवाईकांनी आत्महत्या केल्या होत्या. या सगळ्या परिस्थितीने राकेशचं मन काळवंडलं होतं आणि निराशेचे ढग दाटले होते. मग ते दूर करण्यासाठी या कोवळ्या वयातील मुलाने ड्रग्जचा आधार घेतला होता. आज राकेश एकीकडे उपचार घेत असून दुसरीकडे सिंगापूरमध्ये त्याचं एमबीएचं शिक्षण पूर्ण करतो आहे.
गांजा, भांग, अफूसारख्या अमली पदार्थाची अनेक देशांमध्ये शेती केली जाते आणि त्या देशांमध्ये त्यांची कायदेशीर खरेदी-विक्रीसुद्धा केली जाते. त्यामुळे जगात अनेक ठिकाणी या वस्तू सहज उपलब्ध असतात आणि राजरोसपणे त्यांची तस्करी सुरू असते. शिक्षणासाठी परदेशात गेलेली  मुलं अनेक वेळा जाणते-अजाणतेपणे अशा व्यसनांच्या विळख्यात अडकतात आणि मग त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी पुन्हा घरी आणावं लागतं.  पदवी प्राप्त करण्यासाठी गेलेली मुलं व्यसनाधीनतेमुळे शिक्षण सोडून परत येतात. गांजा, चरस, भांग या अमली पदार्थाचे व्हायचे ते दुष्परिणाम होतातच. कधी उत्सुकतेपोटी तर कधी ‘एकदा अनुभव घ्यायला काय हरकत आहे’ असा विचार बहुतेक मुलं करताना दिसतात. कारणं काहीही असली तरी या प्रकारामुळे कुटुंबावर मोठा आघात होतो. वडील मंडळी मुलाच्या आईवर सगळं खापर फोडतात तर मुलाच्या व्यसनाधीनतेमुळे आणि इतरांच्या बोलण्यामुळे आई पार खचून जाते. पण दोषारोपात वेळ न दवडता जे पालक ही गोष्ट गांभीर्याने घेतात आणि मानसोपचारतज्ज्ञांची किंवा समुपदेशकाची मदत घेतात तिथे आशेचा नवा किरण फुलतो. लगेच मोठा चमत्कार होईल असं नाही पण चांगल्या बदलांची सुरुवात होते. कुणी काही दिवसांत, कुणी काही महिन्यांत तर कुणी वर्षभरात बदलू लागतात. ज्योतीषापेक्षा अशा वेळी समुपदेशक महत्त्वाचा असतो आणि ज्योतिषापेक्षा स्वस्तही.
 एका केसमध्ये पोलीस खात्यातील कर्मचाऱ्याने आपल्या मुलाला तो गांजाच्या आहारी गेला आहे हे कळल्यावर बेदम मारलं होतं. त्या रागाने मुलगा घर सोडून गेला आणि परत आलाच नाही. परिस्थिती वाईट होतीच, पण आता ती अधिकच वाईट झाली. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अति धाक किंवा भीती अशा वेळी काम करीत नाही तर त्यांच्याशी खुलेपणाने बोलणं, त्यांना बोलतं करणं, संवाद साधणं, आधार देणं, नवी उमेद देणं गरजेचं असतं. बरेच वेळा पोलीससुद्धा उत्तम समुपदेशक असतात आणि अल्पवयीन मुलांना व्यसनाधीनतेपासून दूर नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावितात.  
व्यसनाधीनता ही आजकाल फक्त मुलांपुरती मर्यादित राहिलेली नाही तर मोठय़ा प्रमाणावर मुलीसुद्धा याच्या आहारी जाऊ लागल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसांच्या पाटर्य़ामध्ये एक वेळ केक नसतो, पण अमली पदार्थ मात्र हमखास असतात. पालक या गोष्टी नाकारतात किंवा लपवून ठेवतात नाही तर मग दारं-खिडक्या बंद करून मुलांना मारीत बसतात आणि अनेक र्वष हे असंच चालू राहतं, पण यातून काहीच साध्य होत नाही. या गोष्टी लपवून ठेवल्याने नाही तर त्या स्वीकारून त्यावर खुलेपणाने चर्चा करून आणि समुपदेशकाचा  किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन सुटतात.
आम्ही गेली दोन दशकं यावर काम करीत असून सोसायटय़ा, कॉलेज, शाळा परिसर, कॉलेज परिसर, कट्टे इत्यादी ठिकाणी जाऊन व्यसनमुक्तीचं काम करीत आहोत. यामागे हाच उद्देश आहे की, लोकांमध्ये जागृती घडवणं. या जनजागृती अभियानाचा खूप चांगला परिणाम होताना दिसतो आहे. जेव्हा शैक्षणिक संस्था अशा अभियानात पुढाकार घेतात आणि मुलांना सुधारण्याची संधी देतात तेव्हा अनेक कुटुंबं तुटण्यापासून वाचतात. पण अजूनही काही शाळा, महाविद्यालयं अशी अभियानं आपल्या आवारात राबविण्यास नकार देतात तेव्हा काळजी आणि वाईट वाटतं. ‘‘छे छे, आमच्या शाळेत अशी मुलंच नाहीत किंवा आमच्या मुलांना या अभियानाची गरजच नाही,’’ असा अनेकांचा दृष्टिकोन असतो. पण अल्पवयीन मुलांना योग्य वयात व्यसनाधीनतेचे धोके, त्याचे गंभीर परिणाम कळले तर अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील नाही का!  मुलांनी बाहेरून माहिती मिळविण्यापेक्षा त्यांना योग्य आणि शास्त्रोक्त माहिती मिळणं आवश्यक असतं आणि तेच काम आम्ही या अभियानातून करीत असतो. व्यसनाधीनतेचा विळखा समाजाच्या कोणत्याही स्तरातील मुलांना बसू शकतो. त्यात श्रीमंत-गरीब-मध्यमवर्गीय किंवा मुलगी-मुलगा, जात-धर्म असा भेद नसतो. सगळेच भरडले जाऊ  शकतात हे लक्षात घ्यायला हवं. व्यसनाधीनतेचं आव्हान मोठं आहे आणि त्याकडे शाळा-महाविद्यालयांसारख्या शैक्षणिक संस्थांनीसुद्धा गांभीर्याने पाहिलं पाहिजे.
मुलांच्या स्वभावात अचानक आक्रमकता दिसू लागली किंवा ती कमालीची शांत बसू लागली किंवा परीक्षेत सारखी नापास होत असतील, डोळे लाल होत असतील, सारखी घराबाहेर राहत असतील, घरातले पैसे चोरत असतील किंवा वजन कमी होत असेल तर लगेचच एका चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाला किंवा समुपदेशकाला गाठा, कारण अशा वेळी मुलांचं आयुष्य सावरण्यासाठी कुणा ज्योतिषाची नाही तर मानसोपचारतज्ज्ञांची खरी गरज असते.   
डॉ. हरीश श़ेट्टी- harish139@yahoo.com 
शब्दांकन- मनीषा नित्सुरे
(लेखाचा उत्तरार्ध- ४ एप्रिल रोजी)

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय