युगांडातील काटवेच्या झोपडपट्टीत राहणारी एक मुलगी योगायोगाने बुद्धिबळाशी परिचित होते आणि कोणतीही पाश्र्वभूमी नसताना, अंगभूत क्षमतेच्या जोरावर, सरावाने भल्याभल्यांना चीत करते. आफ्रिकन चेस चॅम्पियनशिप जिंकणारी ती आतापर्यंतच्या या खेळाच्या इतिहासातील वयाने सर्वात लहान व्यक्ती आहे. इस्तंबूलमध्ये २०१२ साली झालेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये ‘विमेन्स मास्टर’ हे मानांकन मिळवणाऱ्या फिओना मुटेसीविषयी.
बुद्धिबळ हा एक तर श्रीमंतांचा, नाही तर बुद्धिवंतांचा खेळ मानला जातो. इतरांसाठी मात्र तो मनाला व्यायाम घडवणारा, वेळ घालवण्याचं साधन असलेला खेळ, पण युगांडाची युवती फिओना मुटेसीसाठी मात्र हा खेळ तिचं आयुष्य बदलून टाकणारा ठरला.
२००५ मध्ये नऊ वर्षांची फिओना, युगांडाची राजधानी कम्पाला येथे काटवेच्या झोपडपट्टीत राहणारी एक साधीसुधी मुलगी होती. बुद्धिबळाच्या पटावरचं एक लहानसं प्यादंच म्हणा ना. फिओना तीन वर्षांची असताना तिचे वडील एड्सने वारले. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आता येऊन पडली फिओनाच्या आईच्या खांद्यावर. फिओना आणि तिच्या तीन भावंडांसह गुजराण करण्यासाठी फिओनाच्या आईने मका विकायला सुरुवात केली; पण तरीही त्यांना अनेकदा अर्धपोटी, वेळप्रसंगी उपाशीही राहावं लागत होतं, फुटपाथवर झोपण्याची पाळी आली होती. फिओनाला शाळेत पाठवायची तर ऐपत नव्हती, त्यामुळे एखादं वर्ष शाळेत गेल्यावर तिची शाळा सुटली. त्यामुळे लिहिता-वाचता येण्याचा प्रश्नच नव्हता. कोवळ्या वयातच जीवन जगण्यासाठी प्रत्येक दिवशी संघर्ष करावा लागत होता. झोपडपट्टीतील लोकांचा मुलांना शाळेत पाठवण्यापेक्षा दोन पैसे कमवायला लावण्याचा कल होता. ती त्याचाच एक भाग होती.
एक दिवस फिओना ‘स्पोर्ट्स आऊटरिच मिनिस्ट्री’ या कम्पालाच्या एका धर्मादायी, सेवाभावी संस्थेकडे गेली. ती तिथे वेगळ्या कामासाठी गेली होती, पण योगायोगाने तिथे तिला बुद्धिबळाविषयी कळलं; पण त्या खेळाला तिच्या स्थानिक भाषेत पर्यायी शब्द नव्हता. तिने पूर्वी कधीही बुद्धिबळ खेळताना पाहिलेला नव्हता; पण तो पाहिल्यावर तिचं कुतूहल जागृत झालं. ती खेळायला लागली. तिचा बुद्धिबळामधला पहिला विजय तिने एका मुलाबरोबर मिळवला. अर्थात तो काही तिला सहजी मिळालेला नव्हता. जेव्हा ती त्याच्याबरोबर खेळायला बसली तेव्हा पहिल्याच डावात त्याने फक्त पाच खेळी केल्या आणि खेळ संपला होता. तो पुन:पुन्हा तिला हरवत होता. मग मात्र फिओनाला प्रतिकार कसा करायचा ते शिकवण्यात आलं. तीही ते परिश्रमपूर्वक शिकली आणि पुन्हा एकदा त्या मुलाबरोबर खेळायला बसली..  या वेळी मात्र तिने अशा काही खेळी केल्या, की तिचं जिंकणं अपरिहार्य होतं आणि त्याचं हरणं इतकं दारुण होतं की, तो मुलगा अक्षरश: रडला.
 एकदा खेळ कळल्यावर मात्र त्याचं तिला वेडच लागलं. दिवसा खेळायचीच, पण रात्रही तिला अस्वस्थ करायची. ती रॉकेलच्या दिव्याखाली रात्र-रात्रभर खेळाचा सराव करत राहायची. थोडय़ाच दिवसांत गल्लीतला तिचा कोच रॉबर्ट यालाही ती हरवू लागली. मूव्ह घेण्यात ती अचूक होती. या खेळात तगून राहणे महत्त्वाचे असते आणि प्रतिकूल परिस्थितीत कसे जगायचे याचे धडे झोपडपट्टीतल्या आयुष्याने तिला दिलेच होते.  
युगांडामध्ये पुरुषी वर्चस्व असलेल्या या खेळात, सगळ्या कठीण परिस्थितीवर मात करत फिओना नाव मिळवू लागली. २००७ मध्ये ती युगांडाची नॅशनल विमेन्स ज्युनिअर चॅम्पियन झाली आणि त्याच्या पुढच्या वर्षीदेखील तिने तिचे ‘टायटल’ टिकवून ठेवलं. २००९ मध्ये ती इंटरनॅशनल चिल्ड्रन्स चेस टुर्नामेंटसाठी सुदानला गेली. तिने तेव्हा प्रथमच विमान बघितलं. एखाद्या हॉटेलात उतरण्याचीदेखील तिची ती पहिलीच वेळ होती. तिच्या रस्त्यातल्या घराच्या तुलनेत तो एक स्वर्गच होता. तिथे खाण्या-पिण्याची-झोपण्याची व्यवस्था घरच्या आयुष्याच्या तुलनेत उत्कृष्टच होती; पण घरी परतल्यावर काय? पुन्हा तीच उपासमार.. तेच रस्त्यावरचं जगणं..
पण एक मात्र झालं, तिची बुद्धिबळाविषयीची आवड अधिकाधिक वाढली. सुदानमध्ये जिंकल्यावर ती २०१०च्या सैबेरियाच्या ऑलिम्पियाडसाठी पात्र ठरली. फिओना तिथला अनुभव सांगते, ‘‘तिथे खूप खूप थंडी होती- माझ्यासाठी ती थंडी इतकी वाईट होती की, मी चांगली कामगिरी केली नाही- पण मला निदान एक चांगला अनुभव मिळाला.’’
झोपडपट्टीतल्या या लहान मुलीची आता आफ्रिकेच्या बाहेरचे लोक दखल घ्यायला लागले होते. खेळांवर लेखन करणाऱ्या स्पोर्ट्स रायटर टिम क्रॉथर्सने तिच्याबद्दल एक पुस्तक लिहिलं- ‘द क्वीन ऑफ कारवे : ए स्टोरी ऑफ लाइफ, चेस अ‍ॅण्ड वन एक्स्ट्रा ऑर्डिनरी ड्रीम ऑफ ए ग्रॅन्डमास्टर..’
 इस्तंबूलच्या २०१२ च्या चेस ऑलिम्पियाडमध्ये वर्ल्ड चेस फेडरेशनकडून ‘विमेन्स मास्टर’ हे बिरुद बहाल करण्यात आलं. या वर्षीच्या नॉर्वेत होणाऱ्या चेस ऑलिम्पियाडसाठी ही टीनएजर सध्या तयारी करते आहे.
 रॉबर्ट काटेंडे, स्पोर्टस आऊटरिच मिनिस्ट्रीचे निर्देशक आणि फिओनाचे सुरुवातीपासूनचे प्रशिक्षक, तिच्या भवितव्याविषयी आशावादी आहेत. तिच्या प्रतिस्पध्र्याइतकी साधनसामग्री तिच्याकडे नसल्याने, तिची क्षमता पूर्णत्वाने गाठण्यासाठी तिला कदाचित परदेशी जावं लागेल, असं त्यांचं मत आहे, कारण सैबेरियाच्या ऑलिम्पियाडच्या वेळी तिने बुद्धिबळावरची ना पुस्तकं वाचली होती, ना तिला  संगणकावरच्या बुद्धिबळाची कल्पना होती. तिचं स्वप्न इथे राहून तिला पूर्ण करता येणार नाही, असं त्यांना वाटतं.
आनंदाची गोष्ट म्हणजे तिच्या कामगिरीमुळे झोपडपट्टीतून निघून फिओना आता तिच्या कुटुंबासह एका घरात राहायला गेली आहे. फिओना आता सतरा वर्षांची आहे आणि सध्या शाळेत शिकत आहे. ती इतरांनाही बुद्धिबळ शिकवते. एक डॉक्टर आणि ग्रँडमास्टरही बनायचं तिचं दुहेरी स्वप्न आहे.
‘‘बुद्धिबळाने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलंय. माझ्यापुढे आता एक उद्दिष्ट आहे आणि मला खूप गोष्टी करायच्या आहेत.. जगाच्या बऱ्याच भागांत मी बुद्धिबळामुळेच जाऊन आलेय. मला डॉक्टर व्हायचंय, कारण मी झोपडपट्टीत राहात असताना मुलांचे हाल होत असलेले बघितले आहेत, त्यामुळे मला डॉक्टर होऊन त्यांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली आहे,’’ असे फिओना सांगते.
फिओना आता तिच्या देशात एक आयकॉन आहे- जगभरातील लोकांसाठी ती एक प्रेरणा आहे. काटेंडे म्हणतात, ‘‘जगभरात सर्वत्रच असे वेगवेगळ्या क्षेत्रांत धडपडणारे अनेक जण असतात. त्यांच्यापुढे बरीच आव्हानं असतात. काही जण ती आव्हानं पेलतात, तर कित्येकांची आशा मावळून जाते. फिओनाच्या कहाणीमुळे इतरांनाही हुरूप येईल.’’
 सप्टेंबर २०१३ मध्ये फिओना कुटाया शफिक या प्रतिस्पध्र्याबरोबर खेळली आणि तिने त्याला पराभूत केलं. तिने ‘युगांडा नॅशनल ज्युनिअर चेस चॅम्पिअनशिप’ची ट्रॉफीही मिळवली आहे. आफ्रिकन चेस चॅम्पियनशिप जिंकणारी फिओना आतापर्यंतच्या या खेळाच्या इतिहासातील वयाने सर्वात लहान व्यक्ती आहे.
 एनवायसिटी येथे ‘विमेन इन द वर्ल्ड’ कार्यक्रमात सादर केलेल्या जगभरातील स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतलेले, उद्योजक, राजकारणी यांच्यासारख्या सेलिब्रिटीजच्या मेळाव्यात, दोन अगदी वेगळेच बुद्धिबळपटू उपस्थित होते. पूर्वीचा वर्ल्ड चॅम्पियन गॅरी कास्पारॉव्ह आणि टीनएज चेस क्वीन फिओना मुटेसी.. कास्पारॉव्हने चेस आणि युगांडाच्या टीनएजर फिओना मुटेसीच्या अस्तित्वाच्या लढाईबद्दल आणि परिस्थितीवर मिळवलेल्या विजयावर भाषण केलं.. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला- त्या कहाणीने त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले. कास्पारोव्ह आणि फिओना नंतर बुद्धिबळाचा एक डावदेखील खेळले.
सर्वसामान्य रंगरूपाची, किरकोळ शरीरयष्टीची, पण दुर्दम्य आशावादी आणि प्रबळ मनोबलाची किशोरी फिओना एक दिवस तिचं डॉक्टर आणि ग्रॅण्डमास्टर बनण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल, हे निर्विवाद. मात्र बुद्धिमत्ता ही कुणा एका गटाची मक्तेदारी नसून ती ईश्वरी देणगी असल्याचे सिद्ध करणारी ही युवती म्हणजे हजारोंसाठी आदर्श आहे.ल्ल
शोभना शिकनीस, या ‘चतुरंग’च्या ज्येष्ठ लेखिका. त्यांनी ‘चतुरंग’वर भरभरून प्रेम केलं आणि म्हणूनच अनेक लेख लिहून ‘चतुरंग’च्या यशाला सक्रिय हातभार लावला. अशा या गुणी लेखिकेचे  ५ सप्टेंबर २०१४  रोजी निधन झाले. मृत्यूपूर्वी ‘चतुरंग’साठी लिहून ठेवलेल्या काही लेखांमधील हा एक लेख. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली.