28 January 2020

News Flash

ब्रेक-अपनंतर

ब्रेक-अप झाला की त्यामध्ये माझा वाटा किती, हा प्रश्न स्वत:ला विचारायचा आणि परखड, प्रामाणिकपणे त्याची उत्तरे लिहून काढायची. असे ब्रेक-अप अचानक घडत नसतात. अनेक घटनांची

| December 1, 2012 05:04 am

ब्रेक-अप झाला की त्यामध्ये माझा वाटा किती, हा प्रश्न स्वत:ला विचारायचा आणि परखड, प्रामाणिकपणे त्याची उत्तरे लिहून काढायची. असे ब्रेक-अप अचानक घडत नसतात. अनेक घटनांची उतरंड त्या पाठीमागे असते. त्या प्रत्येक घटनेत माझा वाट किती? कदाचित अगदी अल्प असेल, पण तरीही तो लिहून काढायचा. हा गृहपाठ केल्यावर लक्षात येईल आपणसुद्धा या ब्रेक-अपला जबाबदार आहोत..
ब्रेक-अप अपरिहार्य असेल तर  या ब्रेक-अपचे करायचे काय, हा प्रश्न पडणारच.
गेल्या लेखाबाबत (१७ नोव्हेंबर) एका स्त्रीने एक प्रतिक्रिया कळवली. ती आधी सांगतो. ती म्हणते, ‘‘लग्नापूर्वी ब्रेक-अप झाला तर वय त्यांच्या बाजूला असते, समोर पूर्ण आयुष्य असते त्यामुळे तो ब्रेक-अप विवाह झाल्यानंतरच्या ब्रेक-अप इतका त्रासदायक नसावा. परंतु लग्नानंतर जोडीदाराचे अकस्मात निधन किंवा जोडीदाराच्या वाईट वर्तनामुळे विभक्त राहण्याची वेळ येणे किंवा घटस्फोट यात अधिक त्रास होतो.’’
एका युवतीने कळवले आहे की लग्नापूर्वीच माझा ब्रेक-अप झाला असून मी विलक्षण खचले आहे आणि त्यातून बाहेर कसे पडावे मला समजत नाही.  ‘ब्रेक-अपग्रस्त’ निखिलचा फोन आला होता, ‘ कितीही ठरवले विसरायचे दुसऱ्या गोष्टीत गुंतवून घ्यायचे तरी जमत नाही. एक वेळ दिवस जातो चांगला, पण रात्र खायला उठते. रात्री दोन दोन वाजेपर्यंत उगाचच फेसबुकवर बसतो, टीव्ही बघतो नाही तर फालतू काही तरी वाचायचा प्रयत्न करतो. कितीही म्हटले तरी गेली पाच वष्रे आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. खूप स्वप्ने पाहिली होती. खूप काही ठरवलं होतं. ते विसरायचे कसे? रात्र ही माझा एक नंबरचा शत्रू झाली आहे. सूर्याने मावळूच नये, असे वाटते. अशा जागरणांमुळे तब्येतीवर परिणाम होऊ लागला आहे.
  तात्पर्य: ब्रेक-अप लग्नापूर्वी झालेला असो किंवा नंतर, ब्रेक-अप हा ब्रेक-अप असतो आणि त्याचे परिणाम सबंध जीवनावर होत असतात. या वेळेला खरा कोणाचा तरी आधार हवा असतो. मनात जे येते ते भडभडा कोणाशी तरी बोलून टाकावे असे वाटत असते. आपल्या डोळ्यातल्या अश्रूंना मोकळी वाट करून देण्यासाठी विश्वासार्ह खांद्याची आवश्यकता असते. पण..
आपले जवळचे जे कोणी असतात ना ते प्रथम सहानुभूती दाखवतात. आणि मग सांगतात, चल विसरून जा. शांत हो. काळ हेच औषध असते बरे! हे शब्द कितीही अर्थपूर्ण असले तरी त्यातून एक तर स्वत:ची आणखीनच कीव वाटू लागते किंवा त्या मंडळींशी बोलूच नये असे वाटायला लागते. आपल्या जवळची माणसेसुद्धा आपल्या नेमक्या भावना समजून घेत नाहीत, असे वाटून अधिक एकाकी वाटू लागते. आणि मग कितीतरी दिवस मुखवटे घालून वागायचे. छुपे नैराश्य!
घटस्फोट झालेल्या मुला-मुलींची तर वेगळीच समस्या असते. कागदपत्रे मिळण्यापूर्वीच त्यांचे पालक त्यांच्या लग्नाची तयारी सुरू करतात. अशीच एक मुलगी भेटायला आली होती. म्हणाली, ‘‘आईला लग्नाची इतकी घाई की मी घरात नकोशी आहे का, असेच विचार येत राहतात. मी तयार आहे पुन्हा लग्न करायला, असं मी सांगितलय याचा अर्थ मला कुणाच्या तरी गळ्यात बांधणे हेच एकमेव काम आहे, असे माझे पालक समजू लागले तर त्रासदायक व्हायला होणारच.’’
 मध्यमवयात घटस्फोट किंवा विभक्त राहणे किंवा जोडीदाराचे निधन झाले असेल तर त्यांची स्थिती सर्वात वाईट असते. विशेषत ती जर स्त्री असेल तर आता मोठी मुले असताना तिचे उर्वरित जीवन मुलांचे शिक्षण, नोकरीत जाईल, असे गृहीत धरले जाते. सुरुवातीला सहानुभूतीचा वर्षांव होतो आणि नंतर जवळचेसुद्धा विशेष लक्ष देत नाहीत. एकदा तिच्या नशिबाला बोल लावला की तिच्या प्रश्नांपासून सोडवणूक करून घ्यायला बसलेलेच असतात.
अर्थात काही जण जीवनातील प्रश्न अधिक प्रगल्भपणे सोडवण्याचे शहाणपण घेऊनच जन्माला येतात. जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही ती प्रसन्नपणे स्वीकारण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे त्यांना पक्केमाहिती असते. कोणत्याही माणसाच्या जीवनात सर्व काही आपल्या मनासारखे होत नाही, या वस्तुस्थितीची त्यांना जाणीव असते. जीवनात अचानक, अकस्मात, वैऱ्यानेही कल्पना केली नसेल असे केव्हाही-कधीही घडू शकते या सत्याचे त्यांना भान असते. कितीही वाईट परिस्थिती समोर उभी राहिली तरी त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची कौशल्ये त्यांनी आत्मसात केलेली असतात.
अशा माणसांना ब्रेक-अपला सामोरे जाणे इतकेच नव्हे तर तो पचवणे तुलनेने खूपच सोपे जाते. परंतु अशी माणसे एकूण समाजातच कमी असतात. पण इथे मला परिणिताचे उदाहरण सांगावेसे वाटते. ती माझी मानलेली बहीण. नवरा दारुडा, प्रचंड िहसक. दहा-बारा वर्षे संसार केला पण जेव्हा दारूच्या धुंदीत तिचा कानच फाडला तेव्हा ती दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडली. सुंदर होती, तरुण होती, पण लग्नाचा विचार काही केला नाही. मुलांचे शिक्षण पूर्ण केले आणि माहेरचा अजिबात पाठिंबा नसताना स्वबळावर उभी राहिली. आज एक कार्यक्षम कार्यकर्ती, उत्तम पालक म्हणून ती ओळखली जाते. ती नेहमी सांगते : परिस्थिती कमालीची वाईट होती, छोटय़ा शहरात एका बाईने एकटीच्या बळावर व्यवसाय करणे आव्हान होते. त्यात आसपासच्या पुरुषांच्या हपापलेल्या नजरा. पण तिने ठरवले नशिबाला दोष देण्यात अर्थ नाही.( तिचा प्रेमविवाह तोही घरच्यांना डावलून) आहे ही परिस्थिती अशी आहे. एक एक दिवस करीत पुढे जायचे. फार मोठे उद्दिष्ट ठेवायचे नाही. एक उद्दिष्ट सफल झाले की पुढचे. या प्रवासात अनेकदा अपयश आले. पण तिच्या मते अपयश बरेच काही शिकवून जाते. तशी ती शिकत राहिली. परिस्थितीला तोंड देत देत तिचा स्वीकार कधी करायचा आणि परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न कधी करायचा याचे शहाणपण तिला गवसले. हे सारे एक-दोन वर्षांत झाले नाही मान्य. पण जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही त्यांचा स्वीकार करण्यावाचून पर्याय नसतो हा तिचा बेस पक्का होता.
लग्नापूर्वी किंवा नंतर झालेल्या ब्रेक-अपमध्ये जे अडकलेले असतात त्यांच्या बाबतीत एक मोठा घोटाळा असतो. श्रेष्ठ विचारवंत जे. कृष्णमूर्ती यांनी काळाचे दोन भाग असतात असे वर्णन करून सांगितले आहे. एक असतो आपल्या सगळ्यांना माहिती असलेला काळ. म्हणजे आपले कॅलेंडर, घडय़ाळ यात असणारा काळ आणि दुसरा म्हणजे आपल्या मनात असलेला काळ. म्हणजे असे की प्रत्यक्षात आपले शरीर घडय़ाळाबरोबर असते. मन मात्र दुसरीकडेच कुठेतरी असते. कधी भूतकाळात कधी भविष्यात ज्याला आपण म्हणू शकतो सायकॉलॉजिकल टाइम वा मानसिक वेळ. अनेक जणांना फिजिकल वा शारीरिक वेळ आणि मानसिक वेळ यामध्ये अदलाबदल करीत जगायची सवयच लागलेली असते. मानसिकरीत्या स्वस्थ माणूस जास्तीत जास्त काळ घडय़ाळाबरोबर चालत असतो. आत्ता इथे या क्षणी काय घडते आहे? या क्षणी मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, याचे उत्तर शोधावे म्हणून तो क्षणभर भूतकाळात जाऊन अनुभवाची पोतडी उघडतो आणि हव्या त्या क्षणात परतून योग्य तो निर्णय घेतो. म्हणजेच भूतकाळ हा फक्त आपला संदर्भग्रंथ आहे हे त्याला पक्के ठाऊक असते. पण अनेक जण ‘आत्ता’च्या क्षणातून संदर्भ घेण्यासाठी  भूतकाळात जातात आणि तिथेच रेंगाळतात. आणि कित्येकांची अवस्था अशी होते की त्यांचा भूतकाळ संदर्भग्रंथाऐवजी मुख्य पुस्तकच बनून जाते. आणि प्रत्यक्षाशी म्हणजेच वर्तमानाशी संपर्क तुटतो.
आभाचा नवरा आदित्य अचानक अपघातात गेला. त्याचे वय अवघे बेचाळीस. आभा अडतीस वर्षांची. एकच मुलगा. आदित्य जाऊन दोन वर्षे झाली तरी आभा सावरलेली नाही. तिला प्रचंड एकाकी वाटते. संध्याकाळी जेव्हा घरी एकटीच असते तेव्हा रडू येते. कुठलीही हौस-मौज नाही. तो गेल्यापासून स्वतसाठी एकही गोष्ट तिने घेतलेली नाही. नोकरी केवळ पसे मिळतात आणि मुख्य म्हणजे वेळ जातो म्हणून ती करते. हे सगळे ऐकल्यावर मी म्हणालो, ‘आभा तू ‘मानसिक वेळे’च्या चौकटीतून बाहेर कधी येणार?’ काहीही निमित्त झाले की आदित्यची आठवण काढत बसतेस. आठवण येणे चुकीचे नाही. काही गोष्टी विसरा, असे अनेकांनी सांगितले तरी विसरता येत नाहीत हेही मान्य. पण याचा अर्थ आठवणींचा उपयोग करून घ्यायला शिकायचेच नाही असा नाही. तू म्हणतेस आदित्यला साडी आवडायची म्हणून तू साडी नेसणे बंद केले आहेस. म्हणजे अजून तो बरोबर असल्यासारखेच वागत आहेस. तू त्या आठवणीतून शिकू शकतेस. त्याची आठवण आली की म्हण ‘त्याच्या आवडीच्या रंगाची साडी नेस्तीय बरं का!’ समजा, त्याला बिर्याणी आवडत असेल तर त्या आठवणीतून बाहेर ये आणि ठरव, ‘त्याला आवडते तशी बिर्याणी करीन,’ अशा काही युक्त्या आत्मसात कराव्या लागतात. एका काळातून दुसऱ्या काळात प्रयत्नपूर्वक उडी मारावी लागते.
काळ सोकावतो म्हणतात तो माझ्या मते हाच मानसिक काळ.
या व्यतिरिक्त काही गोष्टी करून बघण्यासारख्या आहेत. त्या लग्नापूर्वीच्या आणि घटस्फोट यांसारख्या कारणांनी झालेल्या ब्रेक-अपबद्दल आहेत.
या ब्रेक-अपमध्ये माझा वाटा किती हा प्रश्न स्वत:ला विचारायचा आणि परखड, प्रामाणिकपणे त्याची उत्तरे लिहून काढायची. असे ब्रेक-अप अचानक घडत नसतात. अनेक घटनांची उतरंड त्या पाठीमागे असते. त्या प्रत्येक घटनेत माझा वाट किती? कदाचित अगदी अल्प असेल पण तरीही तो लिहून काढायचा. हा गृहपाठ केल्यावर लक्षात येईल आपणसुद्धा या ब्रेक-अपला जबाबदार आहोत. सलीलने असे लिहिल्यावर त्याला जाणवले अनुप्रीता गेली चार वर्षे सांगत होती, ‘‘करिअरकडे लक्ष दे, व्यायाम कर, जरा नीटनेटका राहा, सिगारेट कमी ओढ, इतर मुलींशी वागताना फार मोकळेपणाने वागू नकोस.’’ पण सलीलची भूमिका अशी होती- ‘ मी हा असा आहे.’ मग अनुप्रीताने एक दिवस ‘आपले जमेल असे वाटत नाही’ म्हटले तर तो दोष फक्त अनुप्रीताचा कसा?’ मी त्याला सांगितले तू जर यातील तुझी जबाबदारी स्वीकारलीस तर तुला त्रास कमी नाही का होणार?
असे परखड आत्मपरीक्षण करण्यावाचून पर्याय नाही. आणि यातून पुष्कळ शिकायलासुद्धा मिळते. सलील आता म्हणतो, ‘‘मैत्रिणीची गर्लफ्रेण्ड करण्यापूर्वी मी माझे हे दोष आहेत ते मी कमी करण्याचा प्रयत्न करीन, पण खात्री देता येत नाही. किती काळात हे दोष कमी होतील हे मी आत्ता सांगू शकत नाही. पटलं तर हो म्हण,’’ अशीच माझी भूमिका असेल.
ब्रेक-अपशी जुळवून घेणे आणि नव्याने पुन्हा चांगले जीवन जगणे अवघड निश्चित आहे पण अशक्य नाही. फक्त स्वत:चे स्वत: बाहेर पडता येत नसेल तर चांगल्या समुपदेशकाची मदत जरूर घ्यावी. अगोदर त्रास झालाच आहे त्यात खितपत पडणे योग्य नाही.

First Published on December 1, 2012 5:04 am

Web Title: after breakup
टॅग Relationship
Next Stories
1 सुख आणि दु:ख
2 दोसा एक, चवी अनेक
3 तुही यत्ता कंची?
Just Now!
X