विमानाचा कप्तान ध्वनिक्षेपकावरून ‘घाबरू नका’ म्हणायला लागला. माझं मन मला सांगत होतं, ‘शांत, श्वासाकडे लक्ष दे.’ पण घाबरलेही असणार. कारण थोडय़ा वेळाने मला लक्षात आलं मी सीटला पकडून फक्त एकच वाक्य म्हणते आहे, ‘आय अ‍ॅम सेफ, मी सुरक्षित आहे!’ त्या क्षणी एकदम सकारात्मक विचार शिकवणारी ‘लुईस एल हे’ ही लेखिका आठवली. ‘तू मागशील ते होईल’ म्हणणारी. आतल्या आत काहीसं गोळा झालं. कुठूनसा एक खोल शांतपणा जाणवायला लागला आणि मी शांतपणे आयुष्याला म्हटलं, ‘ए थांब रे मित्रा.. एवढय़ात नाही. अजून खूप काही राहिलं आहे. आता नाही. आत्ता नाही,’ एवढंच म्हणत राहिले. किती वेळ कुणास ठाऊक. विमानाचं गदगदणं शांत होत अखेर थांबलं..

मलेशियाच्या विमानाचं गूढ जेव्हा वाढत चाललं होतं तेव्हा मला आठवला तो माझा विमानप्रवास. अगदी काहीच दिवसांपूर्वी मी बर्लिनला निघाले होते. मुंबईहून झुरिच साधारण सात तासांचं अंतर मग झुरिच ते बर्लिन हा साधारण तासा-दीड तासाचा छोटासा विमानप्रवास. तो प्रवास अगदी नेहमीच्याच विमानप्रवासासारखा सुरू झाला. सुंदर हवाईसुंदरीनं गोड हसत बसायची जागा दाखवली. सामान ठेवलं गेलं. माझ्याबरोबर डॉ. मोहन आगाशे होते, त्यांचा ‘घाशीराम कोतवाल’ हा चित्रपट बर्लिन मोहोत्सवात दाखवला जाणार होता आणि माझा ‘किल्ला.’ मला सोबत व्हावी म्हणून त्यांनी खास माझ्या विमानाचं तिकीट काढलं होतं. आमच्या आत्ताच्या या विमानात तुरळक प्रवासी होते. जर्मन वेळेनुसार मध्यरात्रीतून आम्ही पहाटेच्या झुंजूमुंजूत प्रवेश करणार होतो. नेहमीप्रमाणे सुरक्षाव्यवस्था दाखवायला सुरुवात झाली. मला ते प्रात्याक्षिक दाखवणाऱ्या हवाईसुंदरीची नेहमी दया येते. फारसं कुणीच तिच्याकडे लक्ष देत नाही, कधीच. ती पण त्यामुळे यंत्रवत हातवारे करते. विमानात भले रंगमंच नसेल पण ती आपल्या सगळ्यांसमोर उभी असते ना.. भले ती जे करते ते नाटक नसेल पण ती काही तरी सांगू पाहत असते ना. रंगमंचावरून आपण काही सांगू पाहतो आहोत आणि समोरचे प्रेक्षक जर आपल्याकडे ढुंकून न पाहता आपसांत गप्पा मारत राहिले तर..? कलाकाराला कसं वाटेल? माझ्या स्वत:च्या अनुभवावरून सांगते, ‘रंगमंचावरचा कलाकार प्रेक्षकाच्या छोटय़ातल्या छोटय़ा हालचालीला ‘टय़ुन्ड’ असतो. छोटय़ातल्या छोटय़ा आवाजालासुद्धा. एका जांभईचा आवाज मी रंगमंचावर असेन तर पोटात खड्डा पाडतो. या सगळ्यामुळे असेल, पण मी हवाईसुंदरीच्या त्या यंत्राविष्काराकडेसुद्धा एखादी महान कलाकृती पाहिल्यासारखी पाहते. जर चुकून तिचे माझे डोळे भिडलेच तर निदान एक कुणी तरी आपलं ऐकतं आहे याचा तिला दिलासा.. तसा याही सुंदरीला मी दिलासा दिला. मुळात तिचं काहीच कधीच मन लावून ऐकावसं वाटत नाही कारण ती सांगते तशी आपत्कालीन स्थिती आपल्यावर कधी येणारच नाही, अशी खात्री वाटत असते. ती का वाटते? जसं, अजूनही मला मी कधीच मरणार नाही, असं वाटत असतं. ‘मरण’ मी कधी खरंच आतून स्वीकारेन? बहुधा म्हातारं झाल्यावर. विमान अपघात फक्त इतर विमानांचेच होतात, युद्धं फक्त आपल्यापासून लांबच होतात, बॉम्बस्फोटसुद्धा! हे माझ्या मनाला कशामुळे वाटतं? अगदी कबुतरखान्याजवळ बॉम्बस्फोट झाला तेव्हा मी दादर स्टेशनजवळ एका दुकानात होते. मला वाटलं, कुणी तरी फटाका फोडलाय. माझ्या आसपासच्यांनाही तेच वाटलं. जे नाही बघायचं ते नाही बघायचं ही मनाची शक्ती अफाट आहे. त्याचमुळं त्या सुंदरीचं सांगणं न ऐकण्याची बेफिकिरी माझं मन करू धजतं. तर तिला वरवर ‘ऐकतेय हं’ असं दाखवलं. मात्र माझी आवडती सूचना मात्र लक्ष देऊन ऐकली. विमानातल्या सुरक्षा सूचना कधी कधी आयुष्य जगण्याची दृष्टी देऊन जातात. त्यातलीच ही सूचना. ‘विमानातला प्राणवायू काही आपत्कलीन स्थितीत कमी झाल्यास ऑक्सिजन मास्क सीटच्या वरच्या भागातून खाली येतील. आधी स्वत:चा मास्क लावा, मग दुसऱ्याला मदत करा.’ ‘परोपकार म्हणजे स्वत:वर कधीच उपकार न करता फक्त दुसऱ्यावरच उपकार’ असं घट्ट मनात बसलं आहे. त्यामुळे फार गोंधळाची स्थिती होते बऱ्याचदा. स्वत:चाच मास्क लावला नाही तर दुसऱ्याचा मास्क लावायला आपण जिवंत तरी कसे रहाणार? विमानातली ही सूचना हे मी माझ्या आयुष्यात ऐकलेलं फार मोठं सुभाषित वाटतं मला. ते मी नेहमीप्रमाणे कान देऊन ऐकलं. विमानानं उडण्याआधीचं चालणं सुरू केलं. विमानात माणसं कमी असल्याने कुठंही बसायची मुभा होती. मी ‘सूर्योदय सगळ्यात छान कुठून दिसेल’ याचा अंदाज घेत पटापट खिडक्या बदलल्या. कारण आता लवकरच ‘बेल्ट लावा’ची सूचना येईल हे मला माहीत होतं आणि तशी ती आलीच. मी सूर्यासमोरची जागा पकडून बेल्ट लावला. आगाशे माझ्या पुढच्या सीटवर होते. विमानानं हळूहळू वेग पकडला आणि एका क्षणी ते हवेत झेपावलं. मी खोल श्वास घेऊन नकळत हात जोडले. हा क्षण मी नेहमी जुळवते. विमानानं जमीन सोडायचा आणि माझ्या नमस्काराचा क्षण. आता इतक्या सगळ्या विमानप्रवासानंतर माझं आणि कुठल्याही विमानाचं या बाबतीतलं टायमिंग सवयीच्या तबलजीबरोबर समेवर येण्याइतकं सहज झालं आहे. हा विमानानं जमीन सोडण्याचा क्षण.. फार थरारक असतो. माझ्या नमस्काराच्या ‘टायमिंग’नंतर विमान नेहमीप्रमाणे हवेत स्थिरावलं. त्याचा सुंदर देखावा दाखवायला सुरुवात केली. मी त्याच दिवशी ‘आंद्रे वायदा’ नावाच्या दिग्दर्शकाच्या आत्मचरित्रात त्यानं विमानातनं पाहिलेल्या जांभळ्या आकाशाचं केलेलं वर्णन वाचलं होतं. ‘वायदासारखा चित्रपट बनवण्याचं स्वप्नं पाहाण्याआधी निदान त्याला आकाशात जे रंग दिसले ते तरी पाहू या’ या विचारानं मी आभाळाकडे टक लावून बसले होते. जगातला कुठलाही सूर्योदय मला माझ्या आजोळी- रहीमतपूरलाच- घेऊन जातो आणि एका शेतासमोर आजीशेजारी उभं राहून म्हटलेला गायत्रीमंत्र कानात सुरू होतो. तसाच तो आजही सुरू झाला. गायत्री मंत्र, देवा तुझे किती सुंदर आकाश, पसायदान, असं काय काय एकापाठोपाठ एक आठवायला लागलं. ते गुणगुणल्यासारखं म्हणत मी समोरच्या आकाशाकडे पाहत राहिले. केशरी आभाळ, सोनेरी प्रकाश, कोवळं ऊन. एक दैवी तंद्री. माझी ती तंद्री भंग न करता हवाईसुंदरीनं हळूच ‘कुठलं ज्यूस?’ विचारलं. मी समोरच्या आभाळाच्या रंगाचं केशरी संत्र ज्यूस घेतलं. तोच.. विमान थोडं हलू लागलं. मी कुठल्याशा आत्मिक पातळीवर होते. विमान आकाशात होतं त्याच्याही वर. तिथून अचानक आकाशातल्या विमानातल्या जमिनीवर आले. हातातलं ज्यूस अचानक गदागदा हलत होतं. समोर ‘बेल्ट लावा’ ची खूण सूर्यप्रकाशाइतक्याच सोनेरी रंगात तळपत होती. पण त्याचं एवढं काही वाटलं नाही. विमानप्रवासात कधी कधी एवढं चालायचंच. ज्यूस सांडू नये म्हणून जरा मोठमोठे घोट घ्यायला लागले. विमान आता अजूनच गदगदायला लागलं होतं. हवाईसुंदरीच्या चेहऱ्यावरचं हसू मावळण्याइतपत. मी खोल श्वास घेतला. सुंदरी माझ्या पुढच्या  सीटवरच्या आगाशांना त्या गदगदण्यातही अगत्यानं विचारत होती, ‘तुम्ही काय पिणार?’ त्यांनी मागितलेलं ज्यूस तिनं त्यांच्यासमोर धरलं. त्या क्षणी विमानाला एक जोरदार हादरा बसला. तिच्या हातातला ग्लास आगाशांच्या अंगावर सांडला. विमान आता वेडंवाकडं हलायला लागलं. सुंदरीनं तिच्या हातातली ट्रॉली कशीबशी पकडली. तिचा झोक जायला लागला. विमानाला जोराचे हिसके बसायला लागले होते. सुंदरी धडपडत झोके खात त्या ट्रॉलीसकट तिच्या मूळ जागेवर जायचा प्रयत्न करू लागली. माझ्या हातातलं ज्यूस कधीच हिंदकळून जमीनदोस्त झालं होतं. माझ्या शेजारच्या खिडकीतली जर्मन बाई आता कोटात तोंड खुपसून किंचाळायला लागली होती. आगाशे शांत होते. समोरच्या बाजूनेही काही ओरडायचे आवाज यायला लागले. विमानाचा कप्तान ध्वनिक्षेपकावरून ‘घाबरू नका’ म्हणायला लागला. मी आधी म्हणत असलेल्या श्लोकांमुळे असेल, शांत होते. माझं मन मला सांगत होतं, ‘शांत, श्वासाकडे लक्ष दे.’ पण घाबरलेही असणार. कारण थोडय़ा वेळानं मला लक्षात आलं मी सीटला पकडून फक्त एकच वाक्य म्हणते आहे, ‘आय अॅम सेफ, मी सुरक्षित आहे, मी सुरक्षित आहे!’ कप्तान ध्वनिक्षेपकावरून सांगत राहिला. ‘सोसाटय़ाचा वारा लागला आहे’ अशा अर्थाचं काहीसं जर्मन -इंग्रजीमध्ये. शब्द आत पोचत नव्हते. एकदम वाटलं, कुठल्याशा सिनेमाचं शूटिंगच चालू आहे आपलं. आता कॅमेरा वेडावाकडा फिरत आहेत. आता नायिकेला तिच्या जवळच्यांचे चेहरे दिसणार. नवरा, आई, बाबा.. एकदम मला बर्लिनमध्ये होणार असलेल्या माझ्या चित्रपटाचा खेळ दिसला. आता जर सगळं संपलं तर मला श्रद्धांजली वाहून पुढे सुरू होणार असलेला. त्या क्षणी एकदम सकारात्मक विचार शिकवणारी ‘लुईस एल हे’ ही लेखिका आठवली. ‘तू मागशील ते होईल’ म्हणणारी. आतल्या आत काहीसं गोळा झालं. कुठूनसा एक खोल शांतपणा जाणवायला लागला आणि मी शांतपणे आयुष्याला म्हटलं, ‘ए थांब रे मित्रा.. एवढय़ात नाही. अजून खूप काही राहिलं आहे. आता नाही. आत्ता नाही’ एवढंच म्हणत राहिले. किती वेळ कुणास ठाऊक. विमानाचं गदगदणं शांत होत अखेर थांबलं.
  कुणीच अजून काही बोलायच्या स्थितीत नव्हतं. गदगदणं पुन्हा होईल का असंही वाटत होतं.. जर्मन बाईनं कोटातनं डोकं वर काढलं होतं. मी कसंबसं डॉ. आगाशांना म्हटलं, ‘डॉक्टर, ठीक आहात ना?’ त्यांनी फक्त शांतपणे माझ्याकडे पाहिलं. एकदम वाटलं, आता विमानातल्या प्रत्येक माणसाच्या आत वेगवेगळं काहीसं मूलभूत घडलं असेल किंवा हललं असेल. ते काय असेल? गेल्या काही वेळात डॉक्टरांनी मनात काय पाहिलं असेल? आणि त्या जर्मन बाईनं? ते जे काही असेल ते आम्हाला प्रत्येकाला बदलवणारं असेल. त्या प्रत्येक ‘पाहण्यावर’ एक चित्रपट होईल. आता मी ज्याचं पुस्तक वाचत होते तो आंद्रे वायदा हा दिग्दर्शक या विमानात असता तर? त्यानं या सगळ्याकडे कसं पाहिलं असतं? अखेर पुन्हा न गदगदता विमानानं बर्लिनच्या जमिनीवर पाय टेकले आणि सगळा एकवटलेला वेग आवरत सावरत ते थांबलं.
     माझ्या गाडीला एकदा अपघात झाला. तिचा चक्काचूर झाला, पण माझ्या नखालासुद्धा काही झालं नव्हतं. तेव्हा उतरून मी गाडीच्या पाया पडले होते. स्वत: जखमी होऊन माझा जीव वाचवल्याबद्दल. या विमानाच्या पायऱ्या उतरण्यापूर्वी हलकेच त्याच्या कठडय़ाला स्पर्श केला. म्हटलं, ‘वाचवलंस रे बाबा!’ मागेच भेदरलेली जर्मन बाई उभी होती. तिला म्हटलं, ‘तू नेहमी येतेस का विमानानं?’ ती म्हणाली, ‘खूपदा, खूपदा. पण आजच्यासारखं कधीच नव्हतं झालं, कधीच. हे फारच भयंकर होतं! भयंकर!’ बर्लिनला पोचले आणि तिथल्या हरखून जाण्यात हे सगळं चक्क विसरले. तिथून परत आले. बर्लिनला माझ्या ‘किल्ला’ चित्रपटाला मोठं बक्षीस मिळालं म्हणून आमच्या एका मित्रानं मुंबईत मोठी पार्टी दिली. त्या पार्टीत ‘किल्ला’चा दिग्दर्शक अविनाश अरुण कुणा एकाकडे बोट दाखवून म्हणाला, ‘हा माझा फिल्म इन्स्टिटय़ूटचा बॅचमेट, पंकज. त्याचा ‘लाजवंती’ हा चित्रपट बर्लिनमध्ये एका वेगळ्या सेक्शनमध्ये दाखवला गेला.’ मी हातातला केशरी संत्र्यांच्या ज्यूसचा ग्लास ओठाला लावत म्हटलं, ‘हो हो, मी वाचलं आहे या चित्रपटाविषयी. उत्सुकता आहे पाहण्याची.’ तो दिग्दर्शक शांतपणे माझ्या डोळ्यात बघत म्हणाला, ‘मीही त्याच विमानात होतो.’ मी म्हटलं, ‘कुठल्या?’ तो म्हणाला, ‘त्याच..’ एकदम थांबले, म्हटलं, ‘हो? तू पण होतास..?’ तो शांत स्थिरपणे म्हणाला, ‘देव आपल्याबरोबर होता. म्हणून तू आज इथे माझ्याबरोबर ज्यूस पीत उभी आहेस.’ मी खोल श्वास घेतला.
समोरच बर्लिनला ‘किल्ला’साठी मिळालेलं बक्षीस दिसत होतं, क्रिस्टल बेअर. काचेचं अस्वल. भारतीय चित्रपटाला मिळालेलं पाहिलं क्रिस्टल बेअर.. मी ते माझ्या डोळ्यांनी पाहत होते. मी त्याला म्हटलं, ‘‘हो देव नक्कीच माझ्याबरोबर होता आणि आहे!’’