एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आपण मोबाइलचा वापर करतो, मात्र आकांक्षा हजारी या तरुणीनं थोडा वेगळा विचार करत मोबाइल क्रांतीच्या माध्यमातून वंचितांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न केला. यासाठीच तिने ‘एम.पानी’चं रोपटं रुजवलं. आकांक्षाच्या या अनोख्या उपक्रमाची ही ओळख..

मो बाइलचा होणारा अतिप्रचंड वापर, मोबाइलच्या स्क्रीनमध्ये डोकं खुपसून बसलेली तरुणाई किंवा मोबाइल वापराचे इतर अनेक दुष्परिणाम.. याबाबत सतत चर्चा झडत असतात. मोबाइलमुळे माणसातला प्रत्यक्ष संवाद संपला, असा आक्षेपही घेतला जातो. मात्र तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मोबाइल आज चन राहिलेली नसून एक गरज बनली आहे. आज जवळपास प्रत्येकाकडे मोबाइल असतोच असतो, म्हणून याच मोबाइलचा वापर समाजाच्या भल्यासाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाला तर? मोबाइल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वात खालच्या स्तरापर्यंत पोहोचणं शक्य झालं तर? मोबाइलचा कल्पकतेनं वापर करून व्यवसाय उभारण्यासोबत समाजसेवा करता आली तर? आकांक्षा हजारी या तरुणीनंही हाच विचार केला. आपली कल्पनाशक्ती लढवली आणि जन्म झाला तो ‘एम.पानी’ या संकल्पनेचा..
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना किंवा डिपार्टमेंटल स्टोअर्समधून खरेदी करणाऱ्यांना रिवॉर्ड पॉइंट्सची माहिती असेल. ग्राहकांनी केलेल्या खरेदीवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळत जातात. या पॉइंट्सच्या बदल्यात काही वस्तू मिळतात. डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये पॉइंट्सच्या आधारावर भरघोस सूट दिली जाते. मोबाइल वापरणाऱ्यांसाठीही अशाच काही योजना असतात. आकांक्षानंही याच संकल्पनेचा वापर करायचं ठरवलं पण थोडय़ा वेगळ्या पद्धतीने.
आकांक्षाचा जन्म पुण्याचा. तिच्या वडिलांची बोटीवरची नोकरी असल्याने तिच्या बालपणातला बराचसा काळा बोटीवरच गेला. आकांक्षा थोडी मोठी झाल्यावर तिचं कुटुंब हाँगकाँगला स्थायिक झालं. हाँगकाँगमध्ये क्रीडा प्रशिक्षण मोफत दिलं जात असल्याने आकांक्षाने स्क्व्ॉशचं प्रशिक्षण घेतलं. राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावर ती खेळली. हाँगकाँगच्या राष्ट्रीय स्क्व्ॉश संघातल्या चिनी खेळाडूंच्या गोतावळ्यात ती एकमेव भारतीय होती. खेळाच्या निमित्ताने तिला जगभर भ्रमंती करता आली. आकांक्षा मुळातच हुशार, कल्पक आणि धडपडी.. तिच्याकडे नव्यानव्या कल्पनांची अजिबात कमतरता नव्हती. पदवीसाठी अमेरिकेतल्या ‘िप्रसेटॉन’ विद्यापीठात तिने प्रवेश घेतला. अमेरिकेत असताना युवा वर्गाला आपला आवाज सरकापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठच उपलब्ध नसल्याचं तिच्या लक्षात आलं. मग आकांक्षा आणि तिच्या सहकाऱ्यांनी ‘यंग प्रोफशनल्स फॉर फॉरेन पॉलिसी फोरम’ची स्थापना केली. अमेरिकेतल्या वास्तव्यात आकांक्षाने अनेक उपक्रम राबवले. राजकारण आणि मध्य-पूर्वेतल्या घडमोडी या विषयांसह तिने पदवी मिळवली. यादरम्यान तिला अनेक गोष्टी शिकता आल्या. आपल्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा फायदा भारतासारख्या लोकसंख्येने अवाढव्य असलेल्या देशाला मिळवून देता येईल, असा विचार करून २००९ साली आकांक्षा भारतात परतली, ‘टेक्नो सव्‍‌र्ह’ या कंपनीसोबत देशाच्या ग्रामीण भागात कृषी क्षेत्रात तिने काम केलं. यामुळे आकांक्षाला आपल्या कृषी क्षेत्राची फार जवळून ओळख झाली. ग्रामीण भागात लोकांकडे आरोग्य, शिक्षण, स्वच्छता याबाबतच्या मूलभूत सोयी उपलब्ध नसल्या तरी प्रत्येकाकडे मोबाइल असतो. शिवाय तालुक्याचं ठिकाण असो वा लहानसं गाव तिथल्या दुकानांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादनं विक्रीसाठी सहज उपलब्ध होतात, हे तिच्या लक्षात आलं. मोठय़ा कंपन्यांनी गावाची वेस ओलांडली असली तरी सरकारी योजना मात्र लोकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात अपयशी ठरत असल्याचा विरोधाभास तिच्या लक्षात आला आणि ही बाब तिला चांगलीच खटकली.
म्हणूनच मोबाइल आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची ग्रामीण भागापर्यंतची पोच यांचा वापर करून तळागाळातल्या लोकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा संकल्प तिने सोडला. त्यानंतर मोबाइलच्या माध्यमातून पॉइंट्स देऊन लॉयल्टी कार्यक्रम राबवण्याची अनोखी कल्पना तिला सुचली.
आकांक्षाची ही कल्पना अनेकांनी उचलून धरली. याच संकल्पनेसाठी तिला २०११ साली ‘हल्टझ पारितोषिक’ मिळालं. एक दशलक्ष अमेरिकन डॉलर्स पारितोषिक स्वरूपात मिळाल्यानंतर आकांक्षाच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले. याच रकमेचा भांडवल म्हणून वापर करून तिने ‘एम.पानी’चं रोपटं रुजवलं. एक दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी मोठी रक्कम पारितोषिक स्वरूपात मिळाली असली तरीही हल्टझच्या नियमांनुसार तिला एका वेळी संपूर्ण रक्कम मिळाली नाही. त्यामुळे अतिरिक्त भांडवलाचा प्रश्न तिच्यासमोर होता. त्या वेळी ‘अनलिमिटेड इंडिया’ तिच्या मदतीला आली. सामाजिक क्षेत्रातल्या अशा उपक्रमांना ही संस्था आíथक मदत देते. त्यांच्याकडून ‘एम.पानी’ला वर्षांला १० हजार डॉलर्सची मदत मिळाली. यामुळे मुंबईसारख्या शहरात ‘एम.पानी’चा डोलारा उभा राहू शकला.
२०१३ साली ‘एम.पानी’च्या कार्याला अधिकृतपणे सुरुवात झाली. ‘एम.पानी’ हा मोबाइलवर आधारित जगातला पहिला लॉयल्टी कार्यक्रम आहे. आकांक्षा हजारी ‘एम.पानी’ची संस्थापक आणि सीईओ. ‘एम.पानी’च्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध नसलेल्या कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी लॉयल्टी कार्यक्रम राबवला जातो. लॉयल्टी कार्यक्रम म्हणजे नेमकं काय, तर ‘एम.पानी’नं मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्या तसंच डिपार्टमेंटल स्टोअर्स किंवा स्थानिक दुकानदारांसोबत करार केलाय. या कंपन्यांची सेवा वापरल्यास किंवा ‘एम.पानी’शी संलग्न असलेल्या दुकानांमधून खरेदी केल्यास ‘एम.पानी’च्या सदस्य ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. म्हणजे जर योजनेचा सदस्य ‘एम.पानी’नं करार केलेल्या कंपनीची मोबाइल सेवा वापरत असेल तर त्यानं मोबाइल रिचार्ज केला किंवा डाटा प्लान घेतला तर त्या बदल्यात काही रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातील. या पॉइंट्सचा वापर त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी केला जाईल. या पॉइंट्सच्या बदल्यात त्यांना वस्तू किंवा बक्षिस दिलं जाईल. या वस्तू कोणत्या, तर कमी उत्पन्न गटाचं आयुष्य बदलणाऱ्या, त्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणणाऱ्या. उदाहरण द्यायचं झालं तर, जलशुद्धीकरणाचं उपकरण सवलतीत मिळेल, इंग्रजीचे धडे देणारी पुस्तकं/ क्लासेसमध्ये प्रवेश दिला जाईल, खेळासाठी लागणारं साहित्य, आरोग्यविषयक सुविधा इत्यादी. सदस्यांनी पॉइंट्स जमवायचे आणि त्या बदल्यात चनीच्या वस्तूंऐवजी मूलभूत सुविधा मिळवायच्या, अशी ही संकल्पना. विविध शहरांमधल्या मोबाइल रिचार्ज करून देणाऱ्या तसंच इतर दुकानांमध्ये ‘एम.पानी’ या संकल्पनेची माहिती देणारी पत्रकं लावण्यात आली आहेत. हे दुकानदार ‘एम.पानी’ची फ्रँचायझी म्हणून काम करतात. या फ्रँचायझींकडून ‘एम.पानी’चं सदस्यत्व घेता येतं.
‘एम.पानी’ ही संकल्पना अशासाठी ठळकपणे उठून दिसते, कारण एकीकडे या संकल्पनेच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात चांगले बदल घडतील, तर दुसरीकडे समाजावर आपल्या उत्पादनाचा किंवा सेवेचा प्रभाव पाडण्याचं उद्योगक्षेत्राला अपेक्षित कामही चांगल्या मार्गाने होऊ शकेल. उद्योगजगताला आपल्या उत्पादनाबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा असतो. या माध्यमातून त्यांचा कार्यभागही साधला जातो. पण तो अधिक प्रभावीपणे, असं आकांक्षा सांगते.
२०१३ साली ‘एम.पानी’च्या टीमनं मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर काही उपक्रम राबवले. त्यांनी निवड केली मध्य मुंबईतल्या शिवडी आणि आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीची. इथल्या अनेक लोकांना साधं पिण्याचं शुद्ध पाणीही नशिबात नाही, तर इतर सोयीसुविधांविषयी काय बोलावे? ‘एम.पानी’नं ४ हजार ते २० हजार रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेली या भागातली एक हजार घरं निवडली. या लोकांच्या गरजा जाणून घेतल्या, सर्वेक्षणं केली. लोकांसोबत बठका घेतल्या. काहींना जलशुद्धीकरण उपकरणांची गरज होती तर काहींना मुलांसाठी शिकवण्या, इंग्रजीचे धडे देणारे अभ्यासक्रम, आरोग्यविषयक सोयी-सुविधा हव्या होत्या. प्रत्येकाच्या आवश्यकतेनुसार आकांक्षाने या सुविधा देऊ शकणाऱ्या कंपन्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. यामुळे रिवॉर्ड पॉइंट्सच्या बदल्यात लोकांना हवी ती सुविधा देण्याचा तिचा उद्देश होता. आकांक्षाने लॉयल्टी कार्यक्रमांची रचना तर केलीच सोबतच प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबवलेल्या गरीब वस्त्यांमधल्या कुटुंबांच्या उत्पन्न-खर्चाबाबत माहिती गोळा करून खर्च कमी करून बचत कशी वाढवता येईल, याबाबत त्यांना मार्गदर्शनही केलं.
अवघ्या दोन वर्षांच्या काळात आकांक्षामुळं या भागात बरंच मोठं काम झालंय. वंचित मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘प्रथम’ या सेवाभावी संस्थेसोबतही ‘एम.पानी’नं भागीदारी केली आहे. प्रथमच्या माध्यमातून वंचित मुलांच्या शिक्षणासाठी ‘एम.पानी’ प्रयत्नशील आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागासह ग्रामीण भागातही ‘एम.पानी’नं आपलं क्षेत्र विस्तारलंय. एवढंच नाही तर आफ्रिकेतल्या काही मागास देशांमध्येही ‘एम.पानी’नं मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत सहकार्य केलंय. ‘एम.पानी’ ही संकल्पना आकांक्षाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायची आहे. समाजातल्या शेवटच्या स्तरातल्या लोकांना ग्राहक म्हणून नवी ओळख तिला मिळवून द्यायचीये.
‘एम.पानी’चं रोपटं रुजून फक्त दोनच र्वष झाली असली तरी अल्पावधीतच आकांक्षा आणि तिच्या सहकाऱ्यांनी अनेकांना या संकल्पनेशी जोडून घेतलं. गरीब वस्त्यांमधल्या घराघरात, प्रत्येक दुकानांत जाऊ न ‘एम.पानी’ ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं आव्हान तिनं पेललं. ‘एम.पानी’च्या कामाला आता कुठे सुरुवात झालीये. आकांक्षाला मोठी मजल मारायची आहे. आपलं आकाश तिला बरंच विस्तारायचंय.
व्यावसायिक दृष्टिकोनाला समाजसेवेची जोड देत आकांक्षाने अनेकांपुढे आदर्श उभा केला आहे. थोडा वेगळा विचार केला तर तंत्रज्ञानाचा समाजाच्या भल्यासाठी वापर करता येतो हे आकांक्षानं दाखवून दिलंय. आकांक्षाच्या प्रयत्नांमुळे भारतातल्याच नाही तर जगभरातल्या वंचितांच्या आयुष्याला नवा अर्थ मिळालाय. तंत्रज्ञानाचा समजाच्या भल्यासाठी वापर करणाऱ्या आकांक्षाचं उदाहरण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाईला नवी दृष्टी आणि दिशा देणारं ठरेल, यात शंका नाही.
श्रीशा वागळे-जादोन -shreesha.indian@gmail.com