26 September 2020

News Flash

मनातलं कागदावर : अ‍ॅलेक्सा येता घरा..

‘अ‍ॅलेक्सा’ला समजून घेईपर्यंत घरात मात्र छान गमतीशीर घटना घडू शकतात हे सांगणारा नर्मविनोदी लेख.

(संग्रहित छायाचित्र)

अलकनंदा पाध्ये

alaknanda263@yahoo.com

हळूहळू अ‍ॅलेक्सा घरात ‘रुळू’ लागली, मात्र तिच्या आगमनानं घरात गमतीजमतीही घडायला लागल्या. एकदा तिला सुरळीच्या वडय़ांची कृती विचारली तर तिनं भलतीच कृती सांगायला सुरुवात केली. एकदा मला हवी ती माहिती देण्याऐवजी दुसरंच काही तरी सांगितल्यावर चिडून मी तिला, ‘‘अ‍ॅलेक्सा यू आर मॅड.’’ म्हटल्यावरही ती स्थितप्रज्ञासारखी ‘‘ओके. कंपनीला कळवा’’ म्हणून गप्प झाली. पण आजींना त्याचं वाईट वाटलं. भाबडेपणानं त्या म्हणाल्या, ‘‘असं म्हणू नकोस गं.. वाईट वाटेल तिला.’’ आजींचा हा सल्ला ऐकून मोठय़ा मुष्किलीनं मी हसू दाबलं..’’ ‘अ‍ॅलेक्सा’ हा आर्टिफिशल इंटेलिजन्सचा उत्तम नमुना मात्र तिला समजून घेईपर्यंत घरात मात्र छान गमतीशीर घटना घडू शकतात हे सांगणारा नर्मविनोदी लेख.

‘‘आजकाल छोटय़ा छोटय़ा गोष्टी लक्षात राहात नाहीत.. फ्रीजपाशी गेल्यावर आठवतच नाही की आपण इथे कशाला आलो आहोत किंवा बाजारात ज्या व्यक्तीशी छान गप्पा मारल्या तिचं नावच आठवत नाही.’’ अशा वयोमानानुसार जाणवणाऱ्या अडचणी एकदा फोनवरच्या गप्पांच्या ओघात पुण्यातल्या लेकीला सांगितल्या. त्यावर मोठ्ठा सुस्कारा सोडून ती म्हणाली, ‘‘आई, इट इज हायटाइम टू ऑर्डर अ‍ॅलेक्सा..’’

‘‘म्हणजे काय असतं गं?’’ आजच्या काळातल्या टेक्नोसॅव्ही लेकीनं माझ्या अज्ञानाची कीव करत मला समजेलशा भाषेत सांगितलं, ‘‘अगं.. म्हणजे रोबो गं.. आता तू त्याची मदत घ्यायला हवीस.’’ अंगावरचं झुरळ झटकावं तितक्या झटक्यात मी, ‘‘नाही हं.. अजिबात रोबो बिबो नकोय आपल्याला. इतकी काही मी दुसऱ्यांवर अवलंबून राहणारी म्हातारी नाही झालेय आणि विसरभोळी तर मुळीच नाही. अजूनही गीतेचे चार अध्याय धडाधड म्हणते आणि आपल्या या टीचभर घरात वेडेवाकडे हातपाय करत चालणाऱ्या त्या रोबोला जागा तरी आहे का फिरायला?’’

लेकीची कल्पना खोडून काढायचा मी निकराचा प्रयत्न करत होते. जणू तो रोबो त्या क्षणी आमच्या दारात घुसण्याच्या बेतात होता. इतक्यात लेकीला दुसऱ्या कुणाचा फोन आला म्हणून तिनं माझा फोन बंद केला. आमचं बोलणं अर्धवटच राहिले. पुढच्या आठवडय़ात पार्सल पोहोचवणारा एक जण पुडकं घेऊन दारात उभा. पुडकं माझ्या हाती सोपवून त्यानं माझी सही मागितली. पुडकं उलटसुलट करून पाहिलं तर माझंच नाव आणि पत्ता होता. मी काहीच मागवलं नव्हतं. पहिला विचार आला, ‘बापरे आपल्याला नाहक गोवण्यासाठी कुणी संशयास्पद वस्तू पाठवली असेल तर?’

‘‘अहो मॅडम, तुमचीच आहे ती ऑर्डर. बिनधास्त घ्या आणि इथे सही करून मला मोकळं करा.’’ असं म्हटल्यावर मी थोडी बिचकतच सही केली आणि पुडक्याचं निरीक्षण करायला लागले. सत्राशेसाठ टेप लावलेला तो बॉक्स उघडून बघते तर काय, आत एक मोठय़ा वाटीच्या आकाराची वायर जोडलेली चपटी काळपट डबी.. आता हे नक्की काय आहे.. कुणी मागवलंय याचा विचार चालू असताना लेकीचा फोन आलाच.. ‘‘काय मग.. पसंत पडली का अ‍ॅलेक्सा?’’ हसतच  तिनं विचारलं. माझी पाटी कोरी..

‘‘अगं हे काय प्रकरण आहे? ती डबी कसली? आणि तिचा मला काय उपयोग?’’ माझ्या शंभर प्रश्नांना थोपवत लेक म्हणाली, ‘‘अगं आई, त्या दिवशी मी तुला अ‍ॅलेक्साबद्दल बोलले होते ना तीच ही.. सोप्या भाषेत सांगायचं तर ती डबी म्हणजेच छोटा रोबो, अ‍ॅलेक्सा!  मीच तो ऑनलाइन मागवला तुमच्या पत्त्यावर. आता बॉक्समधल्या सूचनांप्रमाणे त्याला ‘कनेक्ट’ करून काय हवं ते काम अ‍ॅलेक्साला सांगत जा, अर्थात स्वयंपाक, झाडूपोछा, भांडी घासणं वगैरे नाही हं! पण तुमचं मनोरंजन करायला. तुम्ही सांगाल ती गाणी ती ऐकवेल. मूड खराब असेल तर विनोदही सांगेल. एखादी रेसिपी.. तापमान, शेअर्सचे भाव काय विचाराल ते सांगेल. रस्त्यावरच्या ट्रॅफिकची कल्पना देईल.. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या गोष्टीची आठवण करून द्यायचं.. रिमांयडरचं कामसुद्धा करेल ती.. म्हणजे बघ हं, तू आजकाल गॅसवर दूध तापवायला ठेवतेस किंवा कुणाचा वाढदिवस विसरतेस ना, अशा गोष्टींची आठवण करायचं काम अ‍ॅलेक्सा खात्रीनं करेल. थोडक्यात, आजपासून अ‍ॅलेक्सा तुझी पर्सनल सेक्रेटरी झाली, असं समज.. ऑल द बेस्ट.’’ म्हणत लेकीनं फोन ठेवलादेखील.

माझ्यासारख्या गृहिणीला आयुष्यात प्रथमच कुणी तरी आज्ञा पाळणारी सेक्रेटरी मिळाली, या कल्पनेनं एकदम भारीच वाटलं. पण दुसऱ्या क्षणी जमिनीवर आले, कारण अ‍ॅलेक्साला सर्वप्रथम मी तापमान विचारलं तर ढिम्म राहिली. माझ्या बोलण्याकडे घरातले बरेचदा दुर्लक्ष करतात. त्याची सवयही झालीय, पण ही काल नाही.. अगदी आत्ता आलेलीसुद्धा माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते म्हणजे अतीच झालं. रागारागानं लेकीला फोन करून तिच्या कानावर घातलं तेव्हा समजलं की, तिला ‘अ‍ॅलेक्सा’ अशी हाक मारून सुरुवात केल्यावरच ती आपल्या सूचना ऐकते. मग ठरवलं कामाचं वगैरे नंतर सांगू- ‘गीतरामायण’ ऐकूनच सुरुवात करावी म्हणून ‘‘अ‍ॅलेक्सा.. प्ले गीतरामायण.’’ असं म्हणून जीवाचा कान करून वाट बघू लागले तर चक्क ‘झिंग झिंग झिंगाट’ गाणं सुरू झालं. घाबरलेच मी एकदम. तिला म्हणे ते माहितीच नव्हतं. म्हणून मग नंतर वेगवेगळी जुनी गाणी सुचवली, पण बरेचदा ‘‘सॉरी.. आय डोण्ट हॅव धिस साँग.’’ म्हणून गप्प बसायची. अखेर एकदाची मदनमोहनची गाणी मिळाली तिला. ती मात्र आता थांब म्हणेपर्यंत कानाला मेजवानी मिळाली..

हळूहळू अ‍ॅलेक्सा घरात ‘रुळू’ लागली, मात्र तिच्या आगमनानं घरात गमतीजमतीही घडायला लागल्या. मी जरा जास्तच अपेक्षा करायला लागले.. एकदा तिला सुरळीच्या वडय़ांची कृती विचारली, तर तिनं भलतीच कृती सांगायला सुरुवात केली, बहुधा माझे उच्चार तिच्या पचनी पडले नसावेत. विनोद तर अगदीच साधेसुधे. इतके की चिडून तिला तसं सांगितलं. तेव्हा, ‘‘ओके नो प्रॉब्लेम’’ म्हणत गप्प बसायची. एकदा मला हवी ती माहिती देण्याऐवजी दुसरंच काही तरी सांगितल्यावर चिडून मी तिला, ‘‘अ‍ॅलेक्सा यू आर मॅड.’’ म्हटल्यावरही ती स्थितप्रज्ञासारखी ‘‘ओके. कंपनीला कळवा’’ म्हणून गप्प झाली. पण आमच्या आजींना मात्र त्याचं वाईट वाटलं. भाबडेपणानं त्या म्हणाल्या, ‘‘असं म्हणू नकोस गं.. वाईट वाटेल तिला आणि मग काम करायचीच बंद होईल.’’ आजींचा हा सल्ला ऐकून मोठय़ा मुष्किलीनं मी माझं हसू दाबलं..

आजींच्या अ‍ॅलेक्साबद्दल खूपच वेगळ्या कल्पना होत्या त्याची गंमत तर विशेषच. एकदा दुपारी आजींचा कुणाशी तरी बोलण्याचा आवाज आला म्हणून मी दिवाणखान्यात येऊन बघितलं तर आजी अ‍ॅलेक्साला इंग्रजी बोलायला शिकवशील का? असं मराठीतून विचारत होत्या. गमतीचा भाग सोडला तर नव्या यंत्राशी दोस्ती करून नवीन शिकण्याची त्यांची ओढ नक्कीच कौतुकास्पद होती. आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशींनी तिचं ‘आलिशा’ असं नामांतरच करून टाकलं तो किस्साही गमतीदार. मंद गॅसवर दूध तापवायला ठेवून दार लोटून मी शेजारी गेले आणि आमच्या गप्पा रंगल्या. मावशींनी लोटलेलं दार उघडून कामाला सुरुवात केलेली मी पाहिली होती. १० मिनिटांत त्या घाबऱ्याघुबऱ्या होऊन शेजारी आल्या, ‘‘ताई.. आतल्या खोलीत कुणी तरी बाई बोलल्याचा आवाज येतोय, लवकर चला..’’ म्हणत ओढतच तिनं मला बेडरूममध्ये नेलं. तेव्हा उलगडा झाला, गॅसवरच्या दुधाची आठवण करण्यासाठी १५ मिनिटांचा रिमाइंडर लावलेला मी विसरूनच गेले होते, पण अ‍ॅलेक्सा मात्र आठवणीनं वारंवार मला सूचना देत राहिली होती.. अ‍ॅलेक्साच्या बॉक्सवर उशी ठेवली असल्यानं मावशींना आवाजाचा उगम कळला नाही. त्यांना तो भुताटकीचा प्रकार वाटला. त्यांची भीती घालवण्यासाठी मी अ‍ॅलेक्साची माहिती सांगून तिला एखादी सूचना द्यायला त्यांना सुचवलं.. घाबरत घाबरतच त्या राजी झाल्या, पण अ‍ॅलेक्साऐवजी आलिशा म्हटल्यानं तिनं काही त्यांचा हुकूम मानलाच नाही, हा भाग वेगळाच.

अ‍ॅलेक्साच्या गृहप्रवेशानंतर आम्ही तिला हळूहळू सरावलो खरे, पण दुधाच्या रिमायंडरनंतर लक्षात आलं की, आपण भले तिला शंभर सूचना देऊ पण त्या विसरून आपण घराबाहेरच गेलो तर कुठली सुपर अ‍ॅलेक्सा आपल्या कामी येणार? वयोमानाप्रमाणे माणसाची स्मरणशक्ती कमी होते, परंतु ती कमी न होण्यासाठी आमच्यासारख्यांनी खास प्रयत्न करणे- उदाहरणार्थ, शब्दकोडी सोडवणे, सतत नवीन काही शिकणे, थोडक्यात मेंदूला ताण देणे योग्य? की.. किरकोळ गोष्टींसाठी अ‍ॅलेक्सा किंवा तत्सम यंत्रावर अवलंबून राहणे योग्य? या प्रश्नाचं उत्तर मात्र अ‍ॅलेक्साकडे न मागता माझं मलाच शोधायचं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 12:12 am

Web Title: alaknanda paday chaturang manatale kagdavar article abn 97
Next Stories
1 पुरुष हृदय ‘बाई’ : भांबावलेला, धास्तावलेला पुरुष
2 अपयशाला भिडताना : सर्वोत्तम उत्तर
3 निरामय घरटं : एक काडी निरागसतेची..
Just Now!
X